आपला शूर दुचाकीस्वार अभिवंदन याच्या पराक्रमावर, आमचे परम मित्र आणि गुरु काकासाहेब खोपोलीकर यांनी लिहिलेले १४(बहुतेक, जास्तकमी झाल्यास जबाबदार नाही) ओळींचे खंडकाव्य!
(हे लिहिण्यास काकासाहेबांना अडिच दिवस लागले. तस्मात् वाचकांनी एक दिवस तरी काढून संपूर्ण खंडकाव्य, प्रस्तावनेसह वाचावे व फोनबुकमधील कुठल्याही मोबाईल नंबरवर आपला अभिप्राय कळवावा ही विनंती!)
खंडकाव्य: अभिवंदन, अभिवंदन!
वीस जून २०१८ रोजी आपला शूर दुचाकीस्वार अभिवंदन सोलापूरकर, पुणे देशातून पिंपरी चिंचवडास परतला. त्या संपूर्ण घटनेने आमच्या मनात दु:ख, अभिमान, चिंता, क्रोध, आनंद, दुचाकीस्वारीप्रेम यांचे आवर्त आलटून पालटून उमटत राहिले.
सोलापूरच्या या वीरपुत्राने ट्राफिकमधील कित्येक अत्याधुनिक आणि सर्वश्रेष्ठ अशा दुचाकीस्वारांना, आपल्या अत्यंत निम्नतर आणि कालबाह्य दुचाकीवर बसून, केवळ असामान्य शौर्य, पराकोटीचे चालककौशल्य, प्रखर पत्नीप्रेम आणि अफाट धैर्य यांच्या जोरावर, जिवाची पर्वा न करता मागे पाडले.
स्वतःची दुचाकी आपद्ग्रस्त झाल्यानंतर, भरभांभुर्डेसिग्नली उडी घेऊन, परिणामांची पर्वा न करता, दुचाकीच्या पीयुसी आणि आरसीसारख्या गोपनीय गोष्टी शत्रूच्या हाती लागू दिल्या नाहीत. पकडला गेल्यानंतर, शत्रूने मशीन घेउन येईपर्यंत कित्येक चौकश्यानंतरसुद्धा हा स्थितप्रज्ञ वीर, मेरुपर्वतासारखा अविचल राहिला.
आपल्या लोकलनेतृत्वानेसुद्धा, असामान्य मुत्सद्देगिरीचे प्रदर्शन करीत, सोलापूरच्या या महान स्वाराला केवळ अडीच तासातच शत्रूच्या तावडीतून सोडवून आणले.
या सा-या घटना, प्रचंड आणि अविश्वसनीय वेगाने, एखाद्या चित्रपटासारख्या उलगडत गेल्या. या चार तासांच्या कालावधीत, सारा पुण्यप्रांत भावनांच्या कल्लोळात न्हाऊन निघाला. या शौर्यगाथेचा शेवट, सुदैवाने आनंदमय आणि समाधानकारक झाला. परंतु या घटनेने असंख्य प्रश्न आमच्या मनात उभे राहिले!
आपण असे किती वीर, किती वर्षे डावावर लावणार आहोत? इतिहासातून आपण काही शिकणार आहोत का?
७० वर्षे आपण वाहतुकीच्या गैरसोयींशी लढलो, असे आपण अभिमानाने सांगतो. पण खरेच, प्रत्येक जण लढला? की काही मूठभर अभिमानीच फक्त लढले ? आणि बरेचसे एकतर घरात बसून राहिले किंवा फितुर होऊन रिक्षा अथवा बससारख्या तत्सम शत्रूंना मदत करत राहिले?
या सा-या दुचाकीस्वारांचे अनैक्य, लाचखोरी, उदासीनता अशा दुर्गुणांचे पर्यावसन ट्राफिकच्या चिंधड्या उडण्यात झाले. जुन्या वाहतुकीच्या यातना नवीन पिढ्यांना माहितही नसतील. एक तृतीयांश रस्ता बीआरटीच्या नावाखाली मुख्य रस्त्यापासून कापला गेला. कायमचा!!
किती चालक आयुष्यातून उठवले गेले? किती अबलांना मारलेल्या कटाचे शिकार व्हावे लागले? कितींचे ग्रामपरिवर्तन केले गेले, दवाखान्यात दाखल केले गेले वा मूळ ग्रामी रिटायर होउन निघून गेले- त्याची आहे काही मोजदाद? आहे आपल्याला त्याचे काही दु:ख?
हे, आणि असे अनंत प्रश्न मनात थैमान घालू लागले. आणि मग, त्या विचार मंथनातून जन्म झाला या सा-या घटनाक्रमावर एक प्रदीर्घ खंडकाव्य लिहिण्याच्या संकल्पाचा!!
