कर्मयोगी! (भाग पहिला)
कर्मयोगी! (भाग दुसरा)
कर्मयोगी! (भाग तिसरा)
कर्मयोगी! (भाग चौथा)
कर्मयोगी! (भाग पाचवा)
कर्मयोगी! (भाग सहावा)
पूर्वसूत्र - "अजून अनेक आठवणी आहेत. आता गाण्यासंबंधीच्या आठवणी सांगू लागलो तर कित्येक तास बसावे लागेल. आपण जरा निवांत बसून बोलूयात. आता मी दमलोय." मी त्यांची रजा घेतली.
--------------------------------------------------------------------
"तुम्हाला आठवत असेल तर साधारण २५ वर्षांपूर्वी दूरदर्शनवर 'ज्ञानदीप मंडळ' हा कार्यक्रम होत असे." आजोबा सांगत होते. "दहीसरला १९८४-८५ च्या आसपास ज्ञानदीप मंडळाची स्थापना झाली. श्री. मोहन सामंत ह्यांच्या पुढाकाराने ते सुरु झाले. आम्ही त्याचे सभासद झालो. काही सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. अनेक खाजगी ठिकाणी मी बासरीवादनासाठी, साथ करायला जायचो. वसईचे श्री. श्रीधर पारकर ह्यांच्या नृत्य विद्यालयाचे प्रोग्रॅम्स होत त्यांचा साथीदार म्हणून मी जात असे. स्वतः श्री. पारकर घरी येऊन मला आवर्जून बोलावून नेत असत. दहीसरला श्री. दिगंबर शिंदे ह्यांचा डान्स क्लास आहे. त्यांच्याबरोबर बाहेरगावी पुणे, कोल्हापूर अशा ठिकाणी मी जात असे. शेतकरी नृत्य, कोळी नृत्य, त्यांचे टीवीवरचे प्रोग्रॅम्स ह्या सगळ्यांना मी साथ केलेली आहे. होताहोता १९९६-९७ साली ज्ञानदीप मंडळाने गाण्यांचा एक मोठा कार्यक्रम करण्याचे घेतले. कवी, संगीतकार, वादक, गायक सगळे दहिसरकर असा एक कार्यक्रम ठरला. चाली देण्यासाठी श्री.पारकर, श्री.पात्रे, श्री. सुर्वे अजून दोन तीन संगीतकार होते दुर्दैवाने त्यांची नावे सध्या स्मरणात नाहीत.एक संगीतकार मीही होतो. चार चार गाणी प्रत्येक संगीतकाराला दिली होती. बर्याच मेहनतीनंतर एकूण ३० गाणी सादर झाली. मोठे संगीत दिग्दर्शक श्री.प्रभाकर पंडीत कार्यक्रमाला उपस्थित होते. दहिसरची अनेक प्रमुख नागरिक मंडळी आवर्जून कार्यक्रमाला हजर होती. सर्व गाण्यांचे उत्तम दर्जाचे ध्वनिमुद्रणही करुन ठेवलेले होते. काही दिवसांनी मंडळात ह्या गाण्यांची कॅसेट करुयात म्हणून कल्पना पुढे आली. बँक ऑफ बडोदामध्ये काम करणारे संगीतकार श्री.दत्ता थिटे ह्यांनी ही कल्पना मांडली होती. गाण्यांच्या व्यावसायिक कॅसेट्स निर्मिती करणारे एकजण त्यांच्या परिचयाचे होते. माझी दोन गाणी त्यात निवडली गेली. त्या गाण्यांच्या चाली थोड्या जुन्या वाटतात त्या नवीन करुन टाकूयात का अशी विचारणा झाली. मी म्हणालो मला नवीन चाली जमणार नाहीत. मग जुन्याच चाली ठेवल्या त्या लोकांना आवडल्या. एक गाणे माझ्या सुनेने सौ.अस्मिताने म्हटले अहे आणी दुसरे सौ. भांगेबाईंनी म्हटले आहे. कवी मोहन सामंत आणि सौ. भांगे ह्यांच्या सगळ्या कविता आहेत. सौ. भांगे ह्या स्वतःचे भजन स्वतः गायल्याही आहेत. ह्या उत्तम कीर्तनकार आणी गायिका आहेत. कॅसेट्स निघाल्या, त्याला डिमांड चांगली होती त्यामुळे लॉस झाला आही.
बोरिवली येथील 'सुविद्यालयाचा' २५ वा वाढदिवस साजरा करण्याचे ठरले. बोरिवलीचे समाजसेवक श्री. मनोहर गोखले ह्यांनी माझ्याकडे विचारणा केली की जुनी मराठी गाणी मी त्या शाळेच्या शिक्षकांकडून आणी संगीत शिक्षकांकडून म्हणवून घेऊ शकेन का? मी होकार दिला. अनेक वाद्यवृंदात मी साथीला जात असे तिथले बरेच कलाकार माझ्या उत्तम परिचयाचे झाले होते. त्यातले काही वादक ह्या कार्यक्रमासाठी मी साथीला बोलावले होते. सर्वांना यथायोग्य बिदागी देण्याचीही व्यवस्था केलेली होती. हा कार्यक्रम मी सादर केला आणी त्याला बरीच वाहवा मिळाली. ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बोरिवली येथील प्रसिद्ध बासरीवादक कै.मल्हारराव कुलकर्णी होते. त्यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा सरस्वतीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला होता.
लोकांच्या ओळखी कशा होतात ह्याचा एक किस्सा आता आठवले म्हणून सांगतो, पं.राम मराठ्यांचे शिष्य राजा उपाध्ये हे माझे स्नेही. ह्यांचा मुलगा हुबेहूब बाबूजींसारखा (कै.सुधीर फडके) गात असे. इतका हुबेहूब की कॅसेटवर आवाज ऐकलात तर सांगू शकणार नाही की कोण गाते आहे! ह्यांच्याकडे गोरेगावला माझा बासरीवादनाचा प्रोग्रॅम झाला होता. त्यावेळी तिथे प्रसिद्ध हार्मोनियम वादक शामराव कांबळे ह्यांच्याशी ओळख झाली. नंतर पुढेही आमचा स्नेह टिकून राहिला. (मागल्या वर्षी २००८ मध्ये शामराव कांबळे ह्यांचे निधन झाल्याचे आजोबांना माहीत नव्हते. ते ऐकून त्यांना दु:ख झाले.)
एक दिवस अभिजित शाळेतून घरी आला आणी पेटीवर अमूक कसे वाजवायचे, तमूक कसे वाजवायचे असे विचारु लागला. तो तसे का विचारतोय हे मला समजेना पण मी त्याला सांगितले. मग त्याने थोडा सराव केला आणि तो गेला. नंतर मला समजले की त्याच्या शाळेत कुठलासा गाण्याचा कार्यक्रम बसवायचा होता. शिक्षकांनी अचानक विचारणा केली की कोण काय वाजवते एक जण म्हणाला तबला मग अभिजित म्हणाला मी पेटी वाजवतो. तोपर्यंत ह्याने पेटी वाजवलेली मी ऐकली नव्हती. पण त्या कार्यक्रमात ह्याने सराईतपणाने पेटीवादन केले आणी मी आश्चर्यचकित झालो. माझा पेटीवादनाचा सराव सुरु असताना हा लक्षपूर्वक बघत असे आणि त्यातूनच त्याने वादन उचलले होते. त्याचा हा पैलू मला नवीन होता.
बासरी शिकायला मी सुमंतराज ह्यांचेकडे जात असे. हे संगीतकार सी.रामचंद्र यांच्या वाद्यवृंदात बासरीवादक होते. त्यांच्या रेकॉर्डिंग्च्या वेळेस ते मला बोलवायचे आणि मी जात असे. सुमंतराज हे जलद फूंक मारुन बासरी वाजवण्यात अतिशय वाकबगार होते. ग्रँटरोडला म्यूझीशियन्सचा रिहर्सलचा हॉल होता तिथे मी ऐकायला जात असे. एकदा मी सुमंतराज ह्यांना "तुमचे गुरु कोण?" असे विचारल्यावर त्यांनी कृष्णाच्या तसबिरीकडे बोट दाखवले! प्रख्यात संगीतकार नौशाद ह्यांच्याकडे चंदू बर्वे हे बासरीवादक होते. नौशाद ह्यांच्या जवळजवळ सगळ्या गाण्यात हटकून बर्वे ह्यांनीच साथ केलेली आढळेल. उभी फ्लूट वाजवण्यात त्यांचा हातखंडा. ह्यांचाही माझा उत्तम स्नेह होता. नौशाद यांच्याकडे तब्बल ८० म्यूझीशियन्स होते. मागे शिल्पीत काम करत असतांना त्यांचा ग्रुप फोटो मी काढलेला होता!
बासरीवादनासाठी माझ्याकडे ५ विद्यार्थी होते हे सगळे आडवी फ्लूट वाजवायचे. डॉ.रानडे, गोसावी, तांबे हे आसनगावचे होते व दर शनिवारी येत. वंदन जोशी हा बरीच वर्षे येत असे, तो सध्या न्यूजर्सीत सेटल झालाय. त्याच्या आईलाही मी हार्मोनियम शिकवीत असे. अजूनही बरेच विद्यार्थी होते. हार्मोनियनसाठी सुद्धा बरेच विद्यार्थी होते. कोणतीही शिकवणी करताना वक्तशीरपणा हा फार महत्त्वाचा आहे. तो मी नेमाने पाळला. माझ्या येण्यावर लोक घड्याळ लावत असत इतका अचूक वेळेला मी पोचत असे, आजोबा अभिमानाने सांगत होते. एका शाळेमध्ये १९८८-८९ च्या आसपास बासरी आणी हार्मोनियम शिकवीत होतो. आठवड्यातून तीनदा जायचे असले तरी मी पाच वेळा जात असे. दहिसरच्या आमच्या चाळितल्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा शिकवण्याचा उपक्रम हाती घेतला होता. वर्षभर चालवला मग आजारी पडल्याने सोडावे लागले. शिकवण्या अगदी आत्तापर्यंत सुरु होत्या २००२ साली मी आजारी पडलो तेव्हा बाहेरच्या शिकवण्या बंद केल्या.
दर गुरुवारी दहिसरला दत्तमंदिरात, म्हात्रेवाडीला गोवेकरांचे भजन मंडळ असे त्यात मी बासरीवादनाची साथ करीत असे. माझ्याकडे एकूण ६० बासर्या आहेत. सगळ्या पट्ट्यांमधल्या (काळी एक, काळी दोन, पांढरी एक, पांढरी दोन इ.) आहेत. गायकाच्या आवाजाची पट्टी बघून, गाण्याची गरज बघून तशा पट्टीतली बासरी वाजवणे गरजेचे असते. बर्याचशा बासर्या ह्या हरीभाऊ विश्वनाथ ह्यांच्या सँडहर्स्ट रोडवरच्या दुकानातून खरेदी केल्या आहेत. काही बासर्या रस्त्यावर बसणार्या लोकांकडूनही घेतलेल्या आठवतात. उत्तम प्रतीच्या बासर्या कलकत्त्याला तयार होतात. गिरगावात उरणकरवाडीत लिमये म्हणून उत्तम बासरी तयार करणारे होते. फारच उच्च दर्जाच्या बासर्या ते बनवीत असत. खास कलकत्त्याहून बांबू मागवून ते बासरी बनवून देत असत. प्रख्यात बासरीवादक श्री.विजयराघवराव ह्यांच्या सगळ्या बासर्या ह्या लिमयांकडे तयार केलेल्या आहेत! लिमये हे अतिशय उच्च दर्जाचा कलाकार व्यक्तिमत्त्व. पुढे ते दुर्दैवाने लवकर वारले. अतिशय दारिद्र्यात त्यांचे शेवटचे दिवस गेले. अशी हुन्नरी माणसे दरिद्री रहावीत हा फार मोठा शाप आहे. पुढे त्यांच्या मुलाने तो धंदा चालवला नाही. (मुले असा धंदा सर्वसामान्यपणे पुढे चालवताना दिसत नाहीत ह्या माझ्या बोलण्यावर आजोबांनी फार मार्मिक टिप्प्णी केली - त्यांच्या म्हणण्यानुसार - आपल्या बापाने धंद्यात सहन केलेला तोटा, सोसलेले दारिद्र्याचे चटके ह्याने मुलांच्या मनावर फार परिणाम होतो आणि त्या धंद्याबद्दल त्यांच्या मनात उद्विग्नता येते, नाराजी बसते आणि ती त्यापासून दूर जातात. त्यामुळे धंदा पुढे चालवला नाही ह्याबद्दल त्यांना दोष देता येत नाही.)
आजोबांना मी बासरी वाजवून दाखवण्याची विनंती केल्यावर त्यांनी त्यांच्याजवळच्या तीन बासर्या काढल्या. दोन आडव्या वाजवायच्या आणि एक उभी वाजवायची बासरी होती. वयाच्या ८५ व्या वर्षी सुद्धा आजोबा बासरी चांगली वाजवतात. त्यांनी यमन रागातली एक धून मला वाजवून दाखवली. "हल्ली दमसास टिकत नाही त्यामुळे मनासारखे वाजवता येत नाही!" आजोबा म्हणाले. त्यामुळे ते जरा नाराज होते. पण एकेकाळी हे उत्तम बासरीवादन करीत असणार ह्याची चुणूक त्यांच्या वादनातून निर्विवादपणे दिसते!
