असीर करके हमें क्यों रिहा किया सैयाद,
वो हमसफीर भी छूटे, वो बाग भी न मिला।
-'जलाल' लखनवी
एकटेपणाचे दु:ख अफाट असते आणि ते ओझे खांद्यावर घेउन आयुष्यभर वणवण भटकण्याची शिक्षा मृत्युपेक्षाही भयानक. लखनवी च्या शायरीमधला पक्षी म्हणुनच पारध्याला (सैयाद) म्हणतो आहे " बाबा रे कधी काळी मला कैद (असीर) केले होतेस ते होतेस पण आता असे एकट्याला सोडुन का देतो आहेस? जिथुन कैद केले होतेस ती बाग तर आता कोसो दूर आहे आणि ज्यांच्यासाठी जगायचे ते कोणी आसपास उरलेले नाही. (त्यापेक्षा सरळ मारुनच का टाकेनास?)
लखनवी च्या पक्ष्याचे आयुष्य नशीबी आलेली व्यक्ती म्हणजे महाभारतातला अश्वत्थामा. हा म्हणे जन्मल्या जन्मल्या घोड्यासारखा खिंकाळला म्हणुन याचे नाव अश्वत्थामा. आयुष्य पण याला घोड्यासारखे मिळाले. जन्मभर उभे राहण्याची शिक्षा दिल्यासारखे. एका ठिकाणी विश्रांती नाही. ज्याला अंत नाही आणि ज्याचा ठाव नाही अश्या रस्त्यावर चालत रहायचे. कपाळावरची भळभळणारी जखम तशीच घेउन. दारोदारी तेल मागत फिरायचे. मिळाले तर ठीक अन्यथा तो भेसूर एकटेपणा उराशी कवटाळुन पाय खुरडत चालत रहायचे. अमरत्वाचे वरदान म्हणायचे की एकटेपणाचा शाप? शापच तो. अमरत्वाचा गोडवा गोंजारण्यासाठी मनाला लागते ती शांती ते सौख्य उरलय कुठे? ते संपले रणांगणावरच. पित्याच्या मृत्युबरोबरच. कदाचित त्याच्याही आधी. नाही कदाचित पित्याच्या मृत्युबरोबर नाहितर घटोत्कचाला युद्धात अभयदान देउन "बाळा मागे फिर. माझ्यापुढे तुझा टिकाव नाही लागायचा" असा आपुलकीचा सल्ला देणारा यौद्धा एकाएकी एका परिवाराचा निर्वंश करण्यासाठी एवढा कृर होइल? अजुन न उमलेल्या कळीवर, एका गर्भावर मृत्युचे सावट सोडेल?
गर्भावर सोडलेल्या त्या एका अस्त्राने द्रोणांच्या या पोराला कायमस्वरूपी खलनायक ठरवुन टाकले. १८ दिवसांच्या त्या युद्धात कितीतरी हिडीस कृत्ये घडली. दुसर्याच्या आडुन बाण मारले गेले, मागुन बाण सोडुन हात छाटले गेले, ध्यानस्थ, पदस्थ यौद्ध्यांच्या माना छाटल्या गेल्या, गुऋचे ऋण त्याच्या जटा ओढुन मान कापुन फेडले गेले, भक्ष्यावर अनेक गिधाडे तुटुन पडावीत तसे अनेक यौद्धे कोवळ्या वीरांवर तुटुन पडले. पण या सर्वाची परमावधी गाठली गेली भृणहत्येने. ज्यावेळेस रणात धारातर्थी पडलेल्या यौद्ध्यांची कलेवरं गिधाडे लुचत होती तेव्हा त्याहुन घ्रूणास्पद कृत्य या भावी व्यासाकडुन घडावे याहुन मोठे दुर्दैव नाही. जी कल्पना कधी नियतेनेही केली नव्हती ते घडले.
अर्थात ज्याची कल्पना नियतीने केली नसेल अश्या बर्याच गोष्टी अश्वत्थ्याम्याने केल्या. एका ब्राह्मणाच्या घरी जन्म घेउन धर्म मात्र कधीच ब्राह्मणाचा जपला नाही. लहानपणापासून त्याला शास्त्रापेक्षा शस्त्र जास्त जवळचे वाटले. एक घोट दूधासाठी तहानलेला जीव तो. वाचेच्या बळावर अन्न मिळत नाही पण तलवारीच्या पात्यावर धन मिळते हे त्याला लहानपणीच कळाले. त्यातही पिता साक्षात परशुरामांकडुन अस्त्र विद्या शिकलेला, सर्व अस्त्रे जाणणारा. पुत्रावर अंमळ थोडे जास्तच आंधळे प्रेम असणारा. असेच आंधळे प्रेम हस्तिनापुरच्या युवराजाला त्याच्या आंधळ्या बापाकडुन मिळाले आणि अश्वत्थामाला त्याच्या बापाकडून. कदाचित हाच समान धागा पकडुन दोघांनीही एकमेकांना अंतापर्यंत साथ दिली.
