ब्राऊ..७
...........
सकाळी सकाळी झोपेतून उठलोय असं वाटत होतं. पण जागा झालो तेव्हा डोळेच उघडेनात. उघडले तरी वेगळीच खोली दिसायची .. वेगळेच पडदे.. आणि बाहेर प्रकाश नाहीच.. सकाळही नसणार म्हणजे...
गपकन परत डोळे मिटून घ्यायचो. परत केव्हा झोप लागायची कळायचंच नाही. स्वप्न पडतंय म्हणून सोडून द्यायचं. परत जागं व्हायचं. असं बराच वेळ चाललं होतं.
एकदा डोळे उघडले. बघितलं तर आई. मग परत मिटून घेतले.
मधेच खूप वेळाने परत जाग आली. बघतो तर बाबा... मग स्वप्न आहे अशीच खात्री झाली. गेलेले बाबा कुठे येणार माझ्यासमोर आता..
पुढच्या वेळी मराठे दिसली तेव्हा मात्र स्वप्न असलं तरी चालेल पण चालू रहायला हवं असं ठरवलं. मी खूप ताकद लावून हसण्याचा प्रयत्न केला. शेवटी माझा चेहरा हसला असावा.
आणि तीही हसली.
माझे डोळे भरले. घशात पाणी आलं.
हाताशी गरम मऊ लागलं. पुन्हा डोळे उघडले हळूच.
माझा हात माझ्या छातीवर होता आणि त्यावर मराठेचा हात..
स्वप्नच च्यायला...
"त्याला झोपू दे आता..", कोणीतरी म्हटलेलं ऐकलं..
..मग परत डोळे मिटले...
....
....
कितीवेळ गेला माहीत नाही.
"मऊभात दिला तर चालेल का त्याला? नुसतं भाताचं पाणी?", आई कोणालातरी विचारत होती.
"सध्या नको. खाल्लेलं उलटलं तर छातीत जाईल..", कोणीतरी उत्तर दिलं.
मी डोळे मिटून ऐकत होतो...
मधेच अंधार दिसायचा.. मधेच उजेड..आणि सारखी झोपच लागायची. उगीच मिनिटभर जाग यायची तेवढीच.
मग हळूहळू जाग वाढली. एकदा मानही वळवायचा प्रयत्न केला पण ती हलत नव्हती. अडकवून ठेवली असणार.
बोलायचोसुद्धा मधेमधे.. पण समोरचा काही ऐकून न घेता लगेच "तू बोलू नको.. तू झोप बघू.." करायला लागायचा.
मी वैतागून गेलो.
परांजप्याची आई माझ्या आईसोबत बराच वेळ तिथे बसलेली असायची. संजीवनी हॉस्पिटलच होतं ते. आता लक्षात आलं. जाधव अजून तिथेच होता की घरी सोडला होता ते कळायला मार्ग नव्हता. मीही कोणाला विचारलं नाही.
"बोलतोय तसा तो अधूनमधून...पण मार बराच लागलाय ना.. म्हणून..", परांजप्याची आई कोणालातरी सांगत होती.
मी आपला डोळे मिटून ऐकत होतो. असलं वाक्य ऐकून मला मी कैलासवासी होण्याच्या मार्गावर असल्याचे सुतकी भास झाले.
"अहो.. इथे त्याच्यासमोर काही बोलू नका तुम्ही..", आईने त्यांना गप्प केलं.
पण असं कितीजणांना गप्प करणार होती ती.
तरीही परांजप्याच्या आईचा आवाज बंद झाला नव्हता, "ते याचं कुत्रं आणलंय आमच्याकडे सांभाळायला.. काही खातपीत नाहीये अन नुसतं आरडत बसतंय सूर काढून रात्रीचं.."
मला एकदम गलबलून आलं. ब्राउ माझी आठवण काढत होता. मला त्याला भेटायला हवंच होतं. जवळ घ्यायला हवं होतं. चारपाच शिव्या हासडायला हव्या होत्या. त्याशिवाय त्याने खाल्लं नसतं.
"आई. ब्राऊला तू स्वतः जाऊन खायला घाल..", मी पुटपुटत म्हणालो.
"बरं.. बघू.. तू बोलू नको जास्त..", आई पुन्हा तेच म्हणाली.
