तूने चुरया मेरे दिल का चैन - विवाहोत्सुकांसाठी एक नवा मंत्र आणि विवाहितांसाठी वरदान

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जनातलं, मनातलं
13 Dec 2013 - 4:58 pm

प्यारे गुरुजींना प्रज्ञा सांत कि असांत असा प्रश्र्ण पडला होता. या जगात काही प्रतिभा या सांत का असांत या वादाच्या पलिकडल्या असतात. या प्रतिभेतून निर्माण झालेल्या कलाकृतिंचा जमेल तेवढा अस्वाद घेणे इतकेच काय ते आपण सामान्य माणसे करु शकतो. अशाच एका अनंत गाण्याची मी आज तुम्हा रसिकंना ओळख करुन देणार आहे. ओळख अशा साठी की त्या गाण्याचे संपुर्ण रसग्रहण करणे या पृथ्वीवरच्या कोणत्याही मानवाच्या आवाक्या बाहेरचे काम आहे. ते गाणे सांतही आहे आणि असांतही. गाणे संपते म्हणुन सांत पण संपल्या नंतर ते अनंत काळ आपल्या मनाचा ताबा सोडत नाही म्हणुन अनंत.

या गाण्याचे कवी, संगीतकार व गायिके बद्दल मला काही माहित नाही. त्या बद्दल मी पहिल्यांदा सर्व रसिकांची क्षमा मागतो व त्यांच्या प्रतिभेने निर्माण केलेले हे गानपुष्प आपल्या चरणी विनम्र पणे अर्पण करतो. मी केवळ वाहकाची भुमिका करतो आहे याची सर्व वाचकांनी कृपया जाणीव ठेवावी.

गाणे ऐकल्यावर व पाहिल्यावर सगळे श्रोते सांत आणि असांत च्या पलिकडे जाउन श्रीसंत होतील याची मला खात्री वाटते.

आपल्या सगळ्यांचा लाडका सुपरहिरो ईस्पायडरमैन (हो हो ईस्पायडरमैनच) वर हे गीत चित्रीत झाले आहे. एक भारतिय नवयौवना आपल्या ईस्पायडीच्या प्रेमात पडली आहे आणि चक्क इस्पायडोबा सुध्दा तीच्यावर आशिक झालेला दिसतो. गाण्याच्या पार्श्र्वभूमीवर उसाचे शेत आहे. शेता जवळच्या मोकळ्या भागावर हे गाणे चित्रीत झाले आहे. अभिनेत्री शेतकरी कन्या असावी असे तिच्या वेशावरुन वाटते. अत्यंत मनमोहक अशा रंगाचे कपडे घालणारी ही लावण्यवती जेव्हा नृत्य करु लागते तेव्हा आपण तिचे नृत्य कौशल्य तिचे पदलालित्य पहाताना मुग्ध होउन जातो. आणि आपल्या इस्पायड्या (नीट वाचा इस्पायड्याच लिहिले आहे. नको तिकडे "व" घालुन वाचु नका) सुध्दा मग तिच्या सोबत नृत्य करु लगतो. गायिकेचा आवाज सुध्दा अतीशय तलम आहे. लेडी तलत मेहमुदचा किंवा सुरय्याचा आवाजच आपण ऐकतो आहोत असे आपल्याला वाटते. अचानक काळी ७ मधे तिने गायला सुरुवात केल्यावर आपण पहिल्यांदा दचकतो पण आपल्या गायन कौशल्याने ती आपल्याला तिच्या सोबत फरपटत यायला भाग पाडते.

संगीतकाराला तर केवळ लोटांगण घालणे इतकेच आपण करु शकतो. रहेमान सुध्दा त्यांच्या पुढे झक मारेल असे फाडु संगीत दिले आहे त्यांने या गाण्याला. गायक, अभिनेते, संगितकार, नृत्य दिग्दर्शक, कॅमेरामन या सगळ्यांनी मिळुन केलेल्या अचाट मेहनतीचा परिपाक म्हणूनच इतकी सुंदर कलाकृती आपल्याला अनुभवायला मिळते. सहस्त्रकातुन एखादीच अशी कलाकृती बनते. असे गुणी कलाकार आपल्या भारत देशात आहेत याचा मला फार म्हणजे फार अभिमान वाटतो.

आता गाण्या विषयी थोडेसे.

सगळ्या जगावर जाळे टाकणार्‍या इस्पायडरमैन ने एका भारतिय तरुणीवरपण गारुड केलं आहे. गावाकडली एक साधीभोळी तरुणी आपल्या इस्पायडरमैन च्या प्रेमात पडली आहे. व ती त्याला सांगत आहे. अरे माझ्या प्राणप्रिय छबुड्या तु माझ्या तनामनाची चोरी केली आहेस. तुझ्या त्या अचाट करामती बघुन मी पुरती घायाळ झाले आहे. आता फार वेळ न वाया दवडता तु सत्वर माझ्या समिप ये व माझ्या तनमनात जी आग भडकली आहे ती शांत कर. या सादरीकरणाच्या वेळी नायिकेने सादर केलेले विभ्रम म्हणजे अभिनयाचा एक अप्रतिम नमुना आहे. नायिका म्हणते

इस्पायडर मॅन इस्पायडर मॅन तूने चुरया मेरे दिल का चैन

इस्पायडर मॅन इस्पायडर मॅन तूने चुरया मेरे दिल का चैन

देख के तेरे करतब यारा मै तो बन गयी तेरी फैन

इस्पायडर मॅन इस्पायडर मॅन तूने चुरया मेरे दिल का चैन हो हो

या ओळी ती म्हणत असतनाचा आपला इस्पायडी मागुन रुबाबदार पावले टाकत मोठ्या डौलाने एन्ट्री मारुन भाव खाउन जातो. भारतात आल्यावर त्याने आपला वेश जरासा बदलला आहे. पण तरी सुध्दा तो इस्पायडरमैन आहे हे आपण सहज ओळखु शकतो.

मधल्या संगीताच्या तुकड्यावर हात आकाशात उंच उचलुन तिने केलेला नृत्याविश्कारातुन ती माधुरी दिक्षीत, श्रीदेवी, वैजयंती माला, हेमामालिनी यांच्या पेक्षा कितीतरी वरच्या दर्जाची नृत्यांगना आहे हे सहजच अधोरेखीत होते.

आपल्या इस्पायडोबाचा विरह तीला सहन होत नाहीये. हा एकटेपणा तीला खायला उठला आहे. थंड हवेच्या झुळकीने सुध्दा तीच्या अंगावर एक गोड अशी शिरशिरी उठते आणि मग हि मोहरुन गेलेली नवयौवना इस्पायडरमैन बरोबर मुग्ध होउन नाचु लागते आणि तो सुध्दा तीच्या मागे मागे धावायला लागतो. आपला इस्पायडु पण नाचायला काही कमी नाही बरका.. पांढरे शुभ्र बुट, पांढरा मुखवटा आणि पांढरे हातमोजे घालुन त्या तरुणीच्या बरोबरीने तो नाचायला लागतो तेव्हा गोविंदा, मिथुन किंवा ॠशीकपुरची आठवण आल्याशिवाय रहात नाही. मधेच तो अंगाला झटके देतो. हात लांब करुन, एक हात पुढे व एक हात मागे करुन नृत्य करतो तेव्हा त्या मुखवट्या मागे शम्मी कपुर तर नाहीना अशी एक शंका मनाला इस्पर्श करुन जाते. पण इस्पांडुरंगाच्या देहयष्टी कडे बघत आपल्याला तो प्रश्र्ण गिळावा लागतो. (हळुच गिळा नाहीतर पुढचे दृष्य बघताना ठसका लागेल)

तनहाई तडपाती है याद तुम्हारी आती है

थंडी थंडी पुरवई छेड के मु़झको जाती है

तेरी तारीफ लिख जो सके होSSS होSSS

तेरी तारीफ लिख जो सके नहि बन कोइ ऐसा पेन

खरच माझी सुध्दा अशी अवस्था झाली आहे किती लिहु आणि किती नको. पुढे ती छबकडी काय म्हणते बघा..........

