भागीमारी - एका पुरातत्वीय उत्खननाची अनुभवगाथा

अरुंधती's picture
अरुंधती in जनातलं, मनातलं
8 Jul 2010 - 3:49 pm

भागीमारी हे नाव आठवले तरी ते सावनेर तालुका (जि. नागपूर) येथील छोटेसे गाव डोळ्यांसमोर उभे ठाकते. जवळपास सोळा-सतरा वर्षांपूर्वी ह्या गावाशी आणि तेथील परिसराशी एका पुरातत्वीय उत्खननाच्या निमित्ताने संबंध आला आणि एक वेगळाच अनुभव माझ्या पदरी पडला.

सर्वात आधी सांगू इच्छिते की आता माझा पुरातत्वशास्त्र इत्यादी विषयांशी फक्त वाचनापुरताच संबंध राहिला आहे. पण कधी काळी एका नामवंत शिक्षणसंस्थेत भारतीय प्राच्यविद्यांचा अभ्यास करताना मला आणि माझ्या तीन सख्यांना पुरातत्वीय उत्खननात प्रत्यक्ष सहभाग घेण्याची अनमोल संधी मिळाली आणि त्या संधीचा लाभ घेताना आम्ही त्या प्रात्यक्षिकपूर्ण अनुभवाने बरेच काही शिकलो. प्रस्तुत लेखात त्या अनुभवांच्या शिदोरीतील मोजके, रंजक अनुभव मांडत आहे. कोठे तांत्रिक चुका राहिल्यास ती माझ्या विस्मरणाची खूण समजावी!!

तर चार झाशीच्या राण्या (उर्फ अस्मादिक व तीन सख्या) प्रथमच अशा प्रकारच्या उत्खननाला तब्बल आठवडाभरासाठी जाणार म्हटल्यावर घरच्यांना थोडी काळजी होतीच. आम्हाला आधीपासून आमच्या मार्गदर्शक प्राध्यापकांनी बरोबर काय काय न्यावे लागेल ह्याची एक मोठी यादीच दिली होती. त्याप्रमाणे जमवाजमव, खरेदी, त्या दरम्यान एकमेकींना असंख्य फोन कॉल्स, सूचना वगैरे पार पडल्यावर जानेवारीच्या एका रात्री आम्ही महाराष्ट्र एक्सप्रेसने नागपुराकडे रवाना झालो. आम्हा नवशिक्यांसोबत एक पी. एच. डी. चे विद्यार्थीही होते. चौघीही अखंड टकळीबाज असल्यामुळे गप्पाटप्पा आणि खादाडीच्या ओघात प्रवास कधी संपला तेच कळले नाही. नागपुराहून भागीमारीला जाताना आधीपासून आमच्या प्राध्यापकांनी आमच्यासाठी खाजगी जीपची व्यवस्था करून ठेवल्याचा खूपच फायदा झाला. आदल्या रात्री अकरा वाजता निघालेलो आम्ही दुसऱ्या रात्री एकदाचे भागीमारीत थडकलो.

आमची नागपुराहून निघालेली जीप धूळ उडवत थेट आमच्या राहुट्यांच्या कँपवरच पोचली. एका बाजूला हाय-वे, दुसऱ्या बाजूला कापणी झालेली शेतं आणि हाय-वे लगतच्या त्या मोकळ्या शेतजमीनीवर उभारलेल्या राहुट्यांमध्ये आमचा मुक्काम! आयुष्यात प्रथमच मी अशा प्रकारे मोकळ्या माळरानावर राहण्याचा अनुभव घेत होते. माझ्यासाठी ते सर्व अनोखे होते. माझ्या बाकीच्या सख्याही पक्क्या शहराळलेल्या. त्यामुळे ह्या नव्या वातावरणात आपण कितपत तग धरू शकू अशी धाकधूक प्रत्येकीच्याच मनात थोड्याफार फरकाने होती. पण त्याहीपेक्षा काही नवे शिकायला मिळणार, आजपर्यंत जे फक्त थियरीत शिकलो ते प्रत्यक्ष करायला मिळणार, अतिशय अनुभवसंपन्न व जाणकार प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभणार ह्या सर्वाचे औत्सुक्य जबरदस्त होते. त्यामुळे जे काही समोर येईल ते स्वीकारायचे, आत्मसात करायचे असाच चंग बांधलेला होता आम्ही!

