जेंव्हा ते पहील्यांदा चालून आले...

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
14 Nov 2009 - 12:41 am

मनसेवरून गेल्या दोनचार दिवसात झालेल्या अनेक चर्चांमधे एक प्रकर्षाने वेगळी जाणवलेली चर्चा ही श्री. कलंत्री यांची होती. त्यावर उत्तर लिहीण्यासाठी खालील विषय सुचला आणि विचार घोळू लागले, पण तेव्हढ्यात योगायोगाने, धनंजयने एक लेख लिहीला ज्याचा विषय, माझ्या विषयाच्या संदर्भात, विनोबांच्या भाषेत वर्तुळाच्या दोन आजूबाजूंच्या टोकांप्रमाणे ठरला: एकीकडून बघितल्यास सगळ्यात दूर आणि दुसरीकडून बघितल्यास सगळ्यात जवळ. :)


बॉस्टनमधे ज्या काही बघण्यासारख्या अनेक ऐतिहासीक वास्तू आहेत त्यात १९९५ मधे अजून एका वास्तूने भर घातली. वास्तवीक त्याचा अमेरिकन इतिहासाशी प्रत्यक्ष संबंध नव्हता, तरी देखील. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाची वाटचाल ज्या पथावरून सुरू झाली, त्या "फ्रीडम ट्रेल" वर, बॉस्टन सिटीहॉलच्या बाजूस वर्दळीच्या भागात सहा मोठे काचेचे मनोरे उभे केले गेले. त्या मनोर्‍यातून एकात एक असे चालत जाता येते. मधे चालत जात असताना पांढरी वाफ - प्रतिकात्मक धूर येत असतो आणि त्या मनोर्‍यातून जात असताना काचेतून जशी बाहेरचे बघताना पारदर्शकता जाणवते तशीच त्या काचेवर लिहीलेले मोठमोठे क्रमांक देखील डोळ्यात भरतात.

असे बघत बघत आपण बाहेर येतो आणि बाजूस लगेचच असलेल्या एका स्मृती खडकावर ती सुप्रसिद्ध (की दुर्दैवी?) वाक्ये दिसतातः

First they came for the communists, and I did not speak out—because I was not a communist;
Then they came for the socialists, and I did not speak out—because I was not a socialist;
Then they came for the trade unionists, and I did not speak out—because I was not a trade unionist;
Then they came for the Jews, and I did not speak out—because I was not a Jew;
Then they came for me—and there was no one left to speak out for me.

- Pastor Martin Niemöller

या ओळी मी एकदा माझ्या एका जालीय प्रिय मित्राला पण येथेच सांगितल्या होत्या...

अर्थात ह्या वास्तूचे नाव आहे "न्यू इग्लंड होलोकास्ट मुझियम" (बॉस्टनसभोवातालच्या सहा राज्यांना "न्यू इग्लंड" असे म्हणतात). हिटलर आणि नाझी जर्मनीच्या क्रूर अत्याचारांतूनही जे वाचले त्यातील काही बॉस्टनमधे येऊन स्थायीक झाले. अशा काही "वाचलेल्यांनी" ठरवले की आपण एक झालेल्या अत्याचारांचे स्मारक बांधायचे. त्यात मग त्यांनी सहा गॅस चेंबर्स असलेले सहा उंच मनोरे बांधले, त्यात ज्यांचे अनन्वित हाल होवून मृत्यू पत्करावा लागला त्या ज्यू कैद्यांचे कैदी क्रमांक कोरले आणि गॅस चेंबर्स मधील विषारी वायू दाखवण्यासाठी प्रतिकात्मक पांढरी वाफ ठेवली... म्हणले तर अगदी साधे स्मारक पण कुठच्याही वाटसरूच्या नजरेतून चुकणार नाही असे.

जेंव्हा त्याचे उद्घाटन झाले तेंव्हा त्याच्या बातम्या स्थानिक माध्यमात एक-दोन दिवस येत होत्या. त्या ऐकताना आम्हा मित्रांना गप्पा मारताना एक प्रश्न पडला होता की ज्यूंना मारले जर्मन नात्झींनी आणि ही अपराधाची भावना अमेरिकेत तीही लिबरल बॉस्टनमधे कशासाठी? अर्थात याचे देखील उत्तर कोणा ज्यूने न सांगता समजू शकले. एक म्हणजे १९४२ च्या शेवटाला जर्मनीत ज्यू, जिप्सि आणि इतर अनेकांची कशी निर्घृण हत्या होत आहे हे समजूनदेखील अमेरिकेने दोस्त राष्ट्रांबरोबर कानाडोळा करायचेच ठरवले होते त्याचा कुठेतरी राग असावा आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे ह्या अत्याचारांची आठवण आणि जाणीव ही जनसामान्यात राहावी कारण सत्तेच्या माजातून होणार्‍या एका अन्यायाकडे दुर्लक्ष केल्याचे परीणाम हे अनेक अन्यायांची निर्मिती करू शकतात. तीच अवस्था अजून पुढे नेल्यास दहशतवादाच्या संदर्भातही लागू होते. आज कुठेतरी वाटते की संपुर्ण जगात बोकाळलेल्या दहशतवादाचा उगम हा कुठेतरी भारतीय राजकारण्यांनी आणि "तथाकथीत" बुद्धीवाद्यांनी योग्य वेळेस योग्य निर्णय अथवा न्याय्य बाजू न घेण्यात झाला आहे. कंदहारप्रकरणी सोडलेला अतिरेकी हा ९/११ च्या अतिरेक्यांना मदत करत राहीला... आपण संयामने घ्यावे म्हणणार्‍या अमेरिका, ब्रिटन, आणि युरोपातील इतर राष्ट्रांनापण त्याची फळे भोगावी लागली/लागत आहेत. इतकेच कशाला आता पाकीस्तानचे काय झाले आहे ते पहा...असो.

दुसर्‍या महायुद्धातील होलोकास्ट हे खूप भिषण होते पण त्याच्या मुळाशी होती ती निरंकूश सत्ता आणि त्या सत्तेच्या दबावाखाली आम्ही काही करू शकू ही गुर्मी. हिटलर आणि नात्झींची गुर्मी आणि स्थानीक संस्कृतीस तुच्छ लेखण्याचा माज हे गुणात्मकरित्या वेगळे नाहीत. त्यातील भाव एकच आहे. फक्त एका ठिकाणी एक पारडे जड होते तर दुसरी कडे त्याच्या विरुद्ध... मात्र अजून एक गोष्ट समान होती, ती म्हणजे स्वतःचे जळत नसताना इतरांच्या भावनांकडे आणि त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाकडे दुर्लक्ष करणारी "तथाकथीत" बुद्धिवाद्यांची वृत्ती. अर्थात जसे सगळेच जर्मन हे नात्झी नव्हते, तसेच सगळेच बुद्धीवादी हे तथाकथीत नसतात. हे देखील एक सत्य लक्षात ठेवणे महत्वाचे.

तात्पर्यः तात्कालीक हिंसा हे कुणाचेही पटकन लक्ष खेचते. त्यात जर स्वतःच्या पोटाला चिमटा बसलाच तर अजूनच जाणवू शकते. पण अशी हिंसा कितीही निंदनीय असली आणि तशी ती असतेच, तरी ती कशाची प्रतिक्रीया म्हणून झाली ह्याचा विचार करणे, ती परत घडू नये असे वाटत असल्यास काय व्हावे यावर विचार करणे, स्वतःचा खारीचा का होईना पण वाटा उचलणे हे "इतर कसे चुकत आहेत" हे दाखवण्यापेक्षा अधिक महत्वाचे वाटते. असाच जास्त विचार केल्यास अशा स्मारकांतून निष्कर्ष निघतो असे वाटते.

