पुस्तकाचे नावः प्रे (सावज)
मूळ लेखकः मायकल क्रायटन
अनुवादकः प्रमोद जोगळेकर
प्रकाशकः मेहता पब्लिशिंग हाऊस
किंमत : रु. ३००/-
मायकल क्रायटन हे नाव आता मराठी वाचकांना अपरिचित राहिलेले नाहिये.
जुरासिक पार्क, लॉस्ट वर्ल्ड, डिस्क्लोजर, काँगो अशा कित्येक कादंबर्या मायकेल क्रायटनने लिहिल्या आहेत व त्याच्या कादंबर्यांवर बेतलेले हॉलिवूड मधील हे इंग्रजी चित्रपटही अतिशय गाजलेले आहेत. अतिशय थरारक अशी कथानकाची रचना करणारा लेखक म्हणून मायकल क्रायटन सर्वांना परिचित आहेच. पण त्याच्या जोडीला तो विज्ञान आणि निसर्गाचे नियम यांची अशी जबरदस्त तर्कशुद्ध जोड देतो की त्याच्या कादंबर्या या कल्पना वाटतच नाहीत. तर अगदी जवळच्या काळात हे सर्व वास्तवात येणार आहे असे वाचकाला मनोमन वाटून देण्यात तो कमालीचा यशस्वी झालेला आहे. थरारक कादंबर्यांमधून वाचकांचे सोप्या भाषेत ज्ञान संवर्धन करणे ही एक अत्भुत कला फार कमी लेखकांकडे असते. अशा हाडाच्या लेखकांपैकी मायकल क्रायटन आहे असे म्हटले तर ते योग्यच ठरेल.
असो... लेखकपुराण पुरे करतो आणि आता आपण मायकल क्रायटनच्या "प्रे (सावज)" या कादंबरीकडे वळूयात.
सर्वात आधी कादंबरीच्या नावाची थोडी उकल करतो. "प्रेड-प्रे" (प्रेडेटर-प्रे अर्थात "शिकारी-शिकार") या मूळ शब्दातून या कादंबरीचे साजेसं व समर्पक नाव लेखकाने दिलेले आहे हे कादंबरी वाचतानाच वाचकाला जाणवत राहतं. कादंबरीच्या गाभ्याशी आहे ते नव्याने उदयास आलेले नॅनो तंत्रज्ञान. नॅनो तंत्रज्ञानामुळे काय होऊ शकेल हे या कादंबरीत अतिशय छानपणे व कारणांसहित सर्वसामान्य वाचकाला सहज कळते. ही कादंबरी वाचताना फक्त एक आठवड्यांतील अत्यंत वेगवान घटनाक्रमाचा थरार वाचक अनुभवणार आहे, तेव्हा थोडक्यात कादंबरीबद्दल सांगतो.
तर या कादंबरीची सुरुवात होते ती कादंबरीचा नायक जॅक आणि त्याची पत्नी ज्युलिआ यांच्यापासून. जॅक एक उत्कृष्ट दर्जाचा संगणकातले प्रोग्रॅम्स तयार करणारा तज्ज्ञ असतो. आणि त्याने तयार केलेल्या प्रेड-प्रे (शिकारी=शिकार) तत्त्वावर बेतलेल्या मल्टी-एजंटच्या प्रोग्रॅम्सची कोणीतरी चोरी करतो. त्यामुळे त्याच्या कंपनीतून त्याला नोकरी गमवावी लागते व गेले सहा महिने तो बेकार असतो. अशा परिस्थितीत जॅकची पत्नी झायमॉस टेक्नॉलॉजीज् या कंपनीत काम करत असते व गेले काही आठवडे ती अतिशय व्यस्त झालेली असते. अशा परिस्थितीत जॅक या दांपत्याची नऊ महिन्यांची मुलगी अमाण्डा, आठ वर्षांचा मुलगा एरिक व बारा वर्षांची मुलगी निकोल या तिघांना अतिशय छान संभाळत असतो. पण कथानकाला सुरुवात होते तीच मुळी जॅकची पत्नी ज्युलिआच्या विक्षिप्त वागण्याने. जॅकला कळत नसते की ज्युलिआ असे का वागते आहे. बाहेरुन आल्यावर कधीही शॉवरखाली स्नान न करणारी ज्युलिआ ऑफिसातून आल्यावर स्वतःच्या नऊ महिन्याच्या मुलीला हातही न लावता आधी स्नान करु लागते. मग ज्युलिआ जॅकला एक व्हिडिओ डेमो दाखवते. झायमॉस टेक्नॉलॉजीला अमेरिकेच्या पेन्टॅगन या संरक्षण व्यवस्था पाहणार्या सरकारी संस्थेकडून एक कंत्राट मिळालेले असते. शत्रूच्या परिसरात जाऊन हवेतून हवी ती छायाचित्रे मिळवण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करोडो कॅमेर्यांचा समूह तयार करायचा अशा प्रकारचे ते काम असते.
ज्युलिआचे वागणे दिवसेंदिवस संशयास्पद होऊ लागलेले असते. ती ड्रायव्हिंग करताना तिच्या शेजारच्या सीटवर कोणीही नसते, त्यानंतर गाडी वळताना जॅक त्याच सीटवर एका माणसाला पाहतो. तेथून जॅकची चलबिचल सुरु होते. ज्युलिआचे कोणाशी अफेअर तर नाही ना? हा संशय बळावतो. मुलगी निकआई, मुलगा एरिक व छोटीशी अमाण्डा आपल्या आईचे बदललेले वागणे लगेच ओळखतात व त्यांना तिच्याबद्दल ममता वाटेनाशी होते. ज्युलिआ एवढी बदललेली असते की अमाण्डा का रडते आहे हेही अनेकदा तिच्या लक्षात येत नाही, अशा वेळी जॅक पुढे होऊन अमाण्डाला शांत करत असतो. दिवसेंदिवस ज्युलिआचे चिडचिडेपण वाढत असते. तसेच जॅकचाही संशय बळावत जातो की ज्युलिआचे ऑफिसमधील कोणाशी तरी अफेअर चालू आहे. मग तो सल्ला घेण्यासाठी आपल्या बहिणीचा सल्ला घेतो. फोनवर बोलताना त्याची बहीण एलेन त्याच्या मदतीसाठी त्याच्या घरी यायचे स्वतःच घोषित करते आणि जेणेकरुन कोर्टात घटस्फोटाची केस दाखल झाली तर जॅकची बाजू बळकट राहीन व तिन्ही मुले जॅककडेच राहतील.
पुढे या प्रयोगात काहीतरी गोंधळ होतो व चूक होते. त्या चुकीला निस्तरण्यासाठी जॅकलाच मदतीसाठी त्याच्या जुन्या कंपनीतून सल्लागार म्हणून पाचारण करण्यात येते. (जॅकची जुनी कंपनीच झायमॉसला तंत्रज्ञ पुरवत असते. झायमॉस टेक्नॉलॉजीमध्ये जॅकचे प्रोग्रॅम्स वापरले गेले आहेत हे तोपर्यंत त्याच्या लक्षात आलेले असते. पण तरीसुद्धा प्रॉब्लेम काय आहे हे त्याला स्पष्टपणे शेवटपर्यंत कोणीही सांगत नाही. ही ऑफर स्वीकारावी की नाही या द्विधा मनःस्थितीत जॅक असतो. पण त्या परिस्थितीत जॅकची पत्नी ज्युलिआचा अपघात होतो व तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागते. अशा परिस्थितीत जॅकवर घराची जबाबदारी पण आलेली असते. जॅक त्याची बहीण एलेनावर जबाबदारी सोपवून झायमॉसची ऑफर स्वीकारतो व ताबडतोब नेवाडातील वाळवंटात असलेल्या झायमॉस च्या अवाढव्य प्रकल्पाकडे हेलिकॉप्टरने प्रयाण करतो. त्यावेळी केवळ एक आठवड्यात अतिशय वेगवान व नाट्यमय घटनाक्रमाचा तो सूत्रधार असणार आहे हे त्यावेळी त्याला अजिबात जाणवलेले नसते.
झायमॉसच्या प्रकल्पापाशी पोहोचताच त्याला धोक्याची जाणीव होते. त्याचा खास मित्र रिक तेथे असतो हे पाहून त्याला बरे वाटते. आधीच्या कंपनीतून जॅकला हाकलून देण्यापूर्वी त्याच्या टीमचे सर्व सदस्य झायमॉसच्या या प्रकल्पावर काम करत असतात. नॅनो तंत्रज्ञान वापरुन केसाच्याही जाडीपेक्षा अत्यंत सूक्ष्म आकाराचे नॅनो रोबो तयार करुन त्यांचे काम एकत्रित रित्या एका थव्यासारखे करवून घेण्यासाठी जॅकच्या मूळ प्रोग्रॅम्सचा वापर या प्रकल्पात झालेला असतो. आकाराने अतिशय लहान असल्यामुळे वाळवंटातील वेगवान वार्यांत या नॅनोकणांच्या थव्याचा टिकाव लागत नसतो. पेन्टॅगॉनने या समस्येवर झायमॉसला उत्तर मिळणार नसेल तर प्रकल्पासाठीचा पैसा ताबडतोब थांबवण्याची धमकी दिलेली असते. त्यामुळे झायमॉसपुढे अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिलेला असतो. जॅक एका सल्लागाराच्या भूमिकेत झायमॉसच्या नेवाडा वाळवंटातील प्रकल्पात गेलेला असतो (जिथे त्याची पत्नी देखील ज्युलिआ कित्येक दिवस काम करत असते). पत्नीचा प्रियकर कोण आहे हे शोधून काढायच्या हेतूने जॅकने ही ऑफर स्वीकारलेली असते. पण पुढील वेगवान घटनाक्रम जॅकला सत्य काय आहे ते दाखवतो.
नेवाडाच्या वाळवंटातील झायमॉसच्या या प्रकल्पात पाय ठेवताक्षणीच जॅकचे स्वागत अतिशय वेगवान हवेच्या मार्यांनी त्याला शुद्ध करणार्या बंद खोलीवजा प्रवेशद्वारापासून होते. विंस नावाच्या व्यक्तीशी परिचय झाल्यावर पुढे जॅकला त्याचा चांगला मित्र रिक भेटतो, तो पुढे प्रकल्पातील इतरांशि ओळख करुन देतो. रोझी कास्ट्रो, डेव्हीड ब्रूक्स, बॉबी लेम्बेक, मे चॅंग , चार्ली डेव्हनपोर्ट अशा लोकांशी जॅकची ओळख होते.
नॅनोकणांचा एक ढग चुकून हवेत निसटला आहे असे रिक जॅकला सांगतो आणि त्यांच्यात स्वतः शिकणार्या एजंटचा प्रोग्रॅम बसवलेला असल्यामुळे आणि जैवतंत्रज्ञानाची जोड देऊन स्वतःचे पुनरुत्पादन करण्याची क्षमता दिलेली असल्यामुळे हा थवा हळूहळू अत्यंत घातक झालेला असतो. याची प्रचिती एका सशाची शिकार किती सूत्रबद्ध व योजनाबद्ध पद्धतीने हा नॅनोकणांचा थवा करतो तेव्हा जॅकला येते. पुढे जॅकला असेही लक्षात येते की या नॅनोकणांच्या ढगाचे आयुष्य फक्त ३ तासांचे असते. पण त्यांच्यात पुनरुत्पादन क्षमता दिलेली असल्यामुळे त्यांची पुढील पिढी आधीपेक्षा प्रगत असते, त्यामुळे माणसाच्या आयुष्याच्या तुलनेत ते अतिशय लवकर शिकत असतात. त्या नॅनोकणांच्या ढगात सामूहिकपणे मेमरी टिकवण्याची क्षमता असते, व प्रेड-प्रे प्रोग्रॅममुळे घटनाक्रमातून लवकर शिकतही असतात. आधी द्विमिती मग त्रिमिती प्रतिमा तयार करणे, सावजाला योजनाबद्ध पद्धतीने जाळ्यात अडकवणे अशा अनेक घटनाक्रमांनी या कादंबरीत लेखकाने थरार निर्माण केलेला आहे. शेवटी शेवटी जॅकची पत्नी ज्युलिआ अपघात झालेला असूनही एमआरआय स्कॅन नाकारुन हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेते व तेथे येते. तोपर्यंत प्रकल्पातील काही जणांचे प्राण गेलेले असतात व जॅकच्याही जिवावर एकदा नाही तर दोनदा बेतते. अशा परिस्थितीत तेथील एक महिला कर्मचारी मे चॅंग हीच जॅकला मदत करते. जॅकचा चांगला मित्र असलेल्या रिकचे वागणे अधिकाधिक संशयास्पद झालेले असते. रिक, ज्युलिआ, विंस, बॉबी अशा चौघांसाठी झायमॉसचा हा प्रकल्प खूप महत्त्वाचा का असतो? पुढे काय होते? ज्युलिआचे अफेअर असते का? सर्वात शेवटच्या जीवघेण्या घटनेतून कोण कोण वाचते? नॅनोकणांचे पुढे काय होते? शेवटपर्यंत झायमॉसची प्रयोगशाळा न सोडणार्या रिकची भूमिका व नॅनोकणांचे ढग या सर्वांत काय दुवा असतो? जॅक तुझे सर्वात चांगले करण्याचा मी प्रयत्न करतो आहे असे रिक त्याला सांगत असतो त्यामागचे रहस्य काय असते? या प्रश्नांची उत्तरे सर्वात शेवटीच वाचकाला मिळतात.
अशा कित्येक मेंदूला मुंग्या आणणार्या प्रश्नांची उकल करण्यासाठी मायकल क्रायटनची ही थरारक कादंबरी "प्रे-सावज" वाचलीच पाहिजे.
सर्वात शेवटी पण तेवढेच महत्त्वाचे - मराठी साहित्यात विदेशी कादंबरीचा अनुवाद तितक्याच ताकदीने आणणे हे एक आव्हानच असते आणि ते प्रमोद जोगळेकरांनी अतिशय समर्थपणे पेलल्याचे या कादंबरीच्या वाचनात पदोपदी जाणवते. प्रमोद जोगळेकरांचे कौतुक फक्त त्यासाठीच नाही तर कादंबरीच्या शेवटी त्यांनी मूळ लेखकाने दिलेल्या संदर्भांची यादी व कादंबरीतील तंत्रज्ञान सहज लक्षात यावे यासाठी सोप्या भाषेत दिलेल्या २८ टिपांच्या परिशिष्टासाठीदेखील केले पाहिजे.
कादंबरीच्या शेवटी हे नॅनो तंत्रज्ञान योग्य प्रकारे हाताळले नाही तर त्यातून केवढा मोठा विनाशकारी आणि भयानक प्रसंग उद्भवेल अशा पद्धतीचा संदेश लेखकाने त्याच्या इतर कादंबर्यांप्रमाणे दिलाच आहे. हा संदेश आपल्याला अंतर्मुख नक्कीच करतो. वैज्ञानिक पार्श्वभूमीवरच्या कादंबर्या आवडणार्या वाचकांसाठी मायकल क्रायटनची "प्रे - सावज" ही एक मेजवानी आहे असे म्हणेन.
प्रतिक्रिया
18 Aug 2012 - 10:29 pm | प्रचेतस
या पुस्तकासाठी तू किती डेस्परेट होतास ते प्रत्यक्ष पाहिलेलेच होते.
क्रायटनच्या बर्याचशा कादंबर्या वाचलेल्या आहेतच. टाइम लाईन ही अजून एक त्याची जबरदस्त कादंबरी.
त्याच्या शेवटच्या नेक्स्ट, स्टेट ऑफ फियर ने मात्र निराशा केली होती. तंत्राच्या तो खूपच आहारी गेल्यासारखे वाटत होते.
'प्रे' चा वृत्तांत मस्तच. पुस्तक अर्थात विकत घेणार नाही. तुझ्याकडे असल्यावर विकत घ्यायची काय गरज ;)
18 Aug 2012 - 10:38 pm | अत्रुप्त आत्मा
@तुझ्याकडे असल्यावर विकत घ्यायची काय गरज Wink >>> ख्याक....
म्हणजे मलाही विकत घ्यायची गरज (र्हाणार) नाही... ;)
फक्त अता येकच भय आहे... मला बहुतेक कादंबरी वाचनाचं वेड लागणार :)
19 Aug 2012 - 1:01 am | सागर
कादंबर्या वाचाव्यात... खास करुन अतृप्त आत्म्याने तर वाचाव्यातच वाचाव्या.... आत्मा तृप्त होतो ना ;)
19 Aug 2012 - 1:04 am | सागर
'प्रे' साठी डेस्परेट होतो त्याचे वाचून खरोखर चीज झाले असेच म्हणेन मी.
शेवटची दीडशे पाने अक्षरशः अधाशासारखी मी सलग वाचून काढली होती एवढी थरारक कादंबरी आहे :)
टाईमलाईन दुर्दैवाने मिळत नाहिये, तीपण कधीची वाचायची बाकी आहे.
अवांतरः होय मी जरुर तुला हे पुस्तक देईन. तुलाही 'प्रे' जाम आवडेल याची खात्री आहे
19 Aug 2012 - 2:01 am | आबा
ही घ्या
http://www.preterhuman.net/texts/literature/general/Crichton_Michael/Crichton,%20Michael%20-%20Timeline.pdf
19 Aug 2012 - 9:44 pm | सागर
आबा,
मानलं तुम्हाला... :)
मराठी अनुवाद काही मिळालाच नाही. पण आता टाईमलाईन इंग्रजीतून नक्की वाचून काढेन.
दुव्याबद्द्ल मनःपूर्वक धन्यवाद
18 Aug 2012 - 10:33 pm | आबा
प्रे, आवडत्या पुस्तकांपैकी एक आहे.
18 Aug 2012 - 11:05 pm | बॅटमॅन
+१.
हेच्च म्हणतो.
18 Aug 2012 - 11:45 pm | जाई.
ऊत्तम परिचय!!!
19 Aug 2012 - 1:05 am | सागर
आबा, बॅटमॅन, जाई ... मनःपूर्वक धन्यवाद :)
19 Aug 2012 - 1:18 am | अभ्या..
'प्रे' मला चक्क नळदुर्ग (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) च्या लोकमान्य वाचनालयात मिळाली होती. प्रचंड आवडली होती. तुम्ही अवघड विषय छान व कमी शब्दात सुंदर मांडला आहे.
19 Aug 2012 - 2:22 am | एस
मला डॅन ब्राउन ची पुस्तकेही फार आवडतात. भन्नाट वेग, विज्ञान-तंत्रज्ञान व कल्पनाशक्तीचा अचाट मिलाप व वाचकांच्या सरधोपट गृहीतकांना एकामागोमाग धक्के देणे ही त्याची काही वैशिष्ट्ये.
मायकल क्रायटनचे तंत्रसुद्धा याच पद्धतीचे आहे. "प्रे" नक्कीच वाचेन.
अवांतर - कुणी मराठी व मूळ इंग्लिश अशा दोन्ही कादंबर्या वाचल्या आहेत का?
19 Aug 2012 - 12:19 pm | सस्नेह
परीक्षण मस्त !
मी 'प्रे' खूप दिवसांपूर्वीच वाचली आहे. अतिशय उत्कंठावर्धक कथानक.
क्रायटन, डॅन ब्राऊन इ. सारखे विज्ञान, रहस्य यावरील दर्जेदार लेखन मराठीत होत नाही याबद्दल खेद आहे.
नारायण धारपांच्या विज्ञान कथा/कादंबर्या साधारण या द्र्जाच्या आहेत. पण संख्या कमी.
अजून अशीच परीक्षणे येऊद्यात !
19 Aug 2012 - 7:23 pm | प्राध्यापक
चला आता प्रे खास विकत घेउनच वाचली पाहीजे, इतक चांगल आणी उत्कंठा वाढवणारं परीक्षण लिहल्याबद्दल धन्यवाद.
(मायकल क्रायटनचा चाहता)प्राध्यापक
19 Aug 2012 - 8:04 pm | रमताराम
झकास परिचय रे सागर. पुलेशु.
19 Aug 2012 - 10:37 pm | सागर
अभिजीत, स्वॅप्स, स्नेहांकिता, प्राध्यापक, ररा सर्वांचे धन्यवाद
@अभिजीत - प्रे सारखी कादंबरी नळदुर्गमधे मिळते आहे म्हणजे मराठी साहित्याचे वाचन कधी नव्हे ते अधिक होऊ लागल्याचे चिन्ह तर नव्हे? ;) छान वाटले हे कळाल्यावर
@स्वॅप्स - डॅन ब्राऊनचा मी ही चाहता होतो, किंबहुना अजूनही आहे. दा विंची कोड मुळे ब्राऊन प्रकाशात आला हे खरे असले तरी त्याची पहिली कादंबरी डिजिटल फोर्ट्रेसने ब्राऊनला कादंबरीविश्वात एक स्थान दिलं. दा विंची कोड नंतर डॅन ब्राऊन ने एन्जल्स एन्ड डेमन्स लिहिली, ही माझी ब्राऊनची सर्वात आवडती कादंबरी आहे. कारण दा विंची तिच्यापुढे खुजी वाटते एवढी ती दर्जेदार झाली. रॉबर्ट लँग्डन सिरिजमधल्या तिसर्या लॉस्ट सिम्बॉल च्या वाटेला गेलो नाहीये अजून. पण डिसेप्शन पॉईंट वाचली होती. ही कादंबरी वाचनसुख नक्की देते. पण त्यासाठी आधीची दीडशे पाने कितीही कंटाळा आला तरी वाचून काढावी लागतात. त्यामुळे ही एक सुमार दर्जाचीच कादंबरी ठरते. ब्राऊन हा एक प्रयोग करणारा लेखक आहे. अजून त्याच्या कित्येक कादंबर्या बाजारात यायच्या आहेत. ब्राऊन पुढे कदाचित क्रायटनपेक्षा प्रसिद्ध होईलही पण क्रायटनइतकी विषयांतली थरारकता आणण्यासाठी त्याला बरीच मेहनत करावी लागेल.
'प्रे' मी आता इंग्रजीतूनही लवकरच वाचणार आहे. वाचून झाल्यावर मग मला मत देता येईन.
@स्नेहांकिता :
क्रायटन, डॅन ब्राऊन इ. सारखे विज्ञान, रहस्य यावरील दर्जेदार लेखन मराठीत होत नाही याबद्दल खेद आहे.
नारायण धारपांच्या विज्ञान कथा/कादंबर्या साधारण या द्र्जाच्या आहेत. पण संख्या कमी.
या मतांशी काही अंशी सहमत आहे. लेखन होते पण वाचकवर्ग पण लाभला तर असे लेखन वाढत जाते. ब्राऊन, क्रायटन हे आजच्या पिढीतले लेखक आहेत. मुख्य म्हणजे ते वैज्ञानिक बाबींचा अभ्यास करुन कादंबर्या लिहितात. पूर्ण वेळ लेखक हा त्यांचा व्यवसाय आहे. अत्यंत व्यावसायिकतेने ते काम करतात व त्यात यशस्वी पण होतात. याच कामासाठी त्यांना प्रचंड पैसा मिळतो. मराठी साहित्यात पूर्णवेळ लेखक असे किती आहेत? आधी प्रपंच मग आवड असा मराठी लेखकां वर एक ताण असतो. असे असूनही मराठीत जेवढी अमाप साहित्य निर्मिती झालेली आहे त्याला खरेच तोड नाही.
विज्ञानकथा क्षेत्रात धारपांनी योगदान दिलेले असले तरी ते मुख्यतः भयकथाकार म्हणून ओळखले जातात.
मराठीत अतिशय दर्जेदार अशा विज्ञानकादंबर्याही झालेल्या आहेत. पण त्या किती लोकांपर्यंत पोहोचल्या? हा एक मोठा प्रश्न आहे. उदाहरण द्यायचे झाले तर - केलाटाची हाक ही चंद्रकांत मराठे यांनी लिहिलेली अतिशय दीर्घ विज्ञान कादंबरी पूर्णपणे स्वतंत्र होती. ती किती जणांनी वाचली आहे? अतिशय जबरदस्त अशी ही कादंबरी आहे.
याव्यतिरिक्त आपल्याला जयंत नारळीकर हे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ मराठी विज्ञानकथांना संजीवनी देणारे म्हणून परिचित आहेत. त्यांच्या प्रेषित, वामन परत न आला, यक्षांची देणगी, व्हायरस, सूर्याचा प्रकोप, अभयारण्य या सर्व कथा-कादंबर्यांनी मराठी वाचकांत विज्ञानकथांविषयी गोडी निर्माण केलेली आहे.
असे असले तरी अविनाश कोलारकर या उमद्या लेखकाने ५ भागांतून विज्ञानकथा लिहिल्या होत्या. हे ५ भाग कोणी वाचले आहे काय? तीच गोष्ट शैलेन्द्र काळे यांच्या कोटास या विज्ञान कादंबरीची.
अशी दर्जेदार पुस्तके अजिबात बाजारात उपलब्ध नसतात पण विदेशी लेखकांचे अनुवाद सहज उपलब्ध असतात. हेही चित्र बदलायला हवे.
विदेशी अनुवादीत पुस्तकांच्या शेजारी आपल्या मराठी लेखकांची तशीच पुस्तके ठेवली गेलीत तरच वाचकांना कळेल ना की मराठीतही असे लेखन उपलब्ध आहे.
स्नेहांकिता खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही अधोरेखित केला आहे म्हणून हा सविस्तर प्रतिसाद....
@प्राध्यापक : क्रायटनचे तुम्ही चाहते आहात म्हणजे त्याची अनेक पुस्तके वाचलेली असतील. प्राध्यापकांच्या शैलीत क्रायटनवरचे एक परिक्षण येऊ द्यात की ;)
@रमतारामः गुरुजी तुम्ही वाचता का असल्या कादंबर्या? तुमच्या टेस्टची मला कल्पना आहे म्हणून हा प्रश्न ;)
20 Aug 2012 - 9:36 am | इरसाल
धन्यवाद सागरा.
24 Aug 2012 - 1:26 pm | सस्नेह
ज. नारळीकरांची वर उल्लेखलेली सर्व पुस्तके मी वाचली आहेत. उत्कृष्टच आहेत. मला वाटते त्यात वैज्ञानिक कल्पनांचा पुरस्कार जरुर आहे. पण उत्कंठाजनक कल्पकते चा अन अद्भुताचा वैज्ञानिक सत्यांशी जसा मिलाफ 'प्रे' इ. आंग्ल लेखनात दिसतो तसा क्वचितच. म्हणजे आपण ज्याला सायन्स फिक्शन म्हणू शकू. माफ करा हे माझे वैयक्तिक मत आहे.
त्यापेक्षा मला अरुण साधूंची 'विप्लवा' वैज्ञानिक कादंबरी म्हणून जास्त आवडली.
तसेच धारपांची 'आकाशाशी जडले नाते', युगपुरुष, नेनचिम, ऐसि रत्ने मेळवीन.
केलाटाची हाक व इतर कथा शोधत आहे.
धन्यवाद !
24 Aug 2012 - 2:24 pm | सागर
पण उत्कंठाजनक कल्पकते चा अन अद्भुताचा वैज्ञानिक सत्यांशी जसा मिलाफ 'प्रे' इ. आंग्ल लेखनात दिसतो तसा क्वचितच. म्हणजे आपण ज्याला सायन्स फिक्शन म्हणू शकू. माफ करा हे माझे वैयक्तिक मत आहे.
स्नेहांकिता,
मराठीत अशा लेखकांची संख्या फार कमी आहे म्हणून हा फरक लगेच जाणवतो. त्यामुळे तुमच्या वरील मताशी मी सहमती दर्शवतो.
धारपांची 'नेनचिम' व 'ऐसि रत्ने मेळवीन' ही २ पुस्तके वाचलेली आहेत. आता बाकीची २ शोधतो :) (तुमच्या प्रतिसादाचा मला झालेला फायदा )
साधूंची विप्लवा बहुतेक दिपावलीच्या कोणत्यातरी एका दिवाळी अंकात 'स्फोट आणि विप्लवा' अशी प्रकाशित झाल्याचे स्मरते आहे. पण खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. बहुतेक वीस-पंचवीस वर्षे झाली असावीत. ही पण कादंबरी शोधतो मी आता :)
23 Aug 2012 - 4:02 pm | गणपा
पुस्तकवेड्या सागरा मस्तच ओळख रे पुस्तकाची.
वाचायला नक्की आवडेल. कधी? कसं? कुठे? हे आत्ताच नाही सांगता येत.
पण लक्षात रहावं म्हणुन वाचनखुण साठवलेली आहे. :)
24 Aug 2012 - 2:26 pm | सागर
कधी? कसं? कुठे? हे आत्ताच नाही सांगता येत.
भारतात ये लवकर मग मीच तुला ही कादंबरी स्वहस्ते देईन
त्यावेळी तुझ्या एखाद्या झकास पाककृतीचा आस्वाद देखील घेता येईल मला ;)
24 Aug 2012 - 1:24 pm | अभ्या..
प्रे सारखी कादंबरी नळदुर्गमधे मिळते आहे म्हणजे मराठी साहित्याचे वाचन कधी नव्हे ते अधिक होऊ लागल्याचे चिन्ह तर नव्हे? छान वाटले हे कळाल्यावर
आपणांस वाचनालय पडताळणी मोहीम माहीत असेलच. त्यातली खरेदी ती. पहिला आणि शेवट्चा (बहुतेक)वाचक मीच. ग्रंथपालाने त्याची नोंदणी सुध्दा 'प्रेसावन' केली होती. आजारपणाच्या सुट्टीत वाचली होती ही सर्व पुस्तके.
24 Aug 2012 - 2:31 pm | सागर
होय अभिजीत
वाचनालय पडताळणी मोहीम मला माहिती आहे. ग्रंथालयांचे कामकाज व्यवस्थित आणि पारदर्शक चालू आहे यासाठी वेळोवेळी शासनाकडून अशा पडताळण्या होत असतात.
ग्रंथपालाने त्याची नोंदणी प्रेसावन अशी केल्याचे वाचून मलाच (पुस्तकांच्या अतिरिक्त प्रेमामुळे ) (प्रेसावन) वेदना झाल्या :(
24 Aug 2012 - 2:50 pm | अभ्या..
कदाचित त्याला प्रे शब्द माहित नसेल. पण.. असो.
त्याच्याच कृपेने मला बर्याच सवलती पण मिळाल्या होत्या (उदा. एकावेळी ३ पुस्तके वगैरे.)
ग्रंथपालाची इच्छा असते पण..(परत)
त्याच्याच कृपेने मला त्याच वाचनालयात अरूण साधूंची मु़खवटा आणि दाविदरची House of blue mango पण मिळाली होती.
24 Aug 2012 - 5:18 pm | सागर
अभिजीत मित्रा,
तू म्हणतोस तसे असू शकेल. पण अशा चुकांमुळे जो वाचक 'प्रे' या शीर्षकाने पुस्तक शोधेन त्याला ते सापडणार नाही.
अशी चूक त्याच्या लक्षात आली आणि लगेच ती दुरुस्त केली तर मग बरेच आहे. अन्यथा अनेक वाचक या पुस्तकाच्या वाचनाला मुकतील एवढे नक्की.
अनेक ग्रंथपाल असे मदत करणारे असतात हे खरे आहे. वाचकांमध्ये वाचनप्रेम टिकवून ठेवण्यात या ग्रंथपालांची अनेक वेळा मदत होते यात शंकाच नाही. मी देखील हाच अनुभव पुण्याच्या नगर वाचन मंदीरात घेतलेला आहे. :)
अरुण साधूंची मुखवटा कधीची वाचायची आहे. मी ती मागच्या वर्षी घेतली होती, तरी अजून वाचायला मूहूर्त लागलेला नाहिये. आता लवकरच वाचेन ;)
24 Aug 2012 - 5:47 pm | अभ्या..
अरुण साधूंची मुखवटा अवश्य वाचा.
व्यक्तीशः मला तर फार आवडते. मुखवटा आणि तुंबाड्चे खोत (ते सुध्दा २ रा खंड आधी मग १ ला) सलग वाचल्या होत्या. मी कोण? याच सनातन प्रश्नाचा पाठलाग दोन्हीतही.
अवांतर : सोलापुरच्या हि.ने. वाचनालयाचा आणि मिरजेच्या ब्रिटिश लायब्ररीचा अनुभव मात्र अत्यंत उत्तम.
बाकी गप्पा खव त. भेटेनच.
25 Aug 2012 - 12:05 pm | मुक्त विहारि
धन्यवाद...
26 Aug 2012 - 6:37 pm | पैसा
दोन्ही पुस्तके (मूळ आणि अनुवाद) मिळवून वाचायचा प्रयत्न करीन.