त्या रात्री आम्ही जरा लवकरच झोपी गेलो. एकतर प्रवासाचा शीण होता आणि दुसऱ्या दिवशी लवकर उठून उत्खननाच्या साईटवर निघायचे होते. माझ्या तंबूत मी आणि एक मैत्रीण अशा दोघींची व्यवस्था होती. बाकी दोघी दुसऱ्या तंबूत. इतर पी. एच. डी. चे विद्यार्थी, प्राध्यापक आणि स्टाफ यांसाठीही वेगवेगळ्या राहुट्या होत्या. स्वयंपाक व भोजनासाठी वेगळी राहुटी होती. सर्व राहुट्या अर्धवर्तुळात रस्त्याच्या विरुद्ध, आतल्या बाजूला तोंड करून होत्या. जरा पलीकडे आमच्या मेक-शिफ्ट बाथरूम्स होत्या. म्हणजे चारी बाजूंनी तरटे लावलेली, पाणी वाहून जायची व्यवस्था केलेली शेतजमीनीतील जागा. त्याही पलीकडे असेच प्रातर्विधींसाठीचे तरटांनी चारही बाजू झाकलेले मातीचे चर. एका मोठ्या चुलाण्यावर सकाळ, संध्याकाळ मोठ्या हंड्या-पातेल्यांतून पाणी उकळत असे. तेच पाणी बादलीतून आम्हाला अंघोळीसाठी मिळे. थेट आकाशाच्या खाली, अंगाला वारा झोंबत, रात्री व पहाटे टॉर्चच्या उजेडात सर्व आन्हिके आटोपताना फारच मजा येत असे! त्यात एक मैत्रीण व मी स्नानाचे वेळी आमच्या नैसर्गिक स्पा उर्फ वेगवेगळ्या तरट-स्नानगृहांमधून एकमेकींशी गप्पा मारत असू. आम्हाला वाटायचे की आम्ही जे काही बोलतोय ते फक्त आमच्यापुरतेच आहे.... पण ते साऱ्या राहुटीवासियांना ऐकू जात असे हे बऱ्याच उशीराने समजले. नशीब, आम्ही वाचलेली पुस्तके, कथा, कादंबऱ्या, पाहिलेले चित्रपट - गाणी वगैरेचीच चर्चा ( वैयक्तिक टिकाटिप्पणीसह) करायचो!!!!

पहिल्या रात्री त्या अनोळखी माळावर, हाय-वे वरच्या ट्रक्सचे आवाज व दिव्यांचे प्रखर झोत तंबूच्या कपड्यातून अंगावर घेत, सतरंजीमधून टोचणाऱ्या नवार खाटेवर कूस बदलत, अंगाला यथेच्छ ओडोमॉस चोपडूनही हल्ल्यास उत्सुक डासोपंतांना हूल देत, बंद तंबूच्या फटीमधून येणारे गार गार वारे अनुभवत आणि दुसऱ्या दिवशीची स्वप्ने पाहत कधी झोप लागली तेच कळले नाही.

दुसऱ्या दिवशी गजर लावला होता तरी कुडकुडत्या थंडीत उठायची इच्छा होत नव्हती. पण तंबूच्या दाराशी आलेल्या बेड-टीने आम्हाला उठवल्यावर मग बाकीचे आवरणे भागच होते. पहाटेच्या अंधारातच पटापट आवरले. येथे खाटेवरून पाऊल खाली टाकल्या टाकल्या बूट-मोजे घालावे लागत. कारण राहुटीचा भाग शेतजमीनीचाच असल्यामुळे रात्रीतून कोण कोण पाहुणे तिथे आश्रयाला आलेले असत. रात्री कंदिलाच्या उजेडात उशाशी काढून ठेवलेला कपड्यांचा ताजा जोड अंगात चढवायचा, सर्व जामानिमा करून दिवसभरासाठी लागणारे सामान सॅकमध्ये कोंबून बाहेरच्या खुल्या आवारात, हातांचे तळवे एकमेकांवर चोळत, थंडीत अंगात ऊब आणायचा प्रयत्न करत प्राध्यापकांची वाट बघत थांबायचे. त्यादिवशीही तसेच झाले. पलीकडे आकाशात विविध रंगछटांची नुसती बरसात झाली होती. सकाळच्या प्रहराला शांत प्रहर का म्हणतात ते तेव्हा नव्याने कळले. जानेवारीतल्या धुक्याच्या दुलईला बाजूला सारत जेव्हा सूर्याची किरणे आसमंत उजळवू लागली होती तेव्हा आमच्या चमूने उत्खननाच्या साईटच्या दिशेने कूचही केले होते. सोबत किलबिलणाऱ्या पक्ष्यांची साथ. नागपुरी उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी डोक्याला हॅट, गळ्यात स्कार्फ, टी-शर्टवर पूर्ण बाह्यांचा शर्ट, पॅंट आणि पायात शूज अशा एरवी मला अजिबात सवय नसलेल्या अवतारात सुरुवातीला वावरताना थोडे अवघडायला झाले होते. पण हळूहळू त्याची सवय झाली. हाय-वे वरून पंधरा-वीस मिनिटे चालल्यावर थोडे आत वळून एका ओढ्याच्या बाजूला असलेल्या एका पांढरयुक्त डोंगरावर आमची उत्खननाची साईट होती. महापाषाणयुगीन संस्कृतीतील वस्तीचे अवशेष येथील उत्खननात गवसत असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व होते. अगोदरच्या वर्षी जवळच त्या काळातील दफनभूमीचे उत्खनन झाले होते. मला ह्यावर्षीच्या त्या पुरातन वस्तीवरील उत्खननात हाडे, सांगाडे वगैरे सापडणार नाहीत म्हणून थोडेसे दुः ख झाले खरे, पण त्या वस्तीच्या खुणांमध्येही काही महत्त्वपूर्ण अवशेष, पुरावे हाती लागायची शक्यता होती.

