हस्ताक्षरातील अक्षर...

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
24 Jan 2012 - 12:16 pm

‘काही मान्यवर अन् प्रथितयश साहित्यिकांच्या हस्ताक्षरातलं एक अक्षर जरी कळत असेल तर शपथ.’ असे काही प्रकाशक आणि संपादक सदरहू साहित्यिकांच्या लिखाणाऐवजी ‘लेखना’वर टिप्पणी करताना जरूर बोलून जातात. याला काही माननीय अपवाद असतील, नाही असे नाही. तरीही यथातथा असलेल्या अक्षरातूनच ‘अक्षर’ वाङ्मय निपजते यात कुणाला शंका नसावी. हस्ताक्षर चांगले नाही वा संपादकांना वाचन सुलभ व्हावे म्हणून काही लेखक मंडळी चांगल्या हस्ताक्षराचे लिपिक पदरी बाळगून असत असेही ऐकिवात आहे. सुंदर विचार प्रसवणारे साहित्यिक अक्षरलेखनात मात्र कुडमुडे का? असा प्रश्न उपस्थित होण्याची दाट शक्यता आहे. मग हस्ताक्षरावरून व्यक्तीच्या भाव-भावनांचा मेळ घालण्याचे जे शास्त्र(?) आजकाल ठासून लिहिले जाते त्याविषयी शंका घ्यायला वाव आहे.
सहीवरून स्वभाव कळतो(?) म्हणतात. ज्यांना अंगठे मारणेच जमते त्यांचा स्वभाव दिलदार आहे की संकुचित? कसे ताडावे? साक्षरता अभियानामुळे तळागाळातील लोक साक्षर झाले. मात्र ते जे लिहितात त्यातील एक अक्षर तरी वाचता येईल का? अशी काही ठिकाणी परिस्थिती असतांना हस्ताक्षरावरून व्यक्तीच्या मनातील भाव, मानसिक बैठक, भावनांची आंदोलने नोंदविणे हा प्रकार कसा तकलादू कुबड्यांवर उभा केला गेलाय ते समजून येईल.
कालच (२३ जानेवारी) राष्ट्रीय हस्ताक्षर दिन (नॅशनल हँडरायटींग डे) साजरा झाला. ‘सुंदर हस्ताक्षर हा एक सुरेख दागिना आहे,’ हा सुविचार वाचता न येण्याच्या वयापासून ऐकावा लागतो. ज्यावेळी लिहायला सुरुवात होते त्यावेळी कुत्र्याचे पाय मांजराला होणे क्रमप्राप्त असते. धाकदपटशा दाखवून अक्षर सुधारते, सुधारावता येते. म्हणजे लहानग्यांनी जे ‘चितारलेय’ ते इतरांना ‘वाचण्या’योग्य होते. खरे तर वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षी वळणदार हस्ताक्षर शिकणे जाणीवपूर्वक सुरु होते. त्यानंतर मात्र स्वतःची विशिष्ट ‘लिखाण’शैली विकसित होते. चोविसाव्या वर्षी हे शिकणे पूर्ण होऊन हस्ताक्षरातून स्वत्व ठीबकू लागते. हँडरायटींगला ब्रेनरायटिंग समजण्याचा काळ या वयानंतरच सुरु होतो, असे म्हणतात.
परंतु मुख्य मुद्दा इथेच उपस्थित होतो की, या वयानंतर पेन कागद घेऊन एकाग्रतेने लिहितांना आजकाल कुणी आढळते का? टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाईल, इंटरनेटच्या या वेगवान जमान्यात ही ‘उत्तम हस्ताक्षर’ नामक कला एका दूर कोपऱ्यात जाऊन पडली आहे की नाही? स्क्रीनवर लागतील इतक्या संख्येने इंग्रजी-मराठी फॉन्ट उपलब्ध असतांना आणि ते विनासायास पाहिजे त्या आकारात प्रकारात प्रिंट करता येण्याची