----------------------------------

सर्व छायाचित्रांचा संदर्भः http://www.nehm.com/

इतिहाससमाजजीवनमानराजकारणप्रकटनविचारबातमीमाध्यमवेधसमीक्षा

प्रतिक्रिया

स्वाती२'s picture

14 Nov 2009 - 3:35 am | स्वाती२

आत्मपरिक्षण करायला लावणारा लेख.

निमीत्त मात्र's picture

14 Nov 2009 - 4:18 am | निमीत्त मात्र

हिटलर आणि नात्झींची गुर्मी आणि स्थानीक संस्कृतीस तुच्छ लेखण्याचा माज हे गुणात्मकरित्या वेगळे नाहीत.

स्थानिक संस्कृतीस तुच्छ मानणे आणि नाझीवादाचा हा असा जोडलेला संबंध हास्यास्पद आहे. गुर्मी आणि माज ह्यात कसला असतो हो गुणात्मक भेद? कुणाला पैशाची मस्ती असते कुणाला सत्तेची कुणाला दोन्हीची तर कुणी जन्मजात मग्रुर असतो म्हणून हे सगळे काय हिटलर/नाझीवादासी जोडलेले असतात काय?

हिटलर सारख्या नराधमांची पूजा करणे त्यांना उघडपणे हिरो मानणारे आजही आहेत. आणि ते इथले बुद्धीवादी आहेत की तथाकथीत राडेबाज हे तुम्हालाही चांगलेच माहित आहे. तेव्हा गुणात्मक संबंध कुठे लावायचा ते तुम्हीच ठरवा.

एकिकडे हिटलरची प्रशंसा आणि दुसरीकडे बिका काकांनी लिहिलेल्या लेखावर नरसंहारावर आसवे ढाळणे ह्यात किती पराकोटीची विसंगती भरलेली आहे हे दिसून न येणे ह्याला काय म्हणावे विकास राव?

नंदन's picture

14 Nov 2009 - 4:19 am | नंदन

लेख.

ज्यूंना मारले जर्मन नात्झींनी आणि ही अपराधाची भावना अमेरिकेत तीही लिबरल बॉस्टनमधे कशासाठी?

अलीकडेच चॉम्स्कींची एक मुलाखत पाहत होतो. त्यात त्यांनी तेव्हाच्या अमेरिकेतल्या छुप्या आणि उघड ज्यू-द्वेषाबद्दल लिहिले आहे. त्यांचे बालपण ज्या फिलाडेल्फिया शहरात गेले, तिथे दुसर्‍या महायुद्धात पॅरिसचा पाडाव झाल्यावर झालेल्या जल्लोषाचे वर्णनही त्यांनी केले आहे. (पहिल्या महायुद्धातही जर्मन वंशाचे नागरिक अमेरिकेन लोकसंख्येच्या १/६ असल्याने अमेरिका युद्धात ल्युसिटानिया जहाज बुडेपर्यंत उतरली नाही असाही एक प्रवाद आहे.). अगदी न्यू यॉर्क टाईम्ससारख्या ज्यूंच्या मालकीच्या प्रकाशनसंस्थेनेही नाझींचे अन्याय पुरेशा प्रभावीपणे लोकांसमोर मांडले नाहीत असा आरोप केला जातो. या पार्श्वभूमीवर या स्मारकाचे महत्त्व नजरेत भरावे.

तात्पर्यः तात्कालीक हिंसा हे कुणाचेही पटकन लक्ष खेचते. त्यात जर स्वतःच्या पोटाला चिमटा बसलाच तर अजूनच जाणवू शकते. पण अशी हिंसा कितीही निंदनीय असली आणि तशी ती असतेच, तरी ती कशाची प्रतिक्रीया म्हणून झाली ह्याचा विचार करणे, ती परत घडू नये असे वाटत असल्यास काय व्हावे यावर विचार करणे, स्वतःचा खारीचा का होईना पण वाटा उचलणे हे "इतर कसे चुकत आहेत" हे दाखवण्यापेक्षा अधिक महत्वाचे वाटते. असाच जास्त विचार केल्यास अशा स्मारकांतून निष्कर्ष निघतो असे वाटते.

-- सहमत आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विकास's picture

15 Nov 2009 - 7:51 am | विकास

धन्यवाद...

अलीकडेच चॉम्स्कींची एक मुलाखत पाहत होतो. त्यात त्यांनी तेव्हाच्या अमेरिकेतल्या छुप्या आणि उघड ज्यू-द्वेषाबद्दल लिहिले आहे.

चॉम्स्कीची पुस्तके वाचली आहेत आणि आवडतातही. त्याची मते कधी कधी टोकाची वाटू शकतात पण माहीतीपूर्ण असतात. तत्कालीन अमेरिकन ज्यू द्वेषाबद्दल मी देखील ऐकले आहे आणि खरे असूही शकेल. पळून आलेल्या ज्यूंचे एक जहाज पण त्यांनी परत बेकायदेशीर म्हणत काही विचार न करता पाठवल्याचे ऐकलेले आहे, पण वाचलेले नाही... त्यांच्या भांडणाची पाळेमुळे त्यांच्या पायातपाय असलेल्या धार्मिक इतिहासात आहेत असे वाटते. पण तो एक वेगळाच विषय आहे. :)

धनंजय's picture

14 Nov 2009 - 5:08 am | धनंजय

स्मारकाची चांगली ओळख करून दिलेली आहे.

मला वाटते, नीमलर यांचे वाक्य "खास विचारवंतांसाठी" लिहिलेले नसून आपणा सर्वांसाठीच लिहिलेले आहे.

किंबहुना समाजात "विचारवंत" आणि "बिगर-विचारवंत" अशा दोन जमाती असतात, आणि त्यातही "खरे विचारवंत" आणि "खोटे विचारवंत" असे दोन उपप्रकार असतात, या म्हणण्याशी मी पूर्णपणे असहमत आहे.

समाजातातील प्रत्येक मनुष्य विचारवंत असतो, आणि प्रत्येक मनुष्य कृतिशील असतो. "काही लोक कृतिशील नसतात" (खारीचा वाटा उचलत नाहीत, पण इतरांचे चुकल्याचे सांगतात) ही कल्पना दयाळू असली तरी उपेक्षामूलक आहे, असे मला वाटते. तसेच "काही सामान्य लोक विचारवंत नसतात" हे वाक्यसुद्धा दयाळू असले तरी अधिक विचाराअंती सामान्यांचा अपमान करणारे आहे.

नीमलर यांचे वाक्य स्वतःचे परखड परीक्षण करणारे आहे - माणूस म्हणून, "विचारवंत" म्हणून नव्हे. पण ते अगदी अगदी प्रामाणिक आहे. त्यांचे आदले वर्तन ते म्हणतात तसे होते, त्यांचे वरील वाक्य केवळ काव्य नाही. साक्सेनहाउसेन येथील कॉन्संट्रेशन कँप म्यूझियममध्ये त्यांची आदली मते वाचायला मिळाली - पण पूर्ण तपशील आठवत नाही - नात्सी काळात हॉलंड किंवा डेनमार्कमध्ये त्यांनी भाषण दिले "तुम्ही लोक ही स्पष्ट गोष्ट समजून घेत नाहीत की ज्यू लोक हे हीन चारित्र्याचे आहेत, हा तुमचा दोष आहे. जर्मनीमध्ये हे सत्य आम्ही मान्य करतो..." वगैरे. असे कित्येक लोकांचे मत होते, आणि युद्धानंतरही ते बदलले नाही. युद्धाची शोकांतिका बघून नीमलर यांचे मत बदलले, आपली चूक कबूल करण्याचे धैर्य त्यांच्यामध्ये होते, हे मला विशेष प्रशंसनीय वाटते.

