मोबियस भाग -२ : प्रकरणे २३-२४

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
27 Feb 2017 - 7:48 pm

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

...तो गुणगुणताना त्याच्या टीव्हीचा आवाज इतका मोठा करतो की ज्यांचे आयुष्यवस्त्र उसवले आहे त्यांचा आक्रोश त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही. एक धागा सुखाचा शंभर धागे.... हे गाणे या जगात खितपत पडलेल्या मनुष्यजातीचे गाणे आहे.... नव्हे पृथ्वीगीत आहे....

मोबियस

२३

‘एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे’....किवा ‘एक धागा दु:खाचा शंभर धागे सुखाचे म्हणा’...

तुम्हाला म्हणायचे असेल खुशाल म्हणा हे गाणे. पण हे धागेच तुटायला आले आहेत. आयुष्याचे वस्त्र हे असल्या धाग्यांनी विणलेले असेल तर मग विचारायलाच नको. या वस्त्रातील भूतकाळ व वर्तमान, वर्तमान आणि भविष्यकाळ यांना जोडणारे धागेही तुटायला आले असणार. या असल्या वस्त्राला लोंबकळणार्‍यांनाच त्यातील दु:ख समजू शकते. हे वस्त्र फाटायला आले की मग तो शेअर्स विकत घेतो, विमा उतरवितो व कामगार संघटनांमधील मित्रांशी खालच्या आवाजात बोलू लागतो. एक धागा ... तो गुणगुणताना त्याच्या टीव्हीचा आवाज इतका मोठा करतो की ज्यांचे आयुष्यवस्त्र उसवले आहे त्यांचा आक्रोश त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही. एक धागा सुखाचा शंभर धागे.... हे गाणे या जगात खितपत पडलेल्या मनुष्यजातीचे गाणे आहे.... नव्हे पृथ्वीगीत आहे....

जेव्हा जमेल तेव्हा त्याने गुपचुपपणे एक दोर वळायला सुरुवात केली होती. त्याने त्याचे जास्तीचे कपडे फाडून ते वळले व तिच्या नवर्‍याच्या कपड्यांच्या चिंध्यांनी घट्ट बांधले. त्याची लांबी आत्ताच साधारणत: पाच एक यार्ड भरली असती. वेळ आली की तो दोर तेथे असलेल्या गंजलेल्या कात्रीला बांधणार होता. कात्रीच्या पात्यांमधे लाकडाची पाचर मारुन तो ती उघडी ठेवणार होता. म्हणजे एक आकडा तयार झाला असता. एक गळ. अर्थात त्या दोराची लांबी अजून पुरेशी नव्हती पण वाळत घालण्याची दोरी त्याला जोडली की त्याची लांबी त्याला पाहिजे तेवढी झाली असती.

ही कल्पना तशी त्याला अचानकच सुचली होती. पण योजनाबद्ध कल्पनाच नेहमी यशस्वी होतात असे तरी कुठे आहे? अशा अचानक स्फुरलेल्या कल्पनाच मुलभूत असतात व यशाची शक्यता जास्त असते.

आता प्रश्न उरला होता तो म्हणजे याची कार्यवाही केव्हा करायची ती. ती दुपारी झोपल्यावर... हंऽऽऽऽ ती वेळ उत्तम होती पण दिवसा गाव पार करताना बराच धोका होता. ती झोपल्यावर बर्‍याच वेळाने तो निसटला असता तर त्याला उजेड असेपर्यंत लपून रहावे लागले असते. चंद्र उगविण्याआधी अंधाराचा फायदा उठवून तो सहजपणे हमरस्त्याला पोहोचू शकला असता.

तोपर्यंत तो हुषारीने तिच्याकडून त्या भागाची व गावाची माहिती गोळा करणार होता. उदा. त्या गावाचे अर्थकारण कसे चालते, समुद्राकाठी असून तेथे मासेमारी का चालत नाही, हे गाव या स्थितीत केव्हापासून आहे? त्याची लोकसंख्या किती आहे, ट्युलिप्सची शेती कोण करते, मुले कुठले खेळ खेळतात, ती शाळेत जातात का? कशी जातात...इ. इ. गावात येताना त्याने जेवढे पाहिले होते व आत्ताच्या माहितीवरुन त्याला एखादा नकाशा सहज करता आला असता. अप्रत्यक्ष माहितीवर आधारीत असलेला हा नकाशा किती अचूक असेल याची शंकाच होती पण नसल्यापेक्षा बरं.

गावाला वळसा घालून जाणे केव्हाही योग्य होते पण पश्चिमेच्या भिंतीपलिकडे एक टेकडीसारखा उंचवटा होता आणि त्याची समुद्राकडेची बाजू एखाद्या तासलेल्या कड्यासारखी झाली होती. अर्थात त्यात गावकर्‍यांनी आधारासाठी खोबण्या खोदल्या होत्या पण त्यावर गचकण माजल्यामुळे त्या सापडणे कठीण होते. शिवाय जास्त चौकशा करुन त्याला संशयाला जागा सोडायची नव्हती. पूर्वेला, म्हणजे बरोबर विरुद्ध दिशेला एक वाळूच्या टेकड्यांनी वेढलेली अरुंद खाडी होती. त्या टेकड्या जवळजवळ पाच मैल पसरल्या होत्या व परत गावाच्या वेशीवर थांबत होत्या. या असल्या वेळखाऊ मार्गापेक्षा त्याला असा मार्ग पाहिजे होता की ज्याने गावकर्‍यांना तयारीसाठी कमी वेळ मिळेल आणि तेवढ्यात तो हमरस्त्यावर पोहोचेल.

