कर्मयोगी! (भाग पहिला)
कर्मयोगी! (भाग दुसरा)
कर्मयोगी! (भाग तिसरा)
कर्मयोगी! (भाग चौथा)
कर्मयोगी! (भाग पाचवा)
पूर्वसूत्र : तीन-चार बाटल्या कोलोन वॉटर आणून त्याने त्याच्या जखमा आणी अंग पुसल्यावर त्याचा ताप उतरला आणि थोड्याच दिवसात जखमा भरून येऊन तो पूर्ववत झाला.
अभिजितच्या आगमनाने आमच्या संसाराचे एक नवीन चैतन्यमय पर्व सुरु झाले होते!
------------------------------------------------------------------------
अभिजित घरी आल्यानंतर नातेवाईकांच्या आग्रहाने त्याला पाळण्यात घालून त्याचा नामकरण विधी केला. हा समारंभ घरगुतीच होता. खरे तर माझ्याकडच्या नातेवाईकांचे ह्या संपूर्ण दत्तक प्रकाराबद्दलच
फारसे अनुकूल मत नव्हते. दत्तकाबद्दल थोडी नाराजी होती. त्याचे कारण असे, की बाकीच्या माझ्या भावांना अपत्ये होती मग तुलाच कशाला हवे असे सगळ्यांचे म्हणणे. परंतु माझे सासरे खंबीर होते त्यामुळे
सासरकडून सगळी नातेवाईक मंडळी हजर होती. त्यामुळे मला हे सगळे करण्यासाठी हुरूप आला. माझे स्टुडिओचे काम नेहेमीप्रमाणेच सुरु होते परंतु आता सौ.सरलाला मला मदत करणे शक्य होत नव्हते.
एके दिवशी काही महत्त्वाचे मोठे काम आले, हिची मदत लागणार होती म्हणून रात्री पाळणाघरातल्या एक नातेवाईक दातार बाईंच्याघरी अभिजितला ठेवला होता. रात्रभर काम करुन आम्ही जेव्हा दातार
बाईंच्या घरी गेलो तेव्हा तो झेप घेऊन आमच्याकडे आला. बाई सांगत होत्या "अहो हा भयंकर रडला. संपूर्ण रात्रभर डोळ्याला डोळा नाही सतत रडत होता." तेव्हापासून त्याला पुन्हा ठेवले नाही.
पत्नीची मदत बंदच झाली. होता होता अभिजित एक वर्षाचा झाला तेव्हा दत्तकविधान करुन घेतले. संस्थेतले लोक आले होते. श्रीमती अलका जोगळेकर, विजया पत्की यांचे गाणे ठेवले होते. हे सगळे लोक माझ्या
फ्लूट वादनाच्या ग्रुपमधले होते. हा समारंभ 'लोकमान्य हौसिंग सोसायटी', माटुंगा इथे पार पडला.
६ वर्षांचा असताना अभिजित 'पूर्ण प्रज्ञा हायस्कूलमधे' पहिलीत जायला लागला. त्यावेळी नॅशनल पार्कमधे चित्रकला प्रदर्शन भरले होते त्यात बालगटात त्याला ७ क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. तो मोठा
होताहोता एक महत्त्वाची बाब समजली की त्याला गणितात मार्क्स कमी मिळायचे परंतु इतर सर्व विषयात उत्तम गुण असत. शिकवणी ठेवली. मग भलतीच सुधारणा झाली. थोडा मोठा झाला तेव्हा शाळेतून तक्रारी
यायला सुरुवात झाली की तो गडबड करतो, मारामारी करतो, परस्पर मुलंना शिक्षा करतो. त्याचा आईने विचारले की काय झाले तेव्हा म्हणायचा की "इतर मुले दुसर्याच्या वॉटरबॅगेतून पाणी पितात ते बरोबर नाही,
तू मला सांगतेस, तसेच मी त्यांना सांगतो पण ते ऐकत नाहीत आणी बाईसुद्धा काही शिक्षा करत नाहीत मग मीच त्यांना मारतो!" त्याच्या सवयींवर हिचे काटेकोर लक्ष असे. त्याची शाळा सकाळची होती. ७ वा वाजता
जावे लागे. काही दिवसांनी अचानक चाळीतल्या एका मुलाबरोबर शाळेत लवकर जायला लागला ६.३० वाजताच निघत असे. हिने जरा खोदून चौकशी केली तेव्हा समजले की शाळेत लवकर जाऊन आदल्या दिवशी
विसरलेल्या पेन्सिली, खोडरबरे, आणी इतर वस्तू जमा करुन हे घेत असत. त्याला सज्जडपणाने सांगितले 'की ही चोरी आहे, तुझे वागणे बरोबर नाही', तेव्हापासून बंद झाले. मुलांना अतिशय नकळत वाईट सवयी
लागतात त्या अशा. त्याचे इंग्लिश सुधारावे ह्यासाठी टाईम्स लावला होता. बघता बघता तो आठ वर्षांचा झाला. मुंज करायचे ठरवले. अंधेरीला छोटा हॉल भाड्याने घेतला. माझा धाकटा भाऊ श्री. गोपाळराव हा गुहागरलाच असे.
तो म्हणाला मी घरच्या दुधाचे श्रीखंड आणणार. आम्ही म्हणले की एवढी उस्तवारी का करतोस? पण पुतण्याचे कौतुक इतके होते की गोपाळराव आणि सौ. वहिनी हे दोघे श्रीखंड बनवून, वाडेश्वराला नैवेद्य दाखवून,
कार्य निर्विघ्न होऊदे असे विनवून पहाटेची गाडी पकडून आली. येताना शेगटाच्या (शेवगा) शेंगा आणि असाच बराच मेवा घेऊन आली होती. मुंजीचा कार्यक्रम छानच झाला. चौथीनंतर अभिजितचे नाव विद्यामंदीर
हायस्कूल मधे घातले.
एकीकडे स्टुडिओच्या कामावर हळूहळू परिणाम व्हायला लागला होता. कामात मध्यस्थी करणार्या दलालांचे प्रस्थ वाढले होते. रेटवरुन घासाघीस होऊन 'सद्गुरु फ्रेममेकरचे' काम सुटले. त्यानंतर काही काळाने
कबे अचानकच आजारी पडून गेले आणी तेही काम कमी झाले. हा साधारण ८३-८४ चा सुमार असावा. एकीकडे अॅडव्हर्टायझिंग मधे पण स्पर्धा सुरु झाली होती. चढाओढीने कामे वाटली जाऊ लागली त्यात दलाली,
कमिशन असे उद्योग सुरु झाले. असल्या टोकाच्या व्यवहारिक तडजोडीत माझे जमेना. कामात, गुणवत्तेत कसूर करणे मला शक्य नव्हते. पैशाचा विचार मी कधीच केला नाही. काम हे चोख हवे हा आग्रह असे. अशाने
काम कमी झाले. स्टुडिओला विजेसह दरमहा रु.५०० भाडे द्यावे लागे. रोज काम नसायचे मग मी आठवड्यातून दोनदा जायचो पण तेवढ्याने भागण्यासारखे नव्हते.
पुन्हा एकदा करायचे काय असा प्रश्न आला. माझ्याकडे कल्पनांची कमी कधीच नव्हती. मी फ्लूट बरा वाजवीत असे त्यामुळे त्याचे क्लासेस सुरु करावेत असे मनाने घेतले. थोडी जाहिरात केल्यावर दोन विद्यार्थी बासरीकरता
मिळाले. 'दत्ताराम अॅडवर्टायझिंग'मधे ते कामाला होते. एक गिरगावलाहून आणी दुसरा कल्याणहून दर शनिवारी दहिसरला येत असे. दहिसरमधले न्यायाधीश श्री. सामंत ह्यांची मुलगी देखील बासरी शिकायला येऊ लागली.
माझ्या गाण्याच्या कलेची थोडी पार्श्वभूमी सांगायला हवी. माझे वडील चांगले गाणारे होते. ते भजने फार सुरेख म्हणत. तसे ते जन्मजात कलाकारच होते म्हणाना. गणपतीच्या मूर्ती उत्तम करीत, उत्कृष्ठ शिवणकाम करीत, ते
अतिशय स्किल्ड कटिंग मास्टर होते एका शिंप्याकडे त्यांनी वर्षभर नोकरीही केली होती. ज्या गोष्टीत हात घालतील त्याचे सोने करायचे असा त्यांचा पिंडच होता. मागे सांगितले त्याप्रमाणे मोठे काका हे चांगले गाणारे होते
आणी ग्वाल्हेरला शिंद्यांच्याकडे ते होते. त्यामुळे आनुवंशिक असेल पण मलाही आवाजाची देणगी होती, बासरीची आवड होती. लहानपणी मी भेंडाच्या झाडापासून अलगूज तयार करीत असे. तर त्याप्रमाणे बासरीचे क्लासेस सुरु
केले खरे पण लवकरच लक्षात आले की बासरीला तेवढे विद्यार्थी मिळत नाहीत पण हार्मोनियमला मिळतात. म्हटले चला हार्मोनियम शिकवूयात. आता सुरुवात पेटी पैदा करण्यापासून होती." मी इथे हसायला लागलो आणी म्हणालो
"तुम्ही जवळजवळ प्रत्येक गोष्ट शून्यापासूनच सुरु केली आहे ह्याचे आश्चर्य वाटते!" तेव्हा आजोबा म्हणाले ते मला फार महत्त्वाचे वाटते, ते म्हणाले "अहो वस्तू ह्या फक्त साधन असतात. मुळात कल्पना डोक्यात असायला हव्यात मग
वस्तूंची कमी भासत नाही." असो. तर पेटी मिळवायला हवी असे ठरले.
माझा मोठा भाऊ सैन्यात कॅप्टन होता ह्याचा उल्लेख मागे आला आहे (आत्याबाईंना शोधून काढणारा). तो सैन्यात कसा गेला तीही एक गोष्टच आहे. मी आठ वर्षांचा असताना माझी मुंज गुहागरात झली त्याचबरोबर ग्वाल्हेरच्या
माझ्या मोठ्या काकांच्या मुलाचीही मुंज तिथेच झाली. तेव्हा काका वडिलांना म्हणाले, "मी श्रीरामला घेऊन जातो त्याचे सगळे मी बघेन." तिथून पुढे तो सैन्यात गेला. त्यालाही आवाजाची देणगी होती आणी काकांमुळे तोही गाणे
शिकला. प्रख्यात भावगीत गायक श्री. अरुण दाते ह्यांचे गुरु कै. राजाभैय्या पूंछवाले ह्यांच्याकडे त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण झालं होतं. तर तो श्रीराम ८५ च्या सुमारास रिटायर होऊन कल्याणला रहायला आला होता. त्याची पेटी त्याने
मला देऊ केली. आता दुसरी अडचण उभी राहिली. शिकवणी करायला एकच पेटी उपयोगी नाही. कारण मी वाजवून दाखवणार आणी बरहुकूम विद्यार्थ्याने वाजवले पाहिजे. मग मी जरा वेगळा प्रयोग करायचे ठरवले. शिल्पीत
असतानाच मी पं. बी. आर. देवधर ह्यांच्या 'इंडियन म्युझिक सर्कल' इथे ऑपेरा हाऊसला दिलरुबा शिकायला जात असे. त्यामुळे माझे स्वरलिपीचे ज्ञान उत्तम होते. मग मी रागाची संपूर्ण स्वरावली पाठ करायला सुरुवात केली.
स्टुडिओत काम कमी असताना मी गाण्याची पुस्तके घेऊन हेच काम करीत असे. एकेका रागातली गाणी निवडून, संपूर्ण गाणी स्वरलिपी सह लिहून मी वह्या बनवल्या. " तुमची एखादी वही नमुन्यादाखल आहे का?"
असं विचारताच आजोबांनी एक वही काढून दाखवली. त्यातलं पान मी इथे डकवतो आहे.
"गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांसाठी मी विद्यार्थी तयार करीत असे. काळी एक, दोन तीन किंवा पांढरी एक, दोन, तीन अशा कुठच्या पट्टीमधे आवाज आहे ते विचारुन घेत असे. त्यानुसार त्या पट्टीत मी गाणे गात असे आणी
विद्यार्थ्याने त्या बरहुकूम वाजवायचे. मी तबलाही वाजवतो. त्यामुळे तालाचे ज्ञान आहेच. गाण्याची लय आणी ताल सांभाळून शिवाय पट्टीत गाणे घोटून घेतल्याने विद्यार्थ्यांची तयारी चांगली होत असे. हळूहळू माझे नाव होऊ लागले.
