कर्मयोगी! (भाग पहिला)
कर्मयोगी! (भाग दुसरा)
कर्मयोगी! (भाग तिसरा)
पूर्वसूत्र : कराचीहून आलेल्या एका सिंधी माणसाचा 'हीरो' नावाचा स्टुडिओ आणी फोटोग्राफीच्या इतर सामानाची मोठी डिलरशिप फ्लोराफाऊंटनला होती तिथे मी नोकरी करु लागलो. १९५६ मधे ३ ते ४ महिने मी तिथे काम केले.
----------------------------------------------------------------------
'हीरो' स्टुडिओतली नोकरी ही तशी तात्पुरतीच होती. दरम्यानच्या काळात सौ. सरला पुण्याहून मुंबईला आली. हिची भावजय, सख्ख्या आत्तेभावाची बायको, प्रसिद्ध पत्रकार सौ.कुसुम रानडे हिच्यामुळे मुंबईत रहाण्याच्या जागेचा प्रश्न सुटला. झावबाच्या वाडीत रानड्यांच्याकडे एकदा गेलो असता त्यांचे शेजारी डॉ. बोडस, अत्तरवाले, ह्यांच्याशी परिचय झाला आणी ते म्हणाले माझी डोंबिवलीत जागा आहे तिथे तुम्ही राहू शकता. आमचे कामच झाले. मग मी पुण्याची जागा दुसर्या एका भाडेकरुला देऊन टाकली. आता माझा रोजचा डोंबिवली ते फ्लोराफाऊंटन प्रवास चालू झाला.चार एक महिन्यानंतर डॉ.बोडसांना त्यांची जागा परत हवी होती. त्याप्रमाणे जागा खाली करुन सौ.सरलाने पुण्याला जाण्याचे ठरले. आदल्या दिवशी डोंबिवली स्टेशनवर हिची ताम्हनमळ्यापासूनची, पण तेव्हा डोंबिवलीत रहाणारी, मैत्रीण भेटली. बोलणे होता होता जागेचा प्रश्न सहजच आला. ती चटकन म्हणाली., "अगं एवढंच ना? मग तेवढ्याकरता पुण्याला का जातेस मी देते तुला जागा!" चला, पुन्हा एकदा आम्ही डोंबिवलीत रहायचे निश्चित झाले. त्या मैत्रिणीच्या आईच्या शेजारच्या जागेतच आम्ही बिर्हाड केले. ही गोष्ट १९५७ सालच्या मे महिन्यातली.
सतत नव्या संधी शोधणार्या माझ्या स्वभावानुसार चांगल्या कामाचा शोध चालूच होता. एकदिवस स्टेशनच्या रस्त्याने जात असताना अचानक रस्त्यालगतच्या सलूनमधून माझा मित्र श्री.शाम जोशी बाहेर आला. अर्धवट दाढी केलेल्या अवस्थेत त्याला बघून मी चकित झालो. तो म्हणाला "अरे माझी दाढी चालू असताना मी तुला आरशात बघितले. महत्त्वाचे काम आहे म्हणून असाच चटकन उठून आलो. " शाम हा माझा अतिशय जुना मित्र, त्याच्या जे.जे.स्कूलच्या दिवसांपासूनचा. हा साराभाई ग्रुपच्या 'शिल्पी अॅडव्हर्टायझिंग' ह्या कंपनीत कमर्शिअल आर्टिस्ट होता. तो पुढे म्हणाला "तू नोकरीच्या शोधात आहेस ना? 'शिल्पी' उत्तम कमर्शिअल फोटोग्राफर्स च्या शोधात आहे. बरेच मोठे मोठे फोटोग्राफर्स येऊन गेले पण सिलेक्ट झाले नाहीत. तू प्रयत्न का करत नाहीस?" मी म्हणालो ठीक आहे. "माझ्या नावाचा वशिला तुला वापरू देणार नाही पण मला विचारले तर ओळख नक्की सांगेन!" शामने मला स्पष्टपणे सांगितले. माझे नुकसान काहीच नव्हते. मी इंटरव्ह्यूला गेलो. आर्ट डायरेक्टर बी. जी. पतकी यांच्या सांगण्यानुसार मॉडेल फोटोग्राफी करून दिली. त्यांना माझे फोटो आवडले, मी सिलेक्ट झालो. जून १९५७ ला मी 'शिल्पी'त रुजू झालो. डार्करूम आणी कमर्शिअल फोटोग्राफी असे काम माझ्याकडे होते. शिल्पीत पुष्कळ नवीन गोष्टी शिकाव्या लागल्या. फोटोग्राफीच्या वेगवेगळ्या तंत्रांचा अभ्यास करावा लागला. भरपूर वाचन करावे लागले. इथे अनेक लोकांच्या ओळखी झाल्या जे पुढे वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या