मोबियस प्रकरणे ९-१०

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
13 Feb 2017 - 9:38 pm

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

सावलीतून एकदम उन्हात आल्यावर तो पायापासून वर वितळू लागल्याचा त्याला भास झाला. पण त्याच्या गाभ्यामधे बर्फाची एखादी लादी असल्यासारखा तो अजून पूर्ण वितळत नव्हता. त्याला एकंदरीत परिस्थितीची लाज वाटली. एक जनावरासारखी बाई, जी फक्त आजचा विचार करतेय, कालचा नाही उद्याचा नाही.जणू काही तिच्या ह्रदयाच्या जागी फक्त एक बिंदू आहे. एक वेगळेच विश्व, ज्यात काही लोकांना ‘ते’ फळ्यावरच्या खडूने लिहिलेल्या अक्षरांप्रमाणे इतरांना एका क्षणात पुसून टाकू शकतात अशी खात्री आहे. त्याच्या स्वप्नातही त्याने अशी कल्पना केली नसती की असा रानटीपणा या जगाच्या पाठीवर अजून शिल्लक आहे. हंऽऽऽऽ, पण त्याच्या सद्सद्विवेक बुद्धीच्या टोचणीने असा विचार मनात आला म्हणजे तो आता धक्क्यातून सावरला आहे असे समजायला हरकत नाही.

मोबियस


बाहेरच्या उजेडातून एकदम घरात आल्यामुळे त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. आत गार व थोडे दमटही वाटत होते. दमटपणामुळे आत वेगळाच वास येत होता. पुढच्या क्षणी त्याला धक्का बसला कारण ती तेथे नव्हती. तिच्या बाबतीत अंदाज बांधून बांधून तो आधीच दमला होता...पण ती तेथेच होती. त्याच्याकडे पाठ करुन ती पाण्याच्या रांजणाजवळ उभी होती.

तिने आवरले होते. प्रयत्न करुनही त्याला तिच्या वस्त्रांमधे काही चूक काढता येईना. तिच्या कपड्यांच्या रंगामुळे त्या हवेत एक प्रकारचा ताजेपणा भरुन राहिला होता. एखाद्या सामान्य पण सुंदर स्त्रीसारखी दिसत होती ती. तो उगीचच तर्कवितर्क लढवत बसला होता म्हणायचे.

तिने तिचा एक हात रांजणाच्या काठावर टेकवला होता आणि दुसर्‍या हाताच्या बोटाने ती रांजणातील पाण्यात रेघोट्या काढीत होती. त्याने एकदम त्याचा शर्ट हवेत झटकला व मनगटाभोवती घट्ट गुंडाळला. तिने चमकून इकडे तिकडे पाहिले. तिच्या चेहर्‍यावरचे चिंतातूर भाव इतके नैसर्गिक होते की कोणालाही वाटले असते की ती आयुष्यभर चिंताच करत जगते आहे की काय! त्याने जरा दमाने घ्यायचे ठरविले.

“गरम आहे नाही आज ? शर्ट घालूच शकत नाही आज.”

तिने संशयाने त्याच्याकडे पाहिले. केविलवाणे हसत ती आढेवेढे घेत म्हणाली,

“आहे खरे गरम नेहमीपेक्षा. अशा हवेत जर कपडे घातले तर घामामुळे तुमच्या अंगावर पुरळ हमखास उठेल.”

“वाळूमुळे?”

“हो! फोड येतात. जसे भाजल्यावर येतात तसे व त्यावर खपल्या धरल्यावर त्या पडून जातात.”

“खपल्या नसतील, मला वाटते दमटपणामुळे ती...”

“हो... म्हणूनच मी म्हणते...” ती आता थोडीशी मोकळी झाली.

“म्हणूनच जेव्हा घाम यायला लागतो तेव्हा आम्ही कमीतकमी कपड्यात वावरतो. आता येथे या विवरात कोण बघायला येणार आहे आम्हाला?”

“तेही बरोबरच आहे म्हणा ! हे बघ मला काही तुला त्रास द्यायचा नाही पण मला शर्ट धुवायचा आहे.”

“मी धुवून देईन ना! ते आपल्या वाट्याचे पाणी उद्या आणून देतील मग देईन धुवून !”

“उद्या? उद्या शक्य नाही !” तो हसत म्हणाला. त्याने त्याला पाहिजे होते त्या विषयावर बोलण्याची गाडी वळविण्यात यश मिळविले.

“ ते मला केव्हा येथून बाहेर काढणार आहेत? नाहीतर माझी पंचाईत होईल. माझ्यासारखा नोकरदार माणूस अर्धा दिवस जरी गैरहजर राहिला तरी त्याचे किती नुकसान होते! मला आता एकही मिनिट वाया घालवून चालणार नाही. या वाळूमधे कोलिओटेरा प्रकारचे किटक मुबलक आढळतात. तुला माहीत असेल तर सांग. या सुट्टीमधे मला एक तरी नवीन किटक शोधायचाच आहे.”

तिचे ओठ हळूवारपणे हलले पण त्यातून एक शब्दही बाहेर पडला नाही. ती ते नाव उच्चारायचा प्रयत्न करीत होती. ती आता परत तिच्या कोषात जाणार हे ओळखून तो घाईघाईने म्हणाला,

“गावकर्‍यांशी संपर्क साधण्यासाठी काही मार्ग आहे का? उदा. त्या डब्यांवर जोरजोरात वाजवून आवाज केला तर?”
पण तिने उत्तर दिले नाही. एखादा दगड जसा पटकन पाण्यात बुडतो तशी ती परत गप्प झाली.

“काय झालंय काय तुला? तू बोलत का नाहीस?” त्याच्या रागाचा पारा परत वर चढायला लागला पण त्याने स्वत:ला सावरले.

“मला समजत नाही. आपल्यात काही गैरसमज निर्माण झाले असतील. तरीही मी म्हणेन, जे झाले ते झाले. त्याचा आत्ता विचार करण्यात काय अर्थ आहे? सगळ्यात वाईट तुझे हे असे गप्प बसणे आहे. माझे विद्यार्थी बर्‍याच वेळा असे करतात. मी त्यांना सांगतो गप्प बसून बालंट आपल्या अंगावर घेणे हा शुद्ध पळपुटेपणा झाला. तुला काही मला सांगायचे असल्यास बोलून टाक!”

“पण.. तिने तिच्या कोपरावर नजर लावली, मला वाटले तुम्हाला आत्तापर्यंत समजले असेल.”

ते ऐकून त्याचा श्वास कोंडला. “समजतंय मला.” त्याने त्याला बसलेला धक्का लपविण्याचा आजिबात प्रयत्न केला नाही.

“पण मला कसं कळणार ! ”तो ओरडला. “तू एकही शब्द बोलत नाहीस, काय कळणार मला कप्पाळ !”

“येथे एकट्या बाईचे आयुष्य फारच खडतर आहे.”

“त्याच्याशी माझा काय संबंध?”

“आहे फार जवळचा संबंध आहे. मी तुम्हाला फसवले आहे”

“म्हणजे? फसवलंय म्हणजे?” त्याचे शब्द घशात अडखळले.

“आता समजले. म्हणजे तू माझ्यासाठी येथे सापळा लावला होतास तर! तुला काय वाटले बाई दिसताच मी या सापळ्यात स्वत:हून उडी मारेन? एखाद्या प्राण्यासारखा?”

“आता उत्तरेचे वारे वाहू लागतील आणि त्यांच्याबरोबर वादळे आणतील.” ती दरवाजाबाहेर पहात म्हणाली. तिच्या त्या एकसुरी आवाजात कोठून कोणास ठावूक मूर्खांचा आत्मविश्वास डोकावू लागला होता.

“विनोद पुरे आता ! असंगतीलाही काही सीमा असते. येथे मला डांबून ठेवणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. अट्टल गुन्हा. मला येथे डांबण्यात काहीच अर्थ नाही. असल्या कामासाठी तुम्हाला अनेक कामगार मिळतील. अर्थात त्यांना तुम्हाला पगार द्यावा लागेल हे वेगळे!”

