बस देवगाव फाट्यावर आली. कंडक्टरने जोरात आवाज दिला, "देवगाव फाटा कोणी आहे का"? कंडक्टरच्या आवाजाने तो डोळे चोळत उठला. हातातील पिशवी सावरत बसमधून खाली उतरला. कंडक्टरने त्याच्याकडे विचित्र नजरेने बघत दरवाजा जोरात बंद केला. बस पुढे निघून गेली. पुढे जाणार्या बसकडे बघत त्याने खांद्यावरची पिशवी सरळ केली. कपडे झटकले.
त्याने घड्याळात पाहिले. रात्रीचे आठ वाजून गेले होते. बस वाटेत बिघडली नसती तर आपण वेळेत गावात पोहोचलो असतो, असा विचार करत असताना त्याचे लक्ष समोरच्या पाटीवर गेले. ' देवगाव तीन किमी'. फाट्यापासून गाव आत तीन किमी होता. त्याने इकडे तिकडे नजर फिरवली. गावात जायला काही गाडी भेटते का तो बघु लागला. पण त्याला गाडीचे काहीच चिन्ह दिसेना. एव्हाना सगळीकडे अंधार पसरला होता. पावसाळ्याचे दिवस असल्याने अंधार जास्त जाणवत होता. गाडी भेटण्याची आशा त्याने सोडून दिली. पाटीवर ज्या दिशेने बाण दाखवला होता, त्या दिशेने एक कच्चा रस्ता गेला होता. तो देवगावला जाणारा रस्ता असेल, अस स्वतःशी म्हणत तो रस्त्यावरून चालत निघाला.
चार दिवसापूर्वी त्याच्या हातात ते बदलीचे पत्र पडले होते. त्याची बदली देवगावच्या जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून झाली. पाहिल्या शाळेतील हेड मास्तराशी भांडण झाल्यामुळे त्याची बदली अशा आडगावात झाली होती. त्याला आता पश्चाताप होऊ लागला. पण कोण त्या हेड मास्तराच्या रोज रोज शिव्या खाऊन घेणार. त्यापेक्षा या आडगावातील शाळा बरी असा विचार करत तो चालू लागला.
पाऊस पडल्यामुळे रस्ता ओला होता. खाली चिखल झाला होता. चपलांचा चपक् चपक् असा आवाज वातावरणातील शांतता भंग करत होता. त्याने पुन्हा एकदा मागे नजर टाकून एखादे वाहन भेटते का याची चाचपणी केली. पण त्याचे काही चिन्ह दिसेना. अंधार वाढला होता. पुढचे काही दिसेना. रस्त्यातील खड्डे चुकवत, हातातील पिशवी सांभाळत तो हळू हळू चालू लागला.
हवेत गारवा वाढू लागला. त्याने थैलीतून मफलर काढली आणि कानाला गुंडाळली. कानाला आराम वाटला. रस्ता नवा असल्यामुळे चालताना वेग येत नव्हता. वातावरणात कमालीची शांतता जाणवू लागली. त्याला थोडी भीती वाटू लागली. सुनसान रस्ता. वाढलेला अंधार आणि अंगाला बोचणारी थंडी यामुळे वातावरणात एक प्रकारची गूढता जाणूवु लागली. गावावरून लवकर निघायला हवे होते अस त्याला राहून राहून वाटू लागल. त्याच हे नेहमीच असत. आता निघू मग निघू करत करत खूप उशिरा निघायची सवय झाली होती त्याला. त्यामुळे अनेकदा संकटात पडला होता तो.
पुढे कोणीतरी चालत आहे असे त्याला जाणवले.
तो जाग्यावर थांबला. पुढे निरखून बघू लागला. पुढे कोणीतरी चालत असल्याचे त्याला अंधुक दिसले. पायाचा आवाज येऊ लागला. त्याला हायस वाटल. कोणीतरी सोबतीला आहे या जाणिवेने तो वेगाने पावले उचलत चालू लागला. तो त्या व्यक्तिच्या जवळ आला. त्याने पाठीमागून आवाज दिला, "कोण आहे तिकडे थांबा जरा."
