त्याचे डोकेच काम करेनासे झाले होते. त्यातच पडलेल्या स्वप्नाने ते पुरते भंजाळून गेले. स्वप्नात तो एका खराट्याच्या काडीवर एका रस्त्यावरुन उडत चालला होता. एखादी स्कुटर चालवावी तशी. पण जशी त्याची नजर रस्त्यावरुन ढळली तसा तो धाडकन जमिनीवर आला. त्याच्या जवळचा रस्ता लाल होता तर दूरवर तो हिरव्या रंगाचा वाटत होता. त्या रंगसंगतीने तो गोंधळून गेला. शेवटी तो एका लाकडी घरापाशी येऊन पोहोचला. हवेत टुकार साबणाचा वास भरुन राहिला होता. त्याने एका जिन्यावरुन एका खोलीत प्रवेश केला ज्यात फक्त एकच लांबलचक, अरुंद टेबल होते. त्या टेबलावर अंदाजे दहाएक स्त्रीपुरुष कसलातरी खेळ खेळत बसले होते. मधाला माणूस पत्त्याच्या कॅटमधून पत्ते वाटत होता. वाटून झाल्यावर त्याने अचानक राहिलेला शेवटचा पत्ता त्याच्या हातात दिला व ओरडला. त्यानेही अचानक समोर आलेला पत्ता घेतला. बघतो तर तो पत्ता नव्हता तर ते एक पत्र होते. त्याचा स्पर्ष हाताला काहीतरी विचित्र लागत होता. त्याने ते पत्र जरासे दाबल्यावर आतून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. ते पाहताच तो जोरात किंचाळला व जागा झाला.
मोबियस
११
बाई बाई गं बाईऽऽऽ
कसला आवाज आहे?
कसला आवाज आहे...
आवाज सैतानाचा बाई..
ती स्वत:शीच बडबडत गाणे पुटपुटत होती. न कंटाळता ती तेच कडवे परत परत म्हणत होती व पाण्याच्या रांजणातून पाण्यावरचा तवंग काढत होती. जेव्हा ती गाण्याची गुणगुण थांबली तेव्हा त्याला कळले की त्याच्या मागे तांदूळ दळण्याचाही आवाज येतो आहे.
त्याने एक सुस्कारा सोडला व कूस बदलली. थोड्याच वेळात तिने त्याच्याजवळ एक पाण्याने भरलेले भांडे आणले. बहुधा तिला त्याचे अंग पुसून काढायचे असावे. त्याच्या अंगाची वाळूमुळे जळजळ होत होती. कुठल्याही क्षणी होणार्या ओल्या फडक्याच्या स्पर्षाची तो अतूरतेने वाट पाहू लागला.
चक्कर येऊन पडल्यानंतर तो अंथरुणातच पडून होता. पहिले दोन दिवस त्याला ताप भरला होता व सारख्या उलट्या होत होत्या. कालच उलट्या थांबून त्याला भूक लागायला लागली होती. त्या वाळूच्या वादळाने त्याला इजा झाली नव्हती जेवढी त्याला त्याच्या अतिश्रमाने झाली होती. एवढ्या श्रमाची त्याला सवयच नव्हती. शिवाय एवढ्या कडक उन्हातही त्याने कधी काम केले नव्हते. पण विशेष काही दुखापत झाली नव्हती.
चौथ्याच दिवशी त्याची पाठ आणि पाय दुखायचे थांबले होते. पाचव्या दिवशी त्याला अंग थोडेसे जड झाल्यासारखे वाटत होते पण बाकी सगळे ठीक होते. पण कावेबाजपणे तो तसाच अंथरुणात आजार्यासारखा पडून राहिला होता पण निसटण्याचा विचार त्याच्या मनातून एक क्षणभरही गेला नव्हता.
“उठलात का?”
ती त्याला हळूवारपणे हाका मारीत होती. मिटलेल्या डोळ्याच्या कोपर्यातून त्याला तिचा मांसल, गोलाई असलेला गुडघा दिसत होता. उत्तरादाखल तो कण्हला. भांड्यात पंचा पिळताना तिने विचारले,
“आता कसं वाटतय?”
“बरंय थोडं”
“तुमची पाठ पुसून देऊ का ?”
तो स्वत:ला तिच्या स्वाधीन करण्यास तयार होता कारण त्याच्याकडे आता आजाराचे चांगले कारण होते. त्याला केव्हातरी वाचलेली एक कविता आठवली ज्यात एक आजारी मुलगा गार, चांदीच्या कागदात गुंडाळला गेल्याचे स्वप्न बघतो....त्याल एकदम गार वाटले. एका स्त्रीचा वास त्याच्या अंगावरुन गेल्यावर तो थोडासा उत्तेजितही झाला.
तरीपण तो तिला माफ करु शकला नाही. तिच्या बद्दलच्या वाटण्यार्या भावना ही एक वेगळी बाब होती आणि तिने काय केले होते ही वेगळी बाब होती. त्या दोन्हीतील फरक त्याने लक्षात ठेवायला हवा होता. सध्याच्या परिस्थितीत तरी. त्याच्या सुट्टीतील तीन दिवस आत्ताच वाया गेले होते. चांगल्या वाईटाचा संघर्ष आत्ता नको. त्याचा पहिला प्रयत्न पुरेशा तयारी अभावी फसला होता. तो त्या उष्माघाताने चक्कर येऊन पडला नसता तर तो कदाचित यशस्वी झालाही असता पण त्याला वाळूत खणण्याच्या श्रमाची कल्पना आली नव्हती हेच खरे. स्वत:ला पार पडता येणारी एखादी योजना आखली पाहिजे’ तो पुटपुटला. त्यातच त्याला ही आजाराची कल्पना सुचली होती.
जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तिच्या घरात बिछान्यावर स्वत:ला पडलेले पाहून त्याला मोठा खेदजनक विस्मय वाटला होता. थोडक्यात त्या गावकर्यांचा त्याला कुठल्याही प्रकारची सहानभूती दाखविण्याचा विचार नव्हता हे स्पष्ट झाले होते. त्याला हे समजले होते पण त्याच्या डोक्यात वेगळेच विचार घोळत होते. त्यांनी त्याचे आजारपण फुटकळ समजून डॉक्टरला बोलाविले नव्हते. त्यांना धडा शिकविण्याचा त्याचा विचार आता पक्का झाला. ती रात्रभर काम करीत असताना तो मस्त झोप काढणार होता आणि दिवसभर जेव्हा तिची झोपण्याची वेळ असते तेव्हा तो विव्हळत तिला जागे ठेवणार होता.
“फार दुखतंय का ?”
“हो ना! माझ्या मणक्याला दुखापत झालेली दिसतेय!”
“मी त्याला मसाज करुन देऊ का?”
“नको नको ! मणक्याचे दुखणे गंभीर असते आणि एखाद्या नवशिक्याकडून मसाज करुन घेण्याची माझी मुळीच इच्छा नाही. समजा मी मेलो तर तूच अडचणीत येशील. डॉक्टरला बोलाविता येईल का? अरे देवा! या वेदना अगदी सहन होत नाहीत. लवकर बोलवा नाहीतर फार उशीर झालेला असेल.”
लवकरच तिला हे सगळे सहन होणार नाही व तिची यात दमछाक होणार असे त्याला वाटत होते. तिला काम करणे जड जाऊ लागेल व वाळू न काढल्यामुळे ते घरही धोक्यात येईल. ही बाब त्यांच्या लक्षात निश्चितच येईल. तिच्याबरोबर कामाला एक माणूस दिल्यावर काम सुरळीत होण्याऐवजी त्यात अडथळेच येत आहेत हे त्यांना कळेलच. त्याला लगेचच बाहेर काढले नाहीतर काहीच दिवसात परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकत होती.
पण त्याची योजनाही तितकीशी सुरळीत पार पडत नव्हती. एकतर या विवरात व गावात दिवसापेक्षा रात्री कामाची जास्त गडबड उडत होती....फावड्यांचे आवाज, गाड्यांचे आवाज, बाहेर होणारे आवाज, दूरवरुन येणारे कुत्र्यांचे रडण्याचे आवाज, तिचे धापा टाकण्याचे आवाज याने त्याची झोप उडून गेली. तो झोपण्याचा जेवढा जास्त प्रयत्न करे तेवढाच तो टक्क जागा रहात होता.
