बनपाव की करवंट्या.......?

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
23 Jul 2019 - 6:27 pm

(पुरुषोत्तम बोरकर, तुम्ही 'परकारातील मल्ल' या तुमच्या आगामी पुस्तकात काय लिहिले असते, त्याची मी कल्पनाही करू शकत नाही. पण तुम्ही गेलात आणि विचारवंतांचे एक छद्मरूप डोळ्यांसमोर तरळून गेले. श्रद्धांजली.)

बनपाव की करवंट्या.......?

त्यांचा ‘भूमिका’ या शब्दावर जीव. अतोनात. मग ती घ्यायची असो, करायची असो वा वठवायची असो.

पण ते पडले पुरुष, बाईच्या भूमिकेची त्यांना दांडगी हौस. बरं, आता भूमिका घ्यायला, वठवायला किंवा करायला बायका आहेत हे सांगूनही त्यांना पटत नसे. भूमिकेचा प्रसंग आला रे आला की ते बनपाव वापरत. मेकअपमन सांगे, ‘करवंटी वापरा.’ तर ते म्हणत, ‘तिला वजन नसते. भूमिका म्हणजे वजन पाहिजे. मला बनपावच पाहिजे.’
ते विचारवंत आहेत, हे माहित असल्याने मेकअपमन बोलणे थांबवी आणि त्यांना बनपाव देई.

एवढ्या मोठ्या देशात काहीना काही हरघडी घडतेच. तसे त्या ही दिवशी घडले. विचारवंत असल्याने त्यांना मत मांडणे गरजेचे होते, मत नुसते मत असून चालत नाही. मताला भूमिकेचे चक्कर पाहिजे.

रात्री उशिरा पर्यंत काम करून निजलेल्या मेकअपमनला उठवले. त्याने कसेबसे बेकरीवाल्याला उठवले. बेकरीवाल्याने पहाटेपर्यंत काम करून दुपारी झोपलेल्या पोऱ्याला उठवले. पोऱ्याने डोळे चोळत कोपऱ्यात पडलेले दोन बनपाव बेकरीमालकापुढे आदळले आणि पुन्हा घुर्रर करू लागला.

तर हे बनपाव योग्य त्या ठिकाणी ठेवून तमक्या विषयक भूमिका मांडण्यासाठी ते पुढे सरसावले. तोंड उघडणार, इतक्यात जिथून भूमिका येणार होती, तिथे बारीक काहीतरी चावले. त्यांचे लक्ष विचलित झाले. लक्ष गेले आणि दुसरा चावा जाणवला. ते आणखी अस्वस्थ झाले. चुळबुळ सुरु झाली. भूमिकेत काय चावायला लागलं कळेचना त्यांना. पण काहीही चावलं तरी भूमिका कायम पाहिजे, असा त्यांचा अट्टहास. आपल्या या विचारावर ते ठाम होणार, इतक्यात आणखी एक कचकावून चावा....!! बरं, समोर त्यांची भूमिका ऐकायला इतकी माणसं बसलेली, हात काय बनपावाकडे नेता येईना. आपली भूमिका तपासून बघता येईना. काय करावं उमजेना. तेवढ्यात एकदम चहूकडून कचाकचा चाव्यांचा वर्षाव झाला... आणि ते ताडकन खुर्चीतून उठले. उजवीकडे जावं की डावीकडे, काय त्यांना कळेचना. पण भूमिका उराशी घेऊन बसले होते, त्यामुळे आता काहीतरी करणे भाग होते. समोर बसलेल्या लोकांना, (लोकच ते!) त्यांना म्हणाले, ‘मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. पण तब्येत अचानक बिघडली आहे, जाऊन येतो.’ लोकच ते! गप्प बसले.

ते बाहेर आले. आपल्या भूमिका का चावा घेतायत कळेना त्यांना!! पटकन दरवाजा लावून घेतला, आणि कपडे काढून बनपाव पाहिले.... बघतात तर काय... लाललाल मुंग्याच मुंग्या. बरं, एक मुंगी एका मताची नाही. सगळ्या वेगळ्या, सगळ्या खंगऱ्या. तशात, एका मुंगीला एक मत नाही!! आत्ता हे, तर मग ते... अशी मतं. त्यामुळे चावे डब्बल कडकडून. त्यांनी बनपाव दूर ठेवून दिले आणि भूमिकेचे मुख्यस्थान स्वत:च्याच बनियनने झटकून घेतले.
चिडले होते, पण विचारवंत असल्याने दिसू दिले नाही. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून मेकअपमनला फोन केला. त्याने बेकरीमालकाला फोन केला. बेकरीमालकाने पोऱ्याला बोलवले. पोरगं अर्ध्या झोपेत होतं. ‘बनपावला मुंग्या कशा लागल्या?’ तर म्हणाला, ‘शिळे पाव मुंग्यांना आवडतेत, त्याला मी काय करू?’ तो परत लुडकला.

विचारवंताना हे उत्तर फॉरवर्ड झाले. विचारवंत असल्याने त्यांनी त्यावर पटकन प्रतिक्रिया दिली नाही. गंभीर ‘हंम्म’ केलं आणि फोन ठेवून दिला. पण भूमिकेशिवाय आपल्याला आयडेंटीटी नाही. मग काय करावं? त्यांना एकदम लाईटवेट करवंट्याची आठवण आली. त्यांनी लगेच मेकअपमनला फोन लावला......

-शिवकन्या

धोरणमांडणीवावरसंस्कृतीवाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानप्रकटनविचारप्रतिभा

प्रतिक्रिया

तुम्ही असं पण लिहिता वाटतं!!
आवडले हेवेसानल

शिव कन्या's picture

23 Jul 2019 - 10:49 pm | शिव कन्या

हातात कळफलक आला की तो 'असा'ही चालवता आला पाहिजे....
नाहीतर इथे विडंबनासाठी कच्चा माल म्हणून नुसत्याच कविता लावण्यात काय अर्थेय?? :)))

योगी९००'s picture

23 Jul 2019 - 8:40 pm | योगी९००

आवडलं...

तेजस आठवले's picture

23 Jul 2019 - 8:57 pm | तेजस आठवले

जबरदस्त पोटेन्शिअल आहे हो तुमच्यात.भारीच लिहिलंय.

चांदणे संदीप's picture

23 Jul 2019 - 8:59 pm | चांदणे संदीप

असो, बनपावातल्या मुंग्यांनी आपली भूमिका वठवली आणि ती मला आवडल्या गेली.

Sandy

ही श्टोरी अगोदर वाचलेली पण या फारम्याटात नव्हती.
भूमिका वठतीय पण चावतीय.
जशी प्रतिभा तुम्हाला कोणत्या व्रताने पावली ते व्रत सांगा सर्वांना. श्रावण जवळच आलाय. (तसा मारवाडी श्रावण सुरू झालाय पौर्णिमेलाच.)

शिव कन्या's picture

23 Jul 2019 - 10:46 pm | शिव कन्या

होय,ही आधी मी माझ्या फेसबुक वाॕलवर टाकली होती.
फाॕरमॕट कथेचाच होता.
बदल नाही.

डोळे उघडे ठेवणे, हेच व्रत. :))

महासंग्राम's picture

24 Jul 2019 - 10:57 am | महासंग्राम

भारीच बाकी पुरषोत्तम बोरकरांची कुणाला तरी आठवण आहे हे सहीच म्हणायला हवं

टर्मीनेटर's picture

24 Jul 2019 - 11:18 am | टर्मीनेटर

एक मुंगी एका मताची नाही. सगळ्या वेगळ्या, सगळ्या खंगऱ्या. तशात, एका मुंगीला एक मत नाही!! आत्ता हे, तर मग ते... अशी मतं.

पण वाचताना मात्र वेगळाच अनुभव आला ह्या मुंग्यांचा, काय चमत्कार झाला माहित नाही पण सगळ्यांचे अचानक एकमत होऊन त्यांनी कडकडून न चावता, गुदगुल्या करून हसवले :-)
छान लिहिलंय, आवडले!

नाखु's picture

24 Jul 2019 - 11:49 am | नाखु

कशाचे विडंबन आहे??

बाकी डोक्याला मुंग्या येतात हे माहित होते पण डोकेबाज मुंग्या आवडल्या!!

मुंगी होऊन साखर खाणारा वाचकांची पत्रेवाला नाखु