पुढचा व्यक्ति त्या आवाजाने जागीच थांबला. हा चालत त्याच्या जवळ जावून पोहोचला. ती एक तरुणी होती. तिचा चेहरा पाहून त्याला कसतरी झाल. भीती वाटली. चेहरा बेढब, केसाच्या दोन छोट्या छोट्या वेण्या, दोन रंगाची ढगळ साडी, काळा वर्ण, पुढे आलेले दोन दात आणि त्यात भर म्हणून एकदम भसडा, घोगरा आवाज. एकंदरीत अशा अवतारात ती एखाद्या भूतासारखी दिसत होती. एवढ्या रात्री ही इथे काय करत असेल? हा प्रश्न त्याच्या मनात चमकून गेला.
"कोण पाव्हण तुम्ही, इकडे कुणीकड?" तीने मागे वळत विचारल.
"मी तुमच्या गावात नवीन शिक्षक म्हणून आलोय." त्याने सांगितल.
"म्हणजे मास्तर हाय का तुम्ही." तिने न समजून विचारल.
"हो" तो हसत म्हणाला आणि तिला विचारू लागला, "तुझ नाव काय आणि इकडं एवढ्या रात्री काय करत आहेस?"
" राधी हाय माझ नाव. माझी बकरी हरवली होती तिला शोधत शोधत आले होते इकडे. आता घरला चालले हाय." पुढे चालत तिने उत्तर दिले.
" मास्तर माझ्या मागन नीट सांभाळून चाला, नाहीतर एखाद्या खड्ड्यात पडसाल." ती फिदीफिदी हासत म्हणाली.
तो तिच्या मागून चालू लागला. राधी सार्या वाटेत बडबड करत होती. वाटेत विस्तीर्ण पसरलेली नदी आणि त्यावरचा तो छोटा पूल बघुन त्याला जरा हुरूप आला. ते गावात आले. त्याला हेडमास्तराच घर दाखवून राधी गाण म्हणत तिच्या घरी निघून गेली. ती दिसायला बेढब असली तरी हुरहुन्नरी स्वभावाची वाटली त्याला. मनाशीच स्मित करत त्याने हेडमास्तराच्या घराचा दरवाजा ठोठावला. त्यांनी दरवाजा उघडला.
"फाट्यावरून चालत आलो म्हणून उशीर झाला." तो म्हणाला.
"रस्ता सापडला ना नीट?" त्याला आता घेत हेडमास्तरांनी विचारल.
" हो. गावातील राधी भेटली होती रस्त्यात तिने मग रस्ता आणि तुमच घर दाखविल." त्याने पिशवी खाली ठेवत सांगितल.
"ती येडी राधी का? ती रात्रीच असच इकडे तिकडे फिरत असते. तिने काही त्रास नाही ना दिला तुम्हाला?" हेडमास्तरांनी विचारले.
"नाही नाही त्रास नाही दिला." तो उत्तरला.
दुसरा दिवस शाळेत गेला. हेडमास्तरांनी सर्वांशी ओळख करून दिली. शाळा लहानच होती. पण सुंदर होती. चार शिक्षक, एक चपराशी आणि हेडमास्तर असा शाळेचा सगळा स्टाफ होता. गावाच्या मानाने शाळा मोठी होती. मुलांची संख्या मात्र खूप कमी होती. शाळे शेजारीच एक चहाची टपरी होती. त्याला चहाची सवय असल्यामुळे त्याला टपरी पाहून बर वाटल. दुपारच्या वेळेला सगळा स्टाफ टपरीवर जमा झाला. बोलता बोलता हेडमास्तरानिं विचारल "सर इकडे कस काय तुमची बदली झाली? तुमचा गाव तर दूर आहे येथून." त्यांना मागच्या शाळेत घडलेला सगळा प्रकार सांगितला. सगळेजण हसू लागले. शाळे शेजारीच त्याला राहायला एक रूम मिळाली. रूम चांगली मोठी होती. साफसफाई करून त्याने रूम मधे सगळ सामान लावल.
दोन दिवस उलटले. शाळा आता अंगवळणी पडली होती त्याच्या. शाळा सुटल्यावर असाच फिरत फिरत तो नदीकडे निघाला. नदी काठच्या एका खडकावर बसुन वाहणारी नदी पाहून त्याला प्रसन्न वाटले. पावसाळा असल्याने नदी काठोकाठ भरून वहात होती. दोन तीन खेकडे काठावरून हळू हळू चालत नदीकडे चाललेले त्याने पाहिले. त्यांच्या तिरकस चालीची त्याला गंमत वाटली. तो निरखून त्यांची चाल बघू लागला. अलगद ते खेकडे पाण्यात उतरून गायब झाले. अचानक पाठिमागे नदीत डुबुकsss डुबुकsss असा आवाज आला. त्याने पाठीमागे वळून बघितले. राधी हातात दगडं घेऊन ते नदीत फेकत होती. त्यांचा डुबुकsss डुबुकsss असा आवाज येत होता. तिला बघून मास्तर म्हणाले, "काय राधे इकडे कुठ?"
"मी तर रोजच येते नदीकड." दगड फेकीत राधी बोलली. राधी त्याच्यापासून थोडी लांब एका खडकावर बसुन नदीत दगडं फेकून लागली. दगडांचा डुबुकsss डुबुकsss येणारा आवाज, पाण्यात उमटणारे तरंग बघण्यात तो बुडून गेला. राधी त्याच्याकडे चोरून बघु लागली. वेणीला खेळत त्याला न्ह्याळु लागली. तिच्या मनात चलबिचल होऊ लागली. मास्तर तिला आवडू लागले.
रात्रीच जेवण हेडमास्तरांच्या येथे करून तो रूमवर आला. उद्या वर्गाला शिकवायच टाचण काढल आणि तो झोपेच्या आधीन झाला रात्रीच्या दहाच्या सुमारास त्याला अचानक कसल्यातरी आवाजाने जाग आली. त्याने तोंडावरचे पांघरुन दूर केले आणि दरवाज्याकडे बघितले. समोर खिडकीच्या गजाला धरून राधी त्याच्याकडे टक लावून पहात होती. ती हाताने खूण करून त्याला जवळ बोलवत होती. त्याला आश्चर्य वाटल. तो जागेवरून उठला आणि खिडकीजवळ गेला. ती त्याला दरवाजा उघडायला सांगत होती. त्याने दरवाजा उघडला. तिने आत येऊन एकदम त्याच्या गळ्यात उडी मारली. तो धडपडून खाली पडला. तो खाली आणि ती वर पडली. ती अशी अचानक अंगावर पडल्याने तो घाबरला. तिने त्याला मिठी मारली. त्याला गुदमरल्यासारख झाल. तिचा तो बेढब देह अंगाला चिकटल्याने त्याला कसतरी झाल. ती त्याच्या गालाला, ओठाला तिचे ओठ लावू लागली. तिची मिठी आणखीन घट्ट होऊ लागली बाहेर पडणारा पाऊस, हवेत पसरलेला थंड गारवा आणि राधीच्या अंगाचा गरम स्पर्श त्याला सुखद जाणवू लागला. त्याचा विरोध हळू हळू मावळू लागला. त्यानेही राधी मिठी मारली. अजून अविवाहित असल्याने त्याला स्त्रीचा स्पर्श स्वर्गासारखा भासू लागला. ती बेढब असली तरी या क्षणाला ती सुंदर वाटू लागली. दोघांच्या अंगाचे गरम स्पर्श एकमेकांना भिडले. उसासे बाहेर पडू लागले. कूस इकडून तिकडे बदलू लागली. राधी पहिल्यांदा कोणा पुरुषाच्या मिठीत शिरली होती. बेढब असल्याने कोणी तिला जवळ केले नव्हते. ती मास्तरवर तुटून पडली. मास्तरही डोळे झाकून तिच्यावर तुटून पडला. एक मोठा उसासा सोडून दोघेही शांत झाले. सकाळी साखर झोपेच्या वेळेला राधी निघून गेली.
दुसर्या दिवशी वर्गात शिकविताना त्याचे मन रमेना. राहून राहून त्याला तो राधीचा हिडीस देह दिसू लागला. त्याला स्वतःची किळस वाटू लागली. त्याला आता पश्चाताप होऊ लागला. एका लालची क्षणाला आपण कसे बळी पडलो. याचे त्याला आश्चर्य वाटू लागले. राधीचे ते राकट ओठ, तिचा तो बेढब चेहरा आणि किळसवाणे अंग सारखे त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागले. जेवताना त्याला उलटी आली. त्यावेळी वाटलेला आनंद आता कुठल्या कुठे पळून जाऊन त्याची जागा आता शिसारीने घेतली होती. त्याला राधीची शिसारी वाटू लागली. पुन्हा तिच्या नादाला लागायचा नाही अस मनात पक्क ठरवल, तेव्हा कुठे त्याला बर वाटल.
संध्याकाळचे जेवण न करताच तो झोपेच्या आधीन झाला. बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती. तोंडावर गोधडी घेऊन तो झोपी गेला. आज पुन्हा रात्रीच्या दहाच्या सुमारास त्याला कसल्यातरी आवाजाने जाग आली. तो उठला त्याला कालच्या सारखीच राधी खिडकीला हात धरून त्याच्याकडे एकटक बघताना दिसली. त्याला जवळ बोलवू लागली. तो रागाने तिच्या जवळ गेला. तिने त्याला दरवाजा उघडायला सांगितला. त्याला तिचा राग आला. तो रागात म्हणाला, "येथून निघून जा. तुझ ते बेढब तोंड नको दाखवू." ती जागची हलली नाही. ती तशीच खिडकीच्या गजाला तोंड लावून त्याच्याकडे टक लावून पाहू लागली. त्याने रागात खिडकी बंद केली आणि झोपायला निघणार तोच ती खिडकी उघडून, रागात त्याला म्हणाली, "मास्तर मला आत घ्या नायतर तुम्ही काल जे केल ते सगळ्या गावाला सांगिल, माझ्या बा ला सांगिल."
त्याला अजून राग आला. ही वाटती तेवढी वेडी नाही याची कल्पना त्याला आली. तिच्या चेहऱ्यावरचे वासनी भाव त्याला दिसू लागले. नाईलाजाने त्याने दरवाजा उघडला.
दार उघडल्या उघडल्या राधीने त्याच्या गळ्यात उडी मारली. तिचा गरम स्पर्श आज त्याला गुदमरल्यासारखा वाटला. तिचा बेढब देह आज त्याला किळसवाणा वाटू लागला. तिच्या चुंबनाचा आज कुबट वास येऊ लागला. त्याने स्वतःला तिच्या मिठीत झोकून दिले.
आता राधी रोज येऊ लागली. रोज गजाला धरायची, त्याला जवळ बोलवून दरवाजा उघडायला लावायची. त्याने दरवाजा उघडल्या उघडल्या त्याच्या गळ्यात पडायची. त्याने आता दरवाजाला कडी लावणे पण बंद केले. सकाळी साखर झोपेच्या वेळेला निघून जायची. त्याच शाळेवरच लक्ष उडाल. कुठे मन रमेना. हातून सारख्या चुका होवू लागल्या.
एका रात्री राधी लवकरच आली. आज आल्या आल्या गळ्यात न पडता त्याच्या शेजारी बसली. त्याला आश्चर्य वाटल.
" मास्तर मी आज तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगणार हाय." ती लाजत म्हणाली.
आता एवढ्या दुःखात ही काय आनंदाची गोष्ट सांगणार आहे, असे स्वतःशीच म्हणत तो तिच्याकडे पाहू लागला.
" मास्तर मी पोटुशी हाय, पाळी बंद झाली हाय माझी."
त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. एवढ्या थंडीत त्याला घाम लागला. राधी फिदीफिदी हसू लागली. तो सुन्न झाला. संवेदना बधिर झाल्या त्याच्या. आणि आशा वेळी राधीच फिदीफिदी हसण्याने त्याचा अंगावर काटा उभा राहिला. राधीन त्याला मिठी मारली. तो थंड पुतळ्यासारखा झोपला. राधी त्याच्यावर तुटून पडली.
दुसर्या दिवशी शाळा सुटल्यावर तो तडक नदीकडे निघाला. नदी काठावरच्या खडकावर बसुन तो राधीची वाट बघू लागला. त्याने राधीला आज नदीकाठी बोलावले होते. वाहणार्या नदीला बघून त्याला जरा हायस वाटल. पाठीमागून डुबुकsss डुबुकsss असा आवाज आला. त्याला कळल राधी आली. त्याने पाठीमागे वळून बघितले. राधी नदीत दगडं टाकीत त्याच्याजवळ आली.
" काय वो मास्तर आज का इकड बोलावलं." आपल्या भसाड्या आवाजात तिने विचारल.
" काय नाही असच बोलवलं. म्हणल इथ बसुन तुझ्याबरोबर गप्पा माराव्यात." तिला बसायची खूण करत तो बोलला.
ती त्याच्या जवळ बसली. लाजत वेणी बरोबर खेळू लागली. तो जागेवरून उठला. त्याने इकडे तिकडे पाहिले. कोणी नाही याची खात्री केली, आणि अचानक तीला धक्का देऊन नदीत ढकलून दिल. ती "मास्तर sssss" अशी ओरडत नदीत पडली. तिच्या नाका-तोंडात पाणी जाऊ लागले. ती बुडू लागली. पाण्याला वेग असल्याने, ती पुढे वाहत गेली. तिचा आवाज शांत झाला. तो तेथून निघून थेट रूमवर आला.
दोन दिवसांनी राधीच फुगलेल प्रेत पुढच्या गावात सापडल. राधीच प्रेत तिच्या बापान ओळखल. हंबरडा फोडून तिचा बाप रडू लागला. राधीच्या मरणान सगळा गाव हळहळला. खेळता खेळता नदीत पाय घसरून पडली आणि वाहत पुढच्या गावात गेली. सर्वांना अस वाटल आणि हळू हळू सगळा गाव राधीला विसरून गेला.
राधी पाय घसरून पडली. हे ऐकून त्याला हायस वाटल. त्याचा खून पचला गेला. त्याला हलक हलक वाटू लागल. त्याची राधीच्या हिडीस देहापासून कायमची सुटका झाली होती.
पावसाचा जोर वाढू लागला. नदीला मोठा पूर येण्याची चिन्ह दिसू लागली. नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. नदीला याच्या आधी कधीच एवढे पाणी आले नव्हते. पाणी गावात शिरू लागले. हेडमास्तरांनी शाळेला सुट्टी दिली. गाव थोडा उंचावर असल्यामुळे पाण्याखाली जाणार नाही, अस गावातील म्हातारे माणस म्हणू लागले.
