मिपावर उठवळ मोर्चा (स्लटवॉक)

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
26 Aug 2011 - 10:27 am

तुम्हाला मिपावर कधी कोणी टोमणा मारला आहे का? कधी तुमच्यावर शाब्दिक किंवा वैयक्तिक हल्ला झालाय का? आणि तो होऊन वर त्याबद्दल तुम्हालाच दोषी धरलं गेलंय का? तसं असेल तर चला, आपण सगळे मिळून मिपावर उठवळ मोर्चा काढू...

आता तुम्ही मला विचाराल, की उठवळ मोर्चा म्हणजे नक्की काय? तर उठवळ मोर्चा हे स्लटवॉकचं मराठी भाषांतर आहे. कॅनडा का कुठल्याशा देशात एका पोलिस अधिकाऱ्यांने बायकांना सांगितलं की 'तुम्हाला जर बलात्कार करून घ्यायचा नसेल तर हे असले उठवळ बायकांसारखे उत्तान कपडे घालणं थांबवा'. त्यावरून बायका खवळल्या. एक तर पुरुष प्रधान संस्कृतीत पददलित म्हणून रहायचं. वर वेळोवेळी पुरुष बलात्कार करतात. आणि त्याच संस्कृतीचा आधिकारिक प्रतिनिधी धोरणाचा भाग असल्यासारखा त्यांना नाक वर करून सांगतो की ज्यांच्यावर बलात्कार होतात त्याच उठवळ! तोही स्वतः पुरुष. याचा निषेध झालाच पाहिजे. म्हणून त्यांनी जगभर जागोजागी मोर्चे काढले. स्लटवॉक. त्यामागचा उद्देश असा होता की स्त्रीने कुठचे कपडे घातले यावरून बलात्कार होतो की नाही हे ठरू नये. नाहीतर प्रत्येकीलाच मुकाट्याने बुरखा घालून रहावं लागेल.

तर ही पार्श्वभूमी झाली स्लटवॉक अथवा उठवळ मोर्चाची. आता तुम्ही म्हणाल की 'मिपावर या उठवळ मोर्चाचा काय संबंध? मिपावर तर कपड्यांचा प्रश्नच येत नाही. चेहरेदेखील दिसत नाहीत, सगळेच आयडीच्या मुखवट्याआड लपलेले असतात. हा, आता काही लोक पूर्वी कपडे काढून टाकल्यासारखे निर्लज्जपणे वावरत. पण ती पूर्वीची गोष्ट झाली. मिपा आता थोडंसं मध्यमवयीनाळलेलं आहे. प्रभू गुरुजीदेखील क्रिप्टिक कमी, समुपदेशक जास्त असं लिहितात. आजच्या रसभरीत खादाडी बरोबर येणारे रसरशीत युवतींचे फोटो देखील थांबले. आता पेंड्यूलम दुसऱ्या दिशेला स्विंग झालाय की काय असं वाटावं असे जॉन, सलमान वगैरेंचे टॉपलेस फोटो येतात. वाताबरोबर बऱ्याच कुक्कुटांनी दिशा बदलली आहे. आता उठवळपणा वगैरे करायला जागाच राहिली नाही!' :-(

हा मुद्दा अगदीच चुकीचा नाही, पण एवढ्यात हिंमत सोडू नका. उठवळपणासाठीचा लढा हा केवळ हवे ते कपडे घालण्याचा (नको ते न घालण्याचा), लैंगिक स्वरूपाचा लढा वाटतो. 'मी स्त्री आहे. मला हवे ते कपडे घालण्याचा हक्क आहे. त्यासाठी मला शिक्षा होता कामा नये.' पण उठवळ मोर्चाची कल्पना अधिक व्यापक आहे. 'मी अमुकतमुक आहे. मला हवी तशी अभिव्यक्ती करण्याचा मला अधिकार आहे. त्याबद्दल मला कोणी सोम्यागोम्याने मला शिक्षा करता कामा नये'. आपण कोण आहोत याची जाणीव असणं व त्याप्रमाणे अभिव्यक्ती करण्याचं स्वातंत्र्य मिळणं महत्त्वाचं. पुलंनी म्हटलेलंच आहे की उंट तिरका म्हणजे तिरकाच चालणार, हत्ती सरळ म्हणजे सरळच चालणार. पण समाज हा काही बाबतीत क्रूर असतो. पुलंच्या वाक्यांना टाळ्या देतो, पण प्रत्यक्षात सर्वमान्य चालीपेक्षा तुम्ही वेगळे चाललात तर तो तुम्हाला फटकारतो, सुनावतो.

मिपावरती वेगवेगळ्या भूमिका घेणाऱ्यांचंदेखील हेच होतं. आपलं स्वत्व, आपली आयडेंटिंटी आपल्या शब्दांतून उघडी केल्यावर तोकड्या कपड्यांतून दिसणाऱ्या अंगाकडे जशा आंबटशौकीन, वाईट नजरा वळतात तशाच इथेही वळतात. मग वैचारिक बलात्कार होतात. आणि कॅनडाच्या त्या पोलिसाने जसं स्त्रियांनाच, व त्यांच्या अभिव्यक्तीलाच दोषी ठरवलं तसं इथेही होतं. म्हणून मी म्हणतो की सर्व पीडितांनी एकत्र होऊन याविरुद्ध आवाज उठवायला हवा

तुम्ही सामान्यांसारखाच विचार करता म्हणून सो कॉल्ड विचारवंत तुम्हाला सडके किंवा भडके म्हणतात का?
की तुम्ही लिबरल विचारसरणी बाळगल्यामुळे कोणीही उठून सडक्या प्रतिक्रिया देऊन तुम्हाला विचारजंती म्हणतो?

तुम्ही केवळ नवे आहात, तुमचा कंपू नाही किंवा जुन्या कंपूएवढा मोठा नाही म्हणून जुनेजाणते तुमचा छळ मांडतात का?
तुम्ही दारू पिता म्हणून दारू न पिणारे तुम्हाला तुच्छ लेखतात का?

तुम्ही शाकाहारी आहात म्हणून मांसाहारी तुम्हाला हिणवतात?
तुम्ही सश्रद्ध आहात म्हणून निरीश्वरवादी तुमच्या विरोधात धागे काढतात?

तुम्ही संपादक आहात म्हणून काही संधीसाधू तुमच्याविरोधात चौपाटी, भेळपुरी, उपोषण वगैरे हत्यार उपसतात का?
तुम्ही निवासी भारतीय आहात म्हणून तुम्हाला भारतात घडणार्‍या प्रत्येक वाईट गोष्टीबद्दल दोष दिला जातो आहे?
तुम्ही अनिवासी भारतीय आहात तेव्हा तुम्हाला भारतातल्या घटनांवर बोलण्याचाच अधिकार नाही असं म्हटलं जातं का?

तुम्ही भारतीय संस्कृतीचे पाईक आहात केवळ म्हणून काही स्त्री-नामधारक-आयडी तुम्हाला "मोठे व्हा", "इनो घ्या" असले अवमानकारक सल्ले देतात का?
व्यनीमनीच्या गोष्टी करून विडंबक तुमच्या कवितांचं घाऊक प्रमाणात विडंबन करतात का?
तुमची लोकप्रियता बघवत नाही म्हणून निव्वळ तुमच्या प्रतिसादांचं विडंबन होतं का?

तुम्ही ज्योतिष/नाडीचा प्रसार करत असताना तुमच्यावर निव्वळ अविश्वास दाखवून तुमच्यावर जाहिरातबाजीचा आरोप होतो का?

यापैकी कुठच्याही प्रश्नांना तुम्ही हो उत्तर दिलंत तर तुम्ही मिपापीडित आहात. सर्व मिपापीडितांनो एकत्र व्हा. मिपावर उठवळ मोर्चा काढा. आपल्या अभिव्यक्तीचे हवे तितके हवे तसे कपडे करून आपलं खरं व्यक्तिमत्व उघडं करा. बघताय काय, सामील व्हा आंतरजालावरील सर्वात पहिल्या 'उठवळ मोर्चा'त. आपल्या प्रतिसादात 'मी अमुकअमुक आहे व मला त्याचा अभिमान आहे' हे वाक्य लिहून आपल्यावर जुलूमजबरदस्ती करणाऱ्यांचा जाहीर निषेध करा. आपापल्या प्रकृतीला शोभेल त्याप्रमाणे मेणबत्त्या, काळ्या फिती, फेसबुकप्रमाणे लाइक, तलवारी, तुताऱ्या वगैरेचे फोटो डकवून या मोर्चात सहभाग घ्या.

उठवळ मोर्चा, झिंदाबाद!

(हा लेख लिहिताना ३_१४ विक्षिप्त अदिती या आयडीचं प्रचंड योगदान मिळालं. त्याबद्दल त्या आयडीचे टॉपपासून बॉटमपर्यंत आभार)

हे ठिकाणवावरधर्मविनोदइतिहासमौजमजाप्रकटनविचारप्रतिसादवादविरंगुळा

प्रतिक्रिया

ढब्बू पैसा's picture

26 Aug 2011 - 8:32 pm | ढब्बू पैसा

मी स्त्रीमुक्तीवादी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. कोणी कितीही भारतीय संस्कॄतीच्या नावाने गळे काढले तरी त्याना "हुडुत" करण्याची क्षमता माझ्यात आहे. आजपर्यंत मिपावर फारशी मतं व्यक्त न केल्यानं टोमणे वगैरे नाही मिळाले अजुन! म्हणून स्लटवॉक च्या निमित्ताने मतं मांडण्याच्या अधिकाराचा वापर करुन घेतेय!
(पाशवी) ढब्बू

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Aug 2011 - 8:34 pm | बिपिन कार्यकर्ते

हिला मुक्त (पक्षी: मोकळी) सोडू नका रे! आमच्या मित्राची काळजी वाटते.

विकास's picture

27 Aug 2011 - 12:53 am | विकास

तुम्ही.......
.........
........
......... का?

हो हो हो! आता कुठकुठ ठिगळं लावू? ;(

मला वाटते खालील रेखांकन मिपावर पण लागू होत असावे. ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Aug 2011 - 8:30 pm | बिपिन कार्यकर्ते

च्यायच्ची अजून एक कटकट! गुर्जींनी दिलेल्या सगळेच क्रायटेरिया थोडे थोडे लागू होतायेत मला! कितीवेळा मोर्च्यात सहभागी व्हावे लागेल? शिवाय, मल्टिपल आयडीवाल्यांनी कसं सहभागी व्हावं हे पण सांगा हो गुर्जी!

तो पर्यंत हे... "मला कोणीही काहीही बोलणार्‍यांचा मी निषेध करतो."