अडाणि's picture

14 Nov 2009 - 6:35 am | अडाणि

लेख छान आहे पण त्यातील निश्कर्षाशी सहमत नाही.

आत्तापर्यंत आलेल्या संदर्भातून (आणि उपदेशातून) असा सूर आहे की मराठीच्या भल्या साठी "उस्फूर्त" जमावाने केलेल्या राड्यात थोडा फार त्रास झाला तर काहीच हरकत नाही. विचारवंत (जे एसी केबीन मधे बसून लेख लिहितात) ते एक वेळ जेवले तर काही फरक पडत नाही, परंतू हा सर्व सल्ला पण लांबून दिलेलाच दिसतोय.

जे कुणी परवाच्या पुण्यातील तोडफोडीचे समर्थन करत आहेत त्यातील एकालाही तोशीस झालेली दिसत नाही (निदान इथल्या कुठल्याही प्रतिक्रियेतून मला समजले नाही) मिपा वर येवून लांब लांब प्रतिसाद, लेख व कविता टंकून , "उंटा वरून शेळ्या हाकण्या पलीकडे" काय होतेय ?

स्वतःचा खारीचा का होईना पण वाटा उचलणे हे "इतर कसे चुकत आहेत" हे दाखवण्यापेक्षा अधिक महत्वाचे वाटते.

आपल्या कडे दोन्ही बाजूंनी हेच चालू नाहीये का?

हिंसाचार आणि दहशीतीद्वारे चालू केलेले काम तुम्हाला तुमच्या संपुर्ण उद्दिष्टापर्यंत कधीच पोचवू शकत नाही, हा निष्कर्श हिटलरच्या उदाहरणावरून जास्त संयुक्तीक वाटतो.

-
अफाट जगातील एक अडाणि.

कौंतेय's picture

15 Nov 2009 - 2:40 am | कौंतेय

सहमत आहे!

लेखातुन मिळालेली माहिती छायाचित्रे आवडली पण त्याचा मनसेने केलेली तोडफोड ह्याच्याशी लावलेला संबंध अनाकलनीय आहे. मूळात मनसेने मराठीच्या मुद्यावर स्थापना केलेलली असली तरी मराठीच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी त्यांनी कोणती विधायक कामे आजपर्यंत केली ह्याची यादी द्यावी. मराठी भाषा तिचा होत असलेला र्‍हास/विकास आणि परंप्रांतियांचे महाराष्ट्रात येणारे लोंढे आणि त्यामुळे वाढत असलेली गुंडगिरी ह्या दोन भिन्न मुद्यांची बेमालूम सरमिसळ मनसेने 'मराठी' ह्या लेबल खाली केलेली आहे आणि मराठी-अस्मितेच्या नावाखाली झुंडशाहीच्या मार्गाने आपला कार्यभाग साधून घेत आहे. उत्तरप्रदेशातुन आलेल्यांची गुंडगीरी कमी करणे ह्याचा मुंबईला फायदा निश्चितच आहे पण ह्यातून 'मराठी भाषेचा' काय फायदा होतो? मुंबईतील मध्यमवर्ग/उच्च मध्यमवर्ग/उच्च वर्ग हा मराठी-गुजराथी-सिंधी-पंजाबी-तमिळ अश्या विविध भाषिकांनी बनलेला आहे आणि त्यामुळे ही गुंडगिरी बंद झाल्याने त्या सर्वांचाच फायदा होतो आणि तसे होत असेल तर ते चांगलेच आहे, पण त्यातुन मराठी माणासाला 'एक्स्क्लुजीवली' असे काय मिळते? विधानसभेत झालेला गोंधळही मराठीच्या तरफदारीपेक्षा उत्तर प्रदेशीय अबूला धडा शिकवण्याच्या हेतुनेच घातलेला आहे. मराठी हाच जर मुद्दा होता तर मराठीतून शपथ न घेणार्‍या प्रत्येक आमदाराच्या शपथविधीला विरोध करायला हवा होता. पण तसे झाले नाही. अबू हा काय लायकीचा माणूस आहे सर्वांना माहित असले तरी तो जनतेने निवडून आणलेला आमदार आहे. त्याला सभागृहात मारहाण करणे हा निश्चितच सभागृहाचा अपमान आहे. (अबूला मारल्याचे दु:ख नाही पण हे चालवून घेतले तर उद्या कुणीही कुणालाही उठून झोडपू लागेल ज्यामुळे जनतेने निवडलेले प्रतिनिधी, विधानसभा ह्या गोष्टींना काहीच अर्थ राहणार नाही. आपला मुद्दा पटवून घेत नसतील तर समोरच्याला हाणा. थोडक्यात म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावेल) अशी घटना (कारण कोणतेही असो) पुन्हा सभागृहात घडणे हे (आधीच अशक्त असलेल्य) लोकशीहीला अतिशय मारक आहे आणि त्यामूळे प्रिवेंटीव्ह मेजर म्हणून जरब बसवण्यासाठी ह्या आमदारांना निलंबीत केले म्हणून रस्त्यावर येऊन सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणे हे तर कुठल्याच दृष्टिकोनातुन समर्थनीय नाही. सरकारचा निषेध नोंदवायची ही कुठली पद्धत? फोडलेल्या बसेस ह्याकाही कुणा आमदाराच्या मालकीच्या नव्हत्या. त्या जनतेच्या मालकीच्या होत्या. ह्याचा विसर कसा काय पडू शकतो?

-कौंतेय

विकास's picture

15 Nov 2009 - 8:59 am | विकास

हा प्रतिसाद मी धनंजय, अडाणि आणि कौंतेय अशा सर्वांच्या प्रतिसादाला एकत्रीत देत आहे कारण त्यात काही समान मुद्दे आहेत.

धनंजय म्हणतातः
मला वाटते, नीमलर यांचे वाक्य "खास विचारवंतांसाठी" लिहिलेले नसून आपणा सर्वांसाठीच लिहिलेले आहे. किंबहुना समाजात "विचारवंत" आणि "बिगर-विचारवंत" अशा दोन जमाती असतात, आणि त्यातही "खरे विचारवंत" आणि "खोटे विचारवंत" असे दोन उपप्रकार असतात, या म्हणण्याशी मी पूर्णपणे असहमत आहे....तसेच "काही सामान्य लोक विचारवंत नसतात" हे वाक्यसुद्धा दयाळू असले तरी अधिक विचाराअंती सामान्यांचा अपमान करणारे आहे.

नीमलर यांचे वाक्य केवळ विचारवंतांस आहे असे माझे म्हणणे नव्हते आणि तसे मी म्हणले देखील नाही. ते वाक्य आठवायचे तात्कालीक कारण हे मूळ लेखात म्हणल्याप्रमाणे कलंत्रींचे लेखन आणि त्यात त्यांची दिसलेली प्रामाणिक चीड. मात्र अबू आझमी ह्यांच्या बद्दल आज जरी चीड आली असली तरी मराठीबद्दलचे तुच्छ भाव हे काही आझमींनीच आणलेले नाहीत, ते आधीपासून होतेच. पण त्यावर कधी आपण सामुहीकरीत्या इतरांचा, इतर भावनांचा/भाषांचा अपमान न करता, कधी स्पष्ट मुद्दा मांडला होता का?

"तथाकथीत विचारवंत" म्हणजे "खोटे विचारवंत" नाही तर "अप्रामाणिक विचारवंत". जे काही तत्वज्ञान असेल ते निवडून (सिलेक्टीव्हली) वापरणे आणि म्हणून अप्रामाणिक अथवा भोंदूगिरी करणारे विचारवंत असा त्याचा अर्थ आहे. प्रत्येक व्यक्ती विचार करते म्हणून स्वतःपुरती विचारी आहे असे म्हणता येईल पण याचा अर्थ ती विचारवंत असते असे नाही. विचारवंत म्हणजे जो समाजाला काही अंशी दिशा देतो असा. नीमलर ह्यांनी स्वत:च्या विचारातील खोट जाणून घेऊन ती मान्य करून जर वरील ओळी लिहील्या असल्या तर ते प्रामाणिक विचार्वंतच ठरतात. तुम्हाला विचारवंतात प्रामाणिक आणि तथाकथीत/अप्रामाणिक/खोटा विचारवंत असे उपप्रकार मान्य नसले तरी मी जेंव्हा टिका करतो तेंव्हा ती सरसकट सर्वच विचारवंतांवर, अगदी माझ्या विचारधारांच्या विरोधात असलेल्यांच्यावर नसते, जेंव्हा ते प्रामाणिक आणि स्वाध्यायी असतात तेंव्हा, इतकेच म्हणू इच्छितो. असो.

आत्तापर्यंत आलेल्या संदर्भातून (आणि उपदेशातून) असा सूर आहे की मराठीच्या भल्या साठी "उस्फूर्त" जमावाने केलेल्या राड्यात थोडा फार त्रास झाला तर काहीच हरकत नाही. - अडाणी आणि लेखातुन मिळालेली माहिती छायाचित्रे आवडली पण त्याचा मनसेने केलेली तोडफोड ह्याच्याशी लावलेला संबंध अनाकलनीय आहे. - कौंतेय

सर्वप्रथम मी मनसेने केलेल्या दंग्याची अथवा इतर कधिही कुठल्याच हिंसेचे समर्थन केलेले नाही. (हे एक उ.दा.) मनसे आणि विधानसभेच्या संदर्भात देखील माझी मते त्यांच्या समर्थनार्थ नाहीत. त्यांना शिक्षा झाली तरी हरकत नाही. मात्र त्याच बरोबर असे का व्हावे याचा आपण विचार न करता नुसते झोडपणे हे देखील मान्य नाही. सर्वांना समान कायदा लागू व्हावा असे माझे मत आहे आणि प्रसिद्धीमाध्यमे आणि त्यातील विचारवंतांनी देखील एकास एक आणि एकास एक न्याय देताना विचार करायला हवा. म्हणूनच आधी मी हा धागा तयार केला होता.

बसेसची मोडतोड पण याच प्रकारात मोडते. असे वर्तन अगदी पूर्ण अमान्य आणि तशी करणार्‍यांना योग्य शिक्षापण केली पाहीजे. पण त्याच बरोबर आपण या विषयावर बोलताना नकळत अतिरंजीत बोलत नाहीना, अफवांनाच वस्तुस्थिती समजत नाहीना, याचा पण विचार व्हावा असे वाटते. ४२च्या चळवळीत शेवटी गांधीजींनी पण "करा अथवा मरा" असे म्हणले कारण त्यांच्यापण सहनशक्तीचा एका अर्थी अंत झाला असे म्हणता येईल. तीच अवस्था फ्रेंच राज्यक्रांती आणि बोल्शेव्हिकांच्या संदर्भात म्हणता येईल...सामान्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला तर काय होते हे लोकलमधे पाकीटमार हातात आल्यावर जे काही सर्वच करतात त्यात जसे समजते तसेच विधानसभेतपण समजू शकते.

जेंव्हा एकास एक आणि एकास एक असे न्याय देणे सातत्याने चालते, तेंव्हा सुरवातीस गुडीगुडी करत आपण मधे पडत नाही, पण त्याचे आपल्याला त्रास भोगावे लागतात...सर्व समाज भरडला जातो. कधी धर्माच्या नावाखाली तर कधी भाषेच्या तर कधी जातींच्या... माझा मुद्दा या संदर्भात आहे.

अडाणि's picture

15 Nov 2009 - 9:41 am | अडाणि

विकासजी,
मि तुमचे इतर ठिकाणी लिहिलेले मत वाचले होते आणि तुम्ही 'भावनेच्या आहारी' न जाता मत प्रदर्शन करता म्हणूनच मि तुमच्या धाग्यावर प्रतिक्रिया दिली.

आत्तापर्यंत आलेल्या संदर्भातून (आणि उपदेशातून) असा सूर आहे की मराठीच्या भल्या साठी "उस्फूर्त" जमावाने केलेल्या राड्यात थोडा फार त्रास झाला तर काहीच हरकत नाही.

हा भाग तुम्हाला निर्देशून नव्हता, ईतर प्रतिक्रिया आणि लेखातून चर्चेचा जो सूर दिसला त्या अनुशंगाने लिहिले होते.

अवांतर - तुम्ही चालु केलेला दुसरा धागा ही मला पटला नव्हता, कारण ईतर ठीकाणी हाणामारी / गोंधळ होत असेल तरी तो आपला आदर्श असू नये. त्या लेखा वरील प्रतिक्रिये वरून तरी असे दिसले नाही.

-
अफाट जगातील एक अडाणि.

चिरोटा's picture

15 Nov 2009 - 11:17 am | चिरोटा

मात्र त्याच बरोबर असे का व्हावे याचा आपण विचार न करता नुसते झोडपणे हे देखील मान्य नाही

सहमत.अबु आझमी मुजोर आहे हे मान्य.त्याने मराठीत शपथ घ्यायला काहीच हरकत नव्हती. आज Times ला त्याने मुलाखत दिली आहे."मी कुठलीही घटनाबाह्य कृती करत नसताना मला विरोध का?विधानसभा अध्यक्षांनी मला मराठीत शपथ घ्यायची सुचना केली असती तर हरकत नव्हती" असे म्हंटले आहे.
राज ठाकरे ह्यांनी मराठीत शपथ घ्यायच्या वादात कर्नाटकात एका आमदाराला कन्नड येत नाही म्हणून वगळले हा संदर्भ दिला होता. इकडे दोन वृत्तपत्रांनी(Times of India आणि एक कन्नड वृत्तपत्र) अशी घटना कधीही न घडल्याचे सांगितले आहे..
भेंडी
P = NP

Nile's picture

14 Nov 2009 - 6:19 am | Nile

एका चांगल्या स्मारकाची सुरेख ओळख करुन दिल्याबद्दल विकास यांचे आभार.

तात्पर्यः तात्कालीक हिंसा हे कुणाचेही पटकन लक्ष खेचते. त्यात जर स्वतःच्या पोटाला चिमटा बसलाच तर अजूनच जाणवू शकते.

