मोबियस प्रकरणे भाग -२ : प्रकरणे १५-१६

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
20 Feb 2017 - 7:34 pm

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

.....पण त्या डोळ्यात त्याला अपरंपार वेदना दिसल्या पण तिरस्कार व कडवटपणा मात्र बिलकूल नव्हता. ती कशाची तरी याचना करते आहे असे त्याला वाटले.
अशक्य! त्याला भास झाला असणार. डोळ्यातील भावना हा एक भाषेचा अलंकार आहे. बुबुळाचा आणि भावनांचा काय संबंध? बुबुळात तर साधा एखादा स्नायूही नसतो.....

मोबियस

१५

त्याचे पाय जड झाले होते कारण त्या वाळूने त्याचा शक्तिपात केला होता. तो तिच्यापर्यंत पोहोचेपर्यंत ती मागे वळलेली होती. तिच्या डोळ्यात भीती आणि आश्चर्य याचे अचूक मिश्रण जमले होते. तिला जर त्याचा प्रतिकार कारायचा असता तर कदाचित वेगळेच काहीतरी झाले असते. पण तिला बेसावध गाठण्याचा त्याचा प्रयत्न यशस्वी झाला. हातातील फावड्याने त्याला मागे ढकलावे हा विचारही तिच्या मनाला शिवला नाही.

“ओरडू नकोस ! मी तुला कसलीही इजा करणार नाही! फक्त गप्प बस!”

घोघर्‍या आवाजात तेच तेच कुजबुजत त्याने तिच्या तोंडात बोळा कोंबला. कसलाही प्रतिकार न करता ती शांत उभी होती.
तिचा तो शांतपणा बघून त्याने तिच्या तोंडातील बोळा काढला व तिचे तोंड त्या पंच्याने घट्ट बांधून टाकले. मग त्याने तिचे हात पाठीमागे घट्ट बांधून टाकले.

“ठीक आहे ! घरात चल !”

झालेल्या प्रकाराने ती बरीच खचलेली दिसत होती. ती त्याला शरण आली तर होतीच पण त्याच्या आज्ञाही पाळू लागली. ती बहुधा अजून बसलेल्या धक्क्यातून सावरलेली नसावी. त्याने ती परिस्थिती फार चांगल्याप्रकारे हाताळली होती असे त्याला मुळीच वाटत नव्हते पण त्याच्या या अशा अनपेक्षित हल्ल्याने तिची प्रतिकाराची मानसिकताच नष्ट झाली होती. त्याने तिला घरातील कट्ट्यावर चढवले व दुसर्‍या लेंग्याने तिचे पाय घोट्यापाशी बांधून टाकले. त्या अंधारात त्याला चाचपडत काम करावे लागत होते. उरलेल्या कपड्याची त्याने तिच्या घोट्याभोवती अजून एक गाठ मारली.

“आता अजिबात हालचाल करु नकोस! समजलं ना? तू नीट वागलीस तर तुला कसलीही दुखापत होणार नाही. मला हे आवडत नाही पण माझा नाइलाज आहे.... ”

दरवाजाकडे जाताना त्याची नजर तिच्यावर खिळली होती. दरवाजातून बाहेर धाव घेत तो दिवा आणि फावडे उचलून लगेचच आत आला. ती खाली एका कुशीवर पडली होती. श्वास घेताना तिच्या जबड्याची विचित्र हालचाल होत होती. ती बहुतेक श्वास घेताना तोंडात माती जाऊ नये याचा प्रयत्न करत असावी. श्वास बाहेर टाकताना मात्र ती प्रयत्नपूर्वक तो जोरात बाहेर टाकत होती. तेही बहुधा नाकासमोर जमा झालेली वाळू झटकण्यासाठी.

“तुला हे थोडा वेळ सहन करावे लागेल बरं का! गावकरी वाळूचे डबे घेऊन येईपर्यंत! मला ज्यातून जावे लागले त्यानंतर तुला तक्रार करण्यास काही जागा आहे असे मला मुळीच वाटत नाही. शिवाय मी माझ्या राहण्याखाण्याचे योग्य पैसे तुला देणारच आहे. अर्थात जो खर्च माझ्यावर झाला आहे तेवढाच बरं का ! खरेतर ही जागा फुकट राहण्याच्याही लायकीची नाही पण मी कोणाचेही उपकार घेत नाही आणि परतफेड करण्यासाठी दुसरा मार्ग नाही. मी तुला पैसे घ्यायला लावणारच आहे.”

