ती पूर्णनग्नावस्थेत झोपली होती.
डोळ्यातील पाण्यामुळे तिची ती आकृती त्याला अंधुकशी दिसत होती. ती एका चटईवर पाठीवर झोपली होती. फक्त डोके सोडून तिचे सर्व शरीर पूर्णपणे नग्न होते. तिने तिचा डावा हात तिच्या पोटावर ठेवला होता. जे अवयव सर्वसाधारणत: झाकले जातात ते पूर्णपणे नग्न होते आणि जे उघडे टाकले जातात ते झाकलेले होते. डोके बहुधा तिने वाळूपासून वाचण्यासाठी झाकले असावे. पण या विरोधाभासाने तिचे ते नग्न शरीर उठून दिसत होते.
मोबियस
७
त्याला एखाद्या गंजलेल्या झोक्याच्या कड्यांचा आवाज येतो तशा कोंबड्याच्या आरवाने जाग आली. जागसुद्धा कशी अप्रसन्न ! त्याने मनगटावरील घड्याळाकडे नजर टाकली. त्याच्या अंदाजाप्रमाणे पहाट झाली असावी पण सकाळचे सव्वा अकरा वाजून गेले होते. तेथे खाली त्या बिळात सूर्याचा प्रकाशही पोहोचताना अर्धमेला होत होता.
तो ताडकन उठला. त्याच्या चेहर्यावर डोक्यावर, छातीवर साठलेली वाळू एखादे वस्त्र गळून पडावे तसे सळ्ळकन खाली पडली. त्याच्या नाकाखाली आणि ओठाखाली त्याच्या घामामुळे थोडी वाळू चिकटून बसली होती. ती त्याने पालथ्या हाताने झटकली व डोळे हळूच उघडले. त्याबरोबर त्याच्या डोळ्यातून पाणी आले. पण त्या पाण्याने डोळ्याखालची वाळू काही निघाली नाही. त्यासाठी पाणीच पाहिजे होते. तो पाण्याच्या रांजणाकडे पावले टाकणार तेवढ्यात त्याला त्या झोपलेल्या स्त्रीच्या श्वासोच्श्वासाचा आवाज ऐकू आला. त्याने तिकडे नजर टाकली व आवंढा गिळला.
ती पूर्णनग्नावस्थेत झोपली होती.
डोळ्यातील पाण्यामुळे तिची ती आकृती त्याला अंधुकशी दिसत होती. ती एका चटईवर पाठीवर झोपली होती. फक्त डोके सोडून तिचे सर्व शरीर पूर्णपणे नग्न होते. तिने तिचा डावा हात तिच्या पोटावर ठेवला होता. जे अवयव सर्वसाधारणत: झाकले जातात ते पूर्णपणे नग्न होते आणि जे उघडे टाकले जातात ते झाकलेले होते. डोके बहुधा तिने वाळूपासून वाचण्यासाठी झाकले असावे. पण या विरोधाभासाने तिचे ते नग्न शरीर उठून दिसत होते.
तिच्या सर्व शरीरावर वाळूचा एक थर जमा झाला होता ज्याने तिच्या शरीराच्या कमनीय, नाजूक रेषा ठळकपणे उठून दिसत होत्या. जणू एखादा वाळूचा पुतळाच. नशिबाने पाण्याचा रांजण भरलेला होता. चूळ भरुन तोंड धुतल्यावर त्याला बरं वाटलं. आयुष्यात प्रथमच त्याला पाण्याचे एवढे कौतुक वाटले. त्याने पाणी पिऊन परत त्या स्त्रीकडे नजर टाकली पण त्याला अधिक जवळ जावेसे वाटेना. ती वाळूचा लेप चढलेली स्त्री, स्पर्षविरहीत, अशीच आकर्षक दिसत होती.
