बौद्धिक संपदा हक्क दिवस २०१७

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
26 Apr 2017 - 2:14 pm

h

.
.
(प्रासंगिक)

सोशल मिडीया आपल्या बोटावर नाचायला लागल्यापासून चांगलं काय झालं याचं मोजमाप प्रत्येकाचं वेगळं असेल. सोय आणि मनोरंजनाचे साधन म्हणून ते आवश्यक झालेय. पण दुष्परिणामही कमीअधिक प्रमाणात अनुभवायला मिळत आहेत.

एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे कसलीही खातरजमा ना करता, मूळ लेखकाला डावलून (कधी कधी तर वाचायच्या आधीच) पुढे ढकलण्याची प्रवृत्ती. छापलेले ते सर्व खरेच असे मानणारा एक वर्ग आजही आहे तसेच ढकलीतून आलेली माहिती खरेच त्या व्यक्तीने लिहिलीय असे मानून थेट मते बनवणारे लोक आहेत. लोक्स कुणालाही त्याने निर्माण न केलेल्या कलाकृतीबद्दल उगाच 'चान चान' म्हणतात..बापडा तोही खूष होतो - हेही दिवस जातील, पण लोकांचं शिक्षण झाल्याशिवाय हे होणार नाही. मूळ कलाकार किंवा संशोधकाला फाट्यावर मारून त्याची कला किंवा एखादी वस्तू, पद्धत आपलीच म्हणून वापरणे ही सहज प्रवृत्ती असली तरी सुसंस्कृतपणा नक्कीच नाही. पोलीस नाही म्हणून 'नो एंट्री' गल्लीत उलट्या दिशेने घुसणे किंवा रस्त्यातले पडलेली नोट हळूच खिशात घालणे यासारखेच हे कृत्य म्हणावे लागेल. अशाने मूळ सादरकर्त्याला नक्कीच वेदना होत असणार. पण असभ्य व्यक्तींना त्याच्याशी घेणे नसते.

आपणही या हक्काची कळून वा नकळत पायमल्ली करतो का? कुठे कुठे करतो? याचा विचार व्हायला हवाय.
कदाचित अनेकदा करतो- कायप्पावर काहीही निनावी ढकलणे, प्रेझेंटेशनमध्ये तक्ते/ चित्रे, मूळ स्रोताचा नामनिर्देश न करता वापरणे, अनधिकृत सॉफ्टवेअर्स शोधणे- वापरणे, स्वस्त मिळते म्हणून नकली माल घेणे - यादी मोठी होईल.

पूर्वी २०००साली बंगळुरातल्या केम्प फोर्ट वर भलामोठ्ठा मिकी माउस लावला होता. ते पाहून म्हणे तिथल्या एका चतुर वकिलाने डिस्नीशी संपर्क साधून 'ही तुमच्या चिन्हाची चोरी आहे' हे पटवून त्यांचे वकीलपत्र मिळवले. नंतर केस दाखल करून कोर्टाबाहेर प्रकरण मिटवले. नंतर हा मिकी माऊस हटवावा लागला. २००० सालामध्ये दोनतीन कोटींची नुकसानभरपाई ही अवाढव्य होती! अर्थात याचा विदा नाही. पण आम्हाला हा विषय शिकवताना शिक्षकाने हे उदाहरण दिले होते. पण हल्ली इंटरनेटच्या प्रसारामुळे अशी दुसर्‍याची चिन्हे/ चित्रे वापरताना मंडळी दहादा विचार करतील, नाही का?

विपो ही जीनिव्हास्थित संस्था याविषयी जागृती आणि नियमनाचे काम करते.
आमच्या कंपनीने दहा वर्षांपूर्वी एकदम १२५ जणांना विपोच्या बेसिक प्रमाणपत्र परीक्षेला बसवले होते, आणि आम्ही ऐंशीजण उत्तीर्ण झालो होतो. जिनेव्हावरून आलेले गुळगुळीत प्रमाणपत्र आपल्याला सुखावून जातेच, पण पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क याविषयी सर्वसाधारण माहिती होते हा एक मोठा फायदा. हल्ली अन्य बऱ्याच कंपन्या हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. एक तासाच्या या परीक्षेला शुल्क नाही, साहित्य सामग्री ऑन लाईन उपलब्ध आहे - कुणीही ती परिक्षा अगदी मोफत देऊ शकतात. आजही अनेक मोफत परीक्षा उपलब्ध आहेत आणि अल्प शुल्कात कांही विशेष प्राविण्य परीक्षा देता येतात.

२०१५ मध्ये कोरियन सॅमसंगने ऍपलला पेटंट हक्क उल्लंघन करून स्मार्टफोन बाजारात आणल्याबद्दल बिलियन डॉलर्सची नुकसानभरपाई दिल्याचे उदाहरण अगदी ताजे आहे. त्यामुळे काय झाले? तर सॅमसंग जरा शहाणे झाले. असं समजण्याचं कारण म्हणजे २०१६ मध्ये पुण्यातल्या एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या प्राध्यापकाला कंपनीच्या वकिलाचा फोन आला, की त्याचे इमेज प्रोसेसिंगसंबंधी असलेले सॉफ्टवेअरचे पेटंट सॅमसंग विकत घेऊ इच्छिते. विश्वास बसणार नाही अश्या किमतीला म्हणजे रुपयांमधे सुमारे एक कोटीला ते पेटंट विकले गेले. दुधाने पोळल्यावर ताकही फुंकून पिण्याचा प्रकार असला तरी पेटंटचे महत्वच यामुळे अधोरेखित होते.

कल्पना सुचली, नवीन आहे, तर पेटंट करून ठेवावे. अर्थात तेही दीर्घकाळीं टिकणारे नसते. मर्यादित काळानंतर कालबाह्य होते . ते जागतिक पातळीवरचे असेलच असे नाही. नुसते भारत, भारत अन चीन किंवा भारत+ युरोप असे कॉम्बो मध्ये घेता येते - त्यातले कायदेशीर मुद्दे आणि त्या संपदेचा प्रकार लक्षात घेऊन किती वर्षांसाठी संरक्षण मिळेल हे पेटंट सल्लागाराशी बोलून पहाता येते. पेटंट घ्यायचा खर्च सुमारे दहा ते वीस हजार रुपये येतो, पण आयुष्यभर सांगण्यासारखे किंबहुना मिरवण्यासारखे क्वालिफिकेशन आहे ते! आज भारतातून पन्नास हजारावर पेटंट्स दरवर्षी दाखल होतात. एकेकाळी आपल्या मागे असणाऱ्या चीनने २०१५ च्या जागतिक २९ लाख पैकी १०.१ लाख पेटंट्स दाखल करून पहिला क्रमांक पटकावला आहे. अमेरिका आणि जपान अनुक्रमे ५ आणि ४ लाखावर बरेच मागे आहेत. सरकारी पातळीवर चीन त्यांच्या आंतरराष्ट्रीय पेटंट धारकाला एक कोटी आरएमबी इतके अनुदान बक्षीस म्हणून देते. तिथले विद्यार्थी झपाटल्यासारखे पेटंट्स लिहीतायत. आपण खरंच फार मागे आणि आहोत. अश्याने नवी कल्पनासुद्धा निव्वळ उशीर झाला म्हणून आधीच दुसऱ्या कुणाच्या तरी नावावर लागते. अशी परिस्थिती मीही अनुभवली आहे.

जगभरात आजचा दिवस - २६ एप्रिल 'बौद्धिक संपदा दिवस' म्हणून साजरा होतो. कुठलीही आणि कुणाचीही निर्मिती, ही त्याची वैयक्तिक संपत्ती मानून त्याचा व्यावसायिक वापर करण्यापूर्वी परवानगी घेणे, नामनिर्देश अथवा किंमत मोजून वापरणे आवश्यक आहे, याची जागृती करण्याचा दिवस. २००० सालापासून औपचारिकरीत्या हा दिवस साजरा करतात. याच दिवशी मूर्त स्वरूपात विपो ही संस्था सुरू झाली. बौद्धिक संपदेमध्ये साहित्य, कला, संगीत, चिन्हे- आकृती, उत्पादन, त्यासाठीच्या विविध पद्धती, हे सर्व आलेच, पण त्याचा आवाका आणखीही मोठा आहे. एखाद्याच्या व्यावसायिक फायद्यावर गदा आली तर तो बौद्धिक संपदा हक्क दाखवून भरपाईसाठी उभा राहू शकतो.त्यासाठीचे नियम, नुकसानभरपाईची मोजणी , त्यासाठीच्या पद्धती -आता निश्चित केले गेले आहेत.

पेटंटची सुरुवात सव्वादोनशे वर्षांपूर्वी झाली. १० एप्रिल १७९० ला अमेरिकन पेटंट कायदा झाला. लगेच तीन महिन्यांत आधुनिक जगातले पहिले पेटंट सॅम्युअल हॉपकिन्स या अमेरिकनाला ३१ जुलै १७९० रोजी मिळाले. त्याने पोटॅश खताच्या मिश्रणासाठी हे पेटंट घेतले. पेटंटकरिता त्या त्या देशाच्या पातळीवर संघटना सुरू होणे, आंतरराष्ट्रीय संस्थ्यांशी ताळमेळ सुरू होणे, त्याचे विविध मसुदे, सामील होत गेलेले नवे देश आणि आजच्या सुदृढ अवस्थेतली १८९ देशांची विपो ही संस्था. हा इतिहास रंजक आहेच, पण तो जालावर वाचायलाही उपलब्ध आहे. प्रगत जगाला बौद्धिक संपदा हक्काची जाणीव आधी आणि जलद झाली. जोडीला परस्पर देशांतले पूरक कायदे, सहकार्य यामुळे विभागीय व्यापारात त्यांनी त्याचा उपयोग चांगला करून घेतला. जालावर माहिती घेताना असे दिसले की थॉमस एडिसनने १०९३ पेटंट्स मिळवली, त्यातली तब्बल १०८४ संशोधने, तर नऊ कलात्मक डिझाईनसाठी होती!

पेटंट म्हणले की आपल्या संदर्भात लगेच आठवते ते कडूनिंब, बासमती तांदूळ, हळदीचे पेटंट अन डॉ. माशेलकरांचा त्याविरोधात यशस्वी लढा !! परंपरागत ज्ञान या सदरात या वनस्पती आणि त्यांचे उपयोग येत असल्याने, शेकडो वर्षे घरोघरी वापरात असल्याने भारतीयांची बाजू वरचढ झाली अन अनर्थ टळला हे आपल्याला आठवत असेलच. त्या सगळ्या घटनाक्रमातून पेटंटविषयी जागृती कमी, अन देशाभिमान, आयुर्वेद कसा श्रेष्ठ याची चर्चाच जास्त झाली. म्हणजे ते कमी महत्वाचे आहे असे नव्हे, पण त्यातून बोध घेऊन आपण इतरांच्या बौद्धिक संपदेचा सन्मान करू लागलो का? तर फारसा नाही. भारतीयांचे पेटंट दाखल करण्याचे प्रमाण वाढले का? नाही - कारणे काही असोत, आपण तिथे कमी पडलो. कदाचित भरल्या पोटी ही जागरूकता अधिक चांगली जोपासली जात असेल.

मागच्या दशकात एका अमेरिकन ग्राहकाशी चर्चा करताना समजले, की आयपीआरच्या बाबतीत त्यांचा चीनपेक्षा भारतीयांवर अधिक विश्वास आहे. चिनी लोकांनी केव्हाच असा इतरांचा आदर करणे सोडले होते. त्या ग्राहक कंपनीचे उत्पादन चीनमध्ये आणि विकसन आमच्या कंपनीत होई. असे असून तिथल्या एका टिनपाट कंपनीने ते उपकरण जसेच्या तसे बाजारात आणले होते. पत्र्याच्या केसवर असलेला जुन्या डायवरचा एक अनावश्यक राहून गेलेला पंचसुद्धा जसाच्या तसा मारलेला. पण तक्रार करून फायदा झाला नाही, त्यांचे सरकार अश्या स्थानिक चोरांना मदतच करते.

कला, संगीताच्या क्षेत्रातही हे हक्क महत्वाचे आहेत. चित्रपट-नाटकाच्या पटकथा आता सुचल्या की लेखकाला त्या नोंदवून ठेवता येतात, नाहीतर लेखक राहील बाजूला अन बडे निर्माते हिट्ट चित्रपट देऊन मोकळे होतील!
चित्रपटातल्या एका प्रसंगात पार्श्वसंगीत म्हणून रेडिओवर लागलेले गाणे, अन्नू मलिकने त्याची 'प्रेरणा' घेऊन गाणे कंपोज करणे, खऱ्या रेडिओवर लागलेले तेच गाणे, पार्टीत कुणी सहज ते गाणे म्हणले तर त्या वेगवेगळ्या बाबी आहेत. पहिल्या तिघांनी व्यावसायिक उपयोग केला म्हणून परवानगी घेणे / मोबदला देणे/ उल्लेख करणे आवश्यक आहे, तर चौथे अव्यावसायिक, किंवा वैयक्तिक करमणूक असल्याने परवानगी किंवा पैसे द्यावे लागत नाहीत. अश्या अनेक घटना/ प्रसंग, चित्रे, चिन्हे, ट्रेडमार्क्स आपल्याला जाता येता रोजच दिसतात. जागृती होत जाईल तसे स्वतः संपदा हक्काचे उल्लंघन न करणे , मग दुसऱ्याला करू न देणे आणि आपल्या कलाकृतीचे हक्काने पैसे मागणे हे हळूहळू सुरू होईल.

जागतिक संघटनेकडून दरवर्षी कला, संस्कृती, उद्योग यातला एक विषय घेऊन जनजागृती केली जाते. या वर्षीचा विषय आहे- Innovation - Improving Lives. यावर्षी आपले जीवन आरोग्यपूर्ण , आरामदायी , सुरक्षित करण्यासाठीच्या कल्पना आणि उत्पादन-सेवांचा प्रसार केला जाईल. हवामान बदल, आरोग्य आणि वाढत्या लोकसंख्येचे प्रश्न हाताळण्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे . त्यासंबंधी तुमच्या कल्पना इथे फेसबुक पानावर मांडू शकता,
किंवा त्यासाठीच्या चिवचिवाटात सामील होऊ शकता .. #worldipday

बौद्धिक संपदा हक्क (IPR) आता ऐकून ऐकून आपल्या चांगले परिचित झालेत. तरी 'चलता है ' संस्कृतीतून आपण पूर्णपणे बाहेर पडलो नसल्याने हे हक्क जोपासणाऱ्यांपेक्षा ते पायदळी तुडवणारेच जास्त दिसत आहेत . त्यासाठी कायदे आहेतच, कठोर अंमलबजावणी झाली तर ओझे वाटण्याऐवजी बौद्धिक संपदेचा आदर करायला लागू अन प्रगत समाज म्हणून तसल्या सभ्यतेच्या दोन पावले जवळ जाऊ !

चला तर मग, आजच एक संकल्प करूया- येत्या काळात एक तरी पेटंट मिळवूयात ! त्यासाठी शुभेच्छा!

संदर्भ:
विपो संस्थळ
दूरशिक्षण दुवा

धोरणमांडणीसंस्कृतीकलाजीवनमानतंत्रप्रकटनविचारप्रतिसादशिफारसमाहितीप्रतिभा

प्रतिक्रिया

पिशी अबोली's picture

26 Apr 2017 - 2:36 pm | पिशी अबोली

लेख आवडला.

मस्त लिहिलेय. अतिशय आवडला लेख. वाखु साठवली आहे.

खूपच छान. खरोखर या विषयात लोकशिक्षण होणे गरजेचे आहे.
हा लेख मित्रमंडळीत तुमच्या नावासह शेअर करू का ? ( खर तर खऱ्या नावासह शेअर करायला जास्त आवडेल.

खेडूत's picture

26 Apr 2017 - 4:20 pm | खेडूत

करा की! लोकशिक्षण हाच तर उद्देश आहे.
आतापर्यंत दोन अभियांत्रिकी महाविद्यालयात याविषयी बोलायला गेलो होतो- प्राध्यापक अन मुले सगळ्यांनाच माहिती देण्याचा प्रयत्न असतो.
विपो च्या संस्थळावरही चांगली माहिती आहेच.

हो, विपो ची साईट पण चांगली आहे.
शेअर करतेय. धन्यवाद!

मस्तच खेडूत राव, आवडली माहिती
एखादे ट्रेनिंग करायची फार इच्छा आहे.
वाखू साठवलीय.

वरुण मोहिते's picture

26 Apr 2017 - 4:16 pm | वरुण मोहिते

ह्यात मेजरमेंट साठी पेटंट कसे मिळतात ? कारण पूर्वी बेंचमार्क उदाहरणार्थ लांबी मोजण्यासाठी एक धातूचा तुकडा असायचा प्लॅटिनम आणि इरिडियम चा मिश्र धातूंचा जगातील कुठलीही पट्टी ह्या बेंचमार्क शी तुलना करून किती अचूक मेजरमेंट आहे हे सांगता यायचे . नंतर हाच प्रकार लाईट वेव्हस शी तुलना करून जोडला गेला . आज अनेक पेटंट मेजरमेंट साठी पण आहेत ह्याची काही माहिती मिळेल का??
तसेच बायोटेकनॉलॉजि संदर्भात भारताचे पेटंट सातत्याने डावलण्यात आले आहेत असे ऐकले आहे . ह्यात काही तथ्य आहे का ?

खेडूत's picture

26 Apr 2017 - 4:23 pm | खेडूत

इथे शोधावे लागेल.
न मिळाल्यास आणि व्यावसायिक गरज असल्यास पेटंट सल्लागाराला विचारावे लागेल. शेवटी मोजमापाची बेंचमार्क पट्टी असेल तर इन्फ्रारेड पद्धतीने जास्त अचूक मोजता येणार. पण त्यातही पद्धतीनुसार सात आठ पेटंट असतील!

शलभ's picture

26 Apr 2017 - 5:02 pm | शलभ

मस्त माहिती

उदय's picture

26 Apr 2017 - 10:38 pm | उदय

WIPO ही मोनोपोली हक्क देणारी संस्था आहे. Intellectual Property च्या नावाखाली अनेक कंपन्यांनी गैरवापर केल्याची अनेक उदाहरणे आहेत.
A World Intellectual Property Organisation will always, understandably, lean towards applying the pre-selected tool-set of monopolisation.....

अधिक माहितीसाठी:
http://fsfe.org/activities/wipo/wiwo.en.html
https://www.eff.org/issues/intellectual-property

खूप छान माहिती. समयोचित लेख! धन्यवाद.

शब्दबम्बाळ's picture

27 Apr 2017 - 9:21 am | शब्दबम्बाळ

छान लेख, यावर मी देखील बऱ्याच दिवसांपासून लिहायचा विचार करत होतो. पण तुम्ही सविस्तर लिहिले आहे!
पेटंट शक्यतो गूगल वर शोधणे हे देखील धोक्याचे काम आहे कारण शेवटी ती देखील एक कंपनी आहे आणि ते तुमचे सगळे सर्च रिजल्ट पाहू शकतात.
अशी पेटंट शोधण्यासाठी काही विशिष्ट टूल असतात.
Orbit पेटंट सर्च हे असेच एक टूल आहे, जगभरातील सगळी पेटंट यावर शोढता येतात पण त्यासाठी तुम्ही सदस्य असणे गरजेचे आहे.

या शिवाय युरोपियन पेटंट शोधण्यासाठी Espacenet हे संस्थळ वापरू शकता. हि ऑफिशिअल वेब साईट आहे आणि इथे बरीच पेटंट पाहता येतात! :)

भारताचे देखील स्वतंत्र संस्थळ आहे. ते इथे पाहता येईल.

बाकी काही दिवसांपूर्वी थोडंफार खरडलं होत तेच इथे लिहितो...

पेटंट:
स्वतःच्या एखाद्या नवीन कल्पनेला कायद्याच्या कक्षेत आणून स्वतःच्या नावावर करण्याची प्रक्रिया म्हणजे पेटंट.

पेटंट का करायचे?
एखादी संकल्पना बाजारामध्ये प्रथम आणणाऱ्याचाच फायदा जास्त होतो. त्यामुळे अशा संकल्पनांना कायदेशीर संरक्षण मिळणे महत्वाचे असते. कारण त्या कंपनीने/व्यक्तीने त्यावर संशोधनासाठी खर्च केलेला असतो.
उदाहरण: एखाद्याने LED Bulb ची संकल्पना प्रथम मांडून पेटंट स्वतःच्या नावे केले तर कोणत्याही कंपनीला LED Bulb चे उत्पादन करण्यापूर्वी त्या माणसाची परवानगी घेणे आवश्यक ठरते. तसे न केल्यास तो माणूस न्यायालयात धाव घेऊन कंपनीवर केस दाखल करू शकतो.

पेटंट हि व्यक्तीच्या किंवा कंपनीच्या मालकीची असू शकतात (जसे कि Samsung )

पेटंट करण्याचे फायदे:
१.पेटंट नावावर झाले कि त्या संकल्पनेचा अधिकार प्राप्त होतो. ज्याच्या नावावर पेटंट आहे त्याच्या परवानगी शिवाय पेटंट वापरता येत नाही.
२. पेटंट मालक ते पेटंट ठराविक पैसे घेऊन कोणाला तरी वापरायची परवानगी देऊ शकतो किंवा अगदी पेटंट कोणालातरी विकू देखील शकतो. पण पेटंट विकल्यानंतर त्याचा त्यावर कोणताही हक्क राहत नाही. खरेदी करणारी व्यक्ती/कंपनी त्या पेटंट ची मालक होते.

पेटंट च्या मर्यादा:
१. पेटंट हे ठराविक वर्षांकरिता केले जाते. कोणतेही पेटंट मंजुरी साठी देण्यास (application charge )काही शुल्क असते.
समजा एक पेटंट १० वर्षांसाठी करण्यात आले आहे तर १० वर्षांनंतर ते लोकांसाठी खुले होते. म्हणजे पेटंट मालकाचा त्यावर हक्क राहत नाही. ते कोणीही समाजाच्या/स्वतःच्या फायद्यासाठी कोणीही वापरू शकते.
२. पेटंट ची प्रक्रिया हि प्रत्येक देशासाठी वेगळी असते. भारतात एखादे पेटंट कोणाच्या नावावर असेल तर याचा अर्थ असा नाही कि चीन मध्ये सुद्धा ती संकल्पना वापरता येणार नाही. प्रत्येक देशाचे पेटंट नियम वेगळे आहेत. त्यामुळे पेटंट हि त्या त्या देशामध्ये स्वतंत्रपणे फाईल केली जातात. (यामुळे samsung आणि iphone सारखे पेटंट भांडणे होतात, कारण samsung नि korea मध्ये घेतलेले पेटंट US मध्ये iphone च्या नावावर असू शकते!)
३. सगळ्याच गोष्टींची पेटंट घेत येत नाहीत. त्यात काहीतरी नाविन्य लागते.

पेटंट प्रक्रिया:
१. संकल्पना व्यवस्थित मांडून, शीर्षक आणि आकृत्यांच्या सहाय्याने समजावून द्यावी लागते
२. त्यानंतर आधी असलेल्या पेटंट शी समानता पहिल्या जातात जर नाविन्याच्या पातळीवर संकल्पना उतरत असेल तर पेटंट मंजूर केले जाते.

कॉपीराईट:
कोणीही लिहिलेले साहित्यक किंवा कलात्मक काम कॉपीराईट करता येते. (चित्रे, कविता, पुस्तक, कादंबरी , फोटो इ.)
यामुळे साहित्याकाराल आणि कलाकृतीला कायदेशीर संरक्षण मिळते.
साहित्याकाराची परवानगी न घेता कलाकृतीचे उत्पादन करता येत नाही.
तसेच परवानगी शिवाय त्यावर चित्रपट करणे नाटक करणे अशा गोष्टीही करता येत नाहीत किंवा मूळ कलाकृतीमध्ये भर/बदल करता येत नाही.
(बाकी सगळ सोप्प आहे)

ट्रेडमार्क:
कंपनीची ओळख दाखवणारे चिन्ह!
हे चिन्ह आकृती किंवा अक्षरांच्या स्वरुपात असू शकते.
ग्राहकांना कंपनीची ओळख पटवण्याचे काम हे चिन्ह करते.
हे देखील कायद्याने संरक्षित आहे. पण इथेही प्रत्येक देशाचे वेगळे नियम आहेत. त्यामुळे कधी कधी वाद होऊ शकतात.
(apple चा "iphone " ट्रेडमार्क चीन मध्ये दुसरी कंपनी वापरते!)

पैसा's picture

27 Apr 2017 - 10:18 am | पैसा

अतिशय समयोचित उत्तम लेख.

मराठी_माणूस's picture

27 Apr 2017 - 10:44 am | मराठी_माणूस

काही दिवसापुर्वी , लोकसत्ता मध्ये ह्या विषयावर खुप छान लेखमाला आली होती.
http://www.loksatta.com/-category/kathaaklechya/

अभिजीत अवलिया's picture

1 May 2017 - 5:53 pm | अभिजीत अवलिया

चांगला लेख आहे.