कोकणकडा' एवढाच शब्द खरं तर या प्रवासाला जाण्यासाठी पुरेसा होता. पण तेवढंच नव्हतं. त्याहीपलीकडे काही गोष्टी होत्या. पहिली म्हणजे जायचं होतं तो भाग आंबेगाव तालुक्यातला होता. जैववैविध्याच्या दृष्टीने सह्याद्रीच्या रांगा या विश्वातील मोजक्या 'हॉटस्पॉट'पैकी एक. त्यात भीमाशंकरचं अरण्य (सरकारदरबारी ते 'अभयारण्य'ही आहे) महत्त्वाचं. त्याचा थोडा भाग पाहण्याची ही संधी होती. दुसरं कारण होतं डिंभे धरण. कधी तरी एकदा पूर्ण पुनर्वसन झालेलं धरण असं त्याचं वर्णन झाल्याची बातमी वाचली होती. वास्तव अर्थातच वेगळं होतं. निघालो होतो ते धरणाच्या आतल्या गावांमध्येच. जाण्याचं ठरलं तेव्हा थोडी चौकशी केली. त्यावेळी समोर आलेली माहिती हलवून टाकणारी होती. 'लोकसत्ता'मधील (बहुदा पांडुरंग गायकवाड या माझ्या मित्रानंच लिहिलेली) 'कोंडलेली गावं' ही वृत्तमालिका या गावांनी रस्त्यासाठी केलेल्या संघर्षावर आधारलेली होती. तिची आठवण निघाली. त्यामुळंही जाण्याचं नक्की झालं. महादेव कोळी आणि कातकऱ्यांची या भागात वस्ती. याआधी पावऱ्यांमध्ये गेलो होतो, कोकण्यांमध्ये गेलो होतो, भिल्लांमध्ये गेलो होतो. महादेव कोळी आणि कातकरी मात्र राहिले होते (तसे अजूनही बरेच राहिले आहेत). मिलिंद बोकिलांच्या 'कातकरी: विकास की विस्थापन' या पुस्तकातून कातकऱ्यांची थोडी ओळख झाली होती. त्याआधी अर्थातच 'जेव्हा माणूस...'मधून. या साऱ्यांनाही व्यापून घेणारं आणखी एक कारण म्हणजे देवराई पहायची संधी. ही सगळी कारणं टप्प्याटप्प्याने पूर्ण होत गेली.
***
साधारण चौतीस वर्षांपूर्वीची ही घटना आहे. खरगपूरच्या आयआयटीमधून आनंद हा युवक पुण्यात आला. कँपस इंटरव्ह्यूतून टेल्कोत त्याची निवड झाली होती. टेल्कोत काम करताना तो डेक्कन वगैरे परिसरात बॅचलर्स लाईफ जगायचा. सामाजिक भान होतं. त्यामुळं त्यातूनच टेल्कोतील कामगारांशी, पुण्यातील इतर अशाच जनसमुदायांशी नातं निर्माण करावं असं त्याला वाटू लागलं. अडचण एकच होती, हा सारा वर्ग बोलायचा मराठीमध्ये. आनंदचा मराठीशी संबंध कुठला? मग त्यानं ठरवलं मराठी शिकून घ्यायची. स्वारी शोध घेत आपटे प्रशालेत जाऊन पोचली. तेथे कुसुम नावाची शिक्षिका होती. तिच्याकडे आनंदनं मराठीचा पाठ लावला. अर्थात, आधी कुसुमनं विचारून घेतलं होतं. "परीक्षा वगैरे द्यावयाची आहे का?" आनंदचं उत्तर अर्थातच 'नाही' हे होतं. "खूप परीक्षा दिल्यात, आता नाही. भाषा शिकायची आहे." मग कुसुमनं मराठीची ओळख करून दिली आणि आनंदला थेट मराठी भावविश्वाच्याच 'दरबारा'त नेलं. त्यात पु. ल. होते, मराठी नाटकं होती, इतर असंख्य पुस्तकंही असावीत. आनंद मराठी शिकत गेला. आज तो इतका मराठी आहे की उच्चारांमधील मराठीपणाचा किंचित अभाव सोडला तर एरवी संशयदेखील येणार नाही.
आनंदला सारे मामा म्हणतात. का ते ठाऊक नाही. पण साऱ्यांचंच पाहून मीही त्याला 'आनंदमामा' म्हटलं तेव्हा, "केला का माझा मामा?" असं विचारण्याइतका तो मराठी आहे.
आनंद म्हणजे 'शाश्वत' आणि 'एकजूट'च्या दोन आधारस्तंभांपैकी एक - आनंद कपूर. दुसरा आधारस्तंभ म्हणजे कुसुम कर्णीक. आपटे प्रशालेतील तीच शिक्षिका. आंबेगाव तालुक्यातील असंख्य कातकरी, महादेव कोळ्यांच्या कुसुमताई!
'शाश्वत' ही संस्था, तर 'एकजूट' ही संघटना. 'एकजूट' संघर्षाच्या मार्गावर, त्या मार्गाला पूरक विकासाचे काम 'शाश्वत'चे.
***
आघाण्याच्या शाळेत आम्हा पाहुण्यांची सोय होती. हे गाव अवघ्या शंभरेक (अधिकतम) लोकवस्तीचं. शाळेचं नाव वनदेव विद्यामंदीर. त्यासाठी गावातीलच कोणा सहृदय माणसानं जमीन देणगी दिल्याचा फलक आपले स्वागत करतो. "ही जमीन गावकऱ्यांच्या नावावर आहे. उताऱ्यावर आम्ही ग्रामस्थ, आघाणे असंच नाव टाकून घेतलं आहे," आनंद कपूर माहिती देत असतात. मी चकीत. अशी नोंद कशी काय होऊ शकते? "केली आहे ना. त्यामागच्या उद्देश स्पष्ट आहे. या जमिनीचा कसलाही व्यवहार करावयाचा असेल तर तो ग्रामस्थांच्या मान्यतेनेच व्हावा लागेल." ही शाळा शाश्वत-एकजूट या संस्था-संघटनांच्या माध्यमातूनच चालवली जाते. पटसंख्या ४८ त्यात २७ विद्यार्थिनीच. सारे कातकरी-महादेव कोळी. शाळा मान्यताप्राप्त आहे, पण विनाअनुदानीत. त्यामुळं हात पसरून निधी उभा करतच या निवासी शाळेचे व्यवस्थापन करावं लागतं. परिसरातील १० गावांतील मुलं या शाळेत शिकतात.
शाळेच्या भिंती रंगवण्यासाठी अतिरिक्त खर्च कशाला करा, असं म्हणत शाळेच्या शिक्षकांनीच महात्मा फुले वगैरेंची चित्रे काढून भिंतींना शोभा आणली होती. चित्रांच्या दर्जापेक्षा त्यामागच्या विचारांचा दर्जा उच्च आणि म्हणून भावणारा.
***
आघाणे येथेच 'गावविकास नियोजन शिबिर' होतं. गावाच्या विकासाचं नियोजन कसं करावं, त्यात कोणकोणती जीवनक्षेत्रे असावीत वगैरे मुद्यांचा समावेश होता दोन दिवसांच्या कार्यक्रमात. शेती, पाणी, वनसंपदा, गावातील मनुष्यबळ, शिक्षण अशा या गोष्टी. राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून काही संस्था-संघटनांचे प्रतिनिधी त्यासाठी आले होते. आघाण्याची देवराई हीच शिबिराची जागा. वनदेव विद्यामंदिरातून वायव्येच्या दिशेला ही देवराई. पाच एकरांवर पसरलेली. घनगर्द. जैववैविध्यानं समृद्ध. जुनी. काही झाडं किमान दोनशे वर्षांची वगैरे असावीत. आंबा, बेहडा वगैरे झाडं होती. पण त्या वर्णनापेक्षा कुसुमताईंच्या शब्दांतील "चारस्तरीय जंगल" हे वर्णन समर्पक ठरावं. मोठी झाडे, मध्यम झाडे, लहान झाडे आणि गवत-पाचोळा असे हे चार स्तर. वर्षाकाठी २५० इंच पाऊस झेलायचा असेल तर हे वैविध्य हवंच.
देवराई हे या भागातील नाव, एका व्यवस्थेचं. परंपरागत चालत आलेली ही व्यवस्था. देवाच्या नावानं राखलेलं जंगल असं त्याचं साध्या-सोप्या शब्दांतील वर्णन. ते ऐकत होतो तेव्हाच मनात आतून हसतही होतो. काही वर्षांपूर्वी पर्यावरणीय नीतीशास्त्र या नव्या अभ्यासाची ओळख झाली होती. माणसाच्या आजच्या पर्यावरणीय (खरं तर पारिसरीक म्हटलं पाहिजे, कारण पर्यावरण ही एक मानवी व्यवस्थापनातील गोष्ट झाल्यासारखी झाली आहे आजकाल) समस्येवर मात करावयाची असेल तर पर्यावरणीय स्वरूपाचे नीतीशास्त्र असले पाहिजे असा या अभ्यासाचा विचार. आल्डो लिओपोल्ड (अ सँड काऊंटी अल्मानाक हे त्याचे या विषयावरील पुस्तक, त्यातील लँड एथिक या शीर्षकाचा निबंध वाचनीय) हा या अभ्यासविषयाचा जनक मानला जातो. या अभ्यासात सध्या सुरू असलेल्या वादाचे स्वरूप पाहिले की चक्रावून जायला होते. त्यावेळी मीही तसाच चक्रावून गेलो होतो. पर्यावरणीय नीतीशास्त्र कोणत्या दृष्टिकोनातून असावे हा या वादाचा मुद्दा. मनुष्यकेंद्री दृष्टिकोन असावा की नको; प्राणीहक्काच्या दृष्टिकोनातून या विषयाकडे पहावे का; प्राणीकल्याण हा दृष्टिकोनच कसा उपयुक्त; छे, या सगळ्या विचाराच्या मुळाशी जैवकेंद्रितता असली पाहिजे; नाहीच, हा प्रश्न स्त्रीवादी दृष्टिकोनातूनच हाताळला जावा... हे आणि असे युक्तिवाद. साऱ्यांचे उद्दिष्ट्य एकच - जैववैविध्य टिकवत पर्यावरणाचे संवर्धन करावे!
आजदेखील सुरू असलेल्या या वादाच्या कानफटात छानपैकी लगावून देणारं एक नीतीशास्त्र माझ्यासमोर जितं-जागतं उभं होतं. मनातल्या मनात मी हसण्याचं कारण तेच. देवराई! देवराई म्हणजे एक नीतीशास्त्र अशासाठी की, देवराई राखण्यासाठीचे नियम पक्के. देवराईतून काहीही घेतलं जात नाही. गळून पडलेलं झाडाचं पानदेखील. मग लाकूडफाटा-फळं वगैरे तर लांबच. देवराईत शिकार होत नाही. देवराईत प्रवेश करताना चप्पला घालता येत नसत पूर्वी. आता तो नियम थोडा शिथील झाला असला तरी, अनेक ठिकाणी काटेकोर पाळला जातो. हे दोन्ही नियम तसे सोपे. "या भागातील लोक तंबाखू खातात, पण बिडी ओढत नाहीत. माचीस हा प्रकार नाही. कारण या देवरायांचं आगीपासून रक्षण करायचं असतं. इथं आपल्यासारख्या बाहेरच्या मंडळींनीच सिगरेट आणली. पण ग्रामस्थांनी त्यांची चौकट सोडलेली नाही," आनंद कपूर सांगत असतात. इतकंच काय, काही गावांमध्ये रॉकेलचा दिवादेखील वापरला जात नाही. ही त्यांचीच पुस्ती. या देवरायांची रचनादेखील कशी आहे पहा. कुसुमताई सांगतात, "सूर्यप्रकाशावर जीवन आधारलेली झाडं (सनलव्हिंग स्पेशीज) देवरायांच्या सीमेवर असतात. छाया हाच जीवनाधार असलेली झाडं (शॅडोलव्हिंग स्पेशीज) आतल्या बाजूला."
मला कळले ते हे इतकेच नियम. पण एकदा तिथं बैठक मारून आणखी नियमांचा शोध जरूर घ्यावा असं सुचवणारे.
पर्यावरणीय नीतीशास्त्र याहून वेगळं काय असू शकेल असा सवाल मनात उभा राहतो आणि त्यावर मनच उत्तर देतं, "दुसरं काही नाही. कारण हाच भाग वृक्षवल्ली आम्हा सोयरे... म्हणणारा आहे."
वनदेव विद्यामंदिरापासून थोडं चालत पुढं पन्नासेक फूट खाली उतरलं की मध्यभागी एक छोटं मैदान. दोन्ही बाजूला पाण्याचे दोन टाके. मुळात आघाणे उंचावर. त्यामुळे वाऱ्याचा सर्वत्र मुक्तसंचार. हवा गार. ऐन उन्हाळ्यातही गार. त्यात देवराईत उतरल्यावर तर वातावरणात एकदम बदल. चहुबाजूंना असलेल्या झाडोऱ्याचा एक विशिष्ट सुगंध तिथं दरवळत होता. सूर्याची किरणं अधूनमधूनच जमिनीचे चुंबन घेण्यापुरतीच खाली उतरायची. पायाखालची माती आख्खी लाल. शिबिराचा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा मी अगदी बाहेरच्या बाजूला बसलो होतो. देवराईतील थंडावा, झाडांचा मंद सुगंध अंगभर भरून घेत. कार्यक्रमातून लक्ष उडायला फारसा वेळ लागलाच नाही. काही क्षणांत देवराईतील वेगवेगळ्या मंजूळ आवाजांनी माझा कब्जा घेतला. सारे पक्ष्यांचे आवाज. कोणता पक्षी वगैरे सांगता येणार नाही. पक्षी दिसायचेही कमीच. कारण झाडोरा अगदी गर्द.
एका कोपऱ्यातून प्चींपींपींयू... असा आवाज आला. लक्ष तिकडं गेलं. कुठल्या तरी झाडाच्या पानांच्या गच्च संभारातून ती सुरावट उमटत होती. तिथं लक्ष स्थिरावतं न स्थिरावतं तोच दुसऱ्या भागातून च्युंइंक, चीचीची... असा आवाज आला. लगेच डोकं तिकडं वळलं. इकडं मागून मघाचा प्चींपींपींयू... सुरूच होतं. तेवढ्यात कुकुर्र, कुकुर्र असा आवाज आला. मी बसलो होतो तिथून मागूनच. पन्नासेक फुटांवरून असावा. लगेच लक्ष तिकडं. पोटापासून वरचा भाग असा सारखा वर्तुळाकार हलू लागला माझा. प्रत्येक आवाज टिपण्यासाठी. कारण सारं काही मुक्तसंगीतच.
हातातील वहीत ते आवाज टिपण्याची कसरत सुरू होती. आत्ता इथं लिहिलेली ही अक्षरं वहीत आहेत. पण त्यावेळी जाणवलं ते इतकंच की हे आवाज आपल्या अक्षरांमध्ये मांडता येणारच नाहीत. त्यात काही ना काही न्यून राहतेच आहे. माणसाशी संबंधित सारे आवाज कदाचित या अक्षरांतून टिपता येतील, पण या सुरावटी? छे, शक्य नाही. हे जाणवलं आणि मग ते टिपण्याचं काम बंद करून मी शांतपणे त्या सुरावटी मनात साठवून घेण्यात गर्क झालो. तासाभराने तिथून उठताना हे सूर टिपणं हे मेंदूचं काम नाही इतकं कळलं.
या देवराईत किती जैववैविध्य असावं असा विचार करत होतो तेवढ्यात हातावर सळसळ झाली. पाहिलं तर झाडावरून 'उतरलेली' एक सहस्रपाद गोम. सरसर करीत पुढं सरकत होती. क्षणभरातच लक्षात आलं आणि मी हात झटकला. ती पडली खाली आणि सरसरतच पानाखाली निघून गेली. खरं तर, तिनं मला काहीही केलं नव्हतं. पण तिच्याविषयीची मनात बसलेली भीतीच हाताला झटका देऊन गेली. तिच्यालेखी माझा हात हा सरसरण्यासाठीचा एक पृष्ठभागच असावा. मी तिला काही करत नव्हतो तोवर ती सरसरत फिरणार होती, तिच्या-तिच्या जगण्याच्या प्रवासाचा तो एक भाग. माझ्यालेखी तिचा संभाव्य दंशच महत्त्वाचा. आणि हात झटकला गेला.
बसलो होतो त्याच्या मागच्या बाजूला गावकऱ्यांनी बांधलेलं पाण्याचं टाकं होतं. तिथं मधमाशांचं एक पोळं होतं. माशा घोंगावर होत्या. शिबिराच्या कार्यक्रमात त्यांचा 'व्यत्यय' नको म्हणून तिथं साखरेचा पाक ठेवण्यात आला होता. त्याभोवती त्यांची फिरफिर सुरू होती. त्याच टाक्यावरून आमच्यासाठी पाणी आणायचं होतं. कोणी जाऊन हापसा मारून पाणी आणलं, पण त्याच्यापाठोपाठ त्या माशा इकडं आल्या. अर्थात, कोणी उठलं नाही. बसलेल्या ग्रामस्थांनी शांतपणे डोक्यावरून रुमाल वगैरे घेतला. माझ्यासमोर एक माशी आली. हातातील वहीनं मी ती झटकण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेजारी बसलेल्या गृहस्थानं मला रोखलं. "काही करू नकोस. शांत बस. उगा हालचाल नको. ती निघून जाईल. एरवी तुझ्या मागं लागेल."
हे जंगल शेकरूसाठी प्रसिद्ध. एखादं पहायला मिळावं ही इच्छा होती. पण त्या देवराईत आमचा आवाजच इतका होता की, बिचारं झाडावर आलंही नसावं. एका उंच झाडावर त्याचं घर दिसत होतं. तशीच आणखी दोन-चार घरं दृष्टीस पडली. पण शेकरू मात्र नाही. माणसाचं अस्तित्त्वच म्हणे अनेकदा त्याला 'लपवून टाकतं.'
***
आहुपे हे गाव सह्याद्रीच्या कड्यावरचं. टोकाचं. कोकणकडा म्हणतात त्या सीमेवरचं. "(इथून) इंदवीला हाक मारून बोलवूया का?" गंमतीनं आमच्यातील कोणी तरी म्हणालं. इंदवी म्हणजे इंदवी तुळपुळे. त्या मुरबाडला असतात. आम्ही होतो तिथून खाली सुमारे तीनेक हजार फुटांवर मुरबाड तालुका. खाली समोर नजर जाईल तेवढं अंतर कोकण पसरलेलं होतं. एखाद्या स्वच्छ दिवशी सागराचं ओझरतं दर्शन घडतही असावं तिथून.
आम्ही उभे होतो त्या मैदानावर जागोजागी बिळं होती. मी कोड्यात. शेकडोंच्या संख्येत बिळं. "खेकड्यांची बिळं आहेत ही," कुसुमताई सांगतात. आणि मग एक कुतुहलजनक गोष्ट पुढं येते. पुन्हा तिचा संबंध तसा पर्यावरणाशीच. इथले आदिवासी या बिळातून खेकडे 'दळून काढतात'. हे तिथलं खास परंपरागत ज्ञान-कौशल्य आहे. ही बिळं ओली असली की त्यात खेकडा आहे हे नक्की. अशावेळी बिळाच्या शेजारी एक चपटा-सपाट दगड ठेवला जातो. त्यावर एक गोल दगड जातं फिरवल्यासारखा फिरवून घरघर असा आवाज काढला जातो. तो आवाज आला की, बिळातून खेकडा बाहेर येतो. आला की, पकडून त्याचा चट्टामट्टा केला जातो. त्या काळात खेकड्याच्या मादीच्या पोटात अंडी असतात. तीही या क्रियेत मरतात आणि खेकड्यांची संख्या आटोक्यात राहते. खेकडा हा भातशेताचा शत्रू. या भागात होणारं पिक भातच. बिळं करून-करून खेकडे खाचरं उध्वस्त करतात, त्यावर काढलेला हा असा उपाय.
पण घरघर आवाज ऐकून खेकडा वर येतो कसा? नेमकं सांगता यायचं नाही, पण त्या घरघरीचा आवाज त्याच्या बिळात आभाळाच्या गडगडाटासारखा होत असावा आणि म्हणून तो बाहेर येत असावा हा एक अंदाज. खेकडे दळणे किंवा दळून काढणे असंच म्हणतात या शिकारीला.
***
आहुप्याची देवराई पाहण्यासाठी तिथं गेलो होतो. या गावात दोन देवराया आहेत. परिसरातील आणखी एक-दोन गावांमध्ये तर तीन-तीन देवराया आहेत. आहुप्याची ही देवराई आघाण्यापेक्षा किंचित मोठी असावी. देवराईच्या पूर्व भागातून घोड नदीचा उगम आहे. तिथं खोलवर दरी आहे, पण गर्द झाडी. त्यामुळं ती पटकन कळून येत नाही. या भागात 'शाश्वत-एकजूट'चं काम सुरू झाल्यानंतर काही काळानं या देवराईसंबंधात पुण्याच्या आघारकर संस्थेच्या मदतीनं एक अभ्यास करण्यात आला. त्यातून असं दिसून आलं की, या देवराईतील एक वेल तब्बल आठशेहून अधिक वर्षांची आहे. या वेलीच्या खोडाचा व्यासच सव्वाफुटापेक्षाही जास्त आहे. जमिनीत एके ठिकाणी प्रश्नचिन्हाचा आकार घेऊन रुजत, ही वेल पुढे आकाशाच्या दिशेनं झेपावते. पहात रहावी अशी. या वेलीचं नाव काटेकोंभळ.
माणूस हाच अनेक गोष्टींचं कारण कसं असतो याचा एक दाखला या देवराईच्या निमित्तानं मिळतो. देवराईचं नीतीशास्त्र न कळत का होईना माणसानंच आकाराला आणलं. त्याची मोडतोड करण्याची वृत्तीही त्याच्यातूनच जन्माला येत असते. आणि मग देवराई विकण्याचा प्रयत्न होतो. आहुप्यात तो झाला.
पूर्वी केव्हा तरी, ही देवराई अवघ्या ७२ हजार रुपयांमध्ये विकण्याचा उद्योग गावातील पुढाऱ्यांनी केला. ग्रामस्थांना एकत्र करून हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आणि म्हणून आज ही देवराई दिसते. "तीनशे ट्रक लाकूड या देवराईतून निघालं असतं," आनंद कपूर माहिती पुरवतात. आपण अवाक् होतो. ७२ हजार रुपयांत तीनशे ट्रक लाकूड. सौदा फायद्याचा तरी किती असावा?
***
आहुप्याच्या देवराईच्या थोडं बाहेर आल्यावर आग्नेय दिशेला एक डोंगरकडा दिसतो. "वर्षातील तीन महिने या गावच्या लोकांना पाण्यासाठी त्या डोंगराच्या पलीकडे जावं लागत असे..." त्या कड्याकडं बोट करून आनंद कपूर सांगतात तेव्हा आपल्या तोंडून शब्द फुटणं अशक्य असतं. "हाती काही नसताना चालत तो कडा ओलांडून पलीकडं झऱ्यावर जाण्यासाठी पाऊण ते एक तास मला लागला होता. तिथून पाणी आणणं हा महापराक्रम. गुरांसाठी तर या गावची मंडळी तीन महिने तिकडेच मुक्काम करत," आनंद यांची पुस्ती. कितीही केलं तरी, माझ्या डोळ्यांपुढं एखादी स्त्री किंवा पुरूषदेखील डोक्यावर हंडा घेऊन तिथून पाणी घेऊन येतोय ही प्रतिमाच उभी राहू शकत नाही. महापराक्रम थोडाच याआधी पाहिला होता, अशी प्रतिमा उभी रहायला!
गावाजवळ पाण्याचा एक स्रोत होता. त्या तीन महिन्याच्या काळात वाटी-वाटीनं पाणी मिळवलं जायचं. त्या स्रोतातून. हा प्रश्न सोडवण्यासाठी काही केलं पाहिजे असं म्हणून सारे कामाला लागले आणि पुढे गावातच एक टाकं करण्यात आलं. त्या स्रोताच्या जवळच (अर्थात, हे टाकं आणि शाश्वत-एकजूटनं या भागात केलेली इतर कामं हा स्वतंत्र लेखाचाच विषय). त्या पाण्यावरच आज गाव चालतं.
हे सारं ऐकलं आणि आघाण्यात पाण्याची सोय काय असावी याचा विचार करू लागलो. रात्री त्याचं उत्तर मिळालं. वनदेव विद्यामंदिरातून हंडे घेऊन रात्री ग्रामस्थ पाणी भरत होते. सुमारे दोनेकशे पावलं चालून पाणी मिळवायचं आणि ते माघारी आणून पिपांमध्ये भरून ठेवायचं. सकाळी पाहुणे उठले की, त्यांना पाणी लागेलच ना?
माझ्यासमवेत धनंजय वैद्य होता. शिक्षणाने आर्किटेक्ट. पत्नी पल्लवी आर्किटेक्ट. दोघंही आजरा तालुक्यात (जिल्हा कोल्हापूर) एका पुनर्वसन वसाहतीत राहतात. भाड्याच्या घरात. केवळ वैयक्तिक जगणं म्हणून. कोणतीही संस्था-संघटना नाही. जे जगायचं आहे ते वेगळं, निसर्गसंवादी असावं या उर्मीतून. आर्किटेक्चरचं सारं करियर सोडून देऊन.
कुठून येतं हे भान, हा प्रश्न मी त्याच्या पुढील भेटीतील मुलाखतीसाठी राखून ठेवला आहे. त्याच्या गावी जाऊन तीनेक दिवस राहून, बाहेरून का होईना, त्याचं जगणं अनुभवण्याचा शब्दही देऊन ठेवला आहे.
रात्रीचं ते पाणी भरणं पाहात असताना दुपारचं धनंजयचं वाक्य आठवलं, "आल्या-आल्या आधी मी पाणी कुठून आणि किती मिळतं याची माहिती घेतली आणि आपण किती पाणी वापरायचं हे ठरवून टाकलं."
***
एक धरण, त्याचा प्रचंड पसरलेला जलाशय कुशीत असणाऱ्या या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं एक रूप पाहून पुण्यात परतलो. शिवाजीगनरहून पीएमटीने निघालो. महापालिका पुलावर बस आली तेव्हा नदी या नावाखाली असलेला प्रवाह पाहूनच धनंजय म्हणाला, "गटारच आहे ही. या शहराला विकसीत, प्रगत कसं म्हणायचं?"
डोक्यात तो प्रश्न घुमत असतानाच घरी पोचलो. सोसायटीत पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. आमच्या घराच्या पुढील भागात असणाऱ्या एका बड्या सोसायटीला पूर्ण दाबानं पाणी दिलं जात असल्यानं आपल्याला कमी मिळतंय, असं काही तरी आई म्हणाली. बेसीनला पाणी नाही म्हणजे माझी चिडचिड होते. वास्तवात आईनं पुरेसा पाणीसाठी करून ठेवला होता. पण बेसीन, टॉयलेटमध्ये नळ चालू नसेल तर फ्रेश वाटत नाही... मी विचारामध्येच होतो आणि इतक्यात गेले दोन दिवस आठवले. तिथं कुठं नळ होते? माझा स्वतःलाच प्रश्न. पाणी मुबलक तर नव्हतंच. नव्हे, वापरतानाही आपण काटकसरीनंच वापरलं होतं.
आणि एक ध्यानी येतं, पाण्याची मुबलकता म्हणजेच स्वच्छता व फ्रेशनेस हे मानसीकच असतं. त्यावर मात करायची असेल तर ती मनातूनच करावी लागेल.
आजअखेर पाण्याचा हा प्रश्न सोसायटीत कायम आहे. तरीही मी फ्रेश आहे!
प्रतिक्रिया
2 Apr 2009 - 10:45 pm | नाटक्या
नोंदी कुठे आहेत? काहीच दिसत नाही...
लेख दिसतो आहे आता.
2 Apr 2009 - 10:46 pm | प्राजु
काका,
लिहिलं नाहीए का अजून?
आता लेख दिसतो आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
2 Apr 2009 - 10:48 pm | श्रावण मोडक
हा काही तांत्रीक घोळ दिसतोय. संपादनमध्ये गेल्यावर मजकूर तर दिसतोय.
पुन्हा अपलोड करतो.
प्राजु, या प्रयत्नांमध्ये चुकून दोन धागे झाले तर एक उडवण्याची व्यवस्था करा.
2 Apr 2009 - 10:55 pm | प्राजु
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
2 Apr 2009 - 11:43 pm | नंदन
नोंद आवडली, सुरेख आहे अशा तुटपुंज्या प्रतिक्रियेवर बोळवण न करता येणारा लेख. तथाकथित शहरी समस्यांत गुरफटलेल्या आमच्यासारख्यांना 'ऐसी भी बातें होती हैं'च्या वास्तवाची जाणीव करून देणारा.
अवांतर - धनंजय वैद्यांचे उदाहरण वाचून 'नावात काय आहे?' हा प्रश्न चुकीचा असल्याची खात्री पटली. :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
3 Apr 2009 - 1:06 am | भाग्यश्री
सहमत.. अशा गोष्टी असतात्/घडतात कुठे याची तरी जाणीव होते तुमच्या लेखांमुळे.. त्यावर उपाय काय, आणि आपण काय करू शकतो हे न कळल्याने खिन्नता.. :|
बाकी, हा लेख वाचून सतत अतुल कुलकर्णीच्या देवराई मधले म्युझिक वाजत होते कानात.. तुम्ही तो देवराईमधला भाग इतका चित्रदर्शी लिहीला आहे की चित्र पण समोर उभे राहते आणि त्या पिक्चरचे संगीत आठवून आठवून ते अगदी रिअल वाटू लागले वाचताना..
3 Apr 2009 - 1:06 am | प्राजु
एकेक नोंदी म्हणजे आपण किती क्षुद्र आहोत याची जणू ग्वाहीच देत आहेत.
स्वतःला प्रगत समजताना आपण आपलं जीवन गोठवून टाकत आहोत का? असं वाटून गेलं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
3 Apr 2009 - 1:54 am | संदीप चित्रे
मोडकसाहेब,
तुमच्या पोतडीतून कधी काय बाहेर काढून वाचायला द्याल सांगता येत नाही.
एवढंच सांगतो की या लेखासाठी मनापासून धन्यवाद.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
3 Apr 2009 - 10:06 am | अभिरत भिरभि-या
अक्षराअक्षराशी सहमत
3 Apr 2009 - 10:08 am | दशानन
१००% सहमत.
3 Apr 2009 - 9:42 am | शिप्रा
>>पर्यावरणीय नीतीशास्त्र याहून वेगळं काय असू शकेल असा सवाल मनात उभा राहतो आणि त्यावर मनच उत्तर देतं, "दुसरं काही नाही. कारण हाच भाग वृक्षवल्ली आम्हा सोयरे... म्हणणारा आहे."
सहमत..खुप सुंदर लिहिले आहे...अजुन असेच लेख वाचायला आवडतील..
3 Apr 2009 - 10:08 am | भडकमकर मास्तर
विषयाची मांडणी आणि विशेषतः शेवट उत्तम...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
3 Apr 2009 - 12:27 pm | स्वाती दिनेश
सगळ्या नोंदी आवडल्या असं कसं म्हणू? काही नोंदी,विशेषत: पाण्याच्या प्रश्नाच्या नोंदी अस्वस्थ करून गेल्या.
स्वाती
3 Apr 2009 - 2:14 pm | अजय भागवत
अशी लोकं असतात म्हणून अजुनही जगात चांगले घडू शकते हा विश्वास बळावतो.
कोण्त्याही वर्तमानपत्राच्या फ्रंटपानावर यावी अशी आनंद ही व्यक्ति आहे...मग अजुनपर्यंत त्यांच्याविषयी का वाचनात आले नाही?
3 Apr 2009 - 2:58 pm | विसुनाना
या नोंदी अशातशा का म्हणता?
महत्त्वाच्या व्यक्तींच्या, महत्त्वाच्या कामांच्या, महत्त्वाच्या स्थानांच्या पण प्रसिद्धी झोतापासून दूर असणार्या या नोंदी आहेत.
जगात माणूस नसता तर अख्खं जग एक देवराई राहिलं असतं असा विचार मनात तरळून गेला.
3 Apr 2009 - 4:14 pm | मॅन्ड्रेक
आणि एक ध्यानी येतं, पाण्याची मुबलकता म्हणजेच स्वच्छता व फ्रेशनेस हे मानसीकच असतं. त्यावर मात करायची असेल तर ती मनातूनच करावी लागेल.
आजअखेर पाण्याचा हा प्रश्न सोसायटीत कायम आहे. तरीही मी फ्रेश आहे!
सह्ही.
at and post : janadu.
3 Apr 2009 - 4:48 pm | पहाटवारा
कुठेतरि कुणीतरि काहितरि चांगले करते आहे त्याची ओळ्ख झाल्याचे अन त्याने मन उल्हसीत झाल्याच्या भावना जास्ती कि
अशा अनुभवांना पारखे रहाण्याचे जीवन जगत असल्याच्या खेद जास्ती हे सांगता येत नाहि.
धन्यवाद !
3 Apr 2009 - 5:43 pm | भोचक
लेखन आवडलं म्हणावं की कुंठीत झालेल्या विकासाचं दुःख मानावं असं काहीसं झालंय. लेखनात शिरल्यानंतर वेगळीच भावना मनाचा ताबा घेते. त्यात आपण ज्या ऐहिक पातळीवर जगतो, त्याचीच लाज वाटायला लागते. ज्या गोष्टींचा आपण बाऊ करतो, त्या इतरांसाठी किती दूरच्या असतात, याची जाणव होते. आणि मग अपराधित्वाची भावना पछाडते.
ता.क. बालपण मोखाड्यासारख्या (जि. ठाणे) ग्रामीण भागात गेल्याने यातल्या अनेक समस्यांची कल्पना होती. पण आजही तिथे हीच परिस्थिती आहे, हे पुन्हा पाहिल्यावर फार अस्वस्थ वाटते.
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
3 Apr 2009 - 7:14 pm | प्रकाश घाटपांडे
आंबेगाव तालुक्याचा उत्तर भाग म्हणजे जुन्नर तालुका. जुन्नर तालुक्याचा पुर्व भाग व पश्चिम भाग यात भौगोलिक फरक. पुर्व भाग नगर जिल्ह्याच्या सीमेवर; दुष्काळाचे प्रमाण मोठे. ७२ च्या दुष्काळात पुर्व भागातील आमच्या बेल्हे भागातील परिसर कोरडा ठणठणीत. आमच्या शेतातील गुरांचे चारा व पाणी अभावी हाल होउ लागले . मग आमची सर्व जित्राबे (गुरे) ओतुर भागात म्हणजे जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात माळशेज घाटा जवळ स्थलांतरीत केली होती . काही काळासाठी माझा टिंग्या झाला होता.त्याची आठवण झाली.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
4 Apr 2009 - 12:29 am | अडाणि
ह्या प्रकारे गावागावात मुलभूत प्रश्न सोडवणार्या उपायांची आणि कामाची माहिती सर्वांना होइल. लेखात नमूद केलेल्या व्यक्तींची अजून माहिती मिळाली तर चांगले होइल.
-
अफाट जगातील एक अडाणि.
4 Apr 2009 - 5:17 pm | क्रान्ति
या नोंदी वाचल्या म्हणजे आपल्या रोजच्या छोट्या छोट्या समस्या, काळज्या, विवंचना यापासून वेगळ काही जगात घडत असतं याचं भान येतं आणि आपण किती क्षुद्र आहोत, याची जाणीव होते. खरच कमाल!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
4 Apr 2009 - 6:34 pm | राघव
संदीप चित्रे वर म्हणतात तसे तुम्ही काय वाचायला द्याल याची कल्पना नसते हेच खरे!
मागेही मी लिहिले होते प्रतिसादात तसेच पुन्हा लिहेन - तुमच्या नोंदी, लेख फार अंगावर येतात. अर्थात त्यात ओलावा असतोच. पण किती त्रासांत माणूस धडपडण्याची पराकाष्ठा करत असतो ते वास्तव जाणवून शहारे येतात.
नोंदी चांगल्या आहेत. अस्वस्थ करणार्या आहेत. बरेचदा वाटते की तुमच्यासोबत येतो म्हणावे म्हणून. पण शक्य होत नाही. (खरे सांगायचे तर: हिंमत होत नाही. कारण एखादी गोष्ट करायची ईच्छा मनापासून असेल तर सारी कारणे दूर सारल्या जातात. असो.)
वर तुम्ही उल्लेखलेली कार्यं बघीतली तर जाणवतं की काम करण्यासाठी कोणत्याही "जाहीरनाम्याची" गरज नसते. ते काम करण्याची गरज असते.
अवांतर: माझे बाबा साकोलीला (भंडारा) होतेत, तेव्हा ते म्हणायचे की, "गावातलं जीवन कठीण असलं तरी तेच आवडतं. " कदाचित त्यांना त्यातला आपलेपणा आवडत असावा.
राघव
4 Apr 2009 - 11:31 pm | श्रावण मोडक
सर्वांना धन्यवाद.
प्राजु - अधिक धन्यवाद. लेखाच्या प्रकाशनाचे कष्ट घेतल्याबद्दल.
'काही नोंदी अशातशाच...' या शीर्षकावर हरकती ऐकतो आहे. याआधी पहिल्या भागावेळीही एक हरकत नोंदवली गेली आहे.
असं आहे की, इथे जे नोंदवतो आहे ते खूप वरवरचं आहे. या प्रत्येक ठिकाणी त्याहीपलीकडं घेऊन जाणारं एक मूलभूत काम सुरू आहे. आधीच्या भागांतील जीवनशाळा व शाश्वत-पर्यायी उर्जेवरचे प्रकल्प, आत्ता डिंभे परिसरात सहकारी तत्त्वावर होत असलेली धरणग्रस्तांचीच मासेमारी, पाण्याचे संवर्धन असे ते विषय. हे सारे या जनसुमदायातून आकाराला आलेले असल्याने अधिक महत्त्वाचे. मला लिहावयाचे आहे ते त्या विषयांवर. त्यापैकी जीवनशाळांचा बराच कच्चा मसाला माझ्याजवळ आहे. लेखनाची बैठक जमत नाहीये. शाश्वत-एकजूटच्या कामाचेही तपशील आहेत. त्यावरून त्याविषयीचा लेख होईल. त्याच जोडीने संदिपान बडगिरे या एका अस्वस्थ माणसाशी झालेली तासा-दीडतासाची चर्चा आहे. आधीची सात वर्षे रासायनीक शेती आणि आता पूर्ण सेंद्रिय शेती. त्यांच्याविषयी याआधीही लेखन झाले आहेच, पण तो माझा स्वतंत्र लेख आहे. हे तिन्ही लेख खरे तर त्या विषयाची मूलभूत आणि वाचणाऱ्या प्रत्येकाला काही प्रेरणा देणारे ठरतील. इथेच एक प्रतिसाद आलेला आहे. भाग्यश्री यांचा, "सहमत.. अशा गोष्टी असतात्/घडतात कुठे याची तरी जाणीव होते तुमच्या लेखांमुळे.. त्यावर उपाय काय, आणि आपण काय करू शकतो हे न कळल्याने खिन्नता." ही खिन्नता पळून जाऊ शकेल असं सामर्थ्य त्या विषयांमध्ये आहे. ते असे-तसे असणार नाही. या नोंदींना अशातशाच म्हणण्यातून माझ्या मर्यादांची जाणीव स्वतःलाच करून देणे हेही साध्य होते आहे... स्वतःचीही तपासणी होतेच आहे. कारण काही गोष्टी इतक्या किरकोळ, सहजशक्य असूनही माझ्या रोजच्या जगण्यात मी करत नाही, मग त्यापलीकडे तिथल्या जगण्यातील प्रश्न आणि त्यावरचे तोडगे काढण्यातील त्यांचं मानसीक सामर्थ्य कुठून यायचं? स्वतःला ही जाणीव देत राहणं असा भाग त्या शीर्षकामागं आहे. त्याचा एक जिता-जागता दाखला वाटतोय तो धनंजय वैद्य. माझ्याच वयाचा हा गृहस्थ सगळं सोडून जेव्हा धरणग्रस्ताच्या वसाहतीत जगण्यातील साऱ्या कष्टांचा मनमुराद स्वीकार करत राहण्यासाठी जातो तेव्हा तो प्रश्न येतोच, हे भान येतं कुठून? त्याच्याही पलीकडं त्याच्या पत्नीचं खऱ्या अर्थानं जीवनसाथी ही भूमिका निभावण्याचं धाडस... मग कळतं की, खोलवरचं पाहिलं पाहिजे. महामुश्कील काम आहे ते हेच. अशी प्रतिबिंबं लाख टिपेन. आत दडलेल्याचं काय?
जगात माणूस नसता तर... वाटलं ते बरोबर. पण विसुनाना, माणसासह अशी देवराई असेल तर...? ती तिथं दिसते आजच्या या जगण्यातदेखील.