ह्या वाक्याशी सहमत आहे, आणि असे मी नुकतेच एका प्रतिसादात म्हणले ही आहे. पण याचा एक मोठा तोटा असा आहे की अश्याप्रकारे हिंसा करुन लक्ष खेचण्याचा प्रयत्न ही होउ शकतो आणि असे होत आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते. (उदा. कुणा नेत्याच्या पुतळ्याची विटंबना इ.)

पण अशी हिंसा कितीही निंदनीय असली आणि तशी ती असतेच, तरी ती कशाची प्रतिक्रीया म्हणून झाली ह्याचा विचार करणे, ती परत घडू नये असे वाटत असल्यास काय व्हावे यावर विचार करणे, स्वतःचा खारीचा का होईना पण वाटा उचलणे हे "इतर कसे चुकत आहेत" हे दाखवण्यापेक्षा अधिक महत्वाचे वाटते. असाच जास्त विचार केल्यास अशा स्मारकांतून निष्कर्ष निघतो असे वाटते.

खारीचा वाटा उचलण्यात 'चुक दाखवणे' हे ही आलेच. सामाजीक प्रबोधन हा कळीचा मुद्दा आहे. (सध्याचा कुठलाही वाद घ्या)

आता मुद्दा उरतो तो (सो कॉल्ड)तथाकथीत बुद्धीवादी लोक यांचा. प्रत्येक विचारवंत हा बरोबरच असला पाहीजे असं नाही. प्रामाणीक उदाहरण द्यायचं झालं तर अणुबॉम्ब, ग्लोबल वॉर्मींग इ. विषयांवरही नावजलेल्या शास्त्रज्ञ मंडळीमध्ये वाद होताच (आणि आहे). प्रत्येकाने आपले मुद्दे मांडण साहजिक आहे. पण हे करताना (पब्लीक फोरम्स वरती) प्रत्येकाने संयम बाळगणही महत्त्वाचं आहे.

वास्तवीक धनंजय, मुक्तसुनीत, विकास आणि इतर अनेक मंडळी (काही लोकांच्या भाषेत सांगायचं झालं तर) 'स्वत:च काही जळत नसतानाही' अश्या वादात सहभागी होतात याचं मला आश्वर्य वाटतं आणि त्याच बरोबर कौतुकही.
जनक्षोभाची पर्वा न करता आपलं मत परखडपणे मांडणं हे अश्या वेळेस मुग गिळुन गप्प बसण्यापेक्षा कधीही श्रेष्ठ.

विकास's picture

15 Nov 2009 - 9:13 am | विकास

खारीचा वाटा उचलण्यात 'चुक दाखवणे' हे ही आलेच. सामाजीक प्रबोधन हा कळीचा मुद्दा आहे. (असेच काहीसे सुनीलचे देखील मत आहे)

यातील दुसर्‍या मुद्याशी सहमत आहे. पण पहील्या वाक्यातील "चूक दाखवण्या" चा वाटा उचलण्यासाठी जरा नैतिक बळ असावे असे वाटते. म्हणजे आपण ज्या समाजाला नावे ठेवत आहोत त्यांच्या जडणघडणीत काही आपुलकीने वाटा उचलत आहोत का? पद्धती अनेक असू शकतात - स्थलकालसापेक्षही असतील पण त्यात काही तरी सकारात्मक असेल तरच मग नंतर तुम्ही सांगितलेल्या चुका ऐकायला समाज तयार राहणार.

आता मुद्दा उरतो तो (सो कॉल्ड)तथाकथीत बुद्धीवादी लोक यांचा. प्रत्येक विचारवंत हा बरोबरच असला पाहीजे असं नाही.

बुद्धीवादी खरे ठरले नाहीत म्हणून ते तथाकथीत ठरत नाहीत तर ते जेंव्हा प्रामाणिक नसतात तेंव्हा ठरतात. तेच इतरत्र. म्हणजे (कोणाला उद्देशून नाही, असेच उदाहरण!) इतरांना "साधी रहाणी उच्च विचारसरणी" आचरायला सांगणार पण स्वत: सर्वसुखात लोळ्णार...

Nile's picture

17 Nov 2009 - 10:23 am | Nile

पण पहील्या वाक्यातील "चूक दाखवण्या" चा वाटा उचलण्यासाठी जरा नैतिक बळ असावे असे वाटते

खरंय. ह्यावर आम्ही फक्त लिंकनचे वाक्य quote करतो:
"He has a right to criticize, who has a heart to help." :)

धनंजय आणि विकास ह्यांचे लेख आवडले.
स्मारकं खऱ्या अर्थाने ज्या संदेशासाठी पुढील पिढीला "अनुभवता (सं’वेदना’)" यावीत म्हणून योजली जातात त्याचे उदाहरण म्हणून निश्चितच ह्या स्मारकांचा उल्लेख करता येईल.

विकास ह्यांच्या "तात्पर्यः तात्कालीक हिंसा हे कुणाचेही पटकन लक्ष खेचते...." ह्या मुद्द्याशी पूर्णपणे सहमत. मुळात तात्कालिक हिंसा (येथे अचानक उद्भवलेली हिंसा असा अर्थ मी घेतोय) ही एखाद्या जुन्या प्रक्रियेचे दृश्य स्वरुप असते. (पाणी उष्णतेवर ठेवताक्षणी जसे उकळत नाही, तसेच.) त्यामुळे प्रत्येक घटना ’तात्कालिक’ पारड्यात टाकू नये असे मला तरी वाटते. त्या घटनेच्या मुळ कारणांवर चर्चा होणे अधिक श्रेयस्कर असावी- जर त्यावर उपाययोजना काय- असा प्रश्न असेल तर.

विकास's picture

15 Nov 2009 - 11:16 am | विकास

मुळात तात्कालिक हिंसा (येथे अचानक उद्भवलेली हिंसा असा अर्थ मी घेतोय) ही एखाद्या जुन्या प्रक्रियेचे दृश्य स्वरुप असते. .... जर त्यावर उपाययोजना काय- असा प्रश्न असेल तर.

थोडक्यात आणि योग्य प्रतिसाद.

धब्यवाद!

प्रकाश घाटपांडे's picture

15 Nov 2009 - 6:57 pm | प्रकाश घाटपांडे

हेच म्हण्तो
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सुनील's picture

14 Nov 2009 - 3:28 pm | सुनील

चांगला लेख.

तात्कालीक हिंसा हे कुणाचेही पटकन लक्ष खेचते
कालातीत सत्य.

स्वतःचा खारीचा का होईना पण वाटा उचलणे हे "इतर कसे चुकत आहेत" हे दाखवण्यापेक्षा अधिक महत्वाचे वाटते
अंशतः सहमत. वर Nile यांनी म्ह्टल्याप्रमाणे, "इतर कसे चुकत आहेत" हे दाखवणे, हे खारीचा वाटा उचलण्यासारखेच आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऋषिकेश's picture

14 Nov 2009 - 3:57 pm | ऋषिकेश

लेख आवडला.. पटवून घ्यायचा पयत्न करतोय पण

हिटलर आणि नात्झींची गुर्मी आणि स्थानीक संस्कृतीस तुच्छ लेखण्याचा माज हे गुणात्मकरित्या वेगळे नाहीत. त्यातील भाव एकच आहे.

या वाक्यामुळे तो पूर्णत: पटला असे म्हणता येत नाहि.

ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

यशोधरा's picture

14 Nov 2009 - 4:02 pm | यशोधरा

लेख आवडला.

प्रकाश घाटपांडे's picture

14 Nov 2009 - 4:17 pm | प्रकाश घाटपांडे

आज कुठेतरी वाटते की संपुर्ण जगात बोकाळलेल्या दहशतवादाचा उगम हा कुठेतरी भारतीय राजकारण्यांनी आणि "तथाकथीत" बुद्धीवाद्यांनी योग्य वेळेस योग्य निर्णय अथवा न्याय्य बाजू न घेण्यात झाला आहे.

खरच अस आहे?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

हिंसा ही लक्षवेधी नक्कीच ठरते. पण आत्ताच्या माध्यमे बोकाळलेल्या काळात, त्या घटनेचे माध्यमांकडून प्रसारण कसे होते यावरही त्याचे परिणाम अवलंबून असतात. माध्यमांचे संचालकत्व कोणाकडे आहे हेही महत्त्वाचे ठरते. सद्य परिस्थितीत तर 'भिंगातून जाळलेल्या कागदासारखे' फक्त हिंसेतल्या जाळावरच ते केंद्रिभूत होताना दिसते आहे.* त्यामुळे त्या हिंसेमागच्या मागण्यांमधली आर्तता त्या मागण्या ज्या केंद्रिय सत्तेसंदर्भात आहेत, तिथपर्यंत नीटपणे पोहेचत नाहीत. तिथे फक्त त्यातली हिंसाच दिसते. अशा वेळी या मागण्या त्या केंद्रिय सत्तेकडे पोहोचविण्यासाठी बुद्धिवादी गटाने सक्रिय भूमिका पार पाडणे अपेक्षित आहे. सध्या मराठीच्या बाबतीत असा एक गट अशी भूमिका पार पाडत असल्याचे ऐकिवात आहे. पण पुन्हा ते सक्रिय राजकारणात नसल्याने त्यांच्या प्रयत्नांवर आणि विस्तारावरही मर्यादा पडतात, असे दिसते. ( ग्रंथालीच्या रूची अंकात यासंदर्भात नेहमी माहिती येत असते.) मनसेसारख्या विधानसभेत प्रतिनिधीत्व मिळालेल्या पक्षाने आता कायदे मंडळात हे काम प्रभावीपणे पार पाडणे अपेक्षित आहे. तिथे अबू आझमीला मारल्याने त्यातली हिंसाच पुढे आली, मराठीचा आग्रह का यामागची भावना कुठेच आली नाही. त्यामुळे लोकशाहीला कलंकापासून अनेक शेलक्या विशेषणांना सामोरे जावे लागले.

* इथल्या हिंदीभाषक वृत्तपत्रात राज ठाकरेंचे एकूण आंदोलन आणि त्या सगळ्या घटनांकडे बघण्याचा दृष्टिकोन भयानक आहे. याविषयावर मी या आधीही लिहिले आहे, पण ताज्या प्रकरणाच्या अनुषंगाने मागील घटनांचीच वृत्तपत्रांमध्ये जास्त तीव्रतेने उजळणी झाल्याचेच दिसले. अबू आझमी हा थर्डक्लास माणूस आहे, पण त्याला मारल्यानंतरही 'हिंदीपर हमला', पासून काय काय हेडिंग होती ते पाहून संताप येत होता. या प्रश्नातून महाराष्ट्रात जनमत मराठीच्या बाजूने तयार होत असले तरीही दिल्लीदरबारी ज्यांची तड लागू शकतील असे मराठीच्या संदर्भातील प्रश्न मात्र जाणीवपूर्वक बाजूला सारले जातात ते केवळ आंदोलनात असलेल्या हिंसेमुळे. निर्णयाचे अधिकार हाती असलेले दिल्लीश्वर या आंदोलनामागे फक्त मनसे आहे अशी समजूत करून घेऊन वाहिन्या, वृत्तपत्रे जे काही सांगतात त्या वृत्तावर, विश्लेषणावर विश्वास ठेवून काहीही करत नाहीत. मुंबईत परप्रांतीयांना राज ठाकरेंचा विरोध एवढेच आणि त्यासाठी होणारी हिंसा एवढेच दाखविले जाते. विरोध का त्याची तार्किक कारणमीमांसा केली जात नाही. त्याची कारण निर्णय घेणार्‍या जमातीपर्यंत पोहोचत नाहीत.

(भोचक)
रविवार पेठ आणि कुठेही भेट !
हा आहे आमचा स्वभाव

एकलव्य's picture

14 Nov 2009 - 5:40 pm | एकलव्य

पर्ल हार्बर च्या घटनेनंतर चर्चिल असे काहीसे म्हटल्याचे स्मरते (चूभूद्याघ्या) - आता अमेरिका युद्धात उतरण्याची निश्चिंती झाली, दोस्तराष्ट्रांचे बळ वाढले.

९/११ नंतर टेररिझमबद्दलही तेच झाले. बळ वाढले किंवा नाही हा वेगळा मुद्दा पण किमान पक्षी तूर्तास तरी अतिरेक्यांना मिळणारी फूस कमी झाली असे दिसते.

First they went for Moscow, and I did extend the support;
Then they continued to blast Kashmir, and I preferred to talk about human rights;
Then they blasted Delhi, Mumbai and Hyderabad, and I did not blink an eye;
When they came for New York, and only since then I have got a bit crazy;
Now they spread the nukes around the globe and I have no guts even to speak about it.

सहज's picture

14 Nov 2009 - 5:47 pm | सहज

९/११ नंतर टेररिझमबद्दलही तेच झाले. बळ वाढले किंवा नाही हा वेगळा मुद्दा पण किमान पक्षी तूर्तास तरी अतिरेक्यांना मिळणारी फूस कमी झाली असे दिसते.

+१

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Nov 2009 - 5:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चांगला लेख आणि माहिती/अभ्यासपूर्ण प्रतिसादही!
एकलव्य, तुम्ही दिलेलं इंग्लिश कोटही आवडलं ... 'सौ सुनार की एक लुहार की' ते हेच!

अदिती

प्रकाश घाटपांडे's picture

15 Nov 2009 - 9:51 am | प्रकाश घाटपांडे

चांगला लेख आणि माहिती/अभ्यासपूर्ण प्रतिसादही!
एकलव्य, तुम्ही दिलेलं इंग्लिश कोटही आवडलं ... 'सौ सुनार की एक लुहार की' ते हेच!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विकास's picture

15 Nov 2009 - 11:21 am | विकास

First they went for Moscow, and I did extend the support;
.................
Now they spread the nukes around the globe and I have no guts even to speak about it.

एकदम चपखल आणि आवडले.

९/११ नंतर ज्या देशांना दहशतवादांना सामोरे जावे लागले अशा देशांमधील अनेकांना कुठेतरी "आता अमेरिकेस कळेल" असेच मनोमन वाटले होते हे वाचताना/चर्चिताना लक्षात आले होते. ज्याच जळतं त्यालाच कळतं हे या अर्थीपण चपखल होते.

पॅपिलॉन's picture

14 Nov 2009 - 7:23 pm | पॅपिलॉन

http://www.misalpav.com/node/7448

फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

विकास's picture

15 Nov 2009 - 11:23 am | विकास

आपले काव्य एकदम योग्य आहे आणि वास्तवाच्या जवळ जाणारे पण...

पॅपिलॉन's picture

16 Nov 2009 - 7:04 am | पॅपिलॉन

धन्यवाद.

फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

प्रसन्न केसकर's picture

15 Nov 2009 - 2:04 pm | प्रसन्न केसकर

विकासजी. अगदी धनंजयांनी लिहिलेल्या लेखासारखाच मनाला भावतो पण या सर्व उदात्त गोष्टींचा संबंध सध्या सुरु असलेल्या गोष्टीशी लावावा का? अन लावला तर कसा.....

सर्वप्रथम मी स्पष्ट करतो की माझा संबंध मनसे शी नाही. त्या पक्षाचा अथवा अन्य कोणत्याही पक्षाशी नाही. खर्‍या अर्थाने अपॉलिटिकल रहाण्याचा माझा प्रयत्न असतो. हिंसाचाराचे मी सरसकट समर्थन करत नाही. पण मला वाटते प्रत्येकवेळी हिंसाचार होतो तेव्हा त्याचा निषेध करण्याआधी तो का होतो याची मीमांसा करणे आवश्यक आहे. अन आत्ता माझा प्रयत्न सध्या जे वातावरण आहे ते का निर्माण झाले आहे त्याची थोडक्यात मीमांसा करण्याचाच आहे.

मी विधानसभेतील शपथ प्रकरण आणि त्यापुर्वी नोकरभरती संदर्भात मनसेनं उपस्थित केलेल्या मुद्यांना पाठिबा देतो अन गेल्या आठवड्यात रस्त्यावर जी आंदोलनं झाली त्याबाबत धादांत खोटी, अतिरंजित दिशाभुल करणारी माहिती देऊन ती केवळ दगडफेक, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान इत्यादीच होती असे जे प्रयत्न केले गेले त्याचा निषेध करतो. (प्रत्यक्षात तेव्हा वस्तुस्तिथी काय होती हे मी याआधीच अन्यत्र प्रतिसादात लिहिले आहे. अन ते लिहीण्याचा संपुर्ण अधिकार मला आहे कारण त्या प्रकारात माझा जागरुक स्थानिक मतदार अन प्रामाणिक करदाता या नात्याने हक्कच आहे. किंबहुना ते माझे कर्तव्यच आहे. माझ्याकडे रेशनकार्ड गॅसकार्ड तर आहेच पण माझे नाव खडकवासला मतदार यादीतही आहे अन मी स्वतः मतदानही केलेले आहे. मराठीच्या मुद्यावर निवडणुक लढवुन विजयी झालेला माझा आमदार केवळ त्याने मराठीचा मुद्दा सदनात लावुन धरला म्हणुन जवळपास पुर्ण टर्म करता विधीमंडळातुन निलंबित झाला आहे अन राज्यातील लोकशाही यंत्रणेच्या सर्वोच्च स्थानी मला प्रतिनिधीत्व नाकारण्यात आलेले आहे - असे गोंधळ यापुर्वी अनेकदा सदनात झालेले असुनही अशी कडक शिक्षा बहुधा प्रथमच होत आहे.)

इथं ज्यु लोकांविरोधात हिटलरनं केलेल्या अन्यायाचा उल्लेख केला. माझ्या मते तेव्हा जर्मनीत ज्यु लोकांचे जे स्थान होते तेच आज महाराष्ट्रात मराठी भाषिकांचे ठरत आहे. एक उपरी भाषा, ती राष्ट्रभाषा आहे असे भासवुन, घटनाबाह्य मार्गांनी लादली जात आहे अन तिला विरोध म्हणजे देशद्रोह असे वातावरण निर्माण केले जात आहे.

राज्याच्या व्यवहारात हिंदी अथवा इंग्रजी भाषेचा वापर न होता स्थानिक भाषेचाच वापर व्हावा या मागणीत काहीच गैर अथवा अन्याय्य अथवा बेकायदा नाही. पण या सरळ साध्या मागणीला जवळपास चाळीस दशके विरोध होतोय अन त्याचे एकमेव कारण म्हणजे असे झाले तर हिंदीभाषिक व येथील काही प्रस्थापितांचे वर्चस्व संपेल हेच आहे.

महाराष्ट्रामधे बहुसंख्य लोकांना हिंदी येते ती तोडकीमोडकी - बॉलीवुडचे सिनेमे बनवताना वापरतात ती. शासनव्यवहाराकरता वापरतात ती हिंदी ही नव्हे अन ती हिंदी एक टक्का मराठीभाषिकांनाही येत नाही हा माझा अनुभव आहे. जवळपास तसेव इंग्रजीबाबतही आहे. हे लक्षात घेतले तर राज्याशासनाचा सर्व कारभार मराठीतच व्हावा या मागणीत काहीच गैर नाही - किंबहुना तसे न होणे म्हणजे येथिल स्थानिक जनतेवर होणारा अन्याय आहे. विधीमंडळात, न्यायालयात, सरकारी कार्यालयात जे काम सुरु आहे त्याची पुर्ण माहिती स्थानिक जनतेला मिळणे हा तिचा हक्क आहे अन त्यासाठीच स्थानिक भाषा वापरणे अत्यावश्यक आहे. आजही न्यायालयांमधे बव्हंशी इंग्रजी भाषा वापरली जाते अन त्यामुळे बर्‍याचशा लोकांना न्यायालयात काय सुरु आहे हेच कळत नाही. सध्या विधीमंडळात जरी बव्हंशी मराठी वापरली जात असली तरी महाराष्ट्रात हिंदी भाषिकांची वाढती संख्या लक्षात घेता अन त्यांचा त्यांच्या भाषेबद्दलचा आग्रह लक्षात घेता सध्या जे सुरु आहे त्याला वेगळे परिमाण प्राप्त होते. थोडक्यात आता महाराष्ट्रातच मराठी जनतेला अभय मिळणे गरजेचे आहे.

हे सर्व मुद्दे लक्षात घेता मला वाटते की इथे प्रश्न मराठी माणसांची आक्रमकता नसुन त्यांच्यावर उपर्‍या भाषेकडुन अन ती बोलणार्‍यांकडुन होणारे आक्रमण, त्यांची अगतिकता असा आहे. अन अश्या अगतीक माणसाने अस्तित्वाच्या लढाईसाठी जर आक्रमक मार्ग स्वीकारला अन्यायाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरुन लढले तर त्यात काहीही गैर नाही, जरी महाराष्ट्रात गेली चाळिस वर्षे अखंडित जमावबंदीचे आदेश असले अन रस्त्यांवर कोणतेही आंदोलन करणे, अगदी पाच जणांनी एकत्र येणे गुन्हा असला तरीही.

गेले काही दिवस इथं `प्रामाणिक करदाते', `स्वयंघोषित जागरुक नागरीक' अन तथाकथित `विचारवंत' जनतेनं केलेल्या आंदोलनांचा तारस्वरानं धिक्कार करीत आहेत. जनतेनं अश्या परिस्थितीत काय करणं अपेक्षित आहे याचा खुलासाही त्यांनी करावा ही विनंती.

सध्या तरी पक्का राडेबाज अन कृतिशील अविचारवंत
पुनेरी

अवलिया's picture

15 Nov 2009 - 6:52 pm | अवलिया

अतिशय योग्य प्रतिसाद.

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

कौंतेय's picture

15 Nov 2009 - 10:46 pm | कौंतेय

मराठीच्या मुद्यावर निवडणुक लढवुन विजयी झालेला माझा आमदार केवळ त्याने मराठीचा मुद्दा सदनात लावुन धरला म्हणुन जवळपास पुर्ण टर्म करता विधीमंडळातुन निलंबित झाला आहे

माफ करा, तुमचा आमदार केवळ मराठीचा मुद्दा लावुन धरला म्हणून निलंबीत झालेला नाही. सभागृहासारख्या ठीकाणी मारहाण केल्याने निलंबीत झाला आहे. एखाद्या मुरब्बी पत्रकारा सारखे तुम्ही इथे फॅक्ट ट्वीस्ट केलेली आहे. मराठीचा मुद्दा लावुन धरण्यास कुणीही बंदी घातलेली नाही. पण अबू आझमीला धडा शिकवण्याच्या नादात आपण सभागृहाचे आणि त्यायोगे लोकशाहीचे पावित्र्य भंग पावत आहोत ह्याची जाणिव नसल्याने तुमचा आमदार निलंबीत झालेला आहे. तुम्ही जसे मतदान करुन तुमच्या आमदाराला निवडून आणलेत तसे अबूलाही त्याच्या मतदारांनी रीतसर निवडून आणून सभागृहात प्रवेश दिला आहे. तेव्हा केवळ मराठीचा मुद्दा लावून धरल्याने आमदार निलंबीत झाले असा प्रचार करू नका.

अन राज्यातील लोकशाही यंत्रणेच्या सर्वोच्च स्थानी मला प्रतिनिधीत्व नाकारण्यात आलेले आहे - असे गोंधळ यापुर्वी अनेकदा सदनात झालेले असुनही अशी कडक शिक्षा बहुधा प्रथमच होत आहे.)

महाराष्ट्रात पूर्वी कधी कोणत्या आमदाराने सभागृहात दुसर्‍या आमदाराला मारहाण केली आणि त्यावर ह्यापेक्षा कमी कडक शिक्षा झाली हे दाखवुन द्या.

इथं ज्यु लोकांविरोधात हिटलरनं केलेल्या अन्यायाचा उल्लेख केला. माझ्या मते तेव्हा जर्मनीत ज्यु लोकांचे जे स्थान होते तेच आज महाराष्ट्रात मराठी भाषिकांचे ठरत आहे.

खरंच का? ज्यू लोकांचा जर्मनित झालेला अनन्वित छळ आणि मराठी माणूस ह्यांची अतिशयोक्ती म्हणूनही तुलना करणे तुम्हाला सूज्ञपणाचे वाटते का?

- कौंतेय

प्रसन्न केसकर's picture

18 Nov 2009 - 2:45 pm | प्रसन्न केसकर

करणे मला सुज्ञपणाची वाटते म्हणुनच मी ती केली आहे. तुम्हाला ती तशी वाटत नसेल तर तुमचे ते स्वातंत्र मी हिरावुन घेत नाही.

अबू आझमीला धडा शिकवण्याच्या नादात आपण सभागृहाचे आणि त्यायोगे लोकशाहीचे पावित्र्य भंग पावत आहोत ह्याची जाणिव नसल्याने तुमचा आमदार निलंबीत झालेला आहे.
हो क्का? कुठले सभागृहाचे अन लोकशाहीचे पावित्र्य हो? आमदारांना वेगवेगळ्या पक्षांनी पळवुन नेऊन डांबले होते (२००२ मधे) तेव्हा, वेगवेगळ्या प्रकरणात अडकलेले गुन्हेगार जिथे माननीय म्हणुन वावरत होते तेव्हा, जांबुवंतराव धोटेंनी सभापतींना पेपरवेट फेकुन मारला तेव्हा, बबनराव पाचपुतेंनी राजदंड चोरला तेव्हा, प्रमोद नवलकरांनी सभागृहात रिव्हॉल्वर नेलं तेव्हा भंगलं नाही वाटतं. काय शिक्षा झाल्या होत्या हो तेव्हा?

तुम्ही जसे मतदान करुन तुमच्या आमदाराला निवडून आणलेत तसे अबूलाही त्याच्या मतदारांनी रीतसर निवडून आणून सभागृहात प्रवेश दिला आहे.

म्हणुन त्यानं चप्पल दाखवायची, त्याच्या पोरानं सभागृहातच आमदारांना धमक्या द्यायच्या असंच ना? काय कारवाई केलीये हो त्यांच्यावर. का त्यानं आमच्यामुळं पावित्र भंगलेल्या सभागृहाची शुद्धी झाली?

उगीचच फार माहिती असल्याचा आव आणुन कै च्या कै प्रतिपादन करु नका राव. ग्रो अप!

विकास's picture

19 Nov 2009 - 1:42 am | विकास

जांबुवंतराव धोटेंनी सभापतींना पेपरवेट फेकुन मारला तेव्हा, बबनराव पाचपुतेंनी राजदंड चोरला तेव्हा, प्रमोद नवलकरांनी सभागृहात रिव्हॉल्वर नेलं तेव्हा भंगलं नाही वाटतं.

जांबुवतंरावांचे उदाहरण बरोबरच आहे. मला वाटते राजदंड वसंतदादांनी पळवला होता. नवलकरांनी सभागृहात रीव्हॉल्व्हर आणले तेंव्हा त्यात सभागृहाचे नियम तोडले का ते माहीत नाही तसेच त्यांचा उद्देश नियमभंद/अपमान करणे वगैरे नव्हता, तर सभागृहाची सुरक्षाव्यवस्था किती ढिली आहे हे दाखवण्याचा होता असे वाचल्याचे आठवते.

वेगवेगळ्या प्रकरणात अडकलेले गुन्हेगार जिथे माननीय म्हणुन वावरत होते तेव्हा,
या संदर्भात माझ्याच एका चर्चेचा दुवा देत आहे...

निमीत्त मात्र's picture

19 Nov 2009 - 8:59 am | निमीत्त मात्र

त्यानी काय केलं आणि ह्यानी काय केलं म्हणून तुम्ही जे केलंत ते माफ होत नसतं.

चतुरंग's picture

15 Nov 2009 - 10:21 pm | चतुरंग

चांगला आहे. पण काही विचार अजिबातच पटले नाहीत उदा.
आज कुठेतरी वाटते की संपुर्ण जगात बोकाळलेल्या दहशतवादाचा उगम हा कुठेतरी भारतीय राजकारण्यांनी आणि "तथाकथीत" बुद्धीवाद्यांनी योग्य वेळेस योग्य निर्णय अथवा न्याय्य बाजू न घेण्यात झाला आहे. कंदहारप्रकरणी सोडलेला अतिरेकी हा ९/११ च्या अतिरेक्यांना मदत करत राहीला...

जगातला दहशतवाद बोकाळण्यास अमेरिकेइतका हातभार त्यांच्याही नकळत क्वचितच कुणी लावला असेल हे एक कटु सत्य आहे. 'एका तेलियाने' हे पुस्तक मी मध्यंतरी वाचले त्यात अमेरिकन राजकारण्यांनी ज्या पद्धतीने तातडीचे उपाय त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर काढायचा प्रयत्न केला त्यात सीआयए च्या इतर देशातल्या कारवाया असोत, दुसर्‍या देशात बंड घडवून सत्ता उलथवणे, दुसर्‍या देशांविरुद्ध दहशतवादी पोसणे, त्यांना शस्त्रे आणि पैसा पुरवणे आणि वेळ येताच त्यांचा काटा काढणे इ. सर्व उद्योग वर्षानुवर्षे केले, जगाच्या वेगवेगळ्या भागात युद्धे घडवून आणली अजूनही करताहेत. ह्या सगळ्यांचा दहशतवादाशी फार जवळचा संबंध आहे. त्यामानाने भारत दहशतवाद वाढायला कितपत कारणीभूत ठरला असेल ह्याची मला शंका वाटते!

चतुरंग