माझे बासरीवादनही सुरू होतेच. दहिसरला दूरदर्शनच्या ज्ञानदीप मंडळाच्या कार्यक्रमात माझे वादन झाले होते. त्यावेळी काढलेला माझा एक फोटो आहे. हा बर्याचवर्षांपूर्वी घेतलाय त्यामुळे तुम्ही मला ओळखू शकणार नाही!"
आजोबा हसून म्हणाले. (मी तो फोटो स्कॅन करुन इथे डकवलाय).
"अजून अनेक आठवणी आहेत. आता गाण्यासंबंधीच्या आठवणी सांगू लागलो तर कित्येक तास बसावे लागेल. आपण जरा निवांत बसून बोलूयात. आता मी दमलोय." मी त्यांची रजा घेतली.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
निवेदन - इथून पुढे तीन आठवडे मी भारतात जात असल्याकारणाने 'कर्मयोगी'चे पुढचे भाग हे मी परतल्यानंतर पुन्हा लिहू शकेन. तोवर नाईलाजास्तव हे क्रमशः मला असेच ठेवावे लागते आहे.
वाचकांची गैरसोय होते आहे त्याबद्दल क्षमस्व पण अशा वल्ली माणसाचे चरित्रकथन ऐकण्याकरता वाचक तेवढी कळ सोसतील ह्याची खात्री आहे. पुन्हा भेटूयात ऑगस्टमध्ये! धन्यवाद.
-चतुरंग.
प्रतिक्रिया
23 Jul 2009 - 11:56 am | स्वाती दिनेश
मागेच म्हटल्याप्रमाणे आजोबांचा जीवनप्रवास मोठा रोचक आहे.
निवेदन वाचले, वाचक कळ सोसतील ,:) भारतवारीसाठी शुभेच्छा!
स्वाती
23 Jul 2009 - 12:37 pm | महेश हतोळकर
शब्दशः सहमत.
-----------------------------------------------------------------
तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे.
-----------------------------------------------------------------
23 Jul 2009 - 12:03 pm | यशोधरा
मस्त उतरलेत आत्तापर्यंतचे भाग. नक्कीच वाट पाहीन पुढच्या भागांची.
भारतवारीसाठी शुभेच्छा!
23 Jul 2009 - 12:28 pm | सुनील
हाही भाग आवडला.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
23 Jul 2009 - 3:17 pm | शाल्मली
सुंदर!!
खरंच आहे!! पूर्ण पटले. :) खरंच, आजोबा कल्पक आहेत. म्हणूनच ते इतक्या निरनिराळ्या गोष्टी करु शकले!
जरुर.
भारतवारीसाठी शुभेच्छा!
--शाल्मली.
23 Jul 2009 - 4:55 pm | ऋषिकेश
वाचतो आहोत.. मस्त चालु आहे..
फोटो आवर्जून डकवल्याबद्दल आभार
(अभिजीतरावांचा शाळाबंधु)ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
23 Jul 2009 - 5:53 pm | विसोबा खेचर
पुन्हा एकवार दंडवत...!
तात्या.
23 Jul 2009 - 6:50 pm | मदनबाण
निवेदन वाचले... :) नक्कीच वाट पाहीन.
भारतवारीसाठी येताय... अरे व्वा. :) पुणे / मुंबई ???
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
23 Jul 2009 - 9:16 pm | क्रान्ति
खरोखरच आजोबांच्या पुढच्या निवेदनासाठी वाटेल तितकी वाट पहायची तयारी आहे. इतकं ते प्रेरणादायक आहे. :)
भारतवारीसाठी शुभेच्छा.
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी
23 Jul 2009 - 10:34 pm | स्वाती२
भारतवारीसाठी शुभेच्छा!
23 Jul 2009 - 11:26 pm | प्राजु
ऑगस्ट्ची वाट पहात आहोत. :)
लवकर या.
हॅप्पी जर्नी!! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/