युगांतर - आरंभ अंताचा भाग १३

मृणालिनी's picture
मृणालिनी in जनातलं, मनातलं
28 Jul 2019 - 2:44 pm

"भीष्म, सर्व कुशल आहे ना?"
"होय राजमाता. काहीवेळा पूर्वीच नगरीत जाऊन येणे झाले. हस्तिनापुरी सर्व स्वस्थ आहे."
"नाही भीष्म, मी नगरीबद्दल बोलत नाही."
"मग राजमाता?"
"विचित्रवीर्य च्या विवाहानंतर मी पाहातेय... तू अस्वस्थ दिसतो आहेस. सर्व ठिक आहे ना?"
भीष्म काहीच बोलले नाहीत. सत्यवतीने तलम गुंडाळलेले संदेशवस्त्र त्यांच्या हाती दिले.
भीष्मांनी उलगडून ते वाचले. 'अद्य शीघ्रंम् आगच्छतू!'
"परशुरामांनी पाठवलेला संदेश दास घेऊन आला होता तू महालात नव्हतास तेव्हा."
"आज्ञा असावी राजमाता. माझ्या गुरूंनी मला बोलावलेले आहे."
सत्यवतीने मान होकारार्थी हलवली.
भीष्माचार्यांचा रथ गुरुनिवासाजवळ थांबला. आपल्या गुरूंना आपली आठवण का आली असावी हा विचार करत त्यांनी काही पावले पुढे टाकली. समोर भगवंत परशुराम उभे होते. भीष्मांनी त्यांना वाकून नमस्कार केला. पण आज गुरूंच्या मुखातून कुठलाच आशिर्वाद बाहेर आला नाही.
"उठ देवव्रत. तू माझ्या आशीर्वादास पात्र नाहीस.":*
विज कडाडावी तसे त्यांचे शब्द भीष्मांच्या कानांवर पडले. त्यांनी हात जोडले.
"हे काय बोलता आहात गुरुदेव?"
"मला स्वप्नातही वाटले नव्हते देवव्रता.... तू असा वागू शकतोस!"
"काय केले आहे मी गुरुदेव?"
"मलाच प्रतिप्रश्न करतोस? हिंमत कशी होते तुझी?"
परशुराम रागाने लाल झाले होते. आपण जर यांचे शिष्य नसतो तर या क्षणी त्यांनी पाणी हातात धरून 'तुझी जागच्या जागी राख होईल' असा शाप द्यायला कमी केले नसते, हे भीष्मांना जाणवले.
"उचल ते धनुष्य. दाखव मला काय शिकला आहेस तु ते!"
परशुरामांनी शेजारचे झाड मुळासकट उपटून भीष्मांच्या दिशेने त्यांनी जोरात फेकले. भीष्मांवर आदळत झाडांच्या फांद्या जमिनीवर पसरल्या. आश्चर्याने त्यांनी परशुरामांकडे पाहिले. परमेश्वर, माता आणि त्या खालोखाल स्थान असलेला गुरु.... मातेने दर्शनापासून वंचित केले आणि गुरु? त्यांनीही इतका क्रोध करावा? तेही आपल्या प्रिय शिष्यावर?
"गुरुदेव, मला खरचं ज्ञात नाही. कुपया सांगा तरी..... असे काय केले आहे मी ज्यामुळे तुम्ही क्रोधित झालात?"
"पाप करून वर असा भोळा आव आणणे कोणाकडून शिकलास देवव्रता? बघ त्या निर्बल कन्येकडे.....तु ह्या कन्येचे अपहरण नाही केलेस?" त्यांनी मागे झाडाखाली उभ्या असलेल्या व्यक्तीकडे बोट दाखवत खडसावून विचारले.
'अंबा? इथे? योग्यच आहे म्हणा.... बाकी असे होतेच कोण जे भीष्मासमोर टिकू शकले असते? दुष्कृत्य एका ठिणगीप्रमाणे असते. बघता बघता तिचे वणव्यात कधी रूपांतर होईल आणि कधी अख्खे रान बेचिराख करेल.... काय सांगावे?' भीष्मांनी हात जोडून गुरूंकडे पाहिले.
" परंतु गुरुदेव.... "
" सत्य आहे कि असत्य? "
" गुरूदेव..."
" सत्य आहे की असत्य ?" परशुरामांचा क्रोध आणि आवाज तारसप्तकास भिडला होता.
" सत्य" भीष्मांनी नाईलाजाने उत्तर देत मान खाली घातली.
"वर तिच्याशी विवाह करायला सुद्धा नकार दिलास?"
"परंतु गुरुदेव, मी...."
"अर्थात हेही सत्य आहे. मग तरीही मला विचारतोस 'काय केले आहे' म्हणून?"
आपण आपल्या गुरुंना नकळत दुखावले आहे, हे भीष्मांना सहन होईना. परशुरामांच्या चरणांवर मस्तक टेकून दिले. भीष्मांच्या डोळ्यांतून आसवे गळू लागली तसा परशुरामांचा राग जरा निवळला.
"उठ, देवव्रता. मला माहित आहे, माझा शिष्य धर्माच्या वाटेवरून कितीही भटकला तरी त्याचे ज्ञान त्याला परत धर्माकडे घेऊन येईल. अंबेशी विवाहकरून केलेल्या पापाचे परिमार्जन कर."
"नाही गुरुदेव. हे शक्य नाही."
"काय?" 'आपल्याला देवव्रत नाही म्हणू शकतो?' परशुराम आश्चर्याने आणि रागाने भीष्मांकडे पाहत होते.
"तुमच्या समोर उभा असलेला हा देवव्रत आता देवव्रत राहिलाय कुठे गुरुदेव.... तुमची आज्ञा पाळणाऱ्या, धर्म आणि न्यायानेच जगणाऱ्या देवव्रतचा मी माझ्या एका प्रतिज्ञेने भीष्म बनवून टाकला. आता तो सर्वात आधी एक दास आहे, हस्तिनापूरचा! जो आज्ञा मिळाली कि ती पूर्ण करायला आकाश पाताळ एक करतो. ज्याला आज्ञा मिळाली होती कन्यांना आणण्याची.... त्याने आणल्या. ब्रह्मचारी राहण्याचे बंधन प्रतिज्ञेने घातले..... त्याने विवाहास नकार दिला." आपल्या शिष्याची अवस्था पाहून मनातून अस्वस्थ झालेल्या परशुरामांकडे भीष्मांनी पाहत हात जोडले, "मी विवाह करु शकत नाही, गुरुदेव."
परशुरामांच्या क्रोधाची जागा क्षणभरात करुणेने व्यापली.... आपला शिष्य! आतून माहिती होते, भीष्म कोणावरही अन्याय करणार नाही. पण हा आलेला पेच? त्यांची नजर अंबेकडे गेली. "परंतु मी अंबेला वचन दिले आहे भीष्मा. मी तिच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेईन म्हणून. ती माझ्या छत्रछायेत आली न्यायाकरता. हे बघ भीष्मां.... नारी सन्मान हा सर्वात जास्त महत्त्वाचा असतो."
"गुरुदेव, परंतु...."
"भीष्मा, मी तुला आज्ञा देउ शकतो."
"गुरुदेव.... मी प्रतिज्ञा नाही मोडू शकत." भीष्मांनी हात जोडले, "तुम्हीच्याच कडून शब्दांचे महत्व शिकलो आहे मी. प्रतिज्ञा मोडणे अशक्य आहे, गुरुदेव."
परशुराम रागाने थरथरू लागले. त्यांनी भीष्मांच्या छातीवर जोरात लाथ मारली. भीष्म जमिनीवर कोसळले. गुरूंकडे बघत उठून उभे राहिले.
"शस्त्र उचल भीष्मा, आज तुझी प्रतिज्ञा तरी तुला सोडावी लागेल अथवा तुझे प्राण तरी."
"मान्य आहे, गुरुदेव. तुमच्या न्यायाचा स्विकार करतो मी." भीष्म हात जोडून नुसतेच उभे राहिले.
शेजारी पडलेले धनुष्य भीष्मांच्या बाजूला फेकत परशुरामांनी नजरेने ते उचलण्याचा संकेत केला. भीष्मांनी धनुष्या कडे पाहिले.
"उचल ते धनुष्य भीष्मा."
"गुरूदेव, शस्त्र उचलून गुरुचा अपमान नाही करू शकत मी."
"भीष्मा.... काय समजतोस तू स्वतःला? तुला वाटते, की तू हातात शस्त्र उचललेस तर तुझा गुरु त्याचा शब्द पूर्ण करू शकणार नाही? विसरतोयस तू.... तुला येणारी प्रत्येक विद्या मी दिली आहे तुला. उचल शस्त्र! एका निशस्त्र मनुष्यावर प्रहार करणे हा योद्ध्याचा अपमान आहे." भीष्म मान खाली घालून उभेच राहिले.
शेवटी परशुरामांनी रामबाण वापरला. "आज्ञा आहे माझी.... उचल ते शस्त्र आणि वार कर."
भीष्मांनी शस्त्र उचलले. संरक्षण हे एकच ध्येय ठेवून त्यांची अस्त्रे परशुरामांचे बाण अडवत होती. हळूहळू दिव्यास्त्रांचा प्रयोग सुरु झाला.
एका मागून एक भयंकर अस्त्र धारण करत दोघा अजेय योद्ध्यांनी त्या वनभूमीचे रणांगण बनवले. भीष्मांची अस्त्रे आता तीव्र होत होती. भीष्मांना होणाऱ्या प्रत्येक घावासोबत अंबेच्या चेहऱ्यावरचा आनंद वाढत जात होता.
दिव्यास्त्रे भिडू लागली.... सृष्टीचा समतोल बिघडू लागला.... एकजण वरुणदेवाचे अवाहन करत विजेचा प्रहार करायचा तर त्यावर उत्तर म्हणून दुसरा सुर्यदेवाचे आवाहन करत त्यांच्या तीव्र किरणअस्त्रांनी जमीन जाळू लागला. दोघेही थांबायचे नाव घेत नव्हते. परशुरामांनी परशु बाहेर काढला. त्यांचे असे अस्त्र जे ना कोणी चुकवू शकते, ना भेदू शकते. उत्तर म्हणून भीष्मांनी ब्रम्हास्त्राचे अवाहन केली. स्वर्गलोकी देव घाबरले. ह्या दोन अस्त्रांचा आघात पुथ्वीवर झाला तर सृष्टीचा विनाश होणार! पण मध्यस्ती करावी तर कोणी?
शिव-शंकर प्रकटले. दोन्ही अस्त्रे परतवत त्यांनी परशुरामांना संबोधले, " हे परशुराम, आपण सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांवर कृपा करा. शांत व्हा."
अंबा युध्द थांबल्याने चिडली. "हे भोलेनाथ, माझा प्रतिशोध अजून पूर्ण नाही झालेला."
"अंबा, हे युद्ध सुरु राहिले तर फक्त भीष्म नाही सर्वांचा अंत होईल."
"पण मला हव्या असणाऱ्या न्यायचे काय?"
"तुझा प्रतिशोध तू स्वतः घेशिल अंबा."
शंकर अंतर्धान पावले. प्रत्यक्ष शिव शंकरांनी हस्तक्षेप केला म्हणल्यावर युध्द थांबवणे शिरोधार्य होते. दोघेही शांत झाले.
"भीष्म, मी सुद्धा एक प्रतिज्ञा घेतेय.... मी तुझ्या पराजयाचे कारण बनेन आणि मगच शांत होईन." पुटपुटत ती तिथून जाऊ लागली," असह्य वेदनांमध्ये तडपताना मला पाहायचे आहे तुला."
परशुरामांना नमस्कार करून भीष्म हस्तिनापुरला निघाले.

©मधुरा

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

28 Jul 2019 - 2:59 pm | जॉनविक्क

आता उलगडत आहेत आणि अजून बरेच उलगडायचे बाकीही आहेत

यशोधरा's picture

28 Jul 2019 - 3:06 pm | यशोधरा

वाचते आहे..

मुक्त विहारि's picture

28 Jul 2019 - 10:49 pm | मुक्त विहारि

सुरेख. ...

पद्मावति's picture

28 Jul 2019 - 10:57 pm | पद्मावति

महाभारतातील कथा कितिही वेळा ऐकल्या, वाचल्या तरीही तेव्ह्डाच आनंद देतात. तुमच्या चित्रदर्शी लेखनशैलीने कथानकात अधिकाधीक रंग भरत चाललाय. पु.भा.प्र.