हळूहळू ग्लानी कमी होत गेली तसं आधीची ती मराठेचा हात हातात घेतल्याची आठवण म्हणजे भासच असणार अशी खात्रीच झाली. तरीही मी आईला एकदा विचारलं, "कॉलेजातून कोणी आलं होतं का गं मला भेटायला?"
"हं. बरेच मित्र येऊन गेले", आई म्हणाली.
"अम.. बरं..", मी म्हणालो. आता खास करुन कोणी मुलगी येऊन गेली का असं मला विचारवेना.
मग बिछान्यात चुळबुळत बरेच तास तसेच काढले... भासच असणार अशी स्वतःची परत परत समजूत घालत. विचारायला भयंकर लाज वाटत होती. आणि तसंही विचारलं असतं तर कोणीतरी कॉलेजातली मुलगी आणि तिच्याविषयी मी स्पेशली विचारतोय म्हटल्यावर आईचं लगेच भलतंच काहीतरी सुरु झालं असतं. त्यापेक्षा नकोच ते.
मग दोन दिवस अतिशय कंटाळवाणे गेले. परांजप्या सारखा भेटायला येत होता. पण झालेल्या गोष्टीविषयी आईसमोर त्याच्याशी बोलता येत नव्हतं. आणि आई उठून जायलाच तयार नाही.
मला आता बरंच बरं वाटत असूनही आई मला अजिबात इकडे तिकडे फिरु देत नव्हती. पडून पडून मी जाम वैतागलो आहे, आता मला घरी सोडा असं मी डॉक्टरांच्या व्हिजिटच्या वेळी त्यांना सांगितलं. त्यांनीही "उद्या घरी जायला हरकत नाही", असं म्हटलं.
मला भयंकर आनंद झाला. त्या आनंदात जरा श्वास घेतोय तोवर आई म्हणाली, "तुझे मित्र आलेत बघ भेटायला.."
नजर टाकली तर खोलीच्या दारात जाधव आणि पाप्या दोघे उभे दिसले. मी एकदम हादरलो. मग सावरुन बसलो. शांत असल्याचं दाखवायला हवं होतं. परांजप्यासोबत मला एकटा न सोडणारी आई नेमकी यावेळी मात्र "बसा तुम्ही गप्पा मारत" असं म्हणत उठून बाहेर गेली.
पाप्याच्या गालावर काळसर छाप अजूनही दिसत होता. त्याने दाढी वाढवली होती, तरी डोळ्याखाली उघड्या भागात तो डाग लपत नव्हता. जाधव थोडासा बारीक झाल्यासारखा वाटत होता. बाकी सरांनी दिलेल्या हग्या माराच्या खुणा काही शिल्लक दिसत नव्हत्या.
अतिशय गंभीर चेहर्याने दोघे कॉटपाशी आले आणि उभे राहिले. त्यांची पोझ श्रद्धांजलीसाठी मिनिटभर शांतता पाळल्यासारखी दिसत होती.
"काय रे.. बरंय का आता?", पाप्या बोलता झाला.
"हं", मी उत्तरलो. हवेत तणाव भरला होता.
"हे बघ, तुला पण लफडा नकोय अन आम्हाला पण ..काय ?", जाधव बोलला.
"हं..", मी काय दुसरं बोलणार होतो?
"पोलीसबिलिस मधे आले की भानगड वाढणार. मग तू पण गेलास आन मी पण..", जाधव..
मी गप्प बसलो. जाधवही गप्प बसला.. मग पाप्याने त्याच्याकडे बघत तोंड उघडलं, "बघ केळ्या, आम्ही सेटल करायला म्हणून आलो..उगाच वाढवूया नको..तेज्यायला चॅप्टर पोरीपायी दोघे फसाल नसत्या लफड्यात.."
मला एकदम धीर आला. सालं आता हे थांबवायलाच हवं होतं. बहुतेक माझा त्यादिवशीचा पिसाळलेला अवतार बघून पाप्यालाही जास्त ताणण्यात अर्थ दिसेना झाला असावा. माझ्यासाठी तर ही चांगलीच गोष्ट होती.
"मला पण आता तिच्यात इंट्रेस नाय", जाधव तेवढ्यात मधे बोलला., "आणि तू पण तिच्यापाठी फिरु नको.. मिटवून टाकूया.."
हे तर्कट विचित्र होतं.. झाला परत बल्ल्या.. मी काय म्हणून मराठेला सोडायचं..?
"तुला आता इंट्रेस्ट नाय तर मग माझ्या तिच्या फिरण्याने तुला काय अडचण रे?", मी सरळसरळ विचारलं.
"नाय.. तसं नाय...", करत जाधव घुटमळला. त्याला लफडा नको होता आणि त्याचवेळी माझं तिच्याशी पुढे काही होत असेल तर तेही सहन होत नव्हतं.
मी झटपट विचार केला. जाधव आणि पाप्याची पनवती माझ्यापाठून आधी सोडवायला हवी होती. मराठेने आधीच मला क्लियर नाही म्हटलं होतं. कितीही चांगला विचार केला तरी मला तिने लाथ दिली होती हे खरंच होतं. मग तिच्या नादी लागून नसता फेरा कशाला लावून घ्यायचा? अशीही ती मिळणार नाहीच आहे..बाकी पुढचं पुढे बघू.. आत्ताच झगडा कशाला?
"ठीक आहे", मी सट्टकन म्हणालो.."नाय लागत तिच्यामागे मी.."
पाप्याने शेकहँडसाठी हात पुढे केला. मी हात मिळवला. एवढ्या जाडजूड पंजेवाल्या सोंडग्याला तवा मारला होता हे मलाच पटेना.
जाधवने हात मागे आखडून घेतले होते. पाप्या "मिळव आता हात भेंचोत", करुन ओरडला तेव्हा त्यानेही माझा हात हातात घेतला. जाधवचा हात तसा किरकोळ होता. यालाच आपण पहिल्यांदा का नाही ठोकला असा विचार मनात आला.
पण सध्या यांच्याबरोबर शांतता ठेवणं जास्त महत्वाचं होतं..आधी मला शांतपणे घरी जायचं होतं. ब्राऊला जवळ घ्यायचं होतं. परांजप्या, डीके आणि मोमीनसोबत व्हिडिओ बघायचे होते..
मिनिटभर नुसतेच उभे राहून पाप्या आणि जाधव झटक्यात निघून गेले.
दुसर्या दिवशी सकाळीच मी घरी आलो. परांजप्याने ब्राऊ आधीच घरी आणून सोडला होता. ब्राऊने मला पुढच्या दोन पंजांनी खाली पाडलं आणि चाट चाट चाटून घाण करुन टाकला. मधेच गुर्फ आणि कुं असे चिडण्याचे आणि रडण्याचे आवाजही येत होतेच. मी बरेच दिवस गायब झाल्याचा भयंकर संताप तो दाखवत होता. त्याला घट्ट मिठी मारुन शांत केलं. त्याने अन्नाला तोंड लावलं नाहीये असं परांजप्या म्हणाला होता. मी स्वतःच्या हाताने त्याला अंडी घातली तेव्हा दहा अंडी गब्बकन खाऊन टाकलीन. नंतर लहान बादली अर्धी भरुन पाणी प्यायला आणि नाचत नाचत पायाशी येऊन बसला. मी मग बसल्याजागी आडवारलो..पाय ताणले आणि आला जबरी पेटका. मग जरावेळ बोंबलून झोपून गेलो.
रात्री आधी परांजप्या आला आणि मागोमाग मोमीन आणि डीके आले. आज कॅसेट बघण्याचा कोणाचा मूड नव्हता. तरीपण नुसतेच गप्पा मारत आम्ही गच्चीत बसलो. ब्राऊसुद्धा तिथेच पायात वेटोळं करुन पडला. डोळ्याचा पांढरा भाग दाखवत तो पडल्यापडल्या आमच्याकडे तिरका बघत होता.
विषय अर्थात दुसरा काही असणं शक्यच नव्हतं. तिघे पाप्या आणि जाधवला शिव्या घालत होते.. . मी काल झालेल्या सेटलमेंटचं त्या तिघांना सांगितलं नाही. डीके आणि मोमीन घरी गेल्यानंतर मी फक्त परांजप्याला सांगणार होतो.