खंडकाव्य ही संकल्पना आज फार मागे पडली आहे. मराठीमध्ये शेवटचे खंडकाव्य कुणी लिहिले असे कुणी विचारले तर त्याचे उत्तर फक्त चितळेबंधू असेच असणार. त्यांच्या श्रीखंडामध्ये चारोळी, बदाम, पिस्ते, इलायची असा सुकामेवा वापरला जातो
आम्ही काही मोठे वृत्तांचे जाणकार नाही. तरीही केवळ लक्ष्याच्या आवडीमुळे आणि स्वखाजेसाठी, विविध वृत्तांत हे काव्य लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. वृत्तांचे नांवे, काने, मात्रा आणि इतर नियम पाळण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. तरीही काही जागांवर एखादा लघु गुरु किंवा महागुरु यांचा विपर्यास झाला आहे.
जे नियम पाळले गेलेत त्याचे श्रेय मानकर ड्रायव्हिंग स्कूलच्या, आदरणीय मानकर मॅडम आणि आदरणीय पासलकर मॅडम यांचे आहे.दोन्ही मॅडमनी त्यांच्या नवर्यांना इतका जाच दिला की ते सतत घर सोडून आमचे ड्रायव्हिंगचे लेसन्स घेत राहिले आणि आम्हाला अमर्याद मदत केली.
आणि जेथे ट्राफिक नियमांचा विपर्यास आहे त्याचे खापर मात्र आमच्या डोक्यावर फोडले गेले पाहिजे.(आम्ही दुसरे एखादे मोठे खापर आणून तुमच्या डोस्क्यावर फोडू, हाकानाका) जाणकारांना त्या चुका दुरुस्त करण्यासाठी सहकार्य करण्याची आम्ही विनंती करतो.
खंडकाव्य: अभिवंदन, अभिवंदन!
छंद: फडाचा
( चाल: गाडी आणावी बुरख्याची, बुरख्याची दोन चाकी॥)
गाडी आणावी होंडाची, होंडाची दोन चाकी.
छान नवी असावी गाडी
संग सिएटची टायर जोडी
अॅक्सिलेटर नुस्ता पिळू गं....
ए.....स्वीटहार्ट्या........
गाडी आणावी होंडाची, होंडाची दोन चाकी.
.
वृत्त: पृथ्वीचेच विषुव
(चाल: आला बाबुराव आता आला बाबुराव)
निलख झालं, गुरव झालं आता कोणतं गाव
निलख झालं, गुरव झालं आता कोणतं गाव
आला अभिराव आता आला अभिराव.
जवा जोशातही गाडीवरी बसला
चांगला चांगला रायडर त्याच्यापुढं फसला.
गाडीपुढं काढू आता साह्यबांचं नाव....
आला अभिराव आता आला अभिराव. एमेच १२
काय ठेवलया त्या बुलेट आणि यामात
जातोया पैका पेट्रोल आणि ग्यारेजकामात
झेपनां त्या गाड्या आता बायबॅकला लाव
आला अभिराव आता आला अभिराव. एमेच १३
निलख झालं, गुरव झालं आता कोणतं गाव
निलख झालं, गुरव झालं आता कोणतं गाव
आला अभिराव आता आला अभिराव. एमेच १४
.
वृत्त : आता मात्र कर्क
(चाल: चांदण चांदण आली रात)
.
पिववववळ्या सिग्नलने केला घात
आता हिरव्याची पाहात होतो वाट
.
ट्राफिकचा पोलीस बोलवा गं
समोरचा फॉर्चुनर हटवा गं
साईडनी कॅबांची वाहतेय लाट
आता हिरव्याची पाहात होते वाट
.
म्यापातले लोकेशन खोला गं
हळूच सिरीला थोडं बोला गं.
व्हाटसपचे मेसेज झालेत साठ
आता हिरव्याची पाहात होते वाट
पिववववळ्या सिग्नलने केला घात
आता हिरव्याची पाहात होतो वाट
.
वृत्तः अमिताभ रेखावृत्त
(चाल : कल्लुळाचं पानी कशाला ढवळिलं, नागाच्या पिलाला तु का गं खवळिलं)
.
पांढर्याखाकीतल्या मामाने प्रश्न विचारला मला,
आणि प्रष्नाचे उत्तर सांगतो तुम्हा पुणेकरांना
डोक्युमेंटस असे म्हणत्यात त्या सगळ्या पुराव्यांना
डोक्युमेंटस असे म्हणत्यात त्या सगळ्या पुराव्यांना
.
येवढ्युशा गाडीला तू कसलं पळविलं
लोकलच्या गुंठ्यांना तू का गं जळविलं.
.
साडेतीनशं सीसीच्या धुडं ती, न हलणारी बुडं ती, पिकपपायी ट्राफिकमधीच फसती.
सांंगवी गेलं, औन्ध गेलं आली कस्पटे वस्ती, कधी येणार शिवार, रोजची कटकट नुस्ती
येवढ्युशा गाडीला तू कसलं पळविलं
लोकलच्या गुंठ्यांना तू का गं जळविलं.
.
- काकासाहेब खोपोलीकर आणि संतोष जुवेकर(बिचार्याची तब्येत आणि आवाज लै युनिक आहे, येऊदे त्याचेही नाव)
मोबाईल तेवढा देणार हुतो पण आता जाऊच द्या.
