मोबियस भाग-३ : प्रकरणे २९-३०

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
4 Mar 2017 - 9:07 pm

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

“झाडच आणायचे असेल तर पिंपळाचे आणूयात. त्याच्या पानांची सळसळ कानाला बरी वाटते.”
पानांची सळसळ, फांद्यांपासून मुक्त होण्याची निष्फळ धडपड.
त्याच्या भावनांचे बंधन झुगारुन त्याचा श्वास मंद चालत होता. त्याला रडू फुटले. त्याने पटकन वाळूत सांडलेले मणी गोळा करण्याच्या बहाण्याने मान खाली घातली व ती वाळू चिवडू लागला.

मोबियस

२९

तिने त्याला पाहिल्यावर जणू काही आत्ताच आठवले आहे अशा अविर्भावात दिवा विझवला. ती अजून काम करणार आहे की काय? काय झाले कोणास ठावूक, तो तिच्यासमोर उभा राहिला व अनावर हो़ऊन त्याने झटका आल्यासारखे तिच्या मांडीवरील मण्यांच्या डबड्याला एक फटका मारला. ते काळे मणी काळ्या तिळासारखे विखरुन वाळूत सांडले. तिने त्याच्याकडे आश्चर्यचकित हो़ऊन पाहिले पण ती काही म्हणाली नाही. तिच्या नजरेकडे पाहताच त्याचा चेहरा भावनाशून्य झाला. त्याच्या घशातून कसलातरी चमत्कारिक आवाज निघाला.

“याला काही अर्थ नाहीए...सोडून दे सगळे. विष काहीच काळात तुझ्या रक्तात प्रवेश करेल.”

ती तरीही गप्प होती. तिच्या हातातील ओवलेल्या मण्याशी ती खेळत राहिली. त्याच्या शरीरातून भीतीची एक शिरशीरी उठली.

“खरेच सांगतोय... फार उशीर झालेला असेल. एक दिवस आपण सोडल्यास सगळे गाव गायब झालेले असेल. मला माहीत आहे, हे असेच होणार आहे. आपला विश्वासघात झाला आहे हे आपल्या लक्षात येईपर्यंत फार उशीर झालेला असेल. आपण त्यांच्यासाठी इतके कष्ट काढले त्याच्यावर ते थुंकतात.”

तिचे डोळे तंद्रीमधे हातातील मण्यांवर लागले होते. तिने निराशेने मान हलविली.

“ते तसे करु शकणार नाहीत. येथून बाहेर पडलेल्या सगळ्यांना बाहेर जगणे मुष्किल आहे.”

“पण त्याचाच अर्थ तो! येथे राहणारे तरी कुठे व्यवस्थित जगू शकतात?”

“पण येथे वाळू आहे...”

“वाळू”? त्याने आपल्या मुठी आवळल्या. वाळूचा काय उपयोग? तुम्हाला छळण्याशिवाय काय करते ती? तिच्यामुळे एकही पैसा मिळत नाही...”

“मिळतो ना! ते वाळू विकतात !”

“विकतात? कोणाला ?”

“बांधकामासाठी विकतात! ते कॉक्रीटमधे ती वाळू मिसळतात !”

“विनोदच आहे! ही असली वाळू जर सिमेंट काँक्रीटमधे मिसळली तर! त्यात क्षाराचे प्रमाण भयंकर आहे. ही वाळू वापरणे नियमबाह्य आहे आणि बांधकामाच्या शास्त्राविरुद्ध.”

“अर्थात त्यामुळेच ते ती चोरुन विकतात! शिवाय स्वस्तात.”

“जरी स्वस्तात मिळाली तरी त्यांनी असले धोकादायक काम का करावे बरे! धरणे आणि इमारती काहीच वर्षात नष्ट होतील.”

तिने डोळ्यांनीच त्याला रोखले. थंड आवाजात ती म्हणाली,

“बाकिच्यांचे आपल्याला काय करायचे आहे?”

