आपल्याला हिंदी चांगलं कळतं असं मराठी माणसाला उगाचच वाटत असतं. म्हणजे त्यात थोडं तथ्य नक्कीच आहे. अहिंदी भाषिकांमध्ये मराठी लोकांनाच हिंदी जास्त चांगली कळते आणि बोलताही येते. पण म्हणून आपण आपली संपूर्ण अभिव्यक्ती त्या भाषेत करू शकतो असं नाही. आता हा अनुभव महाराष्ट्रात तितका येणार नाही. पण उत्तरेकडे गेल्यानंतर अनेकदा हिंदी चांगली समजत असूनही अनेकदा आपला 'मोरू' होतो.
इंदूरमध्ये सुरवातीला आल्यानंतर हिंदीत संवाद साधणं काही कठीण नाही, अशीच भावना होती. पण काही दिवसात आपोआपच विकेट पडायला सुरवात झाली. बायकोने एकदा तूप आणायला लावलं. इथे दुध-दुभतं भरपूर. त्यामुळे त्याची दुकानही बरीच. ऑफिसातून घरी परतताना एका दुकानासमोर गेलो आणि एकदम बोललो 'एक किलो तूप देना'. त्याला काही कळेचना. बरं तो माझ्याकडे विचित्र नजरेने पहायला लागला. मला कळेचना काय झालं. मग माझ्या लक्षात आलं. तुपाला हिंदी दुसरंच काही तरी म्हणतात. मग मी काय म्हणतात ते आठवायला लागलो. जाम आठवेचना. मग त्याच्या दुकानावर नजर फिरवायला लागलो. तेव्हा 'घी' असं नाव दिसलं. तेव्हा जीवात जीव आला आणि त्याला 'घी' द्यायला सांगितलं. त्या माणसाची विचित्र नजर त्यानंतरही कायम होती.
एकदा असंच बायकोने मिरे आणायला (वाटायला नव्हे) लावले. दुकानात गेलो. त्याला सांगितलं, 'मिरे द्या'. तीच गत. त्याला काही कळेचना. मग मी त्याला त्या मिर्यांचं वर्णन करायला लागलो. 'वो नहीं क्या काले काले होते है. गोल गोल दाने होते है'. माझ्या या वर्णनावरून त्याला बहुधा अदमास आला असावा. मग त्याने समोरच्या कपाटातून एक छोटा खोका काढून दिला. त्यावर लिहिलं होतं, 'काली मिर्च'. खाली चित्रही होतं. मी मनातल्या मनात 'हुश्श' म्हटलं. आणि त्याला 'यहीच देना' असं म्हणून घाम पुसला.
संक्रांतीच्या वेळीही असंच झालं. हलवा किंवा साखरफुटाणे हे घ्यायला दुकानात गेलो. तर त्याला नेमकं काय म्हणतात ते माहित नव्हतं. दुकानात एका टोपलीत हलवा ठेवलेला होता. त्यामुळे माझा जीव भांड्यात पडला. मग दुकानदारालाच विचारलं याला काय म्हणतात? त्यानं सांगितलं, 'चिरोंजी के दाने.' हा शब्दच मी पहिल्यांदा ऐकला. त्यामुळे हलवा समोर दिसला नसता तर कितीही डोकं खाजवलं असतं तरी त्याला हिंदीत काय म्हणतात ते आठवण्याचा प्रश्नच नव्हता.
अशाच एका सणाच्या दिवशी म्हणजे मराठमोळ्या गुढीपाडव्याच्या दिवशी म्हटलं बासुंदी आणूया. दुकानात गेल्यानंतर त्याला बासुंदी सांगिल्यानंतर ठार काही कळेना. म्हटलं 'वो दूध की होती है. उसको नहीं क्या आटाते है' ( आता आटवणेला हिंदीत काय म्हणतात हे पार 'आटवेना') त्याचा चेहर्यावरचा मख्खपणा कायम. मग मी दृश्य माध्यमाचा आधार घेऊन त्याच्या दुकानातली प्रत्येक मिठाई पहायला लागलो. एका ठिकाणी बासुंदीसारखं दिसंल. त्यावर तो म्हणाला ही रबडी आहे. म्हटलं ठिक आहे. चालेल दे बाबा. बासुंदी आटीव असली तरी ती घट्ट नसते. इथे रबडीचे 'लच्छे' असतात. आम्ही बासुंदीची तहान रबडीवर भागवली.
भाजीच्या बाबतीतही तेच. आलू, बैंगन, प्याज, गाजर इथपर्यंत आपल्याला माहिती असतं. (थॅंक्स टू बॉलीवूड) पण त्यापुढे जायचं असेल तर मात्र आपला 'भाजीपाला' होतो. भाजीसाठी 'सब्जी' हा शब्द असला तरी तो साधारणपणे तयार केलेल्या भाजीसाठी वापरतात. बाजारात भाजी आणायला गेल्यास 'तरकारी' शब्द प्रचलित आहे. मी तर हल्ली भाजी आणायला गेलो की समोर 'वो देना' असंच म्हणतो. कारण अनेकदा नावच माहित नसतं. दुधी भोपळ्याला इथे 'लौकी' म्हणतात हे कळल्यामुळे मला अगदी 'लकी' असल्याचं वाटलं. त्याचवेळी मटारला 'बटला' आणि डांगराला कद्दू म्हणतात हे ज्ञानही काही काळानंतर झालं. कोथींबिरीला 'कोथमीर' असाही हिंदी शब्द असला तरी इथे तिला तिच्या मातृकुलाच्या नावाने म्हणजे 'धनिया' म्हणून ओळखले जाते. फळांच्या बाबतीतही तेच. सफरचंदाला सेब, आंब्याला आम हे माहित असलं तरी पेरूला इथेही 'जांब' असे म्हणतात हे नव्यानेच कळलं. जांब हा उच्चार ग्रामीण महाराष्ट्रात मी ऐकला होता.
खाद्यपदार्थांच्या बाबतीतही ती अडचण येते. आपल्याकडे बाराखडीत 'व्यंजन' असते, इथे पदार्थांनाच 'व्यंजन' म्हणतात. आपल्याकडचा वडापाव इथे 'बडापाव' होतो. इथे बिना तला समोसा म्हणजे आपल्याकडचं बटाट्याची भाजी असलेलं पॅटीस त्रिकोणी आकारात दिलं जातं. एरवी पॅटीस म्हणून आपण जे खातो त्याला इथे 'टिकीया' म्हणतात. ती आलूपासून बटल्यापर्यंत कशाचीही असते. साखरेच्या पाकाला इथे 'शक्कर की चाशनी' म्हणतात. उडाली की नाही विकेट? आणि बिटाला काय म्हणतात माहितेय? 'चुकंदर'...
सगळ्यात पंचाईत डॉक्टरकडे गेल्यानंतर होते. एखादी भावना त्या हिंदी भाषक डॉक्टरला कशी समजून सांगावी ते कळत नाही. डोकं भिरभिरतंय ला 'सर चकराता है' हे सांगू पण डोक्यात घण घातल्यासारखं दुखतंय हे 'सरदर्द' या शब्दातून नेमकं कसं व्यक्त होणार? 'पेटदर्द' सांगू शकतो, पण 'पोटात ढवळून येतंय' हे कसं सांगणार? तोंड आल्याला 'मूह आया' असाच भाषांतरीत शब्द आहे हे कळल्यानंतर आश्चर्यच वाटलं होतं. अवयवांच्या बाबतीत तीच स्थिती. टाच, कोपर, गुडघा, पोटर्या या अवयवांच्या बाबतीत काही सांगायचं तर प्रत्यक्ष तो अवयव दाखवून सांगावं लागतंय. काही भावना इंग्रजीचा आधार घेऊन किंवा काही जवळपास जाईल असा हिंदी शब्द शोधून सांगत आम्ही निभावून नेतोय.
हिंदीच्या अशा अनेक गमती जमती नंतर हळूहळू कळत गेल्या. इथे वाहतुकीची 'यातायात' कशी असते ते वर्षभरात कळून चुकले आणि नियमात चुकल्यानंतर 'यातायात पोलिस' इथे 'चालान' करतात याचा अनुभवही आला. आपल्याला चांगल्या गोष्टीचं समाधान मिळतं, इथे प्रश्नाचं 'समाधान' असतं. आपल्याकडे एखादी गोष्ट करण्यासाठी 'अवकाश' असतो. इथे सुटीच्या दिवशी 'अवकाश' असतो. आपल्याकडे 'भोग' भोगावे लागतात इथे देवाला चढवतात. आपल्याकडे संकष्टीपासून सोमवारचे 'व्रत' असते. इथे उपास असला की 'व्रत' असतं. आपण कुठल्याही गोष्टीची 'चिकित्सा' करतो, इथे डॉक्टर करतो ती 'चिकित्सा' असते आणि खुद्द त्याला 'चिकित्सक' म्हणतात. आपल्याकडे दोषींना 'शिक्षा' होते इथे मुलांना 'शिक्षा' दिली जाते.
थोडक्यात काय आम्ही अशा अनेक गमती जमतीतून हिंदी शिकत आहोत. महाराष्ट्रातल्या हिंदी भाषकांना मराठी येवो न येवो पण आम्ही मात्र हिंदी नक्की शिकणार.
प्रतिक्रिया
15 Oct 2008 - 5:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
भोचकसाहेब,
तुमचा लेख आवडला. माझीही अशीच गंमत होते. अज्ञान कबूल केलं की कसं छान वाटतं. पण मला दोनदा(च) अगदी उलट अनुभव आले. नॉयडात भाजीवाल्याला मी बोट दाखवून याला हिंदी शब्द काय असं विचारलं. त्यानी माझ्याकडे बघून जो काही चोक्कस चेहेरा बनवला, भाव एकूण असे, "दिसत्ये तर तशी शिकलेली, पण एवढंही माहित नाही". "इस को ब्रोकली कहते है।" दुसर्यांदा हा किस्सा असाच किवी या फळांच्या बाबतीत झाला. अर्थात ब्रोकली आणि किवीला मराठी शब्दही मला माहित नाही आहेत.
15 Oct 2008 - 5:15 pm | घाशीराम कोतवाल १.२
धमाल हाय राव लय अड्चन व्हत आसल नव्ह तुमासनी
त्याच काय आहे आपल्या मुंबईत या हिंदि भाषिक लोकांनी भाषेची जी मिसळ केली आहे ना त्याचा हा परिणाम
दुसर काय
मी असा कसा असा कसा वेगळा वेगळा?
15 Oct 2008 - 5:15 pm | विजुभाऊ
महाराष्ट्रातल्या हिंदी भाषकांना मराठी येवो न येवो पण आम्ही मात्र हिंदी नक्की शिकणार.
ही असली मुजरा करायची सवय मराठी माणसाला लावणारे मराठीच आहेत.
आपल्यावर हिन्दी लादली जाते याचा त्याला विसर पडतो. आपल्या मातृभाषेचा योग्य आद्र आपणच राखला पहिजे.
मराठीत अपण गर्वाचे घर खाली ही म्हण शिकतो
हिन्दी लोकाना ही ग ची बाधा होत अभिमानाने होते
येथे येणार्या माणसाला जेंव्हा मराठीतच बोलायला भाग पडेल तेंव्हाच जया बच्चान सारख्यांचा माजुरडेपणा उतरेल
15 Oct 2008 - 5:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
येथे येणार्या माणसाला जेंव्हा मराठीतच बोलायला भाग पडेल तेंव्हाच जया बच्चान सारख्यांचा माजुरडेपणा उतरेल
असल्या थोड्या मूर्ख आणि माजुर्ड्या लोकांसाठी आपण एक/अनेक भाषा शिकायच्या नाहीत, सगळ्याच हिंदी भाषिकांना माजुर्ड म्हणायचं ... नाही पटत हे!
दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं भारतावर म्हणून तुम्ही इंग्लिश शिकायचं नाही असं म्हणता का?
हिन्दी लोकाना ही ग ची बाधा होत अभिमानाने होते
आपला अभिमान हिंदीत गेला की गर्व होतो.
15 Oct 2008 - 5:29 pm | मनिष
छान लेख आहे...आवडला!
असे नका म्हणू बुवा...रबडीसाटी जीव गहाण टाकावा अशी तिची चव, तिच्यापुढे बासुंदी अगदीच मिळमिळीत वाटते! आणि इंदौर चे खाणे-पिणे तर एकदम खास!!
15 Oct 2008 - 5:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
असे नका म्हणू बुवा...रबडीसाटी जीव गहाण टाकावा अशी तिची चव, तिच्यापुढे बासुंदी अगदीच मिळमिळीत वाटते! आणि इंदौर चे खाणे-पिणे तर एकदम खास!!
बेश्ट! तोंडाला पाणी सुटलं सगळं नमकीन आणि मिठाई आठवून!
15 Oct 2008 - 6:02 pm | ललिता
अर्थात ब्रोकली आणि किवीला मराठी शब्दही मला माहित नाही आहेत.
ब्रोकोली जरी कॉलिफ्लॉवरच्या जातीची असली तरी अस्सल भारतीय नाही, युरोप-अमेरिकेत ही भाजी प्रचलित आहे... भारतात ही आता पिकते का याची मला कल्पना नाही. पण परकी भाजी असल्याने कुठल्याही भारतीय भाषेत तिला शब्द असणे शक्य नाही.
किवी देखिल भारतीय फळ नाही तेव्हा सर्व भारतीय भाषेत 'किवी'च शब्द राहील.
15 Oct 2008 - 6:58 pm | योगी९००
सहावीला जेव्हा मी कोल्हापुरहून पनवेलला नव्या शाळेत आलो..
हिंदीचे मास्तर म्हणाले.."लिखो रेल्वेस्टेशनपर एक घंटा"..
आणि मी लिखले..
परसो मैं पनवेल रेल्वेस्टेशनपें गया था | वहा मैने एक घंटा देखी | वो टण टण बजती थी | बहोत लोगोंको उसका फायदा होता था | ....
...
....
....सचमुच रेल्वेस्टेशनपर घंटा होना कितनी अच्छी बात है ना ???
मास्तरांनी जेव्हा माझा हा निबंध वर्गात वाचून दाखवला...तेव्हा सगळी पोरे खुदूखुदू हसत होती ..आणि मलाच कळत नव्हते की माझे काय चुकले आहे...
खादाडमाऊ
15 Oct 2008 - 7:33 pm | प्राजु
लयच भारी. माझी जाऊ आहे इंदौरची. आम्ही एकदा गेलो तिच्या माहेरी. शॉल्लिड मज्जा असते मिठाई आणि खाण्यापिण्याची.
लेख अतिशय खुमासदार झाला आहे. आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Oct 2008 - 10:28 pm | चतुरंग
"जाऊ बाई, इंदौरला जाऊ!" ;) असं होत असणार नै प्राजू तुझं!
चतुरंग
15 Oct 2008 - 7:39 pm | अवलिया
छान लेख !
आवडला !!
(बघा बरे भोचकांना उत्तरेत गेले अन त्यांना फक्त हिंदितच बोलावे लागल्यामुळे त्यांचे हिंदि तर सुधारलेच पण आपल्याला हा लेख वाचुन बरीच माहिती मिळाली. तसेच मराठीत एक छान लेख वाचायला मिळाला. असेच महाराष्ट्राचे व मराठीविषयीचे ज्ञान उत्तरेतील लोकांना मिळावे म्हणुन तिथुन इथे आलेल्या लोकांना आम्ही मराठीत बोला, तिकडे जावुन हिंदीत लेख लिहा म्हणतो तर आम्ही संकुचित... हेच इंग्रजीच येणा-यांबद्दल. असो. )
नाना
15 Oct 2008 - 8:10 pm | छोटा डॉन
टाळ्या !!!!
सहमत आहे ...
बाकी हलकाफुलका लेख झकास ...
आवडला, लिहीत रहा ....
आम्हाला बेंगरुळात असाच अनुभव येतो, ती जिभेशी झोंबी खेळणारी कन्नड शिकायचा प्रयत्न चालु आहेच ...
मग ते अर्धेकच्चे कन्नड, अर्धे हिंदी बोलतो आम्ही दुकानात, अशी धमाल मज्जा येते कि विचारायला नको ...
काही ठिकाणी दुकानदार फक्त "कन्नड हाडु" असतो आणि आम्ही " मी मराठी" ...
मग शेवटी तह म्हणुन हातवार्यांच्या भाषेत कसेबसे निभावते ....
इकडे "जर्मनीत" तर अजुन वेगळीच मजा, लिहीन सवडीने ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
16 Oct 2008 - 9:50 am | अभिरत भिरभि-या
डॉन भाऊ,
तुम्ही बेंगळुरात नाही बेंगरुळात लिहिलेय. =))
बेंगळुर कितिही बेंगरुळ असले तरी इतका स्पष्टवक्ते बरा नव्हे !!
असो निमदु शिक्षे केळी ,
प्यालेस ग्राऊंडास ५० फेर्या अथवा पंपाच्या महाकाव्यातील १०० श्लोक बिनचुक घोकणे !
( शिक्षा तुम्ही निवडू शकता)
----
कानडीत केळी म्हणजे ऐका. आता पेरु म्हणजे बोला; असा पाचकळ विनोद करु नये.
----
ह.घ्या. हे. सां न लगे:)
17 Oct 2008 - 10:45 pm | छोटा डॉन
बघा उपजत विनोदबुद्धी अशी असते , आम्ही सहज बोलता बोलता विनोद करुन जातो आणि आम्हाला त्याचे भान पण नसते.
असो.एखादा मानुक्ष ठेवावा लिहुन घ्यायला, पुढे मागे पुस्तक छापता येईल .... ;)
=)) =)) =))
आता आम्ही छाती ठोकुन सांगतो की ते आम्ही "जाणतेपणी" लिहले ...
बोला आता ...
काका मला वाचवा !!!
अवांतर : अभिरत आण्णा, निमगा कळसा माडताय इल्ला दिसते ...
म्हणजे तुम्हाला काही काम नाही असे दिसतेय ( वाक्यावरुन निघतो तसा माडीवर कळधी भरुन न्हे असा अर्थ नव्हे )
अर्थातच ह.घ्याच ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
16 Oct 2008 - 11:52 am | प्रकाश घाटपांडे
यकदा फ्लॆट बुक केला तव्हा तिथली मान्स कडाप्पा कडाप्पा अस काही तरी बोलत होती. त्या बांधकामावर अन्ना होता. तो मुकादम व्हता. तव्हा मला वाटला कि ह्येच नाव कडाप्पा हाय. त्यात किचन आन कडाप्पा याचा संबंद दाखवनारी काही वाक्य होती. तवा आमाला वाटल कि किचन च काम करनारा मानुस म्हन्जी कडाप्प्पा. पन म्हन्ल खात्री झाल्या शिवाय तोंड उचक्टायला नको. त्याचा फायदा झाला हे सांगणे न लगे
प्रकाश घाटपांडे
16 Oct 2008 - 10:53 pm | यशोधरा
तुम्ही बेंगळुरात नाही बेंगरुळात लिहिलेय.
बेंगळुर कितिही बेंगरुळ असले तरी इतका स्पष्टवक्ते बरा नव्हे !!
=)) =))
शाब्बास रे डान्या!!
शूर वीर सरदार तुला रे, काय कोणाची भीती!! =))
15 Oct 2008 - 7:44 pm | baba
भोचकसाहेब, तुमचा लेख आवडला.
आम्हि सुध्दा अजुन हिन्दि शिकतच आहोत.. तसे आमचे बम्बैय्या हिन्दि छान आहे.. पन त्याला मुंबईबाहेर कुनी विचारत नाहि असे झालेय..
बाकी, आमच्या मुंबईत, आलू ला 'बटाटा', प्याजला 'कांदा' आणि सब्जी /
तरकारीला हिन्दितहि भाजीच का बोलतात कोण जाणे...
....(मुम्बैकर आणि मराठीचा आग्रही) बाबा
15 Oct 2008 - 7:44 pm | धनंजय
छान लेख!
15 Oct 2008 - 7:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हिंदी च्या गमती जमती मस्तच !!!
15 Oct 2008 - 8:09 pm | विचारी मना
लेख छान आहे. अतिशय ओघवत्या शैलीत लिखाण केलेत आपण!
15 Oct 2008 - 8:35 pm | स्वाती दिनेश
हिंदीच्या गमतीजमती आवडल्या..
अवांतर- चिरौंजी हा शब्द मी पहिल्यांदा 'शोले' मध्ये ऐकला. रामलाल बाजारातून चिरौंजी,साबुदाना और रंग लाता है।:)
स्वाती
30 Jul 2009 - 2:08 am | संदीप चित्रे
>> त्यानं सांगितलं, 'चिरोंजी के दाने.' हा शब्दच मी पहिल्यांदा ऐकला
'शोले' पाहिला नाही का राव?
बाकी लेख आवडला. आपलं हिंदी म्हणजे खत्तरनाकच असतं म्हणजे एकवेळ लेखी हिंदी बरोबर असतं पण बोलताना मराठी उच्चार डोकावतात.
माझी आई मराठी आणि हिंदीची शिक्षिका असल्याने दोन्ही भाषा नीट शिकण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
('पंडित' परीक्षा उत्तीर्ण) संदीप
15 Oct 2008 - 8:43 pm | लिखाळ
लेख छान .. गमती जमती आवडल्या...
वेगळ्या प्रांतात भाषेमुळे मजा मजा होणारच...
हिंदीमध्ये झुरळाला काय म्हणतात ते माझ्या काही हिंदी मित्रांनासुद्धा माहित नव्ह्ते.. कॉक्रोच हाच शब्द त्यांना माहित होता.. तुमच्या आसपासच्या लोकांना माहित आहे का ? :)
--लिखाळ.
16 Oct 2008 - 9:54 am | ऋचा
झुरळाला "झिंगुर" म्हणतात हिंदीत :?
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
15 Oct 2008 - 8:44 pm | ललिता
झुरळाला "वांदा"म्हणतात हिंदीत असं आठवतंय!
15 Oct 2008 - 8:47 pm | लिखाळ
वांदा असाही शब्द असेल.. पण मला माहित झालेला शब्द आहे तिलचट्टा :).. हा शब्द डिस्कवरी वगैरे वाहिन्यांवर सुद्धा ऐकला आहे.
-- लिखाळ.
16 Oct 2008 - 10:04 am | धमाल मुलगा
मग झिंगुर म्हणजे काय हो?
मी ईतके दिवस समजत होतो की झिंगुर म्हणजे झुरळ!
आपण नाही का एखाद्याला म्हणत, "चल रे झुरळा, जास्त मस्ती नको करु" तसंच हिंदीत "ओ झिंगुर.." म्हणतात ना...
गंडलो की मी!
16 Oct 2008 - 10:06 am | ऋचा
माझा पण हाच प्रश्न आहे..
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
15 Oct 2008 - 8:59 pm | प्रमोद देव
गुजराथीत झुरळाला वांदर आणि ढेकणाला माकड म्हणतात.
चिमणीला चकली म्हणतात.
15 Oct 2008 - 9:26 pm | कलंत्री
लहानपणी ऐकलेला संवाद, जगा नही तो सरकु किधर?
15 Oct 2008 - 10:18 pm | भाग्यश्री
वा काय मस्त गमती जमती आहेत!! :) मस्त झालाय लेख...
नेहेमीचे मराठी माणसाचे हिंदीचे जोक्स असतील असं वाटलं होतं, पण हा लेख फारच वेगळा आणि छान निघाला..
15 Oct 2008 - 10:36 pm | चतुरंग
एकदम चटपटीत लेखन. मस्तच वाटलं.
(अवांतर - रबडी आणि बासुंदी - मला दोन्ही आवडतात. दोन्हीचा आपापला करिष्मा आहे. बासुंदी खायची तर गणेशवाडीची. नरसोबाच्या वाडीला मंदिराच्या बाहेर दुकानात थंडगार बासुंदी मिळते. दाट गंधासारखी दिसणारी, खरपूस बदामी रंगाची बासुंदी अप्रतिम असते. तिथल्या भटजींकडे नैवेद्य सांगितलेला असेल तर जेवायलाही तशीच सुंदर बासुंदी मी खाल्ली आहे.)
चतुरंग
16 Oct 2008 - 4:59 am | सुक्या
सुंदर लेख. बर्याच जुन्या आठवनी ताज्या झाल्या.
"मे जोर से भाग्या आउर धापकन पड्या" अशी हिंदी असलेला मी आनी काही मित्रांना असेच खुप मजेदार अनुभव आले. इतकी वर्षे महाराष्ट्राबाहेर राहुनही माझा 'दाहीने अन बाए' यातला घोळ आजही कायम आहे. 'कच्छा' हा डोक्यावरुन घालायचा असतो की पायातुन हे मला न सुटलेलं कोडे आहे. हिरव्या भाजीला सब्जी म्हनायचं की 'साग'? सरसों का साग, मेथी का साग, पालक का साग .. च्यामारी मग सब्जी कशाला म्हनायचं आनी केव्हा? लुसलुशीत चवळी ला 'बरबट्टी', फणसाला 'कटहल', समोसा ला 'शिंघाडा' आनी पुरी ला चक्क 'पुडी' म्हणतात. आम्हाला शिंगाडा उपवासाला खातात अन पुडी खायची नव्हे तर 'सोडायची' चीज असते एवढेच माहीत होते.
एकदा हरीयाणा मधे असताना घरी फोन करण्यासाठी मी व काही मित्र आमच्या ट्रेनिंग सेंटर जवळच्या शहरात गेलो. ट्रेनिंग सेंटर हे गावाच्या बाहेर २ कि. मी. अंतरावर होते. मोबाइल ची सोय तेव्हा जवळपास नव्हतीच. सर्वांचे फोन करुन परत निघायला रात्रीचे ११ वाजले. परतीच्या रस्त्यावर मधे एक पोलिस चौकी होती. बाहेर बसललेल्या 'दारोग्या'ने आम्हा सर्वांना धांगडधिंगा करत येताना पाहिलं. आम्हाला एका बाजुला बोलावुन त्याने चौकशीला सुरुवात केली. 'हम लोक फोन करनेकु गये थे' वगेरे न झेपनारी हिंदी ऐकुन त्याने 'कहा से हो?' विचारले. आम्ही महाराष्ट्रातुन आलो आहोत असे समजल्यावर त्याने हिंदी में 'लोक' नही 'लोग' होता है म्हनत सुरुवात केली आनी भर रस्त्यात येनार्या / जानार्या वाहनांच्या सा़क्षीने आम्हाला हिंदीचे धडे दिले. २० मिनिटांनी दारोगासाहेब थांबले अन आम्हाला 'चलो निकलो अब' म्हनत पिटाळले. बाकी दारोगा साहेब 'दारु'च्या अमलाखाली होते हे वेगळे सांगने नको.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी (आपुन के गांव मे पोस्ट हापीस नही हे. लिवनेका था इस्लिये लिव्या.)
16 Oct 2008 - 8:41 am | सुचेल तसं
>>इतकी वर्षे महाराष्ट्राबाहेर राहुनही माझा 'दाहीने अन बाए' यातला घोळ आजही कायम आहे
ह्यावर माझ्याकडे एक उपाय आहे. दाहीने हे तीन अक्षरी आणि बाए हे दोन अक्षरी. मराठीत ह्यासाठी तितक्याच अक्षरांचे प्रतिशब्द आहेत. अनुक्रमे उजवा आणि डावा.
[तसचं इंग्लिशमधे - राईट आणि लेफ्ट :) ]
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
30 Jul 2009 - 2:12 am | संदीप चित्रे
इतक्या वर्षांत ही साधी गोष्ट लक्षात आली नव्हती !
=D> =D>
'रोज काहीतरी नवीन शिकायला मिळतं' हे खरंय.
16 Oct 2008 - 5:16 am | बेसनलाडू
इंदुरी मिश्र मराठी/हिंदी चा सगळ्यात जास्त लक्षात राहिलेला म्हणजे -
का बंदरासारखा पेडावर चढून र्हायलास :)))
(बंदर)बेसनलाडू
16 Oct 2008 - 7:15 am | झकासराव
मस्त हलका फुलका लेख.
अदिती : किवी ला "किवी"च म्हणतात.
ब्रॉकोली हा प्रकार काय आहे अजुन पाहिलाच नाही मी.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
16 Oct 2008 - 8:20 am | भाग्यश्री
ब्रोकोली म्हणजे जवळपास हिरवा फ्लॉवर.. :)
16 Oct 2008 - 7:24 am | अनिल हटेला
एकदम मस्त लेख !!
आणी एक से बढकर एक प्रतीक्रिया !!!
(हसुन बेजार!!)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
16 Oct 2008 - 9:57 am | ऋचा
मी कॉलेजला असताना ऐकलेले वाक्य- आंगपे आयेगा क्या?
(एखादी गाडी/माणुस अंगावर येत असेल तर )
मस्त लेख :)
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
16 Oct 2008 - 10:20 am | नंदन
आवडला. चुकंदर हे तर उंदीर, चिचुंद्री अशासारख्या एखाद्या प्राण्याचं नाव वाटतं :). चिरोंजी के दाने ही प्रथमच वाचले.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
16 Oct 2008 - 11:12 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
चिरोंजी के दाने ही प्रथमच वाचले.
"खोसला का घोंसला" नावाचा एक महान चित्रपट कोणी पाहिला असेल तर हे चिरौंजी प्रकरण फारच विनोदी वाटेल.
त्यात अनुपम खेर हा मुख्य खोसला असतो आणि त्याच्या मोठ्या मुलाचं (परवीन डबास) नाव असतं चिरौंजी लाल, उर्फ, सी.एल. खोसला, उर्फ चेरी!
मला तेव्हा ते चिरौंजी प्रकरण फार विनोदी वाटलं नव्हतं, पण आता हलवा किंवा साखरफुटाणा असं माणसाचं नाव कळल्यावर मात्र .... =))
17 Oct 2008 - 1:50 am | बिपिन कार्यकर्ते
भोचक भाऊ, मस्तच लिहिलं आहे हिंदीबद्दल आणि इंदौरबद्दल. खुप आठवणी जाग्या केल्या तुम्ही. :)
बिपिन.
17 Oct 2008 - 9:53 pm | भिंगरि
लेख खुप आवडला. मी विदर्भातलि असल्यामुळे चुकंदर आणि बटला सोडले तर बाकि सगळे शब्द ओळखिचे वाटले त्यामुळे आणखिन मजा आलि. :)
18 Oct 2008 - 9:07 am | विसोबा खेचर
भोचकगुरुजी,
मस्तच लेख आहे. दुकानात खरेदीकरता गेल्यानंतर झालेल्या गंमतीजंमती आवडल्या! :)
येऊ द्या प्लीज अजूनही असेच काही खुमासदार लेखन..
बाय द वे, दोन दिवसांचा पाहूणचार घ्यायला एकदा तुमच्या इंदुरात आलं पाहिजे आता! मस्तपैकी रबडी चापू..! :)
आपला,
तात्याभैय्या देवासकर,
देवासकरांची कोठी, इंदौर.
18 Oct 2008 - 2:41 pm | भोचक
सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार. तात्यांसह सगळ्यांना इंदूरचे आग्रहाचे निमंत्रण. नक्की या. संकोच बाळगू नका.
बाय द वे आपल्या मराठी खाद्यपदार्थांचा एक मेळा इथे जत्रा नावाने भरतो. त्यात शेपन्नास मराठी खाद्यपदार्थांचे स्टॉल असतात. (अगदी फोडणीच्या पोळीचाही एक स्टॉल असतो.) कालपासून ही जत्रा इथे भरलीय. तिथे मैदानाभोवती स्टॉल आणि मध्यभागी लावणीचा कार्यक्रम असतो. त्यासाठी पुण्याचा एक ग्रुप आलाय. आज तिथे जायचा इरादा आहे.
इंदूरचे जवळपास सर्व फेमस पदार्थ चाखून झालेला
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
19 Oct 2008 - 5:46 am | मैत्र
काही कारणाने तीन चार दिवसांपूर्वी हाताच्या कोपराला हिंदीत काय म्हणतात शोधत होतो. खात्रीशीर उत्तर मिळालं नाही... भोचक भाऊ सांगाल का ?
19 Oct 2008 - 10:31 am | मनिष
कोपर = कोहनी
हिंदीवर प्रेम करणारा (मनिष)
30 Jul 2009 - 12:54 am | भडकमकर मास्तर
"मुंहमें छालें " पडलेल्या हिंदी पेशंटाला मी "कुछ नहीं आपका मुंह आया है " असे म्हणता म्हणता थांबलो आहे..आणि चुकीचे हिन्दी बोलण्याबद्दल अपराधी वाटून अनेक वेळा चुकचुकलो आहे.. आता नाही वाईट वाटून घेणार...
... "आपका मुंह आता है क्या बारबार?"
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
30 Jul 2009 - 3:15 am | प्रअका१२३
आपल्या मर्हाटी लोकांना हिंदी 'येते' ची भावना कशाने होते म्हायतिये? हिंदी चित्रपटांमुळे आणि मुंबईला हिंदी चित्रपट भसाभसा काढत असतात म्हणून.....
आणि खरच इतर अहिंदी लोकांपेक्षा आपली हिंदी चांगली असते.... यात मुंबैया हिंदीत मराठी जास्त घुसलंय, म्हणून तर आणखीच मज्जा.
हिंदी चित्रपटांच्या कृपेने आपल्याला प्यार, साजन, कुत्ते कमिने, खुषी गम, मजबूर, बेकरार, पागल, हसिना, सुहाग, मुसीबत वगैरे शब्द अगदी ओळखीचे वाटतात. पण आम आदमी के रोजमरहा के प्रसंग मात्र अगदी गोची करतात.
शिवाय आपण इथली हिंदी किती बिघडवली याचा जास्त त्रास तर मुळीच करून घेऊ नये. मी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणची वेगळी हिंदी ऐकलीय. रूडकी हरिद्वार कडची खडी हिंदी, दिल्लीला पंजाबी धाटणीची हिंदी, इंदौरची माळवाप्रांतीय हिंदी, बेंगलूरुची दाक्षिणात्य हिंदी, हैदराबादकडच्या लोकांची चक्क मराठी वाटणारी उर्दू (म्हणे) हिंदी, शिवाय रेडिओ टी व्ही वरच्या बातम्यांमधली पुस्तकी हिंदी..... असले कितीतरी प्रकार आहेत. त्यात मराठी लोकांनी मुंबैया प्रकारात केलेले हिंदीचे लोणचे आपल्याला तर लै ग्वाड वाट्टे ऐकायला.
एकुणच भोचकरावांच्या लेखामुळे एक नक्की..... इतर हिंदी भागात जाताना, पुस्तकी हिंदी शिकून व भरपूर हिंदी रेसिपी शो पाहूनच जावे.
-
अतिभटकलेला
प्रअका
20 Jul 2011 - 12:19 pm | मृत्युन्जय
२० जुलै रोजीच मागच्या वर्षी बहुधा भोचक उर्फ अभिनय यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा धागा वरती आणतो आहे.
22 Jul 2011 - 3:06 am | इंटरनेटस्नेही
चांगलं केलंत.
अभिनय यांना विनम्र श्रद्धांजली.