वेंकटने तीन हजार रियाल खात्यात जमा झाल्याचे स्क्रीनवर पाहिले. सिगरेट क्रश केली. उठला. पुढच्या महिन्यात किमान शंभर रियाल तरी वाढवा, नाहीतर हा मी निघालो सौदीला, असं उद्या बॉसला दमात घेऊन सांगायचं, असा विचार करून तो पार्किंगकडे वळला.
दुपारच्या टळटळीत उन्हात रस्त्यावर फारसं कोणी नव्हतं.... मागे पडण्याऱ्या दुतर्फा खजुराच्या झाडांबरोबर त्याचे विचारही पळू लागले. ‘..... काये त्याला अक्कल? मी आलो आणि लेबर प्रॉब्लेम मिटवला. कामं मार्गी लागली. मी कागदावर काय आहे, काय नाही, ते जाऊ दे यांच्या उंटाच्या ***. पण प्रोजेक्ट मार्गी लागला ना! उद्या हीच इमारत उभी राहिली कि महिन्याला हजारो रियाल खिशात घालेल, तेव्हा हा वेंकट नाही आठवणार! साला, हीच वेळ आहे, नाक दाबून तोंड उघडायला लावायची.’
तितक्याच गतीने त्याने कार गर्रकन भव्य Money Exchange Centre कडे वळवली. उतरला. मेसेजची रिंग वाजली. व्होईस मेसेज होता.... अम्माचा. तिला टाईप करता येत नाही. आवाज पाठवते. तिचा मेसेज म्हणजे ऐकणे आले. तो आवाज बोलत होता, ‘वेंकी....... घरी ये बाबा. बास झाले पैशे. इथे मी एकटी... एवढा मोठा मळा, एवढे मोठे घर, मला होत नाही. गुडगे दुकतात. आता डोळ्यांना लांबचे दिसत नाही..आलीकडे तर एक हात थरथरतो. रात्री झोप येत नाही.... नोकर ते नोकर. तू घरी ये. काल स्वामी येऊन गेले. पोरगी अजून किती वर्षं ठेवू म्हणत होते... तू घरी ये.....’ तिचा आवाज विद्ध झाला होता. आर्जव होते त्या आवाजात.
तो क्षणभर थांबला. अशा मेसेजेसना त्याने उत्तर देणे अलीकडे बंद केले होते. ‘माझे मन भरेपर्यंत मी रियाल कमावणार. मग काय इंडिया आपलाच. घर आपलेच.’
आजचा इंडियन रुपीचा रेट पाहिला. खुश झाला. तीन पैकी हजार पाठवावेत. बाकी दोन हजार दुबईसाठी. न्यू इयर सेलिब्रेशन. मनात हिशोब केला.इंडियात पैसे पाठवले.
बाहेर पडला. तितक्यात, दोन उंचेपुरे पाकिस्तानी कि अफगाणी त्याच्या मागोमाग झपझप येत असल्याचे त्याला जाणवले. त्याने लगेच आपल्या चालण्याचा वेग वाढवला. ते ही त्याच्या मागोमाग. दुपार असल्याने त्या भव्य कॉम्प्लेक्स मध्ये कुणीच नव्हते. त्यांचा सणसणीत पाठलाग त्याच्या बुटक्या देहाला जाणवत होता. घशाला कोरड पडली. तो वळणार, इतक्यात त्या दोघांनी त्याला झपकन गाठले.
गोरेपान, धरधरीत नाकाचे, पठाणी ड्रेस घातलेले, खांद्यावर पंचा सोडलेले दोघेही...‘साबजी ...’ म्हणाले, तेव्हा त्याचा जीव स्थिर झाला. खरे तर लेबरलोक सांभाळताना, त्यांना वाचायची त्याला सवय झाली होती. पण कधी कुणाचा काय भरवसा, म्हणून त्याला त्या दोघांचा पाठलाग घाबरवून गेला.
त्या दोघांच्या डोळ्यात कमालीचे आर्जव होते. कुठेतरी साईटवर काम करणारे होते. त्यांची ना धड हिंदी, ना पंजाबी... त्यांच्या जगण्यासारखीच त्यांची धेडगुजरी भाषा. त्यांनी शेवटी सांगितले, ‘साबजी, ATM मधून रियाल काढायचेत. काढलेले रियाल घरी पाठवायचेत. आमाला जमत नाही. दरवेळेस आम्ही अशीच कुणाची तरी मदत घेतो... हुजूर, तुम्ही मदत करा.’
त्यांच्या ओबडधोबड, कष्टी जगण्याला फक्त आर्जव, विनंतीच माहित असावी.
वेंकटने त्यांचे कार्ड घेतले. मशीनमध्ये घातले. बाजूला झाला, म्हणाला पिनकोड घाला. त्यांच्या घाऱ्या डोळ्यात लाचारी आली, एकाने लगेच बंद मुठ उघडली. त्यात एका चिटोऱ्यावर चार आकडे दिसले. ‘साबजी... पिनजी!’
वेंकटने मुकाट्याने आकडे दाबले. Balance 40 रियाल. त्याने विचारले,‘किती काढायचे? किती ठेवायचे?’
त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले. आपापसांत काहीतरी बोलले. ‘गल्ल नही..’ एवढेच त्याला कळले.
‘पस्तीस काढा,घरी पाठवतो. पाच ठेवा..’
मग त्यांनी तुटक्या फुटक्या हिंदीपंजाबीत जे सांगितले त्यावरून त्याला कळले,
त्यातल्या एकाची आई सिरीयस आहे. दवाखान्याचे बिल थटलेय. पाच रियालमध्ये महिना काढायची त्याची तयारी होती. मित्र त्याच्याकडून जेवणाचे पैसे घेणार नव्हता.
वेंकटला या गोष्टी नव्या नव्हत्या. इतके टक्केटोणपे खाल्ल्यावर मन दगडासारखे झाले होते....पण जेव्हा त्याने पाच पाच रियालच्या सात नोटा हातात धरल्या, आणि त्या दोन तगड्या, जमिनीला नजर खिळवून उभ्या असलेल्या, चिंतेत बुडून गेलेल्या माणसांकडे पाहिले, तेव्हा त्याच्या मनात काहीतरी हलले. त्या सात नोटा, त्याच्या खिशातल्या दोन हजार रियालपेक्षा जड वाटू लागल्या. काहीच बोलला नाही.
एक्सचेंज counter ला गेला.
‘किती पाठवायचेत?’
‘शंभर रियाल...’ वेंकट म्हणाला. पस्तीसमध्ये आणखी पासष्ठ रियाल त्याने घातले. फॉर्म वगैरे भरला. रियालचे अफगाणी होऊन ते अफगाणीस्तानच्या मार्गाला लागले होते.
‘हो गया भाई तुम्हारा काम...’ म्हणत बाहेर आला. अचानक, त्याला भर दुपारचे ऊन कोवळे भासले.
कारमध्ये बसला. एसी चालू केला. उन्हात पायी रस्ता ओलांडणारे ते दोन अफगाणी त्याला दिसले. अम्माचा मेसेज परत ऐकला. तिला उत्तर पाठवले, ‘अम्मा.. आज रात्री फोनवर बोलू सगळं.’
(अफगाणी – अफगाणीस्तानची करन्सी)
@शिवकन्या
प्रतिक्रिया
9 Mar 2018 - 11:55 am | मराठी_माणूस
छान
9 Mar 2018 - 11:55 am | एस
सुखांत शेवट आवडला.
9 Mar 2018 - 12:11 pm | जेम्स वांड
वेंकट निड्स टू कम बॅक टू होम ए.एस.ए.पी!!
बाकी गोष्ट छान छानच आहे!
9 Mar 2018 - 12:28 pm | उपेक्षित
मस्त, आवडली कथा
9 Mar 2018 - 12:36 pm | अनिंद्य
टचिंग. अम्मा रेजड अ गुड बॉय :-)
12 Mar 2018 - 8:44 pm | शिव कन्या
अनिन्द्य.... एकदम सही. कथेचे मर्मच सांगितले. धन्यवाद.
9 Mar 2018 - 12:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर कथा !
9 Mar 2018 - 1:28 pm | सिरुसेरि
छान कथा
9 Mar 2018 - 2:44 pm | असंका
सुरेख!!
धन्यवाद!!
9 Mar 2018 - 2:56 pm | वडगावकर
अप्रतिम, अरेबियन डेज आठवले. टॅक्स फ्री रियाल्स ची मोहमाया खरंच सुटवत नाही
कित्येक वर्षांपासून,भारतात आपलं कुटुंब ठेऊन एकांडं आयुष्य जगणारे अल-ज्युबेल मधले मित्र...
12 Mar 2018 - 8:46 pm | शिव कन्या
होय, ते रीयालच्या मोहात आईची / घरची माया सुटली नाही, तर तीच खरी मिळकत म्हणायची.
9 Mar 2018 - 3:12 pm | सस्नेह
आटोपशीर पण टचिंग कथा.
10 Mar 2018 - 10:05 am | विनिता००२
डोळे पाणावले. खरंच आहे, आपल्याला मिळेल तेवढे कमीच वाटते
10 Mar 2018 - 11:10 am | अभ्या..
तुकड्यातला तुकडा
चांगले असते, असावे असे बंधन नसते पण...
12 Mar 2018 - 8:52 pm | शिव कन्या
बंधन नसताना, घडून जाते.... संस्कार म्हण, जाणीव म्हण .... किंवा काहीच नको ...
प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.
10 Mar 2018 - 4:04 pm | manguu@mail.com
छान
10 Mar 2018 - 4:33 pm | पद्मावति
कथा आवडली.
10 Mar 2018 - 6:34 pm | तुषार काळभोर
एकदम अंदरतक छु लिया.
10 Mar 2018 - 7:19 pm | अनन्त्_यात्री
आवडली.
10 Mar 2018 - 10:39 pm | सुखीमाणूस
माणुसकीच्या झर्याची गोष्ट मस्त आहे
11 Mar 2018 - 12:39 am | चामुंडराय
हृदयस्पर्शी कथा.
अवांतर : ३५ रियाल म्हणजे साधारणतः किती पाकिस्तानी किंवा अफगाणी पैसे?
11 Mar 2018 - 4:51 pm | अनिंद्य
@ चामुंडराय,
ह्या आगाऊपणाबद्दल लेखकाची क्षमा मागून :-
सौदी अरेबियाप्रमाणेच इराण, ओमान, येमेन आणि कतार ह्या देशाचे चलनही 'रियाल' आहे - अर्थातच प्रत्येक देशाचे वेगळे वेगळे रियाल. वेंकटच्या तोंडी सुरवातीलाच ''पुढच्या महिन्यात किमान शंभर रियाल तरी वाढवा, नाहीतर हा मी निघालो सौदीला'' असे शब्द असल्यामुळे ही घटना सौदीत घडली नसावी.
मग तुमच्या प्रश्नाचे उत्तर :-
३५ इराणी रियाल असतील तर - (अंदाजे) १२ पाकिस्तानी पैसे /० किंवा नगण्य अफगाणी
३५ ओमानी रियाल असतील तर - (अंदाजे) १०००० पाकिस्तानी रुपये / ६३०० अफगाणी
३५ येमेनी रियाल असतील तर - (अंदाजे) १५ पाकिस्तानी रुपये / ९ ते १० अफगाणी
३५ कतारी रियाल असतील तर - (अंदाजे) १०६० पाकिस्तानी रुपये / ६६६ अफगाणी
याउप्पर सौदीचेच ३५ रियाल असतील तर - (अंदाजे) १०३० पाकिस्तानी रुपये / ६५० अफगाणी
दमलो आता :-)
अवांतराबद्दल क्षमस्व, पण राहवले नाही :-)
अनिंद्य
11 Mar 2018 - 10:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
हे आकडे कोणत्या दिवसाचा चलनदर वापरून लिहिले आहेत, हे पण द्या... दर दिवशी चलनदर बदलू शकतो :) ;)
12 Mar 2018 - 12:06 am | चामुंडराय
अनिंद्य सर, माहिती बद्दल धन्यवाद.
दवाखान्याचे बिल द्यायचे असल्याने ते ओमानी रियाल असावेत अशी अपेक्षा.
इराणी रियाल ची किंमत एव्हढी नगण्य आहे ??
अवांतर : इंटरनॅशनल ट्रेडिंग मध्ये हे सगळे रियाल वेगवेगळे कसे दाखवतात? म्हणजे भारतीय रुपया जसा INR किंवा ₹ असा दर्शवतात त्याप्रमाणे हे रियाल प्रत्येक देशाचे कसे दाखवतात?
12 Mar 2018 - 11:12 am | अनिंद्य
@ डॉ. म्हात्रे - चलन दर कालचा वापरला होता.
@ चामुंडराय,
इराणी रियाल - IRR (होय, या चलनाची अवस्था वाईट आहे सध्या)
ओमानी रियाल - OMR
येमेनी रियाल - YER
कतारी रियाल - QAR
सौदी रियाल - SAR
12 Mar 2018 - 8:56 pm | शिव कन्या
चामुंडराय, अनिंद्य, डॉ. म्हात्रे..... चलनाचा घरचा अभ्यास करून इथे सांगितल्या बद्दल धन्यवाद.
लिहीणारीचे कष्ट वाचवलेत.... :-)
12 Mar 2018 - 12:06 am | चामुंडराय
अनिंद्य सर, माहिती बद्दल धन्यवाद.
दवाखान्याचे बिल द्यायचे असल्याने ते ओमानी रियाल असावेत अशी अपेक्षा.
इराणी रियाल ची किंमत एव्हढी नगण्य आहे ??
अवांतर : इंटरनॅशनल ट्रेडिंग मध्ये हे सगळे रियाल वेगवेगळे कसे दाखवतात? म्हणजे भारतीय रुपया जसा INR किंवा ₹ असा दर्शवतात त्याप्रमाणे हे रियाल प्रत्येक देशाचे कसे दाखवतात?
12 Mar 2018 - 11:33 pm | डॉ सुहास म्हात्रे
इथे जगातल्या सर्व चलनांची चिन्हे व अक्षरांतील "करन्सी कोड्स" सापडतील.
12 Mar 2018 - 12:11 am | चामुंडराय
सॉरी, माझ्या मूषकाची तब्येत बिघडलेली दिसतेय !
तो प्रत्येक प्रतिसाद क्लोन करतोय :)
एक प्रतिसाद कृपया उडवावा.
11 Mar 2018 - 3:46 am | फारएन्ड
आवडली
11 Mar 2018 - 5:16 am | श्रीरंग_जोशी
हृद्य कथा भावली.
11 Mar 2018 - 8:01 pm | Nitin Palkar
कथा आवडली.
11 Mar 2018 - 10:41 pm | मुक्त विहारि
परत वाळवंट नको रे बाबा....
12 Mar 2018 - 7:09 pm | मराठी कथालेखक
छान
12 Mar 2018 - 8:57 pm | शिव कन्या
सर्व जाणकार वाचकांचे मनापासून आभार.
14 Mar 2018 - 11:17 am | जव्हेरगंज
मस्तच!
14 Mar 2018 - 1:56 pm | चिर्कुट
सकारात्मक शेवट आवडला..