कांचीवरम! रेशीम धाग्यापासून साडी विणण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले नगर!
'फुलांमधे जति, पुरूषांमधे विष्णू, स्त्रियांमधे रंभा आणि नगरांमध्ये कांची' असे महाकवी कालिदासही संस्कृतामध्ये ज्या नगराचे वर्णन करतो ते कांचीवरम.
भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं आहे, पण तरीही सामान्याना ब्रिटीशांपासून मिळालेलं स्वातंत्र्य खर्या अर्थाने उपभोगता येत नाहीच. याचं मुख्य कारण म्हणजे सावकार-जमीनदारांनी सामान्य लोकांची चालवलेली पिळवणूक. व्यापारी लोकं स्वतःचा नफा वाढवण्यासाठी मजूरांना अगदी कमी मजूरीत प्रचंड काम करवून घेत आहेत. त्यांच्या विरोधात सामान्य मजूरांना संघटीत होऊन आवाज उठवता येत नाही. भांडवलशाहीच्या वाढत जाणार्या शोषणातून कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी कम्युनिस्ट चळवळीची सुरूवात कांचीवरममध्ये होते आणि रशियन क्रांतीच्या साम्यवादाची बीजे इथून पुढे भारतात रूजली जातात.
व्यंकटेश! कांचीवरममधला एक अतिकुशल विणकर. रेशमापासून साडी विणणार्या वडीलांना लहानपणापासून पाहताना आपणही लग्न करून आपल्या बायकोला रेशमी साडी नेसवून घरी न्यायचे असे स्वप्न उराशी बाळगलेला व्यकंटेश...
मात्र घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. वडीलांच्या अंतिम संस्कारावेळी त्याची ही खंत आणखी तीव्रतेने समोर येते. रिवाजानूसार अंतिम संस्कारावेळी प्रेताच्या अंगावर रेशमाचे वस्त्र टाकल्यावर त्याला मोक्ष प्राप्त होतो हे जाणून असलेला व्यंकटेश स्वतःच्या गरिबीला दोष देत मुकाट्याने वडीलांचा अंतिम संस्कार करतो.
दरम्यान नगरातला कुशल विणकर असल्याने गावातला मोठा व्यापारी आपल्या मुलीच्या लग्नाची साडी व्यंकटेशला विणायला देतो. आणि व्यंकटेशही आपले कौशल्य पणाला लावत एक अतिशय सुंदर साडी त्या व्यापार्याला विणून देतो. त्याने विणलेल्या साडीवर व्यापारी आणि त्याच्या घरचे तर खुष होतातच पण त्यांच्याकडे आलेला ब्रिटीश पाहुणाही साडीचे अप्रतिम विणकाम पाहून व्यंकटेशची प्रशंसा करतो.
आयुष्यात सगळं काही व्यवस्थित सुरू असताना व्यंकटेशला कन्यारत्न प्राप्त होते. कन्येच्या नामकरणावेळी संपूर्ण गावासमोर तो "लेकीला लग्नात रेशीम साडी नेसवून पाठवणी करणार" असं वचन देतो. संपूर्ण आयुष्यभर मेहनत करूनही रेशीम साडी आपल्या आवाक्याबाहेर आहे हे जाणून असलेला गावातील विणकर समाज आणि त्याची बायकोही या वचनाने अवाक होतात. पण व्यंकटेश आपल्या वचनावर ठाम असतो. एक बाप आपली अपूर्ण राहीलेली इच्छा आपल्या लेकीच्या माध्यमातून पूर्ण करू पाहतो. त्यात लेकीवर असलेल्या प्रेमासोबतच आयुष्यभर उराशी बाळगलेले स्वप्न सत्यात आणण्याची धडपडही दिसते.
परिस्थिती नसतानाही मुलीच्या लग्नात रेशीम साडी कुठून आणणार या बायकोच्या प्रश्नावर व्यंकटेश तिला आयुष्यभराची साठवलेली कमाई काढून दाखवतो आणि लग्नापर्यंत पैसे साठवल्यास साडी नक्की घेऊ शकू असा विश्वास जागवतो. पण दुर्दैवाने साठवलेले सगळे पैसे त्याला बहीणीस सांभाळण्याची असमर्थता दाखवणार्या तिच्या नवर्याला द्यावे लागतात. नेहमी सकारात्मक विचार करणार्या व्यंकटेशचा इथून पुढे खरा प्रवास सुरू होतो. ते सगळं इथे सांगणं चुकीचं ठरेल, त्यामुळे तो सगळा रंजक प्रवास स्वतः पाहणं तुम्हाला नक्की आवडू शकतं.
