२००३च्या मे महिन्यातली दोन तारखेची ती दुपार. टळटळीत उन्हामुळे घराबाहेर पडुच नये असे वाटायला लावणारी. भरदुपारी मी मात्र बातम्या शोधत फिरत होतो. माझ्या धंद्याला अन संपादकाला शिव्या घालत अन अश्या उन्हात छानपैकी पंखा, एसी वगैरे लावुन एखाद्या थंड खोलीत बसुन काम करणार्या किंवा घरीच बसुन वामकुक्षी करणार्या सार्या जगाच्या नावाने मनोमन खडे फोडत.
असाच फिरता फिरता गेलो क्राईम ब्रँच मधे अन समोर दिसली एसीपी शिंदेंची केबिन. एसीपी शिंदे बरोबर माझे तसे चांगले संबंध. त्यांनी कंजारभाट समाजातल्या लोकांना दारु गाळणे वगैरे बेकायदा धंदे सोडुन द्यावे म्हणुन त्यांनी केलेले काम मी पाहिले होतेच. तहानतर लागली होतीच म्हणुन विचार केला त्यांच्याकडे जावुन पाणी प्यावे, थोड्या गप्पा माराव्यात अन सरळ शिरलो आतमधे.
केबिनमधे जावुन त्यांच्यासमोर टेकलो तर त्यांचा मोबाईल वाजला. संभाषण ऐकताना जाणवले की हा कंजारभाट समाजातला त्यांचा कुणीतरी खबरी आहे. पाच मिनिटे बोलल्यावर मी पोहोचतो वेळेत तिथे असे सांगुन त्यांनी फोन ठेवला अन माझ्यातल्या पत्रकाराला बातमीचा वास आला. काही विषेश, असे सहज विचारले तर शिंदे गडगडाटी हसले अन उत्तरले, "अरे तुम्हा बातमीदारांना बातमीशिवाय काही विचारच करता येत नाही का रे? झोपेतुन उठल्या उठल्या बायकोला बघुन सुद्धा असेच काही विषेश असे विचारत असशील तु बहुतेक. वहिनींना एकदा विचारलेच पाहिजे. तुझ्या पेपरला बातमी काही नाही. पण विचारतोच आहेस तर सांगतो, उद्या कंजारभाट समाजाची जातपंचायत आहे पुण्यात. येणार आहेस?"
क्राईम रिपोर्टिंग करताना पुर्वी पारधी समाजातल्या काही लोकांशी संबंध आला होता अन एक दोनदा त्यांच्या जातपंचायती पण पहाता आल्या होत्या. त्यातला तो 'रिट्रीब्यूटरी' न्याय पाहून अंगावर शहारे पण आले होते. पण ते सगळे शहराबाहेर लांब. अन कंजारभाट समाज तसा शहरात राहुन बराच पुढारलेला - अगदी ब्रँडेड कपडे, गॉगल घालणारे अन स्वतःच्या कार फिरवणारे लोक. शहरात त्यांची अशी पंचायत होत आहे म्हणल्यावर तिथे काय होते ते पहाण्याची उत्सुकता अनावर झाली अन कुठलाही विचार न करता मी होकार दिला. "मग उद्या सकाळी ये माझ्या ऑफिसात. नेतो तुला पण," शिंदे म्हणाले.
तीन तारखेला सकाळीच संपादकांना फोन केला, सगळे कानावर घातले अन आज सकाळच्या मीटींगला येत नाही असे बोललो. त्यावर "ओके" असे त्रोटक उत्तर ऐकले अन सरळ गाठले शिंदेंचे ऑफिस.
त्यानंतर बराच वेळ शिंदे त्यांचे काम करत बसले होते अन मी त्यांच्यामागे "कधी जायचे," अशी भुणभुण लावत समोर बसलो होतो. अकरा वाजले अन शिंदेंचा मोबाईल परत वाजला. "साडेअकरा वाजता बावधन. ओके. काही बदल झाला तर लगेच कळव," एव्हढे बोलुन त्यांनी फोन ठेवला अन पीएला बोलावले. "ऑपरेशनवर जायचे आहे. आपल्या दोन तीन कॉन्स्टेबलना ताबडतोब साध्या कपड्यात तयार व्हायला सांग. अन स्टेशन डायरीमधे एंट्री कर. मी आणलेल्या खाजगी जीपमधे जायचे आहे," असे पीएला आदेश दिले अन ड्रॉव्हरमधुन सर्विस रिव्हॉल्वर काढत चला असे मला म्हणाले. पण मी तिथे होतो कुठे? मी आधीच जावुन बाहेर लावलेल्या जीपजवळ उभा राहीलो होतो.
तिथुन आम्ही निघालो ते सरळ बावधन. शिंदे स्वतः गाडी चालवत होते. त्यांनी जीप नेली ती सरळ शिंदेनगरी सोसायटीमागच्या माळरानात. लांबवर एका बाजुला भडक रंगाचे टी शर्ट अन टाईट जीन्स घातलेले पंधघातलेले तरुण उभे होते. जवळच काही मोटारबाईक्स पण होत्या. आमची गाडी त्या बाजुला वळताच त्यांनी गडबडीने त्यांच्या गाड्या सुरु केल्या अन सुसाट निघुन गेले.
त्यानंतर बराच वेळ आम्ही त्या भागात फिरत होतो पण कुठेच कोणि दिसेना. मी वैतागलो पण शिंदे मात्र शांत होते. होता होता दोन वाजले अन शिंदे साहेबांचा मोबाईल परत वाजला. "बोल!" शिंदे म्हणाले अन पलीकडच्या माणसाचे बोलणे त्यांनी एक्-दोन मिनिटे ऐकले. नंतर त्यांनी गाडी परत वळवली आम्ही माळरानातुन वळुन पुन्हा चांदनी चौकाकडे जाणार्या हमरस्त्याकडे परतु लागलो.
"काय झाले," असं मी विचारलं. "त्यांनी सकाळी आम्हाला ओळखले अन घाबरुन ते पळुन गेले. आत्ता त्यांची पंचायत दुसरीकडे सुरु झाली आहे. तिकडेच चाललोय आपण," शिंदे उत्तरले.
मग आम्ही गेलो कात्रज्-देहुरोड बायपास वर. बावधन गाव ओलांडुन थोडे पुढे बालेवाडीकडे गेल्यावर रस्त्याच्या डाव्या हाताला एक डोंगर आहे. बावधन पासुन साधारण दीड किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला एक हीरो होंडा उभी होती अन तिच्यावर होता एक तरुण हिरवागर्द शर्ट अन लाल पँट घातलेला, गळ्याभोवती रुमाल. आमची गाडी येताना त्याने पाहीली अन त्याची मोटारबाईक सुरु करुन तो डोंगराच्या दिशेने निघाला. आम्ही होतोच मागे.
त्या तरुणाचा मोटारबाईकवरचा कंट्रोल खरच वाखाणण्यासारखा होता. रस्तातर सोडा, साधी पायवाटपण नव्हती पण त्या दगडगोटे सर्वत्र विखुरलेल्या भागातल्या चढावरुन तो तीस-चाळीस च्या स्पीडने जात होता अन मागे हेलकावत, धक्के खात आम्ही. असे आम्ही सुमारे अर्धा किलोमिटर गेलो अन अचानक समोर आली एक वस्ती - दहा बारा पालांची. सगळी पाले ओस पडली होती पण शिंदेंनी गाडी तिथेच थांबवली अन आम्ही खाली उतरलो तर पलीकडे एका जांभळाच्या मोट्ठ्या झाडाखाली बरेच बायका-पुरुष बसलेले.
आम्ही जवळ गेलो तर त्यांच्यात कुजबुज सुरु झाली. पण पंचमंडळी मात्र शांतपणे बसुन राहीले, बहुधा ते शिंदेना ओळखत होते. शिंदे सरळ समोर चालत गेले अन पंचांजवळ जाऊन उभे राहीले. "चालु दे तुमचे. फक्त कुणाकडे काही हत्यारे असतील तर ती लांब काढुन ठेवा. कुणी गडबड केली तर याद राखा," एव्हढ्या दिवसांच्या ओळखीनंतरही पहिल्यांदाच मला शिंदेंच्या आवाजात एव्हढी जरब येवु शकते याची जाणीव झाली.