रात्री व्यवस्थित झोप न आल्यामुळे तो दिवसा डुलक्या काढत होता. पण एका विचाराचा त्याला भयंकर त्रास होत होता. जर हा उपाय फसला तर दुसरा मार्ग शोधावा लागणार आणि आता त्याचा धीर सुटत चालला होता. जवळजवळ आठवडा उलटून गेला होता आणि त्याच्या नाहिसे होण्यासंबंधी कोणीतरी पोलिसांमधे तक्रार दाखल केली असणार. पहिले तीन दिवस त्याचे रजेचे होते ते सोडल्यास आता तो चार दिवस कामावरुन गैरहजर होता. त्याच्या इतर भानगडीत नाक खुपसणारे त्याचे सहाध्यायी निश्चितच गप्प बसणे शक्य नव्हते. त्याच संध्याकाळी कोणीतरी त्याच्या खोलीवर चक्कर मारली असणार. न उघडलेल्या खोलीतील कुबट वास लपणार नव्हता. दुसर्या दिवसापासून त्याच्याबद्दल कुजबुज सुरु झाली असणार. (यापेक्षा वेगळे काही होईल असे त्याला तरी वाटत नव्हते. शिक्षकांइतका मत्सरी प्राणी सार्या दुनियेत सापडणार नाही. वर्षामागून वर्षे, त्यांना तेथेच मागे सोडून एखाद्या वाहत्या नदीतील पाण्यासारखे विद्यार्थी त्यांच्या हाताखालून जात असतात. जसे काही पाण्यात रुतलेले दगड. तो इतरांना स्वप्नं दाखवित असेल पण स्वत: मात्र स्वप्नं बघत नाही. तो स्वत:ला क्षुद्र समजतो व एकाकीपण स्वीकारतो. जर तसे नाही झाले तर मात्र इतरांवर टीका करत करत स्वत:च संशयाच्या फेर्यात सापडतो. या सगळ्यापासून सुटण्याची व काहीतरी वेगळे घडावे याची त्याला इतकी आस लागलेली असते की शेवटी तो इतरांचा तिरस्कार करु लागतो.) त्यांनी काय विचार केला असता याची त्याला खात्री होती. त्याचे नाहिसे होणे हा एक अपघात होता? नसावा! तसे असते तर कुठेतरी बातमी आली असती. मग आत्महत्या? नसावी नाहीतर पोलिसांनी हे प्रकरण डोक्यावर घेतले असते. त्या मूर्खाला उगाचच जास्त महत्व देऊ नका. तो स्वत:च पळून गेलाय. पण आता आठवडा होत आला...काय करतोय कुणास ठाऊक इ. इ.
आता त्या सगळ्यांना त्याची खरीच काळजी वाटत होती का याची शंका आहे पण त्यांना या रहस्याची वाटणारी उत्सुकता मात्र एखाद्या लागलेल्या फळापेक्षाही जास्त होती. पुढे शाळेचे हेडमास्तर पोलिसचौकीत जाऊन रीतसर तक्रार नोंदवतील. चेहर्यावर उसना गंभीर भाव आणून ते अर्ज भरतील.
नाव: ....... वय : ३१ केसाचे वर्णन : मागे वळवलेले, पातळ उंची : ५’ ५” वजन: ६० किलो इतर वर्णन : उभट चेहरा, करडे डोळे, चौकोनी जबडा, डाव्या कानाखाली एक मस. रक्तगट : एबी. खर्जात बोलतो व बोलताना चाचरत बोलतो. अडमुठ्या, हट्टी. कपडे: बहुतेक जंगलात घालण्याचे कपडे घातले असावेत. दोन महिन्यापूर्वी काढलेले छायाचित्र सोबत जोडलेले आहे.”
अर्थात गावकर्यांनीही या कटात पुढचे डावपेच आखले असणारच. गावातील मूठभर बुद्दू पोलिसांना मूर्ख बनविणे त्यांना सहज शक्य होते. बहुधा त्यांनी काहीतरी युक्ती वापरुन ते त्या भागात येणार नाहीत याची काळजी घेतली असावी. पण हे सगळे तो धडधाकट असता तर ठीक होते. एखाद्या आजारी माणसाला जो त्या विवराच्या तळात पडला आहे त्याच्या बाबतीत हे करणे परवडणारे होते का, हा खरा प्रश्न होता. त्यांना जर तो कुचकामी वाटत असेल तर त्यांनी ताबडतोब त्याला तेथून हाकलायला पाहिजे कारण कुठल्याही क्षणी गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. मागचे लपविण्यासाठी ते एखादी गोष्ट रचू शकत होते. उदा. त्याला भ्रम झाल्यामुळे तो त्या विवरात पडला....एवढे कारणही तो तेथे का आहे यासाठी पुरे होते. आता भ्रमिष्ट म्हटले की त्याने सांगितलेल्या खर्या कहाण्यांवर कोणीही विश्वास ठेवला नसता. गावकर्यांचेच म्हणणे त्यांनी खरे मानले असते.