कामगिरीचे मानकरी ठरले. प्रसिद्ध कथालेखक श्री. अच्युत बर्वे हे तिथे मॅनेजर होते. उत्तरायुष्यात ख्यातकीर्त कवी, पद्मश्री आणी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित झालेले श्री. निस्सीम इझिकेल हे त्यावेळी शिल्पीत एक मॅनेजर होते. आज आपण ज्यांना प्रख्यात कलासमीक्षक म्हणून ओळखतो ते श्री. ज्ञानेश्वर नाडकर्णी हे कॉपिरायटर होते. साराभाई ग्रुपच्या सर्वेसर्वा होत्या श्रीमती गिराबेन साराभाई, म्हणजे महान संशोधक आणी पुढे भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार ठरलेले दिवंगत डॉ. विक्रम साराभाई ह्यांच्या भगिनी. शिल्पीतही त्यांचा एक विशेष वचक होता.
दरम्यान आम्ही रहात असलेली जागा त्या मालकांना हवी असल्याने पुन्हा एकदा जागाबदलाचा प्रश्न आला. मग आम्ही माझ्या एका मित्राच्या कांदिवली इथल्या इराणीवाडीतल्या रिकाम्या खोलीत रहायला गेलो. तिथूनच माझे शिल्पीतले काम सुरु होते.
मी माझ्या कामात उत्तम दर्जा राखून असे परंतु ज्युनिअर आर्टिस्ट असल्याकारणाने माझ्या कामाचे श्रेय लाटण्याचे प्रकार वारंवार घडत. माझे फोटो कित्येकदा अधिकारी व्यक्ती स्वत:च्या नावावर खपवत. तक्रार करून फारसा उपयोग नसे. एक घटना सांगतो. कॅलिको स्टुडीओने गिरगाव चौपाटीवर डोम भरवला होता. त्यात विशिष्ठ प्रसंगाची छायाचित्रे काढायची होती. 'शिल्पी'तल्या लोकांनी स्वत:ची नावे माझ्या आधीच्या फोटोंवर टाकलेली असल्याने साहजिकच त्यांना फोटो काढायला बोलावले गेले. काही केल्या फोटो जमेनात. शेवटी स्वतः गिराबेन यांनी मला बोलावले. मी फोटो काढले खरे पण प्रसिद्ध करण्याच्या शेवटच्या क्षणी माझं नाव बदलून डायरेक्टरने स्वतःचं नाव टाकलंच! असे एक ना अनेक प्रसंग. पुढे मला त्याची सवय होऊन गेली. कमर्शियल आर्टच्या डिग्रीचे क्वालिफिकेशन नसल्याकारणाने माझ्याकडून काम करुन घेऊन बाजूला सारणे त्यांना सहज शक्य होते. असो.
त्याचसुमारास 'फॉर्च्यून' मॅगेझीनचे प्रसिद्ध फोटोग्राफर 'लिओ लिओनी' हे मुंबईत आले होते. मी केलेली रत्ना शिवदासानीची पोस्टर्स त्यांच्या पाहण्यात आली. रत्ना शिवदासानी ही प्रसिद्ध सिनेतारका साधना शिवदासानी हिची बहीण (साधना? असे विचारताच, "होय तीच ती साधना कटवाली!" हे सांगताना आजोबा मिश्किल हसले! :)) . रत्ना, ही 'शिल्पी'साठीच मॉडेलिंगचे काम करीत असे. तिचा माझ्या कामावर एवढा विश्वास की ती आर्ट डायरेक्टरकडे न जाता थेट मी काम करीत असलेल्या डार्करुममध्ये येऊन माझे काम पहात बसे! थोडीच वर्षे काम करुन पुढे ती लग्नानंतर लंडनला स्थायिक झाली असे समजले. लिओनी यांनी माझ्या कामाची खूप प्रशंसा केली. लिओ लिओनींच्या बरोबरचा आणखी एक रंजक प्रसंग. श्रेय लाटण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या एका सहकार्याने त्याच्या एका कोलाजमध्ये खुद्द लिओनी यांनी काढलेले फोटो वापरले. "हे फोटो कोणाचे आहेत" असे लिओनींनी विचारले तर त्याने हे स्वत:ची कामगिरी म्हणून सांगितले. यावर चाट पडलेले लिओनी म्हणाले,"अहो, हे माझे फोटो आहेत!" त्याप्रसंगाचे वेळी मी मीटिंगमध्ये हजर होतो. त्या सहकार्याचा चेहेरा पाहण्यालायक झाला होता!
