युगांतर आरंभ अंताचा! भाग १७

मृणालिनी's picture
मृणालिनी in जनातलं, मनातलं
1 Aug 2019 - 4:42 pm

निपुत्रिक कुंतीभोजला शुरसेनाची दत्तक मिळालेली कन्या एक वरदानच होतं. तिच्या साऱ्या इच्छा पुर्ण करत, संस्कारांचे बाळकडूही तिला त्याने दिले होते. कुंती भोज राजाची लाडकी कन्या म्हणून त्याच्याच नावावरून सगळे तिला कुंती म्हणू लागले. राजमहालात खेळत बागडत ती मोठी होऊ लागली.
एके दिवशी राजा कुंतीभोज चिंतेत बसलेले तिने पाहिले.
"काय झालं पिताश्री?"
"काही नाही, कुंती. अगं दुर्वासा ऋषींकरता एक सेवक पाठवयचा आहे."
"का?"
"ते तपश्चर्येला बसणार आहेत."
"मग त्यात काय चिंताकारक आहे? पाठवून द्या."
"त्यांनी तुझ्या करता विचारले आहे."
"मी जाईन की मग."
"खरचं जाशील? त्यांच्या कुटीत? सेवक म्हणून?"
"हो." अगदी सहज म्हणल्या सारखी कुंती म्हणाली.
इतरांकडून सेवा करून घेणाऱ्या राजकन्येला कुटीत जाऊन ऋषींची सेवा करायला लावणं राजाच्या जिवावर आलं होतं. पण तो शब्द देऊन बसला होता.
कुंतीला राजाने कुटीत रवाना केले.
दुर्वासा ऋषी तपश्चर्येला बसले. कुंतीने त्यांची मनोभावे सेवा केली. कुटी साफ करणे, रोज देवपुजेसाठी फुले तोडून आणणे, जलाशयातून शितल पाणी भरून आणणे वगैरे वगैरे... असे बघितले असते तर कोणालाही आश्चर्य वाटले असते की ही राजकन्या आहे. तपश्चर्या संपवून दुर्वासा ऋषींनी तिला समाधानाने आशीर्वाद दिला आणि तिच्या कडे बघत तिचे भविष्य बघताना पतीपासून तिला पुत्र प्राप्ती नसल्याचे त्यांना कळाले. "कुंती, तुला मी एक मंत्र देतो. त्याने तुला कोणत्याही पाच देवतांकडून गर्भधारणे विना पुत्र प्राप्त होतील."त्यांनी तिच्या मस्तकावर हात ठेवला. कुंती आज्ञा घेऊन राजमहाली परतली.
नदीच्या तिरावर नुकताच सुर्यदेवांचा प्रकाश पसरला होता. कुंती अर्घ्यदान करायला नदी तिरावर आली. सुर्यदेवांचे ते सोनेरी रुप पाहून तिचा चेहरा प्रसन्न झाला. दुर्वासा ऋषींनी दिलेला मंत्र तिला आठवला. 'बघू तरी काय होते....' ती मंत्रांचे उच्चारण करू लागली. हवेतली उष्णता वाढल्या सारखी जाणवली तसी ती घाबरली. बघता बघता सुर्याचा एक भाग निखळून जमिनीवर आदळला. तिच्याच समोर! त्यातून एक मानवी भासणारी आकृती दिसू लागली. तेजोपुंज!
"सुर्यदेव.... तुम्ही खरचं आलात!" तिने नमस्कार केला.
"हो. सांग. कसा पुत्र हवा आहे तुला?" त्या आकृतीने विचारले.
"पुत्र? मला नकोय...." कुंती घाबरली, " म्हणजे आत्ता नकोय."
"मग? आवाहन का केलेस मला?"
"मी? असच! तुम्ही परत जा देवा."
सुर्यदेव विचारात पडले.
आता काय करावे? ही तर अजून लहान दिसते. बालकाची जवाबदारी घेण्या योग्यही नाही ती अजून. पण ऋषी दुर्वासा....!
"कुंती, हा मंत्र ऋषी दुर्वासांची आज्ञा आहे. मी ती डावलू शकत नाही."
"पण माझ्या प्रतिष्ठेचे काय होईल? मी अविवाहित आहे, सुर्यनारायण!"
"हा विचार आता करू नकोस. मी दुर्वासांची आज्ञा नाकरली तर मी निस्तेज होईन.... आणि समस्त सृष्टीला धोक्यात घालणे अयोग्य आहे."
कुंती रडकुंडीला आली होती.
"कुंती, तुला या बालकाची काळजी करावी लागणार नाही. मी त्याला अभेद्य कवच देईन. कुठलेही अस्त्र शस्त्र कवच भेदून त्याला इजा करू शकणार नाही."
सुर्यदेव अंतर्धान पावले आणि कुंतीला हात जड झाल्याचे जाणवले. तिने बघितले तर हातात एक लहान सुवर्ण कांती असलेले बालक होते. कानात सुवर्णाहून तेजस्वी कर्णडूल होते. अंगभर सोनेरी कवच होते. क्षणभर ती त्या लोभस रुपाकडे बघत बसली. तितक्यात दासी आली.
"हे कोणाचे बालक आहे राजकुमारी?"
तिला काय उत्तर द्यावे कळेना.
"अगं... तुला सांगितले होते ना. मला मंत्र दिला होता... तो.... हा... सुर्यदेव" जमले तसे तिने सांगाण्याचा प्रयत्न केला.
"म्हणजे तुम्ही तो मंत्र आत्ताच वापरलात?"
"नाही... म्हणजे... हो... पण..."
थोडावेळ विचार करून दासी म्हणाली, "त्याला इथेच सोडून द्या राजकुमारी."
"काय? काय बोलतेस अगं तू! निदान विचार करून तरी बोल."
"तुम्ही विचार करा राजकुमारी.... कोण एका पुत्र असलेल्या राजकुमारीशी विवाह करेल? राजघराण्याचा काय मान राहिल? लोकांना हे पटेल, की हा मंत्रोच्चाराने झालेला पुत्र आहे? तुमच्या पिता महाराजांची काय दशा होईल हे कळाल्यावर, याचा एकदा विचार करा राजकुमारी!'
तिला डोळ्यांसमोर पितामहाराजांची दैन्यावस्था दिसू लागली.
दासीने एक लाकडी गोलाकार अर्ध पेटिका मागवली. बाळाला त्यात ठेवायला हात पुढे केला तसे कुंतीने बाळाला घट्ट पकडून ठेवले.
"राजकुमारी हा नक्की सुर्यदेवांचा पुत्र आहे ना." कुंतीने दासीकडे रागाने पाहिले.
"तुला शंका वाटते?"
"नाही. आणि तुम्हालाही विश्वास असेल तर ठेवा त्याला यात."
"अगं पण हे काही पाप आहे का त्याला असं गंगेत सोडून द्यायला?"
"नक्कीच नाही राजकुमारी. आणि म्हणूनच मला विश्वास आहे की हे दैवी बाळं सुरक्षित राहील."कुंतीने रडत रडत बाळाला त्यात ठेवले. अंगावरचे दागिनेही काढून त्याच्या जवळ ठेवले. पेटिका प्रवाहात पुढे पुढे जाऊ लागली तसा कुंतीने जोरात टाहो फोडला. दासीने तिला सावरत महालात परत आणले.
नदीप्रवाहात वाहत पाण्याने त्या बालकाला त्याच किनारी आणले, ज्या किनारी गंगेने स्वतःची सात मुले प्रवाहात बुडवून प्राणहिन बनवली होती.

