३० वर्षांपासून अखंडित....

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
26 Jan 2024 - 2:30 pm

संग्रह

सव्वीस जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचा अंमल सुरू झाल्यावर भारत सार्वभौम, प्रजासत्ताक झाला. तेव्हापासूनच दरवर्षी 26 जानेवारीला देशभर प्रजासत्ताक दिनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाऊ लागलं. त्या कार्यक्रमांपैकी सर्वात मुख्य कार्यक्रम असतो नवी दिल्लीत आयोजित होणारे संचलन आणि अन्य कार्यक्रम. हा सोहळा मी 30 वर्षांपूर्वी पहिल्यांदा दूरदर्शनवर पाहिला होता आणि तेव्हाच मला तो प्रचंड भावलाही. पुढच्या काळात या सोहळ्याविषयी कुतुहल वाढत गेलं आणि कधीही न चुकता या सोहळ्याचं फक्त दूरदर्शनवरच थेट प्रसारण पाहण्याचा पायंडा पडला. यातून या संपूर्ण सोहळ्याविषयी अधिकाधिक जाणून घेण्याचा माझा प्रयत्न सुरू झाला आणि त्यासंबंधीची माहिती संकलित करण्यासही सुरुवात झाली. त्यातून प्रजासत्ताक दिन सोहळ्यात होत गेलेले बदल, प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे आयोजन, त्याची तयारी कशी होते या सर्वांविषयीची माहिती मी जमवत गेलो. आज सुमारे 16000 शब्दांच्या त्या माहितीचीमोठी फाईल तयार झालेली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात गेल्या 74 वर्षांमध्ये अनेक बदल होत गेलेले आहेत. त्यापैकी काही बदलांचा उल्लेख इथं करता येईल. प्रजासत्ताक दिनाचं पहिलं संचलन 26 जानेवारी 1950 ला नवी दिल्लीतील नॅशनल स्टेडियममध्ये (सध्याचं मेजर ध्यानचंद स्टेडियम) आयोजित करण्यात आलं होतं. त्यानंतरच्या वर्षांमध्ये ते लाल किल्ला, किंग्ज वे कॅम्प आणि रामलीला मैदान येथे पार पडलं होतं. मात्र 1955 पासून हे संचलन दरवर्षी राज पथावर (आताचा कर्तव्य पथ) आयोजित केलं जात आहे. पुढे काळानुरुप या संचलनात बदल होतच राहिले. सुरुवातीची काही वर्षे संचलनात फक्त तिन्ही लष्करीदलांचाच सहभाग असे. काही वर्षांनंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सूचनेनंतर विविध राज्यांमधील संस्कृती, कला, लोकजीवन इत्यादींची ओळख करून देणारे चित्ररथही संचलनात सहभागी होऊ लागले. राज पथावर संचलन सुरू झालं, तेव्हा ते विजय चौकापासून मेजर ध्यानचंद स्टेडियमपर्यंत जात असे. पण कालांतराने संचलन मार्ग विजय चौक ते लाल किल्ल्यापर्यंत (8 किलोमीटर) विस्तारण्यात आला.

संचलनाचा कालावधी कमी करण्याच्या उद्देशानं 2005 मध्ये त्यात काही बदल करण्यात आले. तेव्हापासून राष्ट्रीय वीरता पुरस्कार मिळालेली मुलं हत्तीऐवजी जीपमधून संचलनात सहभागी होऊ लागली. पहिल्या प्रजासत्ताक दिनापासून एखाद्या देशाच्या नेत्याला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यास सुरुवात झाली असली तरी 2016 मध्ये पहिल्यांदाच प्रमुख अतिथीच्या देशाचं लष्करीपथकही संचलनात सहभागी झालं होतं. त्यावर्षी फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्रपती फ्रान्कवा ओलांद प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी होते. पहिल्यांदाच 2018 मध्ये एकाचवेळी 10 देशांचे नेते प्रमुख अतिथी म्हणून प्रजासत्ताक दिनाला आले होते. त्यावेळी ‘आसियान’ संघटनेतील सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांना निमंत्रित करण्यात आले होते.

संचलनाच्या सुरुवातीला पंतप्रधानांकडून संपूर्ण देशाच्यावतीने अमर जवानांना आदरांजली वाहण्याची प्रथा 1972 पासून सुरू झाली. 2019 पर्यंत हा कार्यक्रम इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती इथं पार पडत असे. 2020 पासून हा कार्यक्रम इंडिया गेटमागे उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय समर स्मारकात आयोजित केला जात आहे. राष्ट्रपती आणि प्रमुख अतिथी 1984 पर्यंत राष्ट्रपती भवनापासून सलामी मंचापर्यंत राष्ट्रपतींच्या खास बग्गीतून येत असत, पण नंतर सुरक्षेच्या कारणामुळे त्या बग्गीची जागा बुलेटप्रुफ मोटारगाडीनं घेतली. त्यानंतरच्या काळात या सहा अश्वांच्या बग्गीचं दर्शन दुर्लभच झालं होतं. यंदाच्या संचलनासाठी राष्ट्रपती आणि प्रमुख अतिथी पुन्हा एकदा त्या खास बग्गीतून येणार आहेत. पण 40 वर्षांनंतर पुन्हा एकदा ही बग्गी संचलन मार्गावर येणार आहे आणि ती उपस्थितांसाठी खास आकर्षणही ठरेल. प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा समारोप समारंभ असलेल्या बीटिंग द रिट्रीटमध्येही काळानुरुप काही बदल घडत गेले आहेत. 2016 पासून त्यामध्ये भूदल, नौदल, हवाईदलाबरोबरच निमलष्करी दलाचं बँडपथकही सहभागी होत आहे.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2024/01/30.html

मांडणीसंस्कृतीइतिहासमुक्तकसमाजप्रकटनविचारलेखअनुभवमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

नठ्यारा's picture

26 Jan 2024 - 8:48 pm | नठ्यारा

तुमच्या परिश्रमांस विनम्र अभिवादन !
-नाठाळ नठ्या

सौन्दर्य's picture

27 Jan 2024 - 4:51 am | सौन्दर्य

उत्तम संकलनासाठी खूप खूप आभार.

चौथा कोनाडा's picture

27 Jan 2024 - 10:33 pm | चौथा कोनाडा

अ ति श य रोचक माहिती !
हे तपशील माहित नव्हते ! इथं संकलित करून दिल्याने सुकर झाले.

आपली जि़ज्ण्यासा आणि संकलन परिश्रमासाठी सलाम !

कर्नलतपस्वी's picture

28 Jan 2024 - 7:24 am | कर्नलतपस्वी

नाॅर्थ ब्लॉकमधील असताना सलग पाच वर्ष परेड खुप जवळुन बघीतली.

छान ,थोडक्यात आढावा इथे सादर केलात. संपूर्ण संकलनाचे एक काॅफी पुस्तक काढा. नक्कीच लोकांना आवडेल. धन्यवाद.

विअर्ड विक्स's picture

29 Jan 2024 - 2:33 pm | विअर्ड विक्स

मी नेहरू प्लेस ला २-३ वर्षे नोकरी केली. २५ जानेवारी ला सक्तीचा हाफ डे मिळायचा सुरक्षा कारणास्तव . प्रत्यक्ष परेड दिल्लीत राहूनही पाहिली नाही . मुंबईस पळायचो सुट्टीसाठी. ऑफिसमधले सांगायचे कि नेहरू प्लेस हुन परेड जायची फार वर्षांपूर्वी

पराग१२२६३'s picture

29 Jan 2024 - 4:19 pm | पराग१२२६३

धन्यवाद सर्वांना.

विवेकपटाईत's picture

2 Feb 2024 - 3:22 pm | विवेकपटाईत

लेख आवडला. ३० वर्षानंतर बग्गीतून राष्ट्रपती आले.याचा अर्थ देश आंतरिक आतंकवाद पासून मुक्त झाला आहे. हा संदेश.

नठ्यारा's picture

3 Feb 2024 - 8:04 pm | नठ्यारा

रोचक निरीक्षणाबद्दल धन्यवाद! :-)
-ना.न.