शिर्षक वाचून भलतं-सलतं काही मनात आणायचा आधीच सांगतो की हे खरं तर "माझी मार-गाथा" असं हवं होतं, पण गर्दी खेचण्याचा उगाच आमचा दुबळा प्रयत्न...
***********************************************************
तर सांगायचा मुद्दा हा, की आयुष्यात मी भरपुर मार खाल्लाय. :-) आमच्या मास्तरांनी म्हणजेच शिक्षकांनी आम्हाला कुबल कुबल (अलका नव्हे!) कुबललाय. आणि "आई हीच मुलाची पहिली शिक्षक" हे आमच्या मातेने भलतंच मनावर घेतल्याने तिने आम्हाला बदडण्याच्या कर्तव्यात अजिबात कसूर केली नाही.. :tongue:
आमचं घर आधीपासून बर्यापैकी दुध-दुभतं असलेले आहे. त्यामुळे घरात मांजरींचाही बराच राबता असतो. दुध पिणे, सायीच्या भांड्यात तोंड घालणे हे सगळं करतांना ह्या मांजरी कधीकधी घाण पण करायच्या. ते बघून आमच्या आईचा रागाचा पारा भडकायचा आणि मग आमच्या मनात मातृप्रेमाचा वणवा पेटायचा आणि आम्ही मांजरींवर बदला घ्यायचे ठरवायचो.
मग आम्ही (म्हणजे मी आणि माझा भाऊ, भैय्या) दोघे मिळून प्लान करुन मांजरीला घराच्या हॉलमधे घेरायचो. दारं खिडक्या बंद करुन आम्ही मांजरीला काठी आणि झाडणीने बदडायला ट्राय करायचो. सुरुवातीला मांजर दबून, लपून रहायला पाहायची, पण दोन-चार रट्टे बसल्यावर मात्र "वाघाची मावशी" असल्याचे सिद्ध करत आम्हाला बोचकारायची. (त्यावेळच्या युद्ध-खुणा आम्ही अजुनही हातांवर मिरवतोय.) मांजर वाचण्यासाठी जी धडपड करायची त्यात भांडी, फुलदाण्या वगैरे पडून आम्ही आईला "मांजर चालेल, पण मातृप्रेम आवरा" असं करुन सोडायचो. पण आम्ही निष्ठेचे पक्के... म्हणून मग मांजरीला पोत्यात भरुन आम्ही तिला खुप खुप दुर असलेल्या ३-४ किमी अंतरावरच्या गावात ओसाड माळावर सोडून यायचो. मग विजयोन्मादात आम्ही घरी परत आलो, की आई आमची वाट बघत उभी असायची ! मग असला ब्येक्कार मार पडायचा राव की ज्याचं नाव तेचं... आणि आई मस्त कोपर्यात कोंडी करुन हाणायची. आम्ही कर्तव्यपुर्तीच्या आनंदात तो मार गपगार सहन करायचो. (येकदम भगतसिंग फिलींग यायचं भौ !) एवढा मार (आम्ही) खाल्यावर पुन्हा संध्याकाळी ती मा़ंजर आमच्यावर तिखट-मीठ चोळायला घरात हजर असायची.. तेव्हा तोच जिंकल्याचा माज तिच्या चेहर्यावर (?) दिसायचा...
*************************************************************
आमचं घर जुन्या बांधणीचं आहे. त्यात दुसर्या मजल्यावर एक छोटा माळा आहे, तिथे (तेव्हा मोठं कूटुंब असल्याने) कांदे वगैरे एकदमच भरपूर आणून त्या माळावर टाकून ठेवायचे. तिथून लागेल तसे ते खाली आमच्या घरी आणायचो...
एकदा मी वरुन कांदे घेऊन खाली येत असतांना, वरच्या पायरीवरुन पाय सटकला आणि मग दाण-दाण करत प्रत्येक पायरीवर बुड ठेचून घेत (अहो, एक एक फूट उंचीच्या जून्या पद्धतीच्या पायर्या त्या..) मी दोन दारांच्या मधल्या चौकात येऊन आदळलो. कांदे चौखूर उधळत अर्धे पुढच्या आंगणात तर अर्धे मागच्या मोरीपर्यंत पसरले. आई बाहेर आली आणि, "एक काम कमी करायचं म्हटलं, तर एक कम फुकटचं वाढवून ठेवते हे पोट्टं" असं म्हणत तिथंच दोन ठेऊन दिल्या. मी लागल्याचं बोंबलायला लागलो तर " जा, आधी कांदे उचलून आण" म्हणत आणखी दोन रट्टे देण्यात आले...
