पुणे रेल्वे स्थानकाला यंदा 165 वर्षे पूर्ण होत आहेत. पुणे स्थानकातून 14 जून 1858 रोजी नियमित रेल्वेवाहतूक सुरू झाली होती. त्यावेळी ही वाहतूक पुणे आणि खंडाळा यादरम्यानच होत होती. त्यानंतर काही महिन्यांमध्येच पुणे आणि दौंडदरम्यानचा लोहमार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. हे दोन्ही मार्ग ब्रॉड गेज होते. 1886 मध्ये घोरपडी आणि कोरेगाव (सातारा) दरम्यानचा मीटर गेज लोहमार्ग सुरू झाला. पुणे स्टेशनच्या सध्याच्या मुख्य इमारतीचे उद्घाटन 27 जुलै 1925 रोजी केले गेले. तोपर्यंत पुणे स्टेशनची कौलारू मुख्य इमारत आटोपशीर होती. स्टेशनमध्ये तीन फलाट होते आणि पहिल्या फलाटावरून दुसऱ्या-तिसऱ्या फलाटावर जाण्यासाठी एक लोखंडी पादचारी पूलही होता. दोन आणि तीन नंबरच्या फलाटावर उतरत्या छपराप्रमाणे शेड करण्यात आली होती. तिचा भाग आजही पाहायला मिळतो. या फलाटांच्या शेजारीच छोटे फलाट केलेले होते, जे अतिविशिष्ट व्यक्तींच्या प्रवासाच्यावेळी वापरले जात असत. गाड्या आणि जादाचे डबे उभे करून ठेवण्यासाठी काही मार्ग त्याचबरोबर मालगाड्यांमध्ये मालाचा चढउतार करण्यासाठी स्वतंत्र मार्ग तीन नंबरच्या फलाटाच्या पलिकडे होते. त्याच बाजूला एक लोको शेडही होती. तरीही त्यावेळी पुणे जंक्शनचा विस्तार मर्यादित होता.
वाढत्या प्रवासी आणि मालवाहतुकीचा पुणे जंक्शनवर उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांवर ताण वाढत चालला होता. त्यामुळे या स्थानकाच्या परिसराची पुनर्रचना करण्याची गरज भासू लागली होती. ती गरज विचारात घेऊन पुणे जंक्शनमध्ये 1925 आमुलाग्र बदल केले गेले. आधीची इमारत पाडून प्रशस्त इमारत बांधली गेली आणि स्थानकाचाही मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला. स्थानकामधल्या फलाटांची संख्या वाढली. 1928-29 पर्यंत मुंबई-पुणे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले. कालांतराने घोरपडीला मोठी डिझेल लोको शेड उभारण्यात आली.
आजही पुणे जंक्शनवर वाहतुकीचा मोठा ताण आहे. जवळजवळ दीडशे प्रवासीगाड्या पुणे जंक्शनमध्ये ये-जा करतात, त्यापैकी काही दैनिक तर काही आठवड्यामधल्या काही दिवशीच धावतात. त्यामध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस, मुंबई-चेन्नई मेल, दख्खनची राणी या ऐतिहासिक गाड्यांचाही समावेश आहे. त्याबरोबर मालगाड्यांचीही पुणे जंक्शनवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. 1971 पर्यंत ब्रॉड गेज आणि मीटर गेज गाड्यांची ये-जा या स्थानकातून होत होती. या स्थानकाच्या विस्ताराला आता मर्यादा आलेल्या आहेत. त्यामुळे आता अन्य ठिकाणी टर्मिनल उभी करून या जंक्शनवरचा भार कमी केला जात आहे.
पुणे जंक्शनच्या 165 वर्षांच्या निमित्ताने मी तयार केलेला व्हिडिओ खालील लिंकवर पाहता येईल.
https://youtu.be/WRCVsP9W2Mc
प्रतिक्रिया
15 Jun 2023 - 2:22 am | शेखरमोघे
पुणे जंक्शनची एकदम जंक्शन माहिती.
पुणे स्थानकाच्या इतिहासातल्या काही काळाबद्दल एका माझ्या आधीच्या पिढीतल्या (आणि वस्त्रोद्योगाशी सम्बन्धित) अस्सल पुणेकर व्यक्तीने दिलेली माहिती:
सगळ्यात शेवटचा फलाट "राजा बहादूर मिल"ला जोडलेला होता आणि मिलची बरीच माणसे पुणे स्टेशनामधून सर्रास ये जा करत असत. त्यामुळे जर कधी विनातिकीट (किन्वा फलाट तिकीट काढल्याशिवाय कुणाला आणण्या/पोचवण्याची कामगिरी) असल्यास, मुख्य द्वारावरच्या तिकीट चेकरला "राजा बहादूर मधून आलो" असे सान्गितल्यावर "बर, जा" असा "हिरवा झेन्डा" मिळवता यायचा.