कुठेतरी कोंबडा आरवला व गाईच्या हंबरण्याचा आवाज ऐकू आला. पण त्या बिळात दिशा आणि अंतर या संकल्पनाच नव्हत्या. त्यामुळे तो आवाज कुठून येतोय इ. बाबींचा प्रश्नच येत नव्हता. त्याचे नेहमीचे जग त्या विवराच्या बाहेर होते ज्यात मुले खेळत होती व कोंबडे पहाटे आरवत होते. त्याने विचार करत डोळे उघडले. भाताच्या वासात पहाटेच्या आकाशाच्या रंगीत छटा मिसळत होत्या.
तिने तोपर्यंत त्याची पाठ घासण्यास सुरुवात केली होती. खसखसून पाठ घासल्यानंतर तिने काच पुसतात तशी ती हळूवारपणे त्या पंचाच्या पिळाने पुसून काढली. सकाळीच होणारे एकसूरी आवाज आणि हे पुसणे त्यामुळे त्याच्या डोळ्यावर जराशी झापड आली.
येणारी जांभई दाबून तो म्हणाला,
“किती दिवस झाले कुणास ठाऊक. इथे वर्तमानपत्र मिळू शकेल का?”
“मी विचारेन त्यांना नंतर.”
एक गोष्ट त्याच्या लक्षात आली ती म्हणजे ती प्रामाणिक आहे हे दाखवायचा ती प्रयत्न तरी करत होती. तिच्या बोलण्यातून जी आत्मियता डोकावत होती त्याने तो थोडासा वैतागला. ती खरंच विचारेल का ? त्याला साधे वर्तमानपत्र वाचण्याचा अधिकार नाही का ? त्याने तिचे हात झटकून टाकले....
पण आता या वेळी संतापणे सगळ्या प्रयत्नावर पाणी फिरवेल. एखाद्या आजारी माणसाला साध्या वर्तमानपत्रावर एवढे संतापणे शोभत नाही. अर्थात त्याला वर्तमानपत्र मिळाले तर पाहिजेच होते. आजूबाजूचा निसर्ग बघता येत नसेल तर किमान त्याची चित्रे तरी पहायला मिळतील. त्याने पूर्वी कुठल्यातरी पुस्तकात वाचले होते की निसर्गचित्रे ही गावाकडे जन्म घेतात तर वर्तमानपत्रे ही गजबजलेल्या शहरांमधे, जेथे माणसांची ओळख हरवलेली असते. आणि कदाचित ‘हरवलेले’ मधे त्याचा कुठे उल्लेख आहे का तेही बघायला मिळाले असते. कदाचित त्याच्यावर एखादा लेखही आला असेल, काय सांगावे. अर्थात गावकरी असला लेख असलेले वर्तमानपत्र त्याच्यापर्यंत पोहोचू देणार नाहीत हे निश्चित होते. हंऽऽऽ या परिस्थितीत धीर धरणे हे सगळ्यात जास्त महत्वाचे होते. पण आजारी असण्याचे सोंग आणणे हे काही एवढे सोपे नव्हते. एखादी स्प्रिंग हातात घट्ट दाबून धरण्यासारखे होते ते. सतत या तणावाखाली राहण्यापेक्षा, त्याला काही झाले तर ती त्यांची जबाबदारी आहे हे त्यांना सांगायला पाहिजे. आजपासून कशाला आत्तापासून तिचा एक क्षणभरही डोळा लागणार नाही अशी तजवीज करण्याची त्याने प्रतिज्ञा केली.
तेवढ्यात त्याला जांभई आली.....झोपू नकोस ! झोपू नकोस ! असे स्वत:ला बजावत त्याने हातपाय ताणले व अजून एक जांभई दिली.....
१२
तिने धरलेल्या छत्रीखाली कसल्याशा गवतापासून केलेल्या सूपचे त्याने घोट घेतले. त्या गरम सूपने त्याची जिभ पोळली. कपाच्या तळात नेहमीप्रमाणे वाळूचे कण खाली बसलेले दिसत होते. त्याचे डोकेच काम करेनासे झाले होते. त्यातच पडलेल्या स्वप्नाने ते पुरते भंजाळून गेले. स्वप्नात तो एका खराट्याच्या काडीवर एका रस्त्यावरुन उडत चालला होता. एखादी स्कुटर चालवावी तशी. पण जशी त्याची नजर रस्त्यावरुन ढळली तसा तो धाडकन जमिनीवर आला. त्याच्या जवळचा रस्ता लाल होता तर दूरवर तो हिरव्या रंगाचा वाटत होता. त्या रंगसंगतीने तो गोंधळून गेला. शेवटी तो एका लाकडी घरापाशी येऊन पोहोचला. हवेत टुकार साबणाचा वास भरुन राहिला होता. त्याने एका जिन्यावरुन एका खोलीत प्रवेश केला ज्यात फक्त एकच लांबलचक, अरुंद टेबल होते. त्या टेबलावर अंदाजे दहाएक स्त्रीपुरुष कसलातरी खेळ खेळत बसले होते. मधाला माणूस पत्त्याच्या कॅटमधून पत्ते वाटत होता. वाटून झाल्यावर त्याने अचानक राहिलेला शेवटचा पत्ता त्याच्या हातात दिला व ओरडला. त्यानेही अचानक समोर आलेला पत्ता घेतला. बघतो तर तो पत्ता नव्हता तर ते एक पत्र होते. त्याचा स्पर्ष हाताला काहीतरी विचित्र लागत होता. त्याने ते पत्र जरासे दाबल्यावर आतून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. ते पाहताच तो जोरात किंचाळला व जागा झाला.
त्याच्या डोळ्यासमोर काहीतरी पांढुरक्या रंगाचा थर आला. त्याने मान हलविल्याबरोबर त्याला कागदाचा आवाज आला. त्याच्या तोंडावर कोणीतरी वर्तमानपत्र टाकले होते आणि त्यावर थोडी वाळू जमा झाली होती. शीऽऽऽऽऽऽ त्याला परत झोप लागली होती तो चरफडला. त्या कागदावरुन जेवढी वाळू घरंगळत खाली आली त्यावरुन बराच वेळ ती पडत असणार. तिरक्या रेषेत पडणार्या प्रकाश किरणांनी त्याने ताडले की दुपार झाली असणार. पण हा परिचीत वास कसला? नवीन शाईचा? अशक्यच होते म्हणा ते. तरीपण त्याने त्या वर्तमानपत्राच्या तारखेवर नजर टाकली आणि काय आश्चर्य, ते आजचेच वर्तमानपत्र होते. त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. याचा अर्थ तिने त्याची विनंती खरोखरच त्यांच्याकडे मांडली होती....
तो सतरंजीवर कोपरे टेकवून उठला. ती घामाने भिजली होती. त्याच्या मनात इतक्या विचारांनी गर्दी केली होती की त्याला त्या वर्तमानपत्रातील मजकुरावर लक्ष केंद्रीत करणे अवघड गेले. त्याची नजर नुसतीच त्या अक्षरांवरुन फिरत होती.
‘जपान-अमेरिकेच्या बैठकीत चर्चेसाठी अधिक मुद्द्यांची भर....’
त्याला तिने हे वर्तमानपत्र कसे मिळवले असेल याचे आश्चर्य वाटले. त्या गावकर्यांना त्याच्याबद्दल आता थोडीफार सहानुभूती वाटू लागली असेल का? का त्यांना आता उमजले आहे की ते त्याचे काहीतरी देणं लागतात? पण आत्तापर्यंतच्या अनुभवाला अनुसुरुन न्याहरीनंतर बाहेरच्या जगाशी त्यांचा संपर्क परत एकदा तुटला. तिची बाहेरच्या जगाशी संपर्काची काही गूप्त व्यवस्था तर नाही? का तिने तो झोपला असताना स्वत:च बाहेर जाऊन ते वर्तमानपत्र आणले असेल ? दोन्हीपैकी एक खरे असणार.
‘रहदारीच्या व्यवस्थेत लक्ष घालणार...’
पण थांब ! समजा ती बाहेर गेली असेल तर तिने शिडीचा वापर निश्चितच केला असणार. तिने तो कसा केला असणार याबद्दल त्याला काही सांगता येईना. पण तिने त्याचा वापर केला असणार हे निश्चित.... त्याच्यासारख्या कैद्याने स्वातंत्र्याची स्वप्ने बघणे हे नैसर्गिक आहे पण त्या गावातील ती एक स्त्री आहे आणि तिला ही बंधने कशी काय चालतात बुवा? बहुधा ती शिडी तेथे कायम स्वरुपातच असणार फक्त त्यांनी ती तो बाहेर येऊ नये म्हणून तात्पुरती काढलेली असणार. त्यांना जर बेसावध ठेवले तर तशी संधी केव्हा ना केव्हातरी मिळेलच.
‘कांद्यातील एक घटक किरणोत्सर्गाच्या जखमात उपयुक्त....’
त्याच्या आजारी पडण्याच्या ढोंगाने त्याला हा एक अनपेक्षितपणे एक फायदा झाला. पूर्वी एक म्हण होती ना....धीरापोटी फळे रसाळ गोमटी... पण त्याचे समाधान होत नव्हते. तो बेचैन होता. कदाचित त्या स्वप्नाचा परिणाम असेल.त्या पत्राची त्याला अजूनही भीती वाटत होती. काय होता त्याचा अर्थ? पण प्रत्येक स्वप्नाचा अर्थ लावण्यात अर्थ नव्हता. त्यापेक्षा त्याच्या योजनेकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे...
ती तेथेच जमिनीवर एका उंचवट्यावर मुटकुळे करुन झोपली होती. एका लयीत ती श्वास घेत होती, सोडत होती. तिने एक चुरगाळलेला जुना कपडा अंगावर ओढला होता. त्या दिवसापासून तिने त्याच्यासमोर नग्नावस्थेत येण्याचे बंद केले होते पण त्या कपड्याखाली ती नेहमीप्रमाणे नग्न असणार, तो मनाशी म्हणाला.
त्याने पटकन स्थानिक बातम्यांवर नजर फिरविली. अर्थात त्यात त्याच्या नाहिसे होण्यावर काहीच छापून आले नव्हते ना हरवल्याची नोटीस. पण त्याने त्याची विशेष अपेक्षा केली नसल्यामुळे त्याचा अपेक्षाभंग झाला नाही. तो शांतपणे उठला आणि त्याने जमिनीवर पाय ठेवला. त्याने फक्त एक कृत्रीम रेशमाची अर्धी विजार घातली होती. तेच बरे वाटत होते तेथे. त्याने कमरेवर जेथे ती विजार बांधली होती तेथे कमरेवर, वाळू जमा झाली होती. तेथे लालसर चट्टा उठलेला त्याला दिसला.
त्याने दरवाजात उभे राहून त्या वाळूच्या भिंतीवर नजर टाकली. प्रकाशाच्या किरणांचे भाले त्याच्या डोळ्यात रुतले आणि आसमंत पेटून उठला. त्याच्या पिवळ्या ज्वाळा त्याच्या मेंदूत पोहोचल्या. तेथे ना कोणी माणूस होता ना ती दोरखंडाची शिडी. त्याने परत एकदा खात्री करण्यासाठी सगळीकडे नजर फिरविली. ती शिडी खाली सोडल्याची कसलीही खूण त्याला दिसली नाही. या अशा वार्यात ती काही क्षणातच पुसूनही गेली असेल. जमिनीवर वाळूची सारखी उलथापालथ चालू होती जणू तेथे वाळूचा एखादा जिवंत झरा असावा.
तो परत घरात आला व पडून राहिला. एक माशी घोंघावत होती. मधमाशी असावी बहुधा. त्याने उशाशी असणार्या प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळलेल्या किटलीतील पाण्याने त्याचे नरडे जरा ओले केले.
“जरा उठशील का?” त्याने विचारले.
ती धडपडत उठली. त्या धड्पडीत तिचे वस्त्र पार कमरेपर्यंत ओघळले. त्यातून तिच्या उन्नत स्तनावरील निळ्या रक्त वाहिन्या त्याला स्पष्ट दिसल्या. वैतागून तिने तिचे वस्त्र सारखे केले. तिच्या डोळ्यावरील झोप अजून सरली नव्हती. तिला आत्ता विचारावे का शिडीबद्दल? रागावून विचारावे का? का जरा सौम्य धोरण स्वीकारावे व वर्तमानपत्रासाठी तिचे आभार मानावेत? तिला झोपू द्यायचे नाही एवढेच जर करायचे असेल तर थोडेसे आक्रमक धोरणच स्वीकारले पाहिजे. त्याचे आजारपणाचे नाटक काही व्यवस्थीत वठत नव्हते. तो मणक्याचा आजार असलेला रुग्ण वाटतच नव्हता. त्यांना तो आजारी असल्याचे पटले पाहिजे म्हणजे ते पहारा थोडा सैल करतील. त्याला वाटले की त्यांची भूमिका थोडीशी सौम्य झाली असावी नाहीतर त्यांनी आज वर्तमानपत्र टाकलेच नसते. ‘त्यांचा विरोध कुठल्या ना कुठल्यातरी मार्गाने मोडून काढला पाहिजे.’ तो मनात म्हणाला.
पण हे असले काहीच न झाल्यामुळे त्याचा अपेक्षाभंग झाला.
“नाही ! मी बाहेर जात नाही. सहकारी संघाने काही लाकडाला लावण्याची रसायने टाकली तेव्हा मी त्यांना वर्तमानपत्राबद्दल विनंती केली होती..या गावात दोनचार घरेच वर्तमानपत्रे घेत असतील. त्यांना ती आणायला बरेच दूर जावे लागते.”
हे असेच घडले असेल असे खात्रीने सांगता येत नाही. ज्याला कुलूप किल्लीच नाही अशा तुरुंगात बंदीवान असल्यासारखेच होते हे सगळे. जरी त्या गावातील लोकांना हे चालणार असले तरी त्याला मात्र ते चालणार नहते. तो अस्वस्थ झाला.त्याचे विचार त्याला स्वस्थ बसू देइनात.
“आश्चर्यच आहे. हे तुझे घर आहे ना? तू काही एखादा पाळीव प्राणी नाहीस. तू केव्हाही येथून जाऊ शकते, परत येऊ शकतेस. का तुझ्या हातून असे काहीतरी घडले आहे की ज्याने तुला गावात तोंड दाखविण्यास जागा उरली नाही?”
तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले. संतापाने त्या मोठ्याल्या डोळ्याचा रंग बदलून लाल झाला.
“मुळीच नाही. असे समजणे मूर्खपणा आहे” ती चिडून म्हणाली.
“मग तुला त्यांना एवढे घाबरण्याचे कारण नाही...”
“पण बाहेर जायचे काही कारणच नाही तर कशाला बाहेर जायचे ?”
“फिरायला तर जाऊ शकतेस”
“फिरायला ?”
“हो ! फिरायला ! काय हरकत आहे ? मी येण्याअगोदर तू फिरायला जात असशीलच ना ?”
“मी काही कारण नसताना चालले तर दमून जाते.”
“मी चेष्टा करीत नाही. स्वत:लाच विचारुन बघ,. एखाद्या कुत्र्यालाही जर असे जखडून ठेवले तर त्यालाही वेड लागेल.”
“पण मी आयुष्यात खूप चालले आहे” ती अचानक तिच्या एकसुरी आवाजात म्हणाली. “खरंच सांगते. ते मला खूप चालवायचे. मी येथे येईपर्यंत. माझ्या पाठीवर माझे बाळ असायचे तेव्हा. चालून चालून मी कंटाळून गेले होते.”
ते ऐकून तो क्षणभर दचकला. त्याच्याकडे यावर बोलण्यासारखे काहीच नव्हते. त्याला आठवले काही वर्षापूर्वी जेव्हा सगळे जमिनदोस्त झाले होते तेव्हा चालायला लागू नये म्हणून सगळेजण धडपडत होते. आता तरी ते चालण्यापासून मुक्त झाल्यामुळे समाधानी होते का? तो विचारात पडला. सहलीला जाण्याचा हट्ट धरणारे मूल हरविले की रडतेच ना?
तिने तिचा स्वर बदलला व विचारले, “तुमची तब्येत ठीक आहे ना.?”
‘बावळटासारखा तिच्याकडे बघू नकोस’ तो स्वत:वर चिडून म्हणाला. त्याला तिच्याकडून चूक कबूल करुन घ्यायची होती. जबरदस्ती करावी लागली तरी. तो विचार मनात आला आणि त्याच्या अंगावर शहारा आला. बहुधा जबरदस्ती आणि कातडी याचे फार जवळचे नाते असावे. क्षणभर त्याच्या डोळ्यासमोर तिची रुपरेषा उभी राहिली. कमनीय बांधा त्याच्या मनात भरला. वीस वर्षाच्या पुरुषाच्या भावना नुसत्या विचारानेही उद्दीपित होऊ शकतात तर चाळीस वर्षाच्या पुरुषाच्या भावना त्याच्या कातडीवर उद्दीपित होतात. पण तिशीच्या पुरुषाला एखाद्या स्त्रीची रुपरेषा दिसणे हे सगळ्यात धोकादायक. त्या आकृतीला तो सहज मिठी मारु शकत होता. पण तिच्या मागे हजारो डोळे त्याच्याकडे बघत असल्याचा त्याला भास झाला. ती त्या नजरांच्या ताब्यात असलेली एक कठपुतळी होती. त्याने जर तिला मिठीत घेतली असती तर कदाचित तोही नजरबंद झाला असता. त्या असल्या जागेतही त्याला त्याच्या वाहत्या आयुष्याला खीळ घालण्याची इच्छा होईना.
ती त्याच्या मागे येऊन बसली. तिचे गुडघे त्याच्या नितंबांना मागून टेकले गेले. उन्हात तापलेल्या पाण्यावर जसा एक तप्त वास येतो तसा वास तिच्या शरीरातून त्याच्या आसपास भरुन राहिला. थोड्याशा नाखुषीने का होईना तिने तिची बोटे त्याच्या पाठीवरुन फिरविण्यास सुरुवात केली. त्याने बरे वाटून त्याचे शरीर सैल पडले. अचानक तिने तिची बोटे बाजूवर फिरवली. त्याच्या तोंडातून एक हलका चित्कार बाहेर पडला.
“तू मला गुदगुल्या करतीयेस.”
ती नुसतीच हसली. ती बहुधा त्याला चिडवत होती किंवा ती लाजून काहीतरी करायचे म्हणून हसली असेल. हे सगळे एकदम झाल्यामुळे त्याला विचार करण्यास वेळच मिळाल नाही. काय हेतू असेल तिचा? तिने मुद्दामहून गुदगुल्या केल्या असतील, का तिचा हात अपघाताने बाजूला पोटावर गेला असेल? काही क्षणापूर्वीच ती मोठ्या कष्टाने डोळे उघडत उठली होती. त्याला आठवले पहिल्या रात्री जेव्हा तो येथे आला तेव्हाही त्याला बोटांनी ढोसताना ती अशीच विचित्र हसली होती. तिच्या या वागण्याने ती काहीतरी सुचवत तर नाही ना ?
कदाचित तिचा त्याच्या आजारावर विश्वास नसावा व ती तिला आलेल्या संशयाचे निराकरण करत असेल. असे सुद्धा असेल. येथे काही सांगता येत नाही. काहीही शक्य आहे. सावधच राहिलेले बरे. तिचा मोह म्हणजे किटक खाणार्या वनस्पतीसारखाच आहे. प्रथम ती मधाचे बिंदू आपल्यासमोर धरेल आणि मग बेड्या....
क्रमशः
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
15 Feb 2017 - 2:51 pm | nanaba
Pubhapra
16 Feb 2017 - 11:59 am | माझीही शॅम्पेन
प्रत्येक भागात प्रत्येक भागाची लिंक देता येईल का ?
किमान मागील आणि पुढील भागाची लिंक तरी मिळेल का ? सगळे भाग शोधणे जवळपास अशक्य झाले आहे
16 Feb 2017 - 6:38 pm | जयंत कुलकर्णी
शेजारील चित्रावर क्लिक केल्यास अनुक्रमणिका मिळेल...
16 Feb 2017 - 12:40 pm | संजय क्षीरसागर
वाचावी म्हणतो ही कादंबरी !
16 Feb 2017 - 7:38 pm | एस
वाचत आहे.
16 Feb 2017 - 8:19 pm | पैसा
खूप उत्सुकता लागून राहिली आहे.
16 Feb 2017 - 10:01 pm | urenamashi
तुमच्या सर्व कथा कादंबऱ्या वाचताना सगळे डोळ्या समोर चिञमय रुपात उभे राहतात ... पण या कादंबरी मधील घर काही केल्या माझ्या डोळ्यांसमोर उभे राहत नाही . मला समजतच नाही की या घराचे structure कसे आहे :(
कदाचित माझी कल्पना शक्ती कमी पडत असेल :(