बोलता बोलता विषय मराठेवर आलाच..
"साल्या, आवडते ना तुला ती.. मग सरळ विचारुन का नाय टाकत?", डीके म्हणाला.. बिचारा अजून जगाच्या बराच मागे होता. परांजप्या त्याच्याकडे बघून नुसताच हसला.. मोमीन गप्प होता.
"विचारलेलं रे मी डायरेक्ट..नाय बोलली ती मला..", मी स्पष्ट केलं. उगाच तेच तेच ऐकत बसायला नको म्हणून.
मग डिक्याला पुढे काहीच बोलता येईना. मयताची बातमी ऐकल्यासारखा गंभीर थोबाड करुन तो बसला.
"आयला, तुम्ही कसली लफडी करत बसता रे पोरींसोबत.. सरळ सेटल होऊन टाकायचं ना..", मोमीन म्हणाला.
आम्ही नुसतंच प्रश्नार्थक चेहरा करुन त्याच्याकडे बघत राहिलो.
"म्हणजे लग्न करुन मोकळं व्हायचं रे, चांगली पोरगी बघून..", त्याने स्पष्ट केलं.
"चांगली बघून म्हणजे? चांगलीच बघितल्येय ना केळ्याने?", परांजप्या माझी साईड घेत बोलला.
"तसं नाय रे.. चांगली असली तरी भानगडीतलीच आहे ना तशी ती.. शेवटी पोरगी कशाला हवी? बायको म्हणूनच ना? मग अशी भानगडीतली पोरगी पुढे बायको म्हणून चालेल का तुला?"
आयला, हा विचार मी केलाच नव्हता. आता ठीक आहे. पुढे खरंच लग्न करायची वेळ आली तर मी कायम मारामारी आणि लफडी थोडाच करत बसणार होतो..?
एकदा मी विचारात पडलोय म्हटल्यावर मोमीनला पाजळण्यासाठी जोर आला..
"शेवटी सगळ्याजणी अंधारात काळ्याच रे..", तो पुढे बोलला..
"भोसडीच्या, पोरगी म्हटली की तुला तेवढंच दिसतं काय रे कुत्र्या..", मी मोमीनवर ओरडलो.. "कुत्र्या" म्हटल्यावर ब्राऊ कुईं करुन उठला आणि जवळ आला. त्याला थापेने परत लोळवला..
"दुसरं काय असतं रे आणि? आं? पोरगी म्हणजे शेवटी लग्न करायलाच ना? म्हणजे शेवटी झोपायलाच ना?", मोमीन आं आं करत तावातावाने विचारायला लागला..
"साल्या, लग्न करायचं म्हणजे नुसतं झोपायचं असतं की काय येडझव्या?", परांजप्या मधे पडला.
"का? केळ्या, तू नाय करत का मराठेविषयी विचार बाथरूममधे? छातीबिती नाय बघत तिची?"
"पिऊन आला का रे तू भडव्या?", मी ओरडलो. मोमीन एरवी असं बोलल्याचं कधीच घडलं नव्हतं.
मी मराठेविषयी सेक्सी विचार कधी केलाच नव्हता. मराठेशी माझं सगळं एकदम पवित्र होतं याची मला खात्री होती..
"मी नाही करत तसला विचार तिच्याविषयी.. तुझा मेंदू सडला असेल.. आमचे शाबूत आहेत..", मी उत्तरलो.
"केळ्या.. गांडूपणा नको करु...तुला पोरगी लग्नाच्या वेळी कुवारी पायजे...", मोमीन म्हणाला.
"कायतरी बोलू नको..काही कुवारी बिवारी असं नाहीये.. हिंदी पिक्चर आहे काय?", मी म्हणालो. आवाजात दम आणण्याचा मी बराच प्रयत्न केला..
"तसंच आहे..तिच्याविषयी का रे पवित्र विचार करतोस? लग्न केल्यावर तर नाही ना करणार....त्याच्याआधी मात्र मनातल्या मनातसुद्धा तिच्यासोबत झोपलास तर कळी कुस्करेल अशी तुला भीती वाटते ना?.. स्वतःपासूनच वाचवून स्वतःसाठीच पहिल्या रात्रीसाठी कुवारी ठेवतोयस ना तिला..म्हणजे एकूण एकच ना ?", मोमीनचा आवाज तापला होता..
