पार्ल्याच्या श्री. प्रकाश जोशींचे युनियन बँकेच्या पार्ले पूर्व येथील शाखेत खाते आहे. १ मे २०१५ रोजी बँकेच्या ए टी एम केंद्रातून पैसे काढत असतांना एक माणूस आत शिरला. “मदत करू का ?” असे विचारू लागला. श्री. जोशींनी त्याला हटकलं. त्यावर मी सुरक्षा रक्षक आहे असे त्याने सांगितले. त्याचा गणवेष आणि ओळखपत्र कुठे असे विचारता त्याने अजून गणवेष मिळाला नाही असे सांगितले. जोशींनी त्याला बाहेर काढला. पण केंद्राच्या दाराला आतून कडी लावायची सोय नव्हती. पैसे काढून बाहेर आल्यावर २ मिनिटे थांबून इकडे-तिकडे कानोसा घेतला. ‘तो’ माणूस कुठे दिसला नाही. काही दिवसांनी जोशी यांनी बँकेचे पासबुक भरून घेतले असता बँकेतून २४००० रुपये काढून घेतल्याचे लक्षात आले. ‘त्या’च माणसाने पैसे घेतले याची त्यांना खात्री पटली. त्यांनी लगोलग बँकेच्या शाखा प्रमुखाकडे जाऊन तक्रार केली. त्यावर सीसीटीव्ही फुटेज पाहावे लागेल आणि त्यासाठी पैसे द्यावे लागतील असे त्यांनी सांगितले. श्री. जोशी याला राजी झाले. परंतु नंतर १. ए टी एम केंद्रात सीसीटीव्ही नाही, २. तिथे रक्षक नेमलेला नाही आणि ३. ए टी एम केंद्राचे दार आतून बंद करण्याची सोय नाही हे त्यांना मान्य करावे लागले.
परंतु तरीही घडल्या घटनेची जबाबदारी घेण्यास आणि श्री. जोशी यांना भरपाई देण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. उलट ए टी एम केंद्राची जागा भाड्याची असल्यामुळे रक्षक नेमण्याची जबाबदारी बँकेची नाही अशी भुमिका घेतली. बाजूलाच दुसऱ्या बँकेचे ए टी एम केंद्र आहे, तिथे सीसीटीव्ही आणि संबंधित बँकेचा रक्षक आहे ही बाब लक्षात आणून दिली असता तो त्या बँकेचा प्रश्न आहे, आमचा काही संबंध नाही असे आणखी एक बेजबाबदार कारण दिले.
आता काहीतरी हालचाल करणे गरजेचे ठरले. आपलं नशीब असं म्हणून हातावर हात धरून बसून राहणे शहाणपणाचे कधीच नसते. त्यांनी बँकेत लेखी तक्रार दिली. त्यात इतर सर्व तपशिलाबरोबर त्यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे बँकेचे लक्ष वेधले. त्यांनी पैसे काढले त्याचा व्यवहार क्रमांक (transaction no.) होता ३२३२. त्यानंतर शिल्लक चौकशी व्यवहार क्रमांक ३२३३ आणि २४००० रुपये काढल्याच्या व्यवहाराचा क्रमांक ३२३४ असे होते हे बँकेच्या नोंदीवरून दिसत होते. पैसे काढतांना मिळालेल्या पावतीवर शिलकीची नोंद असतांना लगेचच पुन्हा शिलकीची चौकशी कोणी का करील ? याचा अर्थ श्री. जोशी तिथून निघून गेल्यावर चोराने शिल्लक पाहिली आणि २४००० रुपये चोरले. बँकेत दिलेल्या तक्रारीची एक प्रत पोलीस ठाण्यात देऊन तिथे चोरीची तक्रार नोंदवली. पोलिसांनी सहकार्य करून ‘अज्ञात इसमा’च्या विरोधात गुन्हा नोंदवून घेतला.
