'भाषाभान' या डॉ. नीलिमा गुंडी यांच्या पुस्तकात भाषा आणि संस्कृती यांविषयीच्या मार्मीक निरीक्षणांवर आधारीत काही ललित लेख आहेत. 'भाषाभान' मध्ये ललित आणि वैचारिक स्वरूपाचे लेख समाविष्ट केले आहेत. भाषेविषयीचे भान धारदार करण्याचे काम या लेखांद्वारे होते. यातील डॉ. अशोक रा. केळकर आणि डॉ. नागनाथ कोतापल्ले या दोन जेष्ठ नामवंत अभ्यासकांच्या यातील मुलाखती विचारांना चालना देणार्या आहेत.
लेखीकेने प्रस्तावनेत जरी 'भाषाविषयक', 'भाषेचे' अशा अर्थाचे शब्द वापरले असतील तरी ते शब्द एका अर्थाने 'मराठी' या भाषेसंदर्भात आलेले आहे. संपुर्ण पुस्तकात मराठी भाषा वैयक्तिक कारणासाठी म्हणा की इतर कारणाराठी वापरतांना घ्यावयाची काळजी लेखीकेने अत्यंत मार्मिकतेने सांगीतलेली आहे.
डॉ. नीलिमा गुंडी यांचे बरेचसे साहित्य प्रकाशित झालेले आहे. त्यात काव्यसंग्रह, बालकवितासंग्रह, कथासंग्रह, लेखसंग्रह प्रकाशित झालेले आहे. त्यांनी विविध पुस्तकांचे संपादन सहाय्यही केलेले आहे. अशा अधिकारी व्यक्तीकडून भाषेविषयीचे भान होणे हे मराठी वाचकांना एक पर्वणी आहे.
या पुस्तकात मुलांची, माणसांची ठेवलेली नावे, लहान मुलांची शब्दसंपत्ती वाढवण्याची शक्ती, शुद्धलेखनात होणार्या चुका, नवतरूणांची भाषा आदी लेख विभाग १ मध्ये आलेले आहेत.
विभाग २ हा मराठी भाषेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. यात मराठी भाषेचे अभिसरण- एक आव्हान व मराठीची आजची स्थिती ह्या दोन लेखात मराठी भाषेला वैश्विक स्तरावर कसे मोठे करता येईल याचे विवेचन आहे. लेखीकेच्या मते भाषा प्रवाही असणे आवश्यक आहे. शालेय स्तरावर व व्यावहारीक स्तरावर साधे वाक् प्रचार कशा पद्धतीने शिकविले पाहिजे याचे विवेचन आहे. भाषा 'श्रवण करणे' अन त्याचा उपयोग लेखनात करणे याचे महत्व त्यांनी 'श्रॄतयोजन: भाषेचा वारसा' या लेखात सोदाहरण पटवून दिलेले आहे. 'वाचन: एक भाषिक कौशल्य' या लेखात वाचन करतांना काय काळजी घेतली पाहीजे हे सांगितले आहे. या लेखातील एक उदाहरण द्यावेसे वाटते: वाक् प्रचारात अर्थसौंदर्याचेही भान हवे. उदा. 'त्याची फे फे उडाली' हे वाक्य वाचतांना 'फे फे' चा 'नेने' सारखा आडनाव समजून उच्चार केला, तर वाचणार्याचीच फे फे उडत आहे, हे जाणवेल.
स्त्रियांची भाषा या विषयी दोन लेख आलेले आहेत. स्त्रियांच्या भाषेत युगजाणीव व्यक्त करण्याची, वास्तव बदलण्याची सुप्त क्षमता आहे असे लेखीका म्हणते. पु. ल. देशपांडे यांच्या 'व्यक्ति आणि वल्ली' व 'अपूर्वाई' या दोन पुस्तकांची रसग्रहणे भाषिक अंगाने आलेली आहेत. आपल्या बालसाहित्यात रुढ भाषेच्या अलिकडची पलिकडची भाषा समाविष्ट आहे का? असा प्रश्न त्या 'बालासाहित्य, बालशिक्षण आणि मुलांची भाषा' या लेखात विचारतात. खरोखर आपले बालसाहित्य या गुणांनी युक्त आहे का? यशवंतांच्या 'आई' कवितेचे परिष्करण' या लेखात कवि यशवंतांनी 'आई' या कवितेत कसे व का बदल केलेत ते स्पष्ट केले आहे.
