मोबियस प्रकरणे भाग -२ प्रकरणे १३-१४

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
17 Feb 2017 - 8:13 am

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

ते त्याने केलेही असते सहन. पण तेवढ्यात त्या विवराच्या कडेने निळसर प्रकाश आत घरंगळत आला आणि सगळे चित्र बदलले. जसा एखादा स्पंज पाणी शोषून घेतो त्याप्रमाणे झोप त्याला आकर्षित करु लागली आणि तो झोप येऊ नये म्हणून झोपेशी झगडू लागला. हे चक्र कुठेतरी भेदायलाच हवे होते. त्याला आता भीती वाटू लागली होती की ही वाळू आता काळ थांबविते की काय.

१३
एखाद्या पेटत्या वातीखालचे मेण वितळावे तसा तो तिच्या स्पर्षाने वितळत चालला होता. त्याचे अंग घामेजले. घड्याळ बंद पडल्यामुळे त्याला किती वाजले ते कळत नव्हते. या साठ फूट उंचीच्या विहिरीच्या बाहेर अजूनही प्रकाश असेल पण येथे तळाशी आत्ताच संधिप्रकाश पसरल्यासारखे वाटत होते.
ती अजूनही झोपलीच होती. तिच्या हालचालीवरुन तिला बहुधा स्वप्न पडत होते. त्याने तिला झोपेतून उठविण्याचा प्रयत्न केला पण तो फसला. त्याच्या बाबतीत बोलायचे तर त्याची झोप केव्हाच उडाली होती.

त्याने उठून ताज्या हवेत चक्कर मारली. तो झोपलेला असताना त्याने तोंडावर घेतलेला पंचा बहुतेक खाली पडला होता कारण त्याच्या कानामागे, नाकावर व ओठांच्या कडेला वाळू साचली होती. ती झटकून त्याने डोळ्यात औषध घातले व पंचाच्या एका टोकाने ते झाकले. दोन तीन वेळा हे केल्यावर त्याला डोळे उघडता आले. पण हे औषध दोनतीन दिवसात संपल्यावर काय? हा खरा प्रश्न होता. त्या अगोदरच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा त्याने मनोमन ठरवून टाकले. त्यांचे अंग इतके जड झाले होते की त्याला वाटले तो पत्र्याचे कपडे घालून एखाद्या लोहचुंबकावर झोपला आहे की काय! बाहेरुन येणार्‍या प्रकाशाच्या तिरीपीत त्याने वर्तमानपत्रातील अक्षरे वाचण्याचा निष्फळ प्रयत्न केला. पण त्याला गिचमिडीशिवाय काही दिसेना.

खरे तर त्याने तिला वर्तमान पत्र वाचून दाखविण्यास सांगायला हवे होते. त्याने एका दगडात दोन पक्षी मेले असते. एकतर ती जागी राहिली असती व त्याचे वर्तमानपत्रही वाचून झाले असते. त्याऐवजी त्याने तिला जागे ठेवण्याचा प्रयत्न केला व त्यामुळे सगळा विचका झाला होता.

त्याने त्याच्या निद्रानाशाला परत एकदा शिव्या हासडल्या. त्याने आकडे उलट्या क्रमाने मोजून झोप येते आहे का ते पाहिले पण छे! त्याने त्याच्या शाळेचा रस्ता आठवला, त्याला माहीत असलेल्या सर्व किटकांची नावे व वर्गवारीची उजळणी केली पण या सर्व औषधांचा काहीच उपयोग होत नव्हता. झोप येत नाही या विचारानेच त्याची झोप उडाली. त्या विवराच्या तोंडाशी घोंघावणार्‍या वार्‍याचा आवाज त्याला स्पष्ट ऐकू येत होता. त्यातच भर पडली वाळूवर आपटणार्‍या फावड्याच्या आवाजाची व कुत्र्यांच्या भुंकण्याची. दूरवरुन येणारे कुजबुजणारे आवाज मेणबत्तीच्या ज्योतीसारखे थरथरत त्याच्या कानावर येत होते त्यामुळेही कदाचित त्याला झोप येत नसावी. अखंड पडणार्‍या वाळूने तर त्याला वेड लागण्याची वेळ आली होती. पण त्याला ते सगळे सहन करणे भाग होते.