युद्धात दुर्योधनाच्या बाजूने प्राणपणाने लढलेला हा एकमेव वीर. भीष्म दोलायमान तर द्रोण शत्रुलाच पक्षपाती, कर्णाला नुकत्याच गवसलेल्या ओळखीने संभ्रमात टाकलेले तर शल्य तर बोलुन चालुन शत्रुचाच आप्त. दुर्योधनाचा केवळे एक सेनापती त्यासाठी जीव ओतुन लढला आणी तो म्हणजे अश्वत्थामा. इतरांनी दुर्योधनासाठी लढताना प्राण दिले. कदाचित त्याच्या ऋणातुन मुक्त होणासाठी किंवा जिवंत राहुन पांडवांना हारवण्याऐवजी जीव देउन मध्यम मार्ग स्वीकरण्याचे आमीष स्वीकारुन. अश्वत्थामा मात्र लढला. भीष्म युद्धाआधी म्हणाले होते "हा आपल्या प्राणांना घाबरतो". माणूस असण्याचेच लक्षण आहे ना ते? मरणाला सगळेच घाबरतात. आणि कपटाने आपल्या आप्तांचे आपल्या गुरुचे बळी देणारे लोक समरात असताना आपल्या प्राणांची क्षिती बाळगणे अयोग्य थोडीच आहे? पण रणांगणावर दुर्योधनाच्या बाजूने लढणार्या त्या तमाम यौद्ध्यांमध्ये प्राणांची तमा बाळगुनही शिर हातावर घेउन लढणार्यात अश्वत्थामाही मागे नव्हताच की. काहितरी पळवाटा शोधुन शत्रुला मारणे टाळुन मृत्युला कवटाळण्याची अहमहिका लागलेला तमाम तथाकथित एकनिष्ठांच्या मांदियाळित केवळ राजाच्या चरणी आपल्या निष्ठा वाहुन मरु किंवा मारु या भूमिकेतुन लढलेला तो एकमेव तर होता.
कर्णाकडे अमोघ कवचकुंडले होती तर अर्जुनाकडे अमोघ अस्त्रे आणि अक्षय भाते पण केवळ युध्द्शास्त्रातल्या सर्वोत्तम ज्ञानाच्या आधारे २ अक्षौहिणीहुन जास्त सैन्य कापुन काढणार अश्वत्थामा अजेयच म्हणायचा. आख्या द्रुपद आणि पांडव कुळाला त्याने एका रात्रीत कापुन काढले. रात्रीत भक्ष्यावर हल्ला करणार्या घुबडाला बघुन म्हणे याला प्रेरणा मिळाली. पण हीच वृत्ती तुमच्या आमच्यात सगळ्यांच्यातच नाही का? रणांगणावर ध्यानस्थ बसलेल्या भुरिश्रवाला मारणार्या सात्यकी मध्ये ती नव्हती का? पुत्रशोकात मग्न असलेल्या निरस्त्र पदाती गुरुच्या जटा धरुन "थेरड्या मर आता" म्हणणार्या दृष्ट्यद्युम्नात ती नव्हती काय आणि त्यावर टाळ्या पिटुन हसणार्या भीमात नव्हती काय? कोवळ्या अभिमन्युवर एकत्र चाल करुन जाणार्या इतर ५ महारथ्यांमध्ये ती नव्हती काय? शत्रुची एक वीतभर भूमी मिळवण्यासाठी रात्र आणि दिवस न बघता समोरच्यावर चाल करुन जाणार्या आजच्या लष्करशहांमध्ये ती नाही आहे काय?
अश्वत्थ्यामाचा हा माणूस बनण्याचा प्रवास लहानपणीच सुरु झाला. पोटात वन्हीने असंगाशी संग करण्यास प्रवृत्त केले. आणि मग पित्याची सबुरीची शिकवण योग्य न वाटता कपटकारस्थानांची क्षात्र वृती योग्य वाटु लागली तर त्यात नवल ते काय? एकदा सख्य अधर्माशी केले की मग धर्माची वाट दाखवणारे हजारो भेटले जरी तरी काय उपयोग?
न आने दिया राह पर रहबरों ने,
किये लाख मंजिल ने हमको इशारे।
-'अर्श' मल्सियानी
महाभारतातला अश्वत्थामा हा असा आहे. मित्राच्या जीवाला जीव देणारा. वेळप्रसंगी नामोहरम यौद्ध्याला देखील दया दाखवुन परत पाठवणारा. महापराक्रमी पण उतावीळ. नारायणास्त्र, ब्रह्मशीर अस्त्र अशी सर्व मार्ग खुंटल्यावर वापरायची अस्त्रे त्याने बिनदिक्कत वापरली. संयम, सहनशीलता, प्रेम, नीरक्षीरविवेकबुद्धी या ब्रह्मचारी गुणांचा अभाव असुनही ब्रह्मशीर वापरले. मग ते परत घ्यायची ताकद होती कुठे? बर ते वळवले दूसरीकडे तेव्हासुद्धा अपमानाचे शल्य अजुन बाकी होते, सूडाचा विखार अजुन धगधगत होता. समस्त पांडवस्त्रियांच्या गर्भावरच त्याने हल्ला चढवला. पोटातले जीव मारले, सुवासिनींची प्रजननक्षमता मारली. आंधळा अहंकार आणि सूडाच अतिरेक जेव्हा मानवाच्या मनाचा ताबा घेतो तेव्हा त्याच्यातला राक्षस जागा होतो. अश्वत्थामा माणूसच होता पण त्याचा अंताला राक्षस झाला. तो परिणाम युद्धाने घडवला की शत्रुने हे गौण ठरते कारण क्रौर्यात पण बूज राखण्यात शत्रु यशस्वी ठरला पण अश्वत्थामा मात्र क्रौर्याची परिसीमा गाठुन मोकळा झाला.