पुढे काय करायचं त्याचा सल्ला घेण्यासाठी श्री. जोशी मुंबई ग्राहक पंचायतीच्या मुख्य कार्यालयात गेले. त्यांची सर्व हकीगत जाणून घेतल्यानंतर तिथल्या कार्यकर्त्यांचे म्हणणे पडले की श्री. जोशी बँकेकडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत. इतकेच नव्हे, तर चोरी झाल्या दिवसापासून बँकेकडून भरपाई मिळेपर्यंत दर दिवशी शंभर रुपये याप्रमाणे नुकसान भरपाई सुध्दा ते बँकेकडे मागू शकतात.
ए टी एम केंद्रात कोणत्या सुविधा असणे बंधनकारक आहे त्याबद्दलचे रिझर्व बँकेचे काही नियम आहेत. पण त्याची छापील प्रत मिळू शकली नाही. मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर अशी प्रकरणे हाताळणाऱ्या खात्याच्या अधिकाऱ्यांना श्री. जोशी भेटले. तिथे कळलेली माहिती अधिकच धक्कादायक होती. १.जेवढ्या रकमेची चोरी झाली असेल, त्याच्या एक तृतीयांश रक्कम तिथे शुल्क म्हणून भरावी. २.जुलै २०१५ पूर्वीच्या सुय्मारे दहा महिन्यात अशा कोणत्याही प्रकरणाची सुनावणी झालेली नाही. तक्रारी दफ्तर दाखल आहेत. ३.सुनावणी केव्हा सुरु होईल कोण सांगणार?
अखेर श्री. जोशी रिझर्व बँकेच्या बँक लोकपाल (ombudsman) कार्यालयात गेले. तिथे श्री. मधुकर सावंत यांनी सर्व कागदपत्रे पाहून दावा खरा असल्याचा निर्वाळा दिला आणि शक्य ती सर्व कारवाई त्वरित करण्याचे आश्वासन दिले. अखेर युनियन बँकेला रिझर्व बँकेने दिलेल्या आदेशानुसार २९ सप्टेंबर रोजी युनियन बँकेने श्री. जोशी यांच्या खात्यात २४००० रुपये भरले. श्री. जोशी यांनी लगेच सर्व पैसे काढून घेतले, तिथल्या ठेवी काढून घेतल्या आणि यानंतर युनियन बँकेशी कोणताही व्यवहार करायचा नाही असे ठरवले.
सार्वजनिक क्षेत्रातल्या (राष्ट्रीकृत) बँकांचे व्यवहार चोख आणि सुरक्षित असतात असा अनेकांचा समज आहे. परंतु वरील हकीकतीवरून तो निव्वळ गैरसमज असल्याचे लक्षात येईल. आपल्या पैशांबाबत आपण जागरूक राहिलेच पाहिजे आणि सुरुवातीला म्हटलं तसं नशिबाला बोल लावत स्वस्थ बसून राहण्यापेक्षा शक्य त्या सर्व मार्गांनी प्रयत्न करीत राहिले पाहिजे. मुंबई ग्राहक पंचायतीच्या मदतीने मी माझे पैसे परत मिळवू शकलो.
राधा मराठे
मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभाग
सदर लेख मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.
प्रतिक्रिया
22 Mar 2016 - 11:46 am | खेडूत
ऑके.
पण रोज १०० रु. प्रमाणे पैसे का नाही मिळाले?
त्यापोटी झालेला खर्च, मनस्ताप यासाठी निकालात काही रक्कम लिहीली नव्हती का?
22 Mar 2016 - 11:55 am | मृत्युन्जय
तुमच्या या धाग्यांबद्दल तुमचे अभिनंदन आणी आभार. भविष्यात कधी कुणाला असे प्रोब्लेम्स आले तर त्याचे निराकरण कसे करावे हे त्याला कळेल.
22 Mar 2016 - 12:07 pm | सस्नेह
तुमचे धागे आवर्जून वाचते. अत्यंत उपयुक्त माहिती आणि आशादायक उदाहरणे असतात.
22 Mar 2016 - 12:15 pm | एस
+१
23 Mar 2016 - 8:47 am | अजया
+१
22 Mar 2016 - 12:15 pm | नाखु
असल्या सत्य आणि उपयुक्त बातम्यांचे वर्त्मानपत्रांना आणि वाहिन्यांना वावडे असल्याने तुमच्या कडून ही प्रबोधन्+सजग राहण्याची माहीती मिळते.
22 Mar 2016 - 12:22 pm | श्री गावसेना प्रमुख
मागे ठाणे कि मुंबईत एका बँकेच्या atm वर पोलिसांचा पगार हा कार्ड क्लोन करून काढून घेण्यात आला होता,प्रकरण पोलिसांशी संबंधित असल्याने संबंधित बँकेने सर्व रक्कम परत केल्याचे वाचलेले आहे ,हे चोर बहुतेक मशीन मध्ये एक यंत्र बसवून कार्ड क्लोन करतात,ह्याला atm ची सिक्युरटी हि सामील असते
22 Mar 2016 - 12:31 pm | पिलीयन रायडर
त्यांना पैसे परत मिळाले हे चांगलेच झाले. पण आपल्या बँकेच्या ए.टी.एम मध्ये अशा चोर्या होत आहेत ह्याचे बँकेला काहीच वाटले नाही का? कार्ड गहाळ झालेले नसतानाही केवळ आपल्या नंतर ट्रान्झॅक्शन करुन कुणीही पैसे काढुन घेउ शकतो असा त्याचा अर्थ आहे का?
ह्याबाबत आपण कोणती काळजी घ्यायला हवी?
22 Mar 2016 - 12:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
हल्ली लिमिटेड फ्री ट्रांझाक्शन्स केलीत खर्चं कमी करायचा म्हणुन. त्याम्धे सिक्युरिटीचा खर्च अंतर्भुत असतो असं कारण बँकांनी दिल्याचं आठवतं. तरीही कित्येक ए.टी.एम. वर सुरक्षारक्षक नाहीत तरीही फ्री ट्रँझॅक्शन्स नंतर हे लोकं लुटतात. ह्याविरुद्ध कुठे दाद मागता येईल. कारण फ्री ट्रँझॅक्शन्स अजिबातचं पुरेशी नाही.
22 Mar 2016 - 2:37 pm | टवाळ कार्टा
एटिएम मशिन असणार्या केबिनला आतून कडी असावीच...मध्ये कायप्पावर एक व्हिडिओ बघितलेला...एका स्त्रीला एटिएम मशिन असणार्या केबिनमध्ये हल्लेखोराने बॅगेमधून आणलेल्या कोयत्याने मारले :(
22 Mar 2016 - 2:45 pm | तिरकीट
एटिएम मधे प्रवेश करताना कार्ड स्वाईप करूनच आत जाता येईल अशी सुवीधा काही एटिएम मधे आहे असे वाचनात आले होते.
तसे असेल तर असे प्रसंग कमी व्हायला मदत होउ शकेल
23 Mar 2016 - 1:25 am | बोका-ए-आझम
सरकारी बँक होती हे पाहिल्यावर आश्चर्य वाटले नाही. आणि चोरी झालेल्या रकमेच्या काही टक्के शुल्क? म्हणजे एक प्रकारे मनस्ताप देण्यात चोराबरोबर सरकारही भागीदार आहे असं वाटतं. त्यावरून हे आठवलं - Why government puts the thieves behind the bars? Because it doesn't like competition!
23 Mar 2016 - 1:31 am | यशोधरा
माहितीपूर्ण लेख, धन्यवाद!
23 Mar 2016 - 2:11 am | रेवती
माहितीपूर्ण लेख आहे. एटीएममधून कार्ड नसताना पैसे कसे काढले गेले?
नेमलेला सुरक्षारक्षक जागेवर नसल्याचे अनेकदा दिसते.
एकाशेजारी दुसरे अशी एकाच जागेच ठेवलेली मशिने दिसतात.
तीही सुरक्षित वाटत नाहीत.
19 Apr 2016 - 9:59 pm | रॉजरमूर
असा समज करून घेण्याचे दिवस इतिहासजमा होतील थोड्याच दिवसात .
राष्ट्रीयीकृत बँका सगळ्याच बाबतीत खाजगी बँकांच्या स्पर्धेत उतरल्या आहेत आता .