ते त्याने केलेही असते सहन. पण तेवढ्यात त्या विवराच्या कडेने निळसर प्रकाश आत घरंगळत आला आणि सगळे चित्र बदलले. जसा एखादा स्पंज पाणी शोषून घेतो त्याप्रमाणे झोप त्याला आकर्षित करु लागली आणि तो झोप येऊ नये म्हणून झोपेशी झगडू लागला. हे चक्र कुठेतरी भेदायलाच हवे होते. त्याला आता भीती वाटू लागली होती की ही वाळू आता काळ थांबविते की काय.

वर्तमानपत्र नेहमीप्रमाणे कंटाळवाण्या बातम्यांनी भरले होते. खरेच आठवडा झाला का मागचे वर्तमानपत्र वाचून? तो संभ्रमात पडला. कारण त्याला त्या बातम्यांमधे काहीच फरक वाटेना. वर्तमानपत्र म्हणे जगाकडे पाहण्याची खिडकी असते. हे खरे असेल तर या खिडकीची काच धुरकट झाली होती हे निश्चित.

महानगरपालिकेत कर खात्यात भ्रष्टाचार; शिक्षणसंस्थांचे झाले कारखाने; कामगार संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक-मसूदा जाहीर होणार; आईने केला दोन मुलांचा गळा आवळून खून; वाहनांची चोरी म्हणजे आधुनिक रहाणीमानाने दिलेले आधुनिक गुन्ह्यांना दिलेले उत्तेजन; पोलिसांना सतत तीन वर्षे अनोळखी भेट; ऑलिंपिकचा निधी; दोन मुलींचा भर बाजापेठेत खून; वायदे बाजारावर मंदीची पकड.......

एकही महत्वाची बातमी नाही. हंऽऽ भ्रमाच्या विटांनी बांधलेला संभ्रमाचा मिनार. जर आयुष्य फक्त महत्वाच्या गोष्टींनी भरलेले असते तर आयुष्य काचेच्या घरासारखे झाले असते. पण दैनंदिन आयुष्य त्या वर्तमानपत्रातील बातम्यांसारखे आहे म्हणून त्याला तेवढेच महत्व दिलेले बरं.
अचानक त्याची नजर एका लेखावर पडली आणि तो चकित झाला.
बांधकामावर झालेल्या एका अपघातात एक मजूर वाळूच्या ढिगाखाली गाडला गेला. जवळच्याच इस्पितळात त्याला मृत म्हणून घोषित करण्यात आले. चौकशी करणार्‍या तज्ञांनी वाळूच्या ढिगातील खालच्या बाजूची वाळू प्रमाणाबाहेर काढल्यामुळे तो ३० फूट उंचीचा वाळूचा ढिगारा कोसळला व त्यात तो मजूर गाडला गेला होता......इ..इ...

नालायक! मी वाचावे म्हणूनच त्यांनी हे वर्तमानपत्र अगदी आठवणीने टाकले असणार. तरीच त्यांनी त्याची विनंती इतकी सहजासहजी कशी मानली याचे त्याला आश्चर्य वाटत होतेच. त्याचे कारण त्याला आत्ता कळले. नशीब त्यांनी त्याच्यावर लाल शाईने वर्तुळ काढले नव्हते. वाळूच्या पिशव्यांनी मारहाण केली की शरीरावर कसल्याही खुणा न उमटवून देता मारहाण करता येते हे त्याला आठवले. वाळू वाहिली तरी ती पाण्यापेक्षा वेगळी असते.....तुम्ही पाण्यावर पोहू शकता पण वाळू तुम्हाला गिळते आणि घुसमवटून ठार मारते....

एकंदरीत काय, त्याचा परिस्थितीबद्दलचा अंदाज पूर्णपणे चुकलाच म्हणायचा.....

१४
पुढची योजना आखण्याआधी त्याला थोडा अवधी पाहिजे होता. तिला वाळू उपसण्यासाठी जाऊन चार तास झाले असतील. वाळू वर खेचणारेही काम संपवून त्यांच्या ट्रककडे निघाले होते. त्याने कानोसा घेतला. आता ते परत येणार नाहीत याची खात्री पटल्यावर त्याने अंगावर कपडे चढविले. ती कंदील बरोबर घेऊन गेली असल्यामुळे त्याला त्याचा टॉर्च वापरावा लागला. त्याने वाळूने बरबटलेले बूट झटकले, पँट पायमोज्यात खोचली आणि आपले किटक गोळा करण्याचे साहित्य एकत्र करुन पटकन सापडतील अशा ठिकाणी दरवाजाजवळ ठेवले. वाळूमुळे त्याच्या चालण्याचा आवाज येत नव्हता हे एक बरे होते.

ती कामात गढून गेली होती. तिची वाळू उपसतानाची हालचाल सफाईने होत होती. श्वास व हालचालीत एक प्रकारची लय होती. तिच्या प्रत्येक हालचालीबरोबर तिची लांबट सावली तिच्या पायात नाचत होती. तो घराच्या कोपर्‍यावर लपला. त्याने श्वास रोखला. त्याच्या हातात त्याने एक पंचा ताणून धरला होता. दहा आकडे मोजून झाल्यावर, ती वाळू उपसण्यासाठी पुढे वाकली की तो तिच्यावर झेप घेणार होता.

अर्थात यात धोका नव्हता अशी त्याने स्वत:ची समजूत करुन घेतली नव्हती. काही सांगता येत नाही, त्याच्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन हे झाल्यावर एका तासात बदलला असता व ते जास्त कठोर भूमिका घेऊ शकले असते. शिवाय त्या म्हातार्‍याने त्याला सरकारी माणूस समजून चिंता व्यक्त केली होती याचा अर्थ ते कुठल्यातरी सरकारी तपासणी अधिकार्‍याची वाट पहात होते. तसे असेल तर गावकर्‍यांत दुफळी माजेल व काही जण त्याला येथून बाहेर काढून गावाबाहेर सोडावे असा हट्टही धरु शकतील. पण आता तो आधकारी अर्ध्या तासातही येऊ शकत होता किंवा एका वर्षानेही. दोन्हीची शक्यता ५०% होती. यावर मात्र तो पैज लावायला तयार नव्हता.
जर मदत येण्याची शक्यता असेल तर त्याला वाटले की आजाराचे ढोंग चालू ठेवणे फायद्याचे ठरेल. पण याच मुद्द्यावर तो गोंधळून गेला. तो एका स्वतंत्र राष्ट्राचा नागरीक होता आणि त्याने मदतीची अपेक्षा करणे हे काही गैर नव्हते. कित्येक नागरीक नाहिसे होतात किंवा रहस्यमयरित्या हरवतात तेव्हा तेही हीच अपेक्षा करत असणार. जर त्याचे स्वरुप गुन्हेगारी नसते तोपर्यंत पोलिसही त्यात विशेष लक्ष घालत नाहीत.

पण त्याच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी होती. तो मदतीची याचना करीत होता, मदतीची वाट पहात होता. त्याच्या रिकाम्या खोलीकडे पाहताच काहीतरी गडबड आहे असे कोणालाही वाटले असते. अर्धवट उघडलेले पुस्तक, खुंटीवरील कार्यालयात जाण्याच्या शर्टात सुट्टे पैसे, बँक पासबूक ज्यातून कित्येक दिवस पैसे काढल्याची नोंद नाही, अर्धवट आवरलेले त्याचे किटक पकडायचे साहित्य, पोस्टात टाकण्यासाठी तयार ठेवलेले तसेच पडलेले पत्र यावरुन तेथे कोणीतरी रहात होते याची निश्चितच कल्पना आली असती.

पण ते पत्र! त्या पत्रानेच सगळा घोळ केला. त्याच्या स्वप्नात तो खरे बोलला होता पण आता तो स्वत:शी उगीचच वायफळ वाद घालत होता. का? हरवलेल्या वस्तूंचे अस्तित्वच नष्ट होते आणि येथे तर त्यानेच स्वत:च्याच हाताने स्वत:चा गळा घोटला होता.