©मधुरा

इतिहासलेख

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

1 Aug 2019 - 5:49 pm | मुक्त विहारि

आवडलं. ..

मृणालिनी's picture

4 Aug 2019 - 8:48 pm | मृणालिनी

धन्यवाद मुक्तविहारी जी!

चांगलं लिहिलं आहे ... एक सांगू का , राग मानू नका गैरसमज करून घेऊन .. जर मृत्युंजय वाचली नसेल अजून एकदाही तर एकदा वाचा .. कदाचित वाचली असेल तुम्ही ऑलरेडी .. पण जर नसेल वाचली तर ... त्यात कुंतीच्याही दृष्टीकोनातून एक भाग सांगितला आहे ... आणि आणखी काही पात्रांच्या .. खूप खोल , डिटेल्स साकारण्याचा प्रयत्न करत लिहिलं आहे महाभारत ...

मुक्त विहारि's picture

1 Aug 2019 - 6:09 pm | मुक्त विहारि

प्रत्येकाच्या नजरेनं वेगळे वेगळे दिसते...

शिवाय लहानपणी वाचलेले महाभारत आणि तरूण पणी वाचलेले महाभारत आणि म्हातारपणी वाचलेले महाभारत, वेगवेगळे पदर उलगडून सांगते.

कुणालाही त्याच्या जातीवरून ओळखू नका, हा माझ्या पुरता, मी महाभारता पासून घेतलेला एक धडा आणि अजिबात व्यक्तीपुजा करायची नाही, हा दुसरा धडा...द्रोणाचार्य आंगठेच नाही तर मेंदूही नाहीसा करतात.

ऍक्चुली कुंतीच्या बाबतीत दिव्य शक्तीशी ( दर वेळी वेगळ्या ) काहीही संवाद न होता संयोग होऊन ... गर्भधारणा होऊन मुलं झाली होती असं आजवर वाचलं आहे आणि अंबिका - अंबालिका यांच्या बाबतीत नियोग शब्दाचा जो काही अर्थ आहे त्याने .

जर आवाहन केलं आणि हातात मूल देऊन सूर्यदेव नाहीसे झाले एवढं सोपं असतं तर सगळ्यांसमोर म्हणजे राजा , दरबार वगैरे समोर दुसऱ्या मंत्राचा वापर करून सिद्ध करता आलं असतं की पहिलं मुल दुर्वासांच्या मंत्रामुळे मिळालं आहे . गर्भवती नसलेल्या कुंतीला " नक्की हे मूल सुर्यदेवांचंच का " असा प्रश्न संशयाने विचारण्याचं दासीला काय कारण ?

गर्भधारणा झालेली कुंती वृद्ध दासीच्या सल्ल्याने , मदतीने 9 महिने कशी काढते , त्यानंतर मूल नदीत सोडून देण्याच्या वृद्ध अनुभवी दासीच्या निर्णयाने तिच्या मनाची कशी उलघाल होते पण मनावर दगड ठेवून अत्यंत नाईलाजाने ते कार्य ती पार पाडते ... आणि त्यानंतरच्या काळातील तिच्या मनातले विचार.... हे सगळं अप्रतिम वर्णन मृत्युंजयमध्ये आहे .

जॉनविक्क's picture

1 Aug 2019 - 7:14 pm | जॉनविक्क

वाढत्या वयासोबत उथळ वाटू लागतो

मुक्त विहारि's picture

1 Aug 2019 - 7:45 pm | मुक्त विहारि

पण मनोरंजक आहे.

अर्थात, तुम्ही कुठल्या नजरेने बघता, त्यावर अवलंबून आहे.

खरं तर महाभारत हे "भगवत गीतेला" केंद्र स्थानी ठेवून लिहिलेल्या कथा आहेत, असे माझे मत.

एक एक पात्र बरेच काही शिकवून जातं....कॅलिडोस्कोपिक महाकाव्य आहे...

जॉनविक्क's picture

1 Aug 2019 - 8:58 pm | जॉनविक्क

खरं तर महाभारत हे "भगवत गीतेला" केंद्र स्थानी ठेवून लिहिलेल्या कथा आहेत, असे माझे मत.

आणि गीता तुम्हाला समजत नाही. तरीही ?

मुक्त विहारि's picture

1 Aug 2019 - 9:57 pm | मुक्त विहारि

कारण, भगवत गीता, वाचणे वेगळे आणि गीता आचरणात आणणे वेगळे.

असो....

आमची मते आमच्या पाशी आणि तुमची मते तुमच्या पाशी..
मस्त थंडगार बियर पिऊ.

गीता आचरणात आणने ब्रम्हदेवालाही शक्य नाही हे गीता खरेच वाचली असेल तर नक्कीच समजेल पण तो वेगळा विषय आहे तरीही एकदा हे जरूर वाचावे असेच सूचवेंन

मुक्त विहारि's picture

1 Aug 2019 - 10:08 pm | मुक्त विहारि

पण सध्या तरी जास्त विचार मंथन करणार नाही.

मी बरा आणि माझे कुदळ-फावडे-घमेले बरे. रोपं लावा आणि रोपं जगवा.

जॉनविक्क's picture

1 Aug 2019 - 10:14 pm | जॉनविक्क

विचार मंथन केले तर रोपं मरणार नाहीत. 100% पण ते करता येणे महत्वाचे.

मुक्त विहारि's picture

1 Aug 2019 - 11:03 pm | मुक्त विहारि

नुसते विचार मंथन करून शेती होत नाही.

त्यामुळे शेतात घाम गाळावाच लागतो.

जॉनविक्क's picture

1 Aug 2019 - 11:44 pm | जॉनविक्क

असेच मी सूचवतोय. नुसता घाम गाळुन शेती होत नसते

प्रचेतस's picture

1 Aug 2019 - 9:28 pm | प्रचेतस

मृत्युंजय नि:संशय एक महान कलाकृती आहे, अतिशय रसाळ कादंबरी आहे पण ती मूळ महाभारताच्या मूळ कथेशी अपलाप करणारी आहे. भैरप्पांचे पर्वही तसेच.

ह्याउलट दुर्गा भागवत, इरावती कर्वे आणि नरहर कुरुंदकर ह्यांनी अनुक्रमे व्यासपर्व, युगांत आणि व्यासांचे शिल्प ह्या पुस्तकांत महाभारतावर केलेली भाष्ये अत्यंत रोचक आहेत.
महाभारतावरील बऱ्याच शंकांचे निरसन ह्यातून व्हावे.
भारताचार्य चिं. वि. वैद्य ह्यांनी तर उपसंहार लिहून महान काम केले आहे.