तो आज दिवसभर रूमवरच होता. जेवण करून तो रूमवर परत आला. एव्हाना पावसाचा जोर खूप वाढला होता. नदीच्या पाण्याचा प्रचंड आवाज सगळीकडे घुमू लागला. मध्यरात्रीच्या वेळी त्याला अचानक जाग आली. त्याने तोंडावरचे पांघरुन बाजूला केले. समोर दाराकडे नजर टाकली. त्याला भीतीचा प्रचंड धक्का बसला. खिडकीच्या गजाला धरून राधी त्याच्याकडे टक लावून पहात होती. त्याला खुणेने जवळ बोलवत होती. त्याच्याकडे पाहून फिदीफिदी हासत होती. तिच्या डोळ्यात वासना, भूक, क्रोध सगळ्या भावना तरंगताना त्याला दिसू लागल्या. तो जाग्यावर थरथर कापू लागला. विजांच्या प्रचंड कडकडाटासह पाऊस कोसळू लागला. आता त्याला दार उघड्याची गरजच पडली नाही. बंद दारातून राधी आत आली. आल्या आल्या त्याच्या गळ्यात पडली. यावेळी तिचा स्पर्श गरम नव्हताच. तो बर्फासारखा थंड थंड होता. अंग गारठून टाकणारा तो थंड स्पर्श त्याला असह्य झाला. ती त्याच्यावर तुटून पडली. त्याला पुन्हा पुन्हा घट्ट आवळू लागली. बाहेर पाण्याचा प्रचंड आवाज आला. कोणीतरी ओरडू लागले, "गावात पाणी शिरलय, जवळच्या टेकडीवर चला सगळे." सगळे लोक टेकडीवर जाऊ लागले. बाहेरून कोणीतरी दरवाजा ठोकून त्याला म्हणू लागले, "मास्तर टेकडीवर चला. गाव पाण्याखाली जाणार आहे." बराच वेळ दार ठोठावण्याचा आवाज आला पण आतून काही उत्तर न आल्याने तो आवाज बंद झाला.
राधीचे थंड ओठ त्याच्या ओठात होते. तो राधीच्या मिठीत होता. तिची मिठी त्याला अजून घट्ट होत गेली. तिच्यातून त्याला आता सुटका नव्हती. तो आता कायमचा तिचाच होणार होता. पाण्याचा एक प्रचंड लोट आत आला. दोघे पाण्यावर तरंगू लागले. राधी जोरात हसू लागली.
" मास्तर आता मी रोज येणार. तुमच्या मिठीत शिरणार. कायमची तुमची होणार. तुम्ही मला कायमचे सोबती मिळाले आहात. माझ्या या दुनियेत तुमची प्रेयसी तुमचे स्वागत करत आहे. मी पाण्यात बुडून मेले. तुम्हालाही मी पाण्यात घेऊन आले." ती प्रचंड जोरात हसू लागली.
पाण्याचा जोर ओसरला. पाऊस शांत झाला. गावाला हायस वाटल. पण पाण्यावर तरंगणारा मास्तरचा देह पाहून प्रत्येकजण हळहळला.
*समाप्त*
*तुमचा अभिप्राय नक्की कळवा.
प्रतिक्रिया
30 Jul 2019 - 2:42 pm | समीरसूर
कथा चांगली आहे. थोडी अजून खुलवता आली असती. थोडे अधिक रंग भरता आले असते. थोडीशी घाई-घाईत संपवल्यासारखी वाटली. शुद्धलेखनाकडे थोडे लक्ष पुरवल्यास कथानुभव अधिक चांगला होईल.
पुढील लिखाणास शुभेच्छा!
30 Jul 2019 - 2:50 pm | vaibhav deshmukh
धन्यवाद... पुढच्यावेळी अजून प्रयत्न करेल.
30 Jul 2019 - 3:01 pm | गड्डा झब्बू
कथा आवडली.
30 Jul 2019 - 3:05 pm | अभ्या..
चांगली लिहिलीय कथा.
शुभेच्छा पुधील लेखनासाठी
30 Jul 2019 - 4:04 pm | योगी९००
चांगली कथा आहे... थोडी प्रेडीक्टिबल वाटली...!! काहीतरी धक्का तंत्र हवे होते.
30 Jul 2019 - 4:28 pm | vaibhav deshmukh
सर्वांचे मनापासून आभार. तुमच्या सुचना, अभिप्राय यावर विचार करून पुढील लेखन लिहिल. धन्यवाद.
30 Jul 2019 - 5:44 pm | श्वेता२४
लिहीत राहा . पु,ले.शु.
30 Jul 2019 - 5:57 pm | जॉनविक्क
काहीही. म्हणजे गुन्हे असेच घडतात पण हॉरर टच खास वाटला नाही.
30 Jul 2019 - 9:26 pm | पद्मावति
आवडली कथा. लिहित रहा.
30 Jul 2019 - 9:54 pm | किसन शिंदे
कथा आवडली. लिहीत रहा.