झालेल्या प्रकाराने बेचैन होत त्याने बाहेरच्या जगाचा कानोसा घेतला. कंदील विझवलेला बरा असे म्हणत तो ज्योतीवर फुंकर घालणार तेवढ्यात त्या बाईकडे एकदा पाहिलेले बरे असे त्याला वाटले. तिच्या पायावरील गाठी अजून घट्ट होत्या अगदी एखादे बोटसुद्धा आत जाऊ शकले नसते. म्हणजे तिने फार हालचाल केलेली नसणार. तिची मनगटे आत्ताच सुजून लाल पडली होती व नखे काळी पडली होती.

तिच्या तोंडातील बोळाही जागेवर होता. तिने तिचे ओठ इतके घट्ट मिटले होते की त्यांचा रंग पांढुरका पडला होता. अगदी भुतासारखा दिसत होता तिचा चेहरा. तिच्या तोंडातील लाळ खाली ठिपकत खालेची वाळू काळी करत होती व त्याचा मोठ्ठा डाग तिच्या गालाखाली तयार झाला होता. त्या मिणमिणत्या प्रकाशात त्याला तिचा मूक आक्रोश स्पष्टपणे ऐकू येत होता....

“त्याचा काही उपयोग नाही. हे सगळे तूच सुरु केले होते.” तो म्हणाला.

“आता फिट्टंफाट झाली असे म्हणायला हरकत नाही. शेवटी मीही एक माणूसच आहे. तुम्ही मला कुत्र्यासारखे या बिळात बांधून ठेऊ शकत नाही. तुला आता कळत असेल. कोणीही हे मी माझ्या स्वत:च्या संरंक्षणासाठीच करतोय असेच म्हणेल.”

अचानक तिने तिची मान विचित्रपणे वळवली व त्याच्याकडे तिच्या किलकिल्या डोळ्याने पाहण्याचा प्रयत्न केला.

“काय झाले ? तुला काहीतरी बोलायचे आहे का?”

तिने मान वेडीवाकडी हलवित होकार दिला. त्याने कंदील आणखी जवळ आणला आणि तिच्या डोळ्यात निरखून पाहिले. त्याला काय दिसले हे तो लगेचच सांगू शकला नाही. पण त्या डोळ्यात त्याला अपरंपार वेदना दिसल्या पण तिरस्कार व कडवटपणा मात्र बिलकूल नव्हता. ती कशाची तरी याचना करते आहे असे त्याला वाटले.
अशक्य! त्याला भास झाला असणार. डोळ्यातील भावना हा एक भाषेचा अलंकार आहे. बुबुळाचा आणि भावनांचा काय संबंध? बुबुळात तर साधा एखादा स्नायूही नसतो. तरीपण तो हात लांब करुन तिच्या तोंडातील बोळा जरा सैल करणार तेवढ्यात त्याला कसलातरी आवाज आला. त्याने पटकन हात मागे घेतले व कंदीलावर फुंकर घातली. तो काळवंडलेला कंदील त्याने त्या उंचवट्याच्या काठावर पटकन सापडेल असा ठेवला. मोरीपाशी जाऊन त्याने किटलीला तोंड लावूस्न दोन घोट पाणी प्यायले. फावड्यावरील पकड घट्ट करत तो दरवाजामागे लपला. तेवढ्या हालचालीनेही त्याला घाम फुटला. अजून फक्त दहाएक मिनिटे.
त्याने एका हाताने मगाशी ठेवलेले दरवाजाजवळचे सामान जवळ ओढले.....

१६

“कोणी आहे का?” एका घोगर्‍या आवाजाची हाक आली.

“खाली काय करताय तुम्ही?” त्याच्या मागोमाग एक तरुण आवाज आला.

तो खाली हातात पकडता येईल अशा घनदाट अंधारात होता पण बाहेर चंद्र वर आला होता आणि त्या विवराच्या कडेच्या सावलीवर त्या माणसांच्याही सावल्या गडद होत होत्या. तो भिंतीजवळ सरकला. उजव्या हातात ते फावडे.
वर हसण्याचा आवाज आला. ते वाळूचे डबे वर घेण्यासाठी खाली दोर सोडत होते.

“चल गं बाई ! आवर लवकर !” त्यांनी आवाज दिला. त्याच क्षणी त्याने पायाखालची वाळू उडवत त्या दोरावर झेप घेतली.

“ओढा ! ओढा लवकर!” तो जोरात किंचाळला. त्याने त्या दोरावरची पकड इतकी घट्ट केली की एखाद्या दगडाचा चुरा झाला असता.

“वर ओढा ! लवकर ! मी तो सोडणार नाही. मी तिला घरात बांधून ठेवली आहे. तिला जर तुम्हाला मदत करायची असेल तर हा दोर वर खेचा. मला वर घेतल्याशिवाय मी तुम्हाला तिच्याकडे जाऊ देणार नाही..तुम्ही जबरदस्तीने खाली आलात तर या फावड्याने मी तुमचे डोके फोडीन.. न्यायालयात मला न्या, मग बघा कोण जिंकते ते. मला वर घ्या, मी तुमच्याविरुद्ध खटला दाखल करणार नाही. एखाद्याला त्याच्या मनाविरुद्ध डांबून ठेवणे हा हिणकस गुन्हा आहे. माहिती आहे ना? काय करत आहात? मला वर ओढून घ्याऽऽऽ”

वरुन पडणारी थंडगार वाळू त्याच्या थोबाडावर आपटत होती. त्याच्या कॉलरमधून त्याच्या शरीरावर थंडगार वाळूने शहारा आणला खरा पण उत्तेजित झाल्यामुळे त्याच्या श्वासाच्या उष्णतेने त्याचे ओठ जळत होते.

वर बहुधा ते कसलीतरी चर्चा करीत होते. अचानक त्याला झटका बसला. त्यांनी त्याला वर ओढण्यास सुरुवात केली. स्वत:च्या वजनाने तो घसरला व त्याचे हात सोलवटून निघाले पण त्याने जिवाच्या कराराने तो दोर पकडून ठेवला. सुटकेच्या कल्पनेने त्याचे ह्रदय धडधडू लागले व वजनाने आतडी पिळवटू लागली.

“देवा रे! सुटलो एकदाचा !” तो म्हणाला.

अचानक तो वजनविरहीत अवस्थेत गेला व त्या अवकाशात तरंगू लागला. झोक्यावरुन खाली येताना जसे पोटात ढवळते तसे त्याच्या आतड्यात ढवळू लागले. ज्या दोराने त्याच्या हाताला सोलवटले होते तो त्याच्या हातात निर्जिवपणे वळवळत होता.

त्या नालायकांनी दोर सोडून दिला होता.

त्याने हवेतच उलटी कोलांटीउडी मारली आणि तो खाली वाळूत फेकला गेला. त्याच्या खाली सापडलेल्या त्याच्या किटकपेटीने तुटणारा आवाज केला. काहीतरी त्याच्या गालाला घासून गेले.....त्या दोराला लटकवलेला गळ असावा.हलकट...नशिबाने त्याला जास्त दुखापत झाली नव्हती. ज्या बाजूवर तो आपटला होता तेथे त्याने चाचपून पाहिले कुठे एकाच ठिकाणी दुखते आहे हे सांगता येत नव्हते. तो ताडकन उठला. त्याने दोरखंडासाठी वर नजर टाकली पण त्यांनी तो वर ओढून घेतला असणार.

“ अरे मूर्खांनो....”
त्याने फाटलेल्या आवाजात त्यांना शिव्या देण्यास सुरुवात केली.

“शेवटी तुमच्यावर पश्चात्तापाची वेळ येणार आहे हे लक्षात ठेवा.”

वरुन काही प्रत्युत्तर आले नाही. फक्त कुजबुज त्याच्या कानावर धुरासारखी पसरली. त्याने त्याला आणखीनच त्रास झाला कारण ती त्याच्या विरुद्ध आहे की नुसतीच चर्चा आहे हे त्याला उमजत नव्हते.

त्याच्या अपमानाने त्याचा राग अनावर झाला. मुठी आवळल्यामुळे त्याची वाढलेली नखे त्याच्या तळव्यात घुसली. तो तसाच तारस्वरात ओरडू लागला,

“तुम्हाला मी काय म्हटले ते समजले नाही का? बहुतेक नसावे. खरेतर मी काय केले आहे हे ऐकल्यावर तुम्ही असे निघून गेला नसता. मी त्या बाईला बांधून घातले आहे. तुम्ही जोपर्यंत मला तो दोर खाली सोडत नाही तोपर्यंत ती तशीच राहणार आहे. याचा अर्थ समजतो का तुम्हाला मूर्खांनो? आम्ही जर येथे गाडले गेलो तर त्याची जबाबदारी तुमच्यावर असेल हे लक्षात ठेवा. शिवाय येथून वाळू उपसली नाही तर ती पसरेल व गाव गिळंकृत करेल.. तुम्ही उत्तर का देत नाही ?”

उत्तर देण्याऐवजी त्यांनी त्याला तसेच अपमानास्पद परिस्थितीत सोडून त्यांचा रस्ता धरला. त्यांच्या मागे त्या डबड्यांचा खडखडाट मात्र त्याच्या कानावर पडत राहिला.

“तुम्ही असे एकही शब्द न बोलता का चालला आहात?” तो रडवेल्या स्वरात किंचाळला.

पण त्याचे किंचाळणे आता फक्त त्यालाच ऐकू येत होते. थरथरत त्याने त्याच्या किटकपेटीतील विखुरलेले साहित्य गोळा केले. बहुतेक त्यातील अल्कोहोलची बाटली फुटली होती कारण त्याला हात लावताच त्याच्या हाताला एकदम थंडपणा जाणवला. त्याचे हुंदके अनावर झाले. पण तो दु:खी वाटत नव्हता. त्याला वाटत होते की दुसरेच कोणीतरी रडत होते.

एखादी जळू चिकटावी तशी त्याला वाळू चिकटली होती. चाचपडत त्या अंधारातून त्याने घराच्या दरवाजातून आत प्रवेश केला. हातातील किटकपेटी त्याने हळूच शेकोटीपाशी खाली जमिनीवर ठेवली. वार्‍याचा घोंगावणारा आवाज त्या विवरात भरुन राहिला होता. त्याने कोपर्‍यातील डबड्यातून प्लास्टिकमधे गुंडाळलेल्या काडेपेटीतील एक काडी पेटवली व कंदील लावला.

ती अजून तशीच पडली होती. तिने दरवाजाकडे पाहिले, बाहेरचा कानोसा घेतला व डोळे दिपल्यामुळे परत घट्ट मिटून घेतले. त्याच्या नुकत्याच झालेल्या अपमानाबद्दल तिला काय वाटले असेल कोणास ठाऊक. तिला काय वाटायचे आहे ते वाटू देत. त्याचा पराभव झाला आहे असे काही म्हणता येणार नाही. कारण टिक् टिक करणार्‍या त्या बाँबचा फ्युज अजून त्याच्याच हातात होता....

तो तिच्याजवळ गुडघ्यावर बसला. नाखुषीनेच त्याने तिच्या तोंडावरचे फडके काढले. त्याला बिलकुल अपराधी वाटत नव्हते ना त्याला तिची कीव येत होती.
तो फक्त दमला होता. त्याला उभेही राहवत नव्हते. विचार केल्यावर त्याला पटले की तिच्या तोंडात बोळा कोंबायची तशी काहीच आवश्यकता नव्हती. उलट ती किंचाळली असती तर त्याचाच फायदा झाला असता.

धापा टाकत तिने तिचा खालचा जबडा हलविला. तोंडातील बोळा तिच्या लाळेने घट्ट भिजला होता. तिच्या मासामधे रुतून त्या बोळ्याने तिची दैना केली होती. तिच्या गालाची कातडी एखाद्या अंजिराच्या सालीसारखी सुकली होती. तिच्या गालाच्या हालचालीने त्यात थोडा जीव येऊ लागला. बोटांच्या चिमटीत तो घाणेरडा बोळा पकडून बाजूला टाकत तो म्हणाला,

“थोड्याच वेळात ठीक होशील तू.” त्यांना काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. मला वाटते ते लवकरच ती शिडी घेऊन येतील. नाहीतर तेच गोत्यात येणार आहेत. मला येथे अडकविण्याची त्यांना काहीएक गरज नव्हती.”
तिने एक आवंढा गिळला आणि तिच्या सुकलेल्या ओठांवरुन तिची जीभ फिरविली.

“पण......” तिच्या तोंडातून काहीच शब्द बाहेर पडले नाहीत. बहुधा तिची जीभ अजून पूर्ववत झाली नसावी. तोंडात एखादी गोटी असावी तशी ती अडखळत म्हणाली,

“चांदण्या दिसताएत का?”

“चांदण्या? त्यांचा काय येथे संबंध?.”

“नाही जर त्या दिसत नसतील तर..”

“दिसत नसतील म्हणजे?”

पण बोलण्याच्या तेवढ्या कष्टानेही तिला ग्लानी आली आणि तिने श्रांतपणे डोळे मिटले.

“आता काय झाले? असे अर्धवट बोलू नकोस. माझी काय कुंडली मांडणार अहेस का तू? का या भागातील एखादी दंतकथा आहे ती? का ते चांदण्या नसतील त्या रात्री ती शिडी खाली सोडत नाहीत? तू बोलली नाहीस तर मला समजणार कसे? चांदण्या दिसेपर्यंत थांबायचे असेल तर ठीक आहे. पण चांदण्यांची वाट पहात असताना वादळ आले तर काय करणार तू? मग कसल्या चांदण्या आणि कसले तारे.”

“जर या वेळेपर्यंत चांदण्या दिसल्या नाहीत तर वादळ येण्याची शक्यता नाही.”

“का?”

“जर चांदण्या दिसत नसतील तर त्याचा अर्थ मधे धुके आहे असा होतो.”

“तुला काय म्हणायचे आहे? आता तर चांगलेच वारे सुटले आहे.”

“नाही तो वार्‍याचा आवाज फार वरुन येतोय.”

त्याने विचार केला. कदाचित तिचे बरोबरही असेल. चांदण्या दिसत नाहीत याचा अर्थ तिला म्हणायचे असेल की हवा हवेतील बाष्प बाजूला ढकलू शकत नाही. आज रात्री बहुधा वारा पडलेला असणार. त्यामुळे गावकरी ते आज बाहेर पडण्याचा कुठलाही निर्णय बहुधा घेणार नाहीत. तार्किकदृष्ट्या हे ठीक वाटत होते.
‘पण मला त्याने काय फरक पडतो. त्यांनी जर थांबायचे ठरवले असेल तर मीही थांबू शकतो. एक आठवडा, दहा दिवस किंवा पंधरा दिवस, मला काहीच फरक पडणार नाही.’

तिने तिचे पाय आत मुडपले. त्याला ते पाहून कशाची तरी आठवण येऊन हसू आले. हसतानाच त्याला तिच्या पायाची शिसारी आली. त्याच्या डोक्यावर ही टांगती तलवार का? त्याने दैवाला दूषणे दिली, शिव्या दिल्या. पण आता शत्रूची नस त्याच्या हातात होती. नाही का? मग जरा आत्मविश्वासाने परिस्थितीकडे पहायला त्याला काय हरकत होती? जर तो परत गेला व सुखरुप परत गेला तर हा अनुभव लिहून काढण्यासारखा होता खास. त्याच्या मनात विचारांची मालिका सुरु झाली...
- व्वा! आश्चर्यच आहे...तू आता लिहायचे ठरवले म्हणजे. त्या अनुभवांनीच तुला लिहिण्यास भाग पाडले आहे. हा लिखाणाचा किडा तुझ्या डोक्यात वळवळला त्याला तो अनुभवच कारणीभूत आहे.
- धन्यवाद! मी योग्य असा मथळा शोधतोय!
- हंऽऽ कुठल्या प्रकारचे? वाळूतील सैतान का वारुळाचा अत्याचार?
- जरा अतिरेकी वाटते आहे..उथळ पाण्याला खळखळाट फार !
- तुला खरंच असे वाटते ?
- तुझा अनुभव कितीही भयंकर असला तरी त्याच्या फक्त खपलीच्या उल्लेखाने आत काय आहे याची कल्पना येऊ शकणार नाही. या शोकनाट्याचे खरे नायक गावकरी आहेत त्यांचा मथळ्यात उल्लेख नाही झाला तर ..
- काय आहे ते ?
- कसला घाण वास येतोय? ते गटारे साफ करताएत का?
- ‘काय ? ’जाऊ देत! मी कितीही लिहिण्याचा प्रयत्न केला तरी काय उपयोग? मी काही लेखक नाही.
- हा ढोंगी नम्रपणा कशासाठी? लेखक म्हणजे काहीतरी विशेष आहे असे समजायचे काही कारण नाही. तू लिहिणार म्हणजे लेखक झालासच की.
- बहुतेक करुन सगळे शिक्षक संदर्भहीन लेखन करतात असे म्हणतात.
- पण शिक्षक ही जमात व्यवसायाने लेखकांच्या बरीच जवळची असते असेही म्हटले जाते.
- म्हणजेच सर्जनशील शिक्षण का? त्यांना स्वत:ला एखादी पेन्सीलची पेटीही तयार करता येत नाही.
- पेन्सीलीची पेटी...व्वा..काय छान कल्पना आहे! सर्जनशीलतेची चांगली परिक्षा आहे.
- धन्यवाद! नवीन वेदनेचा अनुभव घेण्यासाठी मला नवीन संवेदनेचा अनुभव घ्यावा लागणार बहुधा.
- आशा बाळग...
- पण एखाद्याची आशा फलद्रूप झाली की नाही यासाठी त्याला जबाबदार धरता येत नाही.
- त्या क्षणापासून प्रत्येकाला आपल्या शक्तिवरच विश्वास ठेवावा लागतो.
- ठीक आहे आपण स्वत:लाच फसवणे थांबवूया. एवढा बनेलपणा एखाद्या शिक्षकाला शोभत नाही.
- बनेलपणा ?
- अहं मी लेखकांबद्दल बोलतोय. तुला लेखक व्हायचे आहे ही एक प्रकारची आत्मप्रौढीच आहे. म्हणजे तुला कळसूत्री बाहुल्यांपासून तू वेगळा आहेस हे त्यांचा सुत्रधार बनून सिद्ध करायचे आहे. बरोबर? या बाईत आणि एखाद्या नटलेल्या बाईत काय फरक आहे सांग बरं.
- पण मग लेखक आणि लिहिणे यातही तेवढाच फरक आहे का?
- हंऽऽऽऽ कळलं का मला लेखक का व्हायचे आहे ते? मी जर लेखक होऊ शकलो नाही तर लिहिण्याची तशी फारशी गरज राहणार नाही.
पॉकेटमनी न मिळालेल्या मुलासारखा चेहरा केला पाहिजे आता त्याला.......

क्रमशः
जयंत कुलकर्णी.

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

पैसा's picture

21 Feb 2017 - 8:14 am | पैसा

वाचते आहे. अतिशय प्रभावी अनुवाद!

शास्त्रज्ञाचे विक्षिप्त वाटू शकेल असे भोळसट विचार करणे अनुवादातून छान पकडले आहे.

अभ्या..'s picture

21 Feb 2017 - 12:38 pm | अभ्या..

माफ करा जयंतराव,
सुरुवातीपासून वाचतोय. एकाही सलग ओळीने पकड घेतली नाही. डोळ्यासमोर ना कॅरॅक्टर उभे राहतेय ना वातावरण. काय चाललेय तेही कळत नाहीये.
आपल्या लेखनाबाबतीत हे असे पहिल्यांदा जाणवले. सॉरी.

माझीही शॅम्पेन's picture

25 Feb 2017 - 6:39 pm | माझीही शॅम्पेन

माफ करा कुलकर्णी साहेब , आता पूर्ण कंटाळा आला , एक तर भाग तरी मोठे टाका नाही तर लवकर आटप वाळूच चर्हाट , उगाच हाइप केल्यासारखं झालय सगळं