सोय असतांना कोण पठ्ठ्या कागदावर सुंदर अक्षरांचे दागिने पेरीत बसेल? आता तर म्हणे प्रत्येक शाळा संगणकीय करणार आहेत. अकरावी-बारावीच्या मुलांना स्वस्तातले लॅपटॉप मिळणार आहेत. म्हणजे उद्याची कॉलेजियन्स खिशात पेन घेऊन मिरविण्याऐवजी संगणकच ठेवून मिरवतील हे आजही दिसतेच आहे. अशावेळी सुंदर हस्ताक्षर वगैरे प्रकार फारच गौण मानला जाईल. याबाबत दुमत नसावे. ज्याचे प्रेझेंटेशन उत्तम तोच उत्तम असेही एक नवे सूत्र आमलात येईल.
सद्याच्या पिढीकडे अॅन्ड्रॉईड लोडेड मोबाईल असतांना कोण महाभाग कागदांवर वा वहीत कधी ना कधीतरी ‘संपणाऱ्या’ पेनाने नोट्स लिहीत बसेल? मग हे ‘हस्ताक्षर सुधार’ वर्ग घेणे, हस्ताक्षरावरून व्यक्तीचा स्वभाव जाणून घेणे, अक्षरांच्या उंचीवरून- फर्राटे मारण्याच्या शैलीवरून मनातील आंदोलने समजावून घेणे याचे ‘शास्त्र’ नक्कीच कालबाह्य ठरणार हे निश्चित.
मामलेदार कचेरीत जाऊन पहा. तिथे अर्ज लिहून देणाऱ्या व्यक्तींची अक्षरे त्यांनाच कळत असतील की नाही देव जाणे. कुठल्याही सरकारी कचेरीत गेलात अन् फायली चाळल्या असता काय दिसेल? हो दिसेलच ते, वाचता येणे अशक्यच असते. शिफारस वा टिप्पणी लिहितांना वरिष्ठ साहेबच जिथे कंजुषी करतो तिथे इतर लिपिकांची सुंदर अक्षर काढण्याची काय मजाल? फार फार तर चौथी पाचवीची मुलेमुलीच तेवढी काहीतरी सुंदर लिहितांना (तेही शिक्षकांनी कम्पलसरी केलं असल्याने) दिसतील. अन्यथा सगळीकडे सुंदर हस्ताक्षरांची बोंबाबोंबच दिसते. असे असतांना आजच्या पिढीसाठी आउटडेटेड ठरणारी शैली गळी उतरविण्याचा गवगवा करून त्यासाठी रान उठवायचे काहीच कारण नाहीये.
आमच्यापैकी कितीतरी डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहितांना अक्षरशः झोपा काढल्यासारखे लिहितात हे काही खोटे नाही. ते असे लिखाण असते की डॉक्टरपेक्षा तो केमिस्टच अतिहुशार म्हणावा की ज्याला ते औषध काय लिहिले असावे याचा अचूक ‘अंदाज’ लावता येतो. पण म्हणून काही डॉक्टरांच्या गिचमिड हस्ताक्षरावरून ते भणंग स्वभावाचे, विघ्नसंतोषी, गुन्हेगारी वृत्तीचे असतील असा कयास काढणारे शास्त्र ‘फसवे’ म्हणावे नाही तर काय? या पुष्ट्यर्थ अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.
एकंदर काय तर लफ्फेदार सही ठोकणारा जितका लुच्चा असू शकतो तितका जोरकस अंगठा उठविणारा कदापी नसतोच असे नेहमी आढळून येते ते काही उगाच नाही. मग गलिच्छ हस्ताक्षरावरून एवढा गदारोळ उडविण्याचे काम का म्हणून करायचे? ज्याला जशी अक्षरे लिहायचीत तशी लिहू द्या, अक्षर चांगले‘च’ असावे असा अट्टहास का? प्रत्येकाने सुंदर अक्षर काढण्यासाठी जनजागृती व्हावी (जी कधी होऊ शकणार नाही) म्हणून हस्ताक्षरदिन साजरा करणे चुकीचेच ठरेल. नाही का?

कलाभाषाशब्दक्रीडासाहित्यिकशुद्धलेखनतंत्रशिक्षणरेखाटनविचारमतबातमीसल्लाअनुभवप्रतिक्रियावादसमीक्षा

प्रतिक्रिया

डाक्टरसायबा लेख मस्त जमलाय.. अंगठेबहाद्दर तेवढे प्रामाणिक आणि सहीवाले तेवढे लुच्चे असे गृहितक सोडता सगळा आवडला.
कागदावर लिहायची वेळ आली तर मी तरी दौतीतली शाई दरवेळी अंगावर सांडून घेऊन का होईना पण फौंटन पेनानेच लिहीतो..
आणि चांगला दिसेल तो फाऊंटन पेन विकत घेतो..
कधी फक्त आपल्यालाच कळेल असं, कधी लफ्पेदार, कधी कर्सिव्ह अक्षरं काढण्‍यात जो आनंद आहे तो विरळाच..
मला कर्सिव्ह येत नव्हती म्हणून मी मुद्दाम बाळबोध धडे गिरवून ती शिकून घेतली आहे..

(अक्षरप्रेमी) यशवंत

प्रभाकर पेठकर's picture

24 Jan 2012 - 1:36 pm | प्रभाकर पेठकर

हस्ताक्षरावरून मनुष्याच्या स्वभावाचे थेट निदान करता येते असे मी कुठे वाचल्याचे स्मरत नाही. परंतु, काही कयास मात्र बांधता येतात. तेही ज्यांचे हस्ताक्षर चांगले ते चांगल्या स्वभावाचे आणि ज्यांचे हस्ताक्षर वाईट ते भणंग स्वभावाचे, विघ्नसंतोषी, गुन्हेगारी वृत्तीचे असतील असा कयास कुठलेही शास्त्र काढीत नाही असे मला वाटते.

हस्ताक्षरातील वळण, गोलाई, अक्षरांना जोडणारी रेषा काढणे, अक्षर रेषेवर किंवा रेषेखाली किंवा रेषेला जोडून काढणे, हस्ताक्षराखाली (सही खाली) रेष ओढणे, टिंब देणे, वेलांट्यांची पद्धत, उकारांची पद्धत, उद्गारचिन्हांचा, अवतरणचिन्हांचा वापर, अनुस्वार 'टिंब' की 'पोकळ गोल', दाब देऊन केलेले लिखाण, समास सोडण्याची पद्धत, दोन अक्षरातील - दोनशब्दातील समान-असमान अंतर, चुकीचा शब्द किंवा अक्षर त्यावर गिरवून सुधारणे, फक्त काट मारून नव्याने लिहिणे, चुकीच्या शब्दाला संपुर्ण काळवटून नविन शब्द लिहीणे, लिखाणातील टापटिप अशा अनेक प्रकारांचा अभ्यास करून लेखकाच्या स्वभावविशेषाचा अंदाज बांधला जातो. गुन्ह्यांचा शोध लावताना, शिक्षा झालेल्या गुन्हेगारांना सुधारण्याच्या कामी ह्या शास्त्राचा बराच फायदा होतो असे म्हणतात.

हल्लीच्या काळात हस्ताक्षर मागे पडत असले तरी अजून तरी सही, व्यक्तिगत बँक चेक, काही प्रमाणातील, संगणकावर उतरविण्याआधीचे, कच्चे लिखाण, एका ओळीच्या सुचना, संदेश, खरेदी करावयाच्या वस्तूंची यादी अशा अनेक ठि़काणी हस्तलिखिताचा वापर होतो. आणि जसे हस्ताक्षरावरून स्वभावाचा अंदाज बांधण्याचे तंत्र आहे तसेच पुढे-मागे संगणकिय लिखाणावरूनही स्वभावाचा अंदाज बांधण्याचे शास्त्र विकसित होईल, कोणी सांगावे?

मी गेले कित्येक महिने हाताने काही लिहीलेच नाहिय्ये. सहीसुद्धा केलेले नहिय्ये.
सध्या अशी परिस्थिती आहे की टायपिम्ग करणे हे लिहिण्यापेक्षा लवकर जमतेय.
हस्ताक्षर दिवसेदिवस गचाळपणात पहिल्या नंबरावर येण्याचा प्रयत्न करायला लागलेय.

सन्माननीय स्पाकांकाच्या या लेखाची आठवण झाली.

आता युबिस्लेट ७ एकदाचा त्यांच्या हातात पडल्यावर उरलेसुरले हस्ताक्षरही संपून जाईल की काय असे वाटतेय.

+1
स्पा काकांनी फार छान लिहीले होते.

'मिपादिवंगत' सदस्या शुचिआजींनी त्या धाग्यावर दिलेली कविता..

पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे
लिपीरेशांच्या जाळीमधुनी नको पाठवू हसू लाजरे||१||
चढण लाडकी भूवई मधली नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून||२||
शब्दामधुनी नको पाठवू अक्षरामधले अधीरे स्पंदन
नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कंप विलक्षण||३||
नको पाठवू वीज सूवासिक उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा सांगीतले मी , तू हट्टी पण !||४||
पाठवीशी ते सगळे सगळे पहील्या ओळीमधेच मिळते
पत्र त्या नंतरचे मग वाचायाचे राहून जाते||५||
-कवयित्री - इंदिरा संत

चतुरंग's picture

25 Jan 2012 - 9:17 am | चतुरंग

यकु, इंदिरा संतांची अतिशय भावगर्भ कविता इथे दिल्याबद्दल धन्यवाद! :)
किती साधे, सोपे, नेहेमीच्या वापरातले शब्द आहेत पण काव्य केवढं अर्थपूर्ण आहे! वा!!

(आनंदी) रंगा

मीच थँक्यू आहे रंगाकाका.
:)

मन१'s picture

24 Jan 2012 - 2:31 pm | मन१

गचाळ हस्ताक्षरवाला

वपाडाव's picture

24 Jan 2012 - 4:41 pm | वपाडाव

माननीय डॉक्टरांनी नवजात संस्थळाचे सदस्यत्व घेतलेले दिसतेय...
तिकडे कदाचित शुद्धलेखनाला फाट्यावर मारत नसावेत म्हणुन इकडे येउन डॉक्टरांनी गळा काढलाय असे दिसते...

पैसा's picture

24 Jan 2012 - 11:37 pm | पैसा

कोणत्याही वादाशिवायच्या स्वच्छ लेखाबद्दल अभिनंदन! लेख आवडला, म्हणजे डॉक्टर लोकांची अक्षराच्या बाबतीत बाजू मांडणारा आहे, ते काम व्यवस्थित केलंय. आता जर फार लिहायचे प्रसंग येत नसतील, तर अक्षर निदान सुवाच्च काढायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे?

हस्ताक्षर दिन साजरा करायला आपल्याला काही प्रॉब्लेम नाही ब्वॉ! रोज कसला तरी दिन असतोच!

हस्ताक्षर आणि व्यक्तिमत्वाबद्दल पेठकर काकांनी सविस्तर लिहिलंच आहे, आणखी लिहीत नाही.

एक शंका आहे, डॉक्टरसाहेब जेव्हा प्रेम करायच्या वयात असतील, तेव्हा एसेमेस, ईमेल्स काही नसावं, मग तेव्हाचे डॉक्टरलोक प्रेमपत्र कशी लिहीत असत? आणि ती वाचायला केमिस्टला बोलवावं लागत होतं का? ;)

अन्या दातार's picture

25 Jan 2012 - 8:47 am | अन्या दातार

......आणि ती वाचायला केमिस्टला बोलवावं लागत होतं का?

इतका कशाला बभ्रा करायचा? सरळ केमिस्ट पोरींनाच लिहित असतील. आता याचे पण फायदे सांगत बसायचे का? ;)

वपाडाव's picture

25 Jan 2012 - 4:53 pm | वपाडाव

आता याचे पण फायदे सांगत बसायचे का?

व्वाह !! मेरे शेर... व्वाह !!

मी-सौरभ's picture

25 Jan 2012 - 1:40 pm | मी-सौरभ

ती वाचायला केमिस्टला बोलवावं लागत होतं का?

असं केल्याने एका डॉक्टरची प्रेयसी केमिस्ट बरोबर पळून गेली म्हणे

मन१'s picture

25 Jan 2012 - 2:01 pm | मन१

भटकलेला मुल्ला मशिदीतच सापडणार किंवा भटकलेला बेअव्डा गुत्त्यातच सापडणार म्हणतात
तसा पळालेला केमिस्ट फार्मसीत किंवा दवाखान्यात सापडतो असे म्हणावे काय? ;)

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jan 2012 - 11:39 pm | अत्रुप्त आत्मा

आजकाल अशी हज्जारो शास्त्र दिवसागणिक निघत आहेत...लेख चांगला लिहिलाय,पण अमच्या हिशेबी हे प्रकरण म्हणजे मागच्या पानावरुन पुढे चालू इतकेच...!

हस्ताक्षरावरुन आठवले ते हस्ताक्षरतज्ज्ञ सप्तर्षी. अहमदनगरला मोरेश्वर त्र्यंबक सप्तर्षी म्हणून हस्ताक्षरतज्ज्ञ होते त्यांची खास शिकवणी लावून माझे आणि बहिणीचे हस्ताक्षर सुधारले होते. म्हणजे खरोखर फायदा झाला आहे. अजूनही माझे हस्ताक्षर बरेच चांगले आहे असे मी अभिमानाने सांगू शकतो. प्रत्येक अक्षराचे वळण कसे असले पाहिजे, अक्षराची सुरुवात कुठून आणि शेवट कुठे झाला पाहिजे हे दर्शवणारे अतिशय अभ्यासपूर्ण तक्ते तयार केलेले होते. दगडी पाटीवर खिळ्याने अक्षरे कोरुन त्यांनी पाट्या तयार करुन दिल्या होत्या त्यावर गिरवून मी अक्षर घोटलेले होते. मला स्पर्धेत बक्षिसेही मिळालेली होती. माझेच नव्हे तर आमच्या वर्गातल्या बर्‍याच मुलामुलींची अक्षरे उत्तम होती. (गेल्या कित्येक वर्षात लिहिण्याची सवय क्रमाक्रमाने कमी होत गेली आहे त्यामुळे अगदी पूर्वीसारखे वळण येत नाही पण कोणे एकेकाळी अक्षर सुंदर होते याच्या खुणा दिसतात, म्हणजे उपमाच द्यायची झाली तर एखादी पंचेचाळिशी-पन्नाशीची पुरंध्री अगदी सडपातळ, सुडौल राहिली नसली तरी ऐन तारुण्यात तिने लोकांना वेड लावले असणार याची खात्री देत असते तसेच काहीसे! ;) )
हस्ताक्षर चांगले असावे याबाबत मी अजूनही आग्रही असतो. चांगल्या अक्षराचे मनात अतिशय चांगले प्रतिबिंब तयार होते यात शंका नाही. इथून पुढे संगणक आणि इतर माध्यमांमुळे लिहिण्याची सवय संपल्यात जमा होत जाईल असे दिसते. परंतु हाताने लिहिलेला कोणताही मजकूर तुम्हाला जास्त जिव्हाळ्याचा वाटतो आणि वाटत राहील किंबहुना इथून पुढे जशी त्याची वानवा होत जाईल तसे त्याचे महत्त्व अधिकच वाढेल.

(सुंदर अक्षर हा दागिना मानणारा) रंगा

परिकथेतील राजकुमार's picture

25 Jan 2012 - 12:25 pm | परिकथेतील राजकुमार

(सुंदर अक्षर हा दागिना मानणारा) रंगा

रेवती काकूंचे मत वाचायला उत्सुक.

मी-सौरभ's picture

25 Jan 2012 - 1:43 pm | मी-सौरभ

काय टायमिंग आहे :)

पॉपकॉर्न विकता येतील का ईथे??? (विचार करणारी स्मायली)

चतुरंग's picture

25 Jan 2012 - 6:48 pm | चतुरंग

या या! स्वागत आहे!
-रंगा

वपाडाव's picture

25 Jan 2012 - 4:57 pm | वपाडाव

(गेल्या कित्येक वर्षात लिहिण्याची सवय क्रमाक्रमाने कमी होत गेली आहे त्यामुळे अगदी पूर्वीसारखे वळण येत नाही पण कोणे एकेकाळी अक्षर सुंदर होते याच्या खुणा दिसतात, म्हणजे उपमाच द्यायची झाली तर एखादी पंचेचाळिशी-पन्नाशीची पुरंध्री अगदी सडपातळ, सुडौल राहिली नसली तरी ऐन तारुण्यात तिने लोकांना वेड लावले असणार याची खात्री देत असते तसेच काहीसे! )

आजोबा, सरळ सरळ असं का नाही म्हणत...
खंडहर देखके इमारत कैसी रही होगी इसका पता चलता है !

बाकी, पर्‍याशी सहमत ...

चतुरंग's picture

25 Jan 2012 - 6:46 pm | चतुरंग

चांगल्या अक्षराला खंडहर वगैरे कसलं म्हणतोस! मराठी, मराठी उपमा सुचत नाहीत तुम्हाला हाच दोष आहे! ;)

-रंगाजोबा

हम्म !

छान लेख ,

हस्ताक्षरा शी कधी ही वावडे नाही, राहिली गोष्ट लेखनाची , मी आणि माझा एक मित्र (तालुक्याला असलेला) पत्रव्यवहार करत असतो. त्यामुळे अजुन लिहायची सवय गेली नाही. ( अर्थात तो माझी पत्रे वाचु शकतो , यातच माझ्या हस्ताक्षर कसे आहे हे समजते ;) )

वपाडाव's picture

25 Jan 2012 - 8:15 pm | वपाडाव

मी आणि माझा एक मित्र (तालुक्याला असलेला) पत्रव्यवहार करत असतो.

आपण मोठ्या शहरात राहुन ऐटीत नोकरी करतो हे दाखवण्याचा अतिशय बाष्कळ प्रयत्न....
---------------------
ऐटीत संगणक वापरत असलो तरी पेनाने पत्रे लिहिणार आहे.

आपण मोठ्या शहरात राहुन ऐटीत नोकरी करतो हे दाखवण्याचा अतिशय बाष्कळ प्रयत्न.... >>>>

=)) =)) =))

पाषाणभेद's picture

25 Jan 2012 - 9:20 pm | पाषाणभेद

>>> आमच्यापैकी कितीतरी डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहितांना अक्षरशः झोपा काढल्यासारखे लिहितात हे काही खोटे नाही.
डॉक्टर लोकांचे अक्षर खराब असते हा निखालस खोटा समज आहे. मी तर सरळ सरळ म्हणतो की काय डायग्नॉसीस आहे ते न समजावे म्हणून डॉक्टर लोकं मुद्दाम खराब अक्षरात प्रिस्र्कीप्शन लिहीतात. (प्रिस्र्कीप्शन म्हणजे केवळ गोळ्या औषधे लिहीलेली चिठ्ठी समजू नका. त्यावर, त्याच्या पाठीमागे डॉक्टर लोकं डायग्नॉसीस, काठी ठोकताळे लिहीत असतात.)

माझा एक बेंच पार्टनर प्रतिथयश डॉक्टर झालेला आहे. त्याच्या अन माझ्या अक्षरांची स्पर्धा चालत असे. (माझे अक्षर चांगले आहे असे मी म्हणत नाही, पण त्याचे अक्षर शालेयकालात माझ्यापेक्षा चांगले होते.)

यावर उपाय म्हणून काही डॉक्टरांनी प्रिंटेड प्रिस्क्रीप्शन दिल्याचे आठवते.

प्रिस्र्कीप्शनवर गोळ्या औषधांचे मुख्य कंटेटच लिहणे अपेक्षीत असते (ब्रांड नेम आदी नको.) हे खरे आहे का? कोणी जाणकार समजून सांगेल काय?

लेख छान आहेच.