(क्रमशः)
-चतुरंग
प्रतिक्रिया
13 Sep 2009 - 8:57 am | क्रान्ति
वयाच्या ८५ व्या वर्षी सुद्धा आजोबा बासरी चांगली वाजवतात. त्यांनी यमन रागातली एक
धून मला वाजवून दाखवली. "हल्ली दमसास टिकत नाही त्यामुळे मनासारखे वाजवता येत नाही!" आजोबा म्हणाले. त्यामुळे ते जरा नाराज होते. पण एकेकाळी हे उत्तम बासरीवादन करीत असणार ह्याची चुणूक त्यांच्या वादनातून निर्विवादपणे दिसते
वा! मस्त!
खरंच कमालीचं व्यक्तिमत्व आहे आजोबांचं! त्यांच्या आठवणी जसजशा वाचाव्यात, तसं त्यात गुंतून जातं मन. एक सुचवू का? या आठवणी पुस्तकरूपानंही प्रसिद्ध कराव्यात. पुढच्या पिढीसाठी खूप मोठा ठेवा असेल तो.
अशा महान व्यक्तिमत्वाशी तुमची भेट घडली, म्हणून तुमच्या भाग्याचा हेवा वाटतो! :)
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
13 Sep 2009 - 9:49 am | अवलिया
वाचतो आहे.
उत्तम लेखन !!
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
13 Sep 2009 - 10:12 am | नंदन
उत्तम लेख, वाचून शाळेतल्या आणि ज्ञानदीप मंडळाच्या कार्यक्रमांच्या आठवणी जाग्या झाल्या. एकेकाळी मराठमोळा चेहरा असणार्या ह्या छोट्याशा उपनगरात सुरेख सांस्कृतिक कार्यक्रम होत याचं श्रेय सावरकर आजोबांसारख्या मंडळींनाच जातं. बँकेतली नोकरी सांभाळून उत्तम निवेदन-लेखन करणारे मोहन सामंत, स्टेशनबाहेरच्या शिवणाच्या दुकानाबरोबरच गाण्याबजावण्यात रमणारे श्री. पात्रे आणि विद्यार्थ्यांना गोडी लागेल इतक्या रसाळपणे मराठी आणि संस्कृत शिकवणार्या भांगे मॅडम ही मंडळी लेखातून पुन्हा भेटली. त्यांची या 'जीविके'मागची* हौस आणि तळमळ पाहिली की 'खटाटोपो भयंकरः' असंच नम्रपणे म्हणावंसं वाटतं.
*आपण पोटासाठी जे काही करतो, त्याला 'उपजीविका' म्हणतात. ती 'जीविका' नाही. जीविका कशासाठी? तर चित्रकलेसाठी, आनंदासाठी, अभिनयासाठी, नर्तनसाठी. यासाठी जगणं ही खरी जीविका आहे.
-- 'सुजनहो'.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
13 Sep 2009 - 11:54 am | ऋषिकेश
असेच म्हणतो..
भांगे मॅडम आम्ही शाळा सोडत असताना मुख्याध्यापिका झाल्या होत्या..आम्हाला त्यांनी मराठी व संस्कृत अतिशय छान शिकवले होते... आता त्या रिटायर्ड झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांशी संपर्कात आहेत हे विषेश..
पात्रे सरांकडे आस्मादिकांनी २-३ महिने(!) तबला शिकायचा प्रयत्नहि केला आहे ;)
छान लेखमाला आहे.. आजोबांची आणि आमच्या ओळखींमधला लसावि सुखावून गेला :)
जाता जाता: मंडळाचे नाव "अक्षर ज्ञानदिप मंडळ" होतं/आहे.
(नॉस्टॅल्जिक)ऋषिकेश
------------------
सकाळचे ११ वाजून ५३ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया...."
13 Sep 2009 - 2:18 pm | मदनबाण
वाचतो आहे...
मदनबाण.....
पाकडे + चीनी = भाई-भाई.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=758...
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=752...
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=758...
14 Sep 2009 - 2:55 am | स्वाती२
आजोबा ८५व्या वर्षी बासरी वाजवू शकतात हे वाचून थक्क झाले.
14 Sep 2009 - 2:58 am | शाल्मली
आजोबांची खूप दिवसांनी भेट झाली. छान वाटले.
उत्तम लेखमाला!
आजोबा ८५व्या वर्षी देखील एकदम तरतरीत दिसताहेत. :)
--शाल्मली.
14 Sep 2009 - 3:24 am | मीनल
ग्रेट आजोबा!
सर्व भाग वाचते आहे.
मीनल.