“मिळतीलही कदाचित! पण बाहेरच्या लोकांना हे कळल्यावर त्याचा त्रास होणारच !”

"मग तुम्हाला काय वाटले, माझ्यापासून तुम्हाला त्रास होणार नाही? चूक आहे. असे समजण्यातच तुम्ही घोडचूक केली आहे. तुमच्या दुर्दैवाने मी लंगडा नाहीए. मी एक प्रामाणिक करदाता आहे व माझे नाव सरकारदरबारी नोंदलेले आहे. लवकरच मला शोधण्याचे आदेश निघतील, बघालच तुम्ही. तुम्हाला एवढे कळत नाही? अशा बेताल वागणूकीचे कसे काय समर्थन करणार तुम्ही? या सगळ्याला जो कोणी जबाबदार आहे त्याला त्वरित बोलवा. मी फक्त त्याच्याशीच बोलेन. या सगळ्या मूर्खपणाबद्दल मी त्याच्याशीच बोलेन.”

ते ऐकताना तिची नजर खाली झुकली. तिचे खांदे खाली पडले पण तिने कसलीही हालचाल केली नाही. एखाद्या भेदरलेल्या कुत्र्याच्या पिल्लासारखी तिची अवस्था झाली होती. पण त्याने त्याला अधिकच राग आला.

“बोल ना माझे आई ! माझ्याइतका तुझ्यावरही अन्याय होतोय. तूच म्हणालीस ना की बाहेर जर हे कळले तर सगळ्यांची पंचाईत होईल म्हणून? म्हणजे येथे काहीतरी भयंकर शिजते आहे हे निश्चित. या गुलामगिरीत खितपत पडू नकोस. बाहेर पड यातून. बोल काहीतरी. कोणालाही तुला येथे असे डांबून ठेवण्याचा अधिकार नाही. जा कोणालातरी बोलावून आण.आपण येथून बाहेर पडणार आहोत. हंऽऽऽऽऽऽ म्हणजे तू घाबरली आहेस हो ना? त्यात काय आहे घाबरण्यासारखे? माझे काही मित्र वर्तमानपत्रात काम करतात. त्यांना सांगून तुझी ही वेठबिगार आपण उघडकीस आणू. तू बोलत का नाहीस ? मी सांगतो तुला....यात घाबरण्यासारखे काही नाही.”

शांततेच्या एकाच क्षणानंतर तिचे ओठ विलग झाले. त्याला बरे वाटावे म्हणून शेवटी ती काहीतरी बोलली एकदाची...

“जेवणाची तयारी करु का?”.........

१०
तिने शांतपणे बटाटे सोलायला घेतले. डोळ्याच्या कोपर्‍यातून तिला न्याहाळताना त्याच्या मनात विचार आला, तिने तयार केलेले जेवण घ्यावे की नाही? त्याच्या मनाचा ताबा नंतर याच विचाराने घेतला.

आता मात्र त्याने शांत रहायला हवे. आता तिने तिचा हेतू स्पष्ट केल्यावर शांतपणे त्याला सामोरे जाऊन सुटकेचा मार्ग शोधलेला बरा. त्यांचा हिशेब नंतर चुकता करता येईल. पण त्याला लागलेली भूक त्याला विचार करु देईना. त्याच्या या दशेला कारणीभूत असलेल्या स्त्रीच्या हातचे जेवण खरे तर त्याने घ्यायला नको होते. एखादे हाडूक समोर दिसल्यावर कुत्रेही आपली शेपूट हलविते..

पण एवढ्यातच कसलाही निष्कर्ष काढायला नको. जोपर्यंत त्याला ती पुढे काय करणार आहे याचा अंदाज येत नव्हता, तोपर्यंत काही गृहीत धरण्याचे कारण नव्हते. तो काही तेथे फुकट राहणार नव्हता. त्याच्या राहण्याचे खाण्यापिण्याचे तो पैसे देणारच होता. पैसे दिले की त्याच्या मनातील उपकाराची बोच जाणार होती. मुष्टीयुद्धाच्या त्याने अनेक स्पर्धा त्याने चित्रवाहिनीवर पाहिल्या होत्या. त्यात तर सगळे ‘आक्रमण हा बचावाचा सर्वोत्तम मार्ग आहे’ असेच म्हणत.

या विचाराने त्याला हायसे वाटले. त्याला आता अन्न स्वीकारण्यासाठी चांगले कारण मिळाले होते. त्याच क्षणी त्याच्या मनावरचे मळभ दूर झाले. फक्त वाळूच त्याची शत्रू होती. त्याच्यावरच लक्ष केंद्रीत करायला हवे. त्यांनी ती दोराची शिडी काढून घेतली, घेऊ देत. तो लाकडाची शिडी तयार करण्याचा प्रयत्न करु शकतो. जर ती वाळूची भिंत सरळसोट असेल तर तो वाळू खरडून त्यात पायर्‍या खोदेल. ‘जरा डोके वापरले तर सगळे ठीक होईल. अवघड प्रश्नांची उत्तरे नेहमीच सोप्पी असतात. थोडा त्रास होईल पण अजून काही सगळे संपलेले नाही.’ त्याने विचार केला. बटाटे सोलून झाल्यावर तिने ते चिरले व एका मोठ्या लोखंडी कढईत टाकले. त्याचबरोबर थोडी गाजरे, काही पालेभाजी टाकली. मग तिने काळजीपूर्वक एका प्लॅस्टिकच्या पिशवीतून काडेपेटी बाहेर काढली व वापरुन झाल्यावर तेवढ्याच काळजीने परत त्या पिशवीत ठेवली व वरुन एक रबरबँड लावले. एका चाळणीत तांदूळ घेऊन तिने त्यावर पाणी टाकले, वाळू काढण्यासाठी. थोड्याच वेळात त्या कढईतून बुडबुडे फुटण्याचा आवाज येऊ लागला व हवेत गाजराचा आंबटगोड वास भरुन गेला.

“थोडे पाणी राहिले आहे. तुम्हाला तोंड धुवायचे असेल तर!”

“नाही. त्यापेक्षा मी पिईन.”

“मी पिण्याचे पाणी वेगळे ठेवले आहे.” असे म्हणून तिने खालून प्लास्टिकमधे गुंडाळलेली एक किटली काढली.

“एवढे गार नाहीए पण उकळून ठेवले आहे त्यामुळे न घाबरता तुम्ही ते पिऊ शकता.”

“पण ती किटली धुण्यासाठी तरी त्यात थोडे पाणी ठेवावे लागेल ! हो ना?”

“नाही! नाही! भांडी धुण्यासाठी मी वाळूच वापरते.”

हे म्हणत असतानाच तिने खिडकीतील मूठभर वाळू उचलली व हातातील ताटात फेकली. तिने त्या ताटातील वाळूला चक्राकार गती दिली. त्याने ते ताट साफ झाले की नाही ते त्याला कळले नाही पण बहुधा झाले असावे. वाळूचा हा एक चांगला उपयोग होता.

परत एकदा छत्रीखाली जेवण झाले. मासे आणि पालेभाज्या. पण सगळ्यात वाळूची कचकच लागत होती. तिने जर ती छत्री कुठेतरी अडकवली तर ते दोघेही बरोबरच जेवू शकले असते. पण त्याला वाटले, तसे म्हटले तर तिला काहीतरी वेगळे वाटायचे. जेवणानंतरचा चहा सामान्य प्रतिचा होता पण त्याचा रंग मात्र गडद होता.

त्याचे जेवण झाल्यावर ती मोरीच्या काठावर गेली. डोक्यावर एक प्लॅस्टीकचा कागद घेऊन ती त्याखाली जेवू लागली. तिच्याकडे पाहताना त्याच्या मनात विचार आला, ‘किटकात आणि हिच्यात किती साम्य आहे ! ही काय आयुष्यभर अशीच राहणार आहे की काय?’ बाहेरुन पाहिले तर ही जागा पृथ्वीवरील एका बिंदूएवढी होती पण आत त्या विवरातून फक्त अमर्याद वाळू आणि आकाश दिसत होते. तिच्या कानावर आत्तापर्यंत प्रेमाचे दोन शब्द तरी पडले आहेत की नाही कोणास ठावूक. कदाचित त्यांनी त्याला तेथे टाकल्यामुळे तिच्या ह्रदयातील धडधड एखाद्या तरुणीप्रमाणे वाढली असावी.....त्याला तिची कीव आली...

त्याला तिच्याशी काहीतरी बोलण्याचा मोह झाला खरा पण त्याने तो बाजूला सारुन धुम्रपान करायचे ठरविले व एक सिगारेट शिलगावली. या जगात प्लॅस्टिक आवश्यकच होते. सिगरेटची चवच गेली होती. त्याने सिगरेट दातात धरुन जोरजोरात कश मारले. पण तंबाखूची चव येण्याऐवजी त्याच्या तोंडात तेलकट धुराची चव घोळत राहिली. त्याने त्याच्या जिभेची चव गेली. त्या चवीमुळे त्याने तिच्याशी बोलण्याचा विचारच सोडून दिला.

तिने भांडी घासून जमिनीवर पसरुन ठेवली व म्हणाली,

“चला आता मला छतावरुन वाळू काढायला सुरुवात केली पाहिजे”

“छतावरची वाळू? काही हरकत नाही.”
आता त्या प्रकाराशी त्याचा काय संबंध राहिला होता हे काही त्याला कळले नव्हते. ते वासे कुजले काय किंवा ते छत पडले काय त्याला आता काहीही फरक पडणार नव्हता.

“मी तुमच्या मधे येतोय का? बाजूला सरकू का ?”

“बरे होईल! तुम्हाला राग तर येणार नाही ना?”

खरे तर तिला नाटक करण्याचे काहीच कारण नव्हते. तिच्या प्रामाणिक भावना ती का नाही बोलून दाखवत? तिच्या ह्रदयात खूपच कटूता भरुन राहिली असणार या परिस्थितीबद्दल. पण तिचा चेहरा भावनाशून्य होता. तिने निर्विकारपणे तोंडाभोवती टॉवेल गुंडाळून मागे बांधला. एका काठीला खराटा बांधून ती त्या मधल्या एक दरवाजा नसलेल्या कपाटावर चढली.

त्याच्या तोंडातून अचानक एक वाक्य निघून गेले,

“प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर हे घर पडून त्याचे तुकडे झाले तर आपल्या दोघांनाही आनंद होईल!”

त्याच्या तोंडातून बाहेर पडलेल्या वाक्याने तो स्वत:च चकित झाला. तिनेही चमकून त्याच्याकडे पाहिले. चला तिचा अगदीच काही किटक झाला नव्हता तर!

“मी काही तुमच्यावर रागावलेलो नाही. येथे जे काही चालले आहे ना, त्याच्यावर चिडलोय मी. कोणालाही असे कट करुन डांबण्याचा हा प्रकार अमानुष आहे. मी काय म्हणतो आहे ते समजतय ना तुम्हाला? अर्थात समजले किंवा समजले नाही त्याने काय फरक पडतो म्हणा आता? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो... माझ्याकडे एक कुत्रा होता ज्याचे केस आजिबात झडायचे नाहीत. तो इतका केसाळ झाला की मी त्याचे केस कापायचे ठरविले. केस कापल्यावर त्या कुत्र्याच्या मनात काय चालले होते कोणास ठाऊक. तो विव्हळल्यासारखा ओरडला. त्याने केस तोंडात पकडले व घरात पळाला. बहुधा त्याला अजूनही ते केस त्याच्या शरीराचाच भाग आहे असे वाटत असावे.”

एवढे बोलून त्याने तिच्यावर काही फरक पडलाय का हे बघण्यासाठी रोखून पाहिले. पण तिच्यात काहीच फरक पडलेला दिसला नाही. ती तशीच त्याजागी अवघडल्यासारखी उभी राहिली.

“जाऊदेत! प्रत्येकाचे एक तत्वज्ञान असते. ते सगळ्यांनाच लागू पडेल असे नाही. तू आपली बोटे झिजेपर्यंत ती वाळू साफ करत बस. पण हे आता माझ्या सहनशक्तीच्या बाहेर चालले आहे. बस्स झाले! आणि माझ्या सिगरेटही संपल्या आहेत.”

“सिगरेट. हंऽऽऽऽऽते पाणी देतील तेव्हा सिगरेटही देतील”

“अरे व्वा! ते सिगरेटही देतात वाटते.” तो स्वत:शीच हसला. मी त्याबद्दल बोलत नाहीए. त्या केसांबद्दल बोलतोय..केसांबद्दल...कुत्र्याच्या.... मला काय म्हणायचंय ते कळत नाहीये का तुम्हाला?”

ती गप्प राहिली. ती यावर काही बोलेल असे वाटत नव्हते. ती एक क्षणभर थांबली. जणूकाही ती त्याचे बोलणे थांबण्याची वाट पहात होती. त्याचे बोलणे थांबले आणि तिने काही झालेच नाही असे दर्शवून तिचे काम परत सुरु केले. तिने त्या कपाटावरील ताडपत्री थोडी बाजूला सारली व वर चढण्याची धडपड सुरु केली. त्या धडपडीने छतातून वाळू गळायला लागली. त्या छतात कसलेतरी वेगळेच किटक असावेत अशी आता त्याला खात्री पटू लागली. वाळू आणि कुजलेले लाकूड....नको त्याबद्दल विचारही नको!.

तेवढ्यात त्या छपराच्या एका कोपर्‍यातून वाळूच्या अनेक चपट्या धारा लागल्या. त्या हिंस्र वाळूचा तो शांत आविष्कार पाहताना तो विस्मयचकित झाला. त्या तापलेल्या वाळूच्या वासाने त्याचे डोके भणाणून गेले. त्याने घराबाहेर पळ काढला.

सावलीतून एकदम उन्हात आल्यावर तो पायापासून वर वितळू लागल्याचा त्याला भास झाला. पण त्याच्या गाभ्यामधे बर्फाची एखादी लादी असल्यासारखा तो अजून पूर्ण वितळत नव्हता. त्याला एकंदरीत परिस्थितीची लाज वाटली. एक जनावरासारखी बाई, जी फक्त आजचा विचार करतेय, कालचा नाही उद्याचा नाही.जणू काही तिच्या ह्रदयाच्या जागी फक्त एक बिंदू आहे. एक वेगळेच विश्व, ज्यात काही लोकांना ‘ते’ फळ्यावरच्या खडूने लिहिलेल्या अक्षरांप्रमाणे इतरांना एका क्षणात पुसून टाकू शकतात अशी खात्री आहे. त्याच्या स्वप्नातही त्याने अशी कल्पना केली नसती की असा रानटीपणा या जगाच्या पाठीवर अजून शिल्लक आहे. हंऽऽऽऽ, पण त्याच्या सद्सद्विवेक बुद्धीच्या टोचणीने असा विचार मनात आला म्हणजे तो आता धक्क्यातून सावरला आहे असे समजायला हरकत नाही.

वेळ महत्वाचा आहे. कामं अंधार पडण्याआधी संपायला पाहिजेत. धापा टाकत त्याने त्या उष्णतेच्या थराखालील वाळूच्या भिंतीची उंचीचा अंदाज बांधला. प्रत्येक वेळी तो नजर टाके तेव्हा त्याला तिची उंची वाढलेली वाटू लागली. त्याचा चढ सरसकट कमी करणे अशक्यच होते पण जेथे ती सरळसोट आहे तेथे थोडी वाळू काढता येण्यासारखी होती. आता माघार नाहीच !

ही भिंत वरुन खरडणे सगळ्यात सोप्पे होते पण ते अशक्यच होते त्यामुळे खालूनच सुरुवात करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. खाली थोडे खणले की वरची वाळू ढासळेल मग ती परत खणून त्याच्या वरची वाळू ढासळेल मग परत खणणे. त्याने जर न कंटाळता हे चालू ठेवले तर तो ज्या जमिनीवर उभा आहे तिची उंची वाढत वाढत तो त्या विवराच्या काठापर्यंत जाऊ शकेल. अर्थात यात वरुन पडणार्‍या वाळूत गाडले जायची भीती होती, नाही असे नाही. पण वाळू म्हणजे काही पाणी नाही. तो वाळूवर चढू शकत होता आणि मुख्य म्हणजे आजवर त्याने वाळूत बुडून मेलेल्या माणसाबद्दल कधीच ऐकले नव्हते.

फावडे आणि ते रॉकेलचे डबे भिंतीला टेकून उभे होते. त्या भिंतीने घराभोवतालच्या जमिनीला एक वेटोळे घातले होते. त्या फावड्याची झिजलेली कड एखाद्या तुटलेल्या चिनीमातीच्या भांड्यांसारखी दिसत होती.

बराच वेळ त्याने खोदण्यात घालवला. वाळू बरीच भुसभुशीत होती आणि काम बर्‍यापैकी पुढे जात होते. फावड्याचा वाळूवरचा आवाज व त्याचा श्वासोच्छ्वास एकामेकात मिसळून गेले. शेवटी त्याचे हात थकले. त्याला वाटत होते की त्याने खूप वेळ काम केले, पण प्रत्यक्ष पाहिले तर तेथे काहीच विशेष झालेले दिसत नव्हते. फक्त जेथे त्याने खोदले होते तेथे उजव्या बाजूने थोडीफार वाळू पडलेली दिसत होती. त्याच्या डोक्यात त्याने जे गणित मांडले होते त्यापेक्षा वेगळेच काहीतरी घडत होते.

उगाचच काळजी करत बसण्यापेक्षा त्याने विश्रांतीच्या काळात त्या विवराची एक छोटी प्रतिकृती तयार करुन त्याच्या वर चढण्याच्या योजनेचा आढावा घेण्याचे ठरविले. कच्चा माल भरपूर होताच. त्याने सावलीत एक जागा पकडली व तीन फूट खोल एक विवर खणले. पण त्याच्या भिंतीचा कोन जसा मोठ्या विवराच्या भिंतीचा होता तसा काही जमला नाही. तो आकार एखाद्या ताकाच्या भांड्यासारखा तयार झाला. त्याने त्या विवराच्या पायथ्याशी खणायला सुरवात केली पण त्या भिंतीचा पंचेचाळीस अंशाचा कोन काही बदलला नाही. बहुधा हा कोनच ठरलेला असावा. वाळूच्या कणाचे वजन आणि न बदलण्याचा गूण अगदी एकमेकांना पुरक दिसतात’ तो मनात म्हणाला. हे जर खरे असेल तर तो जी भिंत चढण्याचा प्रयत्न करीत होता त्याचाही कोन पंचेचाळीस अंशाचा असेल काय ?

नाही ते शक्य नाही. तो कदाचित दृष्टीभ्रम असेल. कुठल्याही तिरक्या भिंतीकडे तुम्ही खालून पाहिलेत तर तो कोन कमीच भासतो.

मग वाळू किती आहे याचे तर ते प्रमेय नसेल ना? वेगवेगळ्या आकाराच्या वाळूच्या ढिगाचा दाब वेगवेगळा असणारच. जर हा दाब वेगवेगळा असेल तर प्रत्येक भिंतीचा तोल सावरण्याचा बिंदूही वेगवेगळा असेल. कदाचित वाळूच्या कणांच्या गुणांवरही ते अवलंबून असेल. न भाजलेल्या विटेच्या मातीचा व एखाद्या खड्यातील मातीचा दाब सहन करण्याची क्षमता वेगवेगळीच असणार ना! शिवाय त्याला वाळूतील आर्द्रतेचाही विचार करावा लागणार होता, ते एक वेगळेच झंझट होते. थोडक्यात काय तो ज्या विवरात उभा होता ते आणि त्याने तयार केलेल्या प्रतिकृतीत परिस्थिती खूपच वेगळी होती. तेथे चालणारे नियम वेगळे होते.

हा प्रयोग असफल झाला तरी तो पूर्णपणे वाया गेला असे म्हणता येणार नाही. या प्रयोगातून त्याच्या विचारांना चालना मिळाली होती आणि त्या विशिष्ठ कोनात ती भिंत स्थिर उभी असते हे एक समजले हेही नसे थोडके. ही स्थिरता अस्थिरतेमधे बदलणे एवढे काही अवघड नसते.
एखादा स्थिर द्राव नाही का आपण हलवून त्यात अजून साखर मिसळू शकतो.

अचानक त्याला जवळपास कोणीतरी असल्याचा भास झाला. कोण ते पाहण्यासाठी तो झटकन वळला. इतकावेळ दरवाजात उभे राहून त्याच्याकडे एकटक नजरेने पहात उभी असलेली ती त्याला दिसलीच नव्हती. ती असे पहातेय हे पाहून तो गोंधळला व त्याने एक पाऊल मागे टाकले व एखादा मदतीची अपेक्षा करताना जसा इकडे तिकडे पाहतो तसे सगळीकडे पाहिले. त्याने वर पाहिले तेव्हा पूर्वेच्या काठावर त्याला तीन माणसे एका रांगेत, त्याच्याकडे पहात, उभी असलेली दिसली. त्यांनी डोक्याला पंचे गुंडाळलेले होते. त्यांची फक्त डोकीच दिसत असल्यामुळे त्याला खात्री वाटत नव्हती पण तो परवाचा म्हातारा त्यात होता अशी दाट शंका त्याला आली. तो एकदम चमकून ताठ झाला पण त्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत त्याचे काम सुरु ठेवण्याचे ठरविले. खरे तर कोणीतरी त्याच्यावर टेहळणी करते आहे या कल्पनेनेच तो संतापला होता.

त्या श्रमाने त्याच्या नाकाच्या शेंड्यावरुन घाम टपकू लागला व डोळ्यात जाऊ लागला. तो पुसण्यासाठीही त्याच्याकडे वेळ नसल्यामुळे त्याने डोळे मिटले व खोदण्याचे काम चालू ठेवले. कुठल्याही परिस्थितीत त्याला थांबायचे नव्हते. त्याचा खोदण्याचा वेग ते पाहतील तेव्हा त्यांना कळून चुकेल की ते त्याला बाहेर येण्यापासून रोखू शकत नाहीत.

त्याने त्याच्या घड्याळात पाहिले व ते त्याच्या विजारीवर पुसले. फक्त दोन वाजून दहा मिनिटेच झाली होती. मागच्या वेळेस त्याने वेळ पाहिली होती तेव्हाही त्याच्या घड्याळात एवढेच वाजले होते. ते पाहून तो खचला. गोगलगायीला सूर्याचा वेग कदाचित क्रिकेटच्या बॉल एवढा वाटत असेल. त्याने फावड्यावरील आपली पकड अजून घट्ट केली व तो परत जोमाने खोदायला लागला.

अचानक त्या वाळूचा वाहण्याचा वेग वाढला. त्याच्या छातीतून कसला तरी आवाज आला व छातीवर कसलेतरी दडपण आले. त्याने वर पाहण्याचा प्रयत्न केला पण त्याची संवेदनाच हरविली होती. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली....

क्रमशः
जयंत कुलकर्णी.

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

तुषार ताकवले's picture

13 Feb 2017 - 11:24 pm | तुषार ताकवले

कुठं चाललीये कथा. काहीच थांग लागत नाहीये

शलभ's picture

13 Feb 2017 - 11:28 pm | शलभ

वाचतोय..

समजत नाहीये अजून. ही लेखमाला पूर्ण झाल्यावर या कथेचे रसग्रहण कराल का प्लीज?

मला वाटतं ते कादंबरी जशी पुढे जाईल तसे कळेल. तसं मला गोष्टीची कल्पना आलीय असं वाटतय पण ते आता नाही बोलून दाखवत मी.

पैसा's picture

14 Feb 2017 - 10:51 pm | पैसा

गुंतागुंत!