म्हणुनच कृष्णाने त्याचा मणी काढुन घेतला. त्या मण्याच्या जागी झालेली भळभळती जखम घेउन अश्वत्थामा आजही हिंडतो आहे, कलीयुगाच्या अंती कलीला मदत करुन व्यासपदी पोचण्यासाठी आजही धडपडतो आहे. अमरत्वाचा शाप घेउन पाठीवर अपराध्याच्या कुबड्या वागवत, उषःकालाच्या प्रतिक्षेत... त्याचा धड ना सूड पुर्ण झाला ना आयुष्याचा फेरा
न इधर के रहे, न उधर के रहे,
न खुदा ही मिला, न विसाले-सनम।
सदसदविवेकबुद्धी, संयम, प्रेम जिव्हाळा गमावलेला प्रत्येक व्यक्ती असाच फिरत असतो, दिशाहीन, अर्थहीन, द्रुष्टीक्षेपात नसणार्या एका ध्येयाच्या शोधार्थ स्वतःच्या विश्वात असीर (बंदीवान) झालेला. बघा तुमच्यात एखादा अश्वत्थामा नाही ना दडलेला?
प्रतिक्रिया
6 Apr 2012 - 2:26 pm | पिंगू
वेगळाच लेख आहे, मृत्युंजया. आवडला गेला आहे.
>> सदसदविवेकबुद्धी, संयम, प्रेम जिव्हाळा गमावलेला प्रत्येक व्यक्ती असाच फिरत असतो, दिशाहीन, अर्थहीन, द्रुष्टीक्षेपात नसणार्या एका ध्येयाच्या शोधार्थ स्वतःच्या विश्वात असीर (बंदीवान) झालेला. बघा तुमच्यात एखादा अश्वत्थामा नाही ना दडलेला?
हम्म. हे मात्र खरेच.
- पिंगू
6 Apr 2012 - 2:40 pm | परिकथेतील राजकुमार
अतिशय सुरेख लेखन रे मृत्युंजया.
फक्त एक / दोन मुद्यांवरती थोडी चर्चा व्हावी असे म्हणतो.
१) अश्वत्थामा हा जन्मजात अमरत्वाचे वरदान लाभलेला पुण्यवान नव्हता. उलट त्याला अमरत्वाचा शाप देण्यात आला. अश्वत्थाम्याच्या शिरावरती एक दैवी मणी होता. ह्या मण्याच्या प्रभावाने त्याच्या शरीराला झालेली कोणतीही इजा, जखम तात्काळ भरुन येत असे. त्याच्या युद्धानंतरच्या कृत्यानंतर तो मणी कृष्णाने काढून घेतला व त्याला प्रलयापर्यंत हिंडत राहन्याचा शाप दिला गेला.
२) अश्वत्थाम्याने फक्त एकाच पांडव स्त्रीच्या गर्भावरती शस्त्र वळवले आणि ती म्हणजे उत्तरा. ते देखीक कृष्णाच्या आज्ञेने. झोपेत असलेल्या पांडवपुत्रांची हत्या केल्यानंतर अश्वत्थामा दडून बसला असताना पांडवांनी त्याला गाठले. शेवटच्या प्रयत्न म्हणून अश्वत्थाम्याने ब्रम्हशिर्सा अस्त्राचा प्रयोग केला. ह्यावेळी ते अस्त्र शांत करण्याचे देखील मनात न आणला अर्जुनाने ते अस्त्र आणि ते अस्त्र सोडणारा ह्या दोघांचा पूर्ण विनाश करणारे पाशुपत* अस्त्र त्याविरुद्ध सोडले. ह्या दोन्ही अस्त्रांच्या धडकेने संपुर्ण पृथ्वी दोलामय झाली आणि तिन्ही लोकात आकांत पसरला. त्यावेळी कृष्णाच्या आज्ञेवरुन अर्जुनाने आपले अस्त्र मागे घेतले, मात्र अस्त्र परत घेण्याचे ज्ञान नसल्याने अश्वत्थामा हतबल होता. अर्जुनाच्यासाठी सोडलेले ते अस्त्र अर्जुन अथवा त्याच्या कुळातील कोणाचा वेध घेतल्यानंतरच शांत होणार होते. अशावेळी कृष्णाच्या आज्ञेने ते अस्त्र त्याने उत्तरेच्या गर्भाकडे वळवले. मात्र श्रीकृष्णाने आपल्या तपोबलाने त्या गर्भास पुढे जीवदान दिले.
6 Apr 2012 - 3:01 pm | मृत्युन्जय
१. बरोबर. महाभारतानुसार त्याला ३००० वर्षे हिंडत राहण्याचा शाप आहे. इतर पुराणांनुसार तो कलियुगाच्या अंताला कलीला मदत करेल. त्यानंतर कॄष्णद्वैपायन व्यासांचा जन्म संपेल आणि त्या जागी अश्वत्थामा व्यास होइल. व्यास ही पदवी आहे आणि कृष्णद्वैपायन (सध्याचे आणि महाभारतातले सुद्धा) २८ वे व्यास आहेत अशी समजूत आहे.
२. अश्वत्थ्यामाने ते कृत्य व्यासांच्या सल्ल्यने केले . त्यांनी त्याला अजुन काही उपाय नसल्याने तुला जे योग्य वाटेल ते कर असे म्हटले. महाभारतानुसार त्याने ते केवळ उत्तरेच्या गर्भाव नाही सोडले तर सर्व पांडवस्त्रियांच्या गर्भावर सोडले. त्यापैकी उत्तरा गरोदर होती. त्यामुळे कृष्णाने त्या अर्भकाचा जीव वाचवला. इतर सगळ्याजणी परत कधीही माता बनु शकल्या नाहीत. काही लोकांच्या मते त्या बाणाने अश्वत्थ्यामाने पांडवांची उरलीसुरली सगळी मुले मारली (बभ्रुवाहन वगळता). पांडवांना एकुण १३ मुले होती. त्यातला बभ्रुवाहन जिवंत राहिला तर ८ जण रणांगणावर गेले. इतर चौघांचे काय झाले याचा महाभारतात उल्लेख नसल्याने "womb of Pandava Women" (अनेकवचनी शब्द आहे) या शब्दाचा अर्थ काही जाणकार उरलासुरला कूळ असा काढतात.
6 Apr 2012 - 3:25 pm | प्रचेतस
सुंदर लेख रे मृत्युंजया.
विदर्भ मराठवाड्याच्या प्रतीमध्ये तरी फक्त उत्तरेच्याच गर्भावर सोडले असाच उल्लेख आहे.
बाकी उरलेली चार मुले कोणती? ५ द्रौपदेय. सौभद्र, घटोत्कच आणि अर्जुनपुत्र इरावान हे रणात गेले. बभ्रुवाहनाने नंतर अश्वमेधाचा घोडा अडवून अर्जुनाचा पराभव केला असा उल्लेख आहेत. बाकी मुलांबद्दल वाचल्याचे आठवत नाही.
6 Apr 2012 - 4:04 pm | मृत्युन्जय
पांडवांची १३ मुले ही:
युधिष्ठीर + द्रौपदी = प्रतिविंद्य
युधिष्ठीर + देविका = यौधेया
भीम + द्रौपदी = सुतसोम
भीम + हिडिंबा = घटोत्कच
भीम + वलंधरा = सर्वगा
अर्जुन + द्रौपदी = श्रतकिर्ती
अर्जुन + सुभद्रा = अभिमन्यु
अर्जुन + चित्रांगदा = बभ्रुवाहन
अर्जुन + उलुपी = इरावण
नकुल + द्रौपदी = सतानिक
नकुल + करेणुमती = निरामित्रा
सहदेव + द्रौपदी = श्रुतकर्मन
सहदेव + विजया = सुहोत्रा
वरीलपैकी इरावणाला सातव्या किंवा नवव्या दिवशी अलंबुसाने मारले. तो मायाविद्येत प्रविण होता. घटोत्कचाला १४ व्या दिवशी कर्णाने वैजयंती शक्ती वापरुन मारले. अभिमन्यु १३ व्या दिवशी दु:शासनाच्या मुलाच्या हातुन गदायुद्धात गेला. द्रौपदीच्या ५ मुलांना अश्वत्थंनामाने १८ व्या दिवशी रात्री मारले. बभ्रुवाहनाने युद्धात भागच घेतला नव्हता. तो मणिपुरच्या राजाला (म्हणजे स्वतःच्या आजोबालाच) दत्तक गेला होता त्यामुळे पांडवकुलीन राहिला नव्हता. इतर मुलांचा काही उल्लेख नाही. ही सगळी मुले ब्रह्मशीर अस्त्राच्या उपयोगाने अश्वत्थामाने मारल्याचा काही लोकांचा समज आहे.
महाभारतात खालील परिच्छेद आहे:
This blade of grass (inspired into a fatal weapon) will, however, fall into the wombs of the Pandava women,
for this weapon is high and mighty, and incapable of being frustrated. O regenerate one, I am unable to withdraw it, having once let it off. I will now throw this weapon into the wombs of the Pandava women.
चारही ठिकाणी अनेकवचनी शब्द आहे आणि उल्लेख समस्त पांडवस्त्रियांचा आहे केवळ उत्तरेचा नाही. :)
6 Apr 2012 - 3:45 pm | प्रचेतस
दृष्टद्युम्नाची झोपेत हातापायांनी बुकलून हत्या केली गेली. अश्वत्थ्याम्याकडे मला शस्त्राने मार अशी विनवणी करूनही अश्वत्थ्याम्याने त्याला शस्त्रांशिवाय मारले. शस्त्राने मरण आलेल्यांना स्वर्ग मिळतो पण दृष्टद्युम्नालाही तेही मिळू नये हा हेतू.
ह्या सर्व गोंधळात द्रौपदीपुत्र जागे होऊन त्यांनी शस्त्र धारण केले पण काही प्रतिकार होण्यापूर्वीच खड्ग, शर अशा आयुधांच्या सहाय्याने त्यांचाही वध करण्यात आला.
अर्जुनानेही ब्रह्मशिरास्त्रच सोडले असा महाभारतात उल्लेख आहे. पाशुपतास्त्र कधीही वापरले गेले नाही.
6 Apr 2012 - 4:13 pm | मृत्युन्जय
अर्जुनानेही ब्रह्मशिरास्त्रच सोडले असा महाभारतात उल्लेख आहे. पाशुपतास्त्र कधीही वापरले गेले नाही.
हो अर्जुनानेही ब्रह्मशीरच वापरले.