*************************************************************
ह्याच्या पुढचा किस्सा माझ्या मेंदूत पक्का कोरलेला आहे..
एकदा घराजवळ खेळतांना कोणाला तरी मी शिवी दिली. आईने ती ऐकली. घरी पोचल्यावर आईनी मला बोलावलं. चुलीजवळ नेलं आणि तिच्यातला निखारा चिमट्यात उचलला. माझ्या तोंडाजवळ आणून म्हणाली, " तोंड उघड." मी तोंड उघडल्यावर आईने तो धगधगता निखारा माझ्या दातांच्या मध्ये तोंडात धरला, आणि म्हणे, "आता तीच शिवी पुन्हा दे". मी कसला शिवी देतोय? दात, हिरड्या नी अख्ख्याच तोंडाला धग लागत होती.. आईनी पुन्हा शिव्या दिल्यास निखारा तोंडात सोडण्याची धमकी दिली आणि ती ते खरं करु शकते ह्याची खात्री आम्हालाही होती. पुढे कॉलेजात भरपुर शिव्या द्यायला लागलो, पण तेव्हाही सुरवातीला जीभ अडखळायचीच...
पण आईनी दिलेल्या ह्या मारानेच आयुष्याला वळण लागण्यास मदत झाली हे ही तितकंच खरं..
**************************************************************
पाचवीनंतर मी जवाहर नवोदय विद्यालयात शिकायला, हॉस्टेलला गेलो.. त्यानंतर मात्र आईने मार दिला नाही. मात्र नवोदयात आमच्या काड्या नी खोड्या करण्याला नवे धुमारे फुटले, आणि तिथे मास्तरांनी आम्हाला मस्तपैकी फोडले.. ;-)
..... वो दास्तान फिर कभी !!
प्रतिक्रिया
5 Feb 2011 - 9:22 pm | शुचि
हाहाहा मजा आली
शिवीचा प्रसंग फारच आवडला.
_____________________
>> "एक काम कमी करायचं म्हटलं, तर एक कम फुकटचं वाढवून ठेवते हे पोट्टं" असं म्हणत तिथंच दोन ठेऊन दिल्या >>
=)) =))
तुमच्या आईची त्यावेळची मनस्थिती समजू शकते. लहान मुलं खरच काम कमी करण्यापेक्षा दुप्पट करून ठेवतात :-D
खूप हसले.
5 Feb 2011 - 10:58 pm | आत्मशून्य
मला तो प्रसंग डोळ्यासमोरच आला, न्हवे जणू माझी आइ मला अशीच भयानक शीक्षा करत आहे असं फील झालं. प्लीज मजा म्हणू नका त्याला. चीगो भाऊंची फूल्टू गेम झाली असती बीचारे लग्नाआधीच कायमचे मूके झाले असते.
5 Feb 2011 - 9:45 pm | दादा बापट
ह्या लेखात विनोदी काय आहे ते मला समजाउन सांगणार का शुची ताई?
6 Feb 2011 - 5:27 am | शुचि
तुमच्यासारख्या विद्वान व्यक्तीला काही मी समजवावे अशी माझी पात्रता नाही.
5 Feb 2011 - 10:41 pm | चिगो
शुचितै, धन्यु... आता दादांना समजवा बरं. त्येंचा "टी. बाळु" वाला इनोद मिपाच्याच डोक्यावरुन गेला वाटतं.. ;-)
(दाबा, कृ. ह. घेणे.. बाकी फरक काय पडतो म्हणा.)
6 Feb 2011 - 4:46 am | प्राजु
चांगले लिहिले आहे.
6 Feb 2011 - 4:56 am | यशोधरा
मस्त लिहिलं आहे!
6 Feb 2011 - 9:17 am | ५० फक्त
चिगो,
छान अतिशय आवडले, आज एवढ्या वर्षानंतर तरी त्या मारामागची आईची भावना कळाली ह्यानंच त्या माउलीच्या काळजात तुम्हाला मार देताना उठलेल्या ओरखड्यावर थोडा तरी थंडावा पडला असेल.
हर्षद.
6 Feb 2011 - 11:00 am | चिगो
आज एवढ्या वर्षानंतर तरी त्या मारामागची आईची भावना कळाली ह्यानंच त्या माउलीच्या काळजात तुम्हाला मार देताना उठलेल्या ओरखड्यावर थोडा तरी थंडावा पडला असेल.
<<
भावनांबद्दल धन्यवाद.. आता तर ते सगळं आठवून हसायला होतं.. खरंतर काल हे लिहीतांनाच आईचा फोन आला नी तिला वाचून दाखवल्यावर दोघेही ते आठवून हसत होतो आम्ही..:-)
7 Feb 2011 - 8:12 pm | गणेशा
मस्त.... असेच हवे ...
8 Feb 2011 - 1:52 pm | स्पा
ओये चीगो... एकदम जबर्या लेख हाणलास रे...
(लग्नानंतरच्या बिझी शेडूल मधून वेळ मिळाला वाटत )
6 Feb 2011 - 10:46 am | भीडस्त
अस्मादिकांनीही मातुश्रींकडून चौदावं रत्न अगणित वेळा मिळवलं आहे. ते दिवस नजरेसमोर तरळून गेले.
नवोदयचाही उदय मिपावर लागलीच येऊद्या.
6 Feb 2011 - 11:03 am | चिगो
नवोदयचाही उदय मिपावर लागलीच येऊद्या..<<
अहो, तिथे तर लय मार खाल्लाय.. सांगू की. निलाजरेपणा हा आमचा सर्वात मोठा गुण आणि गुणधर्म आहे.. ;-)
6 Feb 2011 - 11:13 am | सूर्यपुत्र
एकदा मी लहानपणी (४थी/५वी) कुणालातरी आई-बहीणीवरून खूप शिव्या दिल्या होत्या. त्यानंतर वडीलांच्या ओळखीचे एकजण घरी तक्रार घेवून आले होते, त्यावेळचा प्रसंग :
तो माणूस घरी आला, आणि एकदम गंभीर चेहेरा करून बसला. वडीलांनी विचारले, तरीही बोलेनाच, एकदम सुन्न. (वातावरण निर्मीती....)
तो : अहो, तुमचा मुलगा.....
वडील : माझा मुलगा, काय झालं त्याला?
तो : नाही पण....
आता वडीलही गंभीर.....
तो : अहो तुमचा मुलगा.... केवढ्या घाणेरड्या घाणेरड्या शिव्या देतो..............
आता अशी तक्रार आल्यानंतर कोणतेही पालक मुलाला फैलावर घेतील, सुनावतील, रागावतील.... पण आमच्या पूर्वसंकल्पनांना धक्के न देतील तर काय...
वडील : बरं मग???
तो माणूस ब्लँक... एकदम गपगार, त्याला वाटले की आमचे वडील रुद्रावतार धारण करतील, कारण मी लहानशी चूक जरी केली तर वडील काठी/कुंचा/वाळलेला उस/ स्वःताचा हात यापैकी जे लवकर हाताला येइल ;), त्याने सडकून काढायचे. (मारायची आयुधं ठेवायचा एक कोपरा असायचा. एकदा त्यांच्या हाती हे काहीही लागू नये, म्हणून आम्ही या वस्तू गायब केल्या. त्यावरूनही डबल मार खाल्ला.... अरे, फारच अवांतर झाले. हाँ, तर तो माणूस)
तो : अहो मी ऐकलं... तुमच्या मुलाने त्याला केवढ्या घाणेरड्या शिव्या दिल्या... ब्राम्हण असूनसुद्धा अश्या शिव्या देतो म्हणजे.....
वडील : बरं मग? त्याला जश्या शिव्या देता येतात, तशी रामरक्षासुद्धा पाठ आहे. हल्लीच्या जमान्यात अस्खलित शिव्यासुद्धा देता येणे फार आवश्यक आहे.
तो माणूस एवढा हिरमुसला, की विचारता सोय नाही.....
-सूर्यपुत्र.
6 Feb 2011 - 11:46 am | चिगो
बढीया किस्सा, सूर्यपुत्र.. आवडलाच एकदम.
आमच्या बाबांनी मला एकदाच झोडपलाय, पण सगळी भरपाई झाली त्यातच. (एरवी त्यांचा आवाजच पुरेसा आहे.)
झालं असं की आम्हाला स्कॉलरशीप साठी ट्युशन देणारे गुर्जी काही कामासाठी घरी आले. कामाबद्दल बोलून झाल्यावर पप्पांनी त्यांना माझ्या अभ्यासाबद्दल विचारलं.. आता ते पडले शिक्षक, खरे काय ते बोलले. पप्पांनी ते गेल्यावर मला बोलावलं. मी गेलो खोलीत. पप्पा खोलीत विहीरीच्या पंपाचे स्टार्टर ठीक करत बसले होते. हातात हा भला मोठा स्क्रु-ड्रायवर...
पप्पा : " काय म्हणतो अभ्यास?"
मी : "चांगलाच सुरु आहे की."
पप्पा : "मग गुरुजी खोटं बोलत होते, नाही?"
मी गप...
पप्पा : "बोल ना आता तोंड उचलून"
मी गपगार..
पप्पांनी त्या स्क्रु-ड्रायवरच्या दांडीला हातात धरुन त्याचा मुठीने असा काही हाणला ना, की ज्याचं नाव तेचं...
8 Feb 2011 - 1:23 pm | टारझन
अरे माझ्या बाबांनी तर मला इतका मारला होता ... इतका मारला होता की बाबांचा हातंच तुटायला आला होता अलमोस्ट. थँक गॉड घरात फेव्हिक्विक होतं म्हणुन .. नाही तर माझ्या बाबांचा हात गेलाच होता त्या दिवशी ...
आणि मला मारायचं कारण काहीच नव्हतं .. वडलांना मुड आला मला मारायचा की मग हाताला लागे त्याने बेदम मारायचे. मला मोठी मौज वाटायची... सुरुवातीला लागलं होतं खुप .. पण म्हणतात ना ... मार मेक्स टारझन रायनो .
एकदा वडिलांनी माझ्या पाठीत पहार मारली तर ती वाकुन चक्क यु शेप ची झाली .. =)) पहारीचं नुस्कान झाल्यामुळे वडीलांनी माझ्या डोक्यात बंब घातला पण तो देखील तुटला... मग काय विचारता ... बाबांचा पारा वाढतंच होता. तरी बरं बाहेर थंडी होती. मग बाबांनी एक सुतोळी बाँब माझ्या हातात धरायला लावला आणि बाँब फोडायला लावला .. पण त्या बॉंबचं णशिबंच फुटकं की तो फुसका निघाला .. मग बाबा थकले आणि मी वाचलो .
- फिगो
8 Feb 2011 - 6:57 pm | सूर्यपुत्र
तुमचा तर व्ही-शेप आहे ना? मग पहार यू-शेप ची कशी काय बुवा झाली?
-मारवन.
6 Feb 2011 - 12:39 pm | इन्द्र्राज पवार
व्वा...एकदम अंगणातून स्वयंपाकघरातच आणून चिगोनी आईची खर्या अर्थाची शिकवणी समजावून सांगितली आहे. निखारा "धडा" देण्यासाठी तर दिला होताच, पण त्यानंतर त्याच माऊलीने ती धग शांत होण्यासाठी काय केले असणार, हे तुम्ही जरी लिहिले नसले तरी मी ते जाणू शकतोय. कारण पाण्यात सूर मारायचे शिकताना कपाळ फोडून घेऊन घरी आल्यावर तिच्या शिव्या आणि पाठीत बुक्क्या जशा खाल्ल्या तसेच त्याच आईने दुसर्या दिवशी परत सायकल स्वतःच रस्त्यावर आणून माझ्या हातात दिली होती आणि चांगले पोहणे आणि सूर मारणे शिकेपर्यन्त 'जखमा ह्या होणारच' अशी शिकवण, अर्थात मायेने, दिल्याचे आठवते. पुढे आयुष्यात कित्येक प्रसंगी सकारण (आणि अकारणही) 'पडण्या'चे डझनावारी प्रसंग आले तरी 'जखमा होणारच' ही तिची शिकवण काही विसरली गेली नाही.
