चल, घरी चल .....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
22 Sep 2017 - 11:34 pm

तू मरून, मोजून १३ वर्षे, ५ दिवस आणि काही तास झालेत. काय काय घडत नाही इतक्या काळात? म्हटलं तर फार काही. म्हटलं तर काहीच नाही. मरणाच्या क्षणापाशी काल गोठून जातो.
पण, तू निघून गेल्यापासून back up ठेवल्यासारखा भेटतोयस.

आधी फार जड गेलं. मी अनंत काळ अशीच रडत राहणार असं वाटलं. पण तसे नाही घडले. तू परत भेटलास! माझ्या घरासमोर मंदिरापाशी, रात्रभर पावसात वाट पहात उभारलेला. का तर, मी एकदा तरी खिडकी उघडेन, किती पाउस पडतोय असं म्हणत बाहेर बघेन, आणि तुला दिसेन. पहाटे पाऊस टीपटीप करीत थांबला. पुजारी आला. एवढ्या पावसात चहाचा रिकामा कप कोण ठेवून गेलं, म्हणून इकडे तिकडे विचारीत राहिला.

एकदा, मी तुझ्याकडे यायला निघाले होते. पार टोकापर्यंत पोहचले होते. तेवढ्यात तू रांगत रांगत आलास. म्हणालास, मला सांभाळ. मी इतका अजाण. बाळ. मला जप. मोठा कर. मग जा. नाही अडवणार. मन गुंतले. मी तुला उचलले. कायमचे.

तू मला परत भेटलास. गंगे किनारी. तिच्या धवल रूपासारखा. तरुण. देखणा. हजार स्वप्न घेऊन. इतका वेळ या गारठलेल्या नदीत पाय ठेवून बसशील तर, न्यूमोनिया होईल म्हणत मला उठवलेस. घेऊन गेलास. उबदार झोपडीत. माझे तळपाय शेकून दिलेस. गरम गरम खीर खायला घातलीस. पेटी काढून सूर आळवलेस. झोपी गेले तर डोक्यावरून हात फिरवत राहिलास. तो स्पर्श अजून झोपेत जाणवतो. सकाळी उठून पाहिले. तुझे विरागी हात गंगेला अर्घ्य देत होते. थोड्या वेळाने संगमावर तू शांतपणे निघून जाताना दिसलास.

परत आलास. म्हणालास, आता तू लिही, मी वाचतो. मी लिहू लागले. किती लिहिले? काय काय लिहिले? आठवत नाही. आठवायचेही नाही. पण लिहित राहिले. तू वाचत राहिलास. तू कधी उत्तर दिलेस का? म्हटले तर हो, म्हटले तर नाही. फार वर्षे लिहित राहिले. तुझे काहीच उत्तर नाही, म्हणून एकदा लिहायची थांबले. तसा तू माघारी वळलास. ‘का लिहित नाहीस, लिही. तू लिहिलेलं मी अनंत वेळा नंतर वाचत राहतो. त्यावरतीच जगतो.’ मग मी लिहित राहिले. कायमची.

तू परत हातात फूल घेऊन समुद्राकाठी उभा. म्हणालास, असे असंख्य किनारे आहेत. चल, तुला पलीकडचा सुंदर किनारा दाखवतो. मी गेले. तर तू मरुभूमीचे रेशीम पसरलेस. पायाला खडा टोचला नाही. हाताला काटा रुतला नाही. आकाश भरून चांदण्या पसरून ठेवल्या. प्रार्थनांनी आसमंत भारून टाकला. सूर्य होऊन त्रस्त केलेस, पण चंद्र होऊन मिठीत घेतलेस. तू भेटत राहिलास.

तू परवा परत आलास. म्हणालास, ‘चल आता परत जाऊ. मला जिथे पुरले होते, त्यावर पारिजात बहरून आला आहे. चार फुले वेच. तुझा स्पर्श होऊ दे. जीव परत गुंतू दे. घरी चल. शरीराची माती झाली. मनाची फुले झालीत. चल, घरी चल .....’

- शिवकन्या

वावरवाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानप्रवासभूगोलदेशांतरप्रकटनप्रतिसादप्रतिभा

प्रतिक्रिया

रेवती's picture

23 Sep 2017 - 1:33 am | रेवती

सशक्त लिखाण आहे.

ज्योति अळवणी's picture

23 Sep 2017 - 10:50 am | ज्योति अळवणी

अप्रतिम हा शब्द पण कमी पडेल. खूप खूप आवडला

मराठी कथालेखक's picture

23 Sep 2017 - 11:39 am | मराठी कथालेखक

दोनदा वाचूनही काही कळलं नाही.. रुपक आहे का काही ? राजकीय .. नारायण राणे वगैरे ?

चौथा कोनाडा's picture

23 Sep 2017 - 12:53 pm | चौथा कोनाडा

सुंदर !

थोडंसच, पण चुट्पुट लावणारं, अ‍ॅब्स्ट्रक्ट पेंटिंग सारखं !

खरोखर एखादं abstract painting ...

जव्हेरगंज's picture

23 Sep 2017 - 1:42 pm | जव्हेरगंज

खूपच आवडलं!!!
सुंदर!!!

पैसा's picture

23 Sep 2017 - 5:00 pm | पैसा

खूप छान!