पण तेवढ्याने प्रश्न मिटत नव्हता. त्या मिनारामधील त्यांचे टेहळणी केंद्र... त्याचे काय करायचे? शिवाय तो पळून गेल्यावर ती आरडाओरड करेल. त्याचीही त्याला काळजी होतीच. तसे झाले असते तर त्यांनी गावाच्या वेशी तो तेथे पोहोचायच्या आतच बंद केल्या असत्या. कदाचित त्याला एका दगडात दोन पक्षी मारता आले असते. ते वाळू न्यायला येणारे अंधार पडल्यावरच येत असत. त्याआधी तिला त्याच्याबद्दल फक्त त्या टेहळणी करणार्‍यांनाच सांगावे लागले असते. त्याचे काय करायचे हाच प्रश्न होता.

नशिबाने तापमानातील फरकाने त्या भागात सूर्योदयापूर्वी अर्धा ते एक तास धुके दाटायचे. त्याचे कारणही त्याने शोधून काढले होते. वाळूतील सिलिसिक आम्ल जास्त उष्णता धरुन ठेऊ शकत नाही त्यामुळे दिवसभरातील शोषून घेतलेली उष्णता एकदम बाहेर फेकली जाते. त्यावरुन परावर्तीत होणार्‍या कोनातच ते टेहळणी केंद्र असल्यामुळे त्या काळात त्यांना या धुक्याच्या पांढर्‍या पट्ट्यापलिकडचे काही दिसणे अशक्य होते. त्याने कालच त्यांना दिसते का याचा प्रयोग करुन पाहिला होता. काल त्याने त्या काळात त्याचा पांढरा पंचा फडकाऊन त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता पण अपेक्षेप्रमाणे त्यांचा प्रतिसाद आला नव्हता.

ही योजना आखल्यापासून चौथ्या दिवशी त्याने ती अमलात आणली. त्यादिवशी शनिवार होता. दर शनिवारी त्यांना आंघोळीसाठी पाणी मिळे. ती रात्र त्याने पूर्ण झोपून काढण्याचे ठरविले होते. त्यासाठी त्याने सर्दीचे कारण पुढे केले. काळजी म्हणून त्याने त्यांच्याकडून काही अ‍ॅस्पिरीनच्या गोळ्याही मागविल्या. त्या रंग उडालेल्या जुनाट गोळ्या आल्यावर त्याने त्यातील दोन त्या गावठी दारुत मिसळल्या व मस्त ताणून दिली.

एकटीलाच काम करावे लागल्यामुळे तिचीही लवकरच दमछाक झाली. ती स्वयंपाकात गर्क असताना त्याने उगीचच बडबड लावली होती. मोरीची दुरुस्ती करायला हवी...इ. इ. तिला काय वाटत होते हे त्याला कळत होते. तिला वाटत होते की त्याची मुळे आता या भूमीत रुजायला लागली आहेत. त्याच्या त्या बडबडीमुळे वैताग आलेला असूनसुद्धा तो चेहर्‍यावर दिसू न देण्याची ती काळजी घेत होती. न जाणो त्याचा विचार बदलला तर? कामानंतर कोणालाही आंघोळ करण्याची इच्छा होतच असते. रात्री घामेजलेल्या अंगाला चिकटलेल्या वाळूमुळे अस्वस्थ वाटत होते. शिवाय आज आंघोळीच्या पाण्याचा दिवस होता आणि तिलाही त्याला आंघोळ घालण्यास आवडत असे. त्यामुळे तिने विरोध करायचा प्रश्नच नव्हता.

ती त्याला साबण लावत असतानाच त्याने कामविव्हल होण्याचे नाटक करीत तिच्या कपड्यांना हात घातला. आता तिला साबण लावण्याची पाळी त्याची होती. गोंधळून तिने विरोध करण्याचा लटका प्रयत्न केला पण त्याला माहीत होते की तिच्या नकारात होकार भरलेला आहे. त्याने पटकन गरम पाण्याची बादली तिच्यावर उपडी केली आणि तिच्या नग्न शरीराला साबण लावण्यास सुरुवात केली. तिच्या कानाच्या पाळ्यांशी खेळत त्याने तिच्या मानेला कुरवाळले. त्याचे हात खांद्याखाली केव्हा आले हे त्याचे त्यालाच कळले नाही. तिच्या ओठातून एक अस्फुटशी किंकाळी बाहेर पडली. खाली घसरत ती त्याला बिलगली. तिचीही बहुधा हीच अपेक्षा असावी. तिच्या उत्तेजित हावभावांचा त्याच्यावरही परिणाम हो़ऊ लागला होता. पण का कोणास ठाऊक त्याच्या मनावर कसले तरी सावट पडलेले त्याला जाणवत होते. तिच्या अंगकांतीवर जणू काजवे चमकत होते. तिची आता निराशा करणे म्हणजे एखाद्या जनावरावर मागून गोळी चालविण्यासारखे होते. त्याचीही गात्रे पेटून उठली.
पण ओढूनताणून आणलेल्या उत्तेजनालाही शेवटी मर्यादा असते. त्याच्या त्या विचित्र हालचालींनी तिही क्षणभर बावरली. त्याला एकदम शिथिलता आल्यासारखे वाटले. परत एकदा जोरदार प्रयत्न करुन उत्तेजित होण्याचा प्रयत्न केला. त्याला हे नाटक अजून दोन तास तरी चालू ठेवायचे होते. शेवटी तीच कंटाळून बाजूला झाल्यावर त्याने जनावरासारखा आपला कार्यभाग आटोपला. मग त्याने तिच्यावर साबण धुण्यासाठी पाणी फेकले व तिला अ‍ॅस्पिरीन मिसळलेली ती गावठी दारु पिण्याचा आग्रह केला. आग्रह कसला बळजबरीच केली. आता ती रात्रीपर्यंत उठत नाही. तो मनात म्हणाला.

ती अतिश्रमाने चक्क मंद घोरत होती.... तिचा श्वासोच्छ्वास मंद व खोल होत होता. त्याने तिच्या टाचेवर त्याच्या पायाने हलकासा धक्का दिला पण तिच्याकडून कसलाच प्रतिसाद आला नाही. एकाद्या पिळवटून टाकलेल्या नळीसारखी ती अस्ताव्यस्त पडली होती. त्याने तिचे वर गेलेले खालचे वस्त्र तिच्या गुडघ्यापर्यंत खाली ओढले. नशीब त्याचे सर्व लक्ष त्याच्या योजनेवर होते नाहीतर त्याचे काही खरे नव्हते. त्या कात्रीचा त्याला पाहिजे तसा आकडा तयार झाल्यावर तो योग्य क्षणाची वाट पहू लागला. तिच्याकडे शेवटचे पाहताना त्याच्या ह्रदयात एक कळ उठली.

डोक्यावर, त्या बिळाच्या काठावर मंद प्रकाशाची कडी दिसत होती. संध्याकाळचे साडेसहा किंवा सात वाजले असावेत. हीच वेळ... त्याने आपले हात व खांदे हलवून जरा मोकळे केले व एक दीर्घ श्वास घेतला.

त्याला प्रथम घराच्या छपरावर चढायचे होते. उन्नतकोन पंचेचाळीसच्या जेवढा जवळ, तेवढे आकडा फेकण्यात यशाची शक्यता जास्त. त्याने कात्रीचा तयार केलेला आकडा टाकून छपरावर चढण्याचा प्रथम विचार केला होता पण छपरावरील आवाजाने तिला जाग येईल अशी त्याला भीती वाटली. त्याने घराला वळसा मारुन मागच्या मोडकळीस आलेल्या छपरीवरुन वर चढण्याचे ठरविले.

चिरफळ्या उडालेले वासे पातळ व कुजलेले होते. त्याला त्याचीच काळजी वाटत होती. पण त्यानंतर त्यापेक्षाही भयंकर अनुभव त्याला आला. उडत्या वाळूने छप्पर अगदी स्वच्छ व नव्यासारखे दिसत होते खरे पण त्याने त्यावर पाय ठेवल्यावर त्याला कळले की एखाद्या सादळलेल्या फटाक्याप्रमाणे ते फुसके झाले होते. त्यावर पाय ठेवणे म्हणजे संकटात पाय ठेवल्यासारखेच होते. वजन विभागले जावे म्हणून तो रांगत पुढे सरकला. शेवटी वरच्या मुख्य वाशावर पोहोचल्यावर तो हळूच त्याच्या गुडघ्यावर बसला. घराची वरची बाजू आता अंधारात होती आणि वरची ओलसर वाळू पाहून त्याला उमजले की धुके जमा होते आहे. आता त्याला त्या टेहळणी मिनाराची काळजी वाटत नव्हती.

त्याने दोराचा फास तयार केला व तो आकड्याच्या खाली चार फुटावर उजव्या हातात घेतला. डोक्याभोवती फिरवत त्याने तो फेकण्याची तयारी केली. त्याला तो वर असलेल्या वाळूच्या पोत्यावर टाकायचा होता. ज्याअर्थी ते त्या पुरलेल्या पोत्यांचा खालून वाळूचे डबे ओढण्यासाठी उपयोग करीत होते त्यावरुन ती पोती त्यांनी भक्कमपणे पुरली असणार. त्याने आकड्याचा वेग वाढवला व तो दोर हातातून सोडून दिला. तो बरोबर उलट्या दिशेला उडाला. त्याचे गणित चुकले होते. तो दोर जरा आधीच सोडायला हवा होता. दुसर्‍या वेळेस दिशा बरोबर आली पण आकडा मधेच आपटून खाली आला. दोराचा फिरण्याचा वेग व कोन याचा ताळमेळ बसत नव्हता हेच खरे.

बर्‍याच प्रयत्नानंतर त्याला बर्‍यापैकी अंदाज आला पण आता थकल्यामुळे त्याचे शरीर काम करेना... त्याला वाटले तेवढे सोपे प्रकरण नव्हते ते. तो स्वत:वरच चिडला. जणू काही त्यानेच स्वत:ला फसविले आहे. त्याच्या डोळ्यात पाणी आले. पण त्याच्या नशिबाने अजून एक नियम अस्तित्वात होता. तो म्हणजे संभाव्यतेचा नियम. यशाची शक्यता ही प्रयत्नांच्या संख्येवर अवलंबून असते. अंदाजे तिसाव्या प्रयत्नाला, जेव्हा त्याने सगळ्याची आशा सोडून दिली होती, तो आकडा सरळ त्या रुतलेल्या पोत्यांपलिकडे जाऊन पडला. त्याचा घसा कोरडा पडला होता. पण एवढे उत्तेजित व्हायचे कारण नव्हते. आत्ताशी त्याला लॉटरीचे तिकीट घेण्यासाठी पैसे मिळाले होते. आता लॉटरी लागणार का नाही हे अजून ठरायचे होते. त्याचे सर्व स्नायू आता त्या दोरावर एकवटले होते. त्याने काळजीपूर्वक तो दोर ओढण्यास सुरुवात केली. जणूकाही तो एका तंतूने आकाशातील तारा ओढत होता.

तेवढ्यात तो आकडा कशालातरी अडकला...

त्याचा स्वत:वरच विश्वास बसला नाही पण आता तो दोर ओढला जात नव्हता. त्याने अजून थोडा जोर लावून पाहिला. तणावाखाली त्याचे शरीर ताठरले. आत्ता... का नाही... पण आता शंकेला वाव नव्हता.. त्याचा आकडा पोत्याला किंवा कशालातरी चांगलाच अडकला होता. तो सावकाश खाली उतरला आणि दोराच्या खालच्या टोकाशी गेला. ते टोक जमिनीपासून थोड्या उंचीवर लोंबकळत होते. इतक्या जवळ की त्याचा विश्वास बसेना.
त्याने दोर हातात पकडला आणि चढायला सुरवात केली.

अचानक दोर रबराप्रमाणे ताणला जाऊ लागला. तो दचकला. त्याला घाम फुटला. नशिबाने दोर लांब व्हायचा थांबला. त्याने आपल्या हातावर थुंकी पसरली, गुडघ्यात दोर पकडला व वर जाण्यास सुरुवात केली. एखाद्या खेळण्यातील माकडाप्रमाणे दिसत होता तो. घामामुळे त्याचे कपाळ थंडगार पडलेले त्याला जाणवत होते. वाळू पडू नये म्हणून तो भिंतीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होता. पण चढताना तो स्वत:भोवती गिरक्या खात होता. त्याचे वजन त्याच्या अपेक्षेपेक्षा खूपच जास्त निघाले. प्रगती अर्थातच अत्यंत हळू होत होती. आणि त्याचे हात त्याच्या ताब्यात नसल्याप्रमाणे अचानकपणे थरथरु लागले. बहुतेक हा गेल्या सेहेचाळीस दिवसाचा परिणाम असावा. काही फूट चढल्यावर हळूळू ते विवर त्याला जास्तच खोल वाटू लागल्यावर तो फारच दमून गेला. खाली बघायचे नाही... वर ती जागा होती जेथे पोहोचल्यावर त्याची सुटका होणार होती...स्वातंत्र्य! पृथ्वीच्या अंतापर्यंत. त्यानंतर हा दोरावरचा प्रवास त्याच्या रोजनिशीमधील वाळलेले फूल बनणार होता. कुठल्या का झाडाचे असेना, विषारी का असेना, पण ते उजेडात धरुन त्याकडे पाहत मित्रांना ही गोष्ट सांगताना मजा येणार हे निश्चित...

आता त्याला तिच्यावर कुठलाही आरोप करण्याची इच्छा उरली नव्हती. ती सभ्य नव्हती पण वेश्याही नव्हती. तिला नंतर या प्रकरणातून सुटण्यासाठी तो तशी साक्षही देण्यास तयार होता. ती एक मूर्ख बाई होती. तिने त्या अखंड प्रवासाचे तिकीट काढले होते. त्याच्या सारखेच.

या सगळ्या प्रकारात तिची चूक होती हे गृहीत धरले तरी एकदा चूक म्हटली की चूकच ती.
खाली बघू नकोस त्याने स्वत:ला बजावले. खाली बघू नकोस !
कडा चढणारे गिर्यारोहक, उंच इमारतीवरील काचा पुसणारा, टि. व्ही च्या मनोर्‍यावर काम कराणारा, सर्कसमधील झोपाळ्यावरचा कसरतपटू...खाली पाहिले की खेळ खल्लास....

खाली बघू नकोस! त्याने परत परत स्वत:ला बजावले.....

२४

शेवटी त्याने त्या पोत्यांचा टप्पा गाठलाच !

त्याची नखे त्या वाळू भरलेल्या पोत्यात रुतली आणि त्याने तळहातांची काळजी न करता स्वत:ला वर खेचले. आता त्याला त्याच्या हाताची पकड थोडी सैल करायला हरकत नव्हती. खाली पडण्याची भीती नव्हती. पण त्याला त्याचे हात ताणता येत नव्हते... काही काळ तो तसाच त्या पोत्यांना धरुन बसला.

आजचा दिवस सेहेचाळीसावा. त्याच्या सुटकेचा. वारा भणाणत वहात होता. त्याने रांगण्यास सुरुवात केली. त्याच्या मानेला व चेहर्‍यावर वाळूचे सपकारे बसत होते. त्याने असल्या हवेचा विचारच केला नव्हता. त्या विवराच्या तळाशी समुद्राच्या लाटांचा अस्पष्टसा आवाज येत असे. त्याच्या हिशेबाने आता समुद्रावर शांत वातावरण असायला पाहिजे होते. आता या जोरदार वाहणार्‍या वार्‍यात धुके तग धरेल का हाही एक प्रश्न होताच... कदाचित त्या विवराच्या तळातून त्याला आकाश तसे दिसत असावे. कदाचित वार्‍याने उडणार्‍या वाळूमुळेच त्याला धुक्याचा भास झाला असेल...कारणे काहीही असोत पण परिस्थिती आता नाजूक होती हे खरे.

त्याने गडबडून वर पाहिले. मावळत्या प्रकाशात तो टेहळणीचा मिनार एका बाजूला झुकल्यासारखा दिसत होता. त्याला वाटले त्यापेक्षा तो बराच दूर होता. पण त्या माणसाकडे दुर्बिण असणार.. त्यांनी त्याला आधीच पाहिले तर नाही ?... नसावे, नाहीतर त्यांनी ती धोक्याची घंटा वाजवली असती...

तिने सांगितलेली हकिकत त्याला आठवली. तिने सांगितले होते की पश्चिमेला गावकुसाबाहेर अशाच एका विवराचा बंधारा कोसळला व त्यात ते घर अर्धवट गाडले गेले. त्यानंतर जे झाले ते फार भयानक होते. त्यानंतर पाऊस आला आणि वजनाने जवळजवळ दुप्पट झालेल्या वाळूत ते घर अक्षरश: एखाद्या काड्यापेटीसारखे चिरडले गेले. नशिबाने कोणी जखमी झाले नव्हते. पण दुसर्‍या दिवशी त्या कुटुंबाने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. धोक्याची घंटा वाजल्यापासून पाचच मिनिटाच्या आत त्या परत आणलेल्या स्त्रीचा आक्रोश गावकर्‍यांना रस्त्यावरुन ऐकू आला होता. त्यांच्या घराण्यातच अनुवंशिक वेडसरपणा होता अशी त्या बाईने नंतर कबुली दिली होती.
पण त्याला आता वेळ घालवून चालणार नव्हते. त्याने आत्मविश्वासाने मान वर केली आणि चहूबाजूला नजर फिरविली. वाळूच्या टेकाडांच्या घळीत लांबलांब सावल्या पडल्या होत्या. वातावरण गढूळ लाल रंगात न्हाले होते. त्या सावल्यातून आवाज करत घोंघावत येणार्‍या वाळूचे कण दुसर्‍या सावल्या गिळंकृत करीत होत्या... या उडणार्‍या वाळूच्या आवरणामुळे कदाचित त्यांना तो दिसणार नाही. त्याने मागे वळून पाहिले आणि तो अनिमिष नजरेने पहातच राहिला. त्या धुरकट वातावरणाला फक्त उडणारी वाळूच जबाबदार नव्हती. जमिनीतून हळूहळू धुके वर येत होते. काही ठिकाणे ते हवेने पसरत होते तर काही ठिकाणी वर चढत होते. त्याच्या विवरातील अनुभवावरुन त्याला वाळू बाष्प शोषून घेते हे माहीत होते पण ते एवढे प्रचंड असेल याची त्याला कल्पना नव्हती. एखादी आग विझल्यानंतर दिसते तसे दृष्य होते ते... अर्थात ते धुके एवढे काही दाट नव्हते पण त्याची आकृती लपण्याइतके निश्चितच दाट होते....

त्याने त्याच्या पट्ट्यात अडकविलेले जोडे काढून पायात घातले व दोर कमरेला गुंडाळला. त्याच्या शेवटी असलेली कात्री लागलीच तर शस्त्र म्हणून वापरता येण्यासारखी होती. सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याला अंधार पडेपर्यंत लपण्यासाठी जागा शोधायची होती.
पण आता पुढे जायला हवं. वाकूनच चालायला लागणार... जेथे उंचवटा आहे तेथे पळत गेले तरी चालेल. त्या तेथे जरा खोल घळ आहे. लपण्यासाठी योग्य दिसते. आणि तो आवाज कसला येतोय? अशुभ! नाही... त्यापेक्षा जरा चालण्याकडे लक्ष दे! उजवीकडचा उंचवटा इतका छोटा आहे की त्याच्या लक्षात आले नसते तर त्याला त्यांनी बरोबर टिपला असता.

दोन विवरांमधील पायवाट त्या वाळू गोळा करणार्‍यांमुळे एका रेषेत तयार झाली होती. त्या पायवाटेच्या उजवीकडील उतारावर बर्‍याच खुणा उमटल्या होत्या. दुसर्‍या विवरातील घराचे छप्पर कसेबसे दिसत होते. समुद्राच्या बाजूला असणार्‍या घरांमुळे गावाला संरक्षण मिळत होते. त्या भागातील विवरांची खोली तुलनेने बरीच कमी होती व वाळूपासून संरक्षण करणारे लाकडी कुंपणे अजूनही तग धरुन होती म्हणायची !

त्या कुंपणाच्या गावाच्या बाजूने ते त्या कुंपणाच्या आत बाहेर करु शकत होते. त्याने डोके वर करुन पाहिले. त्याची नजर गावाच्या मध्यापर्यंत पोहोचत होती. एखादा नकाशा समोर उलगडावा तसे ते गाव त्याच्यासमोर उलगडले. घरे, त्यांची पत्र्याची छपरे, काही घरे गवताने शाकारलेली. मधेच एक पाईनचे बेट होते आणि तेथेच काही तरी तलावासारखे दिसत होते आणि या असल्या केविलवाण्या भूगोलाला वाचविण्यासाठी समुद्राकाठी काही घरांना गुलामीत आयुष्य कंठावे लागत होते.
गुलामांची विवरे आता रस्त्याच्या डाव्या बाजूला राहिली. वाळूच्या गाड्यांनी त्या रस्त्याला अनेक फाटे फुटले होते आणि पुरलेल्या वाळूच्या पोत्यांमुळे कुठे विवर आहे हे उमगत होते. त्या विवरांकडे पाहताना त्याच्या काळजात एक कळ उठली. काही ठिकाणी त्या दोराच्या शिड्या वर काढून ठेवलेल्या आढळल्या तर काही ठिकाणी त्या तशाच आत सोडलेल्या दिसल्या. ‘बहुधा इथल्या गुलामांची स्वातंत्र्याची आस मेलेली दिसते.’ तो मनाशी पुटपुटला.

हे असे कसे जगता येते हे त्याला आता सहज समजत होते. तेथे स्वयंपाकगृहे होती ज्यात चुली पेटल्या होत्या. लिखाणाच्या टेबलांची जागा पुस्तकांनी भरलेल्या पेट्यांनी घेतली होती. तेथे स्वयंपाकगृहे होती, त्यात चुली होत्या व चुलीत जळणारी आग होती. काजळी धरलेली छपरे होती. तेथे चालणारी घड्याळे होती व बंद पडलेलीही. तेथे केकाटणारे रेडिओ होते तसेच मोडलेले. आणि या सगळ्यामधे होती विखरुन पडलेली नाणी, पाळीव प्राणी, मुले, लैंगिकता, प्रतिज्ञापत्रे, पिवळी पुस्तके, उदबत्त्या, तसबिरी.. छे ! अशक्यप्राय तोचतोचपणा. अर्थात एकसुरीपणाशिवाय आयुष्यात काय आहे. ह्रदयाचे ठोके हे एकसुरीपणाचे उत्कृष्ट उदाहरण... पण आयुष्यात ह्रदयापेक्षा अजून कितीतरी महत्वाच्या बाबी आहेत.

तेचढ्यात तो दचकला. त्याने चमकून वर पाहिले. काही विशेष नव्हते. एक उडणारा कावळा. त्याला आता तो पकडून त्यात भुसा भरता येणार नव्हता. अर्थात त्याने आता काय फरक पडतो? पदके, बक्षिसांची किंमत जेव्हा अविश्वसनिय स्वप्ने पुरी करण्याची स्वप्ने पहात असतो तेव्हाच असते म्हणा.
शेवटी तो गावाबाहेर आला. आता रस्ता एका वाळूच्या टेकडीच्या माथ्यावरुन जात होता आणि त्याला डावीकडे समुद्रही दिसत होता. हवेत कसलातरी दर्प भरुन राहिला होता. वारा त्याच्या कानापाशी फिरणार्‍या भोवर्‍यासारखा आवाज करीत घोंघावत होता. मानेवर टाकलेला त्याच पंचा एकदम हवेत फडफडला व त्याचे एक टोक त्याच्या चेहेर्‍यावर आपटले. त्याला वाटले होते त्याप्रमाणे येथे मात्र धुक्यात वर चढण्याइतकीही शक्ती नव्हती. एखादा अ‍ॅल्युमिनियमच्या कागद पसरल्याप्रमाणे ते पाणी चमकत होते. फक्त त्यावर तापलेल्या दुधावर पडतात तसल्या सुरकुत्या पडल्या होत्या. बेडकाच्या अंड्यांप्रमाणे सूर्य ढगांमधे लोंबकळत होता, जणूकाही त्याला खाली समुद्रात पडायचे नव्हते. क्षितिजावर जहाजांच्या काळ्या आकृत्या स्तब्ध दिसत होत्या.

बाकी सगळीकडे गुळगुळीत दिसणार्‍या वाळूच्या टेकड्या, त्यावर दिसणार्‍या नागमोडी रेषा, शेवटी उताराला जाऊन मिळत होत्या. पण असे नुसतेच चालत राहणे धोकादायक असू शकते. त्याने चिंतातूर होत मागे वळून पाहिले; नशिबाने त्या टेहळणी मिनाराच्या आणि त्याच्यामधे एक उंचवटा येत होता. तो हळूहळू त्याच्या चवड्यांवर उठून उभा राहिला. त्याच्या उजव्या बाजूच्या उतारावर त्याला वाळूत अर्धवट गाडलेली झोपडी दिसली. वार्‍याच्या दिशेला एक खड्डा पडला होता. एखाद्या महाकाय चमच्याने वाळू काढून घेतल्यासारखा...

‘लपायला चांगली जागा आहे.’ तो पुटपुटला. वाळूचा पोत शिंपल्याच्या आतील भागाइतका गुळगुळीत होता. एकंदरीत तेथे कोणी रहात असेल असे वाटत नव्हते पण त्याच्या वाळूत उमटणार्‍या पाऊलखुणांचे काय करायचे? त्याने उलट जाऊन त्या पाहिल्या तर त्या उडणार्‍या वाळूने पूर्ण झाकल्या गेल्या होत्या.
‘चला वार्‍याचा काहीतरी चांगला उपयोग होता तर.’
तो झोपडीच्या मागे जाण्यासाठी पाऊल उचलणार तेवढ्यात अचानक एक काळी आकृती त्या झोपडीतून बाहेर आली. एक लाल रंगाचा कुत्रा होता तो. त्याने त्या कुत्र्याला हाकलण्याचा प्रयत्न केला पण तो तेथेच त्याच्याकडे पहात उभा राहिला. त्याचा एक कान फाटला होता व नजर त्याच्यावर रोखलेली. मधेच त्याने त्याच्यावरुन येणारी हवा हुंगली. त्याचा भुंकण्याचा तर विचार नाही ना? त्याला भुंकू तर दे.. ‘या कात्रीने त्याच्या कवटीला भोकच पाडतो.’
तो मनात म्हणाला. त्याने खिशातील कात्रीवरची पकड अजून घट्ट केली पण तो कुत्रा फक्त त्याच्याकडे पहात उभा होता. गुरगुरणे नाही आणि काही नाही. ‘तो जंगली कुत्रा तर नव्हता? ते म्हणतात जो कुत्रा भुंकत नाही तो जास्त धोकादायक असतो. काहीतरी खाण्याच्या वस्तू आणायला हव्या होत्या.’ खाण्याची आठवण झाल्यावर त्याला त्याने लपविलेल्या पोटॅशियम सायनाईडच्या बाटलीची आठवण झाली. ‘जाऊ देत आता’ तो मोठ्याने म्हणाला. त्याने ती अशा ठिकाणी लपवली होती की तिला ती सापडणे शक्यच नव्हते. त्याने हात पुढे करुन एक बारीक शीळ घातली. त्याच्या शिळेला उत्तर म्हणून त्याने आपला खालचा ओठ मुडपला. बहुधा त्याला त्याच्यात फारसा रस नसावा. त्याला आश्चर्य वाटले, असला कसला कुत्रा हा पण त्याचा जबडा चांगलाच रुंद होता. ‘त्याला पहिल्या फटक्यातच लोळवला पाहिजे...’

त्या कुत्र्याने अचानक दुसरीकडे पाहिले, त्याच्या मानेवरील कातडे खाली सरकले. काहीच विशेष नसल्यासारखे तो कुत्रा कंटाळल्यासारखा चालू लागला. त्याच्या इच्छाशक्तीपुढे त्याने मान तुकवली. म्हणजे त्याची मन:शक्ती अजून खचलेली दिसत नाही. नाहीतर त्या कुत्र्याने त्याच्या नजरेपुढे माघार घेतलीच नसती. तो त्या खड्ड्यात घसरत उतरला व त्या उतारावर पडून राहिला. त्याचे आता वार्‍यापासून संरक्षण होत होते व तो कुत्राही त्या उडणार्‍या वाळूमुळे त्रस्त होत तेथून नाहिसा झाला होता. त्या जंगली कुत्र्याने तेथे आसरा घेतला होता याचाच अर्थ गावकरी तेथे फारसे येत नसावेत. त्या कुत्र्याने जाऊन गावातील कार्यालयात त्याच्याबद्दल सांगितले नाही तर तो तसा सुरक्षित होता. घामाच्या धारा लागल्या होत्या. तरीपण त्याला बरे वाटत होते. किती शांतता होती तेथे. त्याच्या डोक्यावर टांगती तलवार होती पण त्याला आता त्याची विशेष काळजी वाटत नव्हती. आश्चर्य म्हणजे त्याच्या घड्याळाच्या टिकटिक आवाजाची त्याला कटकट होत होती. मोबियसने त्या परिस्थितीचे आकलन खालीलप्रमाणे केले असते.
- मित्रा तू तुझ्या पळून जायच्या मार्गाचा विचार करतो आहेस पण तू तुझ्या अंतिम ध्येयावर लक्ष केंद्रीत करत नाहीस.
आणि त्याने हे ताबडतोब मान्य केले असते.
"बरोबर आहे. पण ध्येय आणि ते मिळविण्याचा मार्ग याच्यात एवढा काटेकोर फरक करणे आवश्यक आहे का? गरजेनुसार त्यांच्या व्याख्या वापरल्या तर चालतील की.''
- नाही नाही. आजिबात चालणार नाही. तुम्ही काळ उभ्या अक्षावर घालवत नाही. तो आडव्या अक्षावर व्यतीत करता.
"का बरे? तो उभ्या अक्षावर व्यतीत केला तर काय होईल ?''
- तुमची ममी होईल.

त्याने हसत जोडे काढले. ‘हंऽऽऽऽ खरे दिसते.’ तो मनाशीच हसला. त्याच्या बोटात जमलेली वाळू आणि घामाने तो वैतागला. त्याने मोजे काढले आणि पायाचे आंगठे जरा ताणले. त्याच्या बोटात हवा खेळल्यावर त्याला जरा बरे वाटले. जेथे प्राणी राहतात तेथे असा घाणेरडा वास यायलाच पाहिजे का? प्राण्यांना फुलांसारखा सुंदर वास असता तर किती मस्त वाटले असते.. शी ! तो वास त्याच्याच बुटाचा होता. ते उमगल्यावर त्याची चिडचिड जरा कमी झाली.

त्या झोपडीचा दरवाजा वाळूत गाडला गेला होता त्यामुळे आतले काही दिसत नव्हते. तेथे पूर्वी एखादी विहीर असावी काय? शक्य आहे. विहिरीचे वाळूपासून संरक्षण करण्यासाठी त्यावर एखादी झोपडी बांधणे सहज शक्य होते. अर्थात या असल्या ठिकाणी पाणी सापडणे अशक्यच होते म्हणा. त्याने आत डोकवण्याचा प्रयत्न केला... यावेळी मात्र त्याला कुत्र्याचा वास आला. प्राण्याचा वास हा कुठल्याही तत्वज्ञानाच्या पलिकडे असतो. त्याचा एक समाजवादी मित्र काय म्हणायचा ते त्याला आठवले. तो म्हणायचा ‘मला कोरियन माणूस आवडतो पण त्याचा वास आवडत नाही.’ पण जर काळ आडव्या अक्षावर पुढे सरकत असेल तर तो किती भरभर पुढे जातो हे त्याने सिद्ध करुन दाखविले पाहिजे. आशा आणि अस्वस्थपणा...मुक्त व उतावीळपणा...या आशा निराशेच्या खेळाने तो अधिकच अस्वस्थ झाला. त्याने तोंडावर पंचा टाकला आणि त्या वाळूत आडवा झाला.

वार्‍याने त्याच्या तोंडावरील पंचा जरा बाजूला उडाला. डोळ्याच्या कोपर्‍यातून त्याला वाळूच्या सोनेरी चमकणार्‍या टेकड्या दिसल्या. त्या टेकड्यांचे काठ नागमोडी वर चढत एकदम अंधारात नाहिसे होत होते. या भूभागात काहीतरी अमंगल असल्याची त्याला जाणीव झाली आणि तो शहारला. त्याला माणसांची जरुरी भासू लागली.
तसा तो देखावा निसर्गरम्य होता त्यात शंकाच नाही. पर्यटकांना आकर्षित करण्याइतका तो निश्चितच नयनरम्य होता. एखाद्या पर्यटन व्यवसायात अनुभव असलेला माणूस याचे सोने करुन दाखवेल. पण त्याला अगोदर या जागेची जाहिरात करावी लागेल. जहिरातीशिवाय एखादी माशीही येथे येणार नाही. ही अशी जागा येथे आहे हे लोकांना कळले नाही तर ती असली काय आणि नसली काय.. कदाचित तो पोस्टकार्ड विकणारा माणूस याच कामासाठी येथे आला असावा. पण तो येथेच राहिला आणि सत्यनाश झाला असणार. या सौंदर्याचा खरा अर्थ काय? निसर्गनियमाचे काटेकोर पालन म्हणावे का निसर्गाचा निर्दयपणा? तसे नसेल तर निसर्ग माणसाच्या समजुतींना का सारखे धक्के देत असतो?

कालपर्यंत तो याच देखाव्याचा द्वेष करीत होता....

तरीपण त्या विवरातील आयुष्य आणि हा नयनरम्य देखावा या दोन विरुद्ध अर्थाच्या गोष्टी आहेत, असे म्हणता येत नाही. नयनरम्य देखावे हे नेहमीच माणसाला सुखावतात असे म्हणता येत नाही. उदा. त्सुनामीचा देखावा. वाळू स्थिरतेच्या विरुद्ध आहे हे त्याचे म्हणणे म्हणजे अगदी काही वेडेपणा नव्हता...एक १/८ मि.मी.चा वाळूचा कण.. त्याचा प्रवाह... एक असे जग, जेथे अस्तित्वच अनेक अवस्थांचे बनले आहे. दुसर्‍या शब्दात सांगायचे तर वाळूचे सौंदर्य हे मृत्युत दडलेले आहे. वाळूच्या अमानवी संहारक शक्तीमागे मृत्युचेच सौंदर्य आहे, असे नाही वाटत ?

अचानक प्रकाश नाहिसा झाला. आसमंत त्याच्या डोळ्यासमोर काळोखात बुडाला. वारा पडला व धुके जोरदारपणे वरती येऊ लागले. कदाचित सूर्य त्यामुळेही झाकोळला गेला असेल. मग आता वाट कशाची बघतोस?
‘चालू लाग...’ तो स्वत:ला उद्देशून पुटपुटला.....

क्रमशः
जयंत कुलकर्णी.

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

सुटकेचा प्रयत्न. वाचतो आहे. पुभाप्र.

बाहेर पडला बाबा एकदाचा..आता घरी पोचनार की परत विवरात जाणार..

संजय क्षीरसागर's picture

27 Feb 2017 - 10:44 pm | संजय क्षीरसागर

त्यांना सोडवायला जाईल परत, त्याचा नेम नाही.

मार्मिक गोडसे's picture

28 Feb 2017 - 3:09 pm | मार्मिक गोडसे

लेखाच्या शीर्षकावरून तरी वाटत नाही की त्याची वाळूच्या विहीरीतून सुटका होईल.