प्रियदर्शनचं दिग्दर्शन क्लास आहे एकदम, चित्रपटाची कथाही त्यानेच लिहिलीये! भूत आणि वर्तमानकाळाचा अगदी बेमालुमपणे मिलाफ करत ही गोष्ट त्याने शेवटाकडे नलीये. चित्राची परीणामकारक भाषा प्रियदर्शनाला चांगल्याप्रकारे अवगत आहे यासाठी यातलाच एक प्रसंग इथे देतो...पोलीसांच्या पाठलागाच्या प्रसंगात व्यंकटेश आणि त्याचा मित्र एके ठिकाणी लपून राह्यलेत...पार्श्वभागी कम्युनिस्ट लेखकाचा पाठलाग करत जाणारे पोलीस, त्यांच्या शिट्यांचा आवाज, त्याला अनुरूप असे चढत जाणारे पार्श्वसंगीत...शेवटी बंदुकीच्या बाराचा आवाज आणि घाबरलेले ते दोघे! अफलातून आहे ते सगळं!! बेस्ट फिल्मच्या राष्ट्रीय पुरस्काराबरोबर इतरही अनेक महत्वाचे पुरस्कार प्रियनला या चित्रपटासाठी मिळाले होते.
दिग्दर्शनाबरोबर अभिनय, छायाचित्रण, संगीत आदी सगळ्याच आघाड्यांवर हा चित्रपट पर्फेक्ट जमून आलाय. प्रकाशराजचा राजच्या अभिनयाची उंची पाहायची असेल तर ती यात पाहावी इतका अप्रतिम अभिनय त्याने केलाय. शेवटच्या प्रसंगात लेकीच्या प्रेतावर रेशीम कपडा टाकतानाची त्याची धडपड आणि शेवटी ढळलेलं मानसिक संतुलन!! व्यंकटेशची मुख्य भुमिका अक्षरश: जगला आहे प्रकाशराज. त्याच्या बायकोच्या आणि मुलीच्या भुमिकेत अनुक्रमे श्रिया रेड्डी आणि शम्मू या दोन्ही अभिनेत्रींना समान लांबीच्या भुमिका मिळाल्या आहेत आणि त्यातही त्यांचा अभिनय नैसर्गिक वाटावा असाच केलाय. प्रियदर्शनने कलाकारांची निवड अगदी अचूक केली आहे हे व्यंकटेशच्या मित्राच्या भुमिकेतल्या अभिनेत्याला पाहून पटते. चित्रपटातले एकमात्र 'सोनेका झुला है, मखमलका टिला है' हे गाणेही श्रवणीय आहे यात वादच नाही. अतिशय शांत वाटलं ते गाणं ऐकताना.
मला यात सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे चित्रपटाचे छायाचित्रण आणि अगदी बारीक बारीक गोष्टींमधूनही डिटेल्ड केलेलं कला दिग्दर्शन. सुरूवातीचा जेलमधला प्रसंग, त्यानंतरचा सेफीया टोनमधला बस स्टॉपवरचा पाऊस, वर्तमान काळातल्या मुसळधार पावसात छोट्या प्रसंगातून आठबणारा भूतकाळातला प्रसंग, व्यंकटेशचे निराश मन दर्शित करणारे मावळतीचे रंग, मंदीरातले कामगारांचे प्रसंग, जत्रेतले प्रसंग. सांगायला गेलं तर चित्रपटातल्या प्रत्येक फ्रेमबद्दल लिहावं लागेल इतकं ते सगळच्या सगळं अगदी प्रचंड सुंदर आहे.
गेल्या काही दिवसांपासून ज्या सिनेमाचा सगळीकडे विषय सुरू आहे त्या सैराटमधल्या बाप-लेकीच्या नात्याविषयी झालेली चर्चा...अभ्याचा त्या वैफल्यग्रस्त बापाच्या नजरेतून लिहीलेला धागा. आज सकाळीच ऐकलेल्या संदिप-सलीलच्या "दमलेल्या बाबाची कहाणी" या संपूर्ण गाण्यामुळे सहजच बाप-लेकीच्या नात्याविषयी माझ्या मनात असंख्य विचार येवून त्या नात्याचे अनेक पदर अलगद उलगडू लागले आणि साहजिकच कांजीवरम आठवला. वडील मुलीच्या नात्याला विविध बाजू असतात आणि या सगळ्या बाजू कांचीवरम आपल्याला व्यवस्थितपणे उलगडून दाखवतो. नातेसंबधांवर आजवर पाह्यलेल्या एकुण चित्रपटात हा सर्वोत्तम चित्रपट आहे असं मी मानतो.
बाबा म्हणजे सोनचाफ्याच्या सुगंधासारखा आयुष्यभर लेकीच्या मनात दरवळणारा, पण इथे परिस्थितीने हतबल झालेला बाबा लेकीचे ते आयुष्यच संपवून टाकतो. पण तरीही त्याचे त्याच्या लेकीवर जीवापाड प्रेम असते.
प्रतिक्रिया
21 Jun 2016 - 5:24 pm | आदूबाळ
काय छान परीक्षण लिहिलंय! ये बात!
21 Jun 2016 - 5:24 pm | विअर्ड विक्स
ओळख आवडली. हिंदीत आहे का ?
21 Jun 2016 - 5:26 pm | किसन शिंदे
मी हिंदीतच पाह्यला.
21 Jun 2016 - 5:26 pm | अभ्या..
अरे हा कांचीवरम मला माहीतच नाही पिक्चर. पाहायलाच हवा रे.
बादवे आमच्या किसन्याने दमदार पुनरागमन केले आहे त्याबद्दल त्याला एक डबल सोलापुरी चादर भेट देण्यात येत आहे.
21 Jun 2016 - 5:28 pm | किसन शिंदे
इंग्रजी कांचीचे मराठीत येताना कांजी होते ना रे अभ्या? माहिती नाही म्हणून विचारतोय.
21 Jun 2016 - 5:31 pm | अभ्या..
आमच्या येथील साड्याच्या दुकानावर मी कांचीवरम टाईप करतो. ऍक्चुअल उच्चार माहीत नाही रे.
21 Jun 2016 - 10:18 pm | प्रदीप साळुंखे
होय,मराठीत कांची चे कांजी होते.
21 Jun 2016 - 10:21 pm | किसन शिंदे
माहितीसाठी धन्यवाद सर.
22 Jun 2016 - 10:31 am | सस्नेह
मूळ शब्द 'कांचीपुरम'. मराठीत 'कांजीवरम' म्हणतात.
21 Jun 2016 - 5:32 pm | रेवती
चित्रपटाची ओळख आवडली. दहा एक मिनिटे सिनेमा पाहिला. कामे छान झालियेत. शेवट अस्वस्थ करणारा आहे.
21 Jun 2016 - 5:35 pm | नीलमोहर
परीक्षण वाचून पहावासा वाटतोय कांचीवरम.
साधारण अशाच थीमवर अजूनही कथा वा चित्रपट आहे बहुतेक.
21 Jun 2016 - 6:22 pm | एस
छान लिहिलेय.
21 Jun 2016 - 6:42 pm | मुक्त विहारि
बोले तो एकदम झक्कास...
21 Jun 2016 - 7:44 pm | अजया
फार छान लिहिलंय परीक्षण. चित्रपट बघावासा वाटायला लागलं.
21 Jun 2016 - 8:26 pm | प्रचेतस
परिक्षण आवडलं.
पण..पण... सुरुवातीलाच काही घोळ झालाय का?
कांचीवरम नावाच्या शहराचं नाव मी तरी कुठे ऐकलेलं नाही. ते शहर कांचीपुरम आहे. कांचीपुरम नगरीत बनलेल्या रेशमाला कांची सिल्क अथवा कांचीवरम सिल्क असे म्हणतात.
कालिदासाच्या श्लोकाचा मूळ संस्कृत संदर्भ देऊ शकाल का? त्याला अवंती नगरी(उज्जैन) सर्वात आवडती होती( पाहा मेघदूत). असे असताना तो कांचीपुरमला सर्वश्रेष्ठ म्हणेल हे सर्वथैव अशक्य वाटते.
21 Jun 2016 - 8:39 pm | किसन शिंदे
ते कांचीपुरमच आहे रे. मी चित्रपटात आलेल्या शब्दांच्या अनुषंगाने तो शब्द लिहिलाय.
21 Jun 2016 - 8:54 pm | प्रचेतस
तो कालिदासाचा मूळ श्लोक तरी द्या हो की तो ही केवळ चित्रपटाच्या अनुषंगानेच आहे?
21 Jun 2016 - 10:12 pm | अभ्या..
एका मिपाकर वल्लीच्या घरातील एक आगामी संवाद. अवांतर आहेच, पण.....
सौवल्ली: ए प्रचू डारलिंग आईक ना.
मिपावल्ली: थांब ग, जरा ह्या शिलालेखाचा अर्थ लावू दे
सौवल्ली : मला किनई कांचीवरम घ्यायचीय
मिपावल्ली: कांचीपूरम आहे ग ते. कालिदासाला माहीत नव्हती ती.
सौवल्ली: असू दे. नाहीतर पैठणी घेऊयात का?
मिपावल्ली : अगं प्रतिष्ठाण म्हण ग. एकेकाळची राजधानीं होती ती.
सौवल्ली: बरं जाऊ दे, एक निदान जीन्स तर
मिपावल्ली: जिन्न सत्ते भन नाट्ट कंफत्तबल म्हण, असे कोरलाय कारल्याच्या लेण्यांवर. तेव्हा पण होत्या बर जीन्स.
सौवल्ली: निदान एक कानातले तरी?
मिपावल्ली: दीदारगंज यक्षीच्या कानातले कर्णभूषण पाहिलेस का? अप्रतिम अगदी.
सौवल्ली: शी बाई, बरं राजधानीला जाऊयात का जेवायला आज?
मिपावल्ली: काय ते जेवण, राष्टरकूटांच्या काळात ताट कसे भरगच्चं असे. ओदन काय, मालपूवे काय, पायस काय.
सौवल्ली: प्रचू डार्लिंग असे रे काय करतोस. चल ना जरा बाहेर तर जाऊ.
मिपावल्ली : अगं थांब ना, बघ ना ह्या शिलालेखावर काय कोरलाय काही कळेना.
सौवल्ली: प्रचू, हा पाटा आहे माझ्या आईने दिलेला. घालू क्या डोस्केमें? शिलालेख म्हणे.
मिपावल्ली: चला चला, कुठे जायचे? काय घ्यायचंय?
सौवल्ली : दगड आहे नुसता, तो पण शालीवाहनकालीन.
.
.
.
(आमचे मित्र हलकेच घेतील ह्यात शंका नै)
21 Jun 2016 - 10:21 pm | किसन शिंदे
=)) =))
ये बे अभ्या तुला गोखलेची उपवासाची मिसळ देतो या प्रतिसादासाठी. =))
21 Jun 2016 - 10:49 pm | अभ्या..
आलोच.
आता बुवा काय देतात ते बघतो
22 Jun 2016 - 8:37 am | नाखु
डब्बल मस्तानी (एक सेपरेट किसनदेवांना परिक्षणासाठी) आणि अभ्याला (ध)पाटा उपयोगासाठी !!!
अति अवांतर : सिनेमा आलाय की येऊन गेलाय हिंदीत असेल तर कुठे मिळेल काय?
22 Jun 2016 - 9:33 am | किसन शिंदे
नाखुकाका तुनळीची लिंक दिलीये की वर
22 Jun 2016 - 2:51 pm | अत्रुप्त आत्मा
@मिपावल्ली : अगं थांब ना, बघ ना ह्या शिलालेखावर काय कोरलाय काही कळेना.
सौवल्ली: प्रचू, हा पाटा आहे माझ्या आईने दिलेला. घालू क्या डोस्केमें? शिलालेख म्हणे
प्रचंड वारल्या गेलो आहे!
संपूर्ण संवादासाठी अभ्याला __/\__ आणि १ ६००/४०० पाण! हव्या त्या मिसळी नंतर!
21 Jun 2016 - 10:42 pm | प्रचेतस
=))
मरतंय मी हसून हसून.
21 Jun 2016 - 10:48 pm | अभ्या..
शिलालेख हलका घेतल्याबद्दल धन्यवाद रे प्रचू.
ह्यामुळेच आम्ही तुमचे फ्यान हावोत.
22 Jun 2016 - 2:46 am | चांदणे संदीप
=)) =))
बेक्कार हस्लो! सुसाट....लै भारी दादानु!
22 Jun 2016 - 7:33 am | डॉ सुहास म्हात्रे
=)) =)) =))
मिपावल्ली आभ्याच्या मागे पाटा घेऊन धावत आहेत असे चित्र ड्वाळ्यासमोर आले ;)
22 Jun 2016 - 11:57 pm | अभ्या..
सापडन तरी का मी वल्याला. तेचि तब्येत बघा, हातातला शी ला लेख बघा. माझा फिटनेस बघा. पळायला ऐकत नाही मी
22 Jun 2016 - 8:52 am | भोळा भाबडा
←आत्मु मोड ऑन→
←आत्मु मोड ऑफ→
22 Jun 2016 - 3:18 pm | सस्नेह
22 Jun 2016 - 3:28 pm | असंका
खरोखर कहर!!!
=))
22 Jun 2016 - 3:34 pm | स्वच्छंदी_मनोज
ठ्ठो.
22 Jun 2016 - 3:58 pm | गणामास्तर
जबऱ्या संवाद. या प्रतिसादासाठी अभ्याशेठ तुम्हाला एक मस्तानी घरपोच दिली जाईल येत्या सोलापूर भेटीत.
22 Jun 2016 - 4:26 pm | नाखु
हा संवाद नक्की कुणाका उद्देशून आहे.
योग्य उत्तरास बुवांकडून एक "मामा मिसळ" देण्यात येईल.
22 Jun 2016 - 4:34 pm | अभ्या..
हे खरं आयजीच्या जीवावर बायजी उदार.
नाखुकाका असली शिलेदारी सोडा, सोता बक्षीस जाहीर करा
22 Jun 2016 - 5:08 pm | नाखु
वरती मस्तानी बक्षीस दिलीय की?
तीकडे का लक्ष्य दिलं नाही ते.
22 Jun 2016 - 5:12 pm | प्रचेतस
बाव अता.
किस्न्यानं एव्हढं जीव तोडून परिक्षण लिहिलंय आणि तुम्ही अवांतर करायलेत.
23 Jun 2016 - 12:00 am | अभ्या..
गप्पे, तुझ्या शिलालेख ऐवजी बुवांचे शी ला लेख असते तर अवांतराचा पाऊस पाडला असतास तिरका तिरका होऊन.
लै सद्गुणांचा पुतळा जणू तू
22 Jun 2016 - 5:43 pm | सूड
या प्रतिसादासाठी तुम्ही आणलेली दाण्याची चटणी तुम्हाला वाटीभर देणेत येईल.
22 Jun 2016 - 5:43 pm | सूड
या प्रतिसादासाठी तुम्ही आणलेली दाण्याची चटणी तुम्हाला वाटीभर देणेत येईल.
22 Jun 2016 - 5:43 pm | सूड
या प्रतिसादासाठी तुम्ही आणलेली दाण्याची चटणी तुम्हाला वाटीभर देणेत येईल.
22 Jun 2016 - 7:43 pm | टवाळ कार्टा
३ वाट्या झाल्या रे
22 Jun 2016 - 7:42 pm | टवाळ कार्टा
ख्याक
22 Jun 2016 - 11:41 pm | रातराणी
अभ्या तुस्सी ग्रेट हो!
21 Jun 2016 - 9:26 pm | कंजूस
हे किसन शिंदे चित्रपट परीक्षणातले मिपाचे वल्ली होते का?
21 Jun 2016 - 10:59 pm | धनंजय माने
छान परिक्षण.
अभ्या चे निरिक्षण देखील मस्त.
22 Jun 2016 - 2:18 am | पद्मावति
खूप छान ओळख.
22 Jun 2016 - 7:43 am | कैलासवासी सोन्याबापु
प्रकाशराज _/\_
22 Jun 2016 - 10:33 am | सस्नेह
उत्सुकता जागृत करणारी ओळख.
तरीही सुखांत नसल्यामुळे पाहवणार नाही.
22 Jun 2016 - 2:14 pm | ५० फक्त
जिथेपर्यंत सुखी आहेच तेवढाच पहा मग.. तुनळीवरच पाहणार आहात ना.
बाकी श्री. किसनजी, या विभागात तुमचा प्रवेश चांगला आहे.
22 Jun 2016 - 2:45 pm | सस्नेह
:)
22 Jun 2016 - 3:51 pm | आतिवास
चित्रपटाची ओळख आवडली.
22 Jun 2016 - 7:22 pm | स्वाती दिनेश
चित्रपटाची ओळख आवडली, नक्की पाहणार.
श्याम बेनेगलांचा 'सुसमन' आठवला.
स्वाती