मला एकदम धक्काच बसला. तो म्हणतोय ते खरं असेल? कधी ना कधी ती मला सगळीच्या सगळी आणि स्पर्श न झालेली हवी आहे म्हणून मी आत्ता तिचं कौमार्य माझ्याच मनातसुद्धा जपतोय की काय? मानसिक कौमार्य वगैरे काही? यापूर्वी मला आवडलेल्या पण मिळण्यापलीकडे गेलेल्या पोरींशी मनातल्या मनात मी जे करायचं ते केलंच होतं.. मराठेला स्वतःतल्याच त्या गलिच्छ माणसापासून वाचवून ठेवत होतो मी? पहिल्या वापरासाठी ? ती मिळेलसं वाटत होतं म्हणून?
ती मिळण्याची आशा संपली की तिलाही ..?
मग पुढे चर्चेची गरमागरमी चालूच राहिली. मीही जमेल तसं शिरा ताणून त्यात भर घालत होतो. मधेच बाथरूममधे जाऊन तोंड धुवायला म्हणून आरशात पाहिलं तर मोमीनने फाडलेला माझा चेहरा पांढराफटकच राहिला होता.
......................
पुढे दोन महिन्यातच धडाधड नव्यानव्या गोष्टी झाल्या..
एका पहाटे पाहिलं तर कराटे क्लास बंद झालेला.. सर अचानक कुठेतरी गायबच झाले होते. नंतर आठवड्याने कळलं की ते कुठल्यातरी नवीन गावी खोली घेऊन राहिलेत. मराठेही त्यांच्यासोबत आहे आणि ती त्यांच्यासोबतच राहणार आहे.. केमिस्ट्री लॅबमधे बर्याच परीक्षानळ्या एकदम फुटल्यासारखं मनाला वाटलं.. मराठेचे आईबाबा आणि सरांची बायको यांच्या मनाचा जो चिखल झाला तो एकत्र मिळून माझ्या एकट्याच्या मनाचा झाला. त्यांना निदान सहानुभूति मिळाली. माझं मात्र काही कोणाला कळलंसुद्धा नाही.
मुख्य म्हणजे हॉस्पिटलमधे गुंगीत तो मराठेचा गरम हात.. हसणं.. मराठे आली होती का? ते सगळं खरंच घडलं होतं का वगैरे आईला विचारत बसण्याची गरज राहिली नाही..
मन निबर होतंय न होतंय तोवर बेगम गाभण झाल्याचं राणेंनी सांगितलं.. मला एक पिल्लू देणार होते.. छोटा ब्राऊ.. पुन्हा आनंद तिच्यायला..
त्याच आनंदात ब्राऊला ढुंगणावर एक फटका दिला..
सालं.. ब्राऊचं तरी नीट झालं ना सगळं..
...कळलं त्या रात्री मी साईकृपात जाऊन परांजप्यासोबत शेपूट न घालता आयुष्यातली पहिली बियर मारली...
..............
(सध्या समाप्त..)
प्रतिक्रिया
5 Sep 2011 - 4:58 pm | स्पा
आईचा हे काय>
चायला....
.................
.............
................
..
5 Sep 2011 - 4:59 pm | यकु
:(
:(
:(
:(
:(
:(
5 Sep 2011 - 5:04 pm | वपाडाव
हे काय बरोबर नाय राव.....
तुम्ही येकदम यु-टर्न देता राव .....
आमचं केळ्या जीव ओवाळतंय अन तिकडं त्या ब्राउला पोरं होत्याती.....
हट्ट... कायतर बघा त्या केळ्याचं.....
कराटे मास्तरला मीच जाउन झापतो....
लय मोठा अन मस्त भाग....
एका श्वासात संपिवला....
आता पुढच्यासाठी मोकळे....
5 Sep 2011 - 5:28 pm | नावातकायआहे
आवडला!
5 Sep 2011 - 5:30 pm | गणेशा
जबरा,,,
बाकी बिचार्या कमनिय मराठे ला, एकदम कराट्याचा तग्या मिळवुन दिल्याबद्दल अआनि घाईत समाप्त केल्याबद्दल निषेध..
----
गवि त्या केळ्याप्रमाणेच तुम्हाला कोणी धमकी नाहि ना दिली की लवकर संपवा सगळे ..
5 Sep 2011 - 5:40 pm | किसन शिंदे
हात जरा आखडताचं घेतला कि तुम्ही, सगळं कस एकदम पटकन संपवल्यासारखं. :(
5 Sep 2011 - 5:42 pm | शाहिर
केळ्याचा दुख बगवला नाय आप्ल्या ला...मंग आपन पन बीर मारली
5 Sep 2011 - 11:54 pm | मी-सौरभ
आधी बीअर मग 'बाप्पा मोरया'
लै भारीच की वो तुमी.
5 Sep 2011 - 6:44 pm | मृत्युन्जय
शेवट अपेक्षित होता. पण एकुण कथेसाठी आणि मांडणीसाठी तुम्हाला साष्टांग प्रणाम. हा शेवटचा भाग कथेचा हायलाईट होता असे म्हणेन. एकदम भिडला हो गवि मनाला. :)
5 Sep 2011 - 7:48 pm | अमोल खरे
ब-याचदा चांगल्या प्रेमकथेचा शेवट वाईटच होतो.
5 Sep 2011 - 8:40 pm | धन्या
जबरदस्त !!!
कथेचा शेवट दु:खांत असला तरी वास्तवाच्या जवळ जाणारा... का कोण जाणे, याच कारणासाठी आम्हाला एरिक सेगलची लव्ह स्टोरी नावाची फडतूस दिर्घकथा आवडली होती. (कोण म्हणाले लव्ह स्टोरी कादंबरी आहे? :) )
एकंदरीत ब्राऊ ही पुर्ण मालिकाच भारी होती, अगदी शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी. इतक्या सुंदर लेखनासाठी धन्यवाद.
5 Sep 2011 - 9:12 pm | जाई.
ब्राऊने शेवटपर्यत उत्सुकता कायम ठेवली
सुंदर लेखन
5 Sep 2011 - 9:24 pm | रेवती
शेवट आवडला नाही. पटला तर नाहीच नाही.
घाईघाईने मालिका संपल्यासारखी वाटतिये.
5 Sep 2011 - 10:16 pm | प्रचेतस
शेवट पटला.
दुनियादारी, शाळाचे शेवट काहीसे याच मार्गाने गेले होते.
ब्राऊ आणि और गिटार मालिका एकदम जबरदस्त.
आता नविन मालिका लवकरच सुरु करा.
6 Sep 2011 - 12:06 am | मी-सौरभ
लई भारी....
शेवट छान होता पण घाईत गुंडाळल्यासारखं फीलिंग मला पण आलं :(
6 Sep 2011 - 12:48 am | शिल्पा ब
मस्त. भारी लिहिलंय.
6 Sep 2011 - 4:33 am | ५० फक्त
आवडला, बरीचशी प्रत्यक्षात घडु शकेल असं वाटलं, सराचं अन केळकरचं खरंच काहीतरी वाकडं असावं, ज्यामुळ त्यानं असा गेम वाजवला त्याचा.
6 Sep 2011 - 5:35 am | नगरीनिरंजन
केळ्याला हिरो न करता केलेला तात्पुरता शेवट आवडला. केळ्याच्या मनात निर्माण झालेले विचारभोवरेही आवडले. पुढच्या लिखाणाच्या प्रतीक्षेत.
6 Sep 2011 - 6:54 am | सुहास झेले
हा भाग पण मस्तच जमलाय, वाचकांना कसं खिळवून ठेवायचं हे तुम्हाला चांगलं माहित आहे गवि... !!
ह्या कथेचे अजूनही भाग झाले असते, पण असो... काही तक्रार नाही. शेवट मनाला लागला, आणि आवडला :) :)
6 Sep 2011 - 9:00 am | चतुरंग
मस्त रंग भरत आणलेली कथा एकदम गुंडाळल्यासारखी झालीये. :(
(नाखूष) रंगा
6 Sep 2011 - 9:02 am | मैत्र
शिरोडकरची आठवण आली....
दहावीचं भकास वर्ष पेक्षा छोटा ब्राऊ हा शेवट जास्त चांगला वाटला...
जबरदस्त लेखमाला... तुफान!
6 Sep 2011 - 10:18 am | गवि
सीरीज संपली म्हणून अगदी पहिल्या भागापासून आत्तापर्यंत सर्वकाही आवडीने वाचून प्रतिसाद देणार्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. जे काही लिहिलं त्यावर स्वतः टिप्पणी किंवा त्यात सुधारणा, त्याच्यावरील टीकेचा बचाव या सर्वामुळे लिखाण आणि वाचनातली मजा जाते. तरीही एक पोच देण्याकरिता काही अजून म्हणू इच्छितो.
दास्तान ए आवारगी, और गिटार आणि ब्राउ ही एकसंध मोठी कथा आहे. त्यात मधे काळाच्या गॅप्स नाहीत. एकातून पुढे सुरु अशा या तीन गोष्टी आहेत. त्यात सस्पेन्स, सनसनाटी किंवा फार मोठे ट्विस्ट नाहीत. एका कॉलेजच्या मधल्या वर्षाला असणार्या पोराची साधी सरळ स्टोरी आहे.
यात विशेषतः शेवटचा भाग गुंडाळल्यासारखा वाटण्याची काही कारणं मला दिसली ती अशी:
ब्राऊ ही खूप छोट्या भागात आणि अनियमित अंतराने लिहिली असल्याने वाचणार्याच्या मनातली कंटिन्युइटी सतत तुटत होती. विशेषतः शेवटून दुसरा भाग आणि शेवटचा भाग यात बरंच अंतर पडलं. त्यामुळे एव्हेंटफुल अशा एका भागानंतर पुढच्याच भागात एकदम शेवट झालेला दिसल्याने तो अचानक झाल्यासारखं वाटतंय. सर्व भागांची एकसंध कथा जोडून एक डॉक्युमेंट म्हणून वाचली तर शेवट तितकासा अचानक जाणवणार नाही याची मला खात्री आहे.
शिवाय मी एक कच्चा लेखक आहे. शेवटांच्या बाबतीत तर मी जरा जास्तच कच्चा आहे (शिकाऊ पायलटचे लँडिंग बराच काळ "वीक" राहते..) अधिकाधिक लिहून होईल तसतशी अजून सफाई येईल. रामदासकाकांची या बाबतीत शिकवणी लावायचा विचार आहे.. अर्थात त्यांनी घेतली तर.. :)
एक कसलातरी मेसेज देणारी कथा नसल्याने सरळसोट निवेदनातून केळकरच्या बाबतीत झालेले इमेज ब्रेक्स मला दाखवायचे होते. त्याने मनात बनवलेली आणि जपलेली मुख्य पात्रांची प्रत्येक प्रतिमा इथे फुटलेली दिसते. सर, मराठे, जाधव, पाप्या, मोमीन आणि शेवटी अगदी स्वतःची देखील. ब्राऊ हा न बदलणारा रेफरन्स आहे फक्त.. जाणीव होण्यासाठी.
परीक्षानळ्यांचं फुटणं म्हणजे हेच.
गिटार आणि ब्राउ हे प्रॉप्स आहेत. नृत्य करताना जसं एखादी रिंग, रिबिन, काठी, झुळझुळीत झिरमिळी यांच्या सहाय्याने आणि त्यांच्या भोवताली स्टेप्स घेतल्या जातात तसं काहीसं आहे.
कितपत जमलंय हे सांगणं कठीण आहे. पण आलेल्यात बहुसंख्य कौतुकाच्या प्रतिक्रिया आहेत आणि ज्या प्रतिकूल आहेत त्याही इतक्या मनापासून आणि प्रांजळ आहेत की त्यातही मला कौतुकच दिसलं आहे.
सर्वांचे पुन्हा मनापासून आभार..
6 Sep 2011 - 11:37 am | स्वैर परी
ईतर भागांप्रमाणे हा भाग हि आवडला! शेवट वाचुन थोडसं दु:ख जरुर झालं.
पण आता लवकरच तुम्ही आणखी एखादी मालिका सुरु कराल हि आशा मनात बाळगुन तुमच्या ह्या मालिकेला सलाम!
खरच फार सुंदर लिहिता आपण. काहि कच्चे वगैरे नाहिए हं तुमचं लिखाण.
असेच लिहित रहा! :)
6 Sep 2011 - 11:59 am | मन१
हरेक भाग आवडला होताच.
त्यातही हा सर्वात जास्त. अगदि चित्रदर्शी (का त्यासारखं काही म्हणतात ते) वर्णन झालय
6 Sep 2011 - 1:47 pm | गणपा
मी ही मालिका ब्राऊ १ पासुन वाचायला सुरवात केली. त्याबद्दल बोलताना गविंकडुन कळलं की कथा 'दास्तान ए आवारगी' आणि 'और गिटार' पासुन सुरु झालिये. त्यांच्याकडुन दुवे पण मिळाले. एका बैठकीत सगळे भाग वाचुन काढले.. आणि (आपल्या पिढीतल्या बरेच जणांच शालेय जीवन थोड्या फार अंतराने सारखच असतं म्हणा म्हणुन) मग केळ्याशी कुठे कुठे रिलेट होत गेलो.
दोघांच्या भांडणात बोकाच लोणी पळवणार हा शेवट काहीसा अपेक्षीत होता.
उगाच फिल्मी शेवट न केल्याने हा भागही आवडला.
केळ्याबद्दल पुढील मालिकांतुन माहिती मिळत जाईलच ही आशा बाळगतो.
पुलेशु.
6 Sep 2011 - 3:42 pm | चिर्कुट
गविसाहेब, __/\__!!
एकदम वास्तवदर्शी शेवट. पटला आपल्याला. उगाच ओढून ताणून गोड शेवट न केल्याबद्द्ल मंडळ आभारी आहे. :-)
आणि मोमीनची बडबड वाचून आमच्याही मनात कधीकाळी झालेला गोंधळ दूर झाल्यासारखे वाटले हां.. ;-)
10 Sep 2011 - 10:21 am | विजय नरवडे
शेवट पटला.
10 Sep 2011 - 3:03 pm | आळश्यांचा राजा
संपूर्ण मालिका आवडली.
सुरेख आणि मॅच्युअर लिखाण!
बाय द वे, त्या मोमीनचा नंबर देता का! ;-)
14 Oct 2011 - 9:08 am | प्यारे१
आयच्या गावात पाऊस....!
हे र्हायलेलंच की वाचायचं. अर्थात मनःस्थितीच नव्हती.
गविना विचारल्यावर कळालं हे संपलंय.
अॅज युज्वल गवि रॉक्स... !
6 May 2013 - 11:37 pm | लॉरी टांगटूंगकर
गविंची कमाल सिरीज वर काढतोय,
वाड्यात...१ च्या प्रतिक्रियात काही ठिकाणी दिसले म्हणून शोधली अन् संपूर्ण एकत्र वाचली...ही आणि ऑर गिटार _पण
कमाल!!!!!!!!!!!!!
6 May 2013 - 11:44 pm | मुक्त विहारि
छान काम केलेस..
7 May 2013 - 12:07 am | बांवरे
ब्राउ मंजी काय पड्लच व्हता प्रश्न. बरं केलंस आता वाचतूय.
22 Aug 2014 - 6:35 pm | बहिरुपी
तिन्ही लेखमालीका एका झटक्यात वाचुन काढल्या! केळ्या, ब्राउ, परांजप्या आणि इतर सगळी पात्र अगदी डोळ्यापुढे उभी राहीली. खुपच सुंदर लिहीलय गवि तुम्ही!
14 Apr 2018 - 3:44 am | प्रसाद गोडबोले
तिन्ही लेखमालीका एका झटक्यात वाचुन काढल्या!
मीही !
खतरनाक लिहिलं आहे गविशेठ ! लेखनाची शैली विशेष भावली !!
पुढील भाग लिहिले आहाएत का ? नसतील कृप्या लिहावेत अशी विनंती करत आहे !
1 Sep 2016 - 2:22 am | धनावडे
सगळ्याच लेखमाला छान आहेत
वाड्यात चा पुढचा भाग कधी.
1 Sep 2016 - 9:40 pm | आदूबाळ
@जव्हेरभाव - तुम्हाला गविंच्या ज्या कथेबद्दल म्हणत होतो तीच ही.