20 June 2019
Pune 27
(Copy नसलेला right: Santosh Juvekar)
.
(आता महत्वाचं.
आमचे वैमानिक, त्यांची विमानं, त्यांची देशभक्ती, त्यांची मर्दानगी, आमचं सरकार, आमचे नेते, त्यांचीपण देशभक्ती, त्यांचीपण मर्दानगी ह्याचा आम्हाला लै म्हणजे लैच अभिमान आहे. हे विडंबन पेर्णेच्या प्रयत्नाचे अर्थात लेखनाचे आहे, मूळ घटनेचे किंवा संबधित व्यक्तींचे नाहीये ह्याची सर्वच सुजाण, सुविद्य, देशभक्त, निडर, भक्त, गुलाम, स्वयंसेवक, लोकसेवक, स्वयंप्रेरकांनी स्पेशल नोंद घ्यावी ही लम्र इणंती.)
प्रतिक्रिया
20 May 2019 - 5:08 pm | चौथा कोनाडा
ठार मेलो ........
आरा रर्र्र्र्र्र्र्र्र रा .... !
अभ्या.. शेठ __/\__ दण्डवत घ्यावा !
20 May 2019 - 5:22 pm | नि३सोलपुरकर
" लोकलच्या गुंठ्यांना तू का गं जळविलं." - आरा रर्र्र्र्र्र्र्र्र रा .... ! खतरनाक
अभिराव एमेच १३ _/\_
20 May 2019 - 6:05 pm | टर्मीनेटर
विनंतीस मान देऊन फोनबुकमधील अभ्या..नावाने साठवलेल्या मोबाईल नंबरवर अभिप्राय कळवला आहे :)
खंडकाव्य (विडंबन) जाम भारी! lol
पेर्णा लवकरच वाचण्यात येईल!
20 May 2019 - 6:23 pm | आनन्दा
20 May 2019 - 6:25 pm | आनन्दा
20 May 2019 - 6:29 pm | तुषार काळभोर
कुठून येते हो एवढी स्फूर्ती, प्रतिभा, उत्साह,
आणि
.
.
.
वेळ?
20 May 2019 - 6:32 pm | mrcoolguynice
या महाकाव्याबद्दल आपणांस, स्टॉकमधील
एखादे शिल्लक असलेले
भारतरत्न (भारत हौ सो गणेशोत्स्तव मंडळ यांच्यातर्फे),
आणि हिलाले अभीआज (छोटा पीर दर्गा कागदीपुरा के जानिबसे )
मिळण्यात यावे.. अशी अपेक्षा.
(बाकी काव्य मस्त १+..हे वे सां न ल )
20 May 2019 - 7:55 pm | अत्रुप्त आत्मा
=))
20 May 2019 - 8:04 pm | उगा काहितरीच
हायला ! जब्राट की !!
20 May 2019 - 8:48 pm | नाखु
जबराट आवडला आहे.
अशीच काव्यप्रतिभा उजळत राहो हीच.
कासारवाडी म्हसोबा आणि सांगवीच्या देवीला प्रार्थना.
पिंपरी-चिंचवड निगडित नाखु पांढरपेशा
20 May 2019 - 11:16 pm | भंकस बाबा
एकदम भारी
20 May 2019 - 11:18 pm | जालिम लोशन
माशी हाकला, माशी हाकला!
21 May 2019 - 6:15 am | प्रचेतस
आरारारारारा.
कं लिवलंय..कं लिवलंय =))
21 May 2019 - 7:46 am | सोन्या बागलाणकर
बाबौ!
लय म्हणजे लयच भारी!
अवधूत म्हणतो तसं "तोडलंस मित्रा"!
21 May 2019 - 8:19 am | नंदन
प्रणिपात __/\__!
21 May 2019 - 8:28 am | यशोधरा
=))
21 May 2019 - 2:56 pm | खिलजि
जबराव जबराव जबराव
खत्तर्नाक खत्तर्नाक लिवलाव
खुश खुश आम्ही झालाव
अभिनंदन अभिवंदन आम्ही करताव
जबराव जबराव जबराव ...
ओळखा पाहू मिपाकरांनो , कुठल्या वृत्ताची ***हीण येक केलीय त्ये
21 May 2019 - 3:34 pm | लई भारी
भारी जमलय!
22 May 2019 - 4:20 pm | मंदार कात्रे
क ह र
22 May 2019 - 4:43 pm | गड्डा झब्बू
प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट कि असाच काही तरी म्हणतात. तो अनुभव आला. वरीजनल तो वरीजनल विडंबन बाप रे बाप :-))
22 May 2019 - 5:15 pm | जव्हेरगंज
बऱ्याच दिवसांनी असा high standard दर्जा वाचायला मिळाला!!
लगे रहो!!!!
=))))
23 May 2019 - 7:25 am | प्राची अश्विनी
जब्बर गब्बर!!!
दंडवत_/\_
27 May 2019 - 2:00 pm | अभ्या..
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे खूप खूप आभार.