15 Jun 2023 - 9:44 am | पराग१२२६३
असं पूर्वी कोल्हापूरच्या स्टेशनवर लोक करायचे. पुढे फलाटांची लांबी वाढली, जुने फाटक बंद झाले, स्टेशनच्या भोवतीने संरक्षक भिंती उभ्या राहिल्या आणि त्या वाटाही आता बंद झाल्यात.
15 Jun 2023 - 6:43 am | कर्नलतपस्वी
"राजा बहादूर मधून आलो"
सहमत.
छान वर्णन केले आहे.
15 Jun 2023 - 6:46 am | कर्नलतपस्वी
मस्तच आहे.
15 Jun 2023 - 6:50 am | सर टोबी
हा मानवाकडून निर्मिलेला एक सुंदर अविष्कार आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. रेल्वे मार्ग तयार करण्याच्या निमित्ताने निसर्गाचे एरव्ही न दिसणारे पैलू आपल्याला दिसतात. रेल्वे फारसं प्रदूषण न करता एखादं खेळणं इकडे तिकडे फिरावं तसं डोंगर दऱ्यांतून फिरत असते. अशा रेल्वेची छोट्या गावातली टुमदार स्टेशनं बघणं आणि जमल्यास तिथे निवांत एखाद्या गाडीची वाट पाहत थांबणं हा देखील खूप आल्हाददायक अनुभव असतो.
पुणे मुंबई रेल्वे मार्ग हा असा अनुभव पुरेपूर देत असे. अगदी दोन दशकापूर्वी पर्यंत पुणे मुंबई दरम्यान शनिवार, रविवार आणि इतर मोठ्या सुट्यांच्या दरम्यान हॉलिडे स्पेशल ट्रेन धावत असे. हि ट्रेन मुंबईला संध्याकाळी जाताना खूप सुंदर अनुभव देत असे. एकदा का चिंचवड सोडले कि घोरावाडी, कान्हे, कामशेत अशी सुंदर स्टेशनं, मैलों मैल दिसणारी शेतं, थंड हवा आणि कामशेत जवळ दिसणारी नदी हे अनुभवणं म्हणजे सुख होतं.
पलीकडे कर्जत यायच्या अगोदर पळसदरी आणि नंतर वांगणी, शेलू, नेरळ अशी सुंदर ठिकाणं.
नुसत्या पुणे स्टेशनचा विचार केला तरी भव्य आणि निवांत पोर्च आणि खानदानी वाटावं असा फलाट क्रमांक एक चा रुबाब. दररोज स्वच्छ धुतलेली डेक्कन क्वीन येथे रुबाबात यायची आणि ७:१५ च्या ठोक्याला मुंबईला प्रयाण करायची. तिकडे बोरीबंदर स्टेशनला पोहोचल्या पोहोचल्या परत तिची सफाई केली जायची.
आज यातलं काहीही शिल्लक नाही. स्टेशनच्या परिसरात खाण्यापिण्याच्या स्टॉल्सची गर्दी, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी संख्या, बकालपणा आणि संपूर्ण पुणे मुंबई पर्यंत बांधकामांची गर्दी. त्यामुळे निदान पुणे मुंबई तरी रेल्वेने प्रवास करू नये या मताचा मी झालोय.
23 Jun 2023 - 7:53 am | इपित्तर इतिहासकार
वाठार स्टेशन, पुणे कोल्हापूर मार्ग (पूर्वाश्रमीचा मद्रास अँड सदर्न मराठा मार्ग) ब्रिटिशकालीन आहे इमारत. हे स्टेशन अजय देवगणच्या राजकुमार संतोषी निर्मित "द लेजंड ऑफ भगतसिंग" सिनेमात लाहौर स्टेशन म्हणुन वापरले होते शूटिंगला असेही ऐकले होते (संदर्भ - साँडर्स हत्येनंतर भगत, राजगुरू, पंडितजी वगैरे मंडळी लाहोर सोडून गायब होत असतात वेषांतर करून तो सीन)
15 Jun 2023 - 8:02 am | कंजूस
लोकसंख्येच्या रेट्यापुढे परिसर पार दबून गेला आहे.
15 Jun 2023 - 8:58 am | PIYUSHPUNE
उत्तम माहितीपूर्ण लेख पण पुणे रेल्वे स्टेशन म्हणजे अत्यंत असुविधापूर्ण स्टेशन वाटते. ना सर्व फलाटांसाठी लिफ्ट आहे ना दोन्ही दिशांसाठी सरकते जिने.
जागेची कमतरता असेल तर लिफ्ट वा सरकते जिने जमिनीखाली देखील बांधू शकतात पण वाटत नाही अजून बरीच वर्षे तरी काही सुधारणा वा चांगले बदल होतील.
15 Jun 2023 - 9:47 am | धर्मराजमुटके
छान लेख !
अवांतर : पुणे, कल्याण, ठाणे, मुंबई सेंट्रल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स यावर मिळून एक तुलनात्मक लेख लिहावा ही विनंती.
उदा. कोणते स्टेशन किती साली बनले, सध्याची क्षमता (रोज किती गाड्या, किती प्रवासी वाहतूक वगैरे).
23 Jun 2023 - 7:57 am | इपित्तर इतिहासकार
एक भारी आयडी होता, मी फॉलो करायला विसरलो.
मुंबईतील सगळ्या उपनगरीय स्टेशन वर थांबून प्रत्येक स्टेशनचा इतिहास सांगत असे तो गडी ३० सेकंदाच्या रील मध्ये.
माटुंगा - मातांगवन - पिलखाना (हत्तींचा तबेला)
इत्यादी इत्यादी.
23 Jun 2023 - 8:02 am | इपित्तर इतिहासकार
नावाचे एक next level Railfan आहेत त्यांनी ब्रिफ हिस्टरी ऑफ इंडियन रेल्वे का काहीसे नाव असणारे पुस्तक लिहिले आहे एक.
त्यात एक मजेशीर माहिती आहे...
एकदा बोरीबंदर ते ठाणे लाडीस ट्रॉली ढकलत जाणाऱ्या एका हमालावर एका पट्टेरी वाघाने (होय होय मुंबईतच) भांडुप जवळ हल्ला करून त्याला जखमी केले , सुदैवाने तो वाचला पण त्यामुळे कामगारांत भीतीचे वातावरण पसरले, अश्यावेळी ह्या वाघाचा बंदोबस्त करण्याचे ठरले व जागोजागी असलेल्या नामी शिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले पण शेवटी मुंबईत राहणाऱ्याच एका स्थानिक अँग्लो इंडियन माणसाने त्या वाघाचा मागोवा काढून माहीम स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक जवळ त्याला ठार केले होते (म्हणे).
23 Jun 2023 - 9:13 am | सर टोबी
टुमदार, निवांत स्टेशनचा विषय निघाला कि हमखास पुलंचा याच विषयावरील लेख आठवतो. प्रवाशांच्या “गाडी केव्हा येणार" अशा प्रश्नाला अमकी तमकी अप किंवा डाऊन गाडी गेल्यावर येईल अशा अगम्य भाषेत उत्तर देणारे स्टेशन मास्तर किंवा “अनसूये पोराला कुंची घालावी कि न्हाई” असा काही तरी सल्ला देणारे पोर्टर असं काहीसं त्या लेखातलं आठवतं.
रेल्वेचे जुन्या काळचे फर्स्ट क्लासचे डबे हा माझ्या दृष्टीने हळहळ वाटणारा विषय. संपूर्ण डब्यामध्ये जेमतेम सोळा जणांसाठीच असणारे हे डबे म्हणजे आरामदायक प्रवासाची एक अनुभूती असायची.
25 Jun 2023 - 8:27 am | इपित्तर इतिहासकार
लोकांत इमानदारी शिल्लक असण्याचा तो काळ होता. आता एका डब्यात १६ ठेवले तर किमती अफाट कराव्या लागतील नाहीतर रेल्वे तरी भिकेला लागेल.
तसेही तिकिटावर आजकाल रेल्वे छापतेच की
"IR recovers only 53% of it's operational costs"
असे काहीसे.
बाकी, रेल्वे सोबत कैक काव्यात्मक गोष्टी लिंक झालेल्या आहेत. उदाहरणार्थ हिमाचल मधील सोलन जिल्ह्यात पडणारे बरोग (बडोग) स्टेशन अन् टनेल.
ह्या स्टेशनचे नाव पडले आहे ते वरील बोगदा ज्यांच्या नावावर आहे त्याच रेल्वेत इंजिनिअर म्हणून असलेल्या कर्नल बारोग ह्यांच्या नावे. सुरुवातीला बारोग् ह्यांना हा बोगदा तयार करण्याचे काम मिळाले होते पण काही गणिती micalculation मुळे त्या बोगद्याचे पूर्ण अलाईनमेन्ट हुकले. त्याचे त्यांना इतके वैषम्य वाटले की त्यांनी तिथेच साईट वर आत्महत्या केली. पुढे दुसरे इंजिनियर लावून रेल्वेने बोगदा पूर्ण करून घेतलाच.....पण कर्तव्यात कसूर झाल्यामुळे पार प्राण देणाऱ्या बरोग साहेबांचे नाव स्टेशन अन् बोगद्याला देण्यात आले.
25 Jun 2023 - 12:07 pm | Trump
मीही ते वाचले आहे. एकाद्या प्रवाश्याला पुर्ण किंमत द्यायची असेल तर ती कशी देता येईल ?
25 Jun 2023 - 2:02 pm | इपित्तर इतिहासकार
पण गॅस सबसिडी नाकारण्या साठी जशी सिस्टीम आहे IVRS बेस्ड तसे काही रेल्वेत अंतर्भूत असल्याचे ऐकिवात नाही माझ्या तरी.
मुळात रेल्वे हे माध्यम (फक्त भारतात नाही तर जगभरात) माल सामान ने आण करण्यासाठी बांधणे प्राथमिकता होती. प्रवासी वाहणे हे एका प्रकारे सी.एस. आरच असते रेल्वे ऑपरेशन मध्ये. त्यात भारतात अर्थव्यवस्था मोठी असली तरीही दरडोई उत्पन्न कमी आहे (लोकसंख्येमुळे)... त्यामुळे आंतरराज्यीय किंवा महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात एक ते दुसऱ्या टोकापर्यंत जाणे ह्याला रेल्वे सोयीस्कर पडते, कारण जनतेला ती परवडते.
ह्यात वृद्ध, कॅन्सर पेशंट, युवक, विद्यार्थी, प्रावीण्यप्राप्त खेळाडू वगैरेंना सवलती असतात. तुम्ही सोडतो म्हणले तरी सबसिडी सोडण्याचे तंत्र काही माहिती नाही अन् सोडले तरी एकंदरीत खास काही फरक पडेल असेही नाही.
मुळात रेल्वे ऑपरेशन मध्ये खेळ आहे तो Axel Load चा पूर्ण, ब्रिटिशांनी भारतात ब्रॉड गेज का लावली ह्याचे एकमात्र उत्तर आहे वाढीव Axel Load आणि पर्यायाने जास्त साधन संपत्ती माल इत्यादी वाहून नेण्याची क्षमता = भारताची लूट.
25 Jun 2023 - 3:19 pm | गवि
अशाच अर्थाचे वेगवेगळे पूर्वीपासून रेल्वेत लिहिलेले असते. मला वाटते की बर्थच्या साईडला किंवा कोणत्या तरी पट्टीवर अधिक स्पष्ट लिहिलेले असे. आणि त्याचा सारांश असा की तुम्हाला रेल्वे प्रवास टाळणे किंवा अन्य (महागड्या) मार्गाने करणे शक्य असेल तर तसे करा आणि रेल्वे प्रवासरुपी सवलत अधिक गरजू व्यक्तींना घेऊ द्या.
चुभूद्याघ्या..
27 Jun 2023 - 11:37 am | Trump
श्री गवि, मला तरी तुमचा तर्क पटला नाही.
माझा मते, सदर संदेश हा मुख्यत: समाजकंटकाना उद्देशुन असावा. कोणत्याही आंदोलनात सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला (रेल्वे इ.) प्रथम लक्ष केले जाते. तसेच चोरीचे, विनातिकिट प्रवासाचे प्रमाण भरपुर आहे. तश्या लोकांच्या आंतरआत्माला साद घालली असावी.
-
जे लोक पुर्ण भाडे देऊ शकतात त्यांना ती सुविधा रेल्वेने द्यायला हवी. भारतीय रेल्वेचे प्रवासी भाडे खुपच कमी आहे.
27 Jun 2023 - 12:01 pm | गवि
ते तर असेलच. मान्यच आहे. तोही एक वेगळा संदेश असेलच.
मी जो संदेश ढोबळ मानाने उल्लेखिला तो रेल्वेत खूप पूर्वी कुठेतरी बघितल्याचे मला स्पष्ट आठवत आहे. पण मजकूर नेमका आठवत नाही. त्यात तर्काला जागाच ठेवली नव्हती. रेल्वे सर्वांनाच प्रवास सवलतीत देते, आणि तोटा सहन करून देते, त्यामुळे (तुम्ही privileged असाल तर) गरजूंना तो फायदा मिळू द्या. अशा अर्थाचे.
गेल्या अनेक वर्षांत रेल्वे प्रवास न घडल्याने आताही हे सर्व लेटेस्ट अस्तित्वात असेल असे सांगता येत नाही.
27 Jun 2023 - 12:57 pm | इपित्तर इतिहासकार
पण मुळात प्रवासी वाहतूक हा रेल्वे रेव्हेन्यूचा मुख्य स्त्रोत नाही, तो माल वाहतूक आहे, प्रवासी वाहतूक एक लोकप्रिय समाजतुष्टी उपाय आहे एका अर्थाने रेल्वेचे स्वतःचे सी.एस.आर....
27 Jun 2023 - 1:02 pm | Trump
तसे असते तर वंदे भारत, तेजस, राजधानी, वातानुकुलित डबे, आणि इतर सुविधांची गरजच नव्हती. ज्यांना परवडते असे लोक दुर सारण्यासाठी दर्जा खालवणे पुरेसे आहे.
27 Jun 2023 - 1:22 pm | इपित्तर इतिहासकार
तुम्ही म्हणता आहात ते पण पटण्यासारखे आहे....
28 Jun 2023 - 2:45 pm | Trump
29 Jun 2023 - 1:18 pm | इपित्तर इतिहासकार
ह्यावरून कुतूहल चाळवल्यामुळे मुंबई कलकत्ता लाईन (आमची लाईन) कधी सुरू झाली ह्याचे टप्पे बघत सुटलो. काही उत्तरे मिळाली काही कनफ्युजन मिळाले.
स्टेशन / लाईन स्थापना
१८५३ - बोरीबंदर ते ठाणे
१८५४ - कल्याण पर्यंत
१८६२ - नाशिक रोड (कदाचित घाट सेक्शन मुळे बांधकामास वेळ लागला असावा)
१८६५ - भुसावळ
१८६७ - आमचे अकोला / बडनेरा (अमरावती) आणि नागपूर स्टेशन.
पुढे मुंबई - नागपूर मार्गे - हावडा सेवा १९११ मध्ये सुरू झालेले पण उल्लेख आहेत
हा सिकवेंस बरोबर वाटतो आहे , पण गोंधळ उडतो ते जळगाव वाचून, जळगाव स्टेशन स्थापनेची तारीख १८६० दाखवतो आहे...
पुढची मागची स्थानके राहता मध्येच जळगाव कसे झाले असेल ?
शक्यता दोन
१. ते वर्ष चुकीचे नमूद केले आहे
२. तत्कालीन परिस्थितीत प्रत्येक स्थानक बांधायचे कंत्राट वेगवेगळ्या कंत्राटदार माणसे/ कंपनीने पूर्ण करण्यास दिली गेली असतील ज्याच्यात जळगाव स्थानकाचे काम मिळालेल्या ठेकेदाराने ते काम चोख मुदतीत बांधून मोकळा झाला असेल ? तोवर बाकी स्थानके झालीच नसतील..
म्हणूनच जळगाव स्टेशन "बांधल्याची" तारीख १८६० असली तरी रेल्वे सेवा सुरू होण्याची तारीख वेगळी असू शकेल ना ?
रच्याकने - आमचे अकोला हे भारताच्या टॉप १०० सर्वाधिक महसूल गोळा करणाऱ्या रेल्वे स्टेशन्स पैकी एक आहे. आता फक्त अकोला ते खंडवा गेज conversion झाले की दक्षिणेतून उत्तरेत जाताना जी महत्वाच्या रेल्वे जंक्शनची माळ (मनमाड, दौंड,भुसावळ, नागपूर, काही अंशी बडनेरा (नरखेड लाईनमुळे))आहे त्यात अकोला पण जोडले जाईल आणि त्या योगे व्यापार उदिम नक्कीच वाढेल.
1 Jul 2023 - 9:52 am | सुबोध खरे
भारतीय रेल्वे हि जगात सर्वात स्वस्त म्हणून गणली जाते. एक किमी ला ३६ पैसे इतका कमी दर कुठेच नाही.
याचे कारण आपली समाजवादी मनोवृत्ती. सरकारने सर्व गोष्टी फुकट किंवा स्वस्तात द्यायला हव्या हि वृत्ती गेल्या ७५ वर्षात निर्मिली आणि पोसली गेली.
यामुळे उत्तम सरकारी सेवेसाठी पैसे मोजण्याची लोकांची मानसिकताच नाही.
मुलांच्या शाळेसाठी आणि क्लाससाठी अक्षरशः लक्षावधी रुपये मोजणारे कनिष्ठ आणि मध्यमवर्गीय लोक गॅस पेट्रोल वीजदर आणि रेल्वेचे भाडे मात्र १९७५ चेच हवे यासाठी आग्रह धरताना दिसतात. माझं पगार दरवरही वाढलाच पाहिजे याशिवाय दिवाळीला बोनस मिळालाच पाहिजे या हक्कासाठी भांडणारा कर्मचारी वर्ग मात्र कोणत्याही सरकारी सेवेसाठी पैसे देण्यास अत्यन्त नाखूष असतो.
हि विलक्षण दुटप्पी मानसिकता पोसली गेली आहे.
रेल्वे ची थोडीशी जरी भाडेवाढ झाली कि विरोधी पक्ष गरीब, मागासलेल्या, तळागाळातील लोकांविरुद्ध प्रचंड अन्याय झाल्याचे ढोल ताशे वाजवू लागतात.
रेल्वेमध्ये तुम्हाला दर्जेदार सेवा हवी असली तर आपल्याला वाजवी दर मोजावे लागतील हे मात्र कुणीच लक्षात घेत नाहीत.
मालवाहतुकीवर लावलेला कर हा होणाऱ्या महागाईमुळे अप्रत्यक्षपणे आपल्यालाच भरावा लागणार आहे याकडे कुणाचे लक्षच नाही.
आईचे प्रेम आणि बापाचा पैसा सोडला तर जगात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही
1 Jul 2023 - 10:00 am | इपित्तर इतिहासकार
रेल्वे ऑपरेशन हे बहुतेक मालवाहतूकीवरच जास्त अवलंबून असते. हल्लीच रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव ह्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार भारतीय रेल्वेने रेकॉर्ड ब्रेक (काही अब्ज मेट्रिक टन) माल एका वर्षात वाहून नेला आहे.
पुढे जाऊन ते हे पण म्हणतात का मालवाहतूक अंतर्गत होणारा नफा हा प्रवासी वाहतुकीत किफायतशीर प्रवास मिळावा म्हणून आम्ही खर्च करतो त्याला क्रॉस सबसिडायजेशन म्हणतात.
बाकी संततीच्या शिक्षणाचा खर्च अन् त्याची तुलना गॅस/ वीज इत्यादींशी करणे थोडे अतिरंजित वाटले. असो.
1 Jul 2023 - 10:30 am | कर्नलतपस्वी
प्रवाशांनी दिले तर क्राॅस सबसीडायझेशन व वाढीव प्रवाशांकडून कमाई रेल्वे सुखसोयी वाढवण्यात मदतच होईल. छत्तीस पैसे प्र कि मी म्हणजे काहीच नाही . मला वाटते एका सिगारेटचा एका वेळचा खर्च दहा रूपये पेक्षा जास्त असेल. (मी सिगारेट पित नाही म्हणून या विषयावर सामान्यज्ञान कमी आहे).
वादविवाद करण्यासाठी पुष्कळ मुद्दे काढता येतील परंतू खरे साहेबांचे म्हणणे बरोबर आहे. दरवाढ व्हायला हवी.
1 Jul 2023 - 10:43 am | इपित्तर इतिहासकार
वादविवाद करण्यासाठी पुष्कळ मुद्दे काढता येतील
अर्थातच, पण मुद्दे काढायचे म्हणून काढले तर हे लागू होईल. जेन्युईन प्रश्न पडले अन् ते ओपन फोरम वर विचारले तर फक्त ते "काढायचे म्हणून काढेलेले मुद्दे" म्हणून कमी लेखणे ही पण एक पळवाट असेलच नाही का ?
परंतू खरे साहेबांचे म्हणणे बरोबर आहे. दरवाढ व्हायला हवी.
तुम्हाला तसे वाटणे तुमचा हक्क, मला न वाटणे माझा. समाजवाद, ७५ वर्षे वगैरे मुद्दे कितीही valid असले तर सर्वकालीन सार्वत्रिक विश्लेषण अंत करणारे होऊ शकत नाहीत.
भरपूर फॅक्टर, variables, इश्युज असतात जे रियल टाईम मध्ये घडत असतात, आता उठसूठ तेच ते ब्लेम करत बसलो आपण तर पोचणार कुठेच नाही.
असो.
1 Jul 2023 - 2:28 pm | धर्मराजमुटके
संपूर्ण भारतीये रेल्वेचे माहित नाही पण मुंबई लोकल तोट्यात आहे असे वाटत नाही. १०० माणसांच्या जागी ४०० लोक जातात. फुकटे प्रवाशी ४ रुपयाऐवजी १०० रुपये देतात. कशी काय रेल्वे तोट्यात आहे ?
1 Jul 2023 - 3:53 pm | इपित्तर इतिहासकार
मुंबई लोकलचा मर्यादित अनुभव आहे, त्यामुळे तुम्ही नेमक काय म्हणता आहात ते जरा स्पष्ट केले तर बरे होईल.
1 Jul 2023 - 6:44 pm | धर्मराजमुटके
दोन स्टेशनमधील कमीतकमी तिकिट ५ रुपये आहे. विनातिकीट पकडले की २५५ रुपये द्यावे लागतात.
पश्चिम रेल्वेचे दंडपत्रक येथे पहा.
मागील वर्षी मुंबई मध्य रेल्वे मंडळाने १०० कोटींचा दंड वसूल केला. ही बातमी.
1 Jul 2023 - 7:28 pm | इपित्तर इतिहासकार
तुम्ही रेल्वे तोट्यात नाही असे म्हणता आहात का ?
1 Jul 2023 - 7:41 pm | धर्मराजमुटके
तुम्ही रेल्वे तोट्यात नाही असे म्हणता आहात का ?
नाही.
पण तुम्ही फक्त दंडाचा मुद्दा वेगळा करुन पाहताय. एका डब्यात किती प्रवाशी प्रवास करतात ते पण पहायला हवे.
आणि मी फक्त मुंबई लोकल एवढया छोट्या भागाबद्दल बोलतोय. प्रवासी भाडे चारपट (चारपट केवळ उदाहरणार्थ) वाढवले की रेल्वे फायद्यात जाईल हा केवळ कल्पनाविलास आहे. विमानप्रवासाची काहीच्या काही भाडी वाढून देखील अनेक विमान कंपन्या फायद्यात नाही हे वास्तव आहे.
2 Jul 2023 - 7:40 am | इपित्तर इतिहासकार
मी तुमच्याशी सहमत आहे.
1 Jul 2023 - 7:54 pm | सुबोध खरे
प्रवासी भाडे चारपट (चारपट केवळ उदाहरणार्थ) वाढवले की रेल्वे फायद्यात जाईल हा केवळ कल्पनाविलास आहे.
चार पट भाडे वाढवणे नव्हे परंतु महागाईशी समतल असे काही असते कि नाही?
गेल्या दहा वर्षात आपला पगार किती वाढला आणि त्या मानाने रेल्वेचे भाडे किती वाढले याचा कुठेतरी ताळमेळ असावा कि नाही?
रेल्वेच्या पायाभूत सुविधा युरोप सारख्या २०२५ च्या हव्यात परंतु भाडे मात्र १९७५ चे हवे हे कसे चालेल?
डिझेलची भाववाढ झाली त्याच्या १० % सुद्धा रेल्वेचे भाडे वाढले का?
रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना सातव वेतन आयोग लागू झाला त्याला लागणारा पैसा येणार कुठून?
मालवाहतुकीचे भाडे अवाच्या सवा वाढवले कि ग्राहक रस्त्याच्या वाहतुकीकडे वळतो हे अनेक वेळेस सिद्ध झालेले आहे. त्यामुळे उलट होणारा महसूल कमी होतो.
मग हि क्रॉस सबसिडी आणायची कुठून?
आयकर वाढवून, जी एस टी वाढवून कि पेट्रोल डिझेलवर कर वाढवून?
2 Jul 2023 - 7:41 am | इपित्तर इतिहासकार
मला वाटते
इकॉनॉमी ऑफ शकेल पाहता मायक्रो अन् मॅक्रो ह्यांची तुलना होऊ शकणार नाही राव.
1 Jul 2023 - 9:00 pm | धर्मराजमुटके
रेल्वे तोट्यात आहे, रेल्वेचे भाडे मुळातूनच कमी आहे ही तुमची विधाने मुळातूनच मान्य आहे. रेल्वे आपापल्या परीने काही ना काही भाडेवाढ करतच असते मात्र ती पुरेशी नाही व सध्याच्या महागाई दराशी विसंगत आहे इथपर्यंतचे तुमचे सगळेच म्हणणे योग्य आहे. मात्र प्रवासी रेल्वेचे तिकीटात वाढ केली तर रेल्वे फायद्यात येईल हे गृहितक चुकीचे आहे. त्यामुळेच वर विमान कंपन्यांंचे उदाहरण दिले आहे.
मुंबई शहराचे उदाहरण घेऊ. लोकलची गर्दी टाळण्यासाठी पुर्वी अंधेरी / बीकेसी ला जाणारी अनेक पैसेवाली मंडळी दहिसर चेक नाका, मुलुंड चेक नाका येथून रिक्षा किंवा टॅक्सीने जात. एकाच भागात जाणारी मंडळी रिक्षा किंवा टॅक्सीचे भाडे वाटून घेत. आज मुंबईत मेट्रो आली, सिटीफ्लो सारखी बस सेवा आली जिचे ठाणे ते अंधेरी एकल भाडे १२५ ते १३० रुपये आहे. जी मंडळी पहिले स्वतःची चारचाकी घेऊन जात किंवा चेक नाक्यांवरून रिक्षा किंवा टॅक्सीने जात असत तीच मंडळी आज मेट्रो, सिटीफ्लो बस यांच्यासारख्या वाहनांने प्रवास करत आहेत.
मेट्रो चे घाटकोपर ते अंधेरी ३० रुपये आहे.
बेस्ट चे घाटकोपर ते अंधेरी तिकिट १० ते १५ रुपयाच्या आसपास आहे.
ठाणे ते अंधेरी (दादर मार्गे) लोकल टिकीट १५ रुपये आहे.
प्रत्येक स्टेशनपासून पुढे गंतव्य स्थानी जाण्यासाठी पुढील खर्च आहेच.
ज्याचा पगार चांगला आहे त्याला अनेक पर्याय आहे. शिवाय "टाईम इज मनी" असे ज्याच्या बाबतीत आहे त्याला महागडे पर्याय परवडतात मात्र ज्याचा पगार १५-२० हजार आहे त्याला हे सगळे पर्याय परवडत नाहीत. आजही ५-१० रुपये वाचविण्यासाठी रेल्वे स्टेशन पासून २-३ किमी अंतरावर घर असलेली आणि चालत जाणारी मंडळी खूप आहेत.
बस आणि रेल्वेचे स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत म्हणूनच सामान्य माणूस मोठया शहरात टिकून आहे. पगाराचा मोठा हिस्सा जर भाड्यात खर्च होणार असेल तर ते त्याला परवडत नाही. शहरात ८-१०-१२-१५-२०-२५ हजाराच्या दरम्यान पगार मिळणार्या अनेक व्यक्ती आहेत. प्रत्येकाला ५० हजाराची नोकरी मिळणे शक्य नाही. वर नमूद केलेल्या व्यक्तीला वर्षातून एकदा गावी जायचे तरी अर्धा एक पगार बाजूला काढावा लागतो किंवा तात्पुरते कर्ज घ्यावे लागते अशी परिस्थिती आहे. ह्या वर्गाचा पगार वर्षाकाठी ५००-१००० पेक्षा जास्त वाढत नाही. आपण मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय चष्म्यातून त्यांच्याकडे पाहिले तर आपल्याला त्याचे नीट आकलन होणे शक्य नाही.
हे सगळे बाजूला ठेवले तरी रेल्वेची मुळ समस्या वेगळीच आहे. मुंबई लोकल मधे एका डब्यातून १०० च्या ऐवजी २०० व्यक्ती प्रवास करतात. केवळ मुंबई महामंड्ळ वेगळे काढून त्याचे हिशेब तपासले तर ते कदाचित फायद्यात दिसेल. मात्र पुर्ण भारताचा विचार केला तर रेल्वे तोट्यातच दिसणार आहे. रेताड मातीत कितीही पाणी ओतले तरी ते वाहूनच जाते त्याप्रमाणे रेल्वेच्या एखाद्या विभागाने कितीही फायदा कमवू द्या, इतर विभागांमुळे एकंदर तोटाच दिसणार. जसे महाराष्ट्र देशास जास्त संपत्ती कमवून देतो पण ही संपत्ती बिमारु राज्यांच्या जास्त कामी येते तसेच काहिसे. विभागवार रेल्वेचे विकेंद्रीकरण केले तर काही भागात फायदा दिसू शकेल.
रेल्वेने उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधावेत, स्वतःचे खर्च कमी करावेत, नवीन संकल्पनांवर काम करुन उत्पन्न वाढवावे (नियमित आणि थोडी थोडी तिकिटवाढ समर्थनीय आहेच). पाच वर्षांनी एकदम भाडे न वाढविता दर वर्षी थोडे थोडे वाढविले तर ते एकदम जास्त देखील वाटणार नाही.
अगोदरील काळापेक्षा आता खचितच नवीन उत्पन्नाचे मार्ग तयार झाले आहेत. जाहिरातींद्वारे मिळणारे उत्पन्न, फलाटावरील स्टॉल्सद्वारे मिळणारे उत्पन्न असे विविध मार्ग चोखाळले तर तोटा कमी करण्यात यश येईल. नफा होईल याची खात्री नाहीच.
एक सामान्य मुंबईकर म्हणून मला युरोप सारखी विमानतळे किंवा रेल्वे स्थानके नसली तरी चालेल. स्पेशल एसी लोकल सोडण्यापेक्षा पहिल्या दर्जाचे डबे काढून प्रत्येक लोकलला दोन-चार एसी डबे जोडता येतील काय याची चाचणी करुन पाहावी. (सकाळी चालण्यार्या एसी लोकलमुळे मुंबईत अनेक वाद विवाद झाले होते)
सकाळी कार्यालयीन वेळेत लोकल मधे दोन पायांवर उभे राहता यावे, रेल्वे वेळेवर याव्यात आणि रेल्वे प्रवासात हुतात्मा / शहीद न होता घरी येता यावे एवढ्याच किरकोळ अपेक्षा आहेत (ज्या ह्या जन्मात पुर्ण होतील ही शक्यता वाटत नाही).
अर्थात रेल्वे खाते हे अजस्त्र धूड असल्यामुळे आपण इथे बसवून सहजतेने कळफलक बडवतो तितके ते काम त्यांच्यासाठी सोपे नाही याची जाणिव आहेच.
असो. सगळ्या रेल्वे प्रतिसाद रामायणाचे सार म्हणजे प्रवासी तिकिट भाडेवाढ म्हणजे मोक्ष मिळण्याची खात्री नव्हे.
2 Jul 2023 - 7:46 am | इपित्तर इतिहासकार
रेल्वेने ह्या दिशेने काम कधीचे सुरू केले आहे, स्टेशन रीडेव्हलपमेंट, पार्किंग लॉट ऑपरेशन, कमर्शियल स्पेस लीज करणे इत्यादी सुरुवात होती, आता रेल्वेची जागा लिज करून उत्पन्न सुरू करण्याचे बेस्ट उदाहरण म्हणजे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर लांब पल्ल्यांच्या गाड्या जात तिथे लॉबी मध्ये नमः पोड्स नावाचे पॉड हॉटेल सुरू झाले आहे. सेम मुंबई सेंट्रल मध्ये पण.
एकदा काही कामानिमित्त मंत्रालयात यायचे होते आणि सोबोची हॉटेल परवडणारी नव्हती म्हणून पॉडचा पर्याय घेतला होता, उत्तम, स्वच्छ अन् किफायतशीर सेवा होती, रिसेप्शन वरचा पोरगा म्हणाला होता की प्रचंड हिट आहे ही सुविधा.