कर्मयोगी! (भाग पहिला)
कर्मयोगी! (भाग दुसरा)
पूर्वसूत्र : कु. मैनाबाई वामनराव गोखले ही सौ. सरला सच्चिदानंद सावरकर बनून आयुष्यात आली. रहाण्याच्या जागेचा प्रश्न बिकट असल्याने सौ.ला लगोलग ताम्हनमळ्याला माहेरी परत पाठवणे भाग पडले.
-----------------------------------------------------------------------
सौ. माहेरी गेल्यानंतर थोडेच दिवसात मी लोकल स्टुडिओतली कंटाळवाणी नोकरी सोडली. पुन्हा एकदा काय करायचे हे ठरवणे भाग होते. श्री. नंदू पालेकर हा माझा दोस्त लोकसत्ताचा उपसंपादक होता. त्याने विचारणा केली
"अरे तू फ्रीलान्स प्रेस फोटोग्राफी का करीत नाहीस?" हा कामातला बदल मला चांगला वाटला. नंदूच्या म्हणण्याप्रमाणे १९५३ च्या सुमारास मी लोकसत्तेचे काम सुरु केले. सुरुवातीला नंदू ज्यावेळेस ऑफिसमधे जात असे त्यावेळी
मी ही जात असे. जसजशी बाकीच्या लोकांची ओळख झाली तसा मी स्वतंत्रपणे जाऊ लागलो. तिथे मात्र माझे झपाट्याने नाव झाले. जवळजवळ सगळ्याच बातम्यांना माझे फोटो असत आणि खाली नाव असे 'छाया: नंदकुमार'
('नंदकुमार' हे टोपणनाव मी वृत्तपत्रातल्या फोटोग्राफीसाठी घेतलेले होते). फ्रीलान्सर म्हणून काम करीत असल्याने नवाकाळ, संध्याकाळ, 'नवशक्ती/फ्रीप्रेस' मध्येही मी फोटो देत असे. नवशक्तीचे संपादक होते श्रीकांत पालेकर.
तिथेच व्यंगचित्रकार म्हणून काम करणारे एक गृहस्थ होते. माझा त्यांचा जवळजवळ रोजचाच संपर्क असे. मी त्यांना वेगवेगळ्या प्रसंगांचे फोटो नेऊन देई. पुढे ते फार मोठे व्यक्तिमत्त्व झाले. शिवसेना संस्थापक श्री. बाळासाहेब ठाकरे
हीच ती व्यक्ती होती हे मला पुढे समजले!
प्रामुख्याने लोकसत्ताचे काम करीत असलो तरी मुळात फ्रीलान्सर असल्याने मला दिवसभराच्या कामाची बेगमी करुन ठेवायला लागे. रोज सकाळी ५.३० वाजता सर्व वृत्तपत्रांना फोन करुन आजचे समारंभ कोणते ते विचारुन घेत असे.
कोणत्या समारंभांमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे त्याप्रमाणे मी फोटो आणून देतो असे सांगे. त्यातले महत्त्वाचे प्रसंग निवडून त्याप्रमाणे कवरेज करावे लागे. माझ्याकडे त्यावेळी रोलिकॉर्ड हा कॅमेरा होता. मोठ्या भावाने मला हा कॅमेरा
हॅमिल्टन स्टुडिओमधून रु.६५० ला घेऊन दिला होता. त्यावेळी १२० आणि ६२० अशा दोन प्रकारच्या फिल्म्स येत. रोलि़कॉर्ड मध्ये १२० प्रकारची फिल्म्स वापरीत. १९५३ च्या सुमारास १२ फिल्म्सचा रोल रु.१.७५ ला मिळत असे.
दिवसाच्या सुरुवातीलाच सर्व प्रोग्रॅम्स ठरवून सगळ्यात आधी जाऊन मी फोटो घेई खरे पण डेवलप कसे करणार? माझ्याकडे डार्करूम नव्हती. त्यावरही मी शक्कल लढवली . भावाच्या घरातच रहात असे तिथे खिडक्या दरवाज्यांवर
काळे कागद लावून अंधार करत असे आणि डोक्यावरुन काळे कापड ओढून त्याचा तंबू करत असे. अशा तंबूच्या आत बसून माझे फिल्म डेवलपिंग चाले!" तसं पहायला गेलं तर भावाच्या घरी एकूण ६ माणसे असत. मी, भाऊ, वहिनी,
आमची बहीण आणी भावाची मुले. पैकी मुले शाळेत आणी भाऊ ऑफिसात गेला तरी घरी बहीण आणि वहिनी असत व धाकटी मुलगी असे त्यातच माझे काम चाले. त्या सर्वांनी मला खूपच सांभाळून घेतले. माझे किचकट काम बघून
त्यांना वैताग येतही असेल पण त्यांनी ते सगळे सहन केले, माझाही नाईलाज होता. त्या सर्वांची मला फार मदत झाली. कधीकधी मी बाहेरच्या स्टूडिओची डार्करुमही वापरीत असे. त्यांना काही तासांचे पैसे दिले की त्याप्रमाणे ते डार्करुम
वापरायला देत असत. तुम्हाला कदाचित प्रौढी मिरवतोय असे वाटेल," आजोबा थोडेसे संकोचून म्हणाले " पण फोटो काढण्याबरोबरच तो प्रसंगाला, बातमीला साजेसा डेवलप कसा करावा ह्याचे माझे तंत्र होते. डेवलपिंगसाठी लागणारी
केमिकल्स योग्य प्रमाणात मिसळून उत्तम परिणाम मिळवण्यात माझा हातखंडा होता. ह्या सगळ्या सव्यापसव्यामधे माझे सगळ्यात आधी काढलेले फोटो प्रेसमधे जायला उशीर होई. माझे फोटो मिळण्याआधी इतरांचे जरी मिळाले तरी
"नंदकुमार यांचे फोटो आल्याखेरीज फोटो अॅक्सेप्ट करता येणार नाहीत!" असे संपादक निक्षून सांगत. सर्व फोटो पाहून त्यातले उत्तम निवडले जात. हटकून माझ्याच फोटोंची निवड होई. त्यामुळे नाव जरी झाले तरी ह्या व्यवसायात मला
बरेच हितशत्रूही तयार झालेले होते. मी एखाद्या ठिकाणी जाऊन कवरेज करणार आहे असे कुठे बोललो की परस्पर जाऊन तिथले काम माझ्यापेक्षा कमी दरात क्वोट करुन पळवणारे महाभागही होते पण त्याकडे लक्ष न देता मी माझे काम
चालूच ठेवले.
त्यावेळी फोटो रीप्रिंटिंग, एनलार्जमेंट्स वगैरेही कामे मी घेत असे. बरीचशी कामे मी स्वतः करी, काही किचकट, अवघड कामे बाहेरुन कमर्शिअयल आर्टिस्टकडूनही करुन घेत असे. त्यावेळचे काही प्रसंग आवर्जून सांगण्यासारखे आहेत.
साहित्य संघामध्ये नाट्यमहोत्सव सुरु होता. त्याचे फोटो काढण्यासाठी गेलेलो असताना रात्री ११ वा लोकसत्ताचे संपादक श्री. ह.रा.महाजनी तिथे भेटले, त्यांनी सांगितले की ठाकूरद्वार येथील श्री दत्त मंदिराला मोठी आग लागली आहे
अशी बातमी आहे तातडीने घटना कव्हर करा. रात्री ११ वाजता नाटक सोडून निघालो. आगीचे फोटो काढून लगोलग पहाटे ते प्रेसला पाठवले देखील. त्यासाठी रात्रभर काम केले होते. लोकसत्तात फोटो छापलेही गेले. सगळ्यात पहिले
फोटो देणारे हे वृत्तपत्र होते.
दुसरा प्रसंग म्हणजे स्व.मोरारजीभाई देसाई ह्यांचे सुपुत्र कांती देसाई आणी राजाराम किर्लोस्कर ह्यांची कन्या पद्मा ह्यांच्या विवाह होणार असल्याची बातमी समजली. त्याचे फोटो काढायचे हे मी ठरवले. हा समारंभ पुण्यात होता. सकाळी
लवकर पुण्यात येऊन लग्नसमारंभाचे फोटो घेऊन दुपारी मुंबईकडे निघालो आणी रात्री फोटो प्रेसला गेलेले होते. त्याकाळातल्या एकूण सुविधा बघता ही मोठीच कामगिरी होती.
१९५४ साली सावंतवाडीच्या महाराजांच्या घरगुती समारंभात उपस्थित रहाण्यासाठी पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरु आलेले होते. त्यावेळी त्या समारंभाचे कवरेज करण्यासाठी मी गेलो होतो. पंतप्रधानांचा दौरा असल्या कारणाने महाराष्ट्र
शासनाचे प्रसिद्धी अधिकारी श्री. शहा तिथे हजर होते. सावंतवाडी ते रत्नागिरी असा प्रवास करण्याची वेळ आली त्यावेळी शहांचे असिस्टंट म्हणाले "सावरकर, आम्ही तुम्हाला आमच्याबरोबर नेऊ शकत नाही!". परंतू श्री.शहा म्हणाले
"अहो मी तुम्हाला ओळखतो मी व्यवस्था करीन." तिथे पलीकडेच मे.ज.जगन्नाथराव भोसले बसलेले होते, ते आमचं संभाषण ऐकत होते, ते चटकन म्हणाले " आमच्या गाडीतून चला तुम्ही सावरकर, मी तुम्हाला घेऊन जाईन!" त्याप्रमाणे
मी मे.ज.भोसल्यांच्या वाहनाने प्रवास केला. माझं काम आणि माझ्या नावाचा दबदबा असल्यानेच प्रवास सुकर झाला.
मला पुष्कळ स्टुडिओतून फ्रीलान्स काम मिळत असे. त्यापैकी एक श्री.झारापकर ह्यांचा स्टुडिओ मांगलवाडीत वेलणकरांच्या हॉटेलच्या बाजूला आहे. त्याकाळी पुष्कळसे धनिक लोक त्यांच्या घरगुती समारंभांचे, नात्यातल्या लोकांचे स्टिल
फोटो आणी फिल्म्स काढून घेत असत. तो एक षौक असे. अशाच एका कामासाठी श्री. झारापकर ह्यांचेसोबत मी गोव्याला गेलो होतो. ते १६ एम्.एम. कलर फिल्म घेणार होते आणि मला स्टिल फोटोग्राफी करायची होती. पेडण्याचे प्रसिद्ध
सावकार श्री. काकासाहेब पेडणेकर ह्यांचेकडे काम होते. त्यांच्या भल्यामोठ्या वाड्यासमोर आम्ही उभे राहिलो. वरती नगारखाना दिसला. रोज पहाटे येथे सनई-चौघडा झडतो असे मला सांगितले गेले. वाडा इतका प्रचंड होता की मी
आत जवळजवळ अर्धा फर्लांग अंतर चालत गेलेलो मला आठवते! वाड्यात कित्येक खोल्या होत्या. अतिशय बडे प्रस्थ होते. आम्ही तब्बल १५ दिवस त्यांचेकडे राहिलो! श्री. झारापकरांचा त्यांच्याशी फार चांगला परिचय होता.
एके रात्रीची गोष्ट मोठ्या लाकडी मेजापाशी पंगत बसली. खायला तिसर्यांचं कालवण होतं आणि मोठी भाकरी होती. जेवण अतिशय रुचकर होतं. श्री. काकासाहेब म्हणाले "मशेरा घ्या". (मशेरा म्हणजे काजूची दारु). मी घेत नाही असे
सांगितले खरे पण थोड्या आग्रहानंतर सगळेच घेताहेत हे बघून घेतली आणी काही वेळातच जमिनीकडे जात आहे असा भास होऊ लागला. शेजारी बसलेल्या झारापकरांना मी काय होते आहे ते हळूच सांगितले. ते म्हणाले शांत रहा,
आत्ता काही बोलू नका. जेवणानंतर कसातरी उठून हात धुतले आणि जो झोपलो तो थेट दुसर्या दिवशी ११ वाजताच जाग आली!
साधारण १९५४-५५ च्याच सुमारची एक अतिशय रंजक आठवण सांगतो. दादरला कुठल्याशा विद्यालयात पं. रविशंकर आणि कै. पं. किशनमहाराज यांच्या सतार-तबला जुगलबंदीचा कार्यक्रम होता. कार्यक्रमाला अर्थातच तुफान गर्दी होती.