आल्यासरशी आमच्या एका प्राध्यापकांनी आम्हाला ओढ्याच्या दिशेने पिटाळले. मग त्यांनी स्वतः येऊन ओढ्याच्या पाण्यातून, परिसरातून जीवाश्म कसे हुडकायचे ते सप्रात्यक्षिक दाखवले. त्यानंतर जवळपास अर्धा-पाऊण दिवस आम्ही घोटाभर पाण्यात उभे राहून, पाठी वाकवून, माना मोडेस्तोवर ताणून जीवाश्म हुडकत होतो. उत्खनन हे येऱ्या गबाळ्याचे काम नोहे हा शोध मला त्याच बकचिंतनात लागला. पुस्तकात वाचलेली सोपी पद्धत प्रत्यक्षात आणताना किती कष्टाची असते ते पहिल्यांदाच जाणवले. लगोलग सर्व पुरातत्वज्ञांविषयीचा माझा आदर जाम दुणावला.

दुपारच्या जेवणापश्चात (नशीब, त्यासाठी वेगळी तंगडतोड नव्हती! ते जाग्यावरच यायचे! ) मोडलेल्या माना, पाठी सावरत आम्ही उत्खननाच्या चरापाशी येऊन थडकलो. चराचे शास्त्रशुद्ध पद्धतीने वेगवेगळ्या चौरसांमध्ये दोरीच्या साहाय्याने विभाजन करण्यात आले होते. आमच्या हातात छोटी छोटी हत्यारे देऊन प्रत्येकीची रवानगी एकेका कोपऱ्यात करण्यात आली. जमीन कशी हलक्या हाताने उकरायची, ब्रशने साफ करायची वगैरेंचे प्रात्यक्षिक झाल्यावर आम्ही मन लावून आपापल्या चौकोनात कामाला लागलो. खूपच वेळखाऊ, कष्टाचे, धीराचे आणि कौशल्याचे काम. कोणतीही घाई करायची नाही. काही महत्त्वाचे सापडत आहे असे वाटले तर लगेच सरांना बोलावायचे. मध्ये मध्ये आमचे सर येऊन शंकांचे निरसन करीत, प्रश्नांना उत्तरे देत आणि आमच्या आकलनाचीही चाचपणी करत. तशी मजा येत होती. पण एवढा वेळ दोन पायांवर उकिडवे बसण्याची सवय नसल्यामुळे दर पंधरा-वीस मिनिटांनी हात-पाय झाडायचा, झटकायचा कार्यक्रमही चालू असे. पाठ धरली की जरा हात-पाय मोकळे करण्यासाठी इतर लोकांची खोदाखोदी कोठवर आली हे बघण्यासाठी जरा फिरून यायचे.... अर्थातच आपल्या चौकोनापेक्षा इतरांचे चौकोन जास्त आव्हानात्मक व आकर्षक वाटत असत!

मला नेमून देण्यात आलेल्या चौकोनात मला तुटकी-फुटकी मातीची खापरे, शंख, हस्तीदंती बांगड्यांचे काही तुकडे मिळत होते. प्रत्येक अवशेष जीवापाड जपून हलकेच साफ करताना नकळत मनात तो अवशेष तिथे कसा, कोठून आला असेल वगैरेची कल्पनाचित्रे रंगत असत.

मी काम करत असलेल्या चौकोनाच्या जवळच मातीत पुरलेल्या रांजणाच्या खुणा सापडल्या होत्या. त्यामुळे आम्ही काम करत असलेला भाग एखाद्या घराच्या स्वयंपाकाच्या जागेतील असावा असे वाटत होते. आमचे प्राध्यापक आम्हाला खापरांचे वर्गीकरण कसे करायचे, त्यांच्यावर दृश्य खुणा कशा शोधायच्या, त्यांची साफसफाई इत्यादीविषयी अथक मार्गदर्शन करत असत. काम कितीही पुढे न्यावे असे वाटले तरी सूर्याचे मावळतीचे किरण आम्हाला जबरदस्तीने परतीचा कँप साईटचा रस्ता धरायला लावत असत. शिवाय दिवसभर उन्हात करपल्यावर दमलेल्या थकलेल्या शरीराने जास्त काही होणे शक्यही नसे.

कँपवर परतल्यावर हात-पाय धुऊन सगळेजण मधल्या मोकळ्या जागेत ठेवलेल्या प्लॅस्टिक टेबल-खुर्च्यांचा ताबा घेत असत. मग चहा-बिस्किटांचा राऊंड होई. जरा तरतरी आली की आळीपाळीने स्नानासाठी क्रमांक लावले जात. दिवसभराची धूळ, माती, घाम, आदल्या रात्रीचा ओडोमॉसचा थर वगैरे चांदण्यांच्या आणि टॉर्चच्या प्रकाशात, किरकिरणाऱ्या रातकिड्यांच्या आणि गार वाऱ्याच्या साथीने, गरम गरम पाण्याने धुतला जाताना काय स्वर्गसुख लाभे हे शब्दांमध्ये सांगणे शक्य नाही. मग जरा किर्र अंधाराची भीती घालवण्यासाठी आपसूकच तोंडातून गाण्याच्या लकेरी बाहेर पडत आणि टेबलाभोवती गप्पा मारत बसलेल्या आमच्या 'सक्तीच्या' श्रोत्यांची बसल्या जागी करमणूक होई!

स्नानादीकर्मे झाल्यावर खरे तर माझे डोळे दिवसाच्या श्रमांनी आपोआपच मिटायला लागलेले असत. पण कंदिलाच्या प्रकाशातील राहुटीतल्या भोजनाचा दरवळ त्या झोपेला परतवून लावत मला जागे राहण्यास भाग पाडत असे. जेवणात आम्हा विद्यार्थी व प्राध्यापकांची अंगतपंगत बसे. आमचा शिपाई/ आचारी/ वाढपी आम्हाला मोठ्या प्रेमाने आणि आग्रहाने खाऊ घालत असे. त्या पंगतीत दिवसभरातल्या उत्खननाच्या प्रगतीवर चर्चा होत. कधी कधी उष्टे हात कोरडे होईस्तोवर ह्या चर्चा रंगत. त्यातील सर्व तांत्रिक मुद्दे कधी कळत तर कधी बंपर जात. पण तरीही तारवटल्या डोळ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मुखातून मिळणारी माहिती शिणलेल्या मेंदूत साठवताना काय तो आनंद मिळे!

जेवणापश्चात पुन्हा जरा वेळ बाहेरच्या टेबलाभोवती गप्पा रंगत. कधी आम्ही पाय मोकळे करण्यासाठी हाय-वे च्या कडेकडेने जरा फेरफटका मारून येत असू. पण दिवसभरच्या सवय नसलेल्या परिश्रमांनंतर माझे पाय अशा सफरीसाठी जाम कुरकुरत. तरीही माघार घ्यायची नाही ह्या तत्त्वानुसार मी स्वतः ला रेटत असे. नऊ-साडेनवाला सगळेजण आपापल्या राहुट्यांमध्ये परतलेले असत. मग रात्री कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात हलक्या आवाजात गप्पा (हो! गप्पांचे आवाजही मोकळ्या माळरानामुळे इतरांना ऐकू जायचे! ), दुसऱ्या दिवशीचे प्लॅन्स आणि मग कधीतरी कंदिलाची ज्योत बारीक करून निजानीज!

दुसरे दिवशी पुन्हा आदल्याच दिवसाचे रूटीन! रोज साईटवर जाता - येता रस्त्याच्या बाजूला असलेल्या दगडांच्या खाणींमध्ये चमचमणारे दगड मिळायचे. अमेथिस्ट, टोपाझच्या रंगछटांचे ते जाडजूड चमचमणारे दगड गोळा करताना खूप मजा यायची. दुपारच्या जेवणानंतर जिथे कोठे, ज्या झाडाखाली सावली मिळेल तिथे अर्धा तास विश्रांती घेऊन मगच पुढच्या कामाला सुरुवात व्हायची. मग आमच्यातील काही उत्साही जन आजूबाजूच्या संत्रा-पेरुंच्या बागांमध्ये रानमेवा शोधत हिंडायचे. गावातील शेतकरी कधी कधी आम्ही काय करतोय हे पाहायला यायचे. आम्हाला आधीपासूनच गावकऱ्यांशी कसे वागायचे वगैरेच्या अनौपचारिक सूचना देण्यात आल्या असल्यामुळे आम्ही आपले हातातले काम चालू ठेवायचो.

आमचे एक प्राध्यापक आम्हाला अनेकदा काही सोन्याचांदीचे दागिने अंगावर असल्यास ते उत्खननाचे वेळी काढून ठेवायला सांगायचे. ते असे का सांगतात ते मात्र कळत नव्हते. शेवटी त्याचा उलगडा एका मजेदार किश्शाच्या कथनाने झाला. अशाच एका उत्खननाचे वेळी तेथील एका विद्यार्थिनीच्या गळ्यातील सोन्याची चेन उत्खनन करत असलेल्या खड्ड्यात पडली. नंतर लक्षात आल्यावर शोधाशोध झाली व अखेर ती चेन खड्ड्यातून मिळाली. एव्हाना गाववाल्यांपर्यंत ही बातमी कशीतरी पोचलीच होती. मग काय! थोड्याच वेळात त्या जमीनीचा मालक व त्याचे इतर गाववाले साथीदार उत्खननाच्या साईटवर हजर झाले! त्यांच्या मते उत्खननात बरेच गुप्तधन सापडले आणि त्या गुप्तधनात सोन्याची चेनही मिळाली! वातावरण बघता बघता गंभीर झाले. गाववाले गुप्तधन ताब्यात द्या ह्या आपल्या आग्रहापासून मागे हटायचे नाव घेईनात आणि त्यांची कशामुळे खात्री पटेल ह्यावर साईटवरील लोकांमध्ये खल-विचार. शेवटी त्या गाववाल्यांची कशीबशी समजूत काढता काढता तेथील प्राध्यापक, विद्यार्थी व मदतनीसांच्या नाकी नऊ आले! तेव्हापासून जरा जास्तच सावधानता!

एव्हाना मी काम करत असलेल्या चौकोनात फार काही निष्पन्न होत नव्हते. परंतु माझ्या दोन सख्या ज्या चौकोनात काम करत होत्या तिथे फक्त चूलच नव्हे तर वैलीच्या अस्तित्वाच्या खुणाही दिसू लागल्या होत्या!! महापाषाणयुगीन संस्कृतीतील मानवालाही चूल-वैलीचे तंत्रज्ञान अवगत असण्याविषयीचा हा फार फार महत्त्वाचा पुरावा होता. मग त्याविषयी अगणित चर्चा, तर्क, अंदाज चांगलेच रंगत असत. दरम्यान आम्ही उत्खननाच्या व आमच्या राहुट्यांच्या साईटपासून बऱ्यापैकी दूर अंतरावर असलेल्या प्रत्यक्ष भागीमारी गावाचा फेरफटका करून आलो होतो. मुख्य वस्तीतील बऱ्याच घरांचा पाया पांढर असलेल्या भागातच होता. मूळ जोत्यावरच पुढच्या अनेक पिढ्या आपली घरे बांधत होत्या. म्हणजे कितीतरी शे - हजार वर्षे त्याच भागात लोक वस्ती करून राहत होते. अर्थात तिथे लोकांची रहिवासी वस्ती असल्यामुळे तसे तिथे उत्खनन करणे अवघड होते. पण निरीक्षणातून अंदाज तर नक्कीच बांधता येत होता.

आतापर्यंत आमच्या खरडवह्यांमध्ये आम्ही उत्खननाच्या चराच्या आकृत्या, कोणत्या चौकोनात काय काय सापडले त्याच्या नोंदी, खुणा, तपशील व जमतील तशा आकृत्या वगैरे नोंदी ठेवतच होतो. त्या चोपड्यांना तेव्हा जणू गीतेचे महत्त्व आले होते. एकेकीच्या वहीत डोके खुपसून केलेल्या नोंदी न्याहाळताना ''ह्या सर्व घडामोडींचे आपण साक्षीदार आहोत'' या कल्पनेनेच मनात असंख्य गुदगुल्या होत असत. काळाच्या पोतडीतून अजून काय काय बाहेर पडेल ह्याचीही एक अनामिक उत्सुकता मनी दाटलेली असे.

बघता बघता आमचा उत्खननाच्या साईटवरचा वास्तव्याचा काळ संपुष्टात आला. आमची बॅच गेल्यावर दुसरी विद्यार्थ्यांची बॅच उत्खननात सहभागी होण्यासाठी येणार होती. मधल्या काळात २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्हाला सुट्टी होती. त्या दिवशी सकाळी गावातील प्रभात फेरीत उत्स्फूर्त भाग घेऊन त्यानंतर आमच्या तज्ञ प्राध्यापकांनी अतिथीपद भूषविलेल्या गावातील पंचायत व शाळेच्या समारंभात उपस्थिती लावतानाही आगळीच मजा आली. दुपारी असेच फिरायला गेलो असता माझ्या लाल रंगाच्या टीशर्टला पाहून जरा हुच्चपणा दाखवणाऱ्या रस्त्यातील म्हशीमुळे माझी भंबेरी उडाली व इतरांची करमणूक झाली!

निघताना आम्ही मैत्रिणीच्या नातेवाईकांकडे सावनेरला रात्रीचा मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी लवकर उठून नागपूर स्टेशन गाठले. तिथून पुढे पुण्यापर्यंतचा सोळा-सतरा तासांचा प्रवास. अंगाला अजूनही भागीमारीच्या मातीचा वास येत होता. नाकातोंडात-केसांत तिथलीच धूळ होती. हातांना कधी नव्हे तो श्रमाचे काम केल्यामुळे नव्यानेच घट्टे पडले होते. पायांचे स्नायू दुखायचे बंद झाले नसले तरी दिवसभराच्या उठाबशांना सरावू लागले होते. आणि डोळ्यांसमोर सतत उत्खननाच्या साईटची दृश्ये तरळत असायची. तो अख्खा प्रवास आम्ही सहभागी झालेल्या उत्खननाच्या आकृत्या पडताळण्यात, त्यावर चर्चा करण्यात आणि दमून भागून झोपा काढण्यात घालवला.

घरी आल्यावर आप्त-सुहृदांनी मोठ्या उत्सुकतेने प्रवासाविषयी, उत्खननाविषयी विचारले. तेव्हा त्यांना काय काय सांगितले, त्यातील कोणाला मी सांगितलेल्यातील काय काय उमजले हे आता लक्षात नाही. एका अनामिक धुंदीत होते मी तेव्हा! पण आयुष्यातील अतिशय अविस्मरणीय असा अनुभव देणारे ते सात दिवस, ते अनमोल उत्खनन आणि वेगळ्या वातावरणात मिळालेली निखळ मैत्रीची साथ यांमुळे भागीमारी कायम लक्षात राहील!

-- अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

संस्कृतीप्रवासवावरइतिहाससमाजजीवनमानशिक्षणप्रकटनलेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

8 Jul 2010 - 4:37 pm | स्पंदना

ते वय आणी त्या वयात अस काही करायला मिळाल्याची धुंदी दोन्ही अगदी पुरेपुर शब्दात उतरलय.

आजुबाजुच वातावरण पण डोळ्यासमोर उभा रहात.

छान लिहिलयस.

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

मस्त कलंदर's picture

8 Jul 2010 - 4:42 pm | मस्त कलंदर

मस्त अनुभव!!!!!
खरेच तुमच्याकडे किती वेगवेगळ्या अनुभवांची शिदोरी आहे!!!! :)

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

यशोधरा's picture

8 Jul 2010 - 4:46 pm | यशोधरा

खूप सुरेख लिहिलं आहेस अरुंधती. अतिशय आवडलं.

रेवती's picture

8 Jul 2010 - 5:12 pm | रेवती

छान अनुभव!
लेखनाची ष्टाइलही आवडली.

रेवती

मितभाषी's picture

8 Jul 2010 - 5:15 pm | मितभाषी

चूलच नव्हे तर वैलीच्या अस्तित्वाच्या खुणाही दिसू लागल्या होत्या!!

वैली काय असते?

रेवती's picture

8 Jul 2010 - 7:17 pm | रेवती

मुख्य चुलीच्या शेजारी आणखी एक चूल तयार करतात. दोन्ही चुलींमध्ये जोड असतो. ज्यामुळे मुख्य चुलीत सरपणाने जो जाळ तयार होइल त्याची धग जोडणीतून दुसर्‍या चुलीतही जाऊ शकेल. पदार्थ जेंव्हा अर्धा अधिक शिजवून होतो तेंव्हा तो मंद आचेवर शिजवण्यासाठी वैलाच्या चुलीवर ठेवतात.मुख्य चुल आता दुसरा पदार्थ शिवण्यासाठी मोकळी होते. अश्याप्रकारे कमी सरपणात बराच स्वयंपाक होतो. आपले बरेचसे पदार्थ हे मंद आचेवर शिजवल्यास चव व सत्व टिकून राहते.
मला वैलाची चूल माझ्या घरी घालण्याची सोय असती तर फार आनंद झाला असता. मी लहान असताना कोकणात काकांकडे माझी वेगळी चूल तयार करून त्यावर रोज भात तरी शिजवावा असा आग्रह धरत असे. चूल सारवल्यावर त्यापुढे रांगोळी घालून, हळदीकुंकू वाहून तिला नमस्कार करायचा, मग स्वयंपाकाला सुरुवात!:)

रेवती

यशोधरा's picture

8 Jul 2010 - 7:37 pm | यशोधरा

रेवती, मस्त लिहिलंस गं. आजोळची चूल आठवली. मस्त. :)

प्रभो's picture

8 Jul 2010 - 7:03 pm | प्रभो

मस्त अनुभव.

श्रावण मोडक's picture

8 Jul 2010 - 7:22 pm | श्रावण मोडक

छान लेख. त्या उत्खननाचे पुढे काय झाले?

अरुंधती's picture

8 Jul 2010 - 7:39 pm | अरुंधती

सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्स!
रेवती, थँक्स वैलाचे स्पष्टीकरण दिल्याबद्दल! :)

श्रामो, आज त्या उत्खननातून सापडलेल्या अवशेषांमुळे भागीमारी हे भारतातील स्थळ महापाषाणयुगीन संस्कृतीचा महत्त्वाचा पुरावा म्हणून सार्‍या जगभरात पोचले आहे. (कित्येकांच्या डॉक्टरेटस झाल्या आहेत त्यावर!) तिथे सापडलेली खापरे, चूल-वैल, हत्यारे/ अवजारे यांवरून तसेच इतर शास्त्राधारित संशोधनावरुन त्या काळात तिथे रहाणारा समाज, त्यांची जीवनचर्या यांच्याविषयी माहिती मिळते. अधिक माहितीसाठी http://www.indiasite.com/archaeology/ ही साईट पहा. तसेच तेथील रहिवाशांच्या दफनस्थानातून मिळालेल्या मानवी अवशेषांवरूनही त्या काळच्या माणसाच्या जीवनशैलीचा, भौगोलिकतेचा अभ्यास करता येतो.

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

श्रावण मोडक's picture

8 Jul 2010 - 7:53 pm | श्रावण मोडक

या दुव्याबद्दल दुवा. पण माझा प्रश्न थोडा वेगळा. अकॅडेमिक बरेच काही झाले असेल. त्या संशोधनाशी तुमचे नाते असल्याने आणखी अशा स्वरूपाच्या लेखनाच्या अपेक्षेतून मी, त्या संशोधनाचे पुढे काय झाले, असे विचारले. लिहा.

आळश्यांचा राजा's picture

8 Jul 2010 - 10:33 pm | आळश्यांचा राजा

होय. पुढे काय झाले हे वाचायला आवडेल.

आठवणी आणि त्या ज्या प्रकारे सांगितल्या आहेत हे आवडलं. या प्रकारचे अनुभव सहसा वाचनात फारसे येत नाहीत. त्यामुळे लिहा.

आळश्यांचा राजा

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Jul 2010 - 8:26 pm | llपुण्याचे पेशवेll

छान लेख.
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

सुनील's picture

8 Jul 2010 - 10:59 pm | सुनील

कथन आवडले.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

रामदास's picture

8 Jul 2010 - 11:35 pm | रामदास

आणि तुम्ही शोधून काढलेले पुरातन अवशेष याबद्दल आणखी वाचायला आवडेल.
एक नविन विषय मिळाला की वाचनाचा हुरुप वाढतो.
हा तुमचा खास विषय असेल तर डि.डि.कोसांबी यांच्या संशोधनाबद्दल पण लिहा .
हा लेख उत्तम उतरला आहेच.

क्रेमर's picture

9 Jul 2010 - 12:53 am | क्रेमर

रामदासांशी सहमत आहे. लेख वाचनीय झाला आहे व नाविन्यतेमुळे या विषयावर आणखी वाचवेसे वाटत आहे.

आनंदयात्री's picture

9 Jul 2010 - 10:21 am | आनंदयात्री

छान अनुभवकथन. असे लेख विरळा, म्हणुन अजुन वाचावेसे वाटतेय.

कवितानागेश's picture

9 Jul 2010 - 11:08 am | कवितानागेश

इतके कमी का लिहिले??
अजून खूप वाचायला आवडेल......
महापाषाणयुगीन संस्कृती म्हणजे नक्की किती वर्षांपूर्वी?
ते मोजण्यासाठी नक्की कुठल्या टेस्ट्स घेतात, भारतात?
============
(उत्सुक्-भोचक) माउ

अरुंधती's picture

10 Jul 2010 - 1:12 pm | अरुंधती

महापाषाणयुगीन संस्कृती म्हणजे इंग्रजीत मेगॅलिथिक कल्चर!
आमचे उत्खनन हे मेगॅलिथिक व मेसोलिथिक कल्चर असलेल्या भागात झाले.
त्याविषयी, ह्या संस्कृतीविषयी जालावर बरेच काही उपलब्ध आहे.
हा दुवा वाचा : http://en.wikipedia.org/wiki/Megalith

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

विजुभाऊ's picture

9 Jul 2010 - 12:51 pm | विजुभाऊ

छान लिहिलाय हो.....
तुम्ही केलेल्या उत्खननाचे पुढे काय झाले तेही लिहा

अरुंधती's picture

9 Jul 2010 - 11:04 pm | अरुंधती

प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद! :-)

तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे उत्खननात नंतर काय झाले - तर त्या उत्खननात सापडलेल्या अवशेष, पुराव्यांची वर्गवारी करुन त्यांच्यावर संशोधन करुन त्यावर शोधनिबंध लिहिले गेले. महापाषाणयुगीन मानवाची एक ठराविक प्रकारची जीवनशैली दिसून येते. त्याने वापरलेली हत्यारे, अवजारे, खापरे, चूल-वैल इत्यादींवरुन त्याने कितपत तांत्रिक प्रगती केली होती ते कळते. तसेच शेती करणे, गुरे राखणे, व्यापार वगैरेंचीही कल्पना येते. आम्ही ज्या साईटवर उत्खनन करत होतो ती वस्तीची साईट होती. त्यामुळे तिथे खूप काही नाट्यमय, सनसनाटी वगैरे मिळाले नाही.

घराची साधारण रचना काय असावी, फ्लोअर प्लॅन कसा असावा हे कळते. जे काही अवशेष, पुरावे प्राप्त झाल्यावर त्यातून नागपूर भागात महापाषाणयुगीन संस्कृती अस्तित्त्वात होती हे सिध्द झाले व त्या काळच्या मानवाची जीवनशैली अधोरेखित झाली. त्या पुराव्यांचे भारतातील किंवा जगात अन्यत्र सापडलेल्या महापाषाणयुगीन अवशेषांशी तौलनिक अभ्यास करण्यात आले.
जीवाश्मांच्या पुराव्यातून त्या काळातील वनस्पती - धान्य यांविषयी कळते. खापरांच्या अभ्यासातून ती कोणत्या प्रकारच्या मातीपासून बनवली गेली, त्यासाठी काय तंत्रज्ञान वापरले, त्या खापराच्या भांड्याचा उपयोग कशासाठी केला गेला असेल वगैरेही संशोधनाचे विषय आहेत.

मी भाग घेतलेल्या उत्खनन- संशोधनात मार्च महिन्यापर्यंत फक्त उत्खननच चालले होते. तोपर्यंत गोळा झालेले पुरावे, अवशेष यांचा पुढील अभ्यास संशोधन संस्थेचे अभ्यासक करत असतात. अनेक संशोधक आपापल्या विषयांच्या अनुषंगाने त्या अवशेषांचा अभ्यास करतात व आपापले निष्कर्ष यथावकाश प्रकाशित करतात.

त्याचेच हे जर्नल आहे : http://asi.nic.in/nmma_reviews/Indian%20Archaeology%201992-93%20A%20Revi...

http://asi.nic.in/nmma_reviews/Indian%20Archaeology%201993-94%20A%20Revi...

त्यात तुम्हाला ह्या संदर्भात झालेल्या पुढील संशोधनाची माहिती मिळेल. लिहायला, टंकायला खूप आहे म्हणून हा शॉर्टकट! ;)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

प्रियाली's picture

10 Jul 2010 - 12:06 am | प्रियाली

मस्त अनुभव आहे आणि मांडलाही चांगला आहे.

अर्धवटराव's picture

10 Jul 2010 - 3:05 am | अर्धवटराव

तुझे एकंदर लिखाण बघुन तु एक सर्वांगसंपन्न आयुष्य जगतेस असं दिसतय.
असेच लिहीत रहा !!

(नाविन्य प्रेमि) अर्धवटराव
-रेडि टु थिन्क

राजेश घासकडवी's picture

10 Jul 2010 - 11:19 am | राजेश घासकडवी

नाविन्यपूर्ण अनुभव आणि समर्थ लेखन. अजून येऊ द्यात.

sneharani's picture

10 Jul 2010 - 11:36 am | sneharani

छान लिहला आहेस अनुभव...!

समंजस's picture

10 Jul 2010 - 4:28 pm | समंजस

छान अनुभव घेतलात तुम्ही :)
बर्‍याच काळानंतर पुरातत्व विषयावर वाचून आनंद वाटला.
आणखी असेच काही अनुभव येउद्यात!.

[जानेवारीतल्या धुक्याच्या दुलईला बाजूला सारत जेव्हा सूर्याची किरणे आसमंत उजळवू लागली होती तेव्हा आमच्या चमूने उत्खननाच्या साईटच्या दिशेने कूचही केले होते. सोबत किलबिलणाऱ्या पक्ष्यांची साथ. नागपुरी उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी डोक्याला हॅट, गळ्यात स्कार्फ, टी-शर्टवर पूर्ण बाह्यांचा शर्ट, पॅंट आणि पायात शूज अशा एरवी मला अजिबात सवय नसलेल्या अवतारात सुरुवातीला वावरताना थोडे अवघडायला झाले होते.
---------------------------------------------------------------
जानेवारी महिन्यात नागपुरी उन्हाचा तडाखा?
माझ्या माहिती प्रमाणे विदर्भात उन्हाळ्याची सुरवात, मार्च पासून होते :? ]

अरुंधती's picture

20 Jul 2010 - 6:28 pm | अरुंधती

समंजस, नागपुर भागात जानेवारी महिन्यात सकाळी आणि रात्री जरी थंडी असली तरी दुपारी ठक्क ऊन पडायचे. आमच्या पुणेकर मंडळींना तर चांगलेच भाजायचे.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

स्वाती२'s picture

10 Jul 2010 - 7:14 pm | स्वाती२

मस्त अनुभव!

बहुगुणी's picture

21 Jul 2010 - 4:20 am | बहुगुणी

अरुंधती: माहितीपूर्ण लेख आवडला.

तुम्ही लेखात एका ठिकाणी .."थोड्याच वेळात त्या जमीनीचा मालक व त्याचे इतर गाववाले साथीदार उत्खननाच्या साईटवर हजर झाले!.." असा उल्लेख केला आहे. म्हणजे अशी ही उत्खननस्थळे सरकारी जमिनीतच नव्हे तर कुणाच्या तरी खाजगी मालकीचीही असू शकतात. मग मनात आलेले काही प्रश्नः
१. या उत्खननासाठी जमीनमालक नेहेमीच सहजासहजी तयार होतील असं नाही, तेंव्हा त्यांच्यावर सरकार/पुरातत्वविभाग काही कायदेशीर आधिकार बजावू शकतं का?
२. त्या जमीनमालकांना काही compensation मिळतं का?
३. मालकांनी परवानगी दिली तर हे उत्खनन काही विवक्षित वेळात पूर्ण करणं हे बंधनकारक असतं का? हा कालावधी साधारण किती असतो?
४. एखाद्या उत्खननस्थळात खूपच महत्वाची माहिती मिळाली, आणि जवळपासच्या (मोकळ्या असलेल्या) जमिनीतही उत्खनन करणं गरजेचं वाटलं तर अशी वाढीव योजना करणं, त्यासाठी निधी जमवणं यात नक्कीच वेळ जात असणार; अशा वेळी (continuity साठी) प्राचीन अवशेष आहे तिथेच जपून ठेवण्याची (आणि जमीन मालकाला जमिनीपासून दूर ठेवण्याची!) वेळ कधी येते का?
५. आणि कदाचित सर्वात महत्वाचं, या नक्कीच महत्वाच्या अभ्यासासाठी भारतात किती निधी उपलब्ध आहे आणि तो पुरेसा आहे का?

उत्तरांचं कुतुहल आहे, आधीच आभार.