छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य : नरहर कुरुंदकर

सागर's picture
सागर in जनातलं, मनातलं
10 Feb 2012 - 9:36 pm

Kurundkar

आजच नरहर कुरुंदकरांचे 'छत्रपती शिवाजी महाराज जीवन - रहस्य' हे अवघे साठ पानांचे पुस्तक वाचून पूर्ण केले. नरहर कुरुंदकरांच्या तिसाव्या स्मृतीदिनानिमित्त या पुस्तकाचे वाचन माझ्याकडून घडावे हा एक योगच म्हणावा लागेल. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे या छोट्याशा पुस्तकाचे वर्णन करता येईल.

'छत्रपती शिवाजी महाराज जीवन - रहस्य' या पुस्तकाचे वैशिष्ट्य असे आहे की यात शिवाजी महाराजांचा इतिहास, तारीखवार घटना, आकडेवारी यांना पूर्णपणे फाटा दिलेला आहे, जे नरहर कुरुंदकरांनी पुस्तकाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे. छत्रपति शिवाजी महाराजांच्या थरारक आयुष्यातील अगदी मोजक्या पण अतिमहत्त्वाच्या घटनाक्रमांवर नरहर कुरुंदकरांनी प्रकाश टाकला आहे.

या सुरेख पुस्तकाला स.मा. गर्गे यांची सात पानी प्रस्तावना लाभली आहे तरी पुढची पाने कुरुंदकरांनी ज्या तर्कपद्धतीने व्यापली आहेत ती वाचताना वाचक थक्क होतो.

पुस्तकाच्या सुरुवातीलाच कुरुंदकरांनी शिवाजी देवाचा अवतार मानला जातो या श्रद्धेचा वेध घेण्याचा परखड प्रयत्न केला आहे. कुरुंदकर म्हणतात "माणसाचा देव ज्या वेळेला केला जातो त्या वेळेला त्याच्या अभ्यासाची गरज संपते, अनुकरणाचीही गरज संपते. हा श्रद्धेने निर्माण होणारा फार मोठा पायगुंता आहे. तो टाळण्याचा आपण यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे."
"समाजाला नाट्यमय आणि रोमांचकारी घटनांची जास्त आवड असते. अशा नाट्यमय घटनांवर लक्ष खिळून राहिले म्हणजे मग खरे कर्तृत्त्व दृष्टीआड होण्याचा धोका असतो."

एवढे परखड आणि वस्तुनिष्ठ विचार वाचल्यावर मी खरे सांगायचे तर एकदम थक्क झालो. कुठे हे कुरुंदकरांचे २० व्या शतकातले वस्तुनिष्ठ विचार? आणि कुठे २१ व्या शतकाच्या विज्ञानयुगातील त्या 'फ्रान्सिस गोतिए'च्या बुरख्याआड तथाकथित धर्मवाद्यांनी पुण्यात १०० कोटी रुपये खर्चून उभारलेले छत्रपति शिवाजी महाराजांचे मंदीर? असो.

छत्रपति शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील नाट्यमय घटना मोजक्या ५-६ आहेत असे कुरुंदकर निदर्शनास आणतात. पैकी पहिली अत्भुत घटना ते अफझलखानाचा वध ही मानतात. तर या पहिल्या अत्भुत घटनेआधीची २९ वर्षे ही नाट्यशून्यतेची होती हेही ते परखडपणे दाखवून देतात. शिवाय "छत्रपतिंचे कर्त्तॄत्त्व समजून घेताना या रोमांचकारी घटनांचा मोह आपण टाळला पाहिजे" अशी नेमकी जाणीवही ते करुन देतात.

"त्यांच्या कार्याकडे मुसलमानांच्या विरुद्ध हिंदूंचा उठाव म्हणून पाहणे काही जणांना आवडते. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या चरित्रात अशा धार्मिक संघर्षाला फारसा वाव नाही" असे सांगताना कुरुंदकर पुढे ते सप्रमाणही वाचकाला समजावून देखील देतात. आणि मग वाचकाला आजचे राजकारणी वा तथाकथित धर्माचे रक्षणकर्ते चेव येतील अशी भाषणे वा लेख यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.

वतनदारांविरुद्धचा लढा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील खूप कठीण लढा होता. कारण हे वतनदार म्हणजे नुसते त्यांच्याच धर्माची माणसे नव्हती तर नातेवाईक, सगे-सोयरसंबंधातील माणसे होती. प्रश्न दोन : उत्तर एक या शीर्षकाखाली कुरुंदकर म्हणतात "शिवाजी महाराजांच्या विरुद्ध त्यांच्याच धर्मातील वतनदार का राहिले, या प्रश्नाचे उत्तर आणि लक्षावधी जनतेने त्यांना ईश्वरी अवतार म्हणून का पाहिले, या प्रश्नाचे उत्तर एकच आहे"

शिवाजी महाराजांनी केलेला संघर्ष हिंदू विरुद्ध मुसलमान अशा स्वरुपात नाकारताना कुरुंदकर मार्मिकपणे म्हणतात - "परस्परांच्या विरोधी उभी राहणारी माणसे कोणत्या ना कोणत्या धर्माची असतातच, त्यांच्यामधील राजकीय ध्येयवादाच्या संघर्षाला दोन धर्मांच्यामधील परस्परविरोधी संघर्ष समजणे हीच एक मूलभूत चूक आहे. मध्ययुगातील अनेक संघर्षांचा अर्थ यामुळे कळू शकणार नाही"

एक अनोखी घटना या शीर्षकाखाली कुरुंदकर म्हणतात - "औरंगजेब मैदानात उतरण्यापूर्वीच शिवाजीसारखा असामान्य नेता दिवंगत झालेला होता. ......"
जदुनाथ सरकारांचा दाखलाही कुरुंदकर देतात की "औरंगजेब लढायांमागून लढाया औरंगजेबाने जिंकल्या, पण तो युद्ध जिंकू शकत नव्हता!"
"साधनसामग्री नसताना, असामान्य नेता नसताना, सर्व प्रतिकूल परिस्थितीच्या विरुद्ध जनता न थकता लढत होती. एखादे राज्य टिकवण्यासाठी फारसे मोठे नेतृत्त्व नसणार्‍या जनतेने इतका दीर्घकाळ लढा द्यावा ही घटनाच हिंदुस्थानच्या इतिहासात नवखी आहे, एकाकी आहे"

पान क्र. २२ वर कुरुंदकरांनी शिवाजी महाराजांना युवावस्थेत राज्यनिर्मितीची प्रेरणा कुठून मिळाली असेल याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. जिजामातेने रामायण महाभारतातील गोष्टी सांगितल्या असतील. विजयनगरच्या वैभवशाली साम्राज्याची हकीकत ऐकली असेल. दादोजी कोंडदेवांचे शासनचातुर्य पाहिले असेल. ज्ञानेश्वर-नामदेव साधुसंतांपासून प्रेरणा घेतली असेल. असे अनेक तर्क आहेत."पण या बाह्य सामग्रीतून लाखोंच्यापैकी एकालाच प्रेरणा का मिळते, इतरांना का मिळत नाही, याचे समाधानकारक उत्तर कोण, कसे देणार?" असा तर्कशुद्ध प्रश्नही कुरुंदकर उपस्थित करतात.

अफझलखान वधाचा वेध घेताना अफझल खान हा वाईचा सुभेदार होता तेव्हा शिवाजीचा नायनाट हे सुभ्याचा सुभेदार या नात्याने अफझलखानानेच करणे अपेक्षित होते. त्यासाठी आदिलशाही दरबारात शिवाजीचा नाश करण्याचा त्याने विडा उचलण्याची गरज नव्हती व ही केवळ कपोलकल्पित भाकडकथा आहे हेही कुरुंदकर वस्तुनिष्ठतेने निदर्शनास आणून देतात.

त्यानंतर सिद्दी जोहरचा वेढा , शाहिस्तेखानाला अचानक लाल महालात घुसून अचंभित करणे, औरंगजेबाच्या कैदेत असताना दिल्लीहून पलायन या घटनांतून शिवाजी महाराज हे केवळ धाडसीच नव्हते तर कल्पक देखील होते याकडेही कुरुंदकर लक्ष वेधतात. शत्रूच्या नेमक्या वर्मावर घाव कसा घालावा हे शिवाजी महाराजांना अवगत होते.

छत्रपतिंच्या नेत्तृत्त्वाच्या खर्‍या यशाचे मूल्यमापन करताना कुरुंदकर म्हणतात - " २७ वर्षांच्या प्राणघेऊ प्रदीर्घ झुंजीतून जे शिल्लक राहिले, ते मराठ्यांचे खरे राज्य आहे. शिवाजीने पेटवलेली ज्योत कर्ते राजे आणि सेनापति नसताना प्रचंड फौजांच्या विरुद्ध २७ वर्षे अखंड झगड्याला पुरु शकली, यातच त्याच्या नेत्तृत्त्वाचे खरे यश आहे"

गडांची डागडुजी व उभारणी याचबरोबर आरमाराकडे लक्ष हाही शिवाजी महाराजांचा दूरदृष्टीकोन कुरुंदकर दाखवतात. शिवाजी महाराजांनी उभारलेल्या आरमाराने पोर्तुगीज, इंग्रज व फ्रेंच यांना धडकी भरवली होती. पुढील काळात मराठ्यांनी या आरमाराचा वापर केला असता तर कदाचित इंग्रज देशावर राज्यकर्ता झाला नसता. पुढे खुद्द नानासाहेब पेशव्यांनीच आरमार नष्ट करुन मराठी साम्राज्याचा पाया खिळखिळा करण्यात मोठा हातभार लावल्याचेही कुरुंदकर मोठ्या व्यथित मनाने लिहिताना दिसतात.

जनतेचे प्रेम शिवाजी महाराजांनी कसे मिळवले? याच्या मुख्य कारणांचा परामर्श घेताना कुरुंदकर म्हणतात - "शिवाजीने जिद्दीने घडवून आणलेला हा वतनदारीचा वध सर्वात महत्त्वाचा आहे" याच जोडीने सर्वसामान्यांच्या स्त्रियांची अब्रू वतनदारांच्या पुंडांपासून वाचवून तिला कुठेही निर्भयपणे फिरता येईल असे राज्य शिवाजीने निर्माण केले, हाही उल्लेख महत्त्वाचा आहे.

सर्वात शेवटी पुस्तकाच्या शेवटच्या २ पानांत रामदास स्वामींचे दोन वेळा आलेले (अनावश्यक) उल्लेख आणि दादोजी कोंडदेव यांच्यासंदर्भातले वादग्रस्त मुद्दे वाचकाने दुर्लक्षित करावे. कारण अलिकडच्या काळात या दिशेने खूप मोठे संशोधन झाले व अनेक पुरावेही समोर आले आहेत, येत आहेत. हा संशोधनाचा विषय आहे. मी करुन देत असलेल्या पुस्तकाच्या परिचयाचा नव्हे. तेव्हा एवढे एवढे सोडले तर बाकीच्या पुस्तकात कुरुंदकरांनी जे विवेचन केले आहे ते खरेच अफलातून आहे.

छत्रपति शिवाजी महाराजांनी गरीब रयतेला वतनदारांच्या जाचातून मुक्त केले यातच त्यांच्या लोकप्रियतेचे आणि यशाचे रहस्य सामावले आहे असे वाचकाच्या लक्षात आणून देण्यास कुरुंदकर पूर्णतः यशस्वी झाले आहेत. आजच्या राज्यकर्त्यांनी केवळ छत्रपति शिवाजी महाराजांच्या नावाचे राजकारण करण्यापेक्षा त्यांच्या गुणांची अंमलबजावणी केली तर ते कृत्य खरे शिवाजी महाराजांचा गौरव वाढवणारे ठरेल.

नरहर कुरुंदकर यांचे हे छोटेसे पुस्तक वाचनीय तर आहेच पण छत्रपति शिवाजी महाराजांना आदर्श मानणार्‍या प्रत्येक मराठी घरात असावेच असे आहे. शिवाय ऐतिहासिक संदर्भासाठीदेखील हे छोटेसे पुस्तक खूप मोठे काम करते.

नरहर कुरुंदकर यांचे छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य हे पुस्तक मी घेतले आहे. तुम्ही घेणार का? :)

इतिहाससाहित्यिकप्रकटनविचारलेखशिफारसमाहितीआस्वादसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

चेतनकुलकर्णी_85's picture

10 Feb 2012 - 9:53 pm | चेतनकुलकर्णी_85

सर्वात शेवटी पुस्तकाच्या शेवटच्या २ पानांत रामदास स्वामींचे दोन वेळा आलेले (अनावश्यक) उल्लेख आणि दादोजी कोंडदेव यांच्यासंदर्भातले वादग्रस्त मुद्दे वाचकाने दुर्लक्षित करावे. कारण अलिकडच्या काळात या दिशेने खूप मोठे संशोधन झाले व अनेक पुरावेही समोर आले आहेत, येत आहेत.
कोणते संशोधन व कोणते अनुमान आले आहे ते कृपया स्पष्ट करावे.....

अमोल खरे's picture

11 Feb 2012 - 10:33 am | अमोल खरे

असे पुरावे मागु नयेत, कारण ते कोण देणार नाही, कारण तसे पुरावेच नाहीत. ब्राम्हणांना शिव्या देऊन लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवायचे असा सिंपल हेतु आहे. दर वेळेस राष्ट्रवादी अडचणीत आली की संभाजी ब्रिगेड हमखास दादोजी कोंडदेवांचा मुद्दा काढते. खुप जुनी टॅक्टिक आहे ती. ब्राम्हणांना काहीही बोलता येतं, हिंमत असेल तर प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली अफजलखानाची कबर हलवुन दाखवावी संभाजी ब्रिगेडने. अशा वागण्याने आत्ता जी मुलं इतिहास शिकत आहेत शाळेत त्यांच्यात जातीभेद नक्की रुजणार. मी शाळेत असताना जातीभेद रुजायला १२ वी नंतर सुरुवात व्हायची जेव्हा चांगले मार्क्स मिळुनही ब्राम्हण मुलांना ईंजिनिअरिंग, मेडिकलला अ‍ॅडमिशन मिळत नसे. आता संशोधन वगैरे च्या नावाखाली इतिहास बदलायला निघाल्यावर हे शाळेपासुनच सुरु होणार, किंवा झालेही असेल कदाचित. ह्यापुढील वर्स्ट स्टेप म्हणजे पेशवे आमचे, शिवाजी महाराज तुमचे असंही होईल. तसे होऊ नये हीच इच्छा.

सागर's picture

11 Feb 2012 - 10:50 pm | सागर

अमोल महोदय,

आपल्या प्रतिसादावरुन असे स्पष्ट जाणवते आहे की तुम्ही माझा संबंध ब्रिगेडी विचारसरणीशी जोडत आहात.
येथे हे स्पष्ट करु इच्छितो की मी कोणत्याही विचारसरणीचा, पक्षाचा वा संघटनेचा नाहिये. मी जे लिहितो ते माझ्या अभ्यासातून मला जे गवसते आणि पटते तेच लिहितो.

बाकी तुमच्या शेवटच्या ओळीशी अगदी सहमत आहे.
पेशवे आमचे, शिवाजी महाराज तुमचे असंही होईल. तसे होऊ नये हीच इच्छा.

सर्वांनी समतेने एकमेकांबरोबर वागावे तर खर्‍या अर्थाने शिवराज्य येईल हीच माझी विचारसरणी आहे.

चेतनजी,

तुमच्या माहितीसाठी अलिकडेच माझ्या वाचनात आलेली महाराष्ट्र टाईम्स मधील काही इतिहास संशोधकांनी निदर्शनास आणलेले पुरावे व त्यांच्या चर्चा या पहा:

ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांनी त्यांच्या मुलाखतीत दादोजी कोंडदेव यांच्याबद्दल मते व्यक्त केली होती,
त्याला उत्तर म्हणून हा लेख पहा

या लेखाला प्रतिउत्तर मेहेंदळे यांनी न देता श्री. कस्तुरे यांनी दिले आहे. ते हे उत्तर

या प्रतिउत्तरात स्पष्ट पुरावे न दिल्यामुळे श्री. सोनवणी यांनी पुन्हा पुराव्यांसह त्यांची मते मांडली आहेत.
हे ते कस्तुरेंच्या लेखाला प्रतिउत्तर

हे अलिकडचे लेखन वाचनात आले होते म्हणून मी वादग्रस्त मुद्दे म्हणून उल्लेख केला होता. त्याचा असा विपर्यास होऊ शकेल याची मी कल्पना केली नव्हती.

मला वाटते आता तुमच्या लक्षात यावे की मी असे का लिहिले होते. वरील मटातील लेखांसंदर्भात येथे चर्चा अप्रस्तुत ठरेल असे मला वाटते, कारण हे लेख लिहिणारे आणि मी पूर्ण भिन्न आहोत :)

अवांतरः तुमच्या माहितीसाठी सांगतो. सभासद बखर ही राजाराम महाराजांच्या काळात लिहिली गेली आहे, जी शिवाजी महाराजांच्या काळातील उपलब्ध साधनांत सर्वात विश्वसनीय मानली जाते. त्या बखरी प्रमाणे देखील दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. उलट दादोजींनी शहाजीराजांना पत्रे लिहून शिवाजी पुंडांसारखा वागत असल्याच्या तक्रारीच केल्या आहेत. अशी ३ अस्सल पत्रे आज उपलब्ध आहेत. मृत्युसमयी दादोजी कोंडदेव यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीस शुभेच्छा दिल्या आहेत असे तत्कालीन सभासद बखरच सांगते. सभासद बखर येथे पाहू शकता या बखरीतील पान क्र. ११ वर सविस्तर माहिती दिलेली आहे.

जयंत कुलकर्णी's picture

11 Feb 2012 - 10:54 pm | जयंत कुलकर्णी

खुद्द शिवाजी महाराज खेडकरांच्या संशोधनाला न जुमानता काय म्हणतात ते बघूयात. बाकी काय करायचे आहे ....

दादोजींच्या मृत्यूचा उल्लेख असलेली तीन अस्सल पत्रे खुद्द शिवाजी महाराजांनीच लिहीले आहेत त्यात काय लिहीले आहे ते बघुयात.
१ पहिले पत्र १५ ऑक्टोबर १६४७चे आहे. ते त्यांनी पुणे परगण्यातील कर्हे पठार तरफेच्या कारकुनास पाठवले आहे. त्यात त्यांनी पुर्वी जे इनाम चालू होते तेच चालू ठेवण्यास सांगितले आहे. त्यात असा उल्लेख आहे “ सालमजकुराकारणे मशहुरल हजरत दादाजी कोंडदेऊ सुभेदार यासी देवाज्ञा झाली म्हणऊनू”
मशहूर : प्रसिध्द, हजरत : या शब्दाचा अर्थ माधव ज्युलियन यांनी असा दिला आहे “ राजास, पैम्गबरास,अगर श्रेष्ठ व वंद्य पुरूषास या शब्दाने स्वामी या अर्थाने संबोधितात. या वरून शिवाजीमहाराजांच्या मनात या माणसाबद्दल काय भावना होती हे समजते.
२ दुसरे पत्र २४ मे १६४७ च्या आसपास्चे आहे ते त्यांनी लिहीले आहे पुण्याच्या देशमुखांना पाठवलेले आहे त्यात सुध्दा त्यांनी एका मशिदीचे इनाम तसेच चालू ठेवायला सांगितले आहे. त्यात पण त्यांनी दादोजींचा असाच आदरपुर्वक उल्लेख केलेला आहे.
३ तिसरे महादजीभटाच्या तक्रारी विषयी पुण्याच्या देशमुखांना लिहीतांना त्यांनी म्हटले आहे “हाली मशहूरल हजरत दादाजी कोंडदेऊ सुभेदार यास देवाज्ञा जाली म्हणोन”

बाकी संशोधन चालूद्यात !

प्रचेतस's picture

11 Feb 2012 - 11:04 pm | प्रचेतस

सभासद बखर ही राजाराम महाराजांच्या काळात लिहिली गेली आहे, जी शिवाजी महाराजांच्या काळातील उपलब्ध साधनांत सर्वात विश्वसनीय मानली जाते.

किंचीत असहमत मित्रा.
सभासद बखर जरी महत्वपूर्ण असली तरी ती राजारामाच्या पदरी असलेल्या कृष्णाजी अनंत सभासदाने लिहिलेली आहे. अर्थातच ती शिवकालातली नसल्याने ती इतकी विश्वसनीय मानता येत नाही. शिवाय राजाराम महाराजांचा पगडा तिच्यावर अधिक असल्याने संभाजी राजांबाबतीत सभासदाने पक्षपात केलेला आढळून येतो.
शिवचरित्राच्या विश्वसनीय साधनांमध्ये कवींद्र परमानंदांचे शिवभारत आणि कविराज भूषणाचे शिवभूषण हे जास्त महत्वाचे मानले जातात कारण हे दोघेही महाराजांच्या पदरी होते. अर्थात त्यामुळे सभासदाच्या बखरीचे महत्व कमी होत नाही हेही निश्चित.

सागर's picture

11 Feb 2012 - 11:23 pm | सागर

संभाजी महाराजांबद्दल पक्षपात समजू शकतो मित्रा

पण दादोजी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते असे सभासदांनी न मानण्याचे काहीच कारण नव्हते.

एक कुशल शासक म्हणून दादोजींचे कर्तृत्त्व वादातीत आहेच. त्याबद्दल कोणालाही आक्षेप असण्याचे कारण नाही, नसावे.
त्यावरुन त्यांचे शिवरायांशी गुरुत्व जोडले जाऊ नये एवढेच म्हणणे होते.

दादोजींनी शिवाजी महाराजांची तक्रार करणारी ३ पत्रे शहाजीराजांकडे पाठवली होती, ती उपलब्ध आहेत त्याचे काय करायचे?

बाकी शिवभूषण आणि शिवभारत कुठे मिळतील काय? मी शोधून दमलोय मित्रा :(

प्रचेतस's picture

12 Feb 2012 - 12:14 am | प्रचेतस

बरोबर आहे. दादोजी हे शिवरायांचे गुरु नव्हते हे स्वतः मेहेंदळ्यांनीच नमूद केले आहे.
पत्रांचे म्हणशील तर वर जयंतरावांनांनी शिवाजी महाराजांच्याच ३ अस्सल पत्रांचे उल्लेख दिलेले आहेतच. पत्रापत्री चालू राहिलच. ;)

बाकी शिवाजीमहाराजांच्या सर्व अस्सल पत्रांचा संग्रह नुकताच प्रसिद्ध झालेला आहे. तो आता मिळवायला हवा.

शिवभारत आणि शिवराजभूषणही नुकतेच एका ग्रंथप्रदर्शनात पाहिल्याचे आठवतेय. माहिती काढून लवकरच तुला कळवतो. (बहुतेक डायमंड पब्लिकेशनचे असावे.)

सागर's picture

12 Feb 2012 - 12:39 am | सागर

सर्व अस्सल पत्रांचा संग्रह नुकताच प्रसिद्ध झालेला आहे. तो आता मिळवायला हवा.

ही माहिती माझ्यासाठी खूप महत्वाची आहे मित्रा. तुला तर माहिती आहेच :)
आपल्या नेहमीच्या ठिकाणी पुढील चर्चा करुयात

प्रचेतस's picture

12 Feb 2012 - 9:20 am | प्रचेतस

शिवकालीन पत्र सार हा त्रिखंडी संग्रह येथे मिळेल.
http://www.sahyadribooks.org/books/shivkaleenpatrasaar.aspx?bid=411

निनाद बेडेकरांनी अनुवाद केलेले मूळ संहितेसह असलेले शिवराजभूषण येथे मिळेल.
http://www.sahyadribooks.org/books/Shivbhushan.aspx?bid=636

सागर's picture

12 Feb 2012 - 6:26 pm | सागर

दोस्ता खूप खूप आभार,

मागवून घेतो ही पुस्तके लवकरच :)

जयंत कुलकर्णी's picture

12 Feb 2012 - 6:47 am | जयंत कुलकर्णी

ही दादोजींची तीन पत्रे वाचायला मिळतील का ? मला खात्री आहे यातून वेडावाकडा अर्थ काढला गेला आहे. किंवा कुठल्या पुस्तकात ती लिहिलेली आहेत ते सांगावे. नवीन संशोधकांच्या ब्लॉगवर/पुस्तकात्ले नको. म्हणजे अस्स्ल पत्रे कुठे चापली आहेत का ?

मालोजीराव's picture

13 Feb 2012 - 12:15 am | मालोजीराव

पत्रांवरून फारसे स्पष्ट होत नाई....कि नक्की काय ते...
दादोजींनी शिवरायांच्या पुंडव्याची पत्रे आदिलशहाला लिहिली तर आदिलशहाने दादोजींच्या पुंडव्याची पत्र कान्हीजी जेध्यांना लिहिले !
त्यामुळे नक्की कोणी काय केले कळायला मार्ग नाही ?

आणि अस्सल पत्रे वाचायला मिळणे अशक्य आहेत...उपलबद्ध पत्रांपैकी ७५% पत्र हि नकललेली आहेत !
मूळ पत्रे नष्ट झालीयेत किंवा मूळ मालकांकडे आहेत

मालोजीराव

मालोजीराव's picture

13 Feb 2012 - 12:33 pm | मालोजीराव

जयंतराव...एक पत्र जे उपलब्ध आहे ते जोडत आहे !
हे मूळ फारसी फर्मान आहे, नक्की विषय लक्षात येत नाही...!

- मालोजीराव

जयंत कुलकर्णी's picture

13 Feb 2012 - 6:33 pm | जयंत कुलकर्णी

चायला हा हरामखोर दादोजी आतून शिवाजीला सामील होता म्हणा की आणि वर शहाजीचेही ऐकत होता असे दिसते......

पुस्तकाचा अतिशय सुंदर परीचय करून दिलास रे मित्रा. पुस्तक नक्कीच वाचेन आता. फक्त ६० पानातच इतके लिहिलेय म्हणजे कमालच आहे. 'श्रीमान योगी' ला असलेली कुरुंदकरांचीच प्रस्तावनाही यापेक्षा मोठी आहे.

वल्ली मित्रा,

तुझा प्रतिसाद नेहमीच मला सुखावणारा असतो. खरे आहे. श्रीमानयोगीच्या प्रस्तावनेत कुरुंदकरांनी खूप मार्मिकपणे अणि परखडपणे त्यांची मते समोर ठेवली आहेत.

हे पुस्तक २००३ साली प्रकाशित झाले आहे, तेव्हा कुरुंदकरांना जाऊन २०-२१ वर्षे झालेली होती. त्यामुळे या पुस्तकाचे संपादन कोणी केले हे त्यात दिलेले नाहिये. पण कुरुंदकरांचे लेखन आहे त्यामुळे नक्की घे. उपलब्ध आहे बाजारात

मनापासून धन्यवाद मित्रा

प्रचेतस's picture

11 Feb 2012 - 10:57 pm | प्रचेतस

पुस्तक नक्कीच घेणार आहे. मिळाले नाही तर तुझी प्रत आहेच. ;)
बाकी वादग्रस्त विषय घेतले नाहीत तेच बरे केलेस. तू म्हणतोस ते खरेच आहे. हा संशोधनाचाच विषय असून तो संशोधकांवरच सोडून द्यावा. आपण फक्त राजांच्या चरित्रातून योग्य तेच बोध घ्यावेत.

सागर's picture

11 Feb 2012 - 11:24 pm | सागर

प्रतिसाद आवडला मित्रा तुझा.

तू माझा मित्र असल्यामुळे तुला माझी बाजू चांगलीच कळाली :)
संशोधकांनी संशोधन करित रहावे...

अत्रुप्त आत्मा's picture

10 Feb 2012 - 11:24 pm | अत्रुप्त आत्मा

दोस्ता...तुझे अनंत आभार...हे पुस्तक मी साधारण ४वर्षापूर्वी प्रथम वाचलं,,,आजही पुन्हःपुन्हा वाचतो आहे...वाचत राहावं लागणार आहे. मी हे पुस्तक अनेकांना घ्यायला लावलं आहे,शक्य नाही त्यांना दिलं आहे. इथे मि.पा.वर सुद्धा प्रतिक्रीयांमधे काही ठिकाणी त्याचा दाखला दिला आहे,,,आणी आज तर तू या महान ग्रंथाची यथासांग ओळख करुन दिलिस...या निमित्तानी संपादकांना अशी विनंती कराविशी वाटते,,,की दर शिवजयंतीला हा लेखच पुनःप्रकाशित करत रहावा. इतकं या पुस्तकाचं मोल आहे...मित्रा तू सर्व काही यथस्थित आणी इतकी अचुक ओळख करुन दिलि आहेस की आता वाचकांचं राहिलेलं काम म्हणजे फक्त पुस्तक आणुन वाचणे... आम्च्या लेखी या पुस्तकाचं मोल म्हणजे शिवाजी विषयी जर का समाजायचं काही राहुन गेलं असेल,तर त्याची परिपुर्ती होण्याचा राजमार्ग म्हणजे हे पुस्तक...(आणी वाचलं नाही तर आपल्याला समजलेला शिवाजी अजुन अपुर्ण आहे,असे हमखास समजावे)

जाता जाता---ऐतिहासिक शोध आणी विशेषतः त्यातुन बोध कसा घ्यावा याचा आदर्श वस्तूपाठ म्हणजे प्रस्तुत ग्रंथाचे लेखक प्रा.नरहर कुरुंदकर...आणी त्यांचे एकंदर सारेच ग्रंथही

सागर's picture

11 Feb 2012 - 10:15 pm | सागर

प्रिय अत्रुप्त आत्मा,

आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद. मी लिहिलेल्या पुस्तक परिचयाचे योग्य दिशेने आपण केलेल्या कौतुकाबद्दल आभारी आहे.

-ऐतिहासिक शोध आणी विशेषतः त्यातुन बोध कसा घ्यावा याचा आदर्श वस्तूपाठ म्हणजे प्रस्तुत ग्रंथाचे लेखक प्रा.नरहर कुरुंदकर...आणी त्यांचे एकंदर सारेच ग्रंथही

याबद्दल अगदी सहमत आहे. दुर्दैवाने कुरुंदकरांचे ग्रंथ प्रकाशक पुन्हा अजिबात छापत नाहित. नाहीतर कुरुंदकरांनी मनुस्मृतीवर लिहिलेला ग्रंथ कोणत्याही काळात खपेल एवढा विद्वत्तापूर्ण आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Feb 2012 - 8:09 am | अत्रुप्त आत्मा

@दुर्दैवाने कुरुंदकरांचे ग्रंथ प्रकाशक पुन्हा अजिबात छापत नाहित. नाहीतर कुरुंदकरांनी मनुस्मृतीवर लिहिलेला ग्रंथ कोणत्याही काळात खपेल एवढा विद्वत्तापूर्ण आहे.>>>> आहेत...सर्व ग्रंथ मिळतात,इंद्रायणी प्रकाशननी पुन्हा छापलेत...मिळण्याचे ठिकाण- साधना मिडिया सेंटर...शनिवार पेठ पोलिस चौकी समोर..पुणे

सागर's picture

12 Feb 2012 - 6:22 pm | सागर

अतृप्त आत्मा,

ही माहिती देऊन मला तर तुम्ही तृप्त केलेत
करतो संपर्क त्यांच्याशी... :)

दीपक साळुंके's picture

13 Feb 2012 - 2:02 pm | दीपक साळुंके

इंद्रायणी प्रकाशनाने कुरुंदकरांचे साहित्य पुन्हा छापलेय ? केव्हा ? माफ करा, पण मी आताच इंद्रायणी साहित्य ला फोन लावून विचारणा केली. तेव्हा असे काही नाहीये, असे उत्तर मिळाले. "शिवाजी-जीवनरहस्य" आणि "थेंब अत्तराचे" ही दोनच पुस्तके उपलब्ध आहेत. इतर सर्व(इंद्रायणी साहित्य ने छापलेली) "आऊट ऑफ प्रिंट" आहेत. हवं असल्यास ०२०-२४४५८५९८ या त्यांच्या क्रमांकावर चौकशी करता येईल.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Feb 2012 - 12:39 am | अत्रुप्त आत्मा

सर्वच पुस्तके इंद्रायणी प्रकाशनाने छापलेली नाहित...माझ्या सांगण्याचा मतितार्थ असा की कुरुंदकरांची साधारणतः १०/१२ पुस्तके साधना मिडिया सेंटर येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत..मी स्वतः त्यातली काही विकत घेतली आहेत...

अँग्री बर्ड's picture

11 Feb 2012 - 12:10 am | अँग्री बर्ड

शिवाजी महाराजांचे गुरु श्री. दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल कुरुंदकर काय म्हणतात ते अफलातून नाही आहे काय ?

सागर's picture

11 Feb 2012 - 10:16 pm | सागर

कुरुंदकरांची लेखणीच अफलातून आहे. :)

इष्टुर फाकडा's picture

11 Feb 2012 - 7:33 am | इष्टुर फाकडा

काय?? दहा ओळी पुरोगामी लिहिल्या आणि एकच ओळ खेडेकरांसाठी? शोभत नाही हो !! कुरुंदकरांचे कुंकू लावून प्रचाराचा नवा फंडा काय?? कुठून बळ मिळते हो तुम्हाला?

अर्धवटराव's picture

11 Feb 2012 - 8:45 pm | अर्धवटराव

दुध नासवणे आवश्यक आहे... नाहि का...

(मलाईवाला) अर्धवटराव

दहा ओळी पुरोगामी लिहिल्या आणि एकच ओळ खेडेकरांसाठी? शोभत नाही हो.कुरुंदकरांचे कुंकू लावून प्रचाराचा नवा फंडा काय??

म्हणजे नेमके काय शोभत नाही?
पुरोगामी म्हणजे नक्की तुम्हाला काय अभिप्रेत आहे?
नक्की माझ्या कोणत्या लेखनामुळे तुमच्या पोटात दुखले?
कुरुंदकरांचे कुंकू लावणे म्हणजे काय हो?

वादासाठी वाद घालत बसू नका. पुरावे असतील तर ते द्या मग बोला. असले प्रहार तुम्हाला विचार न करता करायची सवय आहे असे दिसते. मी अगोदरच खुलासा केलेला असतानाही मला असे टोचून बोलता यातच तुमची विकृत मनोवृत्तीचे दर्शन होते. आम्ही सांगितला तोच खरा इतिहास या दिवास्वप्नात तुम्हाला रहायचे असेल तर खुशाल रहा. तो तुमचा प्रश्न आहे. याउप्पर लिहित नाही. माझे येथील परममित्र परा यांना मी संयमी लिहिण्यासाठी माहिती आहे , आणि मला तुमच्याशी अर्थहीन वाद घालण्यासाठी वेळ वाया घालवण्यात रस नाहिये. इति लेखनसीमा

तर्री's picture

11 Feb 2012 - 9:32 am | तर्री

सागर-रावानी करून दिलेला पुस्तक परिचय अतिशय ओघवता आणि मार्मिक.
महाराजांना (आणि मग सावरकराना ) देव्हार्यात बसवून त्याच्या अनुनयानीच ह्या "महापुरुषावर " अन्याय केला आहे.
अवांतरः
कुरुंद्करांचे अनेक ग्रंथ त्यानिमीत्ताने आठवले. जागर , धार आणि काठ इ.
समाजवादी हिंदुत्वाकडे अत्यंत हिणकस नजरेने पहात असत.(आता ही विचारधारा संपण्याच्या मार्गावर आहे ) कुरुंदकर विचाराने समाजवादी होते तरीही त्यांचा हिंदुत्वाचा गाढा अभ्यास होता.

कुरुंदकरांनी संघाविषयी नोंदवलेले मत मनात घर करून राहिले आहे :- " संघाने हिंदूसमाजा पेक्षा हिंदूधर्मा वर जास्त प्रेम केले "

तर्री महोदय,

आपण पुस्तकाचा परिचय समजून घेतलात याबद्दल मनापासून धन्यवाद.

कुरुंदकरांचे कार्य काळाच्या पुढचेच होते. त्यांची पुस्तके आज ग्रंथालयांतच मिळतात. आज २-३ पुस्तकांव्यतिरिक्त कुरुंदकरांची इतर पुस्तके मिळत नाही हे दुर्दैव आहे.

अवांतर : तुम्ही कुरुंदकरांचे 'शिवरात्र' वाचले आहे का? या पुस्तकांतून कुरुंदकरांनी जातीयवाद आणि जमातवादी राजकारणाचे घातक परिणाम सांगितले आहेत.

तर्री's picture

12 Feb 2012 - 10:06 am | तर्री

वाचून अस्वस्थ झालो होतो.
मराठी मातीत असे काय आहे की आपण सतत ईतिहासात रमतो.
मझ्या मते ईतिहासाचे संदर्भ घेवून भविष्याचा वेध घेणे महत्वाचे.

श्रीयुत संतोष जोशी's picture

11 Feb 2012 - 9:46 am | श्रीयुत संतोष जोशी

धन्यवाद, इतक्या चांगल्या पुस्तकाची माहिती दिल्याबद्दल.

सागर's picture

11 Feb 2012 - 10:45 pm | सागर

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा

संतोषजी उस्फूर्त प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
बाकी सहमत आहे. :)

पिंगू's picture

11 Feb 2012 - 10:16 am | पिंगू

पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. आता पुस्तक मिळवतोच..

- पिंगू

सागर's picture

11 Feb 2012 - 10:44 pm | सागर

नक्की वाचा

शरद's picture

11 Feb 2012 - 10:25 am | शरद

आणि कुठे २१ व्या शतकाच्या विज्ञानयुगातील त्या 'फ्रान्सिस गोतिए'च्या बुरख्याआड तथाकथित धर्मवाद्यांनी पुण्यात १०० कोटी रुपये खर्चून उभारलेले छत्रपति शिवाजी महाराजांचे मंदीर?
कोठे आहे हे मंदीर ?
शरद

शरदजी

http://www.esakal.com/esakal/20111104/5754748871502950056.htm

ही बातमी पहा. यात सविस्तर माहिती दिली आहे.

अलिकडेच श्री.श्री.रविशंकर यांच्या हस्ते छत्रपति शिवाजी महाराजांच्या या मंदिराचे उद्घाटनही झाले असून सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

11 Feb 2012 - 1:36 pm | परिकथेतील राजकुमार

श्री. सागर हे आमचे चांगले मित्र असून एक संयमीत व्यक्तिमत्व अशी आम्हाला त्यांची ओळख आहे. मात्र आज त्यांच्या लिखाणाने आम्ही काहिसे चक्रावुन गेलो आहोत.

सर्वात शेवटी पुस्तकाच्या शेवटच्या २ पानांत रामदास स्वामींचे दोन वेळा आलेले (अनावश्यक) उल्लेख आणि दादोजी कोंडदेव यांच्यासंदर्भातले वादग्रस्त मुद्दे वाचकाने दुर्लक्षित करावे.

रामदास स्वामींचे दोन उल्लेख का आले आहेत आणि ते अनावश्यक का आहेत हे त्यांनी (पुरव्यानिशी) आम्हाला समजावल्यास अतिशय आनंद होईल.

आणि मुख्य म्हणजे असे 'अनावश्यक' लिहिणार्‍या माणसाच्या पुस्तकाची ओळख इथे का करून दिली आहे ते देखील जाणून घ्यायला आवडेल.

सागर's picture

11 Feb 2012 - 10:35 pm | सागर

परा,

माझ्या प्रिय मित्रा,

तू म्हणतोस ते खरे आहे. मी संयमित लेखन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच मला न पटलेल्या मुद्द्यांचा उल्लेख केला होता व त्याचा खरेखोटेपणा हा संशोधनाचा भाग आहे हेही लिहिलेले आहे.

** आणि मुख्य म्हणजे असे 'अनावश्यक' लिहिणार्‍या माणसाच्या पुस्तकाची ओळख इथे का करून दिली आहे ते देखील जाणून घ्यायला आवडेल.**

तुझ्या या मताबद्दल थोडेसे सांगावेसे वाटते. पुस्तकाचा परिचय मी लिहिला आहे त्यामुळे 'अनावश्यक' उल्लेख हे माझ्या दृष्टीने आहेत. अलिकडेच माझे या वादग्रस्त विषयांच्या अनुषंगाने बरेच वाचन व अभ्यासही झाला आहे. त्यामुळे मला व्यक्तीशः त्या गोष्टी खटकल्या होत्या. दुसर्‍यांना तीच गोष्ट पटूही शकते. येथील प्रतिसाद पाहून माझा लेख संपादित करुन त्यात हा खुलासा मला टाकायचा होता, पण लेखकाला लेख संपादित करता येत नाहिये, त्यामुळे येथेच देतो आहे.

दुसरे तुझ्या प्रश्नाचे उत्तर असे की कुरुंदकरांचे लेखन अनावश्यक आहे असे मी अजिबात म्हटलेले नाहिये. उल्लेख अनावश्यक होते असे म्हटले आहे. आणि तेही माझ्या मते. बाकी सर्व लेखकांची मते पटतातच असेही नाही ना मित्रा.

कुरुंदकरांच्या मी केलेल्या ९९ % कौतुकाकडे सर्वांनीच लक्ष द्यावे ही विनंती. कुरुंदकरांनी शिवाजी महाराजांच्या खूप महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. त्यादृष्टीने हे पुस्तक खूप महत्त्वाचे आहे.

चेतनकुलकर्णी_85's picture

11 Feb 2012 - 5:50 pm | चेतनकुलकर्णी_85

तेच ....पहिल्या प्रतिसादात मी तेच विचारले आहे...पण कोणी अजूनतरी उत्तर दिले नाही...
आता इतकी शिवचारित्रे झालीत कि खुद्द शिवाजी महाराजांचा पण गोंधळ उडेल...
बाकी हे पुस्तक म्हणजे "crash course" आहे का शिवचरित्राचा?..

आता उत्तर मिळाले असेल अशी आशा आहे.

चेतनकुलकर्णी_85's picture

11 Feb 2012 - 5:54 pm | चेतनकुलकर्णी_85

महाराजांना (आणि मग सावरकराना ) देव्हार्यात बसवून त्याच्या अनुनयानीच ह्या "महापुरुषावर " अन्याय केला आहे...

कोणी व कुठे बसविले आहे ह्या दोन लोकोत्तर पुरुषांना देव्हाऱ्यात???ते शिवाजी महाराजांचे मंदिर तरी कुठे आहे हे स्पष्ट करावे....
बाकी सोनिया गांधीचा दुर्गावतार चालतो वाटतो तुम्हाला कॉंग्रेस च्या पोस्टर वरील?????

लोहगांव येथे हे मंदीर आहे.
http://www.esakal.com/esakal/20111104/5754748871502950056.htm

ही बातमी पहावी. मागच्याच महिन्यात श्री.श्री.रविशंकर (आर्ट ऑफ लिव्हिंगकर्ते) यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन झालेले आहे.

जिज्ञासूंनी नरहर कुरुंदकर यांच्या "माणसाचा देव ज्या वेळेला केला जातो त्या वेळेला त्याच्या अभ्यासाची गरज संपते, अनुकरणाचीही गरज संपते. हा श्रद्धेने निर्माण होणारा फार मोठा पायगुंता आहे. तो टाळण्याचा आपण यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे." या विचारांच्या पार्श्वभूमीवर (कुरुंदकरांचे विचार पटत असतील तर) अवश्य भेट देऊन हे छत्रपति शिवाजी महाराजांचे मंदीर पहावे

हा या मंदीराचा फोटो

आणि ही ती शिवाजी महाराजांच्या मंदीरातील प्रमुख मूर्ती

गोतिए यांच्या या ब्लॉगवर अधिक माहिती मिळेल

अर्धवटराव's picture

11 Feb 2012 - 8:59 pm | अर्धवटराव

या लोहगाव प्रकल्पात शीवाजीमहाराजांच्या कर्तुत्वाचे, इतीहासाचे शिल्परुपाने प्रकटन आणि अभ्यासाला उत्तेजन देण्याचा संकल्प मांडण्यात आला आहे.. हे छत्रपतींचे दैवतीकरण नाहि... आपण कलामंदीर, विद्यामंदीर म्हणतो तिथे कलेचा, विद्येचा अभ्यास होतो म्हणुन.. कुठले कर्मकांड होते म्हणुन नव्हे.
एका चांगल्या विषयाचा चुथडा करण्यात काय समाधान मिळतं पब्लीकला...देवास ठाऊक.

अर्धवटराव

सागर's picture

11 Feb 2012 - 10:02 pm | सागर

असहमत आहे अर्धवटराव,

एकाच बातमीत काय म्हटले आहे हे पहा.

"लोहगाव येथे पाच एकरांत शिवाजी महाराजांचे मंदिर आणि त्यांच्या पराक्रमाची माहिती देणारे संग्रहालय"

मंदीर आणि संग्रहालय हे दोन्ही शब्द एकाच बातमीत असल्यामुळे तुम्ही दिलेला तर्क व अर्थ पटत नाही :(

खुद्द गोतिए यांनीदेखील हे मंदीरच असल्याचे मान्य केलेले आहे. :)

अर्धवटराव's picture

11 Feb 2012 - 10:50 pm | अर्धवटराव

बातमीतला अगदी पहिला परिच्छेद..
"... ते तब्बल शंभर कोटी रुपये खर्चून भव्य संग्रहालयाच्या माध्यमातून शिवचरित्राचा आलेख मांडणार आहेत."
ज्या विभुतीबद्दल हा उपक्रम आहे त्याचे एक अधिष्ठान स्मारक/मंदीर असणे असणे स्वाभावीक आहे. आणि हा फ्रेंच माणुस शिवाजीला हार-फुले वाहुन, नवसाला पावणारा एक चमत्कारी पाषाणमूर्ती बनवेल असं दिसत नाहि.
मंदीर म्हणजे केवळ धार्मीक औपचारीकता पाळण्याचे ठीकाण नाहि... तर आदर/भक्ती व्यक्त करण्याचं व्यासपीठ आहे.

तसं पाहिलं तर संभाजी ब्रिगेड प्रणीत "जीजाऊ धर्म" के काय सुरु झालय... ते शुद्ध दैवतीकरण होय (तेही द्वेषाधारीत...)
असो. मूळ धाग्याचा विषय फार चांगला आहे, पण शेवटच्या रामदासांच्या आणि दादोजींच्या उल्लेखाने लेखनकर्त्याने इतक्या छान लेखाची रया घालविली असं माझं स्पष्ट मत आहे... हा देखील चुथडाच.

अर्धवटराव

स्मारक/मंदीर

असे म्हणता नाही येणार प्रिय मित्रा.

दोन्ही शब्दांचे अर्थ पूर्ण वेगळे आहेत.

श्री. गोतिए यांच्याच शब्दांत सांगायचे तर त्यांनी हे श्राईन उभारले आहे. (श्राईन म्हणजे मंदीर हे सांगायला नकोच)

स्मारक उभारले असते तर प्रश्नच नव्हता. आज मंदीर उभारले आहे. अजून ५० - १०० वर्षांनी या शिवाजी महाराजांच्या मंदीरात लोक नवस बोलायला आले तर आश्चर्य वाटायला नको. या भयास्तव हे मंदीर म्हणून आज स्वीकारणे पटत नाही.
स्मारक उभारणार असतील तर १०० काय १००० कोटी पण छत्रपति शिवरायांच्या स्मारकावर खर्च झाले तरी चालतील. (मुंबईतील समुद्रातील स्मारकात ते होतेच आहे :) )

अर्धवटराव's picture

12 Feb 2012 - 7:29 am | अर्धवटराव

जसं मी पुर्वी टंकलय, मंदीर म्हणजे केवळ धार्मीक विधी पार पाडण्याची वा नवस-सायास करण्याची जागा नाहि तर श्रद्धाभाव प्रकट करण्याचे/आपल्या दैवताशी भावनीक कनेक्ट करायचा यत्न करण्याचे/आईच्या कुशीत जाऊन मायेचा ओलावा अनुभवण्याचे/आठवणींना जागे करुन अंगावर रोमांच उभे करण्याचे ठीकाण आहे. हा सर्व भावनांचा कल्लोळ फार उदात्त आणि स्वाभावीक आहे... आणि तो एक्सप्रेस व्हायला म्हणुन मनुष्य मंदीर उभारतो (त्याचे पुढे बाजारीकरण होते... मान्य)
गोतिए असा बाजार उठवायला बघतोय कि त्याला खरोखरच शिवाजी विषयात रस आहे माहित नाहि... आणि तु म्हणातोस तसं ५०-१०० वर्षांनी या शिव मंदीरात उपासाचे बोकड कापल्याही जातील... काहि भरवसा नाहि. शेवटी त्या स्थळाचे पावित्र्य आणि उद्देश जपणं आपल्या समाजावर अवलंबुन आहे. तिथे मंदीराऐवजी स्मारक जरी बांधलं तरी त्यावर बदामाच्या आकारात क्ष+य असं काहि लिहायला आपले पब्लीक कमी करणार नाहि.
असो.

अवांतरः ५०-१०० वर्षांनी लोकांना शिवाजी नावाने जरी ठाऊक असला तरी मिळवली.

अर्धवटराव

सागर's picture

12 Feb 2012 - 6:24 pm | सागर

एक्झॅटली मला हेच म्हणायचे आहे मित्रा . :)

अशा गोष्टी नंतर होण्याच्या शक्यता निर्माण होण्यापूर्वीच टाळता आल्या तर ते जास्त योग्य नाही का?

बाकी स्मारके कितीका उभारेनात , तो छत्रपतिंचा गौरवच असेन

तर्री's picture

11 Feb 2012 - 9:39 pm | तर्री

चेतनराव , "देव्हार्‍यात बसवणे " चा शब्दशः अर्थ नका घेवू. सावरकरांच्या विचाराचे आचरण करण्या ऐवजी ( जाती भेद निर्मूलन , कर्मकांड विरहित हिंदुत्व ) त्यांच्या नावाचा जप करण्यात काही "जाती" धन्यता मानतात. तसेच महराजांच्या (रयतेचा राजा , सुभेदारी नष्ट करणे, हिंदवी स्वराज्य ) तत्व सोडून "हिणकस" राजकारण करण्यात त्यांचे तथाकथित अनुयायी धन्यता मानतात. एवढेच मला म्हणायचे होते.

सागर's picture

11 Feb 2012 - 10:42 pm | सागर

तत्व सोडून "हिणकस" राजकारण करण्यात त्यांचे तथाकथित अनुयायी धन्यता मानतात

तर्री यांच्याशी अगदी सहमत आहे

चेतनकुलकर्णी_85's picture

11 Feb 2012 - 8:41 pm | चेतनकुलकर्णी_85

लिंक दिल्या बद्दल आभार..
पण हे संग्रहालय सारखे असून ह्यात शिवाजी महाराजांची काही आरती वगैरे गायली जाणार नाही आहे...
"माणसाचा देव ज्या वेळेला केला जातो त्या वेळेला त्याच्या अभ्यासाची गरज संपते, अनुकरणाचीही गरज संपते. हा श्रद्धेने निर्माण होणारा फार मोठा पायगुंता आहे. तो टाळण्याचा आपण यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे."
काही कळले नाही बुवा ..हि सक्ती फक्त हिंदू धर्म बद्दलच का बरे???
आणि समर्थान बद्दल आणि दादोजीन बद्दल काय लिवले आहे व कशाच्या आधारावर ह्या महाशयांनी ते कळले तर बरे होईल...

चेतन महोदय,

"माणसाचा देव ज्या वेळेला केला जातो त्या वेळेला त्याच्या अभ्यासाची गरज संपते, अनुकरणाचीही गरज संपते. हा श्रद्धेने निर्माण होणारा फार मोठा पायगुंता आहे. तो टाळण्याचा आपण यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे."

काही कळले नाही बुवा ..हि सक्ती फक्त हिंदू धर्म बद्दलच का बरे???

हे कुरुंदकरांचे विचार आहेत हे लक्षात घ्यावे. ते पटत नसतील तर त्यावर बोलायला मी असमर्थ आहे. कारण कुरुंदकर हयात नाहियेत आणि मी तेवढ्या अधिकाराने (माझी बाजू मांडू शकेल पण) कुरुंदकरांची बाजू मांडू शकणार नाही. :)

कृपया पुस्तकाच्या महत्त्वाच्या भागाकडे लक्ष द्यावे, दिशा भटकवू नये ही विनंती. मी फक्त पुस्तकाचा परिचय लिहिला आहे पुस्तक नाही. वादग्रस्त मुद्द्यांचा उल्लेख मी अगोदरच परिचयात केला आहे आणि तो संशोधनाचा भाग आहे हेही स्पष्ट केले आहे.

धन्यवाद

मृगनयनी's picture

11 Feb 2012 - 11:05 pm | मृगनयनी

सागर'जी..
आपण सोनवणी यान्ची एक लिन्क दिलेली आहे, त्यामध्ये.. "ज्ञानेश्वर, चक्रधर(स्वामी), एकनाथ इ सन्तांबद्दल बहुजनांना आदरच आहे, मग ते फक्त रामदासस्वामींचाच का तिरस्कार करतात, असे दिलेले आहे..
किन्वा सोन्वणींच्या म्हणण्याप्रमाणे ""सगळ्या ब्राह्मणांचा तिरस्कारच बहुजनांना करायचा असता.. तर ज्ञानेश्वर, एकनाथ इ. ब्राह्मण सन्तांचाही केला असता.. पण बहुजन लोक या २-४ ब्राह्मणी सन्ताना मानतात.. आणि शिवाजी आणि रामदास यान्चा काहीही सम्बन्ध नसताना तो ब्राह्मणी षड्यन्त्रातून जोडला गेल्याने आणि "सत्य"काय आहे हे सगळ्या बहुजनांना माहित असल्याने ते फक्त समर्थ रामदासन्नाच नावे ठेवतात..."" इ. इ. इ.

----- या सगळ्यावर इतकेच सान्गावेसे वाटते,की मुळात ज्ञानेश्वर, एकनाथ, चक्रधरस्वामी यांचा शिवाजीमहाराजांसारख्या इतर कोणत्या थोर क्षत्रिय स्वराज्यसन्स्थापकाबरोबर कधी सम्बन्ध आलेला नव्हता. तसेच "शिवाजी महाराज" या नावावरूनच राजकारण खेळण्याची परम्परा महाराष्ट्रात अगदी पूर्वापार चालत आलेली आहे. त्यातूनच "जातीयवाद" निर्माण झाल्याचे तर सगळेच मान्य करतात. रामदास स्वामी, तुकाराम'जी हे शिवाजींच्या काळातलेच सन्त होते.

यापैकी रामदास स्वामी- ब्राह्मण तर तुकाराम'जी हे जातीने वाणी होते. त्यामुळे रामदास स्वामी किन्वा दादोजी कोन्डदेवांसारख्या ब्राह्मण लोकांना जर शिवरायांचे गुरु म्हनून मान्य केले, तर समाजातील ब्राह्मणजातीला महत्व किन्वा मोठेपणा दिल्यासारखे होईल... ही भीती मराठा-क्षत्रिय, वाणी, शूद्र या सगळ्यांच्याच मनात होती... अर्थात अजूनही आहे.... त्यामुळे साहजिकच रामदासांच्या आणि दादोजींच्या "गुरु-त्वा" ला नाकारले गेले../ जात आहे.

ज्ञानेश्वर, एकनाथ या सन्तांकडून किन्वा या सन्तांच्या इतिहासाकडून सीग्रेडी किन्वा नरके-सोनवणी कम्पूतल्या लोकान्ना काहीही फायदा तोटा, धोका नसल्याने साहजिकच या ब्राह्मणसन्तांना सहसा कुणी वाईट म्हणत नाही. किन्वा त्यान्चे अस्तित्वही नाकारत नाही!!

तसेच सगळ्याच बहुजन समाजाला रामदासांचा तिरस्कार आहे , असेही नाही..पुण्यश्लोक स्व. 'नानासाहेब धर्माधिकारी' यान्नी दासबोधाद्वारे तसेच रामदासांच्या शिकवणुकीप्रमणे अनेक बहुजनांचा उद्धर केला. साधारण २-३ वर्षांपूर्वी नानासाहेबांचे निधन झाले..पण आजही नानासाहेब आणि समर्थ रामदासांना मानणारे व दासबोधाच्या शिकवणुकीचे पालन करणारे असंख्य बहुजन आहेत. आणि ते समर्थ रामदासांनाच शिवाजींचे गुरु मानतात!!!

मृगनयनी,

मी व्यक्तीशः कोणताही भेद मानत नाही. सोनवणींनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यांचे खंडन कोणीही पुराव्यांनिशी करत नाहिये हे मला जाणवले. त्यांची सर्व मते पुराव्यांनी खोडून काढली गेली तर प्रश्न आपोआपच मिटतो. पण असे कोणीही करत नाहिये , ही खेदाची गोष्ट आहे.

ब्राह्मण लोकांचा मी व्यक्तीशः अतिशय आदर करतो. कारण ज्ञानाची कवाडे बहुजनांसाठी त्यांनीच तर खुली केली ना?
लोकमान्य टिळक किंवा कुरुंदकरांसारखे अनेक समत्त्व मानणारे विद्वान बहुजनहिताय बहुजनसुखाय याचा पुरस्कार करताना दिसतात. त्यामुळे समता मानणार्‍या सर्वांचाच मी आदर करतो.

पण मृगनयनी तुला आश्चर्य वाटेल, काही विध्वंसक प्रवृत्ती (ज्ञाति नव्हे) खोट्या अभिमानाला अजूनही कुरवाळतात. व आम्ही सांगतो तेच खरे असा अट्टाहास धरतात. श्री. सोनवणी हे एक इतिहास संशोधक देखील आहेत. किंबहुना मी देखील त्यांच्याशी वाद घातला आहे. पण त्यांनी जे प्रश्न निर्माण केले, जे त्यांच्या लेखातही आहेत. त्यांची उत्तरे कोणी का देत नाही? हा प्रश्न मला सतावतो आहे. असो.

पण तू जे लिहिले आहेस ते सर्व सोनवणींच्या लेखाबद्दल आहे. त्याबद्दल मी अधिकाराने बोलू नाही शकणार.

बाकी तू जे रामदास स्वामींबद्दल लिहिले आहे त्याबद्दल आदर आहेच.
दासबोध मीही वाचला आहे.
मनाचे श्लोक तर अजूनही आवडीने कधी कधी मी म्हणत असतो :)

तू सविस्तर दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. आपण जो अभ्यासला तोच इतिहास खरा असे कोणी मानू नये व समोर येणारे नवे संशोधन पुराव्यांनिशी तपासून आपली मते ठरवावीत एवढेच माझे म्हणणे होते. बाकी ज्ञानेश्वर, रामदास पूजनीय आहेत व राहतील :)

अवांतरः मी तुझ्यासाठी सागरजी कधी झालो ? (की मी समजण्यात चूक करतो आहे ? :(

मूकवाचक's picture

13 Feb 2012 - 10:46 am | मूकवाचक

आपण जो अभ्यासला तोच इतिहास खरा असे कोणी मानू नये व समोर येणारे नवे संशोधन पुराव्यांनिशी तपासून आपली मते ठरवावीत ...
सहमत. त्या त्या काळची वैचारिक फॅशन आणि राजकीय सोय/ मतपेटीची समीकरणे लक्षात घेत नवे नवे संशोधन घडत रहावे. ('स्पॉन्सरशिप'चा प्रश्न त्याने आपोआप सुटतो). इतिहासाचे अव्याहतपणे पुनर्लेखन घडत रहावे. त्यानुसार यथायोग्य असे मूर्तिभन्जन आणि दैवीकरण घडत रहावे. यातूनच महाराष्ट्राचे आणि पर्यायाने भारताचेही उज्वल भविष्य घडेल अशी खात्री आहे.

चेतनकुलकर्णी_85's picture

11 Feb 2012 - 10:44 pm | चेतनकुलकर्णी_85

तर्री यांना..
मला तर तुमच्याच प्रतिसादावरून जातीय वादाचा वास येतोय :)
"जाती" वर फार जोर दिलात तुम्ही...
अशी पुस्तके स्वस्तात ल्या स्वस्तात उपलब्ध करून व त्याचा प्रसार करून ब्राम्हण व मराठा ह्यात वाद निर्माण करणे हाच हेतू आहे असल्या लोकांचा...सावरकरांचे विचार हीच माणसे पायदळी तुडवीत आहेत... कारण ह्यानंच जातीचे राजकारण करून आपली वजने वाढवायची आहेत..आणि उलट्या बोंबा...

इनोबा म्हणे's picture

12 Feb 2012 - 12:03 am | इनोबा म्हणे

यापैकी रामदास स्वामी- ब्राह्मण तर तुकाराम'जी हे जातीने वाणी होते. त्यामुळे रामदास स्वामी किन्वा दादोजी कोन्डदेवांसारख्या ब्राह्मण लोकांना जर शिवरायांचे गुरु म्हनून मान्य केले, तर समाजातील ब्राह्मणजातीला महत्व किन्वा मोठेपणा दिल्यासारखे होईल... ही भीती मराठा-क्षत्रिय, वाणी, शूद्र या सगळ्यांच्याच मनात होती... अर्थात अजूनही आहे.... त्यामुळे साहजिकच रामदासांच्या आणि दादोजींच्या "गुरु-त्वा" ला नाकारले गेले../ जात आहे.

कृपया कुठल्याही जातीविषयी अशी थेट विधाने करताना, थोडे तारतम्य बाळगा. याच न्यायाने मराठा-क्षत्रिय, वाणी, शूद्र जातीय ही ब्राह्मणजातीला दोषी ठरवू शकतात.
एखाद्या व्यक्तीची अथवा एखाद्या व्यक्तीसमूहाची चूक ही संपूर्ण समाजाची/जातीची चूक समजली जाणार असेल तर याच न्यायाने ज्ञानेश्वर आणि तुकारामांना विरोध करणार्‍या ब्राह्मणजातीय व्यक्तींमूळे संपूर्ण ब्राह्मणजातीला ही दोष दिले जातील हे लक्षात असू द्या.
शिवाजी महाराजांना क्षत्रिय मानण्यास विरोध करणारे ही ब्राह्मण त्यावेळी होते. याचा आधार घेऊन आज कोणा मराठा-क्षत्रिय, वाणी, शूद्रांनी ब्राह्मण शिवाजी विरोधी होते असे म्हटल्यास आपण ते मान्य कराल काय?

या जातीय भांडणात मला काही ही वैयक्तीक रस नाही. मिसळपावचे वातावरण असल्या विषयांवरुन बिघडू नये एवढीच इच्छा आहे.

सागर's picture

12 Feb 2012 - 12:42 am | सागर

इनोबा,
प्रतिसाद आवडला

एखाद्या व्यक्तीची अथवा एखाद्या व्यक्तीसमूहाची चूक ही संपूर्ण समाजाची/जातीची चूक समजली जाणार असेल तर याच न्यायाने ज्ञानेश्वर आणि तुकारामांना विरोध करणार्‍या ब्राह्मणजातीय व्यक्तींमूळे संपूर्ण ब्राह्मणजातीला ही दोष दिले जातील हे लक्षात असू द्या.

नेमके मला हेच म्हणायचे होते. प्रवृत्तींना जातीवाचक समजले जाऊ नये.

मैत्र's picture

12 Feb 2012 - 7:54 am | मैत्र

-- I don't hate in plurals...

(इंग्रजीबद्दल क्षमस्व - आशय पहावा).

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Feb 2012 - 8:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुस्तक परिचयाबद्दल आभार. पुस्तकाची चांगली ओळख करुन दिली आहे.
पुस्तक मिळवून वाचून संग्रही ठेवेन. काही वादाच्या विषयांवर आम्हीही घातलेले वाद.

ब्राह्मण हा विषय आल्यावर काही लोक लैच मनाला लावून घेतात असे दिसते. असो, चालायचंच...!

-दिलीप बिरुटे

पुण्याचे वटवाघूळ's picture

12 Feb 2012 - 9:11 am | पुण्याचे वटवाघूळ

खूपच छान. ६० पानी पुस्तकात 'ते' उल्लेख शेवटच्या दोन पानात आणि सागर यांच्या ५० पेक्षा जास्त ओळींच्या लेखात त्या उल्लेखांचा उल्लेख एका ओळीत (म्हणजे २%). आणि ७०% पेक्षा जास्त चर्चा त्यावरच. चालू द्या.

१९८५ मध्ये मी दहावीला असताना मराठीच्या पुस्तकात नरहर कुरूंदकरांचा एक धडा होता. त्यात महाराजांच्या चरित्रातील नाट्यमय घटनांना टाळून त्यांचे खरे कर्तुत्व अभ्यासले पाहिजे, तसेच महाराज गेल्यानंतर २५ वर्षे महाराष्ट्रातील सामान्य जनता हातात शस्त्रे घेऊन शत्रूविरूध्द उभी राहिली आणि जे राज्य सामान्य जनतेला आपले वाटले पण वतनदारांना आपले का वाटले नाही या दोन प्रश्नांचे उत्तर एकच आहे अशा स्वरूपाचे मत त्यात कुरूंदकरांनी मांडले होते असे आठवते.

छान लेखाबद्दल सागर यांना धन्यवाद आणि त्या गोष्टीपेक्षा जास्त चर्चा लेखातील इतर कन्टेन्टवर असती तर चांगले झाले असते असे वाटते. वेळ मिळेल त्याप्रमाणे मी पण या चर्चेत सहभागी होणार हे नक्की.

(महाराजांचा मोठा पंखा)

पैसा's picture

12 Feb 2012 - 11:57 am | पैसा

हे पुस्तक सहज उपलब्ध नसेल तर एक सूचना आहे. "वास्तवदर्शी चित्रपट" प्रकल्पाप्रमाणे कुरुंदकरांच्या पुस्तकांचे काही करता येत असेल तर जरूर पहा.

तिमा's picture

12 Feb 2012 - 12:59 pm | तिमा

माझी सर्व वाचकांना व धागाकर्त्याला विनंती आहे की बाकी सर्व वाद राहू द्यात, आधी ह्याचा विचार करा की सध्याच्या 'वतनदारांपासून' आपली सुटका करणारा आहे का कोणी या देशांत ? नसला तर तसा होण्याचा कोणीतरी प्रयत्न करणे जरुरी आहे. कारण तरच पुढील पिढीला काही भवितव्य राहील.

नितिन थत्ते's picture

12 Feb 2012 - 1:24 pm | नितिन थत्ते

तिरशिंगराव आगे बढो, हम तुम्हारे साथ पीछे बहुत दूरीपर हैं.

सुनिल पाटकर's picture

12 Feb 2012 - 2:38 pm | सुनिल पाटकर

हे पुस्तक मी वाचले आहे..जुने पुस्तक आहे परंतु त्याची माहिती करून देण्याचे काम आपण केले आहे.अतिशय तपशिलवार पुस्तकाची मांड्णी आहे .कुरुंदकरांनी शेवटी एका पानामध्ये महाराजांविषयी सारांश दिला आहे तो अप्रतिम आहे.