जगायचं कसं?

विनीत संखे's picture
विनीत संखे in जनातलं, मनातलं
10 Apr 2011 - 4:07 pm

एका पेंशनर ची डायरी....

आज मी आणि सौ मालाड येथे इनॉर्बिटला मॉलमध्ये गेलेलो. हा मॉल म्हणजे पन्नास वर्षांच्या मुंबईत गुजारलेल्या आपल्या आयुष्यात प्रथमच तिचे सिंगापूर (किंवा शांघाय) होण्याच्या स्वप्नात उचलेले पहिले मोठे पाऊल असल्याचे मनोमन वाटले.

(वास्तविक हे एवढे मोठे पहिले पाऊल उचलल्यावर, मुंबईचा पाय मुरगळून ती त्याच पाऊलावर बसकण मारणर होती हे निश्चित होतं... पण पाऊल उचलल्याशी मतलब ... काय? )

मॉल भारी होता. शनिवार संध्याकाळ असल्याने गजबजलेलाही होता. पोरं टोरं घेऊन लठ्ठ (अन बव्हतांश मठ्ठ) बायका उगीच आपलं इथंतिथं करीत प्रत्येक मजल्यावरची झगमग पाहात रस्ता गोगलगायींसारख्या कापित होत्या. तरूण मुलं मुली घोळक्यांत आपल्याच घरी किंबहुना एकाच 'खोलीत' असल्यासारखे वागत होते. त्यांची लो वेस्ट जीन्स पाहून, प्राथमिक शाळेत सैल चड्डी घालून येणारा गुंड्या आठवला. त्याच्या मागल्या बाकावर बसलेलो आम्ही वात्रट मुलं त्याच्या चड्डीतून डोकावणाऱ्या "खोबणीत" मुद्दामून आमच्या पेन्सिली घुसवायचा खेळत असलेला खेळही आठवला, अन हसू आलं. सौ लाही सांगावसं वाटलं पण तिला अश्ल्याघ्य वाटेल असं समजून गप्प बसलो.

आमच्यासारखे काही इतरही उनाडटप्पू होते... विंडो शॉपिंग साठी आलेले होते. दुकानं चिक्कार होती. कपड्यांची, खेळण्यांची, म्युझिक शॉप होते, कॅन्डी शॉप्स. पण एक मात्र जाणवलं. दुकानातून बाहेर पडणारे लोक हातात कसल्याही पिशव्या नसलेले, अपराध्यासारखे चेहेरा करून खिसा चाचपत बाहेर पडत होते.

"अहो मनासारखे कपडे मिळाले नसतील", सौ म्हणत होती.

(मी मात्र तिच्या भोळ्या स्वभावावर कीव करणं लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून सोडलंय...)

एखाद तास इथं तिथं फिरून दुपारची तलफ घालवावी म्हणून 'कॅफे कॉफी डे' नावाच्या कॉफी शॉप मध्ये गेलो. एक कॉफी दोघे प्यायलो. अडीचशे रूपये दिले आणि माझ्या नोकरीच्या पहिल्या दोन महिन्यांतल्या पगाराएवढी ती रक्कम एका कॉफी मागे देताना चेहेरा पंक्चर झाला. पटकन वरळीच्या आमच्या ऑफिसाच्या शेजारी आम्ही जात असलेलं शंभू कॉफी हाऊस आठवलं. १९७२ मध्ये त्याने वाढवलेल्या चाराण्याने आमची कॉफी किती कडू केलेली ह्याची आठवण आली अन त्याच कडू चेहेऱ्याने ह्या अडीचशे रूपये घेणाऱ्या पोराकड पाहिलं.

माझा पंक्चर झालेला चेहेरा पाहूनही त्या पैसे घेणाऱ्याला आमची दया आली नसावी. उलट त्याने अडीचशे रूपये दिल्याची दोन पानी पावती आमच्या हातात दिली. (सज्जन शंभू मात्र पैसे मिळाल्यावर पावत्या फाडून कचऱ्यात फेकायचा). आज आयुष्यात प्रथमच मी दोन पानी पावती पाहिली. हिच्या महिन्याच्या किराणाची यादीही कधी दोन पानी होत नाही. म्हणून "एवढं काय छापलं आहे ह्यात?" ह्या विचारात नाकावर चश्मा बसवला अन पावती वाचली. पावतीवर एकामागे एक असे पाच आयटम्स दिसले आणि "अहो आम्ही एवढे पदार्थ मागवलेच नव्हते" असं इंग्रजीत विचारलं. (सद्ध्या बहुभाषी भारत हा इंग्रजीच्याच एकतेने बांधला गेलेला आहे हे नुकतंच एका आंग्लहिंदू लेखिकेने कलकत्त्यात म्हटले होते हे आठवलं).

पोरगावलेल्या इसमाने सोज्वळपणे हसून ते पाच पदार्थ म्हणजे कॉफी, वॅट, सर्विस टॅक्स, मॉल फण्ड, कंपल्सरी क्राय डोनेशन असल्याचं दाखवून दिलं.

दोन पानी पावती मनात पटली आणि आपल्या हातून नकळत डोनेशन झाल्यानं सौच्या चेहेऱ्यावर समाधान दाटलं.

"बरी लोकं आहेत. दानशूर दिसतायत.", तिनं म्हटलं.

वास्तविक ते डोनेशन फक्त दोन रूपयाचं होतं. पण तेवढ्याने ही कृतकृत्य झाली होती.

एखादा दोन तास खाली वर प्रत्येक मजला फिरून झाला. फूड कोर्ट मध्ये गेलो. तिथे मला ब्लड प्रेशर अन हिला पोटाचा त्रास होत असल्याचं आठवलं अन सारं वर्ज्य अन्न इतरांना खाताना पाहून मनाला समाधान वाटून घेतलं. एखादं ज्यूस प्यावसं वाटलंच. पण दोन पानी पावती अन डबल डोनेशनची चाहूल लागली आणि तो विचार मनातल्या मनातच परतवला. मग काहीच नाही त्यापेक्षा आईस्क्रीम घेतलं.

मुद्दामून डबल स्कूपचा एकच कोन घेतला. सौ ने घेण्याच्या आधी मीच थोडा चाटला आणि वळवून तिला दिला. कुणी बघितलं नाही ना अशा भावात तिनं तो घेतला अन लाजत लाजत खाऊ लागली. लाजताना तिच्या भुवया थोड्या आकुंचतात आणि डाव्या गालात तिरीप येते. लक्ष मात्र आईस्क्रीममध्येच असतं. मला १९६५ ला लग्नाच्या दुसऱ्या आठवड्यात जुहू चौपाटीवर दोन स्ट्रॉ घालून प्यायलेला शहाळं आठवलं आणि ते पिताना तिच्या लाजण्याच्या ह्या तऱ्हेचं मी नीट केलेलं निरीक्षण आठवलं. आजही तशीच लाजते.

कालौघात न बदलणाऱ्या काही गोष्टी मनाला अशा गाफिल क्षणीही किती सुखावून जातात... काय सांगू?

आईस्क्रीम संपलं आणि उतरत उतरत पार्किंग लॉट मध्ये आलो. गच्च भरलेला पार्किंग लॉट पाहून पटकन आठवलं आणि बाहेरच्या रस्त्यावर गेलो अन तोच रस्त्यापाशी ऊभी केलेली स्विफ्ट दिसली. तिच्या वरचा नो पार्कींगचा बोर्ड दिसला आणि तिच्यापाशी पोलिसही दिसला.... स्विफ्टवर दोनशे रूपयाचं तिकीट अडकवत.

मी त्याच्याकडे गेलो. सौ बावरलेली होती.
"अहो साहेब, तुम्ही ह्या म्हाताऱ्या जोडप्याला पार्कींग तिकीट देताय. जरा आमच्या वयाचा विचार करा."
पोलिसानं खडूसपणे आमच्याकडे पाहिलं.
त्यानं आणखी एक तिकीट फाडलं अन वायपर हॅण्डशी अडकवलं.
मी शांतपणे पुन्हा म्हणालो, "अहो साहेब आम्ही तुमच्या आई वडिलांच्या वयाचे आहोत..."
पोलिसाने पानाची पिंक थुंकली अन आणखी एक दोनशेचं टिकिट फाडलं.
"हे बघा", मी आवाजात जरबच आणली, "तुम्हाला शेवटचं बजावतोय. माझी ओळख कमिश्नर पर्यंत आहे."

