एका प्रशि़क्शणार्थी पत्रकाराची डायरी

प्रसन्न केसकर's picture
प्रसन्न केसकर in जनातलं, मनातलं
10 Jun 2009 - 4:20 pm

(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात. म्हणूनच तर आपण त्यांनी लिहीलेले वाचतो ना?)

आमच्या आळीतल्या भोंड्यांचा पम्या म्हणजे लय भारी बेणं! तसे घरातले सगळे एकदम जंट्लमन, पण त्यांच्यात पम्या म्हणजे एकदम भांगेत तुळस! ड्ब्बल जाड काचेचा चश्मा लावणारा, पम्याचा फादर मुन्शीपाल्टीत संडास (सॉरी शॅनिट्री) इंस्पेक्टर असला तरी आपल्याला रिस्पेक देतो. गणपतीत आपल्या मंडळाला त्याच्याकडून सगळ्यात ज्यादा वर्गणी असते अन वर चहा पाजुन आपल्याला म्हणतो, "अहो, तुम्ही कार्यकर्ते लोक! उद्याचे कॉर्पोरेटर. आत्तापासून चांगले संबंध ठेवले पाहिजे." पम्याची मदर पण नोकरी करते. आणि त्याची सिस्टर निमी.... एकदम खूबसूरत, टकारा पीस पण सीधी. दहावीला ८२ अन बारावीला ७० ट्क्के घेतले तिने. लय पोरांनी तिच्यावर लाईन मारुन पाहिली पण निमी एकदम स्ट्रेट, नाकापुढे बघणारी. पम्या मात्र वेगळा.... बालवाडीपासून माझ्या वर्गात. शाळेत असताना शेजारच्या बागेतुन कैर्‍या चोरायला पुढे... नंतर कॉलेजात गेला पण अभ्यासापेक्शा राडे करण्यातच जादा लक्श. गेल्यावर्शी त्यानं पत्रकार व्हायच्या कुठ्ल्यातरी कोर्सला अ‍ॅडमिशन घेतली. पण उन्हाळ्याच्या सुट्टीत एका पेपरमधे इंटर्नशिप केल्यापासून तो खूप बदलला, गुमसुम रहायला लागला. परवा त्याच्या घरी गेलो तर तो नव्हता पण त्याची डायरी टेबलावर पडलेली. उचलली आणी बाहेर आलो. वाचून तर आपला मेंदूच काम करेना. भेजेमे खयाल का फुल्ल ट्रॅफीक जॅम.... मानला आपण पम्याला, काय लाईन पकडलीय त्याने.... एकदम सही भाय! विश्वास नसेल बसत तर हे बघा काय लिहिलय त्याच्या डायरीतः

३० एप्रील

आज शेवट्चे लेक्चर झाले. विचार होता आता किमान एक महिना सुट्टी.... फुलटू टाईमपास करू. पण कसचे काय. मास्तरने येवून सांगितले सुट्टीत ईंटर्नशिप करायला. आयला, कॉलेजात सुट्टी काय काम करायचे? होल जिंदगी पुढे तेच तर करायचेय ना! वैताग आहे साला!

२ मे

आज मास्तरने सांगितलेल्या पेपरच्या ऑफिसात गेलो सकाळीच. कोणच आले नव्हते बारा वाजेपर्यंत. नंतर एक एक जण उगवायला लागले. साले काय दुपारपर्यंत झोपतात का काय? संपादकाने विचारले तुला काय काम करायचेय म्हणुन तर आपण सांगीतले की रिपोर्टिंग करायचेय म्हणून. कसा ट्क्कून बघत होता पण आपण नाही घाबरत! त्याने सांगितले त्या टकल्या चीफ रिपोर्टरला पण भेटलो. तो म्हणाला, उद्यापासून रोज एका रिपोर्टर बरोबर बीटवर जात जा. उद्या क्राईम रिपोर्टर बरोबर काम करायला सांगितलंय! आपल्याला काय! जमेल तेवढे करू. नोकरी थोडीच करायचीय इथे?

३ मे

क्राईम रिपोर्टर तोडकर बाप माणूस आहे! काय वट आहे त्यांचा. आपण तर पार फिदा झालोय. दुपारी आला आणि चल म्हणाला. जेवून येवू का विचारले तर म्हणे बाहेर होईलच जेवण. त्याच्या मोटरसायकलवर बसलो तर बूंगाट गाडी काढली ती एकदम पोलिस स्टेशनलाच. तिथे सरळ इंस्पेक्टरच्या केबीनमधे गेला. मी होतोच मागे. आत गेलो तर साहेब उठून उभा - या या तोडकरसाहेब म्हणत. चहा-कॉफी , थंड काय मागवू विचारले तर तोड़कर सरळ म्हणाला ही काय चहाची वेळ आहे? जेवायच्या वेळी आलोय तर खायला मागवा. दोघांनापण बिर्याणी चारली साहेबाने वर सिग्रेट ही. नंतर कमीशनर ऑफिस मधे गेलो तर तिथेपण सगळ्या साहेब लोकांशी दोस्ती. संध्याकाळी प्रेसरूम मधून प्रेस्-नोट घेऊन येत होतो तर रस्त्यात एक पांडू नो एंट्रीतून जाणार्‍यांकडून तोड करत होता. तोडकरने बघितले अन मोबाईलने फोटो घेतला. वर पांडू ला तो दाखवला अन छापु का विचारले. पांडू टरकलाच.... पाया पडला तोडकरच्या. १०० रू घेतले तोड्करने त्याच्याकडून आणि मग फोटो डिलीट केला. काम संपल्यावर मला बीयर पण पाजली. बिल द्यायला कोणतरी फौजदार होताच.

४ मे

आज दोगळे रिपोर्टर बरोबर मुन्शीपाल्टीत गेलो. त्याची वेगळीच तर्‍हा. एकतर उगवलाच ४ वाजता. मी आपला मुन्सीपाल्टीच्या बाहेर दोन तास उभा. आला तो सरळ पाणीपुरवठ्याच्या ईंजिनिअरच्या केबिनमधे घुसला. ईंजिनिअरला विचारले नेहरुनगरमधे माझ्या बहिणीच्या घरी दूषित पाणी येतेय? ईंजिनिअर तंतरलाच. लगेच कुणालातरी फोन लावला मग म्हणाला अहो एक ड्रेनेज लाईन लीक आहे, साठ्-सत्तर घरांचा प्रश्न आहे. रात्रीत रिपेर करून देतो. नंतर प्रेस्-रूम ला गेलो तर दोन्-तीन कॉर्पोरेटर वाट बघत होते त्याची, आज जीबीत काय बोलायचे ते विचारायला. जीबी संपल्यावर एका कॉर्पोरेटरने चहा खारी दिल्या. परत ऑफिसला आल्यावर दोगल्यानं जीबीची बातमी तर दिलीच पण वर नेहरुनगरच्या पाणीपुरवठ्याची पण दिली "पालिकेचा हलगर्जीपणा; नेहरुनगर मधे २०० घरी दूषित पाणीपुरवठा" म्हणून.

५ मे

सांस्क्रुतिक बघणार्‍या यशदा मॅड्म लई भारी! आज त्यांना "एका नटाची गोष्ट" नाटक बघून परिक्शण लिहायचे होते पण त्या तिथे गेल्याच नाहीत. पास देउन मला एकट्याला जायला सांगितले. परत येवून मी परिक्षण लिहीले तर मला म्हणाल्या मुख्य पात्राचे काम करणारा नट तोतरा आहे ते का लिहीले नाही? मला त्याचे काम आवडले होते. मी तसे सांगितले तर स्वतःच हवे तसे लिहीले आणि माझ्याबरोबर स्वतःचे नाव लेखावर टाकले. वर शीर्षक दिले "एका तोतर्‍याची गोष्ट". खरे तर मॅड्मचे नाव नडदाच हवे होते. काय नडल्यात त्या नटाला. काय खुन्नस आहे काय माहिती.

६ मे

आज बिझनेस कॉरस्पाँडंट गोळे बरोबर होतो. दुपारी एक प्रेस्-कॉन्फरन्स होती तिथे खच्चून जेवलो आम्ही. निघताना एका मुलीने प्रेस्-नोट आणी मोठे पार्सल दिले गोळ्याला. परत ऑफिसमधे सोडायला गाडी होतीच. ऑफिसमधे पोचल्यावर गोळेनं प्रेस्-नोट जशीच्या तशी उतरवली अन स्वतःच्या नावाने बातमी केली. रात्री अजुन एक कॉकटेल प्रेस्-कॉन्फरन्स. मजबूत प्यायला गोळे तिथे अन वर अजुन एक गिफ्ट पण घेतली. दिवसात दोन गिफ्ट मिळाल्या पण मला एकपण नाही दिली. उगीच नाही ऑफिसात सगळे आखडू म्हणत त्याला.

८ मे
इंटर्नशिप संपली आज. मजा आली. आपणतर आता ठरवलय हीच लाईन धरायची. कमाई पण होते अन माज पण करता येतो. ठरले तर मग.

विडंबनसमाजनोकरीमौजमजाप्रकटनमतविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

10 Jun 2009 - 4:30 pm | श्रावण मोडक

फारच लवकर संपली इंटर्नशिप. अनेक कॅरेक्टर्स डोळ्यांसमोर येऊ लागली होती आणि तितक्यात पडदा पडला... :(

Nile's picture

11 Jun 2009 - 2:53 am | Nile

+१.

प्रत्येक कॅरॅक्टर थोडं अजुन वाढवलं असतं तर चाललं असतं. :)

मराठी_माणूस's picture

10 Jun 2009 - 4:39 pm | मराठी_माणूस

काल्पनिक वाटली नाही

हर्षद आनंदी's picture

10 Jun 2009 - 4:51 pm | हर्षद आनंदी

राजकारणा प्रमाणेच समाजसेवा, सत्याचा पाठपुरावा वगैरे नसुन....
फक्त आणि फक्त पोट भरण्याचे साधन राहिले आहे. :W

कथा म्हणुन मस्तच..... नविन पत्रकार काय आदर्श डोळ्यासमोर ठेवुन चालतात हे बघुन डोळे फिरले. 8}

संदीप चित्रे's picture

10 Jun 2009 - 7:24 pm | संदीप चित्रे

की खरंच असं असतं असा प्रश्न पडतोय आता !

अवलिया's picture

10 Jun 2009 - 7:38 pm | अवलिया

फार थोडक्यात आटोपले राव !
एकेका दिवसाचा एकेक भाग होवु शकतो :)
असो.
चालु द्या प्रशिक्षण :)

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

निशिगंध's picture

10 Jun 2009 - 10:06 pm | निशिगंध

खरेच असे होते का...
वाईट वाटत आहे..

पण डायरी ची पाने छान.. थोडी वाढ्ली असती तर..
बाकी आवडली

____ नि शि गं ध ____

सहज's picture

11 Jun 2009 - 7:50 am | सहज

अजुन येउ दे!