ते ऐकून त्याला धक्काच बसला. तिच्या या रुपाने तो हादरला. किती बदलली होती ती काहीच क्षणात. तिचा मुखवटा गळून पडला होता. त्या मुखवट्याच्या आत ती एक गावकरी होती हे त्याला उमगले. इतके दिवस तो गावकर्‍यांना नरभक्षक वाघ, किंवा त्या मांगाच्या बाजूचे समजत होता. व तो एक सावज. पण आता त्याला उमगत होते की गावकर्‍यांना, जगाने त्यांना वाळीत टाकले आहे असे वाटत होते. त्यामुळे त्यांना बाकीच्या जगाशी काही घेणेदेणे नव्हते. त्याने असा आत्तापर्यंत असा विचार करुनच पाहिले नव्हते. पण हे मान्य केले तर त्याचे मुद्दे खोडून निघत होते.

“ठीक आहे तू बाकिच्यांचा विचार करु नकोस पण येथे त्या वाळूतून तुमच्या जिवावर कोणीतरी पैसे करतंय. हो ना? तसल्या माणसाला तुम्ही सहाय्य करता कामा नये.”

“नाही ! वाळूची खरेदी विक्री त्यांची संघटना करते.”

“पण एकंदरीत या व्यवसायामधे गुंतलेला पैसा मला तरी प्रचंड वाटतोय.”

“जे श्रीमंत होते, ज्यांना बोटी घेणे परवडत होते ते केव्हाच गाव सोडून गेले. त्यांनी तुम्हाला आणि मला तसा काहीच त्रास दिलेला नाही. चांगले वागविले. मी खोटे बोलते आहे असे वाटत असेल तर तुम्ही त्यांच्या नोंदी पाहू शकता म्हणजे मी काय म्हणते आहे ते तुम्हाला कळेल.”

तो तसाच तेथे आळशासारखा उभा राहिला. एकदम दु:खी झाला. त्याच्या युद्धाच्या नकाशावर आता त्याच्या सैन्याची आणि शत्रूच्या सैन्याची सरमिसळ झाली होती व त्यावर सांडलेल्या शाईचे मधेमधे धब्बे पडले होते. तेथे तर काहीच कळत नव्हते. थोडा विचार केल्यावर त्याला उमगले की त्या मासिकावर एवढा विचार करण्याचे काहीच कारण नव्हते. तो हसतोय का रडतोय हे पहायला तेथे कुत्रे देखील नव्हते. त्याने घसा ताणला व पुटपुटण्यास सुरुवात केली...

“हंऽऽ तू म्हणते आहेस ते एका अर्थाने बरोबरच आहे. तसा आपला काही संबध नाही म्हणा.” मग अचानक त्याच्या तोंडून भलतेच शब्द बाहेर पडले. म्हणजे त्याला ते उच्चारायचे होते असे नाही.

“एखादी रोप लावलेली कुंडी आणूया का आपण?” ते शब्द ऐकून त्याचा तोच हादरला आणि त्याहून जास्त ती गोंधळली. मग मात्र त्याला ते वाक्य पूर्ण करणे भाग पडले.
“येथे नजर टाकण्यासारखे काहीच नाहीना म्हणून म्हटले.”

“सुरुची आणूयात का ?” तिने खालच्या आवाजात विचारले..

“पाईन? मला नाही आवडत पाईन. दुसरे काहीही चालेल अगदी गवतसुद्धा. त्या उतारावर खूप गवत माजले आहे. काय म्हणता तुम्ही त्याला?”

“ते एक प्रकारचे गवत आहे. पण झाडच बरे पडेल नाही का?”

“झाडच आणायचे असेल तर पिंपळाचे आणूयात. त्याच्या पानांची सळसळ कानाला बरी वाटते.”

पानांची सळसळ, फांद्यांपासून मुक्त होण्याची निष्फळ धडपड.
त्याच्या भावनांचे बंधन झुगारुन त्याचा श्वास मंद चालत होता. त्याला रडू फुटले. त्याने पटकन वाळूत सांडलेले मणी गोळा करण्याच्या बहाण्याने मान खाली घातली व ती वाळू चिवडू लागला.

