युगांतर आरंभ अंताचा! भाग १७
निपुत्रिक कुंतीभोजला शुरसेनाची दत्तक मिळालेली कन्या एक वरदानच होतं. तिच्या साऱ्या इच्छा पुर्ण करत, संस्कारांचे बाळकडूही तिला त्याने दिले होते. कुंती भोज राजाची लाडकी कन्या म्हणून त्याच्याच नावावरून सगळे तिला कुंती म्हणू लागले. राजमहालात खेळत बागडत ती मोठी होऊ लागली.
एके दिवशी राजा कुंतीभोज चिंतेत बसलेले तिने पाहिले.
"काय झालं पिताश्री?"
"काही नाही, कुंती. अगं दुर्वासा ऋषींकरता एक सेवक पाठवयचा आहे."
"का?"
"ते तपश्चर्येला बसणार आहेत."
"मग त्यात काय चिंताकारक आहे? पाठवून द्या."
"त्यांनी तुझ्या करता विचारले आहे."
"मी जाईन की मग."