मोबियस भाग २ प्रकरण - २७ व भाग-३ प्रकरण २८

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
3 Mar 2017 - 7:33 pm

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

....एकलेपणा म्हणजे आभासाची आस, या पलिकडे काय असते ?

मोबियस

२७
दोराला बांधून एखादे पोते सोडावे तसे त्याला परत विवरात सोडण्यात आले. एकही जण एकही शब्द बोलत नव्हता. एखादी शवपेटी खड्ड्यात उतरवताना असते, साधारण तसे वातावरण होते म्हणाना! विवर खोल व अंधारे होते. चंद्राच्या प्रकाशात वाळूच्या टेकड्या उजळून निघाल्या होत्या व त्यावरील उठणारे तरंग काचेच्या काठासारखे चमकत होते. त्या वातावरणाशी काडीमोड घेत ते विवर मात्र काळ्याकुट्ट अंधारात बुडले होते. तो इतका दमला होता की त्याला मान वर करण्याइतकीही शक्ती उरली नव्हती. एकदा त्याने निकराने प्रयत्न करुन पाहिला पण चंद्राकडे पाहिल्यावर त्याला पोटात ढवळू लागले व चक्करही आली.

त्या अंधारात तिची आकृती गडद छायेसारखी दिसत होती. तो बिछान्याकडे जाताना ती बरोबर चालत होती पण त्याला ती दिसत नव्हती. तीच नाहीतर त्याला सगळेच अंधुक दिसत होते. बिछान्यावर पडल्यावरसुद्धा त्याला तो वाळूतून जिवाच्या कराराने पळतो आहे असा भास होत होता. अतिश्रमाने त्याला गाढ झोपही लागत नव्हती. त्याच्या मेंदूत अनेक चलत्चित्रांची सरमिसळ होत होती... कुत्र्यांचे भुंकण्याचे आवाज, वाळूच्या गाडीचा आवाज, वाळूचा आवाज... त्याला ती मध्यरात्री काहीतरी खाण्यासाठी कामावरुन आली आहे आणि तिने त्याच्या उशाशी असलेला कंदील लावला आहे हेही समजत होते. तहान लागल्यावर तो पूर्ण जागा झाला खरा पण थकल्यामुळे तो तिच्या मदतीला जाऊ शकला नाही.

काहीच करण्यासारखे नसल्यामुळे त्याने कंदील मोठा केला आणि विमनस्कपणे सिगारेट ओढत बसला. एक जाडा कोळी कंदीलाच्या काचेभोवती लटकत फेर्‍या मारत होता. आश्चर्यच होते. सिगरेटच्या चटक्याने तो मारुन टाकण्याची त्याला अनावर इच्छा झाली पण त्याने ती आवरली. त्याने काचेभोवती आपल्या प्रदक्षिणा चालूच ठेवल्या एखाद्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे. तंद्रीत ते पाहत असतानाच एका पतंगाने पंख फडफडवत त्या दिव्यावर झेप घेतली. काचेवर फडफडण्यार्‍या त्या पतंगाची अवाढव्य सावली भिंतीवर भयानक भीतीदायक वाटत होती. शेवटी तो त्या कंदीलाच्या कडीवर जाऊन स्तब्ध बसला. विचित्रच होता तो पतंग. त्याने सिगारेटचे जळते टोक त्या पतंगाला लावले आणि त्याचे मज्जातंतू नष्ट केले. निष्प्राण झालेल्या त्या पतंगाला त्याने त्या कोळ्याच्या मार्गात टाकले. अपेक्षित नाट्य त्याच क्षणी सुरु झाले. त्या कोळ्याने मस्त जेवणाच्या कल्पनेने जिभल्या चाटल्या असणार... निश्चितच.

या प्रकारचे कोळी असतात हे त्याला माहीत होते. जाळ्याऐवजी दिवा वापरण्याची त्यांची युक्ती फारच कल्पक वाटली त्याला. जाळी लावून सावजाची वाट बघत बसण्यापेक्षा हे केव्हाही बरं. निसर्गामधे असा प्रकाश मिळणे तसे अवघडच. चंद्राच्या प्रकाशात किंवा सूर्याच्या प्रकाशावर पतंग झेप घेत नाहीत... बहुधा या कोळ्यांचीही माणसाबरोबर उत्क्रांती झली असावी का? त्याच्या मनात विचार आला...पण मग पतंगाच्या ज्योतीवरील झेपेचे काय उत्तर आहे? पतंग वेगळा आणि कोळी वेगळा. पण उत्तर एकच आहे. पतंग ज्योतीवर झेप घेतो आणि कोळी ज्योतीवर तरंगतो. या साठी लागणारी ज्योत ही माणसाने दिली आहे... पतंग चंद्राच्या दिशेने झेप घेत नाही हाच त्याचा पुरावा आहे. एकाच जातीचा पतंग असे करतो असे असते तर समजू शकले असते पण सर्व जातीच्या पतंगांचे वागणे असेच असल्यामुळे हा निसर्गनियम आहे हे मानण्यास जागा आहे. हे पतंगाचे ज्योतीवर फडफडणे व कोळी, ज्योत व पतंगाचे एकमेकांशी जडलेले नाते. ‘काही कारण नसताना जर नियम अस्तित्वात येऊ लागले तर विश्वास कोणावर ठेवायचा..?’ त्याने स्वत:लाच प्रश्न केला.

त्याने डोळे मिटले. पापण्यांच्या आड त्याला एकप्रकारचा प्रकाश तरंगताना दिसू लागला. त्याने तो पकडण्याचा प्रयत्न केला पण तो दरवेळी त्याच्या पापण्यातून निसटत होता. वाळूतील किटकांच्या सावल्याच जणू...
तिच्या हुंदक्यांनी त्याला जाग आली..

“आता कशासाठी रडते आहेस तू?”

ती गडबडीने उठली. आपला रडवेला चेहरा लपवत ती म्हणाली,

“मला क्षमा करा! मी तुमच्यासाठी चहा टाकणार होते.”

तिच्या रडक्या आवाजाने त्याला आश्चर्य वाटले. चुलीतील लाकडे खालीवर करताना तिच्या थरथरणार्‍या उघड्या पाठीकडे पाहताना त्याला त्याचा अर्थ समजेना. तिचे विचार एखाद्या पुस्तकाच्या पुसट झालेल्या पानांसारखे हळूहळू वाचता येत होते. पण त्याला अजूनही ती पाने उलगडता येत होती. दुसर्‍याच क्षणी त्याला स्वत:चीच शरम वाटली...

“मी हरलोय !”

“हंऽऽऽ !”

“मी खरेच पराभूत झालो आहे”

“पण अजूनपर्यंत एकाही माणसाने यात यश मिळवलेले नाही...”

तिच्या आवाजात कंप होता पण एक प्रकारचा ठामपणाही होता. जणू काही ती त्याच्या अपयशाचे स्पष्टीकरण देत होती. त्याला तिचे क्षणभर कौतुक वाटले. याचे तिला बक्षिस द्यायलाच हवे.

“हंऽऽऽऽ वाईट झाले खरे! मी जर निसटलो असतो तर तुझ्यासाठी एखादा रेडिओ पाठविण्याचा विचार होता माझा.”

“रेडिओ ?”

“हो! मी बरेच दिवस त्यावर विचार करत होतो.”

“त्याची काही गरज नव्हती. मी जर थोडे जास्त काम केले तर आपण तो इथेही घेऊ शकतो. हप्त्यावर घेतला तर सुरवातीला पैसेही कमी भरावे लागतील.”

“हंऽऽऽऽ बरोबर आहे. हप्त्यावर घेतला तर सहज शक्य आहे.”

“पाणी तापल्यावर मी तुमची पाठ धुवून देऊ का?.”

अचानक त्याच्या मनावर मळभ दाटून आले. त्यांनी एकमेकांच्या जखमांवर कितीही फुंकर घातली तरी, अगदी आयुष्यभर घातली तरी त्यांच्या जखमा भरुन येणार नाहीत याची त्याला खात्री होती. शेवटी त्यांचे ओठ फाटतील पण जखमा भरुन येण्याची शक्यता नव्हती.

मला समजत नाही. पण आयुष्य समजणे फार कठीण आहे. किती प्रकारची आयुष्ये असतात. शिवाय दुसर्‍याचे आयुष्य आपल्याला नेहमीच सुंदर वाटते. या प्रकारच्या आयुष्याचा शेवट काय असेल हे समजणे मात्र फार कठीण आहे. अर्थात ते तुम्हाला कधीच समजणार नाही...पण कशाततरी मन गुंतवून घेणे बरे...”

“तुम्हाला आंघोळ घालू का.?”

ती असा आग्रह करीत होती की त्याला भरीस पाडत होती? तिचा आवाज मृदू व गोड होता. त्याने त्याच्या शर्टाची व विजारीची बटने काढण्यास सुरुवात केली. त्याच्या कातड्यात वाळू भरल्यासारखे त्याला वाटत होते. बायको आता काय करत असेल? त्याच्या मनात विचार डोकावला. काल जे काही घडले त्याला युगे लोटून गेल्यासारखे त्याला वाटत होते.

तिने त्याच्या पाठीला साबण लावण्यास सुरुवात केली. त्याचे शरीर त्याने आक्रसून घेतले...

मोबियस भाग -३ प्रकरण २८.

२८

ऑक्टोबर !

उन्हाळा माघार न घेता वाळू तापवत होता. त्यांना अनवाणी वाळूत पाच मिनिटासाठीही उभे राहता येत नव्हते. पण सूर्यास्त झाल्यावर वाळूतील भेगातून दमट थंडगार हवा घरात घुसत होती. लाकडे वाळवायचे अजून एक काम त्यांच्या डोक्यावर येऊन पडले. तापमानातील फरकामुळे धुके जास्त दाट झाले. लांबून ते एखाद्या गढुळ नदीसारखे भासू लागले.

अशाच एका दिवशी त्याने घराच्या परसात कावळ्यांना पकडण्यासाठी एक सापळा तयार करण्याचा प्रयत्न केला त्याने त्याचे नाव ठेवले होते, “आशा”.
हा सापळा फार साधा होता. व त्यात वाळूच्या गुणधर्माचा वापर केला होता त्याने. त्याने एक खोल, सरळ भोक खणले व त्यात एक लाकडाची बादली पुरली. त्यावर काड्यांच्या आधाराने त्याने एक झाकण बसविले ज्याचा आकार अर्थातच बादलीच्या तोंडापेक्षा कमी होता. त्या तीन काड्यांना दोरे बांधून त्याने ते त्या झाकणाला पाडलेल्या भोकातून वर नेले व त्याला एक माशाचा तुकडा बांधला.

हे झाल्यावर त्याने तो खड्डा वाळूने झाकून टाकला. आता वर फक्त माशाचा तुकडाच दिसत होता. कावळ्याने त्या तुकड्यावर झडप घातली की तो त्या खड्ड्यात पडणार व वाळूत गाडला जाणार अशी त्याची एकंदरीत योजना होती. त्याने त्या सापळ्याची दोनतीन वेळा रंगीत तालीम घेतली. सगळे कसे सुरळीत चालत होते. त्या कावळ्याला पंख फडफडविण्याचीही संधी मिळाली नसती.

त्या कावळ्याला पकडून तो त्याच्या पायाला चिठ्ठी बांधणार होता. अर्थात यात नशिबाचा भाग बराच होता म्हणा. प्रथम म्हणजे तो कावळा उडाल्यावर कोणाच्या हातात पडता कामा नये, शिवाय तो कुठल्या दिशेला उडेल याच्यावर त्याचे नियंत्रण नव्हते. कावळा सर्वसाधारणत: त्याची जागा सोडून फार दूर जात नाही. सगळ्यात धोकादायक म्हणजे गावकर्‍यांना पायात चिठ्ठी अडकवलेला हा विचित्र कावळा दिसला तर मात्र...

पहिल्याच प्रयत्नात तोंड भाजल्यामुळे आता तो ताकही फुंकून पीत होता. त्याने त्याचे आयुष्य त्या विवराशी असे जोडले जसे अस्वल हिवाळ्यात झोपी जाते. गावकर्‍यांना त्याला बेसावध ठेवायचे होते. कंटाळवाण्या दिनक्रमामधे कंटाळल्यासारखे भाग घेत तो दिवस काढू लागला. कदाचित ते त्याला विसरतील या आशेने. पुनरावृत्तीत अजून एक महत्वाचा गुण असतो... उदा.. तिने गेले दोन महिने मण्याच्या माळा गुंफण्याचे काम घेतले होते. दिवस रात्र ती तेच काम करीत होती. ते काम ती एवढ्या एकाग्रतेने करी की तिचे डोळे इतरवेळीही मिचमिचे दिसायला लागले होते. खोक्यातून तिच्या लांबलचक सुईत ते मणी घेताना तिने एक लय पकडली होती. अजून एक दोन आठवड्यात तिच्याकडे रेडिओ घेण्याइतके पैसे निश्चितच जमले असते.

तिच्या त्या सुईभोवती त्याचे जग फिरते आहे की काय असे त्याला वाटू लागले. तिच्या त्या हालचालींनी त्या घराला जरा घरपण आले. त्यानेही इतर गोष्टींकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.. छपरावरील वाळू साफ करणे, तांदूळ चाळणे, कपडे धुणे... या कामात त्याचा चांगला वेळ जाऊ लागला. यातून जो वेळ उरे त्यात तो नवननवीन गोष्टी शोधून काढत असे. उदा. त्याने वाळू अंगावर पडू नये म्हणून प्लास्टिकचा एक तंबू तयार केला होता. गरम तापलेली वाळू वापरुन त्याने मासे भाजण्यासाठी एका शेगडीचेही संशोधन केले होते. या प्रकरणात त्याचा वेळ चांगला मजेत जात होता.

परत आल्यावर त्याने एक गोष्ट ठरविली होती ती म्हणजे स्वत:ला त्रास होईल अशी एकही गोष्ट करायची नाही. त्यानुसार त्याने आता वर्तमानपत्र वाचण्याचे सोडायचे असे ठरविले होते. दोनच आठवड्यात त्याला वर्तमानपत्राची आठवणही होईना. थोड्याच दिवसात वर्तमानपत्र नावाची वस्तूच तो विसरुन गेला. पूर्वी एकदा त्याने एक चित्र पाहिले होते त्यात एक माणूस हवेत तरंगत होता...त्याचे डोळे विस्फारलेले होते व त्याच्या आसपासचे अवकाश पारदर्शक प्रेतांनी भारलेले होते. ती प्रेते इतक्या दाटीवाटीने त्याच्या अवतीभोवती पसरली होती की त्याला कसलीही हालचाल करणे शक्यच नव्हते. त्या प्रत्येक प्रेताच्या चेहर्‍यावर वेगवेगळे भाव होते. एकमेकांना ढकलत ते अखंडपणे त्या तरंगणार्‍या माणसाशी बोलत होते... चित्राचे नाव होते एकांतवासाचा नरक... त्यावेळी त्याला त्या नावाचे मोठे अप्रूप वाटले होते..पण आता त्याला त्याचा अर्थ चांगलाच समजत होता.

एकलेपणा म्हणजे आभासाची आस, या पलिकडे काय असते?

ह्रदयाच्या प्रत्येक ठोक्याबरोबर जुळवून न घेता आल्यामुळे मग माणसे नखे खातात, मेंदूच्या तालाशी जुळवून न घेता आल्यामुळे मग ती सिगारेट ओढतात, काही जण रतिक्रिडेत समाधान न मिळाल्यामुळे हस्तमैथून करतात.. श्वासोच्छ्वास, चालणे, दिनक्रम, आठवड्यातून एकदा येणारा रविवार, दर चार महिन्यांनी येणारी परिक्षा, या सगळ्या नियमीत येणार्‍या घटनांनी बिचारा अजूनच एखाद्या नवीन कंटाळवाण्या गोष्टीकडे ढकलला जातो. मग त्याचे धुम्रपान वाढते व त्याला भयानक स्वप्ने पडू लागतात ज्यात तो लोकांपासून लपण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याच्याबरोबर एक घाणेरडी नखे खाणारी स्त्रीही असते...नंतर जेव्हा त्याला विषबाधेची लक्षणे दिसू लागतात तेव्हा तो जागा होतो...वाळूच्या ढिगात.

त्या कामाच्या रगाड्यात त्याला समाधान मिळत असले तरीही त्याच्या पुरुषार्थाला अजून आव्हान मिळाल्यासारखे त्याला वाटत नव्हते. पण एके दिवशी इतर सामानाबरोबर एक मासिक त्यांच्याकडे टाकण्यात आले. जीर्ण व तेलकट झालेल्या मासिकात तसे विशेष काही असेल असे वाटत नव्हते...बहुधा रद्दीच्या दुकानात त्यांना सापडले असेल...कुठेतरी टाकायचे म्हणून त्यांनी येथे टाकले असेल... पण त्याला गावकर्‍यांनी फार मोठे काम केले असे वाटले..त्यातील एका विनोदी लेखावर तो गडाबडा लोळत हसला देखील. या अशा परिस्थितीत तो हसू कसा शकतो...त्यालाच आश्चर्य वाटले. खरे तर त्याला स्वत:ची शरम वाटली पाहिजे. या परिस्थितीशी जुळवून घेण्यालाही काही मर्यादा आहेत.. येथे त्याला फक्त एकाच दिवसासाठी मुक्काम करायचा होता पण... त्याची प्रकाशात येण्याची इच्छाच मेली होती की काय?
त्यावर विचार केल्यावर त्याला उमजले की येथून निसटायची संधी केव्हा मिळेल हे परमेश्वरालाही सांगता येणार नाही. हां वाट पाहण्याची सवय मात्र करता येऊ शकते. मनात कसलेही ध्येय न ठेवता तो वाट पाहू शकतो. मग एक दिवस जेव्हा त्याची सुटका होईल तेव्हा त्याचे प्रकाशाने डोळे दिपतील व त्याला बाहेरही येता येणार नाही. ते म्हणतात ना, एकदा भीक मागितली की त्याचीच सवय लागते. मेंदू किती पटकन सडतो... तो यावर विचार करणार तेवढ्यात त्याला तो लेख आठवला आणि तो परत हसायला लागला. दिव्याच्या उजेडात ती नेहमीप्रमाणे माळा ओवत होती. तिने मान वर करुन त्याच्याकडे पाहिले व निरागसपणे हसली. स्वत:शीच गद्दारी करणे त्याला असहय्य झाले. त्याने ते मासिक बाजूला उडविले व तो बाहेर आला.

पांढुरके धुके कड्याभोवती गिरक्या घेत पसरत होते. मधे मधे रात्रीच्या अंधाराची ठिगळे त्यांच्या चमकणार्‍या कडांनी ओळखू येत होती. त्या वातावरणाने त्याच्या मनात कल्पनांचे खेळ चालू झाले. त्या निसर्गाकडे तो कितीही वेळ बघत बसू शकला असता.. प्रत्येक क्षणी त्याला नवीन काहीतरी गवसत होते.. किती प्रकारचे आकार तेथे उदयास येत होते आणि लोप पावत होते.

त्याने त्या धुक्याकडे मान झुकवत आपले गार्‍हाणे मांडले...

- न्यायाधीश महाराज, मला माझ्यावर हा खटला का चालवला गेला हे कृपया सांगावे. मला ही शिक्षा का ठोठाविण्यात आली ते सांगावे. मी तुमच्यासमोर उत्तराची वाट पाहत उभा आहे. तेवढ्यात त्या धुक्यातून आवाज आला. तो त्याला ओळखीचा वाटला खरा. एखाद्या दूरध्वनीतून यावा तसा तो आवाज होता...

- शंभरातून एकाला हे प्रमाण आहे..
- काय म्हणालात ?”
- "मी तुला सांगतोय की येथे शंभरात एक माणूस दुभंगलेल्या व्यक्तिमत्वाच्या आजाराचा बळी असतो..''
- ..त्याचा काय संबंध आहे?
- "चौर्य उन्मादाचेही तेच प्रमाण आहे..."
- आपण कशाबद्दल बोलत आहात? काही समजत नाही...
- "अशा सगळ्या रोग्यांचे प्रमाण काढून त्याची बेरीज केली तर..."
- बस्स करा हो ही बकवास!
- "नीट ऐक... तर १००% माणसे ही कुठल्या ना कुठल्यातरी असहाय्य रोगांनी पछाडलेली आढळतील..."
- काय मूर्खपणा आहे! निरोगीपणाची व्याख्या काय हे ठरल्याशिवाय कसे सांगता येणार...?
- "मी तुझी बाजू मांडतोय..."
- माझी?
- "तूही तुझी चूक कबूल करणार नाहीस."
- नाहीच! तेही नैसर्गिक आहे. नाही का ?
- "मग तू जरा जास्त आज्ञाधारकपणे वागत जा. तुला तुझ्याबाबतीत घडलेला प्रकार कितीही अपवादात्मक वाटला तरी काळजी करायचे कारण नाही. तुझ्यासारख्या विचित्र पक्षाला त्यांनी वाचवायलाच पाहिजे असा नियम नसला तरीही तुझा न्याय करण्याचाही त्यांना अधिकार नाही."
- विचित्र पक्षी? मी त्यांना विरोध केला म्हणून मी विचित्र पक्षी?
- "स्वत:ला एवढे निरपराध समजू नकोस. जेथे हवेत बाष्प व उष्णता जास्त असते तेथे सगळ्यात जास्त नुकसान हे पाण्याने होते. उडणार्‍या वाळूने, जे तुझ्या बाबतीत झाले आहे त्याचे प्रमाण अत्यल्प असेल... हे म्हणजे सहारा वाळवंटात पाण्याने होणार्‍या नुकसानभरपाईसाठी कायदे करण्यासारखे झाले..."
- मी कुठल्याही कायद्याबद्दल बोलत नाही. मला जे सहन करावे लागले त्याबद्दल बोलतोय मी. असे एखाद्याच्या मनाविरुद्ध अडकवून ठेवणे हा गुन्हा आहे...
- "कायदेशीर नाही...पण माणसाची हाव अमर्याद असते. तूच बघ ना. तू त्यांच्या दृष्टीने किती महत्वाचा आहेस."
- मूर्खपणा...माझ्याकडे जगण्यासाठी अधिक महत्वाची कारणे आहेत.
- "तुझ्या या लाडक्या वाळूची चूक आहे असे म्हटले तर तुला चालेल का?"
- चूक?
- "असे ऐकले आहे की या जगामधे अशी माणसे आहेत की ज्यांनी पायची किंमत काढण्यासाठी दहा वर्षे खर्च केली आहेत. त्यांना जगण्यासाठी ते कारण पुरेसे होते. पण तू या अशा जागी आलास कारण ते कारण तुला जगण्यासाठी पुरेसे वाटत नव्हते."
- नाही ते खरे नाही. वाळूचेही दोन चेहरे आहेत. वाळूचा वापर तुम्ही साचे बनविण्यासाठी करु शकता. काँक्रीटमधे तर त्याचा वापर अपरिहार्य आहे. वाळूचा शेतीसाठी वापर करण्याबाबतही संशोधन चालू आहे. त्यांनी वाळूचे रुपांतर मातीत करण्यासाठी जंतूही शोधून काढले आहेत म्हणे.
- "व्वा! काय पण बाजू बदलली आहे...तू तुझा दृष्टीकोन इतका बदललास की कशावर विश्वास ठेवायचा हेच कळत नाही."
- मला येथे भिकार्‍यासारखे मरायचे नाही...
- "हंऽऽऽऽ जो मासा तुमच्या गळाला लागत नाही तो नेहमीच मोठा असतो."
- कोण आहेस कोण तू... !

तेवढ्यात त्या पसरणार्‍या धुक्यात तो आवाज नष्ट झाला. त्याचे डोके गरगरु लागले. त्याला एकदम खूपच थकल्यासारखे वाटू लागले... एक कावळा ओरडला आणि त्याला त्याचा सापळा आठवला. त्याने परसातील ‘आशा’ वर नजर टाकायची ठरविली. त्यात यश मिळण्याची शक्यता तशी कमीच होती पण ते ‘मासिक वाचण्यापेक्षा बरे !’ तो मनात म्हणाला..

त्याने सापळ्यावर लावलेल्या माशाचा कुजलेला दर्प त्याच्या नाकात शिरला. आता दोन आठवडे झाले असतील तो सापळा लावून, पण काहीच झाले नव्हते. काय कारण असेल बरे? त्याच्या आराखड्यात तर काही चुकण्यासारखे नव्हते. कावळ्याने त्याच्या सावजावर झडप घातली की तो आत पडणार होता. पण कावळे त्या सापळ्याकडे पहातच नव्हते. मग काय करणार तो तरी? तो असहाय्य होता...

पण “आशा” त्यांना का आवडत नव्हता? त्याने सर्व दृष्टिकोनातून विचार करुन पाहिला पण त्या सापळ्यात त्याला काही चूक आढळेना.. कावळे तसे हुशार असतात व सावध असतात, कारण शक्यतो ते माणसाच्या वस्तीजवळ राहतात ना. मग शेवटी कोणाचा धीर आधी सुटतो हेच महत्वाचे आहे. धीर धरणे म्हणजे काही पराभव नाही म्हणूनच त्याने त्या सापळ्याचे नाव ‘आशा’ ठेवले होते.

तो शांतपणे पाय ओढत घराकडे चालू लागला....

क्रमशः
जयंत कुलकर्णी.

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

अमित खोजे's picture

3 Mar 2017 - 11:02 pm | अमित खोजे

तुमचे लिखाण एवढे जबरदस्त चालले आहे कि ना राहवून काल शेवटी पिक्चरच बघून टाकला. अपेक्षेप्रमाणे बरीच काटछाट केली आहे त्यामध्ये पण खूप सुंदर आहे. ते वाळूच्या खड्ड्यात कसे घर असेल हा प्रश्न मलासुद्धा पडला होता त्याचे निराकरण झाले. गाळलेल्या जागा तुमच्या लिखाणातून कल्पना करून अनुभवत आहे.

भारी चाललंय - चालुद्या.

एक प्रश्न - तुम्हाला हि कादंबरी का वाचविशी वाटली किंवा पुढे जाऊन तिचे भाषांतर का करावेसे वाटले?

एस's picture

4 Mar 2017 - 12:29 am | एस

वाचतोय.

मार्मिक गोडसे's picture

4 Mar 2017 - 12:59 am | मार्मिक गोडसे

संपूर्ण अनुवादीत लेखमाला वाचून संपवल्याशिवाय हा सिनेमा बघणार नाही.

पिलीयन रायडर's picture

4 Mar 2017 - 8:47 am | पिलीयन रायडर

काका, ही कादंबरी पुर्ण झाली की मग वाचायचे असे ठरवले आहे. (शक्यतो क्रमशः गोष्टी वाचायच्या नाहीत, शेवट झाला की मगच मिपावर ती लेखमाला वाचायची असे आजकाल ठरवले आहे.)

पण मी नक्की वाचणार आहे. प्रतिसाद दिल्याशिवाय रहावेना आता म्हणुन ही फक्त पोच!

पैसा's picture

4 Mar 2017 - 9:46 am | पैसा

:(