'शिल्पीमधे' असतानाच पं. रवीशंकर ग्रुपसाठी स्लाईडस करून दिल्या होत्या. रंगमंचावर ऑर्केस्ट्रा चालू असे आणी पार्श्वभूमीला ह्या स्लाईडस प्रक्षेपित केल्या जात. ते दृष्य मोठे आकर्षक दिसत असे. त्याच सुमारास मला फ्लूट शिकण्याची गोडी लागली. प्रख्यात बासरीवादक पं. विजय राघवराव यांचे शिष्य श्री. सचदेव यांच्याकडे मी बासरी शिकायला जात असे. 'वल्लभभाई स्टेडियममध्ये' क्लासेस असत. दिवसभर शिल्पीतले काम झाल्यावर संध्याकाळी धावतपळत क्लास गाठणे ही कसरत असे पण मजा येई. त्यावेळी बाहेरचीही बरीच कामे मी घेत असे. कमर्शियल आर्टिस्ट्सना एनलार्जमेंट्स करुन देणे हे माझे एक महत्त्वाचे काम होते. 'बँक ऑफ बडोदा'साठी काही कॅलेंडर्सही मी करून दिली होती. बाहेरची कामे घेतो आहे हे शिल्पीत कळू नये म्हणून एन. कुमार या नावाने ती प्रसिद्ध करत असे. शिल्पीत मी उत्तम दर्जाचा रोलीफ्लेक्स कॅमेरा वापरीत असे. एकदा त्या कॅमेर्याच्या दुरुस्तीला एका सरदारजीच्या दुकानात गेलो असता गप्पांच्या ओघात त्याच्याकडून दहिसरला जागा आहेत असे समजले. तसा मित्राच्या खोलीवर राहून मीही कंटाळलोच होतो त्यामुळे जुन्या मगनलाल चाळीतली ती जागा मी बघून आलो. १० X ११ फुटाची खोली आणी बाहेर ६ फुटाचा उघडा व्हरांडा अशी ही छोटीशी जागा २००रु. पागडी आणि महिना ११रु. भाडे अशा कराराने घेतली आणी डिसेंबर १९५७ मध्ये आम्ही तिथे रहायला गेलो. त्यावेळी खरंतर मुंबईत खूपच स्वस्ताई होती त्यामुळे थोडेफार पैसे असते तर खुद्द मुंबईतही जागा घेणे तितके अवघड नव्हते पण माझ्याकडे काहीच नव्हते त्यामुळे दूर जाण्याशिवाय पर्याय नव्हता.
नवीन जागेत गेलो खरे पण तिथे ना वीज, ना पाणी. पाण्याचा टँकर येत असे त्यातून आम्ही पाणी भरीत असू. वीज आलेली होती पण रस्त्यालगतच्या खांबावरुन वीज आणायची म्हणजे खर्चाचे काम. मीच पुढाकार घेतला आणी सर्व चाळकार्यांना भरीला घालून शेवटी एकदाची दीडेक वर्षाच्या प्रयत्नाने चाळीत वीज आली. सगळ्यांच्या घरातले कंदील जाऊन तिथे बल्ब आले. लोक आनंदले. आता पुढचा प्रश्न पाण्याचा. जागा दिली असेल तर मालकाने पाण्याची व्यवस्था केलीच पाहिजे असा कायदा असल्याने मी योग्य हापिसातून पाठपुरावा केला. शेवटी मालकाने प्रत्येक घरात पाण्याचे कनेक्शन दिले. रोज ठराविक वेळी पाणी भरुन ठेवावे लागे पण टँकरची उस्तवारी संपली ह्यातच मोठे समाधान होते.
सकाळी ८ वाजताची लोकल पकडून दहिसर ते चर्चगेट हा रोजचाच प्रवास सुरु झाला. शिल्पीत पैसे तसे बरे मिळत त्यामुळे फर्स्टक्लासने प्रवास करीत असे. ३५रु.च्या आसपास मासिक पास असे. त्यावेळची एक आठवण ऐकली तर थक्क व्हाल, आजोबा म्हणाले. एके दिवशी नेहमीप्रमाणे चर्चगेटला उतरलो. ऑफिसवर पोचलो. काम सुरु केले. १२ वाजण्याच्या सुमारास एका क्लायंटबरोबर बोलत असताना बी. बी. वर्तक स्टुडीओमधून फोन आला. फोनवर बोलणार्या व्यक्तीने मला थेट विचारले "सावरकर, तुम्ही आज काय विसरला आहात?" मला काही कळेचना! पूर्ण गोंधळून गेलो, विचारले, "काय विसरलो आहे?" "तुमचा कॅमेरा आणी इतर इक्विपमेंट कुठे आहे?" ते ऐकताच मला एका सेकंदात दरदरून घाम फुटला. सकाळी काय घडले ते आत्ता लक्षात येत होते. चर्चगेटला उतरताना कॅमेरा आणि इतर मौल्यवान साहित्य लोकलमध्येच विसरलो होतो. विचारांमध्ये इतका गुंग होतो की ऑफिसवर जाऊन काम सुरू केले तरी ही गोष्ट माझ्या लक्षात आली नव्हती. क्लायंटला काहीतरी इमर्जन्सी सांगून कसाबसा तेथून सटकलो. कोणाला समजले असते तर नोकरीवर गदा येऊ शकत होती. लगोलग वर्तक स्टुडिओतून माझे साहित्य सुखरूप घेउन आलो. वर्तक स्टुडीओत ते साहित्य पोहोचवणार्या इसमाला "तू तिकडेच हे नेऊन कसे काय दिलेस?" असे विचारल्यावर तो म्हणाला "तुम्हाला रोज गाडीत बघतो. तुमचा कॅमेरा बघून म्हटलं तुम्ही तिथेच काम करीत असणार म्हणून तिथे नेऊन दिला." त्या भल्या माणसाला मी ताबडतोब ५०रु. बक्षीस दिले.
मला वाटतं १९५९ च्या सुमारास महाराष्ट्र् राज्य छायाचित्र आणी पोस्टर्सचे चौथे प्रदर्शन भरले होते. त्यात टायपोग्राफी हा सब्जेक्ट होता. त्या प्रदर्शनासाठी क्लॅरेंडॉन टाईपफेसचा मोठा "C" प्ले केलेलं आणी त्याला साजेशी कॉपी लिहिलेलं, २०" X ३०" आकाराचं, ब्लॅक अँड व्हाईट पोस्टर तयार केलेलं होतं. मी, 'वकील अँड सन्स' मधले प्रसिद्ध आर्ट डायरेक्टर श्री. शरद गोखले आणि तिसरे एक स्पर्धक (दुर्दैवाने आत्ता नाव आठवत नाही) अशा तीघांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला होता. मी स्वतः नागपूरला बक्षीस समारंभाला गेलेलो मला आठवते आहे.
१९६६ साली मला शिल्पीतर्फे अहमदाबादच्या "नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाईन" (एन. आय्.डी) ह्या जगप्रसिद्ध संस्थेत ट्रेनिंगसाठी जाण्याची संधी मिळाली. तिथे आम्हाला रहाण्यासाठी खोलीची वगैरे सर्व व्यवस्था केलेली असल्याने मी व सौ. दोघेही तिकडे रवाना झालो. जगातले नामवंत फोटोग्राफर्स तिथे येत. त्यांची एनलार्जमेंट्सची कामे ते आवर्जून मला देत. कित्येक फोटोग्राफर्सनी पाठीवर शाबासकीची थाप दिली. तिथले डायरेक्टर श्री दशरथ पटेल ह्यांना माझे काम अतिशय आवडले आणि त्यांनी तसे प्रशस्तीपत्र 'शिल्पी'त पाठवून दिले. सहा-आठ महिनेच झाले असावेत एके दिवशी अचानक मला श्रीमती गिराबेन साराभाईंकडून ताबडतोब मुंबईत ऑफिसवर जाऊन रिपोर्ट करण्याबद्दल तातडीचा निरोप आला. बरं का जायचं आहे ते कळेना. असे तडकाफडकी झाल्याने मी काढलेले रेशनकार्ड वगैरे परत करुन आम्ही उभयता मुंबईस परतलो. एक गोष्ट बरी होती म्हणजे शिल्पीने आमची प्रवासाची व्यवस्था रेल्वेच्या फर्स्टक्लासने केली होती त्यामुळे तो तरी नीट पार पडला. ऑफिसवर रिपोर्ट केला. मग समजले की तिथल्या काही असंतुष्ट आत्म्यांच्या राजकारणाने, माझ्या अनुपस्थितीत, माझ्या जागेवर दुसरा फोटोग्राफर नेमण्याचा कट शिजत होता! माझ्या अचानक येण्याने ते बारगळले पण माझे अहमदाबादेचे चांगले काम सोडून यावे लागले त्याची चुटपुट लागून राहिलीच. एन्.आय्.डी. मध्ये जाण्याआधी शिल्पीने माझ्याकडून पाच वर्षांचा करार करुन घेतला होता की ट्रेनिंगनंतर मी पाच वर्षाच्या आत नोकरी सोडली तर मला पैसे भरावे लागतील. मी तसे करणार नव्हतोच. अखेर १९७० च्या सुमारास कराराची पाच वर्षे पूर्ण करुन एकूण १४ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडाने मी शिल्पीला रामराम ठोकला. 'शिल्पी'तला काळ हा माझ्या आयुष्यातला अतिशय चांगला असा काळ गेला. मला बरेच शिकायला मिळाले, मोठ्या लोकांशी ओळखी झाल्या आणी माझ्या कामाचे चीज झाले अशी भावना माझ्या मनात आहे. तिथल्या सगळ्या लोकांचा मी ऋणी आहे!
चतुरंग
प्रतिक्रिया
19 Jul 2009 - 4:52 pm | रामदास
आजोबांना बोलतं करून एका मोठ्या कालखंडाचा सामाजीक इतिहास तुम्ही सहज लिहून गेलात.अभिनंदन.
आजोबांच्या बद्दल काय लिहावे ?
आज तारखेस मला राहते घर सोदून दुसरीकडे बिर्हाड थाटायचे या विचारानीसुध्दा हुडहूडी भरते आणि आजोबांनी तर जशी गरज पडेल तशा जागा बदलल्या.एव्हढा मानसीक लवचीकपणा बघायला मिळत नाही .मला वाटतं की त्यांच्या यशाचे गमक या लवचीकतेतच आहे.
अभिनंदन.
19 Jul 2009 - 6:26 pm | स्वाती दिनेश
आजोबांचा जीवनप्रवास मोठा इंटरेस्टिंग आहे, वाचते आहे.. पुढचे लिहा लवकर..
स्वाती
19 Jul 2009 - 7:46 pm | क्रान्ति
खूपच रोचक आहे. सरळ माणसाच्या स्वभावाचा गैरफायदा घेणं हा काही लोकांचा जन्मजात अवगुण असतो, पण आजोबांनी आपल्या स्वभावात कटुता येऊ दिली नाही, हे किती विशेष! खरंच खूपच कमालीचं व्यक्तिमत्व आहे!
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी
20 Jul 2009 - 3:44 am | सुबक ठेंगणी
असंच म्हणते...वाईट अनुभव येऊनही मिळालेल्या गोष्टींबद्दल ऋणी रहाण्यातली आजोबांची सकारात्मक वृत्ती, मनाचा मोठेपणा आवडला.
हे सगळं आमच्यापर्यंत पोचवणाबद्दल तुम्हालाही पुन:पुन्हा धन्यवाद.
20 Jul 2009 - 5:29 am | स्वाती२
+१
असेच म्हणते.
चतुरंग, या आजोबांची ओळख करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
19 Jul 2009 - 8:01 pm | मदनबाण
पुढच्या भागाची वाट पाहत आहे.
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
19 Jul 2009 - 9:55 pm | शाल्मली
आजोबांचा जीवनप्रवास मोठा रंजक आहे!
सुंदर लेखमाला!!
लवकर येऊदे पुढचे भाग..
--शाल्मली.
20 Jul 2009 - 5:36 am | प्राजु
+१
हेच म्हणते. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Jul 2009 - 11:06 pm | ऋषिकेश
अरे वा! हा भागही रोचक आहे
आजोबा दहिसरकर आहेत हे वाचून अजूनच जवळचे वाटु लागले आहेत :)
येऊ दे पुढील भाग.... वाचतो आहोत
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे