"हरी ओsssम" असे मोठ्या आवाजात म्हणत रवी बाबाने चिलीम धरलेली हातांची जुडी कपाळाला लावली आणि डावीकडे बसलेल्या राजाराम बुवाने पेटवून धरलेल्या माचीसच्या दोन काड्यांजवळ तिचे टोक आणून सर केली. गांजाचा एक दमदार झुरका मारून तोंडातून धुराचे लोट सोडत चिलीम शेजारी बसलेल्या रज्जुभैय्याच्या पुढ्यात धरली.
"चल चली को चाम ले...साई बाबा का नाम ले" असा घोष करून रज्जुभैय्याने जोरकस दम मारून चिलीम बाजूच्या सागर संजयक्षीर कडे पास केली.
सर्वज्ञानी सागरने आधी तोंडावरचा N95 मास्क काढला. मग खिशातून 80% अल्कोहोल असलेल्या सॅनीटायझरची बाटली काढून दोन्ही हातांचे निर्जंतुकीकरण केले.
सॅनीटायझरची बाटली पुन्हा खिशात ठेऊन रज्जुभैय्याने देऊ केलेली चिलीम घेण्यासाठी हात पुढे करेपर्यंत एवढा कालावधी उलटला होता की तोपर्यंत चिलीम पुढच्या विकुशाने तोंडाने अस्पष्ट काहीतरी पुटपुटत दम मारल्यावर, त्याच्या पुढच्या राजाराम बुवाकडे जाऊन त्याने "जय भोलेनाथ...कर सभीका भला" असे म्हणून झुरका मारून झाल्यावर पुन्हा रवी बाबाच्या हाती पोचली देखील होती.
एकतर सागर एकदम विज्ञाननिष्ठ माणूस. देव धर्म अशा कल्पनांवर त्याचा काडीचाही विश्वास नाही. त्यात इथे मैफलीत एकटा विकुशा झुरका मारताना काय बोलला ते ऐकू नाही आले पण बाकीचांच्या तोंडातून बाहेर पडणारी देवांची नावे ऐकून त्याला अंगावर पाल पडल्यासारखे वाटत होते. त्यात चिलमीचा पहिला राउंड हुकल्याने त्याच्या अंगाचा तिळपापड झाला.
"अरे एवढी कसली घाई या लोकांना? कोरोनाच्या संकटकाळात माणसाला साधे हात निर्जंतुक करायलाही थोडा वेळ देत नाहीत म्हणजे काय? शेवटी काल वगैरे भ्रम आहे इतकी साधी गोष्टही कशी माहिती नाही या अडाण्यांना?" अशा अनेक प्रश्नांचे काहूर त्याच्या मेंदूत माजले आणि तो फार अस्वस्थ झाला. पण त्वरित मैफलीचा त्याग करून तिथून निघून जाण्याचा विचार मात्र त्याच्या मनाला शिवला देखील नाही.
कसा शिवणार म्हणा! लॉकडाऊनचा पहिलाच महिना होता. मायबाप सरकारने दारूची दुकाने बंद ठेवली होती. सतत कुठल्या तरी किकच्या शोधात असलेल्या सागरला ती किक कुठेच मिळायला तयार नव्हती. घरातला सगळा मद्यसाठा संपून पंधरा दिवस उलटले होते. काल वगैरे भ्रम आहे यावर त्याचा अढळ विश्वास असला तरी तो अशा गोष्टींची नोंद ठेवत होता.
पुढे काही दिवस त्याने काळ्या बाजारातून सात-आठ दारूच्या बाटल्या खरेदी केल्या पण त्यासाठी मोजावी लागणारी किंमत त्याला अस्वस्थ करीत होती. तसा तो गेल्या सहा वर्षांपासूनच अस्वस्थ होता, पण सर्वज्ञानी सागरला हि अस्वस्थता पळवून लावण्याचा रामबाण उपाय माहितीच होता. जी एस टी, नोटाबंदी केल्याबद्दल सरकारला एक भकाराने सुरु होणारी शिवी हासडली की त्याचे मन काल वगैरे भ्रम असला तरीही काही काळासाठी शांत होत असे. त्याच्यासाठी हा एक हुकमी इलाज सिध्द झाला होता. त्या जोडीला "वडापाव" नावाच्या संकेत स्थळावर हजेरी लाऊन समीक्षकाच्या थाटात इतरांच्या कथा, शशक, कविता, लेखांवर तिरकस, टीकात्मक प्रतिसाद देणे आणि आपल्या पाशी असलेल्या अगाध ज्ञानाच्या जोरावर अचाट-अफाट असे लेख लिहिणेही चालू होते, त्यात त्याला एक वेगळीच किक अनुभवायला मिळत होती.
असो, तर परवा घरात जमा झालेल्या रिकाम्या दारूच्या बाटल्यांच्या ढीगाकडे हताशपणे पहात असताना विज्ञाननिष्ठ सागरला न्युटनच्या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आठवून
एक झकास कल्पना सुचली.
त्याने सगळ्या बाटल्या भिंतीला टेकवून उलट्या करून ठेवल्या. गुरुत्वाकर्षणाने बाटल्यांमध्ये तळाशी राहिलेल्या दारूचे थेंब खाली येऊन बुचांमध्ये जमा होत होते.
ते मनोहारी दृश्य पाहून तो आपल्या बुद्धिमत्तेवर भलताच खुश झाला व त्या आनंद आणि उन्मादाच्या भरात त्याने "युरेका...युरेका" अशी विज्ञाननिष्ठ आरोळी ठोकली.
एकूण तेवीस बाटल्यांच्या बुचात गोळा झालेली दारू मग सागरने मेजरिंग ग्लास मधे जमा करून मोजली तेव्हा ती एकशे अडोतीस मी.ली. भरली. आणखीन बेचाळीस मी.ली. जमा झाली असती तर निदान एक क्वार्टर तरी झाली असती असा हिशोबी विचार मनात आल्याने तो आधी हिरमुसला. पण आजचा दिवस तर निघाला अशा विचाराने थोडा सुखावला.
हे झाले परवाचे. कालचा दिवस रिकामा गेला होता, त्यात 'वडापाव' वर लिहिलेल्या त्याच्या लेखावर विरोधी विचारांच्या अज्ञानी-अडाणी अशा लोकांनी टीकेचा वर्षाव करणारे प्रतिसाद दिले होते. त्यांच्या प्रश्नांना-कुशंकांना उत्तरे देणे टाळून त्याने विषयाला बगल देण्याचे बरेच प्रयत्न करून झाले होते. पण ती मूर्ख-अडाणी लोकं काही समजून म्हणून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्या चर्चेतूनही दोन दिवस झाले पण काही किक मिळत नव्हती.
त्या मूर्ख-अडाणी लोकांचा उद्धार करत तो तिरीमिरीत पायात चपला अडकवून घराबाहेर पडला. बिल्डींगच्या बाहेरच त्याला त्याचा समविचारी मित्र विकुशा भेटला. तोही थोडा भांजाळलेलाच वाटत होता.
दोघांची तक्रार किक मिळत नसल्या बद्दलच होती. विकुशाने शहराबाहेरच्या तळ्याकाठी असलेल्या रवी बाबाच्या मठात गेलो तर तिथे गांजा फुकायला मिळेल अशी कल्पना मांडली.
एरवी मंदिर-मठ वगैरेंच्या जवळही न फिरकणाऱ्या सागरने गांजाची का असेना पण किक मिळेल म्हणून लगेच ती कल्पना मान्य केल्याने ते दोघे या मैफलीत सामील झाले होते.
"चिलम के इलम पता नही क्या तुम्हे?" या रज्जुभैयाच्या प्रश्नाने चिलमीचा पहिला राउंड हुकल्याने मनोमन संतापलेला सागर भानावर आला.
"जी नही, पेह्लीबर आया हु मैफिलमे!" असे उत्तर सर्वज्ञानी सागरने दिल्यावर मग रज्जुभैयाने पुढे तीन चिलमी संपेपर्यंत 'चिलम के इलम' या विषयावर त्याचा क्लास घेतला.
त्यानंतर तिथे पुनर्जन्म या विषयावर काथ्याकुट चालू झाले. एव्हाना सागर आणि विकुशाची ब्रम्हानंदी टाळी लागली होती. काळ हा भ्रम मानणाऱ्या सागरला नाही पण विकुशाला वेळेचे भान आले. मग दोघांनी उठून नाईलाजाने बाकीच्या तिघांना नमस्कार केला आणि तिथून सटकले.
त्या रात्री सागर सॉलिड ट्रान्स मधे गेला होता. त्याला कसले कसले भास होत होते. कसल्या कसल्या आठवणी येत होत्या. कधी तो नदीत होडी वल्हवत होता तर कधी राजदरबारी नर्तिका म्हणून स्त्री रुपात नाचत होता. कधी माळावर मेंढ्या चरायला घेऊन गेलेले दिवस आठवत होते तर कधी आपण मासा आहोत आणि समुद्रात पोहत आहेत असे वाटत होते.
दुपारी उशिरा उठल्यावर त्याने पहिले विकुशाला फोन लाऊन हा प्रकार सांगितला. त्यावर "तू पहिल्यांदाच गांजा फुक्लास म्हणून तुला भास झाले" असे सांगून आज संध्याकाळी पण जायचे का मैफिलीला हे विचारले.
विज्ञाननिष्ठ सागरला कालच्या भास-आठवणी या प्रकारांचा छडा लावायची तीव्र इच्छा होती म्हणून त्याने लगेच होकार दिला आणि संध्याकाळी पुन्हा दोघे मठात गेले.
आजपण कालच्यासारख्या चार चिलमी पिऊन जोडगोळी परतली.
सागरला पुन्हा काल रात्री सारखेच भास होऊ लागले आणि आठवणी येऊ लागल्या. आपण स्पेनचे फुटबॉलपटू असून पेनल्टी किक मारून आपल्याला सामना जिंकायचा आहे अशा काही आठवणीत त्याने बॉलवर मन एकाग्र करून एक सणसणीत लाथ झाडली. कुशीवर झोपलेल्या सागरने झाडलेली लाथ पलंगाला लागून असलेल्या भिंतीला लागली. पायाची बोटे जोरात भिंतीवर आपटून झालेल्या वेदनांनी किंचाळत तो पलंगावर उठून बसला.
दुखत्या पायाला औषधपाणी करून पुन्हा आडवा झाला. या प्रकारांमागचा कार्यकारणभाव समजून घेण्यासाठी त्याच्या मेंदूत जोरदार विचारचक्र सुरु झाले.
रात्रभर आढ्याकडे बघत दुखरा पाय कुरवाळत कुरवाळत विचार करत असताना पहाटेच्या सुमारास त्याला एक साक्षात्कार झाला. परवा रात्री मैफलीत झालेल्या पुनर्जन्मा वरच्या चर्चेतून आपल्या डोक्यात हा किडा आला आणि आपल्याला हे भास-आठवणी येऊ लागल्या.
असा साक्षात्कार झाल्या झाल्या दुखणे बिखाने सगळे विसरून उत्साहाच्या भरात तो उठला आणि कॉम्पुटर चालू करून कळफलक बडवायला घेतला.
"पुनर्जन्म वगैरे सब झुठ आहे!
ती लोकांना दिलासा द्यायला शोधलेली फक्त कल्पना आहे
जेंव्हा आपण एखाद्याचा पुनर्जन्म झाला असे म्हणतो तेंव्हा नक्की काय झालेलं असतं ?
तर एका जीवंत माणसाला दुसऱ्या मृत व्यक्तीचा भूतकाळ स्मरत असतो. पुनर्जन्म वगैरे यापेक्षा वेगळे काही नाही.
या स्मृती जीवंत व्यक्तीच्या मेंदूखेरीज कुठेही नसतात.
मग हा प्रकार कशामुळे होतो ?
तर माणूस मेल्यावर देहासवेत त्याचा मेंदू पण फुल्ली फॉरमॅट होतो, थोडक्यात सर्व स्मृती, कौशल्य, विव्दत्ता सर्व काही शून्य होते.
पण या प्रोसेसमधे काही वेळा चुकून, स्मृतीच्या काही स्ट्रिंग्ज फॉरमॅट न होता अंतराळात रिलीज होतात.
या स्ट्रींग्ज नवजात अभ्रकाच्या मेंदूत डायरेक्ट कॉपी-पेस्ट होतात. त्याला तो डेटा सक्रीय झाला की मृत व्यक्तीच्या जीवनपटाचा काही भाग दिसायला लागतो आणि लोकं म्हणताय पुनर्जन्म झाला !!!
त्यामुळे पुनर्जन्म वगैरे काही नसून, ती डिस्क फॉरमॅटींगमधे नकळतपाने झालेली चूक आहे"
'वडापाव' वर हा सिद्धांत मांडून झाल्तावर सागरच्या मनाला असे काही अलौकिक समाधान मिळाले होते की विचारू नका! पण हायरे किस्मत!!
पुन्हा या सिद्धांतावर तिथले मूर्ख-अडाणी लोकं तुटून पडले. सिद्ध करून दाखवा आणि अजून काय काय प्रतिसाद खरडत राहिले. मला एक काळात नाही की मी एवढा विज्ञाननिष्ठ, सर्वज्ञानी असताना हि लोकं माझ्या सांगण्यावर विश्वास का नाही ठेवत? माझ्याकडे पुरावे वगैरे मागण्याची यांची हिम्मत तरी कशी होते? मला झालेला साक्षात्कार खोटा ठरवायला निघालेत काय?
ते काही नाही आज पुन्हा संध्याकाळी विकुशाला घेऊन मठात जातोच आणि चांगल्या पाच-सहा चिलमी फुकतो आणि रात्री-पाहटे पुन्हा साक्षात्कार झाला की माझा मुद्दा सिध्द करून दाखवतोच या अडाण्यांना... पुरावे मागतात काय माझ्याकडे? निर्बुध्ह लेकाचे.
क्रमशः
----------
टीप: सर्व पात्रे आणि नावे काल्पनिक आहेत. त्यांचा कुठल्याही जिवंत अथवा मृत अथवा पुनर्जन्म झालेल्या व्यक्तींशी संबंध नाही. तरी संबंध अथवा साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
विशेष सूचना- सदर लेखन वाचून खरोखरीच कोणाच्या डोक्याला शॉट लागल्यास लेखकाचा उत्तरदायित्वास नकार लागू :P
प्रतिक्रिया
18 Jun 2020 - 6:52 pm | गड्डा झब्बू
नवगुरू आचार्य "विज्ञाननिष्ठ" यांचे चरणी अर्पण :-))
जय गुरुदेव!
18 Jun 2020 - 9:42 pm | आनन्दा
अकु झाले, आता हे!
तुम्हाला पण दत्तात्रेयांसारखे २४ गुरू मिळोत आणि आम्हाला त्यांची विचित्र चित्रे वाचायला मिळोत अशी दत्तात्रेयचरणी प्रार्थना!
19 Jun 2020 - 11:43 am | अथांग आकाश
+१०१
18 Jun 2020 - 9:03 pm | अर्धवटराव
हेच एक बघायचं, म्हणजे वाचायचं राहिलं होतं
=))
18 Jun 2020 - 9:15 pm | शा वि कु
Whatever floats your boat
18 Jun 2020 - 9:20 pm | संगणकनंद
बाबा विज्ञाननिष्ठ यांनी अंतराळात सोडलेलया स्मृती स्ट्रिंग्ज तुमच्या मेंदूत शिरतील
18 Jun 2020 - 9:39 pm | आनन्दा
गुद्दा झब्बु,
तुमची गुद्दे घातलेली व्यक्ती(वि)चित्रणे मला जाम म्हणजे जामच आवडतात..
18 Jun 2020 - 10:16 pm | यश राज
व्यक्ती(?)चित्रण जमलेय ...
हायला क्रमश: आहेच का अजुन..
18 Jun 2020 - 11:00 pm | अत्रुप्त आत्मा
जाऊ दे हो.. मनो रुग्ण (आजारी) माणूस आहे.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अर्थात तुम्ही दूर -लक्ष केलेलेच आहे म्हणा! =))
19 Jun 2020 - 11:25 am | अथांग आकाश
वांझोट्या चर्चांनी भरलेला बोर्ड पाहून बेजार झालेल्या शेकडो-हजारो सामान्य मिपा वाचकांना विरंगुळा देणारे लेखन.
वामा मोड सोडून प्रतिसाद देण्यासाठी Log in करायला भाग पाडलंत राव!
You said it, Man!!
19 Jun 2020 - 6:32 pm | विजुभाऊ
आमच्या मेमरी स्ट्रिंग पिळल्या गेल्या
आणि त्यावरच्या जळल्याच्या खुणाही फॉर्मॅट झाल्या
19 Jun 2020 - 7:27 pm | संगणकनंद
काळजी करु नका. ते अंतराळात निसटलेल्या स्मृती स्ट्रींग्ज पकडून तुमच्या मेंदूत भरतील (अ)वैज्ञानिक प्रयोग करुन. बरं तुम्हाला कसल्या स्मृती स्ट्रींग्ज? क्लासिक की एआय एनेबल्ड? विथ हार्ड डीस्क की विथ एसेसडी?
23 Jun 2020 - 2:12 am | कोहंसोहं१०
हाहाहा..मस्त लिहिलंय...पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत :)