मोबियस : भाग-३ : प्रकरणे ३१-३२ व मोबियस भाग :४ प्रकरण ३३ समाप्त.

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
5 Mar 2017 - 7:43 pm

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

...ते बघून तिलाही हसू आवरेना. त्याच्या डोक्यात एकमेकांना जोडलेल्या असंख्य खड्ड्यांचे जंजाळ आकार घेत होते. पण तिला मात्र ते त्याचे उत्तेजन वाटत होते. अर्थात हे सगळे नैसर्गिकच होते.. पाण्यात बुडणार्‍या माणसाला डोके वर काढून श्वास घेताना जो आनंद होतो तो त्याच्याशिवाय कोणाला कळणार.....

मोबियस

३१
कंटाळवाण्या वाळूचे आणि कंटाळवाण्या रात्रींचे आठवडे सरले.

कावळ्यांनी ‘आशा’कडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले होते. वर लावलेल्या माशाच्या तुकड्याकडे कावळ्यांनी ढुंकूनही पाहिले नसेल पण जंतूंनी मात्र त्याच्याकडे नीट लक्ष दिले होते. एक दिवस त्याने त्याच्याकडे नजर टाकली तेव्हा तेथे आता फक्त माशाचे काटे शिल्लक राहिले होते. आमिष बदलताना त्याने आतही डोकविण्याचे ठरविले. वरची वाळू काढून त्याने झाकण उघडले आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला.. त्या बादलीच्या तळाशी पाणी साठले होते.. चारएक इंच असेल पण होते एकदम स्वच्छ. त्यांना पुरवठा होणार्‍या मचूळ पाण्यापेक्षा अत्यंत शुद्ध. गेले दीडमहिना तर पाऊस पडलेला नाही मग हे पाणी आले कुठून. आणि ती बादली गळकी होती हेही त्याला चांगलेच आठवत होते. त्याने बाहेर काढल्यावर ती लगेचच गळू लागली. एवढ्या कमी अंतरावर जिवंत झरा असणे शक्यच नव्हते. गळणार्‍या पाण्याची भरपाई कुठूनतरी होत होती हे निश्चित. सैधांतिकदृष्ट्या तर तसेच व्हायला हवे. पण या तापलेल्या वाळूतून पाणी कसे येणार...

त्याला लागलेल्या या शोधामुळे तो उत्तेजित झाला. त्याला यामागे एकच कारण दिसत होते ते म्हणजे वाळूतील केषाकर्षण. वाळूच्या पृष्ठभागावर विशिष्ट उष्णता जास्त असल्यामुळे ती वर कोरडी असते पण थोडे खणले तर तेथे थोडीशी आर्द्रता असतेच. पृष्ठभागावरील बाष्पीभवनाने ती आर्द्रता वर येत असणार. हा एक प्रकारचा पंपच होता. हा विचार आल्यावर त्याला सगळे सोप्पे वाटू लागले. प्रचंड प्रमाणात पहाटे व रात्री बाहेर येणारे धुके, घराच्या भिंतींवर चढणारी ओल या सगळ्याची उत्तरे त्याला आता मिळतील असे वाटू लागले. वाळू पृष्ठभागावर कोरडी होती याचे कारण नुसती उष्णता नव्हती तर आतून पाण्याचा पुरवठा पुरेसा नव्हता हेही होते. याचाच अर्थ पाण्याचे सतत अभिसारण होत होते. ते चक्र त्याने खड्डा खणून मधेच तोडले होते. काही प्रश्नांची उत्तरे त्याला अजून सापडत नव्हती.पण मुख्य म्हणजे या तत्वाचा उपयोग करुन त्याला एखादे पाण्याचे यंत्र करणे सहज शक्य होते.

या प्रयोगात तो यशस्वी झाला असता तर त्याला पाण्यासाठी गावकर्‍यांवर अवलंबून राहण्याचे कारणच नव्हते. पण त्याहून महत्वाचे होते त्याला या पंपाचा लागलेला शोध. तो एका विशाल पंपावरच बसला होता...हा लागलेला शोध. तो उत्तेजित झाला. त्याला शांत होण्यासाठी खाली बसावे लागले. थोड्यावेळाने मनातील खळबळ शांत झाल्यावर त्याचे विचारचक्र सुरु झाले. त्याचे हे संशोधन इतक्यातच कोणाला सांगायची त्याला गरज नव्हती. पुढच्या प्रयत्नावेळी हा त्याचा हुकमी एक्का असणार होता.

पण त्याला त्याचा आनंद लपवता येत नव्हता. त्याच्या “आशा” बद्दल तो तिच्याशी बोलणार नव्हताच पण त्या शोधामुळे झालेला आनंद त्याच्या ह्रदयात मावत नव्हता. तो एकदम आनंदाने चित्कारला व त्याने तिला मागून घट्ट मिठी मारली. तिने तिची सुटका करुन घेतल्यावर त्याने त्या बिछान्यावर लोळण घेतली व गुदगुल्या होणार्‍या लहान मुलासारखा तो स्वत:शीच हसू लागला. तो कशावर तरी तरंगत असल्याचा त्याला भास झाला व त्याच्या हसण्याचे खदाखदा हसण्यात रुपांतर झाले.

ते बघून तिलाही हसू आवरेना. त्याच्या डोक्यात एकमेकांना जोडलेल्या असंख्य खड्ड्यांचे जंजाळ आकार घेत होते. पण तिला मात्र ते त्याचे उत्तेजन वाटत होते. अर्थात हे सगळे नैसर्गिकच होते.. पाण्यात बुडणार्‍या माणसाला डोके वर काढून श्वास घेताना जो आनंद होतो तो त्याच्याशिवाय कोणाला कळणार ?

अजून तो त्या विवराच्या तळाशीच होता पण मनाने तो त्या टेहळणीच्या मनोर्‍यावर पोहोचला होता. बहुतेक जग उलटेपालटे झाले असावे असे त्याला वाटू लागले. त्याला ते विवर वर व मनोरा खाली भासू लागले. आता त्या गावकर्‍यांची दादागिरी चालणार नव्हती. त्यांनी त्याचे पाणी तोडले तरी त्याच्याकडे आता भरपूर पाणी असणार होते. त्याने अतिशयानंदाने एक आरोळी ठोकली व तो परत हसू लागला. त्याने थबकून दूरवर दृष्टी टाकली व त्याला सगळे दृष्य दिसू लागले. मोझॅईक जवळून पाहिल्यास त्याचा उलगडा होत नाही. ते दुरुनच पहावे लागते. जवळ गेल्यास त्यातील एक तुकडाच दिसतो. त्या तुकड्यावरुन नजर काढली की ती दुसर्‍या तुकड्यात अडकते. बहुतेक आत्तापर्यंत तो जे पहात होता ती वाळू नव्हती तर वाळूचे कण होते.

त्या पाण्याच्या खड्ड्यांचा अभ्यासही त्याच्या दिनक्रमात अंतर्भूत झाला. रेखाचित्रांनी, गणितांनी कागद भरु लागले. जागा, बादलीचा आकार, दिवसाचे तास व रात्रीच्या तासांचे गणित, पाणी साठायचा वेग, तापमानाचा परिणाम, दाबाचा होणारा संभाव्य परिणाम... अशा अनेक गोष्टींवरील टिप्पण्यांनी वह्या भरु लागल्या. तिला मात्र कावळ्याच्या सापळ्यासाठी एवढे काम करण्याची काय आवश्यकता आहे असा प्रश्न पडला. पण तिने मनाची समजूत घातली...‘प्रत्येक पुरुषाला असे काहीतरी खेळणे लागतेच. तो जर त्यात रमत असेल तर तिला काही अडचण नव्हती.’ शिवाय का कोणास ठाऊक त्याने तिच्या माळांमधेही जास्त रस दाखविण्यास सुरुवात केली होती. कावळ्याचा सापळा सोडून देऊ...पण तिला एकंदरीत त्याचा फायदाच वाटत होता. अर्थात या सगळ्यात त्याचाही स्वार्थ होताच. त्याला रेडिओवर हवामानाच्या अंदाजात हवामानाचे अचूक आकडे मिळायचे जे त्याला त्याच्या गणितात उपयोगी पडायचे. तो रेडिओ त्यांच्यातील एक महत्वाचा दुवा झाला. त्याला एक अजून चांगला रेडिओ घ्यायचा होता.

नोव्हेंबरच्या सुरवातीला त्याने एक गॅलन पाणी जमा झाल्याची नोंद केली. पण त्यानंतर मात्र पाणी दिवसेंदिवस कमी होत गेले. बहुधा तापमानाचा परिणाम असणार तो. पण प्रयोग करण्यासाठी त्याला वसंतऋतूची वाट पहावी लागणार असे वाटू लागले. शिशिर आला आणि बर्फासारख्या थंडगार वाळूचे कण उडू लागले. त्याला चांगल्या प्रतीचा रेडिओ घ्यायचा असल्यामुळे तो तिला तिच्या कामात मदत करु लागला. एक बाब चांगली होती, त्या विवरात वार्‍यापासून संरक्षण होत असे पण सूर्याचे दर्शन न झाल्यामुळे मनावर मळभ साठत असे हा एक तोटा होताच. शिशिर असला तरी वाळू उडण्याचे काही थांबले नव्हते व त्यामुळे ती उपसायचे कामही. त्याच्या हातावरील फोड थंडीमुळे फुटत व त्यातून रक्तही येत असे..

कसाबसा शिशिर गेला आणि वसंत आला. मार्चच्या सुरुवातीला त्यांचा नवीन रेडिओ आला. त्यांनी त्याची अँटिना घरावर उभी केली... तीही उत्साहाने बटने फिरवत त्यावर वेगवेगळे स्टेशन्स लाऊन त्याची खरखर ऐकू लागली. त्याच महिन्याच्या शेवटी तिने ती गरोदर असल्याचे जाहीर केले. दोन महिने असेच गेले. विवरावरुन पांढरेशूभ्र मोठे पक्षी उत्तरेकडे उडताना दिसू लागले. त्याच दिवशी तिचे कपडे रक्तस्त्रावाने भरले. एका गावकर्‍याने परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले. तिला असह्य वेदना होत होत्या. शेवटी तिला दवाखान्यात घेऊन जायचे ठरल्यावर त्यांनी ती तीनचाकी गाडी बोलावली. ते त्या गाडीची वाट पहात असताना तो तिच्याशेजारी तिचा हात हातात घेऊन बसला होता. त्याचा दुसरा हात मोठ्या मायेने तिच्या ओटीपोटावरुन फिरत होता. त्याचे डोळे भरुन आले...

शेवटी ती गाडी एकदाची आली. सहा महिन्यात प्रथमच दोराची शिडी खाली सोडण्यात आली. कांबळ्यात गुंडाळलेल्या तिला त्यांनी ओढून वर घेतले. तिच्या डबडबलेल्या डोळ्यातून ती तो नाहिसा होईपर्यंत त्याच्याकडे पहात होती. त्याने ते सहन न होत त्याची मान फिरवली.

तेवढ्यात त्याच्या नजरेस एक अजब दृष्य पडले ज्याने तो दचकलाच. हादरला !

दोराची शिडी अजूनही तेथेच लटकत होती.

त्याच्या शरीरात गरम रक्त सळसळत गेले.
त्याने त्या दोराच्या शिडीला हात लाऊन पाहिले. ती नाहिशी होत नाही हे पाहिल्यावर त्याने एक सुस्कारा सोडला. त्याने हळूहळू वर चढण्यास सुरुवात केली. वर आकाश पिवळे पडले होते. त्याचे हातपाय जड झाले. हीच ती शिडी जिची तो इतक्या आतूरतेने वाट पहात होता. जिच्यासाठी त्याने जिवाचा आटापिटा केला होता.

वाहणारा वारा त्याचा श्वास खेचून घेत होता. त्या विवराच्या तोंडाभोवती दोन फेर्‍या मारुन तो जवळच्याच उंचवट्यावर चढला. तेथून त्याला समुद्र स्पष्ट दिसत होता. त्याचाही रंग घाणेरडा पिवळटसर दिसत होता. त्याने एक दीर्घ श्वास घेतला पण त्याने त्याच्या घशाची खवखव वाढली.. त्याला वाटले तेवढे काही त्याला बरे वाटले नाही... त्याने आजुबाजूला नजर फिरविली. दूरवर वाळूचा लोळ उठला होता. बहुधा तिला घेऊन जाणारी गाडी असावी ती.
‘चुकलच माझं! तिला त्या सापळ्यातून काय मिळाले हे सांगायला हवे होते.’ तो मनाशी म्हणाला.

तेवढ्यात त्याला विवराच्या तळाशी काहीतरी हालचाल दिसली. ती त्याचीच सावली होती. त्या सावली शेजारीच तो सापळा होता. एका बाजूची फळी जरा तुटली होती. आलेल्यांपैकी कोणीतरी चुकून पाय दिला असावा बहुतेक. तो घाईघाईने खाली आला. तोडमोड फार काही झालेली दिसत नव्हती व पाणीही बरेच जमा झाले होते. आत रेडिओवर कोणीतरी घुसमटलेल्या आवाजात गात होते. तिची आठवण येऊन त्याला रडू फुटले. त्याने त्याचे हुंदके आवरले पण ते सहन न होता त्याने गुडघ्यावर बसून त्या पाण्यात आपले हात खुपसले. बर्फासारखे थंडगार पाणी. त्याच अवस्थेत तो तसाच बसून राहिला. रिकामा...

पळून जायची आता तशी घाई नव्हती. त्याच्या परतीचे तिकीटही आता त्याच्या हातात होते..शिवाय त्याला त्याच्या संशोधनाबद्दल कोणालातरी सांगण्याची प्रचंड उत्सुकता लागली होती. गावकर्‍यांनाच त्याचा उपयोग होता. ‘आज नाहीतर उद्या त्यांना सांगता येईल..’ तो मनात म्हणाला.

ते त्यांना सांगेपर्यंत येथून पळून जाण्याची योजना थोडी लांबणीवरही टाकता येईल.
त्यात काय एवढे....

मोबियस भाग :४ प्रकरण ३३

स्थळ : स्थानिक जिल्हा न्यायालय
हरवलेल्या व्यक्तिंबाबत : विषय : निकाल
नाव : तो
तक्रारदार : त्याची आई.
नियमानुसार सात वर्षात वरील व्यक्तीची काहीच खबरबात न लागल्यामुळे त्याला मृत म्हणून घोषित करण्यात येत आहे.. योग्य ती कार्यवाही करावी असा आदेश देण्यात येत आहे...
न्यायाधिश : सही.............

समाप्त.
जयंत कुलकर्णी.

मित्रहो अशा रितीने ही कादंबरी येथे संपली.

काही प्रश्र्न तुमच्या मनात निश्चितच उभे राहतील. त्यांची यथाशक्ती उत्तरे देण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेन. अर्थात मला फार विद्वत्तापूर्ण उत्तरे विद्वत्तापूर्ण प्रश्र्नांना देता येणार नाही... :-) पण इतर साध्यासुध्या प्रश्र्नांची उत्तरे देण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेन. कोणीतरी मला एका प्रकरणात विचारले होते की मी ही कादंबरी का वाचली व तिचे भाषांतर मला का करावेसे वाटले.. थोडा दम खाऊन त्याचेही उत्तर देण्याचा प्रयत्न मी करेन

ही माझी सगळ्यात अलिकडची कादंबरी मी येथे टाकण्याचे कारण काय.... मला लिहिता येते व मी लिहिलेले वाचक वाचतात, त्यांना ते आवडते, याचा शोध मला मिपावरच लागला. (असे मला वाटते... नाहीतर काहीजण म्हणतील, "हे तुम्हाला कोणी सांगितले ''.) म्हणून ही कादंबरी मिपाला व मिपावाचकांना अर्पण. शिवाय एक नवीन विभाग चालू करावा हाही हेतू होताच. त्यासाठी परवानगी दिल्याबद्दल श्री. नीलकांत यांचे आभार मानतो.

ही कादंबरी मी एकदम का नाही टाकली : वर म्हटल्याप्रमाणे ही कादंबरी मी प्रकाशनासाठी लिहिली होती. एकाने तयारीही दाखविली होती त्यामुळे ती छपाईसाठी योग्य अशा फाँटमधे लिहिली. कादंबरी परत युनिकोडमधे रुपांतरीत करण्यात माझा बराच वेळ गेला..म्हणून प्रत्येक भागामधे थोडे अंतर ठेवावे लागले. बाकी काही नाही...

वाचा, वाटल्यास चर्चा करा... कादंबरी चर्चा करण्यायोग्य आहे ... टीका मी नेहमी सकारात्मकतेने घेतो.

रामराम !

जयंत कुलकर्णी.

लेखनसीमा.

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

मार्मिक गोडसे's picture

5 Mar 2017 - 8:35 pm | मार्मिक गोडसे

कादंबरीचा विषय थोडा गूढ असूनही केवळ अनुवाद छान जमल्यामुळे ही कादंबरी वाचवीशी वाटली व आवडलीही.

रिम झिम's picture

5 Mar 2017 - 9:01 pm | रिम झिम

अतिशय सुंदर आणि छान. खुप इंटरेस्टींग होती.....

वरुण मोहिते's picture

5 Mar 2017 - 9:31 pm | वरुण मोहिते

सांगता येणार नाही कारण मूळ वाचलं नाही . तरी जराश्या किचकट समजण्यासाठी असणाऱ्या पुस्तकाचा अनुवाद चांगला केलात . त्यामुळे जमला आहे अनुवाद .

पैसा's picture

5 Mar 2017 - 9:47 pm | पैसा

खूप आवडली कादंबरी. कादंबरीला दिलेले मोबियस पट्टीचे नाव अतिशय समर्पक वाटले.

सर्व भाग वाचले. कादंबरी उत्कृष्ठ आहेच, पण शेवटी कदाचित जराशी घाई झाली असावी असे वाटते. तो का पळून जात नाही ह्या भागाचे मूळ कादंबरीत जास्त वर्णन आहे का? अनुवादात काही भाग कदाचित गाळला असावा असं जाणवलं.

उत्तरा's picture

6 Mar 2017 - 10:02 am | उत्तरा

कादंबरी आवडली.
तो का पळुन जात नाही याबद्दल थोडा गोंधळ उडाला आहे..

तो का पळुन जात नाही याबद्दल माझा थोडा गोंधळ उडाला आहे.. अधिक जाणुन घ्यायची उत्सुकता आहे.

मार्मिक गोडसे's picture

6 Mar 2017 - 10:45 am | मार्मिक गोडसे

किटक जसे आमिषाला बळी पडतात तसे ह्या कथेतील नायकाचे झाले असे दाखवायचे असेल. त्याच्यातील संशोधक वृत्ती त्याला तेथून बाहेर पडण्यास परावृत्त करीत असावी.

कादंबरीचे सुरुवातीचे काही भाग वाचले, आवडलेही होते, परंतु एकामागोमाग एक भाग येत राहिल्यामुळे आणि त्याच सुमारास ऑफिसमध्ये कामाची खूप गडबड असल्याने पुढील भाग वाचता आले नाहीत.

सवडीनुसार सर्व कादंबरी अवश्य वाचून काढेन.
केवळ प्रतिसाद द्यायचा राहून जाऊ नये म्हणून ही पोच.

कादंबरीचे सुरुवातीचे काही भाग वाचले, आवडलेही होते, परंतु एकामागोमाग एक भाग येत राहिल्यामुळे आणि त्याच सुमारास ऑफिसमध्ये कामाची खूप गडबड असल्याने पुढील भाग वाचता आले नाहीत.

सवडीनुसार सर्व कादंबरी अवश्य वाचून काढेन.
केवळ प्रतिसाद द्यायचा राहून जाऊ नये म्हणून ही पोच.

श्वेता व्यास's picture

6 Mar 2017 - 11:14 am | श्वेता व्यास

कादंबरी आवडली. मध्ये काही भागांमध्ये वाळूच्या वर्णनाचा तोचतोचपणा येतोय असं वाटलं त्यामुळे पुढे काय झालं असेल या उत्सुकतेने मूळ कादंबरी वाचली. त्यातच त्या प्रकरणांमध्ये तोचतोचपणा आहेच. मस्त झालाय अनुवाद.

इरसाल कार्टं's picture

6 Mar 2017 - 11:59 am | इरसाल कार्टं

खूप छान लिहिलात, खूप आवडली कादंबरी. धन्यवाद.

गौतमी's picture

6 Mar 2017 - 1:03 pm | गौतमी

वाचली पुर्ण... रोज नविन भागाच्या प्रतिक्षेत असायचे, पण कधीच प्रतिसाद दिला नाही म्हटल पुर्ण वाचुनच देईन.
छान लेखन.

माझीही शॅम्पेन's picture

6 Mar 2017 - 2:02 pm | माझीही शॅम्पेन

अप्रतिम अनुवाद आणि शेवट गूढ पण अत्यंत आशादायी !
एका ठिकाणी येऊन वाळू वाळू वाचून वैतगलो होतो पण हा भाग वाचून छान वाटल ,
कथेचा मोबियस स्ट्रिपशी नेमका सबंध कळला नाही

देशपांडेमामा's picture

6 Mar 2017 - 3:32 pm | देशपांडेमामा

अनुवाद आवडला. तुमच्या अनुवादाच्या आणि टंकण्याच्या मेहनतीला सलाम !!

देश

बापू नारू's picture

6 Mar 2017 - 5:58 pm | बापू नारू

सुरुवातीला थोडी बोरिंग वाटत होती कथा ,पण नंतर नंतर इंटरेस्टिंग होत गेली

आनन्दा's picture

7 Mar 2017 - 11:03 am | आनन्दा

"मोबिअस - उपसंहार" च्या प्रतीक्षेत!

मस्त अनुवाद केलाय..किटकांचा अभ्यास करत होता..विवरातील घरात किटकासारखीच हालत झाली त्याची..हाच मोबीयस पट्टा होता वाटतं..तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे उपसंहार लिहाच..अजून काही निसटलं असेल तर समजेल आम्हाला..

जव्हेरगंज's picture

8 Mar 2017 - 11:07 pm | जव्हेरगंज

तुमच्या चिकाटीला सलाम!!!

urenamashi's picture

9 Mar 2017 - 11:32 pm | urenamashi

उपसंहारा ची वाट पहात आहे...

रांचो's picture

22 Mar 2017 - 9:30 pm | रांचो

कथा सुरुवातीला खुपच हळु हळु उलगडतेय असे वाटले. थोडे बोअरपण झाले. पण वाचावीशी नक्कीच वाटत होती.
तो का पळुन जात नाही म्हणे? प्रेमात पडतो का तीच्या? किंवा त्या जागेच्या?