शिव्यावरून एक आठवले....जी.ए.कुलकर्णी यांच्या कथेतील एक स्त्री पात्र शिव्या कशा पद्धतीने देत असे याचे खास जीए शैलीतील वाक्य....."तिच्या शिव्याही अशा काही टोपपदराच्या असत की, शिव्या द्यायला सुरुवात केली असता तिच्या तोंडासमोर जर दगडी पाटा धरला तर त्याला छानपैकी टाके पडत...!"
मस्तच लेख, चिगो.
इन्द्रा
6 Feb 2011 - 11:14 pm | माझीही शॅम्पेन
मूळ लेख एकदम फर्मास आणि खुमसदार ;), त्यावर ही प्रतिक्रिया म्हणजे अतिशय उत्कृष्ट अनुभूती !
6 Feb 2011 - 12:40 pm | कवितानागेश
एक काम कमी करायचं म्हटलं, तर एक कम फुकटचं वाढवून ठेवते हे पोट्टं>>
हा गुण बर्याच पोट्ट्यांमध्ये अनेक वर्षे टिकून राहतो!
8 Feb 2011 - 12:17 am | अंतु बर्वा
मी लहानपणी शाळेतुन घरी आल्यावर बॅगेतुन डबा काढुन ठेवत नसे. मग दुसर्या सकाळी सकाळी डबा भरताना आईला आधी तो धुवावा लागायचा. एकदा आईला इतका राग आला की तोच डबा मला फेकुन मारला. त्या दिवसापासुन शाळाच काय अगदी ऑफिसातुन आल्यावरही डबा आठवणीने काढुन ठेवतो.
हीच गोष्ट हस्ताक्षराची. केरसुणी ने मार खाल्लाय अक्षर चांगलं नाही म्हणुन.. लहानपणी एकदा सोड्याचं (छोटे झिंगे) कालवण केलं होतं. मी रस्सा खाउन सोडे तसेच ठेवले आणी त्यात हात धुतला आणी ते पाहुन आईने मला एवढा मजबुत धुतला की आजतागायत जेवण झाल्यावर ताटात काहीही टाकायला हात धजावत नाहीत.
पण त्याचमुळे आज शरीराला चांगल्या सवयी लागल्या आहेत... छडी लागे छमछम चा मंत्र आम्हाला लागु पडला खरा, पण आजकाल जिथे शाळेत मुलांना आधी ९११ डायल करायला शिकवलं जातं तिथे कितपत चालेल याबद्दल शंकाच आहे.
8 Feb 2011 - 2:50 am | सुनील
मार-गाथा आवडली!
(आमच्या एका "पलायनवादी" मित्राची आठवण आली!)
8 Feb 2011 - 1:32 pm | परिकथेतील राजकुमार
हेच चित्र आमच्या घरात होते.
झाडू आणि लाटणे हि आमच्या मातोश्रींची आवडती हत्यारे =))
8 Feb 2011 - 7:14 pm | धमाल मुलगा
हे कैच्च नै! कढई भिरभिरत येऊन हेल्मेटसारखी डोक्यात पडलीए का कोणाच्या? :D
टेबलफ्यान डाव्या हातात घेऊन उजव्या हातात त्याची वायर दांडपट्ट्यासारखी फिरताना पाठीवर उमटलीए का कोणाच्या? आणि ओरडलं तर 'हा फॅन पाठीत घालेन' अशी धमकी मिळालीये का?
शाळा सुटल्यावर अन्याय करतो म्हणून मास्तरला कुदलल्यावर घरी गेलं की आपल्याआधीच ही बातमी घरी पोहचुन हवा टैट झालीए आणि दारात आपलं पाऊल पडल्यापडल्या समोर बंदुकीची नळी दिसलीये का?
मार खायचा म्हणजे कसा....चिल्लरमध्ये मजा नाय राव....होलसेलमध्ये बुकलुन घेतलंय राव अंगच्या (अव)गुणांपायी!
9 Feb 2011 - 10:17 am | अमोल केळकर
' पण आईनी दिलेल्या ह्या मारानेच आयुष्याला वळण लागण्यास मदत झाली हे ही तितकंच खरं..'
वा क्या बात है
अमोल