तुम तो मेरे जान हो दिल का मेरे अरमान हो

हर लडकी जो खाना चाहे तुम वो मिठा पान हो

आपल्या इस्पांडोबाची तुलना ती पानाबरोबर करते आहे. आणि त्याला प्रेमाने खायचे आहे असे म्हणते आहे. प्रेमात माणुस अंधळा होतो हे खरच आहे. आपला इस्पायडु पण हे समजुन आहे. म्हणुन तो तिला प्रेमाने उचलतो आणि ह्वेत गरागरा फिरवतो.

मन मौजी चित्रपटातल "मै तो तुमसंग नैन मिलाके" हे गाणं आठवतय का? तोच दर्द तेच आर्जव पुढच्या ओळींमधे आहे. आणि साधना पेक्षाही सरस कसदार अभिनय आपल्याला या गाण्यात बघायला मिळतो. आणि त्या आलापी ताना ऐकताना तर आपण देहभान विसरुन जातो.

याद मे तेरी जाग जाग के होSSS होSSS

याद मे तेरी जाग जाग के थकने लगे ह मेरे नैन

इस्पायडर मॅन इस्पायडर मॅन तूने चुरया मेरे दिल का चैन

गाणे बघत बघत हा लेख लिहीताना माझ्या हृदयाची धडधड एक दोन वेळा इतकी जास्त वाढली की शेजारचे लोक घरी आले होते विचारायला. आमच्या हीने त्यांना पण गाणे बघायला जबरदस्तीने घरात बोलावुन घेतले आणि माझ्या शेजारी बसवले.त्या वेळी मी ३८३७व्यांदा गाणे बघत होतो. त्या दिवसा पासुन माझे शेजारी माझी नजर चुकवित पळत आहेत. मी दिसलो की लांबूनच रस्ता बदलून जतात. साले जळतात माझ्यावर.. जाउन दे जळो बापडे आपण गाण्याचा आनंद लुटुया.

शेवटच्या कडव्यात ती तरुणी अस्सल भारतिय नारी आहे याचा आपल्याला प्रत्यय येतो. सुपरहिरो इस्पायडेश्र्वराला ती आपल्या जाळ्यात कायमचा अडकवायला बघते. ती बाला शरीराच्या आकर्षक हलचाली करताना कॅमेरामनने पण त्या अचुक टीपल्या आहेत. मधेच ते दोघे आपल्या इस्पायड्याच्या सायकलवरुन रपेट मारतत तेव्हा डोळ्या समोरुन चटकन आमिर आणि आयेशाचे "पहेला नशा" हे गाण सरकत. आणि मग आपण नकळत या दोन गाण्यांची तुलना करायला लागतो. पण "पहेला नशाला" या गाण्याची सर येउच शकत नाही याची आपल्याला पुढच्याच सीनच्या वेळी जाणीव होते आणि मग आपण परत गाण्याच्या मागे फरपटतो.

मैतो तुम पे मरती हु पर दुनियासे डरतीहु

करनी चहु बात तुमस पर दिलसे अपने डरती हु

डोली मेरी जल्दिसे लेजा होSSS होSSS

डोली मेरी जल्दिसे लेजा गाडी लेके आ तू जान

इस्पायडर मॅन इस्पायडर मॅन तूने चुरया मेरे दिल का चैन

लग्न न झालेल्य तरुण तरुणींनी आपल्या होण्यार्‍या जोडीदराला हे गाणं जरुर म्हणजे जरुर दाखवावे. रोमान्स कशाला म्हणतात हे समजले की रोमन्सचा मजा आणखी वाढतो. लग्न झालेल्यांना तर काही सांगायची गरजच नाही. गाणे संपूर्ण पाहिल्यावर त्यांना समजेलच घरी गेल्यावर काय करायला पाहिजे ते.

माझ्या ऑफीस मधल्या स्वतःला अल्लड समजणार्‍या अडदांड बालीकेला मी हे गाणे दाखवले तेव्हा ती जोरजोरात किंचाळतच सुटली. माझा गालगुच्चा घेणेच तिने बाकी ठेवले होते. सगळा स्टाफ माझ्या कडे संशयाने (आणि सहानुभूतीने) बघायला लागला. पण मग जेव्हा रहस्यभेद झाला तेव्हा सगळ्यांनी ते गाणे कॉपी करुन घेतले. आता सकाळ संध्याकाळ कुठेना कुठे आमच्या हापिसात हे गाणे वाजतच असते. या गाण्याच्या प्रेरणेने हपिसातल्या दोन घोडनवर्‍यांची लग्ने झाली (पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी दोन्ही अर्थाने घोडनवर्‍यांची हा शब्द वापरला आहे. हो उगाच कोणी निराश व्हायला नको) आणि तिघा चौघांची मार्गावर आहेत. काही नाही इतकेच करयचे, फक्त समोरच्याला दम द्यायचा करतोस / करतेस की नाही लग्न? नाहीतर रोज सकाळी तुझ्या घरा समोर येउन हे गाणे मोठ्यांदा वाजविन.

इस्पाडुरंग इस्पांडुरंग

मुळ गाणे इथे आहे.
http://www.youtube.com/watch?v=enOgueqnYOM

नाट्यसंगीतइतिहासवाङ्मयऔषधोपचारगुंतवणूकराजकारणरेखाटनआस्वादशिफारसमदतप्रतिभा

प्रतिक्रिया

आनंदराव's picture

13 Dec 2013 - 5:24 pm | आनंदराव

गाणे कहर आहे. बाकी तुमचे गाण्याचे विश्लेसन कमाल आहे.
हि तुमची कला आहे.
येऊ दे

चित्रगुप्त's picture

13 Dec 2013 - 5:31 pm | चित्रगुप्त

व्वा. पूर्ण गाणे बघितले.
अशी थोर कलाकृती निर्माण करणार्‍यांना आणि ती आमच्यापर्यंत पोहोचवणार्‍या तुम्हाला साष्टांग दंडवत.
इस्पाईडर्म्यानच्या बुरख्याआड बहुधा प्रभुदेवा असावा.
गाण्याचे शेवटी ती दोघे अचानक गायब होतात, त्यानंतर बहुधा मागील उसाच्या फडात गेली असावीत. तेथील कार्यक्रमाचा पण व्हिडियो आहे का?

शिद's picture

13 Dec 2013 - 5:50 pm | शिद

गाण्याचे शेवटी ती दोघे अचानक गायब होतात, त्यानंतर बहुधा मागील उसाच्या फडात गेली असावीत. तेथील कार्यक्रमाचा पण व्हिडियो आहे का?

=)) =)) =))

टिवटिव's picture

13 Dec 2013 - 11:14 pm | टिवटिव

आगागागा...

सूड's picture

13 Dec 2013 - 5:32 pm | सूड

>>सांत कि असांत

सांत की अनंत अस्तंय वो त्ये!! जरा करेक्शन करायचं बघा की वो !! सांत = स+ अंत (ज्या गोष्टीला अंत आहे) अनंत= अन्+ अंत (ज्या गोष्टीला अंत नाही)

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Dec 2013 - 10:10 am | ज्ञानोबाचे पैजार

या अचाट गाण्याचे रसग्रहण करणे म्हणजे शिवधनुष्य उचलण्या सारखेच कठीण कार्य होते.

फार वर्षांपूर्वीची गोष्ट आठवली. रावण जनकाच्या दरबारात शिवधनुष्य उचलायचा प्रयत्न करत होता. उचलताना त्याच्या हातून, शिवधनुष्य ज्या टेबलावर ठेवले होते, त्या टेबलावरचा टेबलक्लॉथ जरासा सरकला, म्हणुन शीतेने त्याच्या बरोबर लग्न करायला नकार दिला. तो प्रसंग जसाच्या तसा आमच्या डोळ्या समोर उभा राहिला.

त्या वेळी रावणाला हसणार्‍यांमधे आम्ही पण होतो. पण रावणाला त्या वेळी काय वाटले असेल ते आज आम्हाला समजले.

ईस्पायडर्म्यानचा पर्दाफाश होऊन तो नरपुंगव कोण, हे कळावे, म्हणून फडातील कार्यक्रमाबद्दल विचारणा केली असे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Dec 2013 - 10:42 am | ज्ञानोबाचे पैजार

फडातल्या कार्यक्रमासाठी पर्दाफाश करायची गरज नसते. ते न करताही फडातला कार्यक्रम उरकता येतो. त्या मुळे इस्पायडीचा पर्दाफाश करण्यासाठी वेगळी युक्ती योजावी लागेल.

(अनुभवी)

राजेंद्र मेहेंदळे's picture

13 Dec 2013 - 5:44 pm | राजेंद्र मेहेंदळे

हपिसात तूनळी उघडत नसल्याने गाणे घरी जाऊन बघण्यात येईल याची नोंद घ्यावी.

कवितानागेश's picture

13 Dec 2013 - 5:54 pm | कवितानागेश

काय भयानक प्रकार आहे!! =))

मागे उसाचे शेत दिसते आहे . हा समग्र नाग-विदर्भावर अन्याय आहे.
आम्ही सीताबर्डीत निदर्शने करुन निर्मात्याला नागपुरात पाऊल टाकू देणार नाही.
धनतोलीत मोर्चे काढून त्याम्च्यावर संत्र्याचा मारा करू.
चित्रपट सृष्टीने सुद्धा नागपूर - विदर्भावला प्रतिनीधीत्व न देवून अनुशेशाने मारले आहे. हा अन्याय आम्ही का म्हणुन सहन करायचा. जिकडे तिकडे पश्चीम महाराष्ट्रच का?

कर्नलतपस्वी's picture

15 Dec 2021 - 9:02 am | कर्नलतपस्वी

तुमच्या दुखड्याची नोंद घेता, बुवानीं संत्री आणी द्राक्षाच्या बागांच्या पार्श्वभूमीवर असणार्‍या मुखड्यांच्या गाण्यावर किर्तन केल्यास मराठवाडा, विदर्भ दोघांनाही न्याय मिळेल.

प्रचेतस's picture

13 Dec 2013 - 7:04 pm | प्रचेतस

हाहाहा =))
जबरदस्त रसग्रहण.

प्यारे१'s picture

13 Dec 2013 - 7:38 pm | प्यारे१

अरेच्चा! आधी हे पाहिलं असतं तर आम्हाला प्रतिभेबद्दल 'प्रश्ण' निर्माणच झाला नसता. काय हे पैजार बुवा? =))
बाकी आमचा देखील प्रयत्न : मुन्नी बदनाम हुई
http://misalpav.com/node/17636

भटक्य आणि उनाड's picture

13 Dec 2013 - 10:49 pm | भटक्य आणि उनाड

तुनळी सम्प्ल्यावरचा फाईट सीन पण बघा..

खटपट्या's picture

13 Dec 2013 - 11:16 pm | खटपट्या

निव्वळ अप्रतिम !!

हे गाणे बघून माझी मुलगी रडायचे थांबली. (चल तेवढा तरी फायदा झाला )

बाकी स्पायड्याचा नाच (?) छानच

लॉरी टांगटूंगकर's picture

13 Dec 2013 - 11:28 pm | लॉरी टांगटूंगकर

==)) :) :D
वाचूनच फुटलो!!!! आता व्हीडीओ पाहतो
अचानक काळी ७ मधे तिने गायला सुरुवात केल्यावर आपण पहिल्यांदा दचकतो पण आपल्या गायन कौशल्याने ती आपल्याला तिच्या सोबत फरपटत यायला भाग पाडते.
याच्या सारख्या काही वाक्यांना जोरात ठसका लागला.

आपल्या इस्पायड्या (नीट वाचा इस्पायड्याच लिहिले आहे. नको तिकडे "व" घालुन वाचु नका >> मी आधी स्पावड्याच वाचले! :D

अत्रुप्त आत्मा's picture

14 Dec 2013 - 2:24 am | अत्रुप्त आत्मा

@माझ्या ऑफीस मधल्या स्वतःला अल्लड समजणार्‍या अडदांड बालीकेला>>> =))

आनन्दिता's picture

14 Dec 2013 - 5:39 am | आनन्दिता

काय आहे हे.. तो ईस्पायडर मॅण असा का करतोय... =))

lakhu risbud's picture

14 Dec 2013 - 6:26 am | lakhu risbud

जरा या

गाण्याचे पण रसग्रहण करा ना !

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Dec 2013 - 9:16 am | ज्ञानोबाचे पैजार

अरारा हे गाण जगाच्या बाहेरचे आहे. स्वर्गीय स्वर्गीय म्हणतात ते हेच असावे.
काय ते गाणे आणि काय तो त्यावरचा ढॅन्स
पैजारबुवा,

नाही पैजारबुवा आम्हाला या गाण्याचे रसग्रहण पाहिजेच.

आनन्दिता's picture

14 Dec 2013 - 10:47 pm | आनन्दिता

हे हे :) ऑलटाईम हिट सोंग हे आप्लं साँग आहे हे!!! मागे एकदा खफवर टाकलं होतं मी.....

देशपांडे विनायक's picture

15 Dec 2013 - 10:58 am | देशपांडे विनायक

akhu risbud आपण जर वेळात वेळ काढून हे गाणे इथे डकवले असेल तर आपण मिपाचे भूषण आहात असे मला वाटते
नुसत्या रसग्रहणाचा आग्रह करणे आपली विनम्रता दर्शवितो
हे पूर्ण गाणे पाहिल्याखेरीज ,ऐकल्याखेरीज मिपा उघडणार नाही अशी व्यवस्था व्हावी या सूचनेच्या
अनुमोदनासाठी हा प्रतिसाद आहे

याच गाण्याचा दुवा जोडणार होतो, आलरेडी ते पुण्यकर्म केल्याबद्दल बहुत धन्यवाद!!!!!!

निव्वळ स्वर्गीय गाणे आहे _/\_

वेल्लाभट's picture

14 Dec 2013 - 7:29 am | वेल्लाभट

हे ठाउक होतं गाणं; कितीतरी हसलोय यावरून; बेस्ट आहे हे.

विजुभाऊ's picture

14 Dec 2013 - 3:17 pm | विजुभाऊ

तो एस्पायडर म्यान नक्की कोणत्या ठेक्यावर नाचतोय? बहुतेक त्यच्या ऐकण्यात थोडा डीले अ‍ॅड झालेला असावा असे वाटते.

पैसा's picture

14 Dec 2013 - 11:03 pm | पैसा

केवळ भयानक आहे!! परीक्षण तर एकदम चिरफाड करणारं!! जबरदस्त!

सुहास..'s picture

15 Dec 2013 - 9:55 am | सुहास..

खल्लास ....कल्ला शोध लावला आहे !!

=)) =)) =))

अरे तो स्पायडरमॅन च्यामारी कमरेवर हात ठेवुन ठुमके मारतोय आणि बबडी घागर्‍याला उआगा त्रास देते =))

आयला त्या नव्य जुन्या सगळ्या स्पामॅ नी पाहिला हा विडो तर स्वता एखाद्या उंच बिल्डीग वरून खाली उडी टाकुन जीव देतील ...

बुवा परिक्षण तर त्याहुनी हुच्च ..

गायिकेचा आवाज सुध्दा अतीशय तलम आहे. लेडी तलत मेहमुदचा किंवा सुरय्याचा आवाजच आपण ऐकतो आहोत असे आपल्याला वाटते. >>

=)) =)) =))

ह ह पु वा .

प्रसाद गोडबोले's picture

16 Dec 2013 - 12:30 am | प्रसाद गोडबोले
प्रभाकर पेठकर's picture

16 Dec 2013 - 2:04 am | प्रभाकर पेठकर

चित्रपटातील स्पायडरमॅन हा स्वतः त्या चित्रपटाचा निर्माता असावा. स्वतःच्या खिशातून 'कांही हजार' रुपये खर्चून आणि शेजारच्या कुळकर्ण्यांच्या धाकट्या मुलीला हिरॉईन बनविण्याची स्वप्ने दाखवून चित्रपटाची निर्मिती केली असल्यासारखे जाणवते आहे.

छे मला तर तिचा नाच एखाद्या बारबालेसारखा वाटतो. आणि ईस्पायडरमॅनच्या स्टेप्स सकाळी पोट साफ व्हायला काही योगासनं करतात तसा वाटतो.

चित्रगुप्त's picture

16 Dec 2013 - 10:34 am | चित्रगुप्त

सांप्रत हा कोणता इस्पाईडरम्यानावतार? हा अलौकिक नरपुंगव कोण? काय नाव त्या पुरुषोत्तमाचे, आणि त्या चित्रपटाचे? तिलोत्तमा, रति, मेनका, रंभा आदिंच्या मनात हेवा निर्माण करणारी कोण ही अप्सरा? व्यास-वाल्मिकी, कालिदासादि महाकवीनाही खाली मान घालायला लावणारी काव्यप्रतिभा अंगी असणारा या गीताचा रचयिता कोण? डोळ्याचे पारणे फिटवणारे हे असे रोमांचक, अद्भुत नृत्य बसविणारा महागुरु कोण? आणि या दिव्य संगीताचा रचयिता कोण? या सर्वांना आमचा त्रिवार मुजरा, आणि विनाविलंब या सर्वांस 'भारतरत्न' द्यावे, ही विनंती. हे नृत्य बघून मनमोहनाच्या डोळ्यात अश्रू आले, एवढेच भारतरत्नत्वास पुरे ठरावे.

ये कौन चित्रकार है ये कौन चित्रकार है?

अनय सोलापूरकर's picture

5 Feb 2014 - 12:19 am | अनय सोलापूरकर

वळख करु दिली. अभारी आहे. अशा गाण्यान्चा खूप आधार असतो.
जवा कवा वाटलन की जग लइ वाइट्ट हाय, आनन्द हरविला आहे, आपल्या नशीबी हेच, हापिसात साहेब आपल्यालाच कावतात वगैरे वगैरे..!! जास्त लोड नाही घ्यायचा.. अरामात [च्या/कापी/ इ. चा] मग हातात घ्यावा आणी इस्पाईडरम्यान, इस्कुल के टेम पे, जाते हो परदेस पिया आणी खुपच येळ असल तर "गुण्डा" पहावा.

अत्रन्गि पाउस's picture

5 Feb 2014 - 6:48 pm | अत्रन्गि पाउस

उतारा म्हनून ह्यो एक बर गावलंय...

http://www.youtube.com/watch?v=EunwnU6vg1Q

लिवा वो कुनीतरी ......

चित्रगुप्त's picture

19 May 2015 - 8:53 pm | चित्रगुप्त

आज पुन्हा एकदा हे सहस्त्रकातुन एखादेच असे हे अद्वितीय गाणे बघून आणि त्यावरील बुवांचे भाष्य वाचून ब्रम्हानंदी टाळी लागली.
सल्लूला हे गाणे ऐकूनच फूटपाथावर गाडी चालवण्याची प्रेरणा मिळाली, असेही ऐकिवात आहे.
त्याने खुद्द आम्हाला या गाण्यासारखे गाणे आपल्या पिच्चर मधे हवेच असा आग्रह इथे केला होता.

पैजारबुवा सर्वप्रथम आपल्या प्रतिभेला साष्टांग दंडवत. रसग्रहण करावं तर तुम्हीच. आज सकाळीच मी हा लेख मिपावर पहिल्यांदाच वाचला. (मी एक आठवड्यापूर्वीच मिपा जॉईन केलंय. मी जेव्हा सगा साहेबांच्या 'पावसात जळाया लागलोय' या कवितेचं तुम्ही केलेलं रसग्रहण केलंय तेव्हापासून मी आपला पंखाच झालोय.) आईशप्पथ!!! हसता हसता फरशीवर लोळत होतो चक्क. माझी पत्नी सुद्धा किचनमधून बाहेर आली हा प्रकार बघायला. मी तेव्हां व्हीडीओ पण पाहिला नव्हता. केवळ तुमच्या शब्दांतच इतकी पॉवर होती!

यशोधरा's picture

4 Jul 2015 - 7:58 pm | यशोधरा

इस्पाडुरंग!! इस्पांडुरंग!!

पैसा's picture

26 Jan 2016 - 12:47 pm | पैसा

पुढचे रसग्रहण कधी?

बाबा योगिराज's picture

27 Jan 2016 - 7:10 pm | बाबा योगिराज

आमच्या आवडत्या पानाचा उल्लेख गाण्यात केल्या मूळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची मागणी करतो.
नृत्य दिरदर्शकास शाष्टांग ____/\____.

आणि अजून एक
पैजारबुआ नृत्य बघुन आमचे पॉट (हसून हसून) दुखल्याने आपणास वकिला तर्फे एक नोटिस पाठवलेली आहे.

विजुभाऊ's picture

14 Dec 2021 - 12:23 pm | विजुभाऊ

आणि हे एक . भन्नाटेस्ट या कॅटेगरीत बसतेय

टर्मीनेटर's picture

14 Dec 2021 - 2:43 pm | टर्मीनेटर

नतमस्तक!
काय हे अलौकीक गाणे आणि काय ते त्यावरचे इस्पायडर मॅनचे अलौकीक नृत्य, आहाहा आहाहा, लाजवाब! लेखातला व्हीडीओ बघीतल्यावर पहीले हे रत्न युट्युबवर अपलोडवणाऱ्या kooldude1111 ह्या चॅनलला सबस्क्राइब केले, व्हीडीओ लाईक आणि डाऊनलोड केला, लुप मध्ये पाच वेळा ही अलौकिक कलाकृती पाहीली आणि मग हा प्रतिसाद लिहायला घेतला.

आपण आजपर्यंत (८० च्या दशकापासुनची) जवळजवळ सगळी हिंदी गाणी ऐकली आहेत असा माझा समज होता. पण तो समज किती ‘गैर’ होता हे आज कळले! माऊली ह्या लेखाद्वारे माझ्या भ्रमाचा भोपळा फोडल्यामुळे मी तुमच्यापुढे नतमस्तक झालो आहे.
आजपासून सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्री अशा सर्व वेळी हे गाणे शक्य तेवढे वेळा पहाण्यास / ऐकण्यास मी व्रतबद्ध झालो आहे.

परीक्षण एकदम भन्नाट केले आहे. नायीकेच्या लीलांना झुकते माप दिल्याने मुख्य पात्र ‘इस्पायडर मॅन कडे, त्याच्या अफलातून नृत्य कौशल्याकडे काहीसे दुर्लक्ष झाल्या सारखे (उगाचंच) वाटले, त्याच्या टॅलेंटलाही परीक्षणात समान न्याय द्यायला हवा होता असेही (उगाचंच) वाटत आहे 😀

असो, हे अद्वीतीय गाणे गाणारी गायीका, संगीतकार, शब्दरचनाकार, व्हीडीओतले ते दोन्ही असामान्य कलाकार, नृत्यदिग्दर्शक, कॅमेरामन आणि हे गाणे आपल्या पर्यंत पोचवण्याचं महान कार्य करणारे PAL Films, युट्युबर kooldude1111, धागा लेखक प. पु. पैजारबुवा आणि हा धागा आज वर आणणारे श्री. श्री. विजुभाऊ अशा सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे 🙏

अवांतर: हा व्हीडीओ युट्युबवर अपलोड करणाऱ्या विनयशील स्वभावाच्या kooldude1111 ह्या महान व्यक्तीने Description मधे लिहिलेली खालची ओळ वाचुन डोळे पाणावले!
“U will definitely commit suicide after watching this shit”

पुन्हा एकदा नतमस्तक!

भारी परीक्षणं! गाणं ऐकलं होतं आज गाणं पाहायचा आणि धमाल रसग्रहणाचा योग जुळून आला.😁

कर्नलतपस्वी's picture

15 Dec 2021 - 9:09 am | कर्नलतपस्वी

बुवा किर्तन लई भारी आणखीन येऊ द्या

रंगीला रतन's picture

15 Dec 2021 - 1:40 pm | रंगीला रतन

सहस्त्रकातुन एखादीच अशी कलाकृती बनते.
+१५१२२०२१
कमाल रसग्रहण, गाणे तर कहर आहे :=)

पुन्हा पुन्हा वाचावा, अश्या या धाग्यात या सुंदर जुन्या गाण्याचा उल्लेख वाचून ते पुन्हा ऐकले :
https://www.youtube.com/watch?v=f-PkZMIiB2w