"अरे तुझ्या कमिश्नरच्या....", पोलिस डाफरलाच, "कमिश्नरचा बाप काय तू... आरटीओवाल्यांना बोलाविन अन गाडी जप्त करीन. समजलं ना..."
"असं होय!..", मीही मग जुंपलो, "बघतोच कसा ह्या गाडीला हात लावतो ते."

सौ ने मागे खेचलं, "अहो कशाला उगीच...", ती म्हणाली.

"बाई हुशार आहेत.", पोलिस तापूनच म्हणाला, "समजवा तुमच्या मिष्टरांना. उरलेले श्रम ह्या गाडीला सोडवण्यात घालवा. बघतो मी ही गाडी कशी सुटते आरटीओ मधून ती. २२३० चा चार्ज लावीन. सहा महिन्यांसाठी जप्त करेन गाडी...."
"अरे जा जा बघतोच मी कसा जप्त करतो माझी गाडी ती..."

पोलिस उफाळलाच...
"अरे तुझ्या थेरड्या... बोलवतोच बघ.... ", अन त्याने त्याच्या वॉकी टॉकीवर नंबर फिरवला, "आता येईलच आर्टीओची मोटार अन घेऊन जाईल तुझी गाडी. मी बघतो कोण सोडवतं ही गाडी तिथून मग...."

असं म्हणून पोलिसानं गाडीच्या काचेवर "सीझ्ड अंडर २२३०" चा रीमार्क लिहून आणखी दोन हजाराचं स्टीकर चिटकवलं अन माझ्याकडे पाहून तोऱ्यात तिथंच उभा राहिला.
"अहो कशाला उगीच ...", सौ ने मागून पुन्हा म्हटले. मी जागचा हललो नाही.

थोड्याच वेळात टोवाले आले अन गाडीला हूक लावून घेऊन गेले. मी मात्र स्थितप्रज्ञ होतो

तो पोलिस छद्मीपणे माझ्याकडे पाहून हसला अन त्याच तोऱ्यात तिथून निघून गेला.

"चला आता.", सौ ने म्हटलं अन नाईलाजाने घरासाठी रिक्षा पकडावी लागली. सौ भयंकर रागावली होती. मी मात्र समाधानी होतो.

आजचा दिवस बरा गेला होता... कारण मनोरंजनासाठी ट्रॅफिक पोलिसांशिवाय उत्तम पर्याय नाहीच...

... देव त्या स्विफ्टवाल्याचं भलं करो.

- विनीत संखे

कथासंस्कृतीसमाजजीवनमानराहणीमौजमजाविचारलेखअनुभवसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

पक्का इडियट's picture

10 Apr 2011 - 4:13 pm | पक्का इडियट

खोबण्या वगैरे निरिक्षण सहमत.
आमचा मित्र खोबर्‍याचा किस विकायला आहे बघ असे असली मंडळी दिसली की सांगतो. असो.

अन्या दातार's picture

10 Apr 2011 - 5:11 pm | अन्या दातार

विनित राव, काय निरिक्षण आहे हो तुमचे! शेवटचा स्विफ्टवाला किस्सा जबराट.
पर्‍याच्या भाषेत सांगायचे तर 'क ह र'

अभिज्ञ's picture

10 Apr 2011 - 5:23 pm | अभिज्ञ

हॅ हॅ हॅ.मस्त निरीक्षण.
स्विफ्ट वाला किस्सा अफाटच.

अभिज्ञ.

स्वछंदी-पाखरु's picture

10 Apr 2011 - 6:52 pm | स्वछंदी-पाखरु

कॉलेजात असतांना एकदा तीर्थ्रुरूपांची चारचाकी कॉलेजात घेऊन गेलो होतो....
जुनी कुरापत काढून एका गुंड प्रवृत्तिच्या क्लासमेट ने इंटरवल नंतर येऊन सांगितलं
हा हा तुझ्या गाडीचा मी कचरा केला फुल्ल जोर क झटका धीरे से लगे , काय उखाडायचं आहे ते उखाड....
अरे अरे गाडीच काय झाल असेल ह्याचा अंदाज करून करून मी घामेघूम झालो होतो...लेक्चर संपताच मी गाडी कडे धावलो... गाडीवर असंख्य ठिकाणी माझ्या नावाचा उद्धार अश्लील शिव्यांसोबत मस्त स्प्रे पेंट ने रंगवला होता. फुटलेली काच बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं.गाडीकडे बघताच आज घरी गेल्यावर बाबा मला मारून मारून माझा पारावरचा मारोती करणार....

अशी मनाची समजुत घातली व गाडीत बसण्यासाठी सेंट्रल रिमोट ची कळ दाबताच लक्षात आल कि हि यंत्रणा पण निकामी झाली आहे...अजून अधिकच हताश झालो. शेवटी नेहमीच्या मेकेनिकला बोलावून आणलं गाडी दाखवून त्याला आता तूच बघ काय करायचं ते अस म्हणालो तर म्हणाला आपली गाडी कुठे आहे??? मी म्हणालो अरे ही काय ???.... दादा हा आपल्या गाडीचा नंबर नाहीये...
मी चापापलोच अरे???? हो.... हि तर माझी गाडी नाही...... आयला म्हणजे हि गाडी दुसर्याचीच आहे कि......नन्तर लक्षात आल कि गाडी मी मागच्या पार्किंग मध्ये लावली आहे पुढच्या नाही..... धावत पळत जाऊन मी माझी गाडी बघितली तिला एकपण स्क्रेच नवता... हां हा आहा अ हा आह जीवात जीव आला..... मग काय ती बिघडलेली गाडी कोणाची हे बघण्यासाठी आम्ही परत आलो नंतर समजल ती गाडी कोण्याएका पालकाची होती...

स्व पा

स्वछंदी-पाखरु's picture

10 Apr 2011 - 6:52 pm | स्वछंदी-पाखरु

कॉलेजात असतांना एकदा तीर्थ्रुरूपांची चारचाकी कॉलेजात घेऊन गेलो होतो....
जुनी कुरापत काढून एका गुंड प्रवृत्तिच्या क्लासमेट ने इंटरवल नंतर येऊन सांगितलं
हा हा तुझ्या गाडीचा मी कचरा केला फुल्ल जोर क झटका धीरे से लगे , काय उखाडायचं आहे ते उखाड....
अरे अरे गाडीच काय झाल असेल ह्याचा अंदाज करून करून मी घामेघूम झालो होतो...लेक्चर संपताच मी गाडी कडे धावलो... गाडीवर असंख्य ठिकाणी माझ्या नावाचा उद्धार अश्लील शिव्यांसोबत मस्त स्प्रे पेंट ने रंगवला होता. फुटलेली काच बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं.गाडीकडे बघताच आज घरी गेल्यावर बाबा मला मारून मारून माझा पारावरचा मारोती करणार....

अशी मनाची समजुत घातली व गाडीत बसण्यासाठी सेंट्रल रिमोट ची कळ दाबताच लक्षात आल कि हि यंत्रणा पण निकामी झाली आहे...अजून अधिकच हताश झालो. शेवटी नेहमीच्या मेकेनिकला बोलावून आणलं गाडी दाखवून त्याला आता तूच बघ काय करायचं ते अस म्हणालो तर म्हणाला आपली गाडी कुठे आहे??? मी म्हणालो अरे ही काय ???.... दादा हा आपल्या गाडीचा नंबर नाहीये...
मी चापापलोच अरे???? हो.... हि तर माझी गाडी नाही...... आयला म्हणजे हि गाडी दुसर्याचीच आहे कि......नन्तर लक्षात आल कि गाडी मी मागच्या पार्किंग मध्ये लावली आहे पुढच्या नाही..... धावत पळत जाऊन मी माझी गाडी बघितली तिला एकपण स्क्रेच नवता... हां हा आहा अ हा आह जीवात जीव आला..... मग काय ती बिघडलेली गाडी कोणाची हे बघण्यासाठी आम्ही परत आलो नंतर समजल ती गाडी कोण्याएका पालकाची होती...

स्व पा

लिखाळ's picture

10 Apr 2011 - 10:50 pm | लिखाळ

मजा आली :)

प्राजु's picture

11 Apr 2011 - 6:43 am | प्राजु

आवडला लेख.

राजेश घासकडवी's picture

11 Apr 2011 - 7:47 am | राजेश घासकडवी

शेवटच्या दोन ओळींतली कलाटणी आवडली.

मदनबाण's picture

11 Apr 2011 - 7:57 am | मदनबाण

झकास लिखाण... :)

अरुण मनोहर's picture

11 Apr 2011 - 8:06 am | अरुण मनोहर

लेख जरी छान लिहीला असला,
तरी अशी आशा करतो, ही सत्यघटना नसेल.
सत्या घटना असेल तर कमिनेपणाची हद्द झाली असेच म्हणावे लागेल. आणि वर पुन्हा गर्वाने हे सगळे सांगणे म्हणजे.... $^&###!@@०००++---

पक्का इडियट's picture

11 Apr 2011 - 8:14 am | पक्का इडियट

कमिनेपणा पेक्षा हलकट वा हिण आणि हिणकस असा शब्दबदल कसा वाटतो ?

विनीत संखे's picture

11 Apr 2011 - 9:28 am | विनीत संखे

हो आजोबा वात्रट आहेत... नक्कीच...

:-)

गवि's picture

11 Apr 2011 - 8:49 am | गवि

हेहेहे..लै भारी विनितराव..

आवड्या अपुनको..

(स्विफ्टचा प्रकार वाचून हे पेन्शनर आजोबा मिपाकर असावेत असे वाटले.. ) ;)

लठ्ठ आणी मठ्ठ बायका? तुम्हाला कसे समजले त्या सर्व बायका मठ्ठ आहेत ते? कि मॉल मध्ये मुले घेउन येणार्‍या सर्व लठ्ठ बायका मठ्ठ असतात असे तुमचे मत आहे?

विनीत संखे's picture

11 Apr 2011 - 9:32 am | विनीत संखे

मॉल मध्ये येणारे अर्ध्याधिक लोक हे फक्त वातानुकूलन अनुभवायला तिथे येतात हे माझे प्रामाणिक मत आहे.

हे आजोबा वात्रट असल्याने त्यांतल्या बायका त्यांना मठ्ठ वाटल्या एवढेच...

शिल्पा ब's picture

11 Apr 2011 - 10:25 am | शिल्पा ब

हॅ हॅ हॅ....लै भारी ओ आजोबा!!

नंदन's picture

11 Apr 2011 - 10:38 am | नंदन

लेख आवडला!

sneharani's picture

11 Apr 2011 - 11:09 am | sneharani

मस्त लेख!

क्राईममास्तर गोगो's picture

12 Apr 2011 - 9:40 am | क्राईममास्तर गोगो

भीषण भालो....

एका पेंशनर च्या डायरीतील हे पान आवडले एकदम ... मस्त..
आनखिन पाने असतील तर द्या .. आवडतील

स्मिता.'s picture

12 Apr 2011 - 7:38 pm | स्मिता.

नाव वाचून वाटलं होतं की काहीतरी फिलॉसोफिकल लेख असेल. पण निघालं भलतंच... आजोबा बरेच अग्गाऊ वाटतात. 'या वयात असे, तर तरूणपणात कसे?' हा विचार मनात डोकाऊन गेला.

विनीत संखे's picture

13 Apr 2011 - 7:58 am | विनीत संखे

पण आजी आहेत नं सांभाळून घ्यायला... आणि आगाऊ पणा झाला तरी कुठे? ... नाहीतरी ट्रॅफिक पोलिसाच्या आधी जर टोवाले आले असते तर नो पार्किंगच्या ठिकाणची गाडी घेऊनच गेले असते नाई?