बघावी तिकडे वाळू! त्याच्या मनात विचार आला, ‘छे! ही वाहणारी वाळू काही जीवनासाठी आवश्यक आहे असे वाटत नाही. पण स्थिरता ही आयुष्यासाठी आवश्यकच आहे असेही नाही. जर सगळेच वाहत्या वाळूसारखे वाहत्या जीवनात सामिल झाले तर या जगात स्पर्धाच उरणार नाही. माणसे स्थिर होण्याचा प्रयत्न करतात म्हणून तर या जगाचा रहाटगाडगा चालतो आहे
मोबियस
१
ऑगस्टच्या महिन्यात एक माणूस गायब झाला. सुट्टीच्या दिवशी त्याने समुद्रकिनार्याला जाण्यासाठी गाडी पकडली खरी पण नंतर त्याच्याबद्दल काहीच कळले नाही. खरे तर त्याचा प्रवास फक्त अर्ध्या दिवसाचाच होता. पोलिसांची चौकशी आणि वार्ताहरांची चौकशी दोन्हीही फोल ठरल्या.
मुले, माणसे हरविणे ही काही विशेष बाब आहे असे म्हणता येणार नाही म्हणा! आकडेवारी पाहिली तर अशी प्रकरणे दर वर्षी शेकड्याने आढळतात. शिवाय यातील फार कमी माणसे सापडतात. अपघातात किंवा खुनाच्या प्रकरणातील माणसे काहीतरी पुरावे मागे सोडून जातात किंवा अपहरणामागे काहीतरी हेतू तरी सापडतो. पण अशी काहीच पार्श्वभूमी नसलेल्या प्रकरणात त्या माणसांचा शोध लागणे जरा कठीणच. शेवटी ती घरातून पळून गेली असावीत असा निष्कर्ष काढला जातो.
या माणसाबाबतीतही कुठलाच धागादोरा हाती लागत नव्हता.
तो कुठे जाणार आहे हे पोलिसांना समजले होते पण त्या विभागात कुठलाही बेवारस मृतदेह सापडल्याची नोंद म्हणा, तक्रार म्हणा, दाखल झाली नव्हती. बरे, तो एखाद्या रहस्यमय कामात गुंतला होता व त्याचे त्यात अपहरण झाले असावे असे म्हणावे तर सकृतदर्शनी पुरावा तसे काही दर्शवित नव्हता. त्याच्या सामान्य दैनंदिनीतून त्याचा नाहिसा होण्याचा काही विचार होता असेही वाटत नव्हते.
मग नेहमीप्रमाणे काहीतरी लफडे असावे अशीही चर्चा सुरु झाली. पण त्याच्या बायकोने नंतर सांगितले की तो नेहमीप्रमाणे किटकांचे नमुने गोळा करण्यास बाहेर पडला होता. ते ऐकताच पोलिसांची व वार्ताहरांची थोडीशी निराशाच झाली.
दुसर्या दिवशी त्या स्टेशनवर काम करणार्या एका कामगाराने त्या स्टेशनवर एक माणूस उतरताना पाहिला होता. त्याच्यामते तो एखाद्या गिर्यारोहकासारखा दिसत होता. त्याने एक बॅग खांद्याला लटकवली होती व त्याच्या हातात एक लाकडी पेटी होती. बहुधा ती रंगाची पेटी असावी, असे त्याचे म्हणणे होते आणि मुख्य म्हणजे तो एकटाच होता. ना त्याच्याबरोबर त्याचा मित्र होता ना एखादी स्त्री. त्यामुळे लफड्याचा संशय ताबडतोब हवेत विरला ते बरे झाले.
त्याने बहुधा आयुष्याला कंटाळून आत्महत्या केली असावी असाही एक प्रवाद निर्माण झाला. त्याच्या एका मित्राने, जो एक मानसशास्त्रज्ञ होता, त्याने या शक्यतेचा दावा केला होता. त्याच्या मते जी माणसे कीटक गोळा करण्यासारख्या फालतू छंदात एवढा वेळ घालवितात त्यांना निश्चितच काहीतरी मानसिक आजार असणार. कदाचित त्यांना त्या किटकांना बोर्डवर पिना खुपसून ठोकण्यात आसुरी आनंद वाटत असेल. सांगता येत नाही. काही कीटकशास्त्रज्ञांना तर त्याच्या ताब्यात असलेल्या पोटॅशियम सायनाईडचेच जास्त कौतुक असते. पण त्याच्या या मताला कोणीच दुजोरा दिला नाही त्यामुळे हाही दावा मागे पडला. आणि शिवाय मृतदेह न सापडल्यामुळे कोणीही कितीही दावे केले तरी ते खोटेच ठरत होते.
या घटनेला सात वर्षे झाली आणि कायद्यात असलेल्या तरतुदीनुसार त्या माणसाला शेवटी मृत म्हणून घोषित करण्यात आले. (नागरी कायदा. भाग -१ कलम क्र.
३०)........
२
त्या दिवशी ऑगस्टच्या दुपारी त्या स्टेशनच्या बाहेर एक माणूस उभा होता. त्याने एक जुनी हॅट त्याच्या डोक्यावर घातली होती व आपली विजार पायमोज्यांमधे खोचली होती. त्याने खांद्यावर एक बॅग व एक लाकडाची पेटी टाकली होती. एखाद्या डोंगरमोहिमेवर निघण्याच्या तयारीत तो असावा असे वाटत होते. आपण ओळखलेच असेल की आपण कोणाबद्दल बोलतोय ते!
पण गंमत म्हणजे त्या भागात आव्हानात्मक, चढण्यायोग्य अवघड, अशी एकही टेकडी नव्हती, डोंगर तर सोडाच. तिकीटे गोळा करणार्या अधिकार्यानेही त्याला एकदा आपादमस्तक न्याहाळले व त्याला जाऊ दिले. स्टेशनबाहेरच उभ्या असलेल्या बसमधे मागील बाकावर तो माणूस शांतपणे जाऊन बसला. त्या बसचा मार्ग डोंगराळ प्रदेशाकडे जात होता....
बसच्या शेवटच्या थांब्यापर्यंत तो माणूस बसमधे होता. जेथे तो उतरला त्या जागेपासून टेकड्या व दर्यांचा प्रदेश सुरु होत होता. खाली भाताच्या शेतीचे हिरवे अरुंद पट्टे दिसत होते तर मधेच झाडांची बेटे उठून दिसत होती. गावातून चालत चालत त्या माणसाने समुद्रकिनार्याचा रस्ता पकडला. माती जाऊन आता पायाखाली कोरडी, पांढरटसर वाळू येऊ लागली. थोड्याच वेळात वस्ती मागे पडली व फक्त पाईनची झाडे दृष्टीस पडू लागली. पायाखालची वाळूही आता दमट व पायाला चिकटू लागली. एखाद्या जागेवर अचानक शेतीही दृष्टीस पडत होती पण कुठेही माणसाची वस्ती दिसत नव्हती.
त्याने थांबून आपल्या कपाळावरचा घाम पुसला व आजुबाजूला नजर टाकली. खांद्यावरील लाकडाची पेटी खाली काढून त्याने त्यातील लाकडाच्या काठ्यांचा एक जुडगा काढला. त्या एकापुढे एक जोडून त्याने त्यांची एक लांब काठी तयार केली व त्याच्या एका टोकाला किटक पकडण्याचे जाळे अडकविले. ही तयारी झाल्यावर त्याने परत चालण्यास सुरुवात केली. चालताना तो काठीच्या दुसर्या टोकाने गवत झोडपत होता. सगळीकडे समुद्रावर येतो तसा दमट वास भरुन राहिला होता. बराच वेळ तो चालत होता पण समुद्राचा पत्ता नव्हता. कदाचित आड येणार्या टेकड्यांमुळे तो दिसत नसावा. थोडे चालल्यावर एकदम त्याच्या दृष्टीस एक गाव पडले. इतर खेडेगावांसारखे एक खेडेगाव. गावकर्यांनी पत्रे उडून जाऊ नयेत म्हणून छपरांवर दगडांची रास रचली होती. काही घरांचे पत्रे लाल रंगाने रंगविलेले दिसत होते. त्या ओसाड पार्श्वभूमीवर तो रंग अजूनच लालभडक वाटत होता, डोळ्यात खुपत होता. त्याच्या मागे वाळूच्या टेकड्या दिसत होत्या व त्यामागे बहुधा समुद्र असावा. रस्त्यावर शंख शिंपल्याचा खच पडला होता व त्यामुळे रस्ता अगदी डांबरी रस्त्यासारखा कठीण झाला होता. रस्त्याकडेला एका दुकानासमोर लहान मुले खेळत होती तर काही माणसे गप्पा मारीत बसली होती. अर्थात त्याने त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. वाळू आणि त्यात सापडणारे किटक एवढेच काय ते ध्येय त्याच्यासमोर आता होते.
आश्चर्य म्हणजे समुद्राकाठी जाणारा रस्ता हा खाली उतरावयास हवा होता पण हा हळूहळू वर चढत होता. त्याचा रस्ता तर चुकला नव्हता ना? त्याने एका भेटलेल्या मुलीला विचारण्याचा प्रयत्न केला पण तिने पापण्या खाली झुकविल्या व काही समजलेच नाही असे दर्शवून ती घाईघाईने निघून गेली. पण तेवढ्यात त्याला मासेमारीची जाळी वाळत घातलेली दिसली आणि त्याने सुटकेचा नि:श्वास टाकला. रस्ता वर वर जात होता व शेवटी त्याचे रुपांतर वाळूत झाले. गंमत म्हणजे घरे, वाड्या मात्र रस्त्याच्या खालच्या पातळीवरच दिसत होती. त्याला ते बघून हसू आले. घरे वाळूच्या विवरात अडकल्यासारखी वाटत होती. चालता चालता अचानक त्याच्यासमोर विशाल समुद्र प्रगट झाला. तो आता एका आडव्या टाकलेल्या वाळूच्या चंद्रकोरीच्या काठावर उभा होता. त्याला येथेच यायचे होते. एकाबाजूला समुद्र होता तर दुसर्या बाजूला खड्ड्यात घरे होती. समुद्रावरील वार्याने त्याचा श्वास कोंडल्यासारखा झाला. त्याने बाटलीतील पाण्याचे दोन तीन घोट घेतले व समुद्रावरचा रखरखीत खारा वारा छातीत भरुन घेतला.
वाळूच्या टेकड्यांमधे राहणार्या किटकांसाठी तर तो इतक्या दूरवर आला होता.
किटक अभ्यासकांना नेहमीच नव्याने सापडणार्या किटकांचे अप्रूप असते. नवीन किटक मिळणे म्हणजे त्यांच्या दृष्टीने एक मोठा शोधच! असा एखादा किटक मिळाला की त्या संशोधकाचे नाव जगातील मोठमोठ्या जर्नल्समधे प्रसिद्ध होई. कोणाला नको असते प्रसिद्धी?
बघावी तिकडे वाळू! त्याच्या मनात विचार आला, ‘छे! ही वाहणारी वाळू काही जीवनासाठी आवश्यक आहे असे वाटत नाही. पण स्थिरता ही आयुष्यासाठी आवश्यकच आहे असेही नाही. जर सगळेच वाहत्या वाळूसारखे वाहत्या जीवनात सामिल झाले तर या जगात स्पर्धाच उरणार नाही. माणसे स्थिर होण्याचा प्रयत्न करतात म्हणून तर या जगाचा रहाटगाडगा चालतो आहे.’ त्या वाहत्या वाळूचा विचार त्याच्या मनातून जाईना. विचार करता करता तोही त्या वाळूच्या प्रवाहात वाहतो आहे असा त्याला भास होऊ लागला.
३
त्याने खाली मान घातली व तो त्या वाळूच्या आडव्या चंद्रकोरीच्या काठावरुन चालू लागला. कुठलाही किटक संशोधक आठ दहा फूटापलिकडे पहात नाही व तो कधीही सूर्य आपल्या पाठीवर घेऊन चालत नाही कारण त्याची सावली किटकांपाशी त्याच्या अगोदर पोहोचते व ते दचकतात. यामुळे तुम्ही पहाल तर कुठल्याही किटक संशोधकाच्या कपाळावरील व चेहर्यावरील कातडी जास्त करपलेली असते.
तो हळूहळू पावले टाकत चालू लागला. प्रत्येक पावलागणिक वाळू त्याच्या बुटांवर उडत होती. काळजीपूर्वक पावले टाकत तो वाळू निरखित चालला होता. बिटल किडे हे काही एकत्र राहणारी जमात नाही. असे म्हणतात एक किडा जवळजवळ एक कि.मी. भूभागावर आपला हक्क सांगू शकतो व इतर बिटलला तेथे येऊ देत नाही. निरीक्षण चालू असतानाच तो अचानक थबकला. गवताच्या बुंध्यात त्याला कशाची तरी चाहूल लागली. बघतो तर एक मोठा कोळी होता. कोळ्यांमधे त्याला काहीच रस नव्हता. खाली बसून त्याने एक सिगारेट शिलगावण्यासाठी काडी ओढली. समुद्रावरुन न थांबता वारे वहात होते व त्यात लाटा घुसळल्या जात होत्या, किनार्यावर धडकत होत्या. पश्चिमेला वाळूच्या टेकडीवर उघडेबोडके खडक उन्हात चमकत होते.
त्या वार्यात त्याला आगकाड्या पेटवता येईनात. त्याच्या दहा काड्या वाया गेल्या. त्याने फेकलेल्या काड्यांच्या रांगेकडे नजर टाकली. तेथेच वाळूत वार्याने तरंग उठत होते. त्याचा वेग साधारणत: घड्याळाच्या मोठ्या काट्याएवढा त्याला भासला. त्याने त्या तरंगांकडे लक्षपूर्वक पाहण्यास सुरुवात केली. जेव्हा त्यातील एका लाटेने त्याच्या टाचेला स्पर्ष केला तेव्हा मात्र तो उठला. वाळू त्याच्या विजारीच्या घडीत जमा झाली होती. त्याचे तोंड कोरडे पडले होते व तोंडात वाळूचा खरखरीतपणा उतरला होता.
थोडक्यात काय आजची मोहीम फसणार अशी लक्षणे दिसत होती. बहुधा वार्याच्या वेगाने किटक बिळांबाहेर येण्यास घाबरत असावेत. पण अशा अनेक प्रसंगातून तो गेला असल्यामुळे त्याने तो अजिबात निराश झाला नाही. वाळूच्या उतारावर त्याला असे वाटले की तेथे त्याला त्याचे लक्ष्य सापडेल. वाळूच्या अनेक लाटा पार करुन तो अचानक त्या टेकडीच्या टोकावर आला. त्याच्या पायाशी असलेले विवर आता त्याला स्पष्ट दिसत होते.
त्या विवराच्या तळात निरव शांततेत बुडालेले त्याला एक छोटेसे घर दिसले. त्या घराचा एक वासा पलिकडच्या वाळूच्या भिंतीत घुसवला होता. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी वाळूपासून त्यांची सुटका नव्हती. छायाचित्र काढण्यासाठी त्याने कॅमेरा रोखला, तेवढ्यात त्याच्या पायाखालची वाळू सरकायला लागली. त्याने दचकून त्याची पावले मागे घेतली पण ती वाळू बराच वेळ सरकत होती. त्याने तोल सावरला. बापरे! कठीण आहे. खोल श्वास घेऊन त्याने त्याचे घामेजलेले तळहात त्याच्या मांडीवर बाजूला खसाखसा पुसले.
तेवढ्यात त्याला मागे खाकरण्याचा आवाज ऐकू आला. एक खेडूत त्याच्या मागे खांद्याला स्पर्ष करता येईल इतक्या जवळ येऊन गुपचूप उभा होता. त्याने एकदा कॅमेर्याकडे पाहिले व एकदा खाली विवरात. त्या म्हातार्या माणसाच्या चेहर्यावर हलकेसे स्मित उमटले. हसल्यावर त्याच्या चेहर्यावरील सुरकुत्यांचे जाळे अधिकच दाट झाले. त्याच्या लाल झालेल्या डोळ्याच्या कडा चिकटलेल्या दिसत होत्या.
“तुम्ही या जागांची पहाणी करताय का?” त्याने संशयाने विचारले.
“नाही ! नाही ! मी किटक गोळा करतोय.”
हे त्याच्या समजण्यापलिकडे होते, हे त्याच्या लगेचच लक्षात आले. म्हातारा काही न बोलता हळुहळु चालत त्या काठावरुन चालता झाला. त्या दिशेला पाहताच त्याच्या लक्षात आले की तेथे अजून तीन माणसे वाळूत बसली होती. मधल्याच्या हातात दुर्बिण होती व गुडघ्यावर बसून तो त्यांच्याकडेच पहात होता. म्हातारा तेथे पोहोचल्यावर त्यांच्यामधे कसलीशी चर्चा चालू झालेली त्याला दिसली. बहुधा त्यांच्यात काहीतरी वाद होत असावा. तो त्याच्या कामाला लागणार तेवढ्यात त्याला तो म्हातारा परत त्याच्याकडे येताना दिसला.
“म्हणजे तुम्ही खरेच सरकारी मोजणी अधिकारी नाही?” त्याने विचारले.
“नाही हो !” असे म्हणून त्याने ब्याद टळावी म्हणून खिशातून त्याच्या नावाचे कार्ड काढले.
“अच्छा म्हणजे तुम्ही शाळामास्तर आहात तर !”
“माझा सरकारी कार्यालयाशी काहीही संबंध नाही”
“हंऽऽऽऽऽऽ शाळेत शिक्षक आहात म्हणा की तुम्ही !’
ते कार्ड हातात घेऊन त्याने त्या तिघांकडे प्रस्थान ठेवले. बहुधा त्यांचे समाधान झाले असावे कारण ते चौघेही तेथून उठले आणि चालायला लागले. पण तो म्हातारा परत त्याच्याकडे आला.
“आता तुम्ही काय करणार आहात?” त्याने विचारले.
“मी आता किटक शोधणार आणि काय?”
“नाही शेवटची बस तर गेली म्हणून विचारले!”
“इथे कुठे राहण्याची सोय नाही का?” त्याने विचारले.
“इथे? राहण्याची?” त्याचे डोळे चमकले.
“जर इथे तशी सोय नसेल तर मला पुढच्या गावाचा रस्ता पकडण्याशिवाय गत्यंतर नाही”
“पुढच्या गावाला? चालत?”
“हो ! मला घरी परतण्याची तशी विशेष घाई नाही !” त्याने हसून उत्तर दिले.
“छे! छे! त्याची गरज नाही.” इतका वेळ मोजकेच बोलणारा तो, त्याने एकदम बोलायलाच चालू केले.
“आमचे गाव गरीब आहे हे खरे आहे पण आपली हरकत नसेल तर मी तुमची कुठेतरी व्यवस्था करु शकतो. अगदी तुमच्या घराएवढे स्वच्छ नसेल ते....., पण सोय होऊ शकेल एवढे निश्चित !”
“फार बरे होईल तुम्ही मला मदत करु शकलात तर.....मला खेडेगावात रहायला मनापासून आवडते. कारण आम्ही मूळचे कुठल्यातरी खेडेगावातच रहात होतो ना!”......
क्रमशः
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
7 Feb 2017 - 6:48 pm | वरुण मोहिते
पु.भा.प्र.
7 Feb 2017 - 7:28 pm | vikrammadhav
वाचतोय!
पुभालटा
7 Feb 2017 - 7:28 pm | उगा काहितरीच
वाचतोय...
7 Feb 2017 - 8:09 pm | जव्हेरगंज
येस. स्टोरीमध्ये गुंतून गेलो आहे.
सुरुवात आवडली.
पुभाप्र.
7 Feb 2017 - 9:17 pm | शलभ
मस्त आहे गोष्टीची सुरूवात..
7 Feb 2017 - 9:57 pm | सुखी
Image मध्ये लिंक embeddedआहे.. मिसळपाव वरून दुसरीकडे घेऊन जात आहे..
अटॅक आहे का?
12 Feb 2017 - 9:17 pm | पैसा
छान सुरुवात