(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात. म्हणूनच तर आपण त्यांनी लिहीलेले वाचतो ना?)
आधीचे भाग येथे वाचा :
भाग एक - http://misalpav.com/node/8127
भाग दोन - http://misalpav.com/node/8138
भाग तीन - http://www.misalpav.com/node/8149
भाग चार - http://misalpav.com/node/8172
भाग पाच - http://www.misalpav.com/node/8189
भाग सहा - http://www.misalpav.com/node/8204
भाग सात - http://www.misalpav.com/node/8219
१७ जूलै
गेले काही दिवस जेव्हा-जेव्हा सरकारी दवाखान्यात जातो तेव्हा काही ठरावीक माणसे पोर्च मधे सतरंज्या अन्थरून पडलेली दिसतात. काही थोड़े पुरुष अन बर्याचश्या बायका. सगळे चाळीशीच्या पुढचे लोक. चेहर्यावर दारिद्र्य अन बापुडवाणेपणा ओत:प्रोत. सगळीच कुठल्याशा रोगाने पछाडलेले, सारखे सतत खोकत असतात आणि छातीचा भाता सतत वर खाली होत असतो. कोण आहेत हे लोक? का असे उघड्यावर थंडी-पावसात असा मुक्काम ठोकून बसलेले असतात? जर आजारी असतील तर दवाखान्यात अॅडमिट का होत नाहित? अनेक प्रश्न मनात येतात त्याना पाहून दरवेळी. शेवटी आज ठरवले हे काय गौड्बंगाल आहे त्याचा छडा लावायचाच अन तिथे झोपलेल्या एका बाईशी बोलायला गेलो. आधी तिने टाळाटाळ केली पण एक चहाचा कप देवू केल्यावर घडाघडा बोलायला लागली. मग इतर काही बायका पुरुष पण जमले आणि त्यानी सांगितले ते ऐकून मी हादरलोच.
ते सगळे दम्याचे रुग्ण होते. आर्थीक परिस्थीती अत्यंत हलाखीची असलेले. बहुतेक सगळे मजूर वर्गातले तर काही कनिष्ठ मध्यमवर्गीय या सदरात मोडू शकतील असे. सगळे या शहरातच राहणारे अन त्यांचे कुटुम्बिय, नातेवाईकसुद्धा इथेच कुठे कुठे रहात असलेले. पण दुर्दैवाने ही व्याधी नशीबी आली अन कपाळीचे भोग एकट्यानेच भोगायचे असतात याचा त्याना प्रत्यय आला. कुणाला मुलाने इथे आणून सोडले होते तर कुणाला नवर्याने. एका माणसाला तर त्याच्या बायकोने इथे सोडले अन ती गेली दुसरे लग्न करायला! त्याना दवाखान्यात म्हणे सांगत होते की ओपीडी पेशंट म्हणून ट्रीटमेंट घ्या पण अॅडमिट करून घेणार नाही. दवाखान्यापासून लांब जायची त्याना भीती. हो! परत दम्याची उबळ आली तर काय करणार. काही काम करायचे तर शरीर आजाराने पोखरलेले. भीक मागुन मग स्वत:चे पोट भरायचे अन दम्याची उबळ कधी येते याची वाट बघत तिथे दवाखान्याच्या आवारात पडून रहायचे, ती आली की आत जावून इंजेक्शन घ्यायचे हेच त्यांचे जीवन....
डोळ्यासमोर अचानक गल्लीतला दमेकरी बोडस आला. पावसाळ्यात अन हिवाळ्यात त्याच्या खोकण्याने सारी आळी दणाणते, विशेषता: रात्री. पण त्याचा मुलगा अन सून भले, रात्रभर त्याला औषधे देत, छाती शेकत जागतात पण तक्रार करत नाही.... या लोकांची आत्ता या पावसाळ्यात काय अवस्था होत असेल? एका माणसाला विचारले तर त्याने शांतपणे सांगितले बर्याचदा सकाळी एखादे माणूस मरून पडलेले लक्षात येते. "मग दवाखान्याचे लोक डेड बॉडी उचलून नेतात पोस्ट मॉर्टेम करायला. त्याचे कपडे, अन्थरूण-पांघरूण वगैरे आम्ही वाटुन घेतो. नाहीतर ते कुणीतरी पळवणार किंवा इथे नवीन येणार्या माणसाला मिळणार," तो म्हणाला. माय गॉड! किती भयानक आहे हे जीवनाचे रूप आत्तापर्यंत आपण असे जीवन कधीच पाहिले नाही विचार केला मी. अन अचानक डोक्यात विचार आला, या विषयावर बातमी करून वाचा फोडली तर या लोकाना मदत करायला कुणी संस्था कदाचीत पुढे येईल. लगेच बाराथे साहेबाना फोन लावला तर ते माझे बोलणे ऐकुन एकदम एक्साईट झाले म्हणाले, "अरे खूप दिवसानी कुणीतरी सामान्य, अतिसामान्य माणसाच्या जीवनावर बातमी करतोय. छान आहे विषय. कर कर बातमी. डोळस फोटोग्राफरला पण पाठवतो त्यांचे फोटो घ्यायला. खूप लोकांशी बोल. स्थानिक पोलिसांशी पण बोल, माहिती घे असे किती लोक मेलेत गेल्या एक महिन्यात. दवाखान्यातल्या अधिकार्यांशी पण बोल. पण एक गोष्ट लक्षात घे, हा आजार दीर्घकाळ रेंगाळतो. त्या सगळ्या रुग्णांना अॅडमिट केले तर इतर रुग्णांसाठी जागाच रहाणार नाही तिथे. या प्रश्नावर मार्ग समाजच काढू शकतो.
पटापट बाराथे साहेबांनी सान्गितल्यप्रमाणे बातमी कव्हर केली अन ऑफिस मधे जावून लिहिली. संपादक आगलावे पण खुश झाले होते. त्यानी स्वत: माझी बातमी पाहिली अन अक्षरश: पुन्हा नव्याने लिहिली. त्यानंतर स्वत:च्या हस्ताक्षरात माझी बायलाइन लिहिली - प्रमोद भोंडे.
आज खरे काम काम केल्याचे समाधान वाटले. माझ्या आणि बाराथे साहेबांच्या पब्लीक अपमानाचे उट्टे काढल्याचा तो आनन्द होता? कुणाला माहिती! पण माजिरे मात्र आज गप्प होता.....
१८ जूलै
माझी सरकारी दवाखान्यात मुक्काम ठोकून बसणार्या दमेकर्यांची बातमी एकदम सुपरहिट ठरणार असे दिसतेय. सकाळपासून बरेच फोन येताहेत, वाचकांचे आणि सामाजिक संस्थांचे सुद्धा. एक संस्था तर सरकारी दवाखान्याच्या आवारातच या रुग्णांसाठी वेगळ्या वार्डची इमारत पण बांधून देवू इच्छिते. संपादक आगलावेनी आज या विषयावर येणार्या प्रतिक्रीयांवर एक ख़ास पान काढायचे ठरवले आहे. मला बाराथे साहेबांनी सगळ्या प्रतिक्रीया एकत्र करायचे काम दिले. संध्याकाली सरकारच्या आरोग्य विभागाची प्रेस-नोट आली की त्या संस्थेबरोबर आरोग्य विभागाच्या अधिकार्यांची चर्चा झाली अन अश्या रुग्णांसाठी सरकार व त्या संस्थेने मिळून स्पेशल वार्ड बांधन्याचे ठरले आहे. हे कलल्यावर संपादक आगलावेनी ती बातमी पहिल्या पानावर ठसठशीत घ्यायचे ठरवले - बातमीचा परीणाम या लोगोसह. हा टपोरी पम्या तर एकदम सेलिब्रीटी झाला.... पेज ३ मधे पण कुठल्या पत्रकाराच्या बातमीचा असा परिणाम झालेला दाखवला नाहीये...
२२ जूलै
आज सकाळी संपादक आगलावेनी सगळ्या संपादकीय स्टाफची मीटिंग घेतली. आमच्या शहरात आधीच सगळी न्यूज चॅनेल दिसतात अन आता एक न्यूज़ची वेबसाईट पण चालू झाली आहे त्या नवीन स्पर्धेबाबत विचारमंथन करायला. विचारमंथन कसले बोड्क्याचे, संपादक आगलावेच सगळे बोलले अन इतरांनी फक्त ऐकून घेतले. आपल्याला नाही पटले संपादक आगलावे काय म्हणाले ते. ते म्हणाले, "आता आपल्याला नवीन स्पर्धेशी सामना करायचा आहे. आपला पेपर सकाळी येणार तोवर सगळ्या घडत असलेल्या घटना-घडामोडींची माहिती आपल्या वाचकाना टीव्ही अन इन्टरनेट वर मिळेल. त्यामुले आता आपल्याला आपला फोकस घटना-घडामोडींवरून ख़ास बातम्या, विशेष लेख याकडे वलवावा लागेल. त्याशीवाय वाचकांना काय आवडेल त्याचा विचार करून पेपर काढावा लागेल. सध्या सगळ्या मिडीया इंडस्ट्रीमधे या विषयावर बराच विचार चालला आहे, बरेच प्रयोगसुद्धा होत आहेत. सर्वच ठिकाणी सेक्स, गुन्हे, सनसनाटी बातम्या याना वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत आपण ही भूमिका घेतली नाही पण आता बदलत्या काळानुसार पावले टाकुन आपल्यालाही तोच ट्रेंड वापरावा लागेल. या विषयावर माझे आणि मालकांचे आधीच बोलणे झाले आहे आणि मालकांना पण असेच वाटते." मला आपले वाटत होते की आपल्या पेपरचे एव्हढे नाव असताना असे करायला नको. हे म्हणजे अगदी गरती बाईला चोच रंगवून बसवणे झाले. पण कोणीच वरिष्ठ काहीच बोलले नाहीत तर काय करणार? शेवटी आपण पडलो किरकोळ ट्रेनी. आत्ताच तर या लाईनीत आलो. या सगळ्या हाय लेव्हलच्या गोष्टी. आपल्याला काय कळते त्यातले. उगीच जास्त शानपत्ती केली तर आहे ती नोकरी जायची. बाराथे साहेबांचा पण चेहरा पडलेला दिसतोय....
प्रतिक्रिया
18 Jun 2009 - 5:21 pm | अभिरत भिरभि-या
कथानायकाचा सुरवंट आता फुलपाखरू होतोय असे दिसतेय
अभिरत
18 Jun 2009 - 7:18 pm | संदीप चित्रे
>> किती भयानक आहे हे जीवनाचे रूप आत्तापर्यंत आपण असे जीवन कधीच पाहिले नाही विचार केला मी.
ह्या प्रकारचं प्रखर वास्तवही दाखवतेय.
18 Jun 2009 - 10:49 pm | श्रावण मोडक
आली मिटींग. वाटच पहात होतो. सो, आता गाडी पुढे... आगलावेंचे भलतेच काही चित्र समोर येणार की काय आता? ;)
लगे रहो... :)
19 Jun 2009 - 4:24 am | Nile
मिडीया ची एकंदरीत परिस्थीती दिसणार काय आता? :)
(हा 'पम्या' खराच रिपोर्टर दिसतो रे, आयला चुकलं, प्रमोद भोंडे, प्रमोद...)
19 Jun 2009 - 9:16 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
छान लिहित आहात, हे काही आता नव्याने सांगायला नकोच. पण आता सिरीयस, खर्या जगातल्या गोष्टीही समोर येत आहेत.
19 Jun 2009 - 2:38 pm | धमाल मुलगा
पुणेरीशेठ,
भारी आख्यान लावलंय की राव :)
मजा येतीय भौ.
आता पुढं काय होणार हो?
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::