“राहू देत ! मी चाळेन ती वाळू... त्याने ते लवकर सापडतील’...” ती घाईघाईने उठत म्हणाली.

३०

एक दिवस तो असाच वाळूच्या रिंगणावरील चंद्राकडे पहात उभा होता. त्याला जणू तो हातात घेऊन बघत होता असे वाटत होते. तेवढ्यात त्याचे अंग शहारले. त्याला ताप आला होता की काय? त्याच्या मनात विचार आला. पण हे काहीतरी वेगळेच होते. तापाआधी वाजून येणारी थंडी त्याने पूर्वी बर्‍याच वेळा अनुभवली होती. त्याच्या अंगावर एवढे काही मास नव्हते ज्यामुळे थंडी वाजेल, पण ही थंडी आतून कुठूनतरी हाडातून बाहेर पसरत चालली होती. साध्या थंडीत अंगावर शहारे येतात या थंडीत त्याला हाडावर शहारे आले आहेत असे वाटत होते. प्रत्येक हाडांमधे वेदना परावर्तित होत होती. पाण्यावर उठणार्‍या एखाद्या तरंगाप्रमाणे ती थंडी पसरत चालली होती.
चंद्राकडे थरथर कापत पहात असतानाच त्या चंद्राने अनेक रुपे घेतली. प्रथम त्याला त्याच्यावरचे ओरखडे उठलेले दिसले. मग एखाद्या स्वस्तातील अल्युमिनियमच्या डब्याच्या झाकणासारखा त्याला तो भासला. जरा स्पष्ट झाल्यावर त्याने कवटीचे रुप धारण केले. जशी विषाची खूण असते ना तशी. त्याच्या बाटलीतील पोटॅशियम सायनाईडच्या गोळ्यांच्या पृष्टभागासारखा त्याला चंद्राचा पृष्टभाग वाटला. ती बाटली लपविलेल्या जागी असेल का अजून?

पिचक्या चेंडूच्या टप्प्यांसारखे त्याच्या ह्रदयाचे ठोके अनियमित पडू लागले. असले अभद्र विचार त्याच्या मनात का यावेत? त्याच्या प्रत्येक कल्पनेला दु:खाची झालर का लावलेली आहे? पण समजा जरी लावली नसती तरीही ऑक्टोबरमधे सुटणार्‍या वार्‍यात पश्चात्ताप भरुन राहिला होता. त्याने रिंगणावर उगवलेल्या चंद्राकडे पहात विचार केला कदाचित त्याची ही भावना म्हणजे असूया असू शकेल. 'असूया... त्या भोकाच्या बाहेर असलेल्या प्रत्येक वस्तूची असूया.” ज्याप्रमाणे ती वाळू घराच्या दाराला भोके पाडत होती त्याप्रमाणे ती असूया त्याच्या शरीराला... शेवटी त्याचे चुलीवर असलेले एक रिकामे पातेले होणार तर! पण रिकाम्या पातेल्याचे तापमान पटकन वाढते. आणि कदाचित ती उष्णता सहन न झाल्यामुळे तो परिस्थितीला शरणही जाऊ शकेल..

त्याला अचानक खुल्या हवेची जरुरी भासू लागली. अशा हवेची, ज्यात त्याचा स्वत:चा श्वास मिसळलेला नाही. ‘दररोज त्या टेकडीवर जाऊन समुद्राकडे नजर टाकता आली असती तर काय बहार आली असती! त्यांनी तेवढी तरी परवानगी द्यायला हवी..’ त्यांच्या पहार्‍याखाली तो निश्चितच पळून जाऊ शकला नसता.. शिवाय आता तो प्रामाणिकपणे त्यांना मदतही करत होता. तुरुंगातही कैद्यांना व्यायाम करण्याची परवानगी असते...

“मला आता हे खरेच सहन होत नाही. इथे मी असाच वाळूत तोंड खुपसून बसलो तर काही दिवसांनी माझे मुरलेले लोणचे होईल. देतील का मला ते परवानगी.?”
त्याची भुणभुण सहन न झाल्यामुळे तिने आपले ओठ घट्ट मिटून घेतले होते.

“त्यांनी परवानगी दिलीच पाहिजे” तो एकदम तारस्वरात किंचाळला. ज्या दिवशी मी पळून गेलो होतो त्यावेळी कित्येक विवरात मला दोराच्या शिड्या तशाच सोडलेल्या दिसल्या...मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे.”

“हो ! बरोबर आहे...पण त्यांच्या कित्येक पिढ्या येथे रहात आहेत.”

“म्हणजे आपल्याला काहीच आशा नाहीत का ?”
तिने त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले.

“ठीक! मीच बोलतो त्यांच्याशी!”

पण त्याला माहीत होते की त्या बोलण्यातून काही निष्पन्न होणार नाही. या असल्या निराशेची त्याला आता सवय झाली होती. त्यामुळेच की काय जेव्हा त्या म्हातार्‍याने पुढच्याच फेरीत उत्तर आणल्यावर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला.

“अंऽऽऽऽऽ ते जरा अवघड वाटतंय.” शब्दांची जुळवाजुळव करीत तो पुटपुटला आणि मग एकदम म्हणाला,

“पण तुम्ही ते आमच्यासमोर केलेत तर ते तयार आहेत तुला ती सवलत देण्यास. तू फार काही मागत नाही आहेस.”

“काय म्हणतो आहेस तू? ते म्हणजे?”

“म्हणजे तुम्ही दोघे तुमच्या खोलीत करता ते!.”

त्याच्या अवतीभोवती असणारे फिदीफिदी हासले. तो मात्र तेथेच कोणीतरी जखडून ठेवल्यासारखा उभा होता. हळूहळू त्याला त्यांना काय पाहिजे आहे ते समजले. मग मात्र त्याला त्याचे काहीच वाटेनासे झाले.
वरुन प्रकाशाचे झोत त्याच्या भोवती नाचत होते..थोड्याच वेळात तसे अजून सात आठ झोत त्या वाळूवरुन घसरत खाली आले. त्या गोंगाटाने उत्तेजित होत मनाने तोही त्या वेडेपणात सामील झाला.

त्याने हळूच तिच्याकडे नजर टाकली. येथेच तर होती ती आत्तापर्यंत.
आता कुठे नाहिशी झाली ? घरात पळाली की काय ! त्याने दरवाजातून डोकावत तिला हाक मारली.

“काय करायचे?”

“ती कुजबुजत म्हणाली, ते काय वाट्टेल ते म्हणतील. म्हणू देत!”

“पण मला बाहेर जायचे आहे. खरेच बाहेर जायचे आहे.”

“पण तुम्ही असं कसं...”

“नुसते नाटक तर करायचे...”

“तुमचे काय डोकं फिरले आहे की काय? बहुतेक तुम्ही शुद्धीत नाही आहात... मी असले काही करु शकत नाही.”

खरेच आपले डोकं फिरले आहे का? त्याने स्वत:ला विचारले. तिच्या आवाजातील कठोरपणा व चीड बघून तो जरा वरमला पण त्याच्या डोक्यात आत कुठेतरी यावर काहीच विचार चालू नव्हते. एवढे तुडवले गेल्यावर आता अजून काही लाजलज्जा वाटायची गरज नव्हती. ज्यांना अशी विकृत इच्छा झाली आहे त्यांनाच शरम वाटायला हवी. त्यामुळे दोघांत फरक करण्याची गरजच नव्हती. त्यांच्यात जो काही थोडाफार फरक होता तो या नाटकांनंतर पूर्ण नाहिसा होईल याची त्याला खात्री होती. विचार कर...पण समुद्राकाठी उभे राहून खोल श्वास घेणे हे जर बक्षिस असेल तर काय हरकत आहे? त्याची स्वत:ची अशी जागा... ज्यावर तो चालू शकणार होता.

त्याने अचानक तिच्यावर झडप घातली. तिचे किंचाळणे व त्यांच्या झटापटींच्या आवाजाने वर माणसांमधे खळबळ माजली. शिट्ट्याचे, टाळ्यांचे आवाज घुमू लागले. उत्तेजित चित्काराने तोही अधिक उत्तेजित झाला. आता प्रेक्षकांची संख्या बरीच वाढलेली दिसत होती ज्यामधे काही स्त्रियाही सामील झाल्या होत्या. प्रकाशाच्या झोतांची संख्या आता जवळजवळ तिप्पट झाली होती.

अचानक झडप घातल्यामुळे ती त्याच्या तावडीत सापडली. त्याने तिला कसेबसे पोत्यासारखे फरफटत बाहेर आणले. वर निशाचरांचा उत्सव चालल्यासारखा प्रकाशझोतांचा खेळ चालला होता. उकडत नसतानाही त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. वरुन येणार्‍या आवाजांच्या प्रतिध्वनीच्या कृष्णछायेने विवरावरचे आकाश झाकाळून टाकले. ती छाया त्याचीच आहे असा त्याला क्षणभर भास झाला. वर उभ्या असलेल्या माणसांशी तो एकरुप झाला. त्यांच्या विकृत इच्छा या त्याच्याच असल्याचा त्याला भास झाला.. त्याच्या मनात विचार आला की तो सावज नसून शिकारी झालाय.

त्या अंधारात तिचे कपडे फेडताना त्याला त्रास झाला खरा. पण शेवटी त्याने ते काम पार पाडले...

“कृपा कर आपल्याला फक्त नाटक करायचे आहे. मलाही हे आवडत नाही व मी ते मनापासून करत नाही...कृपा कर माझ्यावर ! कृपा कर!”
त्याने तिची भीक मागितली.

त्याचे ते बोलणे ऐकून ती निपचित पडली. तिचा विरोध मावळला असे त्याला वाटले खरे पण तेवढ्यात त्याच्या पोटात तिचा खांदा आदळला. ज्या त्वेषाने तिने तो मारला होता त्याने त्याचा जीव कळवळला. होणार्‍या वेदनेने त्याने गुडघे मुडपले. तिने त्याच्यावर ओणवे होत त्याच्या चेहर्‍यावर गुद्यांचा वर्षाव केला जणू काही ती तांदूळ कांडते आहे. त्याच्या नाकातोंडातून रक्त आल्यावर ती जराशी शांत झाली. त्या रक्ताला वाळू चिकटली. वाळू खाल्ल्यासारखा त्याचा चेहरा झाला.

काड्या तुटलेली छत्री मिटावी तशी वर होणारी गडबड शांत झाली.

उत्सुकता नष्ट झाल्यामुळे त्यांची गर्दी पांगण्यास सुरुवात झाली. कोणीतरी काहीतरी विवरात खाली फेकले पण त्यातही लोकांना आता रस वाटेना. ज्या अनपेक्षितपणे ते सगळे सुरु झाले त्याच अनपेक्षितपणे ते सगळे संपले. कामावर चला! कामाला चला! अशा आरोळ्या ऐकू आल्या आणि प्रकाशांची एक रांग झाली व दिसेनाशी झाली. मागे राहिले उत्तरेकडून वाहणारे थंड गडद वारे व त्यावर उडून जाणारी गावकर्‍यांची उत्सुकता....

त्याला मात्र हे सगळे लिहून ठेवल्याप्रमाणेच झाले असे वाटत होते. त्याने तिच्यापासून स्वत:ची सुटका करुन घेतली.

थोडाफार शिल्लक राहिलेला तो हळुहळु हळुवारपणे तिच्यात वितळून गेला.....

क्रमशः
जयंत कुलकर्णी.

कथाभाषांतर