थोडी चुळबुळ अन मग एकएक करत पुरुष मंडळी उठली. त्यांनी त्यांच्याजवळची हत्यारे मी अन इतर पोलिस उभे होते तिथे आणुन ठेवली तर मी बघतच बसलो. पाच मिनिटातच तिथे हत्यारांचा ढीग जमला. छोटे भाले, पातळ लोखंडी तलवारी, चाकू, चामड्या-लोखंडाच्या ढाली, गोफणगुंडे अन काठ्या अशी सगळी हत्यारे तिथे जमा झाली. "आम्हाला तुमच्या समाजातल्या बाबींशी काहीच घेणे-देणे नाही. तुमची पंचायत चालू द्या. पण कुणी गडबड, मारामारी केली तर माझ्याशी गाठ आहे हे लक्षात ठेवा. मी फायर करायला कचरणार नाही," शिंदेंनी परत दम भरला अन आम्ही होतो तिथे येवुन ते उभे राहीले. "तुम्ही यांना हत्यारे बाळगली म्हणुन अटक करणार," मी विचारले. "उगीच कशाला अटक करायची. त्यांनी आपापसात मारामार्या झाल्या तर स्वसंरक्षण करण्यासाठी ती हत्यारे बाळगलीत. आज अटक केली तर उद्या ते जामीनावर सुटतील पण नाही केली तर त्यातले बरेच लोक माझ्यावर विश्वास ठेवुन खबरी होतील अन पुढचे गंभीर गुन्हे टळतील," शिंदे उत्तरले.
"मग आपण इथे आलो कश्याला," माझा प्रश्न. "इथे कुणी वाँटेड गुन्हेगार असते तर त्यांना पकडायला. अन काही भांडणे होऊ नये म्हणुन," शिंदे उत्तरले. "बरे झाले तुम्ही आलात. पंचायतीत नेहमी भांडणे होतात. मग गट पडतात अन मारामारीत काही लोक जखमी होतात," आमच्या शेजारी येवुन उभा राहीलेला तरुण बोलला. मग मी त्याला विचारले ही पंचायत कशाला बोलावली आहे ते. "तो पंचांच्या उजव्या बाजुला बसलाय ना, तो गबदुल. अन त्याच्यामागे बसलेले त्याचे लोक. डाव्या बाजुला आहेत बेनिमाधव अन त्याचे लोक. गबदुल अन बेनिमाधवचे पलीकडे दारुधंदे आहेत पण त्यांची भांडणे चालु आहेत. गबदुल म्हणतो बेनिमाधव मुद्दाम दारु स्वस्त विकतो अन त्याचा धंदा मार खातोय," तो तरुण उत्तरला.
तोवर भडक पिवळ्या रंगाची साडी नेसलेली एक बाई आली अन शिंदेंच्या पाया पडली. "का गं! तु इथे कशी?" शिंदेंनी विचारले. "गबदुल माझा रिश्तेवाला आहे," ती उत्तरली. ही कोण मी विचारले अन कळले ते भन्नाटच. तिच्या दरवडेखोर नवर्याला काही महिन्यापुर्वी शिंदेंनीच अटक केली होती अन अजुन तो तुरुंगात होता. "इतर कोणीतरी माझ्या नवर्याचे एन्काऊंटर केले असते अन मेडल मिळवले असते. पण साहेबांमुळे तो जिवंत आहे. मी सांगायचे दारु गाळु शकतो, कमी पैसे मिळाले तरी सेफ धंदा पण ऐकत नव्हता. आता म्हणतो तो की परत दरोडे नाही घालणार," ती म्हणाली.
तोवर समोर पंचायतीचे काम सुरु झाले होते. गबदुल अन बेनिमाधवच्या गटातल्या बायकांनी एकच गिल्ला केला अन त्या एकमेकांना भिडल्या. एकदम रणधुमाळी माजली. शेवटी पंच उठले अन त्यांनी त्यांच्या हातातल्या काठ्या जमिनीवर आपटल्या तशी शांतता पसरली. मग पंचांनी सुनावले, "बायका लई कडू. त्या ऐकत नाहीत. त्यांच्यामुळे पुरुषांतपण भांडणे होतात. सगळ्या बायकांना लांब पाठवा. मग पंचायत चालेल.".मग पुरुषांनी सगळ्या बायका लांब पिटाळले अन परत बाचाबाची सुरु झाली.
हा तमाशा काही वेळ पाहिल्यावर परत पंच उठले अन चालू लागले. त्यांच्यामागे गबदुल अन बेनिमाधव धावले. पंच म्हणाले, "ही जागा अवगुणी आहे. इथे न्याय होत नाही तर भांडणे वाढतात." मग जरा बाजुला दुसर्या झाडाखाली थोडे लोक जमले अन पंचायत पुन्हा सुरु झाली. तिथे काय चालले होते ते आम्हाला ऐकायला मात्र येत नव्हते.
थोड्या वेळातच गबदुल अन बेनिमाधव पंचांपासुन विरुद्ध दिशांना लांब चालत गेले. "पंचांनी तोडगा काढलेला दिसतोय. आता गबदुल अन बेनिमाधव त्यांच्या लोकांना तो मान्य करायचा का ते विचारताहेत. त्यातल्या कुणी तो मान्य केला नाही तर मारामार्या होतील अन जो पंचांचा निर्णय अमान्य करेल तो जातीतुन बाहेर काढला जाईल," माझ्याशेजारचा तरुण म्हणाला.
सुदैवाने तसे काही झाले नाही. काही मिनिटातच गबदुल अन बेनिमाधव पंचांजवळ परतले अन काहीतरी बोलले. मग त्यांनी एकमेकांना मिठी मारली अन दोन्ही बाजुंच्या समर्थकांनी आनंदाने आरोळ्या मारल्या.
नंतर पंच उठुन आमच्याजवळ आले अन म्हणाले, "आम्ही आमचा न्याय केलाय. इथुन पुढे बेनिमाधव त्याचा सगळा माल गबदुलकडे देईल अन गबदुल सगळा माल विकेल. होणारा फायदा ते मालाच्या प्रमाणात वाटुन घेतील. शिवाय त्यांच्यात परत भांडणे होवु नयेत म्हणुन गबदुल त्याच्या मुलाचे लग्न बेनिमाधवच्या मुलीशी लावुन देईल. साहेब आमचे काम आम्ही केले तुमचे तुम्ही. आता आमच्या समाजाच्या लोकांना आनंद साजरा करु दे. तुम्ही इथे थांबलात तर बरे वाटणार नाही. आम्ही तुमचा मान राखला आता तुम्ही आमचा मान राखा अन निघा."
अन आम्ही निघालो. आमच्या प्रगत समाजात......
प्रतिक्रिया
13 Jul 2009 - 4:40 pm | प्रकाश घाटपांडे
उत्तम.वाचताना रामनाथ चव्हाणांची आठवण झाली.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
13 Jul 2009 - 10:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>वाचताना रामनाथ चव्हाणांची आठवण झाली.
लेखन वाचतांना मलाही रामनाथ चव्हाणच्या 'जाती-जमाती' ची आठवण झाली.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
14 Jul 2009 - 7:47 am | सहज
>>वाचताना रामनाथ चव्हाणांची आठवण झाली.
रामनाथ चव्हाणांचे लेख सकाळमधे यायचे. त्याची आठवण झाली.
14 Jul 2009 - 8:30 am | पाषाणभेद
लेख फारच मस्त आला आहे. बारकाईने लिहिलेला आहे. असली जमात अंगमेहनतीस घाबरत नाही. मला वाटते ते त्यांच्या जिन्स मधुनच आले असावे.
अवांतर : रामनाथ चव्हाणांचे लेख सकाळमधे यायचे. मी ते वाचत असे. त्याची आठवण झाली. मी ईतर पेपर्स पण वाचत असे. मी ईतर मासीक्स पण वाचत असे.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
15 Jul 2009 - 1:29 pm | प्रसन्न केसकर
आपल्या भावना पोहोचल्या पण रामनाथ चव्हाणांशी माझी कृपया तुलना करु नका. ते थोर आहेत. त्यांचा व्यासंग दांडगा आहे. मी स्वतः त्यांचे लिखाण वाचत वाढलो. माझ्या दृष्टीने ते म्हणजे जणु हिमालयाचे उत्तुंग शिखर. त्यांच्यापुढे मी खूप खुजा आहे. अस्थानी मोठेपणा देवुन कृपया मला लाजवु नका.
पुनेरी
16 Jul 2009 - 4:05 am | पाषाणभेद
पुनेरीजी काहीतरी गैरसमज झाला आहे आपला.
आपल्या विनयाने आम्हाला लाजवले. पण माफ करा मी आपल्या लेखाला चांगलेच म्हटले आहे. मी उगाच कुणाशी पंगा घेत नाही हो. आपण बरे जग बरे. (बरे आहे बरे :-))
मी तर सहज रावांच्या प्रतिक्रीयेस अवांतर मध्ये उत्तर दिले आहे, ते निट बघा. म्हणजे आपल्याला समजेल.
आणि हो आता राहीले सहजराव. माझी त्यांच्याशीही काही वैर नाही. त्यांनी सकाळचा उल्लेख केला व गेल्या काही दिवसांत सकाळच्या बातम्या माझ्या डोक्यात गेल्या होत्या त्या मुळे माझी प्रतिक्षेपी क्रियेने तशी अवांतर प्रतिक्रीया आली. बाकी काही नाही. गैरसमज काढून टाका आणि यावर काही प्रतिक्रीया येवू द्या नाहीतर मी नाराज होईल.
ओळख असू द्या.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
नाराज न होणारा व मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
13 Jul 2009 - 4:50 pm | श्रावण मोडक
वाचतोय. अगदी तटस्थ वृत्तांकन.
14 Jul 2009 - 11:44 am | Nile
असेच. वाचतोय. येउद्या.
13 Jul 2009 - 6:03 pm | धमाल मुलगा
काय पण एकेक प्रकार! ऐकावं ते नवलच.
असंच एकदा पारधी जातपंचायतीबद्दल ऐकलं होतं एकांकडून. ते तर लय डेंजर असतं म्हणे. जोरात कापाकाप्या होतात असं म्हणतात.
असो, पुनेरीभाऊ, तुमच्या पोतडीतले येऊ द्या अजुन एकेक किस्से बाहेर. :)
----------------------------------------------------------------------------------------
::::विकासरावांच्या मताचा मान ठेऊन स्वाक्षरी काढलेली आहे.::::
13 Jul 2009 - 6:29 pm | आनंदयात्री
पुनेरी तुमचे लिखाण नेहमीच आवडीने वाचतो. अजुनही येउ द्या.
13 Jul 2009 - 7:18 pm | नीलकांत
तुमचं लेखन आवडतं. अधिक येऊ द्या.
- नीलकांत
13 Jul 2009 - 7:04 pm | दशानन
उत्तम लेखन !
डोळ्यासमोर घटना उभी करण्याची ताकत आहे राव तुमच्या लेखनामध्ये !
वाचत आहे.. लिहीत रहा.
13 Jul 2009 - 7:44 pm | सुनील
कोकणातही गावकी नावाचा प्रकार भरतो. साधारणतः असाच.
जर प्रचलित कायद्यांचे उल्लंघन होत नसेल आणि संबंधित पक्षांना न्याय मिळाल्याचे वाटत असेल, तर अशा समांतर न्यायव्यवस्था न्याय्य ठरतात का?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
14 Jul 2009 - 11:55 am | नीधप
गावकी देवळात भरते ना. गावदेवीचं जे देऊळ असेल तिथे. आणि तिथे पंचमंडळी, वादी-प्रतिवादी, गावातले प्रतिष्ठीत आणि गावातली इतर मंडळी यांच्या बसण्याच्या जागाही ठरलेल्या असतात. माझ्या सासरच्या गावात तरी असं होतं हे ऐकलंय मी.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
13 Jul 2009 - 8:28 pm | धनंजय
असेच म्हणतो. या प्रकारासाठी लेखासाठी उत्तम लेखनशैली.
13 Jul 2009 - 9:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पुनेरीभाऊ, वेगळ्याच जगाची ओळख तुमच्या लेखणीतून तुम्ही अतिशय उत्तमरित्या करून देता.
13 Jul 2009 - 10:01 pm | मस्त कलंदर
पुनेरीभाऊ, वेगळ्याच जगाची ओळख तुमच्या लेखणीतून तुम्ही अतिशय उत्तमरित्या करून देता.
अगदी खरं!!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
13 Jul 2009 - 11:39 pm | llपुण्याचे पेशवेll
हेच म्हणतो.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
13 Jul 2009 - 10:02 pm | अनंत छंदी
उत्तम, वास्तववादी लिखाण!
13 Jul 2009 - 10:06 pm | लिखाळ
लेख छान आहे.
तुमचे इतर लेख सुद्धा वाचले. आवडले.
-- लिखाळ.
13 Jul 2009 - 10:20 pm | चतुरंग
अजून निवाड्याबद्दल नेमके वाचायला आवडले असते.
कंजारभाटाच्या मोटरसायकलवरच्या कौशल्यावरुन आठवले.
पारधी लोक हे पळून जाण्यात अतिशय निष्णात. माझे आजोबा हे फौजदारी वकील होते ते सांगायचे त्या आठवणीत हे पारधी लोक माळावरुन पळताना पोलीस मागे लागले तर पळतापळताच पायाचा आंगठा आणि शेजारचे बोट ह्याच्या बेचक्यात दगड पकडून मागे फेकत फेकत पळायचे. वेग कमी व्हायचा नाही आणि नेम इतका अचूक की पाठलागावरचा जरा बेसावध राहिला तर कपाळमोक्ष ठरलेला! :T :O
चतुरंग
13 Jul 2009 - 10:29 pm | घाटावरचे भट
उत्तम लेख.
13 Jul 2009 - 10:40 pm | चकली
धन्यवाद. वेगळे आणि चांगले वाचायला मिळाले.
चकली
http://chakali.blogspot.com
13 Jul 2009 - 11:22 pm | बिपिन कार्यकर्ते
पुनेरि, उत्तम लेखन. अगदी तटस्थ. आवडले.
बिपिन कार्यकर्ते
13 Jul 2009 - 11:32 pm | अवलिया
उत्तम लेखन !
--अवलिया
===========
रामायण महाभारत घडायला स्त्रीची गरज आहे असे नाही, आजकाल सहीच ते काम करते. ;)
14 Jul 2009 - 12:52 am | स्वाती२
लेख आवडला. एक वेगळे जग डोळ्यासमोर उभे केलेत.
14 Jul 2009 - 11:10 am | नीधप
वा तुमचे लेख वाचायला मस्त वाटतं.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
14 Jul 2009 - 2:25 pm | प्रकाश घाटपांडे
मटा ने निवडलेल्या उत्तम १५० पुस्तकात त्रिंबक नारायण आत्रे यांचे गावगाडा आहे. वरदा बुक्स ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
कुमार केतकरांनी इथे त्याचा परिचय दिला आहे
मुक्त सुनीत ने हे पुस्तक वाचले आहे.
आता आपल्याला गावगाडा ई बुक स्वरुपात भविष्यात वाचता येईल. इथे पहा
खुप सुंदर पुस्तक आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
14 Jul 2009 - 2:20 pm | प्रकाश घाटपांडे
सुनील यांच्या स्थलांतरे या धाग्यातील गावगाडा या पुस्तकाविषयी माहिती दिली आहे .इथे पण पहा
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
14 Jul 2009 - 5:22 pm | वेताळ
पारधी जातपंचायतीचा पण उल्लेख केला आहे तुम्ही. त्याबद्दल पण एकादा लेख टाका.
वेताळ
14 Jul 2009 - 5:22 pm | वेताळ
पारधी जातपंचायतीचा पण उल्लेख केला आहे तुम्ही. त्याबद्दल पण एकादा लेख टाका.
वेताळ
14 Jul 2009 - 5:27 pm | वेताळ
पारधी जातपंचायतीचा पण उल्लेख केला आहे तुम्ही. त्याबद्दल पण एकादा लेख टाका.
वेताळ
14 Jul 2009 - 6:37 pm | राजू
श्री क्षेत्र मढी येथे रंग पंचमीच्या आसपास वेगवेगळ्या जातींची जात पंचायत भरत असते.
14 Jul 2009 - 8:49 pm | रामदास
हे तेच मढी आहे का जिथे गाढवांचा मोठा बाजार भरतो ?
अहमदनगरजवळ आहे असे कोणीतरी सांगीतल्याचे आठवते.
14 Jul 2009 - 8:51 pm | धमाल मुलगा
कानीफनाथांचे ठाणेदेखील आहे ते.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
14 Jul 2009 - 9:16 pm | चतुरंग
पाथर्डी तालुक्यात आहे.
हा घ्या दुवा.
(अलख निरंजन)चतुरंग
14 Jul 2009 - 9:49 pm | ऋषिकेश
लेखन खूप आवडले.. तटस्थ तरीही चित्रदर्शी
अजून असेच भन्नाट किस्से येऊ द्या.
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
14 Jul 2009 - 10:49 pm | प्राजु
कोल्हापूरला आमच्या घरासमोर कंजारभाटांची वस्ती आहे. अव्याहत दारू गाळण्याचं काम चालतं. पण त्यांच्या त्रास असा काही नाही. त्यातले काही कधी कधी काही अवजड काम असेल तर येतात मदतीला. त्यांचं जग तसं जवळून पाहिलं आहे मी.
लेख आवडला हे वेगळे सांगायला नको. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Jul 2009 - 9:22 am | मुक्तसुनीत
लिखाण रोचक वाटले. मोडक म्हणाल्याप्रमाणे अभिनिवेशरहित. रिपोर्ट लिहिल्यासारखे आणि त्यामुळेच वाचनीय.
गिरीश प्रभुणे वगैरे लोकांनीसुद्धा या विषयात उत्तम लिखाण केलेले आहे.
पुनेरी यांच्या लिखाणाची प्रतीक्षा राहील.