पानाआडच्या कळ्या - १: "सति"

वाचक's picture
वाचक in जनातलं, मनातलं
5 Mar 2009 - 10:26 am

वास्तविक एखाद्या पुस्तकाने इतके झपाटून जाण्याचे वय (आणि मन) आता राहिलेले नाही. म्हणजे वय खूप झाले असे नव्हे तर आता नवथरपणा जाउन कशालाही पटकन दिलखुलास दाद देण्याची, शिफारस करण्याची खोड जाउन अंगी एक (उगिचच) शिष्टपणा आला आहे. पण ह्या पुस्तकाने मात्र झपाटून टाकले आहे. गेले कित्येक महिने, वाचल्यापासूनच, ह्यच्यावर कहीतरी लिहिले पाहीजे, दुसर्‍या कुणालातरी सांगितले पाहीजे असे तळापासून वाटत होते.

एवढे काय आहे ह्या पुस्तकात ? आणि पुस्तक तरी कोणते ?
ते पुस्तक म्हणजे "सति" - लेखक - प्रविण पाटकर (मॅजेस्टिक प्रकाशन - १९९६)

सत्यांश असलेल्या कथा किंवा कथेच्या अंगानी जाणारे, साधारण युनिक फीचर्स च्या साच्यात चपखल बसतील असे लेख अशी ह्या पुस्तकाची ओळख करुन देणे म्हणजे त्या पुस्तकावर धडधडीत अन्याय होय. प्रविण पाटकर हे स्वत: हाडाचे कार्यकर्ते आणि त्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून गोळा केलेली ही पुंजी - अत्यंत वेगवेगळ्या विषयांची एक दुसरी बाजू आपल्याला दाखवते आणि अशा सहज शब्दात - कुठलाही अभिनिवेश न आणता. अनेक विषय -हिजडे, वेठबिगार, वेश्या, ड्रग्ज, आदिवासी, समाजसेवक, राजकारण - पल्ला प्रचंड आहे आणि एवढा मोठा असूनही कुठेही काहीही 'वरवरचे , उथळ' वातत नाही हे ह्या पुस्तकाचे वैशिष्ट्य. (प्रत्यक्षात कसाही असला तरी) लेखकाचा प्रामणिकपणा पानोपानी जाणवत रहातो आणि म्हणूनच संवेदनशील वाचकाला अस्वस्थ करण्याची ताकद ह्या पुस्तकात आहे.

"सती" कथेत समाजसेवेचे भूत डोक्यावर स्वार झालेल्या बापाने केलेली सख्ख्या मुलीची फरपट आपल्याला अधांतरी ठेवते आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या आयुष्याला अशी पण एक बाजू असू शकते ही कदाचित नविनच जाणिव करुन देते. ह्या कथेतला काळ थोडासा जुना आहे, म्हणजे आदर्शवादावर विश्वास ठेवून 'क्रांती' घडवून आणायला निघालेल्या तरुणाईच्या भ्रमनिरासाची सुरुवात असणारा - पण म्हणून 'आज' सुद्धा काहीच बदलले नाहीत ह्या वास्तवाची जाणिव अजूनच प्रखर होते. आदिवासींच्या शोषणाच्या बातम्या आपण वर्तमानपत्रातून, मासिकातून वाचलेल्या असतात - पण कथेच्या माध्यमातून येणार्‍या ("मध") नायिकेच्या आयुष्याची हलाखी अजूनच तीव्र होते.

ह्या सगळ्या पुस्तकाचे एक अंगावर येणारे ठळक वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या समस्येची दुसरी बाजू - जी बहुतेकवेळा अंधारात असते - कधी उपेक्षेमुळे तर कधी जाणुनबुजून. ड्रग्ज घेणार्‍यांबद्दल आपल्या मनात थोड्या सहानुभूतीबरोबरच थोडी चीड असू शकते पण त्यांना मदत करणार्‍या समाज्सेवी संस्था, व्यक्तींबद्दल मात्र आदरच असतो - पण त्याची दुसरी बाजू पाटकर कुठलाही आव न आणता दाखवतात. तीच गोष्ट वेश्यावस्तीतल्या समस्यांची. आणि इथे मात्र पाटकरांच्या लेखनातील प्रामाणिकपणा मनाला भिडतो कारण त्यांच्या पत्नीचे कामच वेश्यावस्तीत आहे - वेश्यांच्या मुलांसाठीची सपोर्ट सिस्टीम तयार करण्यात. एड्स चा वाढता प्रसार रोखण्यासाठी सरकारने, स्वयंसेवी संस्थानी योजलेले उपाय किती वरवरचे, दिखाउ आणि बिनकामाचे आहेत हे "जगबूड" आणि "काळोख लाल रंगाचा" ही कथा आपल्यापुढे मांडते - त्याचप्रमाणे ह्याच उपेक्षितांच्या जगण्यावर 'स्टडी' करुन आपली पोळी भाजून घेणार्‍या लोकांची निर्लज्ज धडपड सुन्न करुन टाकते.

वेठबिगारी थांबवण्याचे प्रयत्न सुद्धा पुरेशा नियोजनाअभावी शेवटी कसे फसतात हे वाचून हादरा बसतो. ते पाटकरांच्या शब्दात देण्याचा मोह आवरत नाही -

वेठबिगारी म्हणजे मजुराला आपले श्रम खुल्या बाजारात विकण्याची संधी नाकारणे आणि प्रचलित दरापेक्षा त्याला कमी वेतन देणे - ह्या दोन गोष्टी सरकारी कायद्यानुसार वेठबिगारी सिद्ध करतात.
आत मूळ मुद्दा म्हणजे - सगळे "काम देणारे - मालक" हे एकजुटीचे (आणि बहुतकरुन वरच्या वर्णवर्चस्वाचे ) - जिथे कामाला हजार माणसे मिळू शकतात तिथे एकाच माणसाला कोण बांधून ठेवेल ? आणि एका मालकाने काम नाकारले की सगळेच तसे करणार - मग मजुराकडे पर्याय काय? दुसरा मुद्दा म्हणजे प्रचलित दराचा - एखाद्या स्थानिक ठिकाणी सगळे मालक जो दर देणार तोच प्रचलित दर - आणि हरकाम्या गड्याचा प्रचलित दर काढायचा तरी कसा ? जोपर्यंत रोजगाराची पर्यायी व्यवस्था उपलब्ध होत नाही तोपर्यंत हे असेच चालू रहाणार.

आता हा मुद्दा असा समजविल्याशिवाय माझ्यातरी अजिबात लक्षात येउ शकला नसता. आणि असे विचार ह्या पुस्तकात अगदी पानोपानी आहेत. हिजड्यांच्या जीवनावरच्या कथेत ("विसंग") आपल्याला दुरुनही किळसवाणे वाटणारे एक वेगळेच जग जवळून बघायला मिळते आणि माणूस म्हणून आपण प्रगल्भ होत रहातो. आपण आजवर जगत आलो ते जीवन किती वेगळ, किती सुरक्षित आहे ह्याची जाणिव होउन अंगावर काटा येतो.

भाषा, शैली ह्या गोष्टींकडे लक्ष न देताही एखादे पुस्तक किती वाचनिय होउ शकते ह्याचे हे उत्तम उदाहरण. जागोजागी आलेले पात्रांच्या तोंडचे विचार तर एखाद्या 'सुविचार' वहीत लिहून ठेवावे असे - आणि तरीही त्या त्या पात्राच्या एकंदर जातकुळीशी अजिबात विसंगत न दिसता. "मुक्ती" कथेत एक "श्री. वाटवे" नावाचे ग्रुहस्थ आपल्याला अनेक मौलिक विचार देवुन जातात. काही उदाहरणे बघा - "भिती हा शरिराचा गुणधर्म नाही - मनाचा आहे" - "ज्या क्षेत्रात इनसाईट मिळवायची त्यावर माणसाने आपली उपजिविका आणि महत्त्वाकांक्षा अवलंबून ठेवू नये - पोट आड येत" ह्या कथांच वैशिष्ट्यच हे आहे की आशय, पात्रे आनि विचार काही म्हणता काही तुमची सहजासहजी पाठ सोडत नाही - अर्थात 'कातडी कमावलेली नसेल' तरच

नक्कीच एक अस्वस्थ करणारा अनुभव देणारे, विचार करायला प्रवृत्त करणारे पुस्तक आणि मला सुदैवानी जाणिव झाली की (अजून) माझी कातडी "जाड" झालेली नाही.