परंतु रौद्र अस्त्र आणि पाशुपत एकच आहे असे मानले तर ते कधी वापरले गेलेच नाही असेही नाही. रौद्र अस्त्राचा प्रयोग अर्जुनाने कर्णावर केला होता परंतु तो निष्फळ ठरला.
रुद्र म्हणजे महादेवाचा अवतार अथवा महादेवाचे रुप त्यामुळे रुद्रास्त्र हे महादेवाचे नसून रुद्राचे अस्त्र आहे आणि महादेवाचे अस्त्र पाशुपतच आहे आणि त्यामुळे ही दोन्ही अस्त्रे वेगवेगळी असा युक्तिवाद केला जातो. :)
6 Apr 2012 - 2:57 pm | प्यारे१
काळ्यातल्या करड्या रंगांना प्रकाशात पाहण्याचा छान प्रयत्न...!
6 Apr 2012 - 3:01 pm | अन्या दातार
उत्तम विवेचन!
6 Apr 2012 - 3:38 pm | आत्मशून्य
A man should not be known by his intention but by the result of his actions...
अश्वत्थामा एक सुरेख उदाहरण.
6 Apr 2012 - 3:42 pm | ५० फक्त
सुंदर लिखाण, चला एखाद्याच्या हटवादी भुमिकेमुळं का होईना पण तु या विषयावर पुन्हा लिहिता झालास हे उत्तम.
आणि उर्दु शायरी अन महाभारताचा मिलाफ तर एकदम झकास.
6 Apr 2012 - 8:01 pm | पैसा
अगदी सहमत!
7 Apr 2012 - 12:53 am | मी-सौरभ
मी पण
6 Apr 2012 - 8:17 pm | निनाद मुक्काम प...
लेख उत्तम जमला आहे.
सलीम खान म्हणतात त्याप्रमाणे महाभारतासारखी स्टोरी आणि स्क्रीन प्ले जगात कोठेही सापडणार नाही. ह्यातील प्रत्येक प्रसंग घटना पात्र ह्यांना योग्य तो न्याय मिळाला आहे.
महाभारत हे आपण इसाप नीती किंवा बोध कथा ह्या अनुषंगाने वाचले तर वास्तविक आयुष्यात त्याचा प्रचंड उपयोग होईन.
मराठीत महाभारतावर आधारित म्हणी जश्या " हा सूर्य हा जयद्रथ" "किंवा हाती न धरी शत्र मी गोष्टी संगे युक्तीच्या चार" ह्या आपल्या आयुष्यात कितीतरी प्रसंगात उपयोगी पडतात.
आज तू महाभारतातील ह्या अनामिक वीराचा योग्य परिचय करून दिला. माझ्या मते आजतागायत कोणीही मुलाचे नाव अश्वस्थामा ठेवले नाही. कारण त्याच्या वाटचे भोग कोणाच्याही वाट्याला येऊ नये सर्वांना वाटते.
6 Apr 2012 - 11:41 pm | दादा कोंडके
सहमत
- असहमत
मूळ (म्हणजे नक्की कोणतं हा प्रश्न आहेच) महाभारतात आणि इतर जणांनी केलेल्या (संपूर्ण किंवा एके पात्र डोळ्यासमोर ठेउन) विवेचनात कलात्मक मूल्य असेल पण उगाच ओढून ताणून वास्तविक आयुष्यात त्याचा उपयोग होणं म्हणजे काय हे कळत नाही. अगदी कायद्यातल्या कलमांना सूद्धा पळवाटा निघतात मग असल्या शेकडो (हजारो?) वर्षापुर्वींच्या कथांची काय कथा? एखाद्याकडे त्या काळचे, परिस्थितीचे संदर्भ समजून घेउन "मोरल" काढणारं शहाणपण असेल तर मग त्यासाठी महाभारत तरी कशाला हवं.
6 Apr 2012 - 10:09 pm | शुचि
लेख सुरेख जमला आहे.
अश्वत्थामा, बुद्धाला भेटतो असा जी एंचा एक धडा शाळेत असल्याचे स्मरते.
6 Apr 2012 - 11:46 pm | दादा कोंडके
ही कथा तुम्हाला इथं वाचायला मिळेल.
7 Apr 2012 - 10:29 am | मृत्युन्जय
शुचि / दादा अतिशय धन्यवाद. ही कथा आजवर वाचली नव्हती, अतिशय सुरेख आहे. दुव्याबद्दल माझ्याकडुन दुआ. :)
6 Apr 2012 - 11:18 pm | सुहास..
लेख सवडीने वाचेनच ,
सध्या लिहीता झालास याचा आनंद झाला हे सांगण्यापुरते !!
7 Apr 2012 - 12:41 am | अत्रुप्त आत्मा
सदसदविवेकबुद्धी, संयम, प्रेम जिव्हाळा गमावलेला प्रत्येक व्यक्ती असाच फिरत असतो, दिशाहीन, अर्थहीन, द्रुष्टीक्षेपात नसणार्या एका ध्येयाच्या शोधार्थ स्वतःच्या विश्वात असीर (बंदीवान) झालेला. बघा तुमच्यात एखादा अश्वत्थामा नाही ना दडलेला? >>> लाइक...लाइक...सुप्पर लाइक :-)
7 Apr 2012 - 12:53 am | बबलु
अप्रतिम लेख.
वेगळ्या angle ने पाहिलेला.
7 Apr 2012 - 9:00 am | मन१
माहिती छान.
शंका :-
अश्वत्थ्याम्यासोबत रात्री पांडवपुत्र व दृष्टद्युम्नाची हत्या करण्यात भूरिश्रवा(यादव कुक्ळातील) ,व खुद्द कृपाचार्यही सामील होते ना? त्यांना कुनीच कसलाही बोला का लावत नाहित?
7 Apr 2012 - 9:54 am | प्रचेतस
कृपाचार्य आणि यादवकुळातील कृतवर्मा हे दोघे रात्रीच्या संहारात सामिल होते. दोघांनीही अश्वत्थ्याम्याला समजवण्याच्या परोपरीने प्रयत्न केला. पण त्याने कुणाचेच ऐकले नाही. अश्वत्थामा पांडव शिबीरात घुसून संहार करत असताना हे दोघेही शिबीराच्या प्रवेशद्वारावर उभे राहून बाहेर पळत आलेल्या सैनिकांचा संहार करत होते.
कृपाचार्य तर चिरंजीवीच होता. महाभारतीय युद्धानंतर ३६ वर्षांनी प्रभासतटावर यादवी युद्धात या सात्यकीच्या हस्ते कृतवर्मा मारला गेला तसेच सर्व यादव परस्परांत लढून नष्ट झाले.
भूरीश्रवा हा कुरुकुळातील.
बाल्हिकाचा पुत्र सोमदत्त, त्याचा मुलगा भूरीश्रवा. बाल्हिक हा प्रतीपाचा पुत्र शांतनुचा सख्खा भाऊ. भीष्माचा काका. ह्या तीनही पिढ्या कौरवांच्या बाजूने युद्धात लढल्या. निशःस्त्र सात्यकीचा खड्गाने वध करण्याचा प्रयत्नात असलेल्या भूरीश्वराचा हात अर्जुन तोडतो. त्यानंतर ध्यानास बसलेल्या भूरीश्रव्याचा सात्यकी वध करतो.
7 Apr 2012 - 12:33 pm | प्रसाद प्रसाद
कृपाचार्य तर चिरंजीवीच होता.
ही नवीन माहिती कळाली. चिरंजीवी म्हणजे अमरच ना? नंतर कृपाचार्याचे काय झाले? महाभारतात युद्धाकाळानन्तरची याविषयीची काही गोष्ट आहे का? जशी अश्वथाम्याची आहे तशी.
7 Apr 2012 - 12:57 pm | मृत्युन्जय
सप्त चिरंजीवी खालील प्रमाणे:
१. बळी
२. हनुमान
३. बिभीषण
४. कृष्णद्वैपायन
५. कृपाचार्य
६. अश्वत्थामा
७. परशुराम
कृपाचार्य चिरंजीवी का आहेत याबद्दलची काही गोष्ट नाही महिती पण ते युद्धकाळाच्या आधीपासुनच चिरंजीव म्हणुन प्रसिद्ध झाले होते.
7 Apr 2012 - 4:55 pm | विसुनाना
अश्वत्थामा बलीर्व्यासो हनुमानो बिभीषणः| कृप: परशुरामश्च सप्तै: ते चिरंजीवा:|
11 Apr 2012 - 10:56 am | धन्या
सध्या हे सारे कुठे असतात? त्यांची भेट घेता येते का?
11 Apr 2012 - 10:59 am | मृत्युन्जय
अश्वत्थामा तापी नदीच्या किनार्याने फिरत असतो म्हणे. शोधा जाउन. ;)
11 Apr 2012 - 11:49 am | धन्या
तापी नदीच्या किनार्याने एकदा जायचंच आहे. मुक्ता तापी नदीच्या तीरावरच वीजेमध्ये गुप्त झाली होती.
बाकीच्यांचं काय? गेला बाजार बिभीषण तरी श्रीलंकेत कुठल्यातरी रो हाऊस राहत असावा ना. :)
11 Apr 2012 - 2:59 pm | मृत्युन्जय
गेला बाजार बिभीषण तरी श्रीलंकेत कुठल्यातरी रो हाऊस राहत असावा ना.
ते अश्वत्थामा भेटल्यावर त्यालाच विचार ने. त्याचा गुरुबंधु जाउन भेटुन आला होता म्हणे बिभीषणाला ;)
9 Apr 2012 - 2:58 pm | ५० फक्त
मा. वल्ली, तुम्ही हस्तिनापुर राज्याचे जन्म्-मरण नोंदी खात्याचे डायरेक्टर होता काय ओ ?
आणि चिरंजीवी काय लिहिलंय ओ ते, चिरंजीव लिहायचं की माझ्या डोळ्यासमोर एकदम इंद्रा द टायगर आला, आणि मग इंद्र - कृपाचार्य - महाभारत - टायगर काही म्हणता काही लिंक लागेना दोन मिनिटं.
7 Apr 2012 - 1:25 pm | मृत्युन्जय
युद्धानंतर ३६ वर्षांनी जी यादवी झाली त्याचे मूळ याच युद्धात होते.
दुर्वांसांनी यादवांना निर्वंश होण्याचा दिलेला शाप खरा व्हायचा वेळ आली तशी अशुभ चिन्हे दिसु लागली. त्यामुळे जितक्या लोकांना वाचवता येइल तितक्यांना वाचवावे असा विचार करुन कृष्ण सर्व यादव कुलासकट नेमका प्रभासक्षेत्री गेला. तिथे सात्यकी आणि कृतवर्मा दारु पिउन मातले आणि सात्यकीने अश्वत्थाम्याची साथ दिल्याबद्दल कृतवर्म्याची निर्भत्सना केली. कृतवर्म्यानेही कपटाने भुरिश्रवाला आणी इतर कौरववीरांना मारल्याबद्दल सात्यकी आणि पांडवांना शिव्या घातल्या. यावरुन त्या दोघांचे युद्ध सुरु झाले. थोड्या वेळाने सात्यकीच्या मदतीला प्रद्द्युम्न आला (कृष्णाचा मुलगा). त्या दोघांनी मिळून कृतवर्म्याला मारले. ते बघुन कृतवर्म्याच्या पाठिराख्यांनी या दोघांना मारले यातुनच तुंबळा युद्ध (यादवी) सुरु झाले आणि यादवांचा निर्वंश झाला.
7 Apr 2012 - 9:29 am | स्पा
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण लेख..
आवडल्या गेला आहे
7 Apr 2012 - 9:45 am | अमितसांगली
मस्तच.....अतिशय सुंदर लिखाण
7 Apr 2012 - 12:39 pm | मुक्त विहारि
छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद....
7 Apr 2012 - 3:10 pm | गणपा
लेख तर आवडलाच पण प्रतिसादाच्या निमित्ताने येणारी माहिती ही उत्तम आहे.
12 Apr 2012 - 6:16 am | किसन शिंदे
+१
मृत्युंजया, महाभारतावरील तुझ्याकडून येणार्या अशा अनेक लेखांची वाट पाहतोय. :)
9 Apr 2012 - 2:41 pm | चित्रगुप्त
युधिष्ठीर + द्रौपदी = प्रतिविंद्य
भीम + द्रौपदी = सुतसोम
अर्जुन + द्रौपदी = श्रतकिर्ती
नकुल + द्रौपदी = सतानिक
सहदेव + द्रौपदी = श्रुतकर्मन
......................हे नेमके कळले कसे ?
यावरून द्रौपदी सुमारे एकेक वर्ष फक्त एका पतीबरोबरच रहात असावी.... याविषयी महाभारतातील नेमके उल्लेख कोणते आहेत?
तज्ञ मंडळींनी प्रकाश टाकावा.
9 Apr 2012 - 2:55 pm | ५० फक्त
त्याकाळी डिएनए सारख्या टेस्ट उपलब्ध असाव्यात अथवा सर्व पांडवांचे केस वेगवेगळ्या रंगाचे होते असं ऐकलेलं आहे त्यावरुन ठरवत असतील. हाकानाका.
विनोद बाजुला, पण हे असे अजुन काही प्रश्न माझ्याही डोक्यात फार फार वर्षे आहेत, कुठं विचारावेत तर मार खायची वेळ यायची म्हणुन विचारत नाही.
11 Apr 2012 - 10:14 am | मृत्युन्जय
पांडवांनी २-२ महिने वाटुन घेतले होते त्यामुळे कोण कोणाचा मुलगा आहे हे ओळखने सोप्पे होते. जेव्हा द्रपदी त्यापैकी एकाबरोबर असेल तेव्हा इतरांनी तिच्यावर हक्क न दाखवण्याचा नियम होता. त्यामुळेच युधिष्ठिर आणि द्रौपदी एकत्र असताना शस्त्रागारात प्रवेश केला म्हणुन अर्जुनावर वनवास ओढवला ही कथादेखील आपणास ज्ञात असेल.
11 Apr 2012 - 5:15 pm | इरसाल
त्यामुळेच युधिष्ठिर आणि द्रौपदी एकत्र असताना शस्त्रागारात प्रवेश केला म्हणुन अर्जुनावर वनवास ओढवला ही कथादेखील आपणास ज्ञात असेल.
ते शस्त्रागारात नसावे.
11 Apr 2012 - 5:27 pm | मृत्युन्जय
अहो महाभारतकालीन लोक देखील एड्वेंचरस होते म्हटलं. :)
शस्त्रागारातच होते. संदर्भ शोधतो महाभारतातले :)
11 Apr 2012 - 5:31 pm | प्रचेतस
शोधू नकोस.
शस्त्रागारातच होते हे नक्की. :)
11 Apr 2012 - 5:33 pm | मृत्युन्जय
तुला आता कोणीतरी टोमणा मारतय बघ की तु अगदी त्यावेळेस शस्त्रागारातच लपून बसलेला असल्यागत लिहितोयस म्हणुन ;)
11 Apr 2012 - 5:35 pm | प्रचेतस
:)
9 Apr 2012 - 11:26 pm | चित्रगुप्त
५० फक्त......... पण हे असे अजुन काही प्रश्न माझ्याही डोक्यात फार फार वर्षे आहेत, कुठं विचारावेत तर..........
अहो येउ द्या ना तुमचे प्रश्न .... बघुया काय काय उत्तरे देतात मिपाकर...
11 Apr 2012 - 1:45 pm | शरभ
छान लेख.
डॉ. प. वि. वर्तक ह्यांच्या कुठल्याशा पुस्तकात (मला वाटते 'पुनर्जन्म') अश्वथामावर काही लेख आहे. पण त्यात मला वाटते त्यांनी अश्वथामाचा पुनर्जन्म झाल्याचा उल्लेख केला आहे. अर्थात ते झाले त्यांचे मत किंवा धारणा.
मृत्युंजया, आपण ते वाचले आहे काय ?
अवांतर - डॉ. वर्तकांनी महाभारताचे कालमापन केलेले आहे बरेचसे पूरावे देऊन. ते देखील वाचण्यासारखे आहे.
--शरभ
11 Apr 2012 - 2:19 pm | प्रचेतस
वर्तकांसारख्या भंपक माणसांचे दाखले देऊ नका हो.
11 Apr 2012 - 3:01 pm | मृत्युन्जय
नाही मी ते नाही वाचलेले. वास्तव रामायण वाचले आहे. त्यातल्या काही गोष्टी पटल्याही पण ते सूक्ष्मरुपाने मंगळावर वगैरे जाउन आल्याचे वाचले आणि अजुन काही वाचण्याचा नाद सोडुन दिला. :)
11 Apr 2012 - 4:19 pm | शरभ
वल्ली आणि मृत्युन्जय यांस.
एखाद्या माणसाच्या सर्वच गोष्टी आपल्याला पटतात असे नाही. परंतु आंधळा विरोध नसावा.
१२ व्या शतकात, जर एखाद्याने म्हंटले असते की , माणसे उडुन एका ठि़काणाहुन दुसरया ठिकाणी जाऊ शकतात, तर तेव्हा ते हास्यास्पद ठरले असते. आता ध्यानातुन एखादी गोष्ट साध्य होते कि नाही ह्यावर ते नीट अवगत केल्याशिवाय बोलणे चुकीचे आहे. कदाचित त्यात काही सत्य नसेल देखील पण म्हणुन ते भंपक आहे म्हणुन अव्हेरणे थोडेसे अयोग्य ठरेल.
असो. विषयांतर झाले. वर्तकांचे कालमापन आणि दाखले नक्कीच वाचण्यासारखे आहेत.
12 Apr 2012 - 10:15 am | मृत्युन्जय
सर्वांना मनापासुन धन्यवाद. पन्नाशी गाठलेला धागा बघुन डोळे भरुन आले (त्यातले १२ प्रतिसाद माझेच आहेत् याकडे कोणी लक्ष वेधुन घ्यायचा कृपया प्रयत्न करु नये ;) )
6 Feb 2014 - 7:03 pm | दुश्यन्त
अश्वत्थामा हा महावीर होता. या पात्राबद्दल जास्त कुठे लिहिले गेले नसवे. आणि लिहिले तर केवळ लहानपणीची ती दुधाची गोष्ट, द्रोणाने पुत्रप्रेमाने शिकवलेली जास्तीची विद्या आणि शेवटचा संहार यामुळे झालेली त्याची खलनायक प्रतिमा हेच जास्त वाचायला मिळते. मृत्युंजय यांचे आभार यासाठी कि त्यांनी दुर्योधनाकडून मनापासून लढलेला योद्धा ही त्याची बाजू दाखवून दिली. आणि याच्यामुळेच द्रोणांना सुद्धा कौरवाककडून लढायला लागले. द्रोणांच्या परक्रमापुढे पाच पांडव, द्रुष्टद्युम्न ,द्रुपद, सात्यकी आदी सर्व महारथी निरुत्तर होते. शेवटी कपटानेच त्यांना मारावे लागले. मात्र एवढे होवूनही अश्वथाम्याने दुर्योधनाला तह करायला सुचवले होते. माझ्या पित्याच्या हत्येचा बदल मी स्वतः घेईन तू युद्ध थांबवून तह कर असे तो म्हणाला असा उल्लेख आहे. द्रोनाचार्यनी याला अर्ध्या पांचाल राज्याचा राजा बनवले होते.याची मुले, विवाह यावर काही वाचायला मिळत नाही. द्रौपदी स्वयंवरात हा पित्याबरोबर उपस्थित होता.कदाचित तो लक्ष्यवेध करण्यास सक्षम असावा असे वाटते. (जाणकार यावर प्रकाश टाकू शकतात). मात्र द्रौपदी ही तर आपली बहिण ( द्रुपद आणि द्रोण हे गुरुबंधू या नात्याने) म्हणून मी पणामध्ये भाग घेवू शकत नाही असे तो दुर्योधनाला म्हणतो.
शेवटी याने द्रुष्टद्युम्नला ज्या पद्धतीने कापून काढले ते योग्यच होते असे वाटते. द्रोणाचा हा प्रिय पुत्र खरोखर वीर पुरुष म्हणून शोभतो.उत्तरेच्या गर्भावर हल्ला हा मात्र हीन प्रकार होता.
6 Feb 2014 - 7:06 pm | इशा१२३
हा लेख ही छानच!
6 Feb 2014 - 9:18 pm | तिमा
मृत्युंजय यांना विनंती की त्यांनी महाभारतातील कमी प्रसिद्ध अशा पात्रांबाबत लेखमाला लिहावी, मग ते नायक असोत वा खलनायक!
7 Feb 2014 - 4:25 pm | घन निल
या असीर चा असीरगढ शी काही संबंध आहे का ? असीर गढ किल्ल्यावर अजून हि अश्वथामा येतो म्हणे !
7 Feb 2014 - 4:55 pm | प्रमोद देर्देकर
खुप छान माहिती मिळाली.
7 Feb 2014 - 5:03 pm | अनन्न्या
लेख आणि प्रतिसाद यांमुळे बरीच माहिती कळली.
7 Feb 2014 - 5:26 pm | यशोधरा
किती सुरेख लेख! मी कसाकाय वाचला नव्हता इतके दिवस!