'भाषा: व्यवस्थेशी निगडीत प्रतिमा' या लेखात भाषाव्यवस्थेशी निगडीत प्रतिमासॄष्टी मराठी कवितेत कसकशा स्वरूपात आढळते, यांचा सोदाहरण शोध घेण्याचा प्रयत्न आहे. विरामचिन्हे, पुर्णविराम, नाम, सर्वनाम आदी मराठी व्याकरणातील संकल्पना हाती धरून मराठी कवितेचा प्रांत मराठी कवींनी कसा समृद्ध केला आहे हे त्यातील उदाहरणांवरून दिसून येते. अनेक कवींनी मराठीत अशा कविता आधीच लिहीलेल्या आहेत. तरीही अशा कवींची संख्या तुलनेने कमी असल्याचे त्या मान्य करतात.
"'म' मराठीचा" या लेखात त्यांनी मराठीचा शिक्षणक्रमात अभ्यास कसा असावा याबाबत मते नोंदवलेली आहेत. आपल्या राजकारण्यांनी अस समाजकारण्यांनी त्या मताचा अभ्यास केल्यास मराठी भाषेसाठी कोणतीही चळवळ उभी करावी लागणार नाही, 'भाष्यलक्षी अभ्यासक्रम' महाविद्यालयांत सर्व शाखांसाठी सुरू करावेत. पहिलीपासूनच मराठी अनिवार्य हवी, आदी त्यांची मते आहेत. "एकंदरीत 'म' मराठीचा' असे बिंबवायला हवे!" हे त्यांचे वाक्य बरेच काही सांगून जाते.
लेखीकेने दोन भाषाधुरीणांच्या मुलाखती घेतल्या होत्या. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषातज्ञ डॉ, अशोक केळकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या मुलाखती या पुस्तकात समाविष्ट आहेत.
भाषातज्ञ डॉ, अशोक केळकर यांची मुलाखत बर्याच अंगांनी त्यांच्या कार्याबद्दल झाली आहे.
कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले यांची मुलाखत म्हणजे आजच्या मराठीची अवस्था, शिक्षणपद्धती, मराठीचे व्यावहारीक उपयोजन आदिंची सांप्रत अवस्थेवर ओढलेले आसूड आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये.
या पुस्तकपरीचयात मी त्या मुलाखतीतील काही भाग विस्तृत प्रमाणात देत आहे, जेणे करून काही लोकांपर्यंत तरी त्याचे शाब्दीक निखारे पोहोचतील व त्यातून अंगार पेटेल.
"नृत्य, नाट्य, शिल्प आदिं कलेच्या विषयांत विद्यार्थ्याला काहीतरी कला सादर करावी लागते. मराठीचा अभ्यास करणार्याला काय साहित्यविषयक कला सादर करावी लागते? त्याचा अभ्यास केवळ वाड:मयाचा अभ्यास, समिक्षा, काव्यशास्त्र, भाषाविज्ञान आदींपुरताच मर्यादित असतो. किती विद्यार्थी केवळ लेखक व्ह्यायचे आहे म्हणून एम. ए. ला मराठी घेतात? काही महाविद्यालयांमध्ये मराठीची केवळ १५० पुस्तके असतांनादेखील तेथे एम. ए. मराठी करण्याची 'सोय' आहे. केवळ विद्यार्थीसंख्या वाढली आहे. गुणात्मक वाढ कमी झाली आहे.मराठी संस्थाच इंग्रजी शाळा सुरू करतात हि उद्विगनतेची बाब आहे. मराठी समाज इंग्रजीला घाबरून गेलेला आहे. महाराष्ट्र शासनाला कोठलेच शैक्षणीक धोरण नाही. पक्ष कोठलाही असो. वीसएक वर्षात कमालीची अनागोंदी शिक्षण खात्यात आहे. शाळा पाहिजे- घेवून जा. महाविद्यालय हवे- घेवून जा. व्यावसायीक शिक्षणसंस्था पाहिजे- उशीर कशाला करता असे महाराष्ट्रीय शासनाचे धोरण आहे. शासन या सर्वांतून पैसा कमावते आहे. मंत्रालयात लोकप्रतिनीधींपेक्षा कारकूनांचे अधीक महत्व आहे. शासनाकडे विचारशक्ती, कल्पनाशक्ती नाही. इतर प्रांतांमध्ये शिक्षणाचे माध्यम त्या त्या प्रादेशीक भाषा आहेत. आपल्याकडे इंग्रजी शाळांमधून लोअरलेव्हल चे मराठी शिकविले जाते. मराठीला प्राधान्य देण्याचे धोरण शासन जोपर्यंत वापरत नाही तोपर्यंत मराठी सर्वसामान्यांपर्यंत जाणार नाही.
बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील संबंध प्रेममय असले पाहिजे. कालपरवा पर्यंत खेड्यातील मराठी (आणि लोकही) हिणकस असतात असे प्रमाण मराठी वापरणार्यांना वाटत होते. आता ते प्रमाण कमी झालेले आहे. भाषेच्या विकासात सर्वात महत्वाची गोष्ट असते ताठ कण्याचे सरकार. महाराष्ट्र शासनाचा कणा किती ताठ आहे हे आपण पदोपदी अनुभवतोच आहोत.महाराष्ट्रातील वैचारीक घुसळण याघडीला थांबलेलीच आहे. आपण मराठी आहोत आणि सगळे व्यवहार मराठीतूनच करू असा आग्रह सोडू नका".
या प्रदिर्घ मुलाखतीतून बरेच काही शिकण्यासारखे आहे. आपल्यापैकी ज्याला ज्याला मराठीचा अभिमान आहे त्याने त्याने ही मुलाखत वाचलीच पाहीजे. या मुलाखतीचे जळजळीत अंजन प्रत्येकाने आपल्या डोळ्यातून घातले पाहीजे.
खरे पाहता 'भाषाभान' या पुस्तकाचे नाव 'मराठीचे भाषाभान' असे ठेवायला काहीच हरकत नाही.
वाच्यार्थ पोहोचवणारी 'अभिधा' शक्ती, लक्षार्थ देणारी 'लक्षणा' शक्ती आणि व्यंगार्थ (सुचवलेला अर्थ) प्रकट करणारी 'व्यंजना' शक्ती या भाषेच्या तीन शक्ती कार्यरत असतात. लेखीकेने 'भाषाभान' हे पुस्तक या तीन शक्तींना अर्पण केलेले आहे. वाचकांचे मराठी भाषाविषयक भान तल्लख होण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग होईल असा लेखीकेला विश्वास वाटतो.
लेखिकेचे मराठी भाषाविषयीचे कुतूहल आणि सामाजिक भान यांना समतोल विचारांचीही यात जोड मिळाली आहे. यातील लेख लालित्यपुर्ण शैलीमुळे वाचकांना आपलेसे करतील आणि चिंतनशीलतेमुळे त्यांना अंतर्मुखही करतील.
भाषाभान
डॉ. नीलिमा गुंडी, पुणे
प्रकाशकः उन्मेश प्रकाशन, पुणे
प्रकाशनः २००८ किंमतः १५० रू. पाने: १७१
प्रतिक्रिया
17 Aug 2010 - 6:05 pm | पाषाणभेद
मराठीची वस्तूस्थिती व त्यावर उपाय सांगणारे हे पुस्तक आहे. हा लेख आता पर्यंत ६३ जणांनी वाचला आहे. हा लेख जास्तीत जास्त संख्येने वाचला जावून मराठीची स्थिती जाणून घेण्यासाठी एखादातरी उत्सूक होईल.
केवळ हा लेख वरती आणण्यासाठी प्रतिक्रिया देत आहे.
प्रतिक्रीयांच्या प्रतिक्षेत नाही. केवळ धाग्यातील विचारांचे जास्तीत जास्त वाचन व्हावे हाच मराठीप्रेमामुळे शुद्ध हेतू. हाच हेतू या धाग्यापुरता परत एका आठवड्याने सिद्ध होईलच.
17 Aug 2010 - 6:08 pm | अर्धवट
किचकट विषय आहे तरी छान ओळख करुन दिलिये.. वाचायला हवं हे.
17 Aug 2010 - 6:11 pm | इंटरनेटस्नेही
छान ओळख! धन्यवाद.
17 Aug 2010 - 6:17 pm | मदनबाण
हेच म्हणतो... :)
17 Aug 2010 - 6:13 pm | मीनल
बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील संबंध प्रेममय असले पाहिजे.
सहमत! प्र्माण भाषा एकसारखी असते/ असावी.
पण बोली भाषेतील शब्दा शब्दातील फरक टिपायला मजा येते.
19 Aug 2010 - 9:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून येऊ दे...!
-दिलीप बिरुटे
19 Aug 2010 - 10:56 am | इन्द्र्राज पवार
फार आनंद झाला या गरजेच्या पुस्तकाच्या ओळखीमुळे (लेखाच्या मांडणीसाठीही श्री.पाषाणभेद यांचे विशेष अभिनंदन. त्यांनी करून दिलेली पुस्तकाची ओळख ही केवळ तांत्रीक ओळख नसून खुद्द त्यांचीही भाषाभान ठेवण्यामागील तळमळ त्यांच्या प्रत्येक विधानातून तीव्रतेने जाणवली.)
शब्दरचनेचे हुकमी सामर्थ्य मनाला येईल तशा पद्ध्तीचे मायाजाल उभे करू शकते. "श्रावण" महिन्याच्या जादुगिरीवर पीएच.डी.साधर्म्य लिखाण होऊ शकते, पण भाषाभान ठेवून बालकविंनी केवळ एका कवितेत उलगडून दिलेला आनंद अवर्णनीय अशासाठी झाला आहे की त्यांना मराठी भाषेची ताकद निश्चितच माहित होती. शंभर वर्षे होत आली "श्रावणमास" कवितेला पण रत्तीभरही जादू कमी झालेली नाही, ही किमया भाषा अलंकारांची !
"किती विद्यार्थी केवळ लेखक व्ह्यायचे आहे म्हणून एम. ए. ला मराठी घेतात?"
या प्रश्नाला दुसरीही बाजु अशी आहे की, ज्या काही विद्यार्थ्यांनी मराठी विषय पदव्युत्तर शिक्षणासाठी घेतला आहे त्यांना मराठीची किती आस्था आहे? नियत अभ्यासक्रमाव्यतिरिक्त किती अवांतर वाचन तो करतो? किती जाण आहे त्याला मराठी साहित्याची? इथे कोल्हापूरात एका हायस्कुलमध्ये "मराठी" विषयाच्या शिक्षकाच्या पदासाठी अर्ज केलेल्या एका एम.ए. (मराठी), बी.एड. उमेदवाराने "मराठीतील तुम्हाला कोणता कादंबरीकार आवडतो?" या साध्या आणि सरळ प्रश्नाचे उत्तर "पु.ल.देशपांडे" असे दिले. तर दुसर्या एका दलित उमेदवाराला "दलित लेखकांतील कुणाकुणाचे लेखन तुम्ही वाचले आहे?" या प्रश्नाला उत्तर आले, "दया पवार". हे उत्तर बरोबर असेल्/होते. पण मुलाखतकर्त्याने पुढील उपप्रश्न विचारला, "फक्त दया पवार? बाबुराव बागुल वाचले नाहीत?" याला त्या दलित उमेदवाराने उत्तर दिले, "नाही, एम.ए.ला फक्त दया पवारांचे 'बलुतं' होतं."
काय अवस्था आहे उच्च शिक्षणातील "मराठी भाषे" च्या अभ्यासक्रमाची आणि उच्चपदस्थांची तळमळ? डॉ.नीलिमा म्हणतात, "मंत्रालयात लोकप्रतिनीधींपेक्षा कारकूनांचे अधीक महत्व आहे." असेल, पण विद्यानगरीच्या विद्यापीठात काय वेगळी परिस्थिती आहे? बीओएस च्या निवडणुकीत जे घाणेरडे राजकारण विद्यापिठातून खेळले जाते तीमध्ये मराठीची तळमळ त्या विषयाच्या प्राध्यापकांना असते की, आपल्या प्रकाशनाची पुस्तके अभ्यासक्रमात "लावली" जातील हे मतलबीपणे पाहणार्या प्रकाशकांच्या लॉबीला?
त्यामुळे शाळा-कॉलेज-विद्यापीठ या जागांपेक्षा जनसामान्य पातळीवर भाषेविषयीचे कुतहूल जागृत ठेवणे हीच सद्यस्थितीत काळाची गरज आहे आणि त्यासाठी लेखकाने ओळख करून दिलेले डॉ. नीलिमा गुंडी यांचे पुस्तक भाषेविषयी अभिमान म्हणून नव्हे तर प्रेम म्हणून जवळ असणे नीतांत गरजेचे ठरेल यात संदेह नाही.
(थोडेसे अवांतर : श्री.पाषाणभेद यांचा नीलिमाताईंशी परिचय असेल तर त्यांनी पुस्तकाबाबतच्या इथल्या प्रतिक्रिया त्यांना जरूर कळवाव्यात.)
इन्द्रा
19 Aug 2010 - 11:30 am | उग्रसेन
खरं बोल्ला दादा तुमी. पदवी आन पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठी विषय घेऊन शिकणार्या पोराला
साहित्याची किती तोंडवळख रहाती ह्यो एम.फील च्या प्रबंधाचा इषय व्हईन. पोराला इचारलं का बाबा मराठीतले साहित्यप्रकार सांग तर आभायाकडं पाहतं. साहित्यप्रवाह इचारल्यावर दाताड काढून सवाल इचारण्याला लय शुल्लक सवाल इचारल्यासारखा पाहतो. येत जात तर काय नाय. दलित लेखक,ग्रामीण लेखक,अदिवासी लेखक, आन भाषाभ्यासकाचे नाव इचारले तर पोर्ग कोमात जातं.
भाषा म्हंजी काय ? भाषेची व्याख्या ? स्वन, स्वनीम,पद,पदीम, असे प्रश्न इचारल्यावर पोर्ग बावचळून जातं. तव्हा अशा भाषाभ्यास असणार्या पुस्तकाची वळख शाळा-महाविद्यालयात पोरायला करुन देली पाह्यजेन. पाषाणभेदानी पुस्तकाची चांगली वळख करुन दिली. मंडळ आभारी हाय.
बाबुराव :)
19 Aug 2010 - 5:34 pm | राजेश घासकडवी
उत्तम ओळख, पाभे.
सर्वांच्या आत्मीयतेचा पण अभ्यासाला कठीण अशा विषयावरच्या चांगल्या पुस्तकाविषयी वाचायला आवडलं.
अजून येऊ द्यात.
19 Aug 2010 - 6:20 pm | भाऊ पाटील
पण पदवी आन पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठी विषय घेऊन शिकणार्या पोरांपैकी बरेचसे नाईलाजाने (किंवा अभ्यास न केल्याने) तिकडे गेलेले असतात. त्यांच्याकडुन आणखी वेगळी अपेक्षा तरी काय ठेवणार.
20 Aug 2010 - 3:53 am | पाषाणभेद
प्रतिक्रिया देणारे अन आवर्जून हा धागा वाचन करणार्यांचे मनापासून आभार.
@ इन्द्र्राज पवार: साहेब, माझी डॉ. नीलिमा ताईंची ओळख नाही. पुण्यात राहणार्या मंडळींनी त्यांच्याशी संपर्क साधणे म्हणजे त्यांना या विषयावर पुन्हा लिहीण्यास हुरूप येईल.
>>> डॉ. नीलिमा गुंडी यांचे पुस्तक भाषेविषयी अभिमान म्हणून नव्हे तर प्रेम म्हणून जवळ असणे नितांत गरजेचे ठरेल यात संदेह नाही.
वाचनालयातून हे पुस्तक आणले तेव्हा मला एखाद्या लहान मुलाला खावू मिळावा तसा आनंद झाला. वाचनालयात असल्या विषयाच्या पुस्तकाला कोणी हात लावत नाही. त्यामुळे हे पुस्तक जवळपास माझेच झाले आहे!
@मीनल ताई : टकुरं, टाळकं, डोसकं, मस्तक, माथा, डोकं, डोई या एकाचअर्थी बोलीभाषेतील शब्दांची मजा वाक्यात वापरून बघा!
@बाबुराव : साहित्य विषय केवळ मार्कांच्या हिशोबात अभ्यासला जातो. पुलंचे वाक्य आहे: 'ज्ञानेश्वर २ मार्कांना आहे तर मी किती मार्कांना असेन?' अशा अर्थाचे. शाळाकॉलेजातसुद्धा मुलांना रस उत्पन्न होईल असे शिकवले जात नाही. केवळ पाट्या टाकण्याचे काम केले जाते अन विद्यार्थीही त्याच लायक आहेत. एकमेकांना पुरक झाले आहे सगळे. काही अपवाद अपवादानेच सापडतील.
या पुस्तकातील डॉ. नागनाथ कोतापल्ले यांची मुलाखत तर फारच मनाला लागणारी आहे व मुळातून वाचण्यासारखी आहे.
ते स्व:ता एका विद्यापीठात कुलगुरू होते त्यामुळे त्यांच्या वाक्यांना अनुभवामुळे महत्व प्राप्त झाले आहे.
त्यांनी नोकरशहा, शासन तसेच इंग्रजाळलेले पालक व शिक्षणसंस्था यांवर सडकून केलेली टिका जाणकार मनाला टोचणी करत राहते. त्यांनी सुचविलेले उपाय जेव्हा महाराष्ट्र शासन अंमलात आणेल तो दिवस मराठीसाठी सोन्याचा (सोनियाचा नव्हे!) असेल.
@भाऊ पाटील: कोतापल्ले सरांनी यामागची कारणमिमांसा मुलाखतीत विस्तृतरीत्या केलेली आहे.
@अर्धवट, @इंटरनेटप्रेमी, @मदनबाण, @बिरुटेसर, @राजेश घासकडवी व इतर वाचकांचे आभार
तुमच्यापर्यंत हा विषय गेला यातच धन्यता आहे. शेवटी मराठीचा उदो उदो होणे हा हेतू सफल होणे महत्वाचे. पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद.