एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग ४

प्रसन्न केसकर's picture
प्रसन्न केसकर in जनातलं, मनातलं
14 Jun 2009 - 2:01 pm

(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात. म्हणूनच तर आपण त्यांनी लिहीलेले वाचतो ना?)

आधीचे भाग येथे वाचा

भाग एक - http://misalpav.com/node/८१२७

भाग दोन - http://misalpav.com/node/8138
भाग तीन - http://www.misalpav.com/node/८१४९

१५ जून
आज आपले नशीब एकदम पीताम्बरी लावून घासल्यागत उजळल. साला पंधरा दिवस झाले इथे जॉइन होऊन पण बाराथे साहेब स्थानिक कार्यक्रमांची यादी आणि पत्रकांवरून संक्षिप्त बातम्या लिहिण्यापलिकडे कामच करायला सांगत नव्हते. मी पण गप्प बसलो होतो. म्हटले कधी न कधी आपली किंमत त्याना कळेलच. आज तो दिवस आला एकदाचा. एका कार्यकर्त्याने खूप अभ्यास करून, माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळवून, प्रदुषणाच्या प्रश्नावर एक लेख लिहून पाठवला होता. बहुधा तो लेख त्याने बर्‍याच वृत्तपतत्रांकडे पाठवलेला असावा. लेखावर मा. संपादक असे टन्कुन पुढे मोकळी जागा सोडली होती आणि तिथे नंतर हाताने आमच्या वृत्तपत्राचे नाव लिहिले होते त्यावरून. बाराथे साहेबानी तो लेख माझ्याकड़े दिला आणि त्या कार्यकर्त्याच्या अभ्यासावर आधारीत एक बातमी तयार करायला सांगितली. लेखाच्या शेवटी त्या कार्यकर्त्याने त्याचा मोबाईल नंबर पण दिला होता त्यावर मी फोन केला आणि त्या कार्यकर्त्याशी बोलून झकास बातमी तयार केली _ चांगली पाचशे शब्दांची. त्या कार्यकर्त्याची बरीच स्तुती पण केली, अभ्यासू, तळमळीचे कार्यकर्ते म्हणुन. शेवटी त्यानंच तर सगळे कष्ट केले होते ना? आणि एव्हढा अभ्यास केलेला असून पण माज नव्हता दाखवला. आपल्याशी आदराने बोलला, आपला नंबर पण मागून घेतला वर म्हणाला तुम्ही पत्रकारच जगाचे भवितव्य ठरवणार. तुमच्यावरच सगळा भरोसा! आयला, इथे माझे स्वत:चे भवितव्य मला कधी ठरवता आले नाही तो मी जगाचे भवितव्य ठरवणार! हे जरा जास्तच होतेय. बाराथे साहेबानी इथे नोकरी दिली नसती तर आपलेच भवितव्य अंधारात होते. पण तो कार्यकर्ता मात्र एकदम प्रामाणिकपणे बोलत होता. एव्हडी वर्ष टर्रेगिरी करत काढल्यावर आपले जजमेंट कधी फेल जात नाही! त्याशिवाय दुपारी सरीता स्वत: येवून आपल्याशी बोलली, "हाय! मी सरिता दिवटे!" आपली तर आधी बत्ती गुल झाली पण तिने आडनाव सांगितल्यावर मात्र हसू आवरेना. आपल्या कट्ट्यावर सुन्दर आणि चालू पोरीला दिवटी म्हणतात _ एकदम दिवटे अणि दिवटी याच्यातला सारखेपणा जाणवला आणि फक्कन हसलो. ती टकामका बघताच राहिली. मग भानावर येवून एकदम स्टाईल मधे सांगितले, "मी प्रमोद भोंडे!" साला आपले पूर्वज पण एकदम छपरी! आड़नाव पण काय घेतले तर भोंडे - एकदम भेंडीची भाजी असल्यागत मिळमीळीत. सालं काहीतरी दणदणीत आडनाव घेतले असते झुंझार वगैरेसारखे तर किमान पोरींवर भाव तरी ज्यास्त पडला असता. भोंडे हे सालं कारकुनाचे नाव वाटते आपल्यासारख्या डेरिन्ग्बाज, जिगरबाज, डेडली पत्रकाराचे नाही. पन सरीता चांगली पोरगी! तिने तसे काही दाखवले नाही. उलट आपल्याला लंच टाईम मधे बरोबर डबा खायची ऑफर दिली. असा ससा एकदम समोर येऊन बसल्यावर आपण काय धरायचा सोडतो काय? सरळ लंच टाईममधे घेऊन घेलो तिला कोपर्‍यावरच्या दिल्ली दरबार मधे. तिनं डब्यात भाजी-पोळी आणली होती. आपण चिकन-बिर्यानी मागवली अन वर लस्सी पण, मलाई मारुन. नव्वद रुपये बिल झाले. ते देताना खिश्याला भोक पड्ल्यागत वाटले पण अशी खल्लास, डीसेंट पोरगी पटवायची म्हणजे पैसे खर्च होणारच ना?

१६ जून

आयला राडा झाला. कालच्या त्या प्रदुषणाच्या बातमीत त्या कर्यकर्त्याचे नावच छापून आले नाही. असे कसे झाले काहीच कळत नाही. उपसंपादकाने उडवले असणार बहुधा! तसाही साला तो माजिरे उपसंपादक लय हलकट आहे. फक्त उपसंपादक हुद्द्यावर आहे तर स्वत:ला संपादकच समजतो. ऑफिस मधे बसून बातमीदाराना कमी लेखतो. त्या कार्यकर्त्याचा पार पापड़ मोडला. सकाळी सकाळी फोन करून मला खूप शिव्या दिल्या. ऐतखाऊ म्हणाला. ऐकून घेतले. करणार काय? चूक झालीय ना बातमीत छापताना! बाराथे साहेबाकड़े तक्रार केली पण माजिरेला कोणच काही बोलले नाही. आज पेपरमधे काय छान जाहिरात आली होती त्या नविन टॉवेलची _ एक मस्त्त पोरगी फक्त टॉवेलमधे स्वत:ला गुंडाळून पहुड्ली होती तंगड्या, पाठ दाखवत. पण तो फोटो पण परत नीट बघावासा वाटला नाही मला.

१७ जून

आज चांगलाच धिंगाणा झाला. त्या संस्कृतीरक्षक संघटनेचे कार्यकर्ते मोर्चा घेउन आले होते टॉवेलच्या जाहीरातीवरून. खच्चून घोषणा दिल्या तासभर. मग संपादक आणि मॅनेजर त्याना भेटले आणि माफ़ी मागितली. च्यायला! पोरीला दाखवायचंय, लोकाना बघायचंय, ह्याना काय घेने ना देने. पण असा राडा करुनच पब्लिकसमोर राहता येते ना? पण त्यांनी संपादकाना आणि मॅनेजरला प्रश्न भारी विचारला, तुमच्या पोरीचे असे फोटो कुठे छापून आले तर तुम्हाला काय वाटेल म्हणून. एरवी आमच्यापुढे ट्याव-ट्याव करणार्‍या आगलावेंचा आवाजच बंद केला. रोज याला-त्याला कारणं काढून झापतात पण आज दिवसभर गप्प होते. मानले आपण! रोज असा काहीतरी लोच्या झाला पाहिजे...

मौजमजाप्रकटन

प्रतिक्रिया

Nile's picture

14 Jun 2009 - 2:58 pm | Nile

वाचतोय! डायरी बरीच वास्तवाकडे झुकतीय. येउद्या अजुन. :)

श्रावण मोडक's picture

14 Jun 2009 - 3:45 pm | श्रावण मोडक

च्यायला! पोरीला दाखवायचंय, लोकाना बघायचंय, ह्याना काय घेने ना देने. पण असा राडा करुनच पब्लिकसमोर राहता येते ना?
खल्लास. वाचतोय. पुढचे भाग लवकर टाक.

सहज's picture

15 Jun 2009 - 7:49 am | सहज

वाचतोय.