त्याने त्याच्या या सुट्टीबद्दल कारण नसताना गुप्तता बाळगली होती. त्याने त्याच्या जवळच्या मित्रांनादेखील तो कुठे जाणार ते सांगितले नव्हते. ना त्याने कोणाचा निरोप घेतला होता. त्याच्या मित्रांना त्यांच्या कंटाळवाण्या, बेसूर आयुष्यावरुन खिजवण्यासाठी याहून उत्तम मार्ग कुठला असणार? पण तो सोडल्यास इतर मित्रांमधे निराशा आणि धुरकट रंग सोडून इतरही लाल निळे असे रंग होते. हा विचार मनात येताच त्याने स्वत:ची निर्भत्सना केली. त्या विचारात तो बुडून गेला.

फक्त कथा कादंबर्‍यातून व चित्रपटातूनच वसंत रम्य असतो. नाहीतर वास्तवात....एखाद्या गावातील रविवार म्हणजे एखाद्या वर्तमानपत्राच्या अग्रलेखाखाली डुलक्या काढणारा माणूस.. चित्रवाणीवरील एखादी धारावाहिका..फळांचे डबाबंद रस.. थरमॉस...बोटीने फेरफटका...त्यासाठी लागलेल्या रांगा..फेसाळलेले समुद्राचे किनारे... व त्यावर लागलेले मेलेल्या माशांचे ढिग आणि मग शेवटी खिळखिळी झालेली, सामानाने ओथंबलेली मॉलमधील ट्रॉली... सगळ्यांना हे असेच वाटते पण मुर्खपणा मान्य करण्याचे कोणात धाडस नसते हेच खरे. मग वास्तवाच्या कॅनव्हासवर अवास्तव मानसिक उधाणाची चित्रे रेखाटायची. नाहीतर दाढीचे खुंट वाढलेल्या बापाने तक्रार करणार्‍या मुलांना रविवार किती छान होता हे म्हणायला लावणे..केविलवाणा मत्सर.. इतरांच्या आनंदाचा.

हे इथेच थांबते तर ठीक होते. मग प्रकरण फारसे गंभीरपणे घेण्याची जरुरी नव्हती. मोबियसची प्रतिक्रिया जर त्याच्या इतर सहाध्यायांसारखीच असती तर कदाचित तो आपल्या मतावर एवढा ठाम राहिला नसता.

त्याने त्या बेडकासारखे डोळे असणार्‍या माणसावर भरवसा ठेवला होता. तो कायम उत्साही व चेहरा धुवून आल्यासारखा दिसे. त्याला कामगार संघटनेत भयंकर रस होता. एकदा त्याने त्याच्याशी बोलताना आपले अंतरंग त्याच्याजवळ उघड केले होते. खरे तर त्याने आजवर तसे केले नव्हते पण त्याला त्याच्याशी बोलावेसे का वाटले कोणास ठाऊक!

“तुला काय वाटते? मला तर सध्याची शिक्षणपद्धती जीवनाचा अर्थ सांगण्यास कुचकामी आहे असे वाटते !”

“अर्थ म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे तुला?”

“दुसर्‍या शब्दात सांगायचे झाल्यास, ही भ्रमनिरास करणारी शिक्षणपद्धती जे नाही, त्यावर विश्वास ठेवण्यास शिकविते. त्यामुळे मला वाळूत फारच रस आहे. तिचे स्वरुप जरी घन असले तरी तिच्यात काही द्रवगतिक गुणधर्म आहेत.”

ते ऐकल्यावर तो मांजरासारखे पोक काढून पुढे वाकला पण त्याच्या चेहर्‍यावरचे भाव तसेच होते. त्याची ही कल्पना त्याने एकदम झिडकारुन टाकली नाही. कोणीतरी माणसाला मोबियसच्या पट्ट्याची उपमा दिली होती. मोबियसचा पट्टा म्हणजे एका कागदाच्या पट्टीला एक पिळ पाडून तयार केलेले एक वेटोळे. या वेटोळ्याला ना आगा असतो ना पिछा ! ज्याने कोणी याचे नाव मोबियस ठेवले होते त्याला असे तर म्हणायचे नव्हते ना की या माणसाचे कामगारसंघटनेचे काम आणि खाजगी आयुष्य हे मोबियसच्या वर्तुळासारखे आहे. त्यावेळी त्या माणसाचे कौतुक वाटल्याचे त्याला चांगलेच आठवत होते. पण त्याला त्याच वेळी त्याने त्याच्याकडे तुच्छतेने एक कटाक्ष टाकलेलाही त्याला आठवला.

“म्हणजे वास्तववादी शिक्षणपद्धती म्हणायचे आहे का तुला?”

“नाही ! मी वाळूचे उदाहरण दिले कारण शेवटी हे जग वाळूसारखे आहे. जेव्हा वाळूचा स्थिर तत्व म्हणून तुम्ही विचार करता तेव्हा वाळूची मूलतत्वे समजण्यास अत्यंत अवघड. वाळू वाहते असे नसून हे वाहणे म्हणजेच वाळू हे बर्‍याच जणांच्या लक्षात येत नाही. माफ करा मला ते यापेक्षा जास्त चांगल्याप्रकारे मांडता येत नाही.”

“तुला काय म्हणायचे आहे ते समजले मला. प्रत्यक्षात तुम्ही सापेक्षतावाद टाळू शकत नाही. हो ना?”

“ नाही. तुम्हीच मग वाळू होता. बघताही वाळूच्या डोळ्यांनी. एकदा मेल्यावर मग मरणाची भीतीही रहात नाही व काळजीही वाटत नाही”

“मला वाटते तू आदर्शवादी असावास. तू तुझ्या विध्यार्थ्यांना घाबरतोस. हो ना ?”

“हंऽऽऽ हो कारण माझे विद्यार्थी मला वाळूसारखे वाटतात.”

यावर तो मनापासून त्याच्या दंतपंक्ती दाखवित हसला. या सगळ्या विजोड संभाषणात त्याला एकदाही त्रास झालेला दिसला नाही. त्याचे डोळे त्याच्या सुरकुत्यांमधे लपले. त्यालाही त्याचे हसू आवरले नाही. तो खरेच मोबियसच्या वेटोळ्यासारखा होता. चांगल्या व वाईट दोन्ही अर्थाने. चांगल्या बाजूसाठी त्याला गुण द्यायलाच हवेत.
पण मोबियसबद्दल बोलताना त्याने पण त्याच्या सुट्टीचा हेवा केला होता. मोबियसचे वेटोळे आणि हे वागणे कितीतरी अंतर होते त्यात... तो ते बघून थोडासा निराश झाला पण खूषही झाला.

चांगुलपणाशी नाहीतरी लोक जरा फटकूनच वागतात. म्हणूनच त्याला त्याची चेष्टा करण्यात आनंद वाटला.

आणि ते पत्र..परत न घेता येणारे. त्याच्या परवाच्या स्वप्नात जाणवलेली ओढ.... त्यामागे निश्चितच काहीतरी कारण होते.

त्याच्या आयुष्यातील पहिल्या स्त्रीवर त्याचे अजिबात प्रेम नव्हते असे म्हणणे धाडसाचे होईल. त्यांच्यातील गूढ नात्यामुळे त्याला तिच्याबद्दल खात्री वाटत नसे. त्याने एखादे म्हणणे मांडले की ती बरोबर त्याविरुद्ध मत मांडणार हे निश्चित. बरे ती म्हणेल तसे म्हटले तर ती बरोबर त्याविरुद्धही बोलण्यास कमी करायची नाही. एखाद्या सीसॉसारखे त्यांचे नाते खालीवर होत असे. पण त्यांचे प्रेम कमी झाले होते असे म्हणण्यापेक्षा ते गोठले होते असे म्हणणे जास्त संयुक्तिक झाले असते.
आणि मग त्याने अचानक तिला पत्राने त्याच्या सुट्टीबद्दल कळविण्याचे ठरविले होते. त्यात त्याने तो कुठे जाणार आहे हे कोणालाही सांगितले नाही हेही लिहिले होते. अर्थात या त्याच्या रहस्यमय सुट्टीचा त्याच्या मित्रांवर जेवढा परिणाम झाला असता तेवढा तिच्यावर झालाच नसता याची त्याला खात्री होती. पण शेवटी ते पत्र म्हणजे मूर्खपणा असे समजून ते तेथेच त्याच्या टेबलावर टाकून तो तेथून निघाला होता.

हे पत्र म्हणजे त्याने त्याच्या सुट्टीला लावलेले कुलूप होते जे फक्त तोच उघडू शकत होता. पण कोणाचीतरी नजर त्यावर पडेलच. जणू काही त्याने तो स्वत:च स्वत:च्या मर्जीने नाहिसा झाला आहे असे लिहून ठेवले होते. एखाद्या गुन्हेगाराने इतरांसमोर आपले ठसे पुसून त्या गुन्ह्यात त्याचा सहभाग होता हे सिद्ध करण्यासारखेच होते ते.....
त्याच्या सुटकेची आशा आता मावळत चालली होती. सुटकेच्या आशा शंकांच्या विषात विरघळत चालल्या होत्या. आता कोणीतरी दरवाजा उघडेल अशी आशा न करता तो फोडणे एवढाच एक मार्ग उरला होता.....

त्याने आपले पाय दुखेपर्यंत वाळूत रोवले व तो पुढे वाकला. दहा आकडे मोजून झाल्यावर तो तिच्यावर झेप घेणार होता. तेरा आकडे मोजून झाले, पण त्याच्या मनाची अजूनही तयारी होत नव्हती.

शेवटी खोल श्वास घेऊन त्याने पुढे झेप घेतली....

क्रमशः
जयंत कुलकर्णी.

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

गणामास्तर's picture

17 Feb 2017 - 12:04 pm | गणामास्तर

पुढे काय होईल या उत्सुकतेने गडबडीने प्रत्येक भाग उघडून पाहतोय.
परंतु कथा काहीशी एकसुरी झाल्यासारखी आणि पुढे सरकतंच नसल्यासारखं वाटतंय :(

संजय क्षीरसागर's picture

17 Feb 2017 - 3:10 pm | संजय क्षीरसागर

स्टॅमीना कितीये यावर ते सगळं अवलंबूने. म्हणजे वाचकांना किती वाळू उपसावी लागणार ते ठरणारे . तरी तुमचा पेशन्स बराचे, मी फक्त शेवटच्या दोन ओळी वाचतो आणि लगेच कळतं !

मूळ लेखकाला जे सांगायचंय ते तुमच्या अनुवादातून पुरेपूर पोहोचत आहे.

पुभाप्र.

पैसा's picture

17 Feb 2017 - 6:40 pm | पैसा

वाचत आहे.

शलभ's picture

17 Feb 2017 - 8:43 pm | शलभ

पुभाप्र.

मार्मिक गोडसे's picture

18 Feb 2017 - 10:08 am | मार्मिक गोडसे

मस्त कथा.

अस्वस्थामा's picture

20 Feb 2017 - 5:51 am | अस्वस्थामा

वाचतोय काका.. उत्सुकता पण वाढतीय. फक्त काही ठिकाणी थोडं कन्फ्युजन झालं या भागात. खासकरुन या परिच्छेदात :

एकदा त्याने त्याच्याशी बोलताना आपले अंतरंग त्याच्याजवळ उघड केले होते. खरे तर त्याने आजवर तसे केले नव्हते पण त्याला त्याच्याशी बोलावेसे का वाटले कोणास ठाऊक!

किंवा

त्याची ही कल्पना त्याने एकदम झिडकारुन टाकली नाही. कोणीतरी माणसाला मोबियसच्या पट्ट्याची उपमा दिली होती. मोबियसचा पट्टा म्हणजे एका कागदाच्या पट्टीला एक पिळ पाडून तयार केलेले एक वेटोळे. या वेटोळ्याला ना आगा असतो ना पिछा ! ज्याने कोणी याचे नाव मोबियस ठेवले होते त्याला असे तर म्हणायचे नव्हते ना की या माणसाचे कामगारसंघटनेचे काम आणि खाजगी आयुष्य हे मोबियसच्या वर्तुळासारखे आहे.

एकंदरीत इथे 'त्याने', 'तो', 'याने' यात गोंधळ उडतोय. अर्थ लावताना भरपूर गडबड होतेय असं वाटलं. म्हणजे पुढचं काहीच माहित नसेल तर इथे काय चाललंय हे लगेच लक्षात येत नाही. :)