जसा दिवस पुढे जाऊ लागला तसे काल रात्री जे काही झाले तो त्याला एक भ्रम वाटू लागला. पण गप्पा मारण्यास तो चांगला विषय हो़ऊ शकला असता म्हणा. त्याने परत एकदा सगळीकडे नजर फिरविली व त्याच्या मनातील आठवणी त्या जागेशी जुळविल्या. तो एकदम सामान आवरायला लागला. त्याच्या कपड्यांवर भयंकर वाळू साठली होती पण त्याबद्दल विचार करण्यात त्याला आता वेळ दवडायचा नव्हता. त्याचे जोडेही वाळूखाली गाडले गेले होते. त्या स्त्रीचा निरोप घ्यावा असे त्याला क्षणभर वाटले पण त्याने तो विचार मनातून झटकला. त्याला तिला एका रात्रीच्या राहण्याचे पैसे द्यायचे होते पण त्याने विचार केला, गावात गेल्यावर त्या काल भेटलेल्या माणसाजवळ ते पैसे दिले तर जास्त बरे होईल. तो पटकन बाहेर आला.
सूर्याच्या प्रकाशात त्या विवराच्या कडा तापल्या होत्या. हळुहळु त्या विवराची जमीनही तप्त होत होती. त्याने पटकन त्या तेजापासून आपले डोळे दुसरीकडे फिरवले. त्या वाळूच्या भिंतीकडे पहात असताना त्याला इतर गोष्टींचा विसर पडला.
अरे बापरे! ती कालची दोराची शिडी गायब होती. ती मधेच असलेली वाळूची पुरलेली पोती मात्र त्याला स्पष्ट दिसत होती. जागा चुकण्याची शक्यताच नव्हती. त्याने याच जागेवर ती शिडी कालच पाहिली होती. त्याच्या मनात विचार आला, ‘वाळूने फक्त शिडी गिळली की काय?’ त्याने त्या भिंतीकडे धाव घेतली व तो दोन्ही हातांनी ती भिंत चाचपडू लागला. त्याचा हात लागताच ती वाळू खाली घसरु लागली. एवढी मोठी शिडी अशी कशी गायब होऊ शकते? निराश होत त्याने त्या भिंतीच्या उताराकडे नजर टाकली.
चढायला कुठेतरी जागा असेल या आशेने त्याने त्या घराभोवती दोन तीन चकरा मारल्या. शेवटी तो त्या घराच्या छपरावर चढला. तेथून समुद्राच्या बाजूला त्या विवराचा काठ जवळजवळ तीस एक फूट तरी उंचीवर असावा. शिवाय तो चढ सगळ्यात जास्त तिथेच होता. मधेच आलेले वाळूचे ढेकूळ त्या भिंतीच्या भुवईसारखे दिसत होते. धोकादायक. केव्हाही पडेल..
त्या मानाने पश्चिमेची भिंत शंकूच्या आतील भागासारखी वाटत होती व तिने जमिनीला अंदाजे ५० अंशाचा कोन केला होता. त्याने काळजीपूर्वक त्या भिंतीवर पाऊल रोवले. कष्टप्रद वाटत असले तरी अशक्य वाटत नव्हते. पहिली चार पाच पावले टाकल्यावर त्याची पावले त्या वाळूत रुतू लागली. थोड्याच क्षणात त्याचे पाय त्या वाळूत गुडघ्यापर्यंत रुतले. त्यातून पाय उचलण्याची त्याच्याकडे ताकदच नव्हती. त्याने परत एकदा गुडघ्यावर रांगत चढण्याचा प्रयत्न केला. तापलेल्या वाळूत त्याचे हात होरपळत होते. घामाने व वाळूने त्याचा चेहरा माखून त्याला दिसेनासे झाले. थोड्याच वेळात त्याच्या पायात गोळे आले व त्याला एकही पाऊल पुढे टाकवेना.
त्याने चढण्याची धडपड थांबविली, जरा दम घेतला व मागे वळून किती अंतर कापले ते पाहिले. त्याला धक्काच बसला त्याने दहा फूट अंतरही कापले नव्हते. एवढे प्रयत्न करुन त्याने ‘आपण काय मिळवले’ असा विचार केला. शिवाय तो भिंतीच्या ज्या भागावर चढाई करत होता, ती वरती जास्त सरळसोट होती. त्याला वर चढायचे होते पण त्याची सर्व शक्ती त्या वाळूत पाय रोवण्यातच खर्च होत होती. भिंतीच्या त्या जाड भुवईने आता त्याला त्यावरची भिंत दिसतही नव्हती. त्याने धडपडत पुढे जायचा प्रयत्न केला खरा पण त्या धडपडीत त्याच्या पायाखालची वाळू निसटली.
त्याचे पाय तेथून सुटले आणि तो सरळ त्या विवराच्या तळाशी आदळला. त्याच्या डाव्या खांद्यातून एखादी काटकी तुटावी असा आवाज झाला पण आश्चर्य म्हणजे त्याला एवढ्या काही वेदना झाल्या नाहीत. थोडा वेळ त्या भिंतीवरुन वाळू घसरत असल्याचा आवाज आला व नंतर सगळे शांत झाले. त्याला एवढे काही लागले नसणार! अजूनतरी घाबरुन जायचे काही कारण नव्हते.
त्याने जोरात किंकाळी फोडायची इच्छा मनात दाबून टाकली व तो खुरडत घरात परतला. ती अजूनही झोपली होती. तशीच तिथेच. त्याने तिला प्रथम हळुवारपणे हाक मारली. काहीच परिणाम न झालेला बघून त्याने आवाज चढवला. उत्तर देण्याऐवजी तिने त्रासिक चेहरा करत फक्त तिची कूस बदलली.
ती हलल्याबरोबर तिच्या अंगावरुन वाळू खाली घसरली. तिचे गोरे खांदे, हात, कंबर व पोट पूर्ण उघडे पडले. पण त्याचे लक्ष याहून महत्वाच्या विषयाकडे लागले होते. तो तरातरा तिच्याकडे चालत गेला व त्याने तिच्या चेहर्यावरचा टॉवेल खस्सकन् ओढला. तिच्या चेहरा कसल्यातरी डागांनी भरुन गेला होता. वाळूचे तलम वस्त्र ल्यालेल्या तिच्या शरीरापेक्षा तिचा चेहरा त्याला भयानक वाटला. काल रात्रीचे गोरेपण निश्चितच तिच्या रंगरंगोटीचे असणार. ती आता निघून गेल्यावर तिच्या चेहर्यावर त्याचे धब्बे दिसत होते.
शेवटी तिने तिचे डोळे अर्धवट उघडले व प्रकाशामुळे किलकिले केले. तिच्या खांद्याला धरुन तिला गदागदा हलवत तो घाईघाईने म्हणाला,
“ती शिडी नाहिशी झालीए! येथून बाहेर पडायचे म्हणजे ती शिडी पाहिजेच.”
तिने तिचा टॉवेल हातात घेतला व अचानक स्वत:च्या थोबाडीत मारुन घेतल्या. त्याबरोबर तिच्या चेहर्यावरची वाळू खाली ओघळली. त्याच्याकडे पाठ करुन तिने गुडघे छातीखाली दुमडले व ओणवी झाली. त्याला हा निर्लज्जपणा वाटला. त्याच्या रागाचा स्फोट झाला व तो जोरात ओरडला,
“ही काही चेष्टा चाललेली नाही. ती शिडी मला मिळाली नाहीतर मी काय करेन सांगता येत नाही. बर्याबोलाने ती शिडी मला दे. कुठे लपविली आहेस? बस झालं आता. शिडी! लवकर !”
यावर तिने काहीच उत्तर दिले नाही. तिने त्या आसनातच तिची मान हलविली.
त्याच क्षणी त्याला त्याच्या प्रश्नातील फोलपणा जाणवला आणि त्याच्या अंगावर काटा आला, त्याचा श्वास थांबला. ती शिडी दोराची होती. जरी ती त्याला मिळाली असती तरी तो ती कशी उभी करणार होता? याचा अर्थ तिने बिचारीने ती काढली नव्हती. कोणीतरी ती वरुनच ओढून घेतली असणार. त्याचा दाढी न केलेला चेहरा अजूनच बापूडवाणा झाला. एवढे सगळे झाले तरी ती गप्पच होती.
तिच्या वागण्याचा व गप्प राहण्याचा त्याने भलताच अर्थ काढला. त्याला विश्वास ठेवायचा नव्हता पण त्याला आतून वाटणारी भीती खरी ठरली होती. ती शिडी त्यांनी तिच्याच संमतीने काढली होती. ती त्यांना सामील होती. हे उमगताच त्याला वाटले की त्याच्यासमोर ती त्या अवस्थेत लाजून उभी नव्हती तर एखाद्या गुन्हेगाराने फटके खाण्यास तयारीत रहावे तशी उभी होती. किटकांनी त्याला फसवून कुठे आणून सोडले होते! येथून त्याची सुटका नव्हती. त्याला एखाद्या पिंजर्यातील उंदरासारखे वाटू लागले.
तो एखाद्या बंडखोरासारखा उसळून उभा राहिला. घाईघाईने दरवाजाकडे जात त्याने बाहेर नजर टाकली. बाहेर वारं सुटलं होतं. सूर्य माथ्यावर होता. उष्णतेच्या लाटा जिवंत असल्यासारख्या तप्त वाळूतून उसळत होत्या. त्याच्या डोक्यावर ती वाळूची भिंत आकाशाला भिडत त्याच्या धडपडीची चेष्टा करीत होती. उष्ण हवा त्याच्या शरीरात घुसत होती. तापमान परत वर चढू लागले.
तो वेड लागल्यासारखे ओरडू लागला. काय ओरडत होता त्याचे त्यालाच कळत नव्हते. त्या दु:स्वप्नातून जागे झाल्यावर त्याला कोणीतरी त्या विवराच्या तळातून बाहेर फेकेल अशी आशा त्याला वाटत होती. पण असल्या आरडाओरड्याची सवय नसलेल्या त्याच्या नरड्यातून फारच केविलवाणे आवाज निघत होते.
अचानक एका भयंकर आवाजाने त्याचे ओरडणे बंद पाडले. तिने काल सांगितल्याप्रमाणे त्या वाळूच्या भिंतीची पुढे आलेली भुवई ओलसरपणा नष्ट झाल्यामुळे कोसळली होती. जणू काही त्या घरानेच जखमी झाल्यामुळे ह्रदयद्रावक किंकाळी फोडली. त्या जखमेतून वाळू भळाभळा वाहत खाली येत त्याच्या पायाशी जमा होत होती. तो थरथर कापू लागला त्याच्या जिभेखाली लाळ गोळा झाली, त्या वाळूच्या ढिगाखाली त्याचेच शरीर सापडल्यासारखी.
हे दिवास्वप्न तर नाहीना ? हे असे होऊच शकत नाही. ज्या माणसाकडे विम्याची कागदपत्रे आहेत, ज्याने सगळे कर वेळच्यावेळी भरले आहेत, जो इमानेइतबारे नोकरी करतोय, ज्याला कुटुंब आहे त्याला असे उंदराच्या पिंजर्यात उंदरासारखे पकडण्याची यांना कोणी परवानगी दिली? त्याचा त्याच्यावरच विश्वास बसेना. कुठेतरी काहीतरी चुकले आहे. निश्चितच! कोणीतरी चूक केली असणार, अशी अपेक्षा करण्यापलिकडे तसेही तो काही करु शकत नव्हता म्हणा! मी कोणाचे काही वाईट केले नाही मग माझ्यावरच अशी वेळ का यावी असा अतिसामान्य प्रश्नही त्याच्या मनात येऊन गेला.
प्रथम त्यांना त्याला असे वागवायचे काहीही कारण नव्हते. तो म्हणजे काही बैल नव्हता ज्याला मनाविरुद्ध घाण्याला लावता येते. कामासाठी त्याचा उपयोग जर करायचा नव्हता तर याचा अर्थ काय असावा? त्या बाईवर नसते ओझे लादायचा प्रकार होता तो!
पण त्याला कशाचीच खात्री वाटत नव्हती. त्याला वेढणार्या भिंती जणूकाही त्याचा गळा घोटण्यास तयार होत्या. त्यांच्याकडे बघताना त्याला त्याच्या मगाच्या प्रयत्नांची आठवण झाली. ती आठवण येताच त्याच्या अंगावर शहारा आला. षंढपणाच्या भावनेने त्याचे शरीर लुळे पडले. वाळूने त्या गावाची पार वाट लावली होती. इतर गावांचा दिनक्रम येथे पाळलाच जात नव्हता. अगदी जगावेगळे होते हे गाव. त्याला आता सगळ्याचा संशय येऊ लागला. प्रथम म्हणजे ते रॉकेलचे रिकामे डबे व फावडे त्याच्यासाठीच तयार करण्यात आले होते. त्याला कल्पना न देता ती दोराची शिडी तेथून काढण्यात आली होती हेही खरे होते. सगळ्यात संशयास्पद होते म्हणजे त्या बाईचे गप्प बसणे. या सगळ्या प्रकाराबद्दल तिने जराही खेद व्यक्त केला नव्हता ना स्पष्टीकरण दिले होते. तिने शरणागती पत्करुन सगळे सहन करण्याचे ठरविलेले दिसत होते. तिच्या अशा गप्प राहण्यानेच त्याच्यावर हा अन्याय होत होता. काल ती जेव्हा म्हणाली की त्याचा मुक्काम मोठा असणार आहे, ते खरे होते तर !
तेवढ्यात वाळूचे वादळ सुरु झाले.
अपेक्षेप्रमाणे तो त्या झोपडीत परतला. आल्याआल्या तो सरळ तिच्याकडे गेला. ती अजूनही तशीच ओणवी बसली होती. त्याने त्याचा डावा हात वर उचलला. त्याचे डोळे रागाने चमकत होते. पण त्याचा हात खाली आणताना तो थबकला. या नग्न बाईला एखादी चापटच पुरे होईल का? त्याने विचार केला. ती जणू शिक्षा होण्याचीच वाट पहात होती. ती एकदा झाली की तिचा गुन्हा सिद्ध होणार होता. जवळच तयार झालेल्या वाळूच्या ढिगावर तो बसला. त्याने चेहरा आपल्या हातात लपविला व विचार करु लागला. ‘पण तिने उत्तरे दिलीच नाहीत तर?’ त्याला असे हतबल हो़ऊन चालणार नव्हते.
हे असे चालायचे नाही. त्या बाईला या सगळ्याचा जाब विचारावा लागेल. काही प्रश्नांची उत्तरे मिळवावी लागतील. कदाचित त्याला जरा आक्रमक भूमिका घ्यावी लागली असती, पण तिने उत्तरे दिली नसती तर? तसे झाले असते तर मात्र कठीण होते. तिची ती जीवघेणी शांतता त्याचा जीव घेणार असे स्पष्ट दिसत होते. स्वत:चा बचाव न करता येणार्या एखाद्या गुन्हेगारासारखी ती तशीच बसून होती.
तिचे ते नग्न शरीर एखाद्या जनावरासारखे वाटले त्याला. जर तिला हात लावला असता तर ती तशीच एका बाजूला लवंडली असती. तिला हात लावण्याच्या विचारानेच त्याला अपराधी वाटू लागले. तिला हात लावला तर त्याचा तिच्याशी बोलण्याचा त्याचा हक्क तो गमावून बसणार असे क्षणभर त्याला वाटले.
तेवढ्यात त्याच्या पोटातून कळ आली.........
८
लघवी झाल्यावर त्याला जरा बरे वाटले. तो तसाच तेथे थोडावेळ उभा राहिला. निराश झाला. थोड्या वेळाने त्याच्या परिस्थितीत काय फरक पडणार होता? तशी आशा करण्यातही काही अर्थ नव्हता. पण त्याला घरात जावेसे वाटत नव्हते. जेव्हा त्याने तिला तिथेच एकटे सोडले तेव्हा तिच्याबरोबर राहण्याचा धोका त्याच्या लक्षात आला होता. त्याला तिची भिती वाटत नव्हती पण ती ज्या आसनात बसली होती त्याचा त्याने धसका घेतला होता. एवढी असभ्यता त्याने त्याच्या आजपर्यंतच्या आयुष्यात पाहिली नव्हती. आत जाण्यात अर्थ नव्हता.
काही किटकांना जेव्हा धोका जाणवतो तेव्हा ते मेल्यासारखे पडून राहतात. फीट आल्यासारखे. जर एखाद्या विमानतळाचा ताबा वेड्या माणसांकडे गेल्यावर काय होईल तसे. तो बिलकुल हलत नव्हता. त्याला वाटत होते की तो हलला नाही म्हणजे सारे जगही हालत नाही. थंडीत बेडूक जसा पडून राहतो तसा.
त्याच्या विचारांच्या शृंखलेत, त्याच्या लक्षात आले नाही की सूर्याचे किरण जास्त तीव्र होत चालले आहेत. प्रकाशाची तिरीप चुकविण्यासाठी तो पुढे वाकला. त्याचवेळी त्याने एका झटक्यात त्याच्या शर्टाची कॉलर पकडली आणि सर्व ताकदीनिशी तो शर्ट डोक्यातून बाहेर काढला. शर्टाची वरची तीन बटणे तुटून हवेत उडाली. हाताला लागलेली वाळू झटकताना त्याला ती काल रात्री काय म्हणाली ते आठवले, ‘वाळू पूर्णपणे कधीच कोरडी नसते. तिच्यात एखाद्या वस्तूचा भुगा करण्याइतकी आर्द्रता नेहमीच शिल्लक असते.’ शर्ट काढल्यावर त्याने त्याच्या पँटचा पट्टा थोडा सैल केला व पँटमधे हवा खेळू दिली. यात एवढा गोंधळ घालायचे काही कारण नव्हते. तो विचार जसा त्याच्या मनात आला तसा गेलाही. ‘हवेच्या सान्निध्यात येताच वाळूतील आर्द्रतेची जादू नष्ट झालेली दिसते!’ तो मनाशी म्हणाला.
त्याचवेळी त्याला त्याची चूक उमजली. कदाचित त्याने तिच्या नग्नतेचा लावलेला अर्थ चुकीचा नसेल कशावरुन? अर्थात तिच्या मनात त्याला भुरळ पाडण्याची छुपी इच्छा असण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. कदाचित असे नग्न राहण्याची इथली एक सामान्य पद्धतही असू शकते. ती दिवसाच बिछान्यात झोपण्यासाठी शिरली होती. ती दिवसा झोपत असेल तर तिचे झोपताना नग्न होणे तो समजू शकत होता. नैसर्गिक होते ते. आणि शिवाय अशा तापलेल्या वाळूत! तो जर तिच्या जागी असता तर त्यानेही शक्य असते तर कदाचित नग्न अवस्थेत झोपणेच पसंत केले असते.
हा विचार मनात येताच त्याच्या मनावरील ताण बराच कमी झाला. त्याच वेळी वार्याची झुळूक आली. त्यानेही त्याच्या मनावर फुंकर घातली. उगाचच घाबरुन जाण्यात काय अर्थ होता? जगाच्या इतिहासात कितीतरी माणसांनी सिमेंटकाँक्रीटच्या भिंती आणि लोखंडाचे दरवाजे फोडले आहेत. कुलपाच्या नुसत्या दर्शनाने त्याची शेळी होणार नव्हती. ते कुलूप उघडे आहे की लावलेले हे तरी पहायला हवे! शांत झाल्यावर वाळूत पाय घासत घासत तो घराकडे गेला. यावेळी मात्र त्याने शांत राहून तिच्याकडून जमेल तेवढी माहिती काढून घायचे ठरविले. उगीच आरडाओरडा करण्यात अर्थ नव्हता. त्याने ती अधिकच गप्प व्हायची. शिवाय तिचे ते गप्प बसणे कदाचित ती नग्नावस्थेत पकडली गेल्यामुळेसुद्धा असू शकेल....
क्रमशः
जयंत कुलकर्णी.
ता.क. आता शेजारील चित्रावरुनही आपण कादंबरीवर जाऊ शकता जेथे अनुक्रमणिका इ. सोयी आहेत.
प्रतिक्रिया
12 Feb 2017 - 8:29 pm | तुषार ताकवले
पुलेशु
12 Feb 2017 - 8:29 pm | तुषार ताकवले
पुलेशु
12 Feb 2017 - 9:43 pm | पैसा
वाचत आहे. जास्तच गुंतागुंतीचे होत चालले आहे प्रकरण!
13 Feb 2017 - 12:08 am | जव्हेरगंज
छान चालले आहे!!
सगळी प्रकरणे एकदमच दिल्यास फार बरे होईल!!
क्रमश: मुळे लिंक तुटत आहे. एका दमात कादंबरी वाचायची इच्छा आहे.