झंकारणारी सतार आणी तेवढाच नजाकतदार तबला ह्यांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. जुगलबंदीत एकवेळ अशी आली की सात आवर्तनात दोघांनी एकमेकांची सम चुकवली आणी आठव्या वेळेला नेमके दोघेही जेंव्हा समेवर आले बरोबर त्याचक्षणी
माझ्या कॅमेर्याचा फ्लॅश उडाला! माझी गाण्याची समज मला ह्या ठिकाणी कामी आली. प्रख्यात व्हायोलिनवादक पं. व्ही. जी. जोग यांचे बंधू त्यावेळी तिथे होते (नामवंत संगीतकार कै. वसंत देसाईंकडे हे वायोलिनवादन करायचे), त्यांनी मला
कौतुकाने अक्षरशः उचलून घेतले. दुसर्या दिवशी लोकसत्तेत मी काढलेल्या छायाचित्रावर मथळा होता,"आमचे छायाचित्रकार नंदकुमार सावरकर समेवर आले!" अशा एकेक आठवणी अजूनही मनात घर करुन आहेत.
१९५५ च्या दरम्यान मला लोकसत्ताचे काम थांबवावे लागले कारण 'प्रभात' सिनेमाचे श्री. राजा नेने ह्यांचेकडून फिल्मसाठी स्टिल फोटोग्राफी करायला याल का अशी विचारणा झाली. पुण्याला काम होते. त्यावेळी पुण्यात डेक्कन, नवयुग आणि प्रभात
असे प्रसिद्ध स्टुडिओ होते. आमचे काम डेक्कन स्टूडिओमधे होते. (सध्या स्वारगेट एस.टी स्टँड जिथे आहे तिथून सोलापूर रोडच्या दिशेने गेले की गोळीबार मैदानाच्या आसपास कुठेसा नवयुग आणि त्याच्या थोडा पुढे डेक्कन स्टुडिओ होता).
प्रसिद्ध 'कमल टॉकीज'चे मालक आय. जी. जे. जोबनपुत्रा ह्यांनी काँट्रॅक्ट करुन आम्हाला बरोबर नेलं. माझ्याबरोबर नाशाद हे संगीतकार (नौशाद नव्हे, हे वेगळे होते) आणी मधुसूदन कालेलकर हे लेखकही होते. इतरही बरीच मोठी टीम होती पण
आता सगळी नावे आठवत नाहीत. ते पिक्चर होतं 'हा हा ही ही हो हो' अशा विचित्र नावाचं. पी.एल. संतोषी हे डायरेक्टर होते (सध्याचे प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक श्री. राजकुमार संतोषी यांचे वडील). तसा चित्रपट क्षेत्रात मी नवखा असूनही
श्री. संतोषींनी मला चांगलं सांभाळून घेतलं. प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर श्री. बाळ बापट हे फोटोग्राफीचे डायरेक्टर होते. (बाळ बापट म्हणजे - जगाच्या पाठीवर, पेडगावचे शहाणे, ऊन पाऊस, लाखाची गोष्ट इ. चित्रपटांचे चलतचित्रकार). ते एकदाच
दिसले नंतर काही कारणाने ते आले नाहीत. मग सगळी जबाबदारी माझीच होती. पण मी फक्त स्टिल फोटोग्राफी करणार होतो. त्या सिनेमाची स्टारकास्ट प्रामुख्याने शामा, सज्जन, राधाकिसन अशी होती. टेकच्या आधीची फायनल रिहर्सल चालू
असताना मला फोटो काढायला लागायचे. त्याशिवाय पोस्टर्ससाठी लागणारे स्पेशल फोटो हे खास अपॉइंटमेंट देऊन, अॅक्शन करुन घेतले जात. हिंदी बोलण्याचा फारसा सराव नसल्याने अशाच एका फोटोसेशन दरम्यान चुकून मी शामाबाईंना
"ए शामा" म्हणून गेलो त्याचा अपमान वाटून फणकार्याने त्या बोलल्या आणी मी माफी मागितलेली मला आठवते आहे.
"हे काम साधारण १ वर्षभर चालले. त्यासाठी मी डेक्कन जिमखान्याला गणेशभुवन मध्ये भाड्याची जागा घेतली होती. माझ्या रु.२५० पगारातून दरमहा रु.१५ घरभाडे देत असे. इथे माझ्याबरोबर सौ.सरलाही होती. रोज मी जेवणाचा डबा घेऊन
जात असे. क्वचित कधी सेटवरही जेवण होई. त्रासाची बाब अशी की कित्येक वेळा महिन्याचा पगार वेळेवर होत नसे. शेवटी शेवटी तर साधारणपणे तीनेक महिन्याचा पगार देखील बुडाला पण आम्ही विचारणार कोणाला? त्यामुळे घरखर्चासाठी
पुण्यातही मला बाहेरची कामे घेणे भाग पडले. ही जादाची कामे मी रात्रीत करीत असे. त्यासाठी माझे डेवलपिंगचे सामानही मुंबईहून पुण्यात मी आणले होते. माझ्या पत्नीने प्रसंगी शिवणकाम करुन संसाराला हातभार लावला. क्वचित कधी आम्हाला
एकवेळ जेवूनही काढावे लागले. तिचा फार मोठा गुण म्हणजे समाधान. खरं तर एका संपन्न घरातून आलेल्या मुलीसाठी हे कठिण दिवस होते. परंतु आपले वडील आणी माहेरच्या इतर कोणाही नातेवाईकांकडे आमच्या परिस्थितीबद्दल तिने कधी
अवाक्षरही काढले नाही. कायम चांगलेच चालले आहे असे सांगितले. तीची फार मोठी साथ मला मिळाली." आजोबांचा गळा दाटून आला होता!
ते काम संपल्यावर आमची काँट्रॅक्ट्स संपली आणी पुन्हा एकदा आम्ही रिकामे झालो. खोली तीन वर्षासाठी माझ्या ताब्यात असल्याने सौ. सरलाला पुण्यातच ठेवून मी मुंबईला परतलो.
कराचीहून आलेल्या एका सिंधी माणसाचा 'हीरो' नावाचा स्टुडिओ आणी फोटोग्राफीच्या इतर सामानाची मोठी डिलरशिप फ्लोराफाऊंटनला होती तिथे मी नोकरी करु लागलो. १९५६ मधे ३ ते ४ महिने मी तिथे काम केले.
चतुरंग
प्रतिक्रिया
14 Jul 2009 - 12:44 pm | Nile
वा! अनुभव वाचताना मजा आली. पुष्कळ नवी माहीती ही मिळाली.
अश्या वल्लीचे दर्शन तुम्ही तुमच्या खुमासदार लेखन शैलीने आम्हाला करुन देत आहात त्याबद्द्ल आभार. :)
14 Jul 2009 - 1:07 pm | रामदास
आता चौथा भाग कधी ?
14 Jul 2009 - 2:17 pm | सुनील
हेच म्हणतो.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
14 Jul 2009 - 2:32 pm | सहज
वाचतोय.
14 Jul 2009 - 10:16 pm | टारझन
झ्झकास !!
14 Jul 2009 - 2:37 pm | शाल्मली
प्रत्येक भागाबरोबर आता पुढे आजोबा काय करणार याची उत्कंठा वाढते आहे! खूपच कमाल वाटते आहे आजोबांची.
चतुरंग, या आजोबांची आम्हाला ओळख करुन दिल्याबद्दल तुमचे पुनःपुन्हा आभार!
अवांतरः- तुम्ही लिहिलेले हे भाग ते आजोबा वाचताहेत का?
--शाल्मली.
14 Jul 2009 - 4:47 pm | चतुरंग
त्यांच्या मुलाने त्यांना मोठ्या टायपातले प्रिंटाऊट्स काढून दिलेत.
पहिला भाग आणी त्यानंतर आलेल्या तुम्हा सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांनी आजोबा लहान मुलासारखे आनंदून गेले होते, सद्गदित झाले होते. मला म्हणाले की माझ्या आठवणी कोणी वाचेल असे मला वाटले नव्हते.
(समाधानी)चतुरंग
15 Jul 2009 - 8:16 am | विसोबा खेचर
माझ्या मते हीच मिपाकरता मोलाची बाब आहे. त्यांचे आशीर्वाद मिपावर आणि मिपाकरांवर सदैव राहावेत हीच इच्छा!
दंडवत...
तात्या.
14 Jul 2009 - 3:09 pm | स्वाती दिनेश
सावरकर आजोबांची गोष्ट वाचते आहे, शाल्मली म्हणते तसे ते वाचत आहेत का? जर त्यांची संगणकाशी मैत्री नसेल तर त्यांना प्रिंट आउट काढून देता येतील म्हणजे ते वाचू शकतील.
स्वाती
14 Jul 2009 - 4:53 pm | स्वाती२
छान! काय अनुभव आहेत एकएक. त्यांना लाभलेली आजींची साथही तितकीच महत्वाची.
14 Jul 2009 - 6:04 pm | लिखाळ
वाहवा ! गुणी माणसाला समोरच्यातले गुण दिसतात हे खरेच !
आठवणी फार छान आहेत. पुढे वाचायला उत्सुक आहे.
आजी-आजोबांची कमाल आहे.
-- लिखाळ.
14 Jul 2009 - 9:56 pm | प्रमोद देव
अतिशय नाट्यमय असे आयुष्य आणि त्याची तितक्याच समर्थ शब्दात केलेली गुंफण.
सावरकरांचे कथन आणि चतुरंगांचे शब्दांकन! दोन्हीही मस्त!
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
15 Jul 2009 - 2:03 am | नंदन
आहे. कथन आणि शब्दांकन दोन्ही सरस.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
14 Jul 2009 - 10:18 pm | ऋषिकेश
अनुभवपट उत्तरोत्तर रंगत जातोय.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
14 Jul 2009 - 10:20 pm | प्राजु
आजोबांची ही लेख माला आंतरजालावर हिट्ट झाली नाही तरच नवल!!!
अजब आणि विलक्षण असं व्यक्तित्व आहे हे.
आजोबांनी खरंतर पुस्तकच काढावं.
चतुरंग, ही लेखमाला आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल खूप खूप आभार!! पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आहोत.
(बाय द वे, तुम्ही भारत वारीला गेला की, मालिका ब्रेक के बाद का??)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
14 Jul 2009 - 10:51 pm | चतुरंग
मालिका आवडण्यात माझं काहीच कौशल्य नाहीये आजोबांचे अनुभवच इतके विलक्षण आणि विचक्षण आहेत की आपल्याला काही करावंच लागत नाही.
(शक्यतोवर सुटीला जाण्याआधीच मालिका पूर्ण करण्याचा विचार आहे.)
चतुरंग(कपूर)
14 Jul 2009 - 10:55 pm | प्राजु
(शक्यतोवर सुटीला जाण्याआधीच मालिका पूर्ण करण्याचा विचार आहे.)
शुभस्य शिघ्रम्!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
14 Jul 2009 - 11:22 pm | बिपिन कार्यकर्ते
काही बोलण्यासारखे नाहीच. चतुरंग, माझा नमस्कार पोचवा आजोबांपर्यंत.
बिपिन कार्यकर्ते
15 Jul 2009 - 8:09 am | सुबक ठेंगणी
खरंच निव्वळ सुरस कहाणी!
अगदी फोटोच्या अल्बमचं एकेक पान उलटत जावं तसं वाटलं!
आजोबांना नमस्कार
15 Jul 2009 - 9:17 am | दशानन
हेच म्हणतो.
अगदी फोटोच्या अल्बमचं एकेक पान उलटत जावं तसं वाटलं!
15 Jul 2009 - 4:07 am | पक्या
जबरदस्त अनुभव कथन आणि तितकच सुंदर शब्दांकन.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
चतुरंगजी , लिखाणासाठी, आपण हे सर्व तपशील कसे लक्षात ठेवलेत? रेकॉर्डीग केले की लिहून घेतले?
15 Jul 2009 - 5:07 am | मदनबाण
आजोबांची गोष्ट अगदी आवडीने वाचतो आहे. :)
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
15 Jul 2009 - 7:47 am | विकास
ही मालीका खूपच छान चालली आहे. अजून येऊनदेत!
15 Jul 2009 - 10:07 am | प्रकाश घाटपांडे
चतुरंग, उत्तम ओळख उलगडत चालली आहे. आजोबांना उत्तम सहचारिनी मिलाली.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
15 Jul 2009 - 4:57 pm | सुधीर कांदळकर
हृद्य अनुभवांना वेगवान भाषेची जोड. भावना योग्य शब्दांत पकडून छान मांडल्या आहेत. उत्सुकताहि अजूनहि कायम.
सुधीर कांदळकर.
15 Jul 2009 - 11:12 pm | अवलिया
रंगाशेट, सुरेख लेखन. :)
--अवलिया
=============================
रामायण महाभारत घडायला स्त्रीची गरज आहे असे नाही, आजकाल सही ते काम करते. ;)