तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (भाग -३/४)

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
7 Apr 2011 - 1:15 am

तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (भाग -३/४)

आधीचे दोन भाग:
तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (भाग१/४)
तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (भाग२/४)

(मंडळी काही खाजगी अन काही ऑफीशीअल कारणांमुळे 'देश प्रेमाला पुरत नाही' या वगनाट्याचा पुढील भाग लगोलग लिहीणे जमले नाही त्याबद्दल मी दिलगीर आहे. वेळात वेळ काढून खास आपल्या मनोरंजनासाठी हे वगनाट्य आता पुर्ण केले आहे. वाचनात सातत्य रहावे अन सर्वांना वाचन करणे सोईचे व्हावे म्हणून मी पुढील दोन भागात आज व उद्या प्रकाशीत करत आहे.)

==================
पुर्वसुत्र:

किसनदेव: बरं बरं, तुमची इच्छा दहि दुध द्येयाची नसंल तरीबी ठिक हाय. तुमी मंग एखादं गाणं नाचून दाखवा. मंग आमाला आमचा कर मिळाला आसं आमी समजू. आन कराची रक्कम आमच्या खिशातून सरकारी खजिन्यात जमा करू.

राधा: ठिक आहे. आम्ही नाचतो. पण आम्हाला लवकर सोड.

(थोडक्यात: पहिल्या भागात पारंपरीक गण होतो. दुसर्‍या भागात बतावणी होते. त्यात पेंद्या, किसनदेव गौळणींना अडवतात, छेड काढतात. कराच्या रुपाने गौळणींच्या नाचाची मागणी करतात. )

पुढे सुरू...........

(राधा अन गवळणी 'वगातली गौळण' सुरू करतात.)

कारे वाट अडवितो नंदाच्या कान्हा
आम्हा जावू दे ना, जावू दे ना, जावू दे ना ||धृ||

दुध दही लोणी घेवून डोई
भार आता मला सहवेना
आम्हा दे ना, जावू दे ना, जावू दे ना ||१||

राहीले गोकूळ दुर, जवळ नाही बाजार
उगाच छेडाछेडी करू नको ना
आम्हा दे ना, जावू दे ना, जावू दे ना ||२||

ठावूक आहे मला, लोणी निमीत्त तूला
आम्हा पासून दुर राहवेना
हे खरे ना, खरे ना, खरे ना ||३||

का रे वाट अडवितो नंदाच्या कान्हा
आम्हा जावू दे ना, जावू दे ना, जावू दे ना ||धृ||

(गौळण संपते.)

मावशी: चला ग बायांनो. आधीच उशीर झाला. ते माठ उचला अन चला बिगी बिगी बाजारला.

(सर्व गवळणी माठ उचलतात अन बाजाराला निघतात.)
(सगळे जण विंगेत जातात)
==========================

शाहीर रंगमंचावर येतात व गातात:

भावर्ता देश होता एक नगर त्यात अवंतिपुर
नगर मोठे सुंदर तेथे उंच उंच गोपुर
सोन्याचे कळस मंदिरांना, तोरणं दारोदार
नक्षीदार दिव्यांची झुंबरं हालती घरोघर ||

अवंतिपुर नगरीचा राजा होता चतूरसेन
दिलदार होता राजा उदार त्याचं मन
पसरली होती जगी किर्ती त्याची महान
कहाणी त्याची ऐका आता देवून तुमचे कान || जी जी जी

सेनापती चतुरांगण होता सैन्याचा प्रमुख
युद्धामध्ये जिंकण्याचा चढता होता आलेख
त्याच्या पदरी होते सांडणीस्वार, हत्ती अन घोडे
तसेच होते हवालदार हातमोडे अन शिपाई पायमोडे || जी जी जी

(शाहीर रंगमंचावरून विंगेत जातात)
=======================

(रंगमंचावर दरबाराचा देखावा उभा केलेला आहे. राजा इकडून तिकडे फेर्‍या मारत आहे.)

महाराज: अजून कसं कोनी दरबारात आलेलं नाही? (हातावर हात मारतो.) श्या.. घड्याळात धा वाजून धा मिन्ट झालीत पन आजून एकबी दरबारी दरबारात न्हाय? थांबा. मला आता दरबारात पंच कार्ड मशीन न्हायतर अंगठा दाबून हजेरी घेनारं मशीनच लावावं लागलं.

(मोठ्याने आवाज देतो.) परधानजी...ओ परधानजी...

प्रधानजी: मुजरा असावा.

महाराज: असो असो. परधानजी, ही काय दरबारात येन्याची येळ झाली का? आता धा वाजून गेलं तरीबी दरबारात कोनीच कसं न्हाई. आन तुमीसुदीक लेट झालात? आता दोन झाडू आणा. एक तुमी घ्या अन एक माझ्या हातात द्या. अन करू सुरूवात आपण दोघं दरबाराच्या साफसफाईला.

प्रधानजी: हो महाराज.

महाराज: अरे परधान हाय का बारदान? मी बोलतो अन तुमी खुशाल हो म्हनताय. काय लाज? काय शरम वाटती का न्हाय?

प्रधानजी: अहो महाराज तुम्ही मला लेट झाल्याचे विचारल त्याला हो म्हटलो. खरं का नाय?

(तेवढ्यात तेथे हवालदार हातमोडे अन शिपाई पायमोडे येतात. ते विनोदाने केवळ हाताचा पंजा खालीवर करून मुजरा करतात.)

हवालदार हातमोडे अन शिपाई पायमोडे: मुजरा म्हाराज. म्हाराजांचा ईजय असो.

महाराजः असो असो.

महाराज: काय परधानजी, राज्याची हालहवाल कशी काय हाय?

प्रधाजनी: काय रे, राज्याची हालहवाल कशी काय हाय?

हवालदार हातमोडे: शिपाई पायमोडे, राज्याची हालहवाल कशी काय हाय?

शिपाई पायमोडे: ठिक हाय हवालदार साहेब.

हवालदार हातमोडे: ठिक हाय परधानजी.

प्रधाजनी (महाराजांकडे पाहून): ठिक हाय म्हाराज.

महाराज: बरं काय चोरी मारी, खुन दरोडे?

प्रधाजनी: काय रे हातमोडे, काय चोरी मारी, खुन दरोडे?

हवालदार हातमोडे: काय रे पायमोडे, काय चोरी मारी, खुन दरोडे?

शिपाई पायमोडे: आजाबात नाय हवालदारसाहेब

हवालदार हातमोडे: आजाबात नाय परधानजी

प्रधाजनी (महाराजांकडे पाहून): नाय महाराज, आजाबात नाय.

महाराज: आवं मंग काय बलात्कार, विनयभंग तरी आसलं की?

प्रधाजनी: हवालदार काय बलात्कार, विनयभंग?

हवालदार हातमोडे: शिपाई पायमोडे काय बलात्कार, विनयभंग?

शिपाई पायमोडे: नाय अजाबात नाय साहेब

हवालदार हातमोडे: नाय अजाबात नाय प्रधानजी

प्रधाजनी (महाराजांकडे पाहून): अजाबात नाय महाराज.

महाराज: अरे हे काय चाललं आहे? मी विचारतो तुमच्यासमोर आन माझी आरडर लगेच खाली खाली जाते. मग शिपायालाच मी विचारतो डायरेक. तुमच्या मधल्यांचं काय काम रे?

प्रधाजनी: अहो महाराज यालाच तर संसदिय लोकशाही म्हनतात. फार आदर्श राज्यप्रणाली आहे ती. वरपासून फकस्त आरडरीच द्यायच्या. काम काहीच नाही.

महाराज: काय म्हणालात?

प्रधाजनी: काय नाय म्हटलं गुन्हे काहीच नाही महाराज आपल्या राज्यात.

महाराज: असोअसो. म्हणजे राज्यात हालहवाल एकदम ठिक आहे तर.

हवालदार हातमोडे: हो महाराज. एकदम ठिक आहे. सगळीकडे आबादी आबाद आहे. पाउसपाणी अमाप आहे. ४० पाण्याचे टँकर भाड्याने लावले आहेत. चोरी दरोडे खुन काहीच नाही. आणखी १० तुरूंगांना मंजूरी दिली आहे. रोगराई, आजारपण नावालाही नाही. आणखी ३० सरकारी दवाखाने ग्रामीण भागात काढायचे आहेत. गावात मारामार्‍या दंगली अजाबात नाही. तंटामुक्ती अभियान जोरात चालू आहे. लोकसंख्या नियंत्रणात आहे. नसबंदीसाठी माणसं गोळा करायला डॉक्टर लोकं गावोगाव वणवण फिरत आहेत. शिक्षण व्यवस्थीत चालू आहे. शिक्षक लोकं जनगणनेच्या कामात बिजी हायेत, आसलं समदं ठिक चालू आहे, महाराज.

महाराज: असो असो. तर मग आमचा विचार आहे की आम्ही आता शिकारीला निघावं.

शिपाई पायमोडे: चला महाराज. आमी तर एकदम रेडी आहोत.

प्रधानजी: अवश्य महाराज. आपण आता शिकारीला गेलंच पाहीजे.

हवालदार: महाराज राज्यात वाघांची पैदास बी लय वाढली हाय. त्यासाठी मी तर कवाच बंदूक तयार ठिवलीय. शिकारी कुत्रे, हाकारे एकदम तयारीत आहे. झाडाला एक वाघबी बाधूंन ठिवेल आहे. तुमी फकस्त जायाचं आन वाघावर गोळी झाडायची की बास. फटू काढायसाठी प्रेस फटूग्राफर बी रेडी हाय. बातमीचा मसूदाबी रेडी हाय. तर कवा निघायचं महाराज?

महाराज: आम्ही आता राणीसाहेबांकडे जातो. थोडी विश्रांती घेतो. अन मग परवा तेरवा निघूना शिकारीला. काय घाई आहे.

हवालदार: महाराज मी बी येवू का तुमच्या संगती रंगमहालात. नाय जरा शेवा करावी म्हनतो मी राणीसाहेबांची...

महाराज (रागाने): हवालदार, काय बडबडत आहात तुम्ही?

हवालदार: अहो राणीसाहेबांची अन तुमची शेवा आसं म्हननार व्हतो मी. आमी तुमचे नोकर हाय ना मग? तुमी पुर्ण बोलूच देत नाई बगा.

महाराज: असो असो.

हवालदार: असो तर असो महाराज.

महाराज: चला तर तुम्ही व्हा पुढे अन शिकारीची तयारी करा. आम्हीही निघतो आता. दरबार बरखास्त झाला आहे.

(सगळेजण महाराजांना मुजरा करतात.)

(हवालदार, शिपाई एका विंगेतून जातात तर दुसर्‍या विंगेतून महाराज जातात.)

(प्रधानजी रंगमंचावर स्वगत बोलत आहेत.)

प्रधानजी (स्वगत): जा जा महाराज तुम्ही शिकारीला जा, राणीसाहेबांकडे जा. तेवढाच वेळ आम्हाला आमच्या चाली खेळण्यात मिळतो आहे. आत्ताच उग्रसेन राजाला निरोप पाठवतो अन त्याला सांगतो की अवंतिपुरावर आक्रमण करण्याला हिच संधी योग्य आहे.

(पंतप्रधान रंगमंचावरून जातो.)
===================================

शाहिर रंगमंचावर येतात व गातात:

चतूरसेनाची पत्नी होती निताराणी सुंदर
अप्सराच जणू स्वर्गीची आली पृथ्वीवर
नाकीडोळी निट तिचे, केस मोठे भरदार
साडीचोळी नेसून ती चाले डौलदार
चतुरसेन, निताराणी राहती नेहमी बरोबर
जीव लावी एकमेकां, प्रेम दोघांचे एकमेकांवर ||

दोघांनाही होता पुत्र नाव त्याचे शुरसेन
राजपुत्र देखणा होता नावाप्रमाणेच शुर
लढाई, घोडेस्वारी, भालाफेक, तलवार
सार्‍या विद्या अवगत, होता त्यात माहिर
होता तो युवक वय त्याचं वीस
हजर राही दरबारी बघे कामकाज || जी जी जी

(शाहीर रंगमंचावरून विंगेत जातात)
===================================

( हवालदार व शिपाई फिरत फिरत रंगमंचावर येतात.)

शिपाई: हवालदार साहेब आसं आपन कुठं फिरून राहीलो भटक्या कुत्रावानी? महानगरपालीकेवाले लोकं आले तर नसबंदीसाठी उगाच पकडून घेवून जातील तुमाला. अन मंग माझ्यावरच सगळी जाबाबदारी येईल ना?

हवालदार: आरे शिपाया काय मुर्खासारखं बोलतोया? आरं आपलं महाराज गेलं विश्रांतीला. मंग आपली डूटी नाय का चालू होत? आरं आपन सरकारी मान्स. त्ये बी राजाच्या दरबारची. आरं आपन गस्त घालत आहोत. उगाचच्या उगाच काय फिरत नाय काय आपन.

शिपाई: मी काय म्हनतो आसं फिरून फिरून माझ्या पायाचं पार मोडलंय बघा. आन मला लय भुका बी लागल्यात. मी त्या समोरच्या हाटेलीत जातो आन 'काय शिळंपाकं आसंल तर वाढ रे बाबा' वराडतो.

हवालदार: आरे पायमोड्या, आरं तू सरकारी मानूस आसूनही भिक मागतो पोटासाठी? (पाय वर करत) हानुका तुझ्या गा...

शिपाई (हात पाठीमागे धरून सावरतो): ए बाब्बो!

हवालदार: हानुका तुझ्या गालावर एक चापट? आँ?

शिपाई (हाताने नको नको चा अभिनय करत): आहो सायेब मागल्या सहा महिन्यापासून तुमी आमचा नाष्ट्याचा अलाउंस पास करेल नाय आन मंग आमी कसा नाष्टापानी करावा?

हवालदार: अरे ते काय आपल्या हातात हाय का? आपले प्रधानजी कसे आहेत ते तुला चांगलंच ठाऊक नाही काय? तरी बरं, माझ्या शिफारसीवरून वेळेवर पगार तरी होतात. बरं मी काय म्हनतो, मला बी लय भुक लागली हाय. मी समोरच्या हाटेलीत जातो आन शिववडा खातो तु बाजूच्या हाटेलीत जा आन कांदेपोहे खावून लगेच ये.

शिपाई: आसं कसं? तुमी येगळी डीश आन मी येगळी डीश कशी खानार? म्या काय म्हनतो त्या समोरच्या हाटेलीत पिझ्झा बर्गर लय भारी मिळतो म्हनं चला तिथंच जावू आपन दोघंबी!

हवालदार: पायमोड्या, आरं आरं बाबा पिझ्झा बर्गर खावून आपल्या ढेर्‍या सुटतील ना? मंग डूटी कशी करता येईल? त्यापेक्षा त्या झाडाखालच्या हातगाडीवर झुनकाभाकर लय झ्याक मिळती बघ. चल बाबा चल लवकर.

(रंगमंचावर गोल गोल फिरतात. नाष्टा करून परत येतात.)

शिपाई: मी काय म्हनतो हातमोडे साहेब, नाष्टापानी करून पोट थोडं जड झालंया. म्या घरला जातो आन इश्रांती घेतो जरा. काये की बायकोबी परवाच माहेराहून आली ना? कटकट करत होती ती की तुमी काय घरला थांबतच नाही म्हनून.

हवालदार: आसं म्हनतो? ठिक आहे तर मग. मी पण मैनावती कडे जावून थोडा श्रमपरीहार करतो. (विंगेत जातो)

शिपाई: ठिक हाय तुमी मोठे लोकं. तुमी श्रमपरीहार करा मी घरी फकस्त श्रम करतो.

(रंगमंचावरून शिपाई एका विंगेत जातो.)
=======================

(हवालदार हातमोडे मैनावती कडे येतो.)

मैनावती: आता ग बया, लय दिसांनी येळ मिळाला हवालदार सायबांनां?

हवालदार: आगं मी सरकारी मानूस.आमची डूटी चोवीस तास आसती. कवा कधी महालातून बोलावणं यायचं त्याचा भरवसा नाही. म्हणून येळ मिळतो तसं येतो आमी.

मैनावती: तुमी बसा. काय च्या पानी घेनार काय? नाश्टाबिश्टा?

हवालदार: च्या पानी, नाश्टाबीश्टा काय नको आमाला. आमी जेवनच करून जानार आज. लय भुक लागली आमाला.

मैनावती: आसं का? तुमी बाहेर येगयेगळ्या हाटेलीत खानारी मान्सं. निरनिराळ्या चवीची लय आवड हाय तुमाला.

हवालदार: हा ते बी खरं हाय मैनावती. पन म्या काय म्हनतो, तुझ्या हाताची चव लय निराळी हाय. म्हनून तर आमी तुझ्याकडं येतो.

मैनावती: मंग म्या आज तुमाला माज्या हातानं ताट करून भरवीन.

हवालदारः ते ठिक हाय. पन म्या काय म्हनतो, त्ये जेवायच्या आधी एक फर्मास नाचगाणं होवून जावू दे की?

मैनावती: आसं म्हनता? ठिक हाय! ऐका तर मग.

(मैनावती लावणी सुरू करते.)

सांगून सांगून थकले हट्ट माझा पुरवा झणी
आजच आणा मला येवल्याची पैठणी
आजच आणा मला पैठणची पैठणी ||धृ||

जरतारी आसलं काठ तिचा बारीकसर
नक्षी आसलं तिच्यावर बुट्टेदार
लई दिसांची ईच्छा आहे मनी
आजच आणा मला पैठणची पैठणी ||१||

आमसूली नाहीतर रंग आणा निळा जांभळा
कसा दिसलं कुणा ठावं चालंल हिरवा पिवळा
आत्ताच घाई करा अन लगेच जावा धनी
आजच आणा मला येवल्याची पैठणी ||२||

नितळ काया माझी वर तुमची माया
जीव लावायचं शिकावं तुमच्याकडून राया
आहे गरज झाकायची ज्वानी आरसपानी
आजच आणा मला येवल्याची पैठणी ||३||

सांगून सांगून थकले हट्ट माझा पुरवा झणी
आजच आणा मला येवल्याची पैठणी
आजच आणा मला पैठणची पैठणी ||धृ||

(लावणी संपते. माडीच्या खाली गडबड गोंधळ ऐकू येतो.)

हवालदार: मैने, खाली काय गोंधळ चालू आहे गं? आन्नांचं उपोषण सुटलं का वल्ड कपचा धुरळा अजून बसला नाही खाली?

मैनावती: या बया? थांबा मी मावशीलाच पाठवते काय खाली काय झालं ते पहायला.

(मैनाबाई मावशीला हाक मारत विंगेत जाते. शिपाई रंगमंचावर फिरत असतो. तेवढ्यात मावशी पळत पळत येते अन हवालदारावर आदळते.)

हवालदार: ये बाबो! काय मावशे, केवढ्यानं आदळलीस तू माझ्यावर! मला वाटलं की इमान बिमान पडलं की काय?

मावशी: अहो बातमीच येवढी भयानक आहे की मला तर काहीच सुचेनासं झालंय. (हवालदाराच्या छातीवर डोकं टेकवते.)

हवालदार (घाबरून दुर होत): बरं, बरं नक्की काय झालं ते तर सांग.

मावशी: अहो व्हायंच काय? आपल्या राज्यावर शेजारच्या राज्याचा राजा उग्रसेन याचं सैन्य युद्धासाठी चाल करून येतोय अशी खबर हाय . म्हणून सगळे लोकं खाली चौकात घाबरून एकत्र झालेत.

हवालदार: अरे बाब्बो, हि तर लईच भयानक बातमी हाय ना. मग हे आधी नाही का सांगायच? चला आता आमाला युद्धाला निघावं लागलं.

(तेवढ्यात मैनावती तेथे येते.)

हवालदारः मैनावती आम्ही युद्धाला निघालो. चल आम्हाला धीरानं निरोप दे.

मैनावती: हवालदार साहेब, तुम्ही विजय मिळवून परत या. तवर मी तुमची वाट पाहीन.

(हवालदार एका विंगेत तर मैनावती, मावशी दुसर्‍या विंगेत जातात.)
=============================

(दरबार. दरबारात महाराज, पंतप्रधान, हवालदार शिपाई, राणी, राजपुत्र, चतुरांगण आदी चिंतीत मुद्रेने एकत्र बसलेले असतात.)

महाराज: आपल्या राज्याच्या शेजारचा राजा उग्रसेन अवंतिपुरावर चाल करून येतो आहे. आपण त्याच्याशी प्राणपणानं युद्ध केले पाहिजे. उग्रसेन अशा प्रकारे दगा देणार याची आम्हाला शंका कशी आली नाही याचेच आम्हाला नवल वाटते आहे. सेनापती चतुरांगण तुम्ही हवालदार, शिपाई व इतर सैन्याला घेवून राज्याच्या सीमेवर लढाईला निघा. आम्हीही जातीनं युद्धाला येण्याची तयारी करतो.

पंतप्रधान (मनातल्या मनात): आता कशी तयारी करतात तेच बघतो. म्हणे युद्धाला येण्याची तयारी करतो. हॅ.

राजपुत्र शुरसेन: बाबा, आम्हीही युद्धावर येणार अन त्या उग्रसेनाचा कायमचा बंदोबस्त करणार. आम्हालाही आपल्याबरोबर रणांगणावर येण्याची आज्ञा असावी.

निताराणी: बाळ शुरसेन, अरे तू अजून लहान आहेस युद्धावर जाण्यासाठी.

राजपुत्र शुरसेन: नाही आई. आम्ही आज वीस वर्षांचे आहोत म्हणजे काही लहान नाही. माझ्याही हातात बळ आहे ते उग्रसेनाला दाखवतोच.

महाराज: शुरसेन, अरे तुझी आई बरोबर म्हनतीया. तु तुझ्या आईबरोबर इथंच थांब. तुमच्या दोघांबरोबर परधानजी हायेत. अन बरं का परधानजी आमच्या माघारी आमच्या राज्याची निट काळजी घ्या.

पंतप्रधान: महाराज तुमी युद्धाला निवांत मनानं निघा. तुमच्या माघारी आमी राज्याची, राणीसरकारांची अन राजपुत्राची निट काळजी घेवू. तुमी कायबी काळजी करू नका.

महाराज: तर मग आजच युद्धभुमीवर निघण्याची तयारी करा.

निताराणी: महाराज आम्हाला फार काळजी वाटते. तुम्ही शत्रूवर विजय मिळवून लवकरात लवकर परत या.

प्रधानजी: राणीसरकार तुम्ही काळजी करू नका. आम्ही आहोत ना. महाराज तुम्ही नक्कीच विजयी होवून परत याल, हो ना?

महाराज: हो हो, नक्कीच. चला तर आम्ही निघतो. आमच्या माघारी राज्याची निट काळजी घ्या. चला.

( सर्व जण मुजरा करतात अन युद्धभुमिवर निघतात.)

(प्रथम प्रवेश संपतो)

(मध्यंतर........ पडदा पडतो.)

क्रमश:

पुढील चौथा अंतिम भाग येथे आहे.

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०७/०४/२०११

नृत्यनाट्यसंगीतकथाकविताप्रेमकाव्यभाषाविनोदमौजमजाचित्रपटआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

7 Apr 2011 - 4:43 am | स्पंदना

छान पाभे! आवड्या!

प्रास's picture

7 Apr 2011 - 10:33 am | प्रास

वगात मस्त रंग भरतोय.....

पाषाणभेदजी, येऊद्यात पुढला भाग.....

बाकी, काव्य भारीये हे वे.सां.न.

प्रास's picture

7 Apr 2011 - 10:35 am | प्रास

.

प्रास's picture

7 Apr 2011 - 10:36 am | प्रास

.

नन्दादीप's picture

7 Apr 2011 - 11:12 am | नन्दादीप

आवडेश,,,

यश राज's picture

7 Apr 2011 - 11:20 am | यश राज

मस्त वग आहे....
पुढ्च्या भागाच्या प्रति़क्षेत......

वपाडाव's picture

7 Apr 2011 - 12:00 pm | वपाडाव

मस्त ...
सगळ्या राजकीय घटनांचा व्यवस्थित मागोवा घेणारे चित्रण...

sneharani's picture

7 Apr 2011 - 12:07 pm | sneharani

मस्त! येऊ दे पुढचा भाग!!

यशोधरा's picture

7 Apr 2011 - 12:26 pm | यशोधरा

आज तीनही भाग वाचले. मस्त जमलंय. आवडलं.

अप्रतिम एकदम ...

छानच वाटले ...

लावणी तर एकदम फक्कड वाटली ...

---

बाकी सोमवारीच आता ऑनलाईन येणार असल्याने पुढील भाग तेंव्हाच वाचेन