(मला माझ्या एका ज्येष्ठ लेखिका स्नेह्यांमुळे अशी पुस्तके वाचायला मिळाली की ज्यांना मी इतर वेळी हात सुद्धा लावला नसता आणि आता कळतय की मी कशाला मुकलो असतो - तोच आनंद मी तुमच्याबरोबर वाटून घेण्या साठी अधून मधून ह्या "पानाआडच्या कळ्या" दाखवायचा विचार आहे)

कलासंस्कृतीवाङ्मयसमाजजीवनमानप्रकटनविचारअनुभवप्रतिक्रियाआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

5 Mar 2009 - 10:33 am | मुक्तसुनीत

वाचक ,
झणझणीत अंजन घालणार्‍या पुस्तकाचा समर्थ परिचय. मनःपूर्वक धन्यवाद ! आता एक मात्र नक्की करा :
१. पाटकरांची इतर पुस्तके कोणती तेही सांगा !
२. "त्या" ज्येष्ठ लेखिका स्नेह्यांमुळे माहिती झालेल्या इतरपुस्तकांची यादी इथे सत्वर द्या !

मी पाटकरांचे हे पुस्तक ऑर्डर करतोय !

सहज's picture

5 Mar 2009 - 10:39 am | सहज

पुस्तक भलतेच अस्वस्थ करणारे दिसतेय.

आजुबाजुला, माध्यमात, परत पुस्तकात अशीच अस्वस्थता पाहून शेवटी हिरो नं १ किंवा चोप्रा-जोहर सिनेमा अचानक आवडू लागतो.

पानाआडच्या कळ्या नाव आवडलं :-) पण आजकाल कसलही विडंबन यायची फॅशन आहे "पानाआडच्या अळ्या" नाव नक्कीच कोणानाकोणाच्या डोक्यात आले असणार आहे ;-)

मुक्तसुनीत's picture

5 Mar 2009 - 10:41 am | मुक्तसुनीत

या शीर्षकावर विभावरी परुळेकरांच्या "कळ्यांचे नि:श्वास" ची सरळसरळ छाया वाटते. (शीर्षकावर ; पुस्तकावर नव्हे , याची कृ. नोंद घ्या !)

वाचक's picture

6 Mar 2009 - 1:00 am | वाचक

हे पाटकरांचे दुसरे पुस्तक - आणखी असतील तर माहिती नाही (हे ही अजून वाचले नाहीये पण मिळणार आहे एका आठवड्याभरात)
ह्याच्या पुढचे पुस्तक डोक्यात आहे ते श्री. दा. पानवलकरांचे "संजारी" - अप्रतिम

(शिर्षकावर कळ्यांचे निश्वास ची छाया नाही :) पानाआडच्या कळ्या कारण ही सगळी पुस्तके तुलनेने बरीच अप्रसिद्ध आहेत. )

विसोबा खेचर's picture

6 Mar 2009 - 1:20 am | विसोबा खेचर

(मला माझ्या एका ज्येष्ठ लेखिका स्नेह्यांमुळे अशी पुस्तके वाचायला मिळाली की ज्यांना मी इतर वेळी हात सुद्धा लावला नसता आणि आता कळतय की मी कशाला मुकलो असतो - तोच आनंद मी तुमच्याबरोबर वाटून घेण्या साठी अधून मधून ह्या "पानाआडच्या कळ्या" दाखवायचा विचार आहे)

उत्तम कल्पना, भरभरून स्वागत...!

वाचकगुरुजी, आपल्या व्यासंगाला प्रणाम..

तात्या.

नंदन's picture

6 Mar 2009 - 1:38 am | नंदन

सुरेख ओळख करून दिलीत. संजारी आणि यादीतील अन्य पुस्तकांबद्दलही वाचायला आवडेल.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्राजु's picture

6 Mar 2009 - 5:54 am | प्राजु

एका उत्तम पुस्तकाची ओळख करून दिलीत.
हे पुस्तक यादीत समाविष्ट केले आहे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

आनंदयात्री's picture

6 Mar 2009 - 3:07 pm | आनंदयात्री

धन्यवाद वाचक. पुस्तक जरुर वाचेन.

लिखाळ's picture

12 Mar 2009 - 8:01 pm | लिखाळ

चांगल्या पुस्तकाची चांगली ओळख. पानाआडच्या कळ्या हे शीर्षक लेखाची तळटीप वाचल्यावर आवडले.

धागे उभे आडवे या (बहुधा हेच नाव) अनिल अवचटांच्या पुस्तकात असेच निरनिराळ्या लोकांचे, त्यांच्या प्रश्नांचे वर्णन वाचल्याचे स्मरते.
-- लिखाळ.

चकली's picture

12 Mar 2009 - 8:33 pm | चकली

छान लिहले आहे. शीर्षक पण समर्पक. पुढील लेख वाचण्यासाठी उत्सुक आहे

चकली
होळी स्पेशल रेसिपी - पुरणपोळी