मोबियस प्रकरण - ६

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
11 Feb 2017 - 10:53 pm

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

“शक्य आहे बाबा!” तो म्हणाला आणि खरोखरीच ते चक्र रात्रभर चालू राहिले. वाळू पडायची काही थांबत नव्हती. ते बघून तो गोंधळून गेला. बावचळला. एखाद्या सापाच्या पिल्लाच्या शेपटीवर निष्काळजीपणे पाय पडावा आणि तो भला मोठा अजगर निघावा अशी त्याची अवस्था झाली.

मोबियस


त्याने वाळूच्या डब्यांची दुसरी खेप केली आणि त्याला वरती जोरजोरात बोलणे ऐकू आले. कंदिलाची ज्योतही वर अंधारात फडफडली.
ती कोणाशी तरी जोरजोरात भांडल्यासारखी बोलत होती.

“ती वाळूची गाडी आली आहे. मला जरा मदत करणार का?”

त्याला आत्ता कुठे त्या दोराच्या शिडीच्या दुसर्‍या टोकाला पुरलेल्या वाळूच्या पोत्यांचा उपयोग समजला. त्या पोत्यांच्या भोवती दोर बांधून ते वाळूचे डबे खालीवर करत होते. तीनचार माणसे डबे वर ओढत होते व अशा तीनचार टोळ्या होत्या. एक भरला की दुसरा ती वर घेत होते. सहा सात खेपांमधे खालची जमा झालेली सर्व वाळू वर गेली.

“अवघड आहे त्यांचे काम.” तो म्हणाला.

त्याच्या आवाजातही आता थोडा आपलेपणा आला होता. त्याने कपाळावरील घाम बाहीला पुसला. त्या माणसांनी पाहुण्याला कामाला लावल्याबद्दल एकही निषेधाचा शब्द काढला नाही. ते चुपचापपणे त्यांचे काम मन लावून करत होते. त्याला त्यांचे कौतुक वाटले.

“आमच्या गावात आम्ही घरावर प्रेम करतो” मनापासून”

“हे कसले प्रेम?”

“तुमच्या राहत्या जागेवरचे प्रेम !”

त्याला हसू फुटले. तीही त्याच्याबरोबर त्या हास्यात सामील झाली पण ती का हसली तेच त्याला उमजले नाही. वरुन ट्रकचा आवाज आला.

“जरा विश्रांती घेऊया का आता?” त्याने विचारले.

“नाही! नाही! ही एक फेरी झाली की ते लगेचच पुढची वाळू घेण्यासाठी हजर होतील.”

“जाऊ देत. उरलेले उद्या बघू आता.” असे म्हणून तो निष्काळजीपणे घराकडे चालू लागला.

“असं नाही करुन चालणार. आपल्याला अजून घराच्या भोवतालची वाळू काढायची आहे..”

“सगळ्या घराभोवतीची?”

“हो ! नाहीतर घराच्या भिंती ढासळतील. सगळीकडून वाळू पडते आहे ना घराभोवती”

“त्याला तर सकाळ उजाडेल.”

जणू काही त्याचे आव्हान स्वीकारुन ती मागे वळली आणि घाईघाईने त्या भिंतीच्या पायथ्याशी कामाला लागली. त्याच्या मनात विचार आला, ‘अगदी बिटलसारखेच.’
याचा अर्थ लक्षात आल्यावर तो चमकला.

“हे असे रोज रात्री असते?”

“वाळू वाहणे थांबतच नाही. हे डबे, आणि ती वरची वाळूची गाडी हे चक्र रात्रभर चालूच असते”.

“शक्य आहे बाबा!” तो म्हणाला आणि खरोखरीच ते चक्र रात्रभर चालू राहिले. वाळू पडायची काही थांबत नव्हती. ते बघून तो गोंधळून गेला. बावचळला. एखाद्या सापाच्या पिल्लाच्या शेपटीवर निष्काळजीपणे पाय पडावा आणि तो भला मोठा अजगर निघावा अशी त्याची अवस्था झाली.

“म्हणजे ही वाळू उपसणे या एवढ्याच कामासाठी तुम्ही अस्तित्वात आहात.”

“हो! असे म्हटले तरी चालेल पण आम्हाला रात्री ही जागा सोडून जाता येत नाही.”

तो भांबावला. त्याला असल्या दुनियेत आयुष्य काढायची मुळीच इच्छा नव्हती.

“का नाही? तुम्ही मनात आणलेत तर काहीही करु शकता!”

“पण तसे करणे बरोबर नाही.” तिचे बोलणे, श्वास व काम एका यांत्रिक लयीत चालले होते.

“आमचा गावगाडा आम्ही ही वाळू उपसतो म्हणून चाललाय, हे विसरुन कसे चालेल? आम्ही जर थांबलो तर दहा दिवसात आमचे गाव वाळूखाली गाडले जाईल. आता पुढची पाळी आपल्या शेजार्‍याची आहे, ते बघा तिकडे मागे !”

“ते ठीक आहे. आणि ती वरची वाळू गाडीत भरणारी माणसे? तीही याच कारणासाठी दिवसरात्र काम करतात का ?”

“त्यांना थोडेफार पैसे मिळतात आमच्या ग्रामपंचायतीकडून !”

“त्यांच्याकडे एवढा पैसा आहे तर ते वाळू थांबविण्यास एखादी कायमची भिंत का नाही बांधत किंवा झाडांचे कुंपण?”

“आत्ता जे करतोय ते त्यापेक्षा स्वस्त पडते, खर्च काढला तर!”

“ही काय पद्धत झाली?” त्याचा स्वर चढला.
त्याला राग आला. अशा पद्धती स्त्रियांना गुलाम बनवितात आणि त्या स्त्रियांचाही त्याला उबग आला ज्या स्वत:हून ही गुलामगिरी पत्करतात.
अशा गावात राहण्यात काय अर्थ आहे ?

“मला खरोखरीच समजत नाही. तुम्ही समजता तेवढी ही गोष्ट साधी नाही. तुमच्या आख्ख्या आयुष्यात ही वाळू अशी हटणार नाही. या मार्गानी तर नाहीच नाही. ही भंपकगिरी आहे. मला तुमच्या विषयी आता मुळीच सहानुभूती वाटत नाही.”

हातातील फावडे त्या डबड्यांवर फेकून तो ताडकन विमनस्कपणे खोलीत चालता झाला. तिच्या चेहर्‍याकडे त्याने ढुंकूनही पाहिले नाही.

ती रात्र त्याने तळमळत काढली. झोप तर त्याला येतच नव्हती. तो सारखा तिचा कानोसा घेत पडून राहिला. त्याला आता थोडेसे अपराधीही वाटू लागले होते. तिच्या समोरुन उद्धटपणे निघून जाण्यामागे तिच्या गुलामगिरीबद्दल वाटणारी सूप्त असुया तर नव्हती? कदाचित त्या गुलामगिरीमुळे ती त्याच्या बरोबर रात्र काढू शकत नव्हती याचाही राग असेल. म्हणजे तिच्या मूर्खपणाबद्दल हा राग नव्हता तर! त्यामागे अजून काहीतरी न सापडणारे कारण असणार. त्याचे अंथरुण अजूनच दमट झाले होते आणि ती वाळू त्याच्या सर्वांगाला चिकटत होती. तो वैतागला. ते फावडे फेकले त्याबद्दल आता त्याला अपराधी वाटेनासे झाले. फेकले तेच बरे झाले तो मनाशी म्हणाला. या परिस्थितीला काही तो जबाबदार नव्हता. त्याने त्या परिस्थितीबद्दल एवढा विचार केला हेच खूप झाले. ही वाळू आणि किटक गोळा करण्याचे कामच याला जबाबदार होते. त्याच्या निरस आयुष्यापासून पळ काढण्यासाठी तर त्याने तो छंद लावून घेतला नव्हता ना? कितीही प्रयत्न केला तरी त्याला या विचारांमुळे झोप येत नव्हती. लांबून त्याला तिच्या फावड्याचा अस्त्रोत आवाज ऐकू येत होता. तिच्या पावलांचा व डब्यांचा आवाज जवळ येत होता व दूर जात होता. हे असेच चालू राहिले तर त्याला उद्या काम करणे कठीणच होते. त्याने ठरविले की उद्या पहाटेच उठून आजचा वाया गेलेला दिवस भरुन काढायचा. त्याने बळजबरीनी डोळे मिटले पण ते लगेचच उघडले. त्याचे डोळे शेवटी दुखायला लागले.. अखंड उघडझाप करणार्‍या त्याच्या डोळ्यांचा व अश्रूंचा त्या वाळूपुढे काही निभाव लागत नव्हता. त्याने टॉवेल त्याच्या डोक्याभोवती गुंडाळून घेतला. त्यामुळे त्याला श्वास घेणे अवघड झाले पण पहिल्यापेक्षा ते खूपच बरे होते.

त्याने स्वत:चे लक्ष दुसरीकडे कुठेतरी केंद्रीत करण्यासाठी डोळे मिटल्यावर त्याला अनेक रेषा त्याच्या दिशेला तरंगत येताना दिसू लागल्या. त्या रेषा त्याने लगेचच ओळखल्या. त्या वाळूवर वार्‍याने उठणार्‍या रेषा होत्या. त्याला वाटले जवळजवळ बारा तास तो वाळूकडे पहात असल्यामुळे कदाचित त्याची प्रतिबिंबे त्याच्या नेत्रपटलावर कोरली गेली असावीत. त्याच वाहणार्‍या वाळूत किती साम्राज्यं आणि शहरं नष्ट झाली होती कोणास ठाऊक.
वाळू, जिचा एक कण फक्त एक अष्टमांश मिमि आकाराचा असतो...

कुठलाही आकार उकार वाहत्या वाळू शेजारी ठेवला की जाणवते की तो अंतर्बाह्य रिकामाच असतो. वाळूची हालचाल ही तिचे एक वैशिष्टय! आकार या शब्दाचा विरुद्धअर्थी शब्द म्हणजे वाळू ! तिचे काम मात्र अजूनही थांबले नव्हते. त्या पातळ भिंतीआडून ती चालवित असलेल्या फावड्याचा अजूनही त्याला आवाज येत होता. तिच्या त्या नाजूक बाहूंनी ती किती वेळ वाळू उपसणार होती कोणास ठाऊक! हे म्हणजे समुद्राचे पाणी बाजूला सारुन तेथे घर बांधण्याचा प्रयत्न करण्यासारखे झाले. अर्थात पाण्यावर जहाज तरंगते ते पाण्याच्या काही गुणांमुळे.

तो विचार मनात येताच त्याचे मन त्या आवाजाच्या छळातून मुक्त झाले. जर जहाज पाण्यावर तरंगू शकते तर वाळूवर का नाही तरंगणार? त्यांनी जर स्थिर घरांचा हट्ट सोडला तर वाळूविरुद्ध चाललेल्या त्यांच्या या लढाईत त्यांचा शक्तिपात होणार नाही. घर - एखाद्या जहाजासारखे, वाळूवर तरंगणारे..... एक विस्कळीत असलेले वाहत्या वाळूतील गाव.

अर्थात वाळू म्हणजे काही पाणी नाही. त्यामुळे त्यात पाण्यासारखी तरणशक्ती असण्याचे काही कारण नाही. त्यावर एखादी हलकी वस्तू टाकली तरी ती वाळूत निश्चितच बुडेल. या जहाजरुपी घरांना वेगळ्या स्वरुपाचे गुण लागतील. उदा. त्याचा आकार एखाद्या पिंपासारखा असावा लागेल आणि ते कुठेही रुतण्याची वा उडी मारण्याची क्षमता बाळगून असेल. ते थोडेसे जरी थरथरले तरी त्यावरील वाळू बाजूला सारुन ते टुणकन उडी मारुन पृष्ठभागावर येऊ शकेल. पण त्याने आतील लोकांना फारच त्रास होईल. म्हणजे त्यात गायरोस्कोपसारखी व्यवस्था करावी लागेल. त्या पिंपात अजून एक पिंप लटकते ठेवावे लागेल जे कायम जमिनीला समांतर राहील. घड्याळाच्या लोलकासारखे एका लयीत हलणारे घर, नाही वाळूतील एक जहाज.

या अशा जहाजांचे काफिले वाळूतून तरंगत जाताना त्याला दिसू लागले व त्याच्या पापण्यांनी त्यांची लय पकडली. त्याच गुंगीत त्याचे डोळे मिटले....
क्रमशः
जयंत कुलकर्णी.

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

प्रवाही भाषांतर. वाचतोय. पुभाप्र.

प्रवाही भाषांतर. वाचतोय. पुभाप्र.

nanaba's picture

12 Feb 2017 - 10:58 am | nanaba

Hadaravanari concept vatatey.
Which one is our sand, ASA vichar rahun rahun manat yetoy.. or is our existence just that? Asahi..
Waiting for next part

मुळ पुस्तक नेट वर ऊपल्बध आहे का
E book!?
क्रुपय लींक द्यावी

पैसा's picture

12 Feb 2017 - 9:31 pm | पैसा

वेगळेच काहीतरी!