वाळू!
केवळ या एका शब्दात आयुष्यभराचा आठव साठवता येऊ शकतो. शंख शिंपले गोळा करत आणि खोपे बनवत वाळूच्या ढिगा-यावर घालवलेलं लहानपण; समुद्रकिना-यावर तीच्याबरोबर तासनतास बसुन बांधलेलं वाळूचं घर; वाळूत उभं राहून ते घर डोळ्यात साठवत असतांना अचानक आलेल्या लाटेबरोबर त्याचं पायाखालच्या वाळूबरोबर वाहून जाणं आणि त्यानंतर झालेला हिरमोड लपवत पुन्हा नव्याने घर बांधायला घेणं! कन्याकुमारीच्या वाळवंटात उभं राहून दिसणारं भारतमातेचं तेजोमय रूप; आणि चंद्रभागेच्या वाळवंटात वारक-यांनी धरलेले रिंगण! अरबी समुद्राच्या वाळवंटातून घडणारं मुंबईतल्या उंचच उंच ईमारतींचं विलोभनिय दर्शन; आणि कुठल्याश्या जवळच्या नदितून ट्रकमध्ये भरून आणलेल्या वाळूचा ढिग आपल्या रिकाम्या प्लॉटवर येऊन पडल्यावर त्या ढिगा-यात दिसणारं 'स्वतःचं घर!' -- प्रत्येकाच्या मनाच्या एका कप्प्यात आयुष्यभर जपुन ठेवता येतील एवढं एक वाळवंट ही 'वाळू' तयार करत असते. सुदर्शन पटनायकच्या मनातही असं एक खुप मोठं वाळवंट आहे. मात्र ईतरांपेक्षा ते खुप वेगळं आहे. सुदर्शनच्या मनातल्या वाळवंटात सर्जनशिलता आहे. जीवंतपणा आहे. म्हणजेच कला आहे.
'प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे' असं म्हणतात. वरवर पाहता वाळूच्या कणांतून तेल गळणे ही अतिशयोक्ती वाटत असली तरी सुदर्शन पटनायकची वालुकाशिल्पं पाहिल्यावर हे अशक्यही नाही, असा विश्वास वाटायला लागतो. ललितकलांचं माहेरघर असलेल्या ओडिसाच्या भुमिमध्ये, पुरीच्या समुद्रकिना-यावरच्या सोनेरी वाळूत भगवान जगन्नाथाच्या दरबारात त्यानं मांडलेला खेळ आज जगभरातल्या कलारसिकांच्या दृष्टीने आश्चर्य, आदर्श, आणि अनुकरणाचा विषय झालेला आहे.
सुदर्शन पटनायक हे नाव वर्तमानपत्रं वाचणा-यांसाठी नवं मुळीच नाही. वालुकाशिल्पाचा एखादा ऑफबिट फोटो एखाद्या दिवशी जवळजवळ सर्वच वर्तमानपत्रांमध्ये झळकतो, आणि सोबत झळकतं 'सुदर्शन पटनायक' हे नाव. वालुकाशिल्प बनवणा-या कलाकारांमध्ये भारतातील एकमेव आणि जगातील अग्रणी म्हणुन आज सुदर्शनचं नाव घेतलं जातं. बर्लीनच्या किना-यावर झालेल्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट वाळुशिल्पकार का खिताब त्याने २००८ मध्ये, स्पर्धेतील त्याच्या पदार्पणातच जिंकला आणि जगभर त्याचा दबदबा निर्माण व्हायला सुरूवात झाली. आज सुदर्शनकडून या कलेचे धडे घेण्यासाठी जगभरातल्या सगळ्या समुद्रकिना-यावरचे लोक येतात. त्यासाठी त्याने सुदर्शन सॅण्ड आर्ट ईन्स्टीट्युटदेखील स्थापन केले आहे. मात्र जेव्हा सुदर्शनने वालुकाशिल्प बनवायला घेतली तेव्हा त्याला शिकवणारं कुणीच नव्हतं.
जगन्नाथपुरीला राहणा-या एका मध्यमवर्गीय, धार्मिक घरामध्ये १५ एप्रिल १९७७ मध्ये त्याचा जन्म झाला. कुटुंबातले लोक जगन्नाथाचे भक्त. म्हणुन मुलाचं नाव ठेवलं सुदर्शन. घरात तीन भावंडं आणि बराच मोठा आप्तपरिवार. त्यामुळे प्राथमिक शिक्षणापेक्षा जास्त फारसं काही शिकता आलं नाही. मात्र घरापासून तीन किलोमिटरवर असलेला पुरिचा समुद्रकिनारा मात्र नेहमी खुणावत असे. सात वर्षाचा असल्यापासून रेतीवरती चित्रे रेखाटण्याचा छंद सुदर्शनला जडला. बारा वर्षाचा झाला, आणि शाळा सुटली ती कायमचीच. मग काय? समुद्रकिनाराच शिक्षक बनला. सकाळी चार वाजता उठून समुद्रावर जायचं, आणि तांबडं फुटायच्या आत काहीतरी शिल्प बनवून गायब व्हायचं. मग दुपारच्या वेळी वाळुचं शिल्प पाहून येणारेजाणारे लोक काय बोलतात याचं रिपोर्टींग घेण्यासाठी आपल्या भावंडाबरोबर किना-यावर फिरायचं हा त्याचा दिनक्रम बनला
चार वर्ष अशीच गेली. जेवढी घट्ट धरण्याचा प्रयत्न कराल तेवढीच हातातून सुटून जाणा-या या वाळूवर सुदर्शनच्या हातांची पकड मात्र चपखल बसायला लागली. त्याचा हात लागल्यावर रेतीचा ढिगारा काही तासांतच ताजमहाल बनायचा आणि काही तासांतच भगवान जगन्नाथाचा रथ! बलरामदास या संतकवीने चौदाव्या शतकात असेच वाळूचे रथ बनवले होते, तेव्हा भगवान जगन्नाथ स्वतः आपला रथ सोडून त्यात स्थानापन्न झाले होते अशी आख्यायिका आहे. जगन्नाथाच्या कृपेने या सोनेरी वाळूलादेखील आकार घेण्याचं वरदान आहे. मात्र बलरामदासांनर गेल्या सातशे वर्षापासुन या वरदानाचा लाभ घेणारा कुणी प्रेषित मात्र या किना-याला लाभला नव्हता. सुदर्शनच्या रूपाने ती कमतरता भरून निघाली. मात्र सुदर्शनमधील कमतरतांचं काय?
शालेय शिक्षण अर्ध्यावर सोडल्यामुळे निट लिहता वाचता देखील येत नव्हतं, तीथे परदेशातून येणा-या पर्यटकांशी संवाद काय साधणार? प्रसिद्धी मिळू लागली होती, नाव व्हायला सुरूवातही झाली होती, पण बोलायचं काय? ते कळतच नव्हतं. सुदर्शनने मग विचार केला. गुरूशिवाय आपण वालुकाशिल्प बनवण्याची कला आत्मसात करू शकतो, तर भाषा का नाही? मग अभ्यास सुरू झाला. ओरीया या आपल्या मातृभाषेबरोबरच बंगाली, हिंदी आणि ईंग्रजींमध्येही त्याने प्राविण्य प्राप्त केलं. आता बिबिसी पासुन ते एनजीसिपर्यंत सगळ्या चॅनल्सला तो ईंग्रजीत मुलाखत देतो, जगभर प्रवास करतो, आणि सातासमुद्राच्या किना-यांवर आपल्या कलेचा आविष्कार घडवून आणतो. सुदर्शनचं वालुकाशिल्प विद्यालय या कामात त्याला मदत करतं.
१९९५ साली, उणेपुरे अठरा वर्षाचा असतांना आकाशाच्या छपराखाली आणि समुद्रकिना-याच्या गालीचावर बसुन दोन विद्यार्थ्यांसह सुरू केलेलं हे विद्यालय. आजही या विद्यालयाला भिंती, दरवाजे किंवा साधं कुंपणदेखील नाही. गुरूकुल पद्धतीने चालणा-या या विद्यालयात आज विद्यार्थ्यांची संख्या आहे पासष्टच्या वर! जगभरातून विद्यार्थी, पर्यटक येत असतात आणि काहीतरी नवीन कल्पना सुदर्शनला देत असतात. या नव्या कल्पनेला सुदर्शन टच मिळाला की तयार होते ती अप्रतीम कलाकृती. लोक कॅमेरा घेऊन धावतच येतात. कारण खरं पाहता वालुकाशिल्प ही क्षणभंगुर कला आहे. काही तास, काही दिवस, किंवा काही महिन्यांच्या वर वालुकाशिल्प टिकत नाही. पण तसं पाहिलं तर आयुष्याचं शिल्पही कायम टिकणार नसतं. म्हणुन काय आपण जगणं सोडतो का?;
कलेकडे भक्ती आणि सौंदर्य या दोन्ही दृष्टीने पहात असतांनाच ऐतीहासिक दृष्टीनेही सुदर्शनने पुष्क़ळ अभ्यास केलेला आहे. कॅनडा, अमेरिका आणि ईतर युरिपियन देशांबरोबरच रशियामध्येदेखील वालुकाशिल्प ही कला आज लोकप्रिय आहे. मात्र सुदर्शनच्या मते याचा उदय आणि विकास भारतात, पुरिच्याच सोनेरी समुद्रकिना-यावर झालेला आहे. जगन्नाथपुरीच्या वाळवंटात रुजलेली आणि वाढलेली ही वालुकाशिल्पाची कला त्याता आता जगभर पोचवायची आहे.
यासाठी जागतीक महत्त्वाचे अनेक विषय तो आपल्या शिल्पांच्या माध्यमातुन हाताळत असतो. ग्लोबल वॉर्मींग, सेव्ह टायगर, सेव्ह गर्लचाईल्ड, एड्स जनजागृती यांसारखे सामाजीक विषय असोत किंवा ओसामा बीन लादेन ची हत्या, मायकल जॅक्सनचा अकस्मात मृत्यु यांसारख्या महत्त्वाच्या ताज्या घडामोडी असोत, सुदर्शन आपल्या सहका-यांसह वालुकाशिल्पांच्या माध्यमातुन हे विषय कल्पकतेने मांडतो आणि मग आपोआपच जागतीक स्तरावर त्याला प्रसिद्धी मिळते.
पुरस्कारांबद्दल बोलावे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही शेकडो पुरस्कार त्याला मिळाले आहेत. बर्लिनपाठोपाठ रशियाच्या समुद्रकिना-यावर बनवलेल्या त्याच्या कलाकृतीला 'पिपल्स चॉईस' पुरस्कार मिळाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव मोठं करणा-या या कलाकाराला आपल्या देशाच्या सरकारने मात्र अजुन पद्म पुरस्कारही दिलेला नाहीय. पुरीला 'सॅण्ड पार्क' तयार करण्याचं त्याचं स्वप्न आहे. यासाठी किना-यावरील थोडी जागा तो विकत किंवा लिजवर घ्यायला तयार आहे. मात्र राज्यसरकारने अजुन ते देखील केलेलं नाही. असो.
वयाच्या पस्तीशित आल्यावर आता सुदर्शनला स्पॉण्डेलायटिसने त्रास देणे सुरू केले आहे. मात्र उत्साह ओसरलेला नाही. काम सुरू ठेवायचं आहे. आता तो एकटाही नाही. त्याच्या विद्यालयाचे अनेक विद्यार्थी त्याच्याबरोबर आहेत. सॅण्डईंडिया डॉट क़ॉम या वेबसाईटमुळे जगभरातील कलारसिक त्याच्याशी जुळत आहेत. गेल्या सत्तावीस वर्षांपासून अखंड सागरसाधना करत असलेल्या या अवलीयाचं पाऊल वाळूत असं काही उमटलंय की सातासमुद्राच्या लाटांनाही त्याची खुण मिटवावीशी वाटणार नाही
प्रतिक्रिया
17 Feb 2012 - 7:19 pm | मस्तानी
सुंदर ओळख ! सुदर्शन ची वेबसाईट www.sandindia.com जरूर बघा.
२/३ दिवसांपूर्वीच माझ्या एका अमेरिकन मैत्रिणीला सुदर्शन च्या कलेची झलक त्याच्या वेबसाईट वरून दाखवली आणि ती ते सर्व पाहून अगदी अवाक झाली होती. "मी ते बुद्ध वाळूशिल्प माझ्या फेसबुक वर शेअर करू का" असं विचारत होती. मी तिला सांगितलं की जरूर कर पण तिथे त्याचं नाव आणि त्याची वेबसाईट याची माहिती न विसरता दे.
17 Feb 2012 - 7:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोणत्याही दैनिकात कधीतरी दिसणारं एखादं वाळुतलं सुंदर शिल्प दिसलं की ही कलाकारी सुदर्शन पटनायक यांचीच असावी, इतकी खात्री पटलेली असते. अतिशय सुंदर अशी कलाकृती त्यांच्या बोटातून उतरते. अन्य कोणी असा शिल्पकार असला तरी त्याचं नाव मला तरी माहिती नाही.
सुदर्शन पटनायक यांची थोडक्यात आणि चांगली ओळख करुन दिली आहे. बाकी, अशी माणसं पुरस्कारांनी मोठी होत नसतात. पुरस्कारांची त्यांना गरजही नसते. झालाच तर तो पुरस्काराचा सन्मान असतो तेव्हा अशा कलाकारांना पुरस्काराची तशी गरजही नसावी, इतर देशातील मोठे पुरस्कार मिळताहेत आपल्या देशानंही त्यांना पुरस्कारानं सन्मानीत करावं, ही अपेक्षा तशी काही गैरलागूही नाही. पण, वाळुतलं शिल्प म्हटलं की सुदर्शन पटनायक हे नाव ओठावर येतंच तेव्हा तोच त्यांचा सर्वात मोठा पुरस्कार आहे, असे मला वाटते.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
17 Feb 2012 - 9:10 pm | पैसा
छान ओळख आणि मस्तानी यानी दिलेल्या लिंकवर अप्रतिमच कलाकृती आहेत!
18 Feb 2012 - 12:18 am | जाई.
पटनायकांची वालूकाशिल्प पेपरातून बघितली आहेत
अतिशय जीवंत वाटतात
त्यांना सलाम
18 Feb 2012 - 4:18 am | प्राजु
सुंदर..! अतिशय सुंदर!
सुदर्शन पटनायक यांच्या कलेला सलाम!
खूप सुंदर ओळख करुन दिलेली आहे सुदर्शन पटनायक यांची.
आभार त्याबद्दल तुमचे. :)
18 Feb 2012 - 1:56